नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नारळीभात एकदाच केला होता आणि तो मी ओगले आजींच्या पद्धतीने केला होता. ही गोष्ट २००१ ची आहे. त्यावेळी इथे आम्ही तुज आहे तुजपाशी हे नाटक बसवत होतो. माझ्याकडे तालिम होती आणि अनायासे रक्षाबंधन सुद्धा जवळ आले होते. म्हणून मी हा भात करुन पाहिला तर सगळ्यांना तो इतका आवडला की प्रत्येकांनी तो एकदा घरी करुन पाहिला होता.

त्यानंतर मी कधीच नारळीभात करुन पाहिला नाही की खाल्लाही नाही. पण सहसा एका प्रयत्नात मला पाककृती जमतात Happy

सगळ्यांचे नारळीभात छान झाले. गुळ साखर एकत्रित करणे मलाही आवडले नाही. गुळच छान लागतो नारळीभातात.

स्वाती, साधारण ४२ लोक (२८ मोठे आणि १४ लहान) गणपती दर्शनाला येणार आहेत. सगळ्यांना अजून २-३ ठिकाणी जायच आहे. त्यामुळे नारळीभात, अळुवड्या आणि पन्हं असा सुटसुटीत बेत ठेवला आहे. प्रत्येकाला एक मूद भात द्यायचा असेल तर किती वाट्या तांदूळ लागेल?

आज ह्या पद्धतीने केला . मस्तच झालाय . आता ना भा करणे म्हणजे बाये हाथ का खेल झालाय . ( स्मित )

मी ही केला असाच भात आज.. पण तंदूळ जरा कच्चे राहिल्या सारखे वाटतायत.. काय झालं असेल?
३ शिट्ट्या केल्या होत्या प्रे.पॅ च्या

तीन शिट्या झाल्या की दहा मिनिटं बारीक गॅस वर कुकर ठेवायचा म्हणजे भात छान फुलून येतो आणि मऊ मोकळा हि होतो.

फोटो नाही तरी सालाबादप्रमाणे यंदाही या रेस्पीचा भात काल करून झाला! खल्लास!
म्हणजे अगदी ऐन वेळी ठरवून, प्रे पॅ नसताना हार्ड अ‍ॅनो भांड्यात मंदच आंचेवर ठेवून फार मस्त झाला. आताशा माझ्या हातून गोड पदार्थ अंमळ कमीच गोड होतायत पण मग आज पुन्हा खाताना अजून थोडं तूप आणि थोडी पिठीसाखर (मला हाणू नका यासाठी) घालून सारखा केला तर अजूनच खतरनाक म्हणजे मस्त भारीबिरी झाला! Happy

काल केला ह्या रेस्पीने. छान झाला होता. मोबिला हरवला आहे त्यामुळे काढला नाहीये.
मी पण मनीमोहोरप्रमाणे तीन शिट्यानंतर पाचेक मिनिट गॅस कमी करुन ठेवला होता.

मी पण ह्या क्रुती ने ना भा केला आणि उत्तम झाला होता. मी साखर वापरुन केला, साखरेचं प्रमाण तान्दुळाएवढच घेतल होतं. भाताचा प्रत्येक शीत वेगळा राहीला तरीही चव एकदम मिळुन आली होती.

खास प्रेशरपॅन आणून केला यंदा नारळीभात. छान झाला होता. दुसर्‍या दिवशी जास्त छान लागला. माझ्याकडून पाणी जास्त पड्लयामुळे थोडा ओलसर दिसत होता केला तेव्हा. एकच वाटी तांदूळ घेतला म्हणून आठवणीनं सगळी प्रमाणं निम्यानं घेतली पण पाण्याचं तेवढं विसरले. तरी तिसरी वाटी पाणी घातल्यावर लक्षात आलं त्यामुळे अगदीच खीर झाली नाही.

जशीच्या तशी रेसिपी फॉलो केल्यास पाप लागतं आणि गुळाला चटका लागल्याशिवाय छान खमंग चव येत नाही या दोन्ही थेर्‍या आवडत्या असल्यामुळे तुपाच्या फोडणीत तांदूळ, नारळासोबत गूळ पण घातला आणि आधणाचं पाणी घालण्याआधी ते मिश्रण छान परतून घेतलं.

Pages

Back to top