उत्तम कथा हाताशी असेल, उत्तम दिग्दर्शक असेल आणि अभिनयनिपुण कलाकार ( भले मग ते नाववाले का
नसोत ) असतील तर कशी एक उत्तम कलाकृती तयार होते, याचे हे उदाहरण आहे.
मी हा चित्रपट सिडीवर बघितला आणि सोबत मेकिंग ऑफ ची सिडी पण होती. ती बघितल्यानंतर तर हा
चित्रपट जास्तच आवडता झालाय, म्हणून इथे लिहितोय.
लग्नाचा अर्थ समजलेला नसणे हि काही नवी थीम नाही.. उपहार, बालिका वधु, अनुभव ( पद्मिनी कोल्हापुरेचा.. तनुजाचा नाही ) वगैरे अनेक चित्रपट येऊन गेले. ते वाईटही नव्हते पण ते टिपीकल गुडी गुडी चित्रपट होते.
इथे केवळ हिच थीम नाही. पुर्वीच्या कथेत एक जोडीदार ( बहुदा नवरी ) अल्लड असे आणि नवरा समजूतदार असे.
इथे दोघेही न्यूनगंडाने ग्रासलेले. ( आयुषमानच्या शब्दात अंडरडॉग्ज ) तिला आपल्या स्थूलपणाचा तर त्याला आपल्या निकम्मेपणाचा गंड. त्यांच्या समंजस होण्याचा हा प्रवास.
यातल्या दोघांचे लग्न लागणे एरवी आपल्याला अशक्य वाटू शकले असते, पण इथे त्याची कारणमीमांसाही
व्यवस्थित दाखवलीय. त्याची नाखुषी पण तिचा उत्साह अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खुलवलाय. प्रत्येक प्रसंग अगदी वास्तव, कुणाच्याही घरी घडू शकेल असा. फक्त हरद्वारला अशी स्पर्धा ( पत्नीला पाठीवर उचलून धावायची ) होत असेल अशी शंका वाटू शकेल. पण या कथेच्या ओघात तिही वाटत नाही. आणि ते प्रेम ( आयूषमान ) साठी अशक्य असणार नाही, असे सूचनही कथेत आहे ( शाखेत जाऊन काय झक मारली का ? असा संवादही आहे चित्रपटात. ) कथेचा शेवटही एका योग्य प्रसंगावर केलाय. काही प्रश्न अनुत्तरीतच ठेवलेत ( उदा. त्याचा हरलेला मित्र आपले वचन पाळतो का ? दुकान विकल्यावर त्यांचे कसे चालणार ? त्याला सरकारी नोकरी मिळते का ? ती नोकरी स्वीकारते का ? ) पण त्या प्रश्नांना ते दोघे समर्थपणे सामोरे जातील, असा आपल्यालाच विश्वास वाटू लागतो.
मेकिंग मधे आयुषमान आणि भूमी जे बोललेत तेही महत्वाचे आहे. त्याने वजन कमी करून ६९ किलो केले होते, तर तिने वाढवून ८६ किलो. तरीही त्याने प्रत्यक्षात तिला उचलून घेतले होते, त्यासाठी कुठलीही ट्रीक वापरलेली नाही. उलट जो बॉडी डबल आणला होता, त्यालाच ते जमले नव्हते. दुसरे म्हणजे भूमीने मुद्दामहून सांगितलेय कि त्याने प्रत्येकवेळी तिला पाठीवरून उतरवताना अगदी हळूवारपणेच उतरवले.
तरीही तिचा स्थूलपणा हा चित्रपटाचा मुख्य विषय नाहीच. तिचा स्थूलपणा अधोरेखीत होईल असा कुठलाही अपमानास्पद कॅमेरा अँगल चित्रपटात नाही ( संवादात अपमानास्पद उल्लेख आहेत, पण ते कथेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. ) एरवी स्थूल पात्र असेल तर त्याने चित्रपटात बकाबक खाण्याचा, पाय घसरुन पडण्याचा, किंवा त्याच्या वजनाने टायर पंक्चर होण्याचा प्रसंग विनोदनिर्मितीसाठी केलेला असतो, इथे तसे काहीच नाही.
तरीही अगदी दोन सूचक प्रसंग आहेत. ते जेव्हा सरकारी पुस्तकालयात रिक्षातून जातात, त्यावेळी तिच्या आड बसलेला तो अजिबात दिसत नाही ( पण असाच शॉट ती मुलाखतीला जाते त्यावेळी मात्र टाळला आहे ) आणि मोह मोह के धागे च्या वेळी त्याला स्कूटर, स्पीड ब्रेकरवरुन न्यायला त्रास होतो तो प्रसंग.
कथेसाठी जो काळ निवडलाय तो पण अनोखा आहे. कॅसेटचा जमाना संपून सिडीचा जमाना सुरु झालाय त्यामूळे आधीच निक्कम्मा ठरलेल्या प्रेमपुढच्या समस्याही वाढणार आहेत. तो काळ, त्या काळातल्या काही कॉमन पद्धतीवरून ( कॅसेटवर गाणी भरून घेणे ) आणि अर्थातच त्या काळातल्या गाण्यातून मस्त दाखवलाय.
अलिकडच्या काही चित्रपटातून भारतातली शहरे महत्वाची पात्रे बनून समोर येताहेत ( कहानी मधले कोलकाता, शूद्ध देसी रोमान्स मधले जयपूर, एन एच टेन मधले गुडगावाँ, फुकरे मधली दिल्ली ) तसेच इथे हरद्वार येते. प्रत्येक शॉट मग तो घरातला असो, गल्लीबोळातला असो कि शाखेतला असो, हरद्वार जाणवतेच. हे गाव नुसते दृष्यातूनच नाही तर भाषेतूनही जाणवते. काही शब्द तर खासच. ( तू जरुर भागोगो, साखाबाबू, सरकारी पुस्तकालय )
संवाद तर खासच आहेत. खास करून दोघांच्या आया, आत्याच्या तोंडचे तर.. कहर आहेत. भाषा, संवादा बरोबरच छोट्या गावातले जे व्यवहार असतात, ते पण नेमके दाखवलेत. ( तिला शेजारणीने वाटेत थांबवणे, पेपरमधे सुईसाईड नोट लिहिली म्हणून पोलिसाने घरी येणे, पेढे वाटताना अर्धाच पेढा घे असे सांगणे.. )
पुर्वी चित्रपटात एखादे घर दाखवायचे असेल तर एक सेट तयार केला जायचा ( तेरे मेरे सपने चित्रपटात तर असा सेटच दाखवलाय ) पण इथे ते घर पण एक पात्र बनून समोर येते. त्या घराच्या गिलावा उडालेल्या भिंती, नदीच्या दिशेचा तुटलेला कठडा, त्या दिशेने असणारे दोन वापरात नसलेले सज्जे, खडाखड वाजणारे दरवाजे... सगळे त्यांची आर्थिक परिस्थिती दाखवतात. पण तरीही ते गरीब बिचारे नाहीत. सुहागरातीला झेंडूच्या माळा लावणे, वाढदिवसाला क्रीम पेस्ट्री वाटणे सारख्या छोट्या छोट्या प्रसंगातून ते आनंद साजरा करतात. त्या घरातील सर्वांचाच वावर अगदी नैसर्गिक वाटतो. त्यांचा एकमेकातील जिव्हाळा पण अगदी सहज दिसतो ( त्याला उलटी झाल्यावर वडील त्याचे तोंड आपल्या कुडत्याने पुसतात, आत्या शोक करताना, जीजी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते.. )
मेकिंग ऑफ मधे भूमी म्हणालीय कि चित्रपटातले काही प्रसंग, सुचलेच कसे असे आम्हाला वाटले. त्या दृष्टीने मला काही प्रसंग खासच वाटले. उदा. आत्या आणि संध्या मिळून फळीवरचे डबे लावतात, संध्याचा भाऊ तिला माघारी न्यायला येतो, नव्या बहूचा कौतूकाचा सैपाक जेवून पोट न भरल्याने आई, बाबा आणि आत्या चोरून जेवतात.. )
तिन्ही गाणी आपापल्या जागी फिट्ट. सुंदर सुशील मधले शब्द, त्या कलाकारांचे आवाज आणि पडद्यावरचा सामुदायिक विवाह, त्यातले वधू वर, गायक कलाकार भन्नाट. मोह मोह के धागे ची चाल सुंदर. शर्यतीच्या वेळचे गाणे प्रेरणादायी... आणि शेवटी येणारे गाणे चित्रपटापासून फटकून असले तरी त्या काळाशी सुसंगत.
चित्रपटातले विनोदी प्रसंगही ओढून ताणून आणलेले नाहीत. ( उदा कोर्टात दोन विहिणी भेटातात तो प्रसंग, तिची वकील संध्याच्या घरी येऊन इंग्रजीमधे बोलते त्यावरच्या तिच्या आईच्या प्रतिक्रिया. ) ते अगदी त्या त्या पात्राच्या नैसर्गिक स्वभावाला अनुसरूनच.
आयूषमान सोडला तर बाकी कुणी कलाकार फार परिचित असा नाही. तरी पण त्यांची निवड अगदी चपखल आहे.
संजय मिश्रा ( प्रेमचे बाबा ) अलका अमीन ( प्रेमची आई ) शीबा चढ्ढा ( प्रेमची आत्या ) सीमा पाहवा ( संध्याची आई ) सर्वच कलाकारांचा अभिनय अव्वल आहे.
भूमीचा पहिला चित्रपट असूनही ती कुठेही नवखी वाटत नाही. तिची तयारी सीमा पाहवानी करून घेतली, असे तिच म्हणालीय, त्यामूळे ती पुर्णपणे संध्याच वाटते.
आयुषमान तर माझा खुप आवडता कलाकार आहे. त्याचा चेहरा विलक्षण बोलका आहे. विकी डोनर, नौटंकी साला आणि ही भुमिकाही अवघडच होती. कुठलीही हिरोगिरी करायला वाव नसणारी हि भुमिका त्याने ताकदीने पेललीय. खास करून त्याचा मित्र त्याला शाखेतून दुकानात नेतो त्यावेळचा त्याचा अभिनय, अंगावर रॉकेल ओतून माचिससाठी आरडाओरडा करण्याचा प्रसंग आणि मुझे वापस नही जाना है, उसे रोक लो असे संध्याने म्हणताच त्याच्या डोळ्यात आलेली चमक... दाद देण्यासारखे आहे.
हा चित्रपट मी सिडीवर बघितल्याने आवडते प्रसंग परत परत बघितले. शक्य असल्यास हि सिडी संग्रही ठेवाच, असे सुचवेन.
मस्तं लिहीलंय दिनेशदा! आता
मस्तं लिहीलंय दिनेशदा!
आता पहावाच लागेल हा चित्रपट.
जाई, ते सिनेमा बघताना वाटल
जाई, ते सिनेमा बघताना वाटल होतं. तिने वजन कमावल्याच् इथे वाचुन समजल असही लिहीलय बघ मी सुरुवातीलाच.
तिचे फोटो बघितले काल हा लेख वाचल्यावरच. मोबाइल वरुन लिहीत असल्याने आधी एव्हढे डिटैलवार लिहीले नाही
हो माझ्या पोस्टित now शब्द
हो माझ्या पोस्टित now शब्द राहिला
दिनेशदा, मस्त लिहिल आहेत.
दिनेशदा, मस्त लिहिल आहेत. बघायचाच आहे हा चित्रपट ह्याची परत एकदा जाणीव झाली
भूमीला खरेच वेगळ्या भुमिकेत
भूमीला खरेच वेगळ्या भुमिकेत बघायला आवडेल. तिने टिपीकल इनुदी भुमिका मात्र करू नयेत.
अगदी एंट्रीलाच, निर्या सैल झाल्या, पदर सापडत नाही... असले संवाद बोलत येणारी नवी नायिका साकारायला खुप गट्स लागतात.
खरं तर या चित्रपटात, बरेच छोटे छोटे घटक आहेत ( उदा. बहिणीची नावे, जया आणि हेमा ) जे खुदकन हसायला लावतात.
दिनेशदा, खूप छान चित्र
दिनेशदा,
खूप छान चित्र परीक्षण. कित्येकदा पाहिला आहे हा चित्रपट रिलीज झाल्यापासून पण तरीही नवीनच भासतो.अतिशय छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा कालानुरुप मांडल्या आहेत, उदा. प्रेम संध्याला न्यायला पहिल्यांदा तिच्या घरी जातो तेव्हाचा त्याचा अवतार्,कोट अन स्पोर्ट्स शूज...जी त्या काळामध्ये फॅशन होती.
सर्व कलाकारांच अभिनय सुद्धा सुंदर.
दिनेशदा, मस्तच लिहिलंय!!! आता
दिनेशदा, मस्तच लिहिलंय!!! आता मात्र हा चित्रपट पहावाच लागेल.
मस्त परिक्षण! आता पहावाच
मस्त परिक्षण! आता पहावाच लागेल.
दिनेश खूप आवडलं परीक्षण !
दिनेश खूप आवडलं परीक्षण ! खरंच बदललं आहे सिनेमाजगत . पाहिला पाहिजे .
काढला रिसायकल बिन मधून.. आज
काढला रिसायकल बिन मधून.. आज रात्रीच्या जेवणात सोयाबीन असल्याने हे सुचले.. पीजे मारायला म्हणून नाही बोलत, सिरीअसली होते.. पण आता बघेन निवांत.. धन्यवाद
दिनेशदा मस्त लिहिले आहे. मला
दिनेशदा
मस्त लिहिले आहे. मला खुप आवडला सिनेमा. मी रीलेट होवु शकले भुमीच्या भुमिकेशी. तिचं बिच्चारं नसणं हाच यु.एस.पी. आहे सिनेमाचा. कलाकार तर सॉलिड आहेत. भुमी पेडणेकर जी यश राज फिल्म्स मधे कास्टींग डायरेक्टर होती तिने इतका कसलेल्या नटी सारखा खणखणीत अभिनय केला आहे.
सन्जय मिश्रा खुप म्हणजे खुपच आवडतो. अगदी गोलमाल सिरीज असो, वन टु थ्री सारखे तद्दन भंकस सिनेमा असोत किंवा "गुरुजी" चा छोटासा रोल जॉनी एल.एल.बी मधे असो, किंवा फस गये रे ओबामा असो संजय मिश्रा धम्माल करतो.
भुमीची आई दाखवली आहे ती पुर्वाश्रमीची "सीमा भार्गव" जीला आपण "हमलोग" मधली "बढकी" म्हणुन जास्त ओळखतो. दिल्लीच्या एन.एस.डी. ची पदवीधारक आणि हिंदी रंगभुमीवरची अतिषय ताकदीची अभिनेत्री. तिचे एक नाटक एन.सी.पी.ए ला पहिले होते.
आत्या झालेली शीबा चढ्ढा "तलाश" मधे म्हातार्या वेश्येच्या भुमिकेत बाजी मारुन गेली होती. आयुश्यमान खुराना खुप छान काम करतो. वेगळ्या भुमिका करण्याची हिम्मत त्याच्या कडे आहे.
ही अशी लोकं मला फार आवडतात. गाजणारे जे नायक्/नायिका आहेत ते सगळे साचेबंद भुमिका करताना आढळतात. त्यांचे सिनेमा बघवत सुध्धा नाहीत. त्या पेक्षा आजकाल हा जो नवा ट्रेंड सुरु झाला आहे तो जास्त चांगला आहे. ज्या कलाकारांना अभिनय खुप चांगला करता येतो त्यान्च्या सिनेमांना गर्दी होत आहे, हे चांगले लक्षण आहे. नाहीतर शाहरुख, सलमान, सैफ हे साचेबंद तेच ते आणि तेच ते सिनेमे बनवत आहेत. "हिरो" "हिरोपनती" ह्या सारख्या सिनेमा मधुन त्याच त्या आणि त्या लव स्टोर्या किती काळ बघत बसायच्या?
वेगळे प्रयत्न थेटर मधे जाउन बघा.... तरच निर्माते असे धाडस करतील.
मस्त परीक्षण
मस्त परीक्षण
Pages