"जळ्ळं मेलं 'लक'शण!!" गद्य STY - १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 16:35

भारत विभूषण आपल्या सिंगल रूममध्ये विमनस्क स्थितीत बसला होता.. आत्ता या घडीला 'सबसे अनलकी कौन' असा गेम शो कुठे असता तर तो नक्कीच जिंकला असता.
तसा तो जन्मापासूनच अनलकी होता. जन्म देतानाच आय मेली अन् बाप आधीच गेला होता घर सोडून. आठवत होतं तेव्हापासून त्याच्या आज्यानंच त्याला वाढवलं होतं.. चार वर्षापूर्वी तोही गेला, अन् हा एकाकी झाला बिचारा.

त्याला बॉलीवूडचा नेक्स्ट 'मगनभाई ड्रेसवाला' बनायचं होतं.. डीझायनर ड्रेस कॅटवॉकपुरते ठीक हो, बाकी, ड्रेस सप्लायरच लागतो लोकांना.. तो बनायचं स्वप्न होतं त्याचं.. त्या स्वप्नापायीच त्याने होती-नव्हती ती पुंजी लावून अंधेरीला खोपटंही टाकलं होतं, दोन टेलर, चार मशिन टाकून काम सुरूही केलं होतं.. त्या निमित्तानं फिल्म लायनीतल्या लोकांच्या बातम्या, गॉसिपही कळत होतं.. पण तिथही नशीब आड आलं! भारतने धंदा सुरु केला तोवर प्रसिद्ध निर्माता 'उदास घाई'चा धंदा पार बसला होता. तो पार कर्जात बुडाला होता.. बहुतेक ड्रेस सप्लायरचा धंदाही मंदा झाला होता कारण दोन चार हातरुमालांमध्ये हिरवणींचे काम भागायला लागले होते. हिरो ही ६-८-१० पॅकच्या नादात असल्याने ड्रेस सप्लायर्सचे धंदे पॅक ह्यायची वेळ आली होती.

त्यातच दुकान टाकताना तिथल्या रामूदादाला पन्नास हजार द्यायचे कबूल केले होते त्यानं.. आता त्याची मदार 'संजीव मिली भोपाली' च्या 'हम देवदास हो चुके सनम' वर होती पण भोपालीनं घातला की सिनेमा डब्यात! सिनेमाच नाही, तर पैसे कुठले??? रामूदादानं वाट पाहिली, पाहिली आणि एक रात्री सोडले चार गुंड दुकानावर! मेल्यांनी पार नासधूस करून टाकली 'भारतभाई ड्रेसवाला'ची! मशिनं मोडली, टेलर गेले पळून वर भारतभाईचे टाकेही ढिले केले.

आता कपाळावर हात मारून बसण्यापलिकडे भारतकडे काहीच करण्याजोगं नव्हतं.. हाती ना पैसा, ना काम, ना कोणी जीवाभावाचा/ची ज्याच्याकडे मन मोकळं करू शकेल.. प्लेन अनलकी फेलो..

स्वत:च्या नशीबाला शिव्या घालता घालता त्याला आठवलं की त्याच्या आज्याने राम म्हणायच्या आधी त्याला एक चपटी लाकडी पेटी दिली होती.. कुठे गेली बरं? रूममध्ये थोडी उचकापाचक केल्यानंतर ट्रंकेच्या तळाला पडलेली ती पेटी त्याच्या हाती लागली. बाहेर काढून, थोडी साफ करून भारत तिच्याकडे निरखून पहायला लागला.. वीतभर लांबी-रुंदीची आतून रिकामी असलेली साधी पेटी होती ती.. पण ती त्याला देताना काय बरं म्हणाला होता म्हातारा.. हां..

'बिभिषणा (आजा त्याला ह्याच नावानं लाडानं हाक मारायचा..) ही पेटी जपून ठिव रंऽऽ सोन्या.. येकदम पावरबाज पेटी हाय, अशीतशी समजू नगंस.. ही पेटी येखाद्याचं नशीब खोलू शकते बग.. म्या फिम्लीस्तानमदी स्पॉटला व्हतो बग, तवा तिथं शूटींग बगायला आलेल्या येका साधूनं दिली व्हती ही.. हां, येकदम पॉवरबाज.. लै बेक्कार दिवस आलं आन् कोनचाच दरवाजा हुघडत न्हाई आसं वाटल ना, की ह्या पेटीवर हात ठिवायचा आन् मंत्र म्हणायचा 'वक्त की फितरत खोलले किस्मत, खुद पे भरोसा है तो आजमाले अपना लक' आन् मग बगंच, अशीऽऽऽ किस्मत खुलेल तुजी.. हां पण ध्यान्यात ठ्येव, पैश्यापायी, लोभापायी पेटीला कामाला लावायचं न्हाई.. फकस्त अडचण आस्ली, तरास आस्ला, काय करावं, कसं करावं कळंना झालं, की मंगच पेटीकडं जायाचं.. हुब्या जिनगानीत तुला अजून काय देऊ नाय शकलो बग.. हीच काय ती माजी इष्टेट.. तुला दीतोय.. पन द्येव करो आणि तुला ती कधी वापरायची येळ न येओ..'

भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला..

इतक्यात.. 'भारतभाऽऽऽय' अशी हाळी आली खालून.. कोण ते आलं या वक्ताला? म्हणून भारतने खाली पाहिलं तर चक्क एरीयाचा दादा सत्तूभायचा उजवा हात पक्या खाली उभा!

"आयला पक्या! अब्बी कैसे?"
"नीच्चे आ बे.. भाय बुलारा.."
"कौन? सत्तूभाय????" भारतचा विश्वास बसेना..
"और कोन? और कोन भाय है बे इधर????" पक्या चिडला की डेंजर माणूस!
"आलो आलो.."

तिच्यायला! तिकडे अंधेरीत रामूदादा आणि इकडे गिरगावला हा सत्तूदादा. साला तो तिकडे टाका ढिला करतो आता हा इकडे काय उसवतोय?

असावी म्हणून भारतने ती पेटी शर्टच्या आतल्या पैरणीच्या खिश्यात सरकवली आणि जिना उतरायला लागला..

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का? का पेटीत अजून काही रहस्य होतं?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रे एका प्रसंगात नव्याने इन्ट्रोड्यूस करू नये.
४) गाणी घालू शकता (घालाच )
५) स्थळं, काळ, वेळ याला बंधन नाही, लॉजिकचाही हट्ट नाही, पण किमान सूत्र असावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्तुभायच्या दत्तुसोबत भारतयात्रा निघाली. अंधेरीच्या गल्लीतून पकुटल्या मागुन चालताना सत्तुभाय आपल्याला किती व कसे उसवतोय या विचारानेच भरतच्या डोळ्यापुढे अंधेरी आली. कसाबसा भेलकांडत तो त्याच्या मागे निघाला. पकुने त्याला अक्षरश: स्कॉर्पीयोत कोंबले व डायवरला 'चल बे' अशी ऑर्डर सोडली.

सत्याभायच्या चाळीत गाडी शिरली तशी भरत भानावर आला. अजुबाजुला चेहर्‍यावर लाचार भाव असणारे पिडीत व भयंकर उर्मट्ट भावप्रदर्शन करणारे सत्याचे गुंड बघुन भरतला 'सत्यमेव जयते' म्हणावे का 'सत्याला मरण नाही' हे कळेना. पकुने त्याला भाईच्या खोलीत धक्का मारला व तो बाजुला उभा राहीला.

भरतने भाईसोबत थोडी आखमिचोली खेळली. जगातले ९०% भाई असे पितरी का असतात अशी एक लघुशंका बराच वेळ गाडीत बसल्यावर येणे स्वाभावीक होते. आपल्या मनातले विचार समोरच्या सांगाड्याला कळले तर आपली खैर नाही हे सत्याला जाणावले. व तो भाईला म्हणाले 'काय भाई, माझ्याकडुन काही चुकले का? गरीबाला कशी याद केलीत?' भाईने नुसतेच त्याच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. तेव्हढ्यात सत्याभाईचा मोबाईल वाजला ' सर्व जगाच्या जनतंला, या तापानी पछाडला, तापानी पछाडला, अरे बाबा डुकराने सतावलं.' (चाल : खंडेराया च्या लग्नाला)

फोनवरील संभाषणात आपले नाव आलेले बघुन भरत दचकला. कुणीतरी भाईचा पितामह बोलत होता म्हणे. त्याचे आपल्याकडे काय काम असेल असा विचार करत असतानाच भाईने 'काय घेणार चा की कापी' असे फर्मास मरठीत विचारले. आपण काहीच नको म्हणले तर हा आपल्याला चाचा करायला लावेल या भितीने भरत 'चा चालेल' म्हणाला. 'आमच्यात चा चालत नाय, चा पितात' असा पाचकळ जोक सत्याभाईने मारला व अजुबाजुचे अश्क्या, दिल्या, रम्या फिदीफिदी हसले.

'हां, तर आपले एक काम आहे भरतराव तुमच्याकडं' असे सत्याने म्हणताच भरत गडबडला. या पेटीच्या चमत्काराने असले लक नशीबात नको असे क्षणभर त्याला वाटले पण 'करणार का नाय ते बोल, नायतर मगनलाल हायेच' या सत्याच्या धमकीमुळे भानावर आला. 'भाई तुम्हाला कोण नाय म्हणतय?' असे म्हणुन मोकळा झाला. 'नकोच म्हणु, तो छगन नाय म्हणला तो मुडदा पडलाय बघ त्याचा ओसरीत. जाता जाता दिसेलच तुला. हं तर काम अस आहे की दुबईतुन १ नंबरची आर्डर आलीय. शिवणाचे काम हाये. कापड आम्ही पुरवु, लै पडलय झेंड्याचे. आम्हाल ३ पदरी दोन लाख फडकी बनवुन हवीत. पुढच्या ८ दिवसात लय मागणी येणार आहे त्याला. पक्या याला मापाला ते मास्क का काय ते दे' असे म्हणुन भाई निघुन गेला.

पक्याने भरतच्या हातात तो मास्क कोंबला व त्याला कल्टी मारा म्हणाला.

हे शाबास केप्या.. लिही लिही.. मलाही लिहायचं आहे, पण नेट स्लो झालंय अन् काम वाढलंय..
तरी पण एक तरी एपिसोड लिहिनच.. Happy

क्यु रे? क्या हुआ तेरे साथ?" सत्तूभाईने त्याला विचारलं. पक्या बाजूलाच उभा होता. भारतला दरदरून घाम फुट्ला होता.
"क क किधर कुच" भारतने सारवासारव केली. "कुच भी तो नही."
खरं तर सत्तू भाई का आलाय हे त्याला माहित नव्हतं. त्याला नक्की काय हवय हेही त्याला माहित नव्ह्तं. पण तरीही "या दादा भाईची संगत कधीबी धरू नकोस" या आज्याच्या शिकवणीनुसार तो कायम असल्या लोकांपासून दूरच राहिला.

"वो हरामजादेने इसको अंडेके माफिक फोडा तो भी यहीच बोलेगा की कुच नही हुआ" पक्या मधेच पकपकला.
सत्तूभाई हसला. लाल पट्यापट्ट्याचा शर्ट काळी पँट आणि डोक्यावर टोपी. डोळ्यात सुरमा आणि तोंडात गुटखा.
"अबे चिंगुट, वो रामूदादाने मारा ना तेरेको. कितना पैसा लिया था उससे?"

भारत आता थरथरायला लागला होता.
"पचास हजार!"
"बस्स्स.. पूरे पचास हजार" सत्तूभाईनी गब्बारची नक्कल ठाकूराच्या आवाजात आणो धर्मेंद्रच्या स्टाईलने केली. "साले, ये एरिया का मै भाई हू. तू मेरेको छोडके तू उसके दरवाजे पे गया!!" तो अचानक गरजला. "और वो तेरेको मारा तो मेरेपास आया तक नही तू!"

"भाई, अंधेरीमे दुकान है मेरी. उधर तो रामूदादा का राज चलता है. इसलिये उसीसे पैसा लिया."
"तो क्या हुआ.. अपनी गली मे तो हर कुत्ता शेर होता है.."
"जैसे आप गिरगाव के शेर हो" पक्या परत पकला.
सत्तूभायने त्याच्याकडे एक विजयी कटाक्ष टाकला.

"चल. वो रामूदादाकी मस्ती उतारके आते है साला मेरे अरियाके आदमी पे हाथ उठाता है. अभी चल गाडीमे. "

भारतला हो किंवा नाही म्हणायची गरजच नव्हती. पक्याने लगेच त्याची गचांडी पकडली. आता रामूदादाच्या अड्ड्यावर गेल्यावर काय होइल ते पाहणे याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीच नव्हते.

अल्लाद्दिनच्या जादुई चिरागसारखी एखादी वस्तू आपल्याकडे असताना पण तिचा वापर करून आयुष्य सुखात घालवणे आप्ल्या नशीबात नाही, हे वाटून भारतला परत आपण फारच अनलकी आहोत असे वाटून फारच रडू आले.

ठीके, जोडू आपण हा धागा, हाकानाका.. Proud
दोन्ही भाग मिळून, भारतला ऑर्डरही मिळाली आणि सत्तूभाय रामूदादाच्या अड्ड्यावर ही निघाला असं समजून पुढे लिहा..

रच्याकने, केप्या Rofl लय भारी! डुक्कर दुबईसून आला होय रे! Lol

हह. आता असे समजून चाल की भारतला मास्कची ऑर्डर मिळाली आणि सत्तूभाई रामूदादाला मारायल अंधेरीला गेला.

जाता जाता मग स्कॉर्पिओमधे.. भारत त्याला मिळालेल्या ऑर्डरचाच मनात विचार करत होता. खरं म्हणजे त्याला मोट्टा ड्रेसवाला व्हायचं होतं आणि काय हे लोकांच्या नाकाला कपडे शिवायची वेळ आली. कुणाच्या नाकाला पुरणार नाही इतक्या कपड्याने आपलं अंग झाकणार्‍या आजच्या हिरविणींचाही त्याला क्षणभर राग आला..

अचानक सत्तूभाईकडे नजर वळल्यावर विचारांची गाडी आपसूक मास्कच्या विचाराकडे वळली. आजकाल रस्त्यावर मिळणारे मास्क त्याने पाहीले होतेच तसेच फ्री साइज मास्क शिवायचे. आठ दिवसात दोन लाख म्हणजे दिवसाला २५००० म्हणजे मोठच काम होतं.. पण भाई पैशाबद्दल काहीच बोलला नव्हता आता भाईच तो त्याला कसं बरं विचारावं ? एका मास्कची किती बरं शिलाई मिळायला हवी?

कर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र कचक....कचक.. गाडीला करकचून लागलेल्या ब्रेकमुळे भारत भानावर आला. धडाधड गाडीची दारं उघडून सत्तूभाई आणि गँग खाली उतरली. भारत बसल्या जागेवरुन बाहेर काय चाल्लंय ते पहात होता. समोर एक जीप थांबली होती. त्यातून रामूदादा आणि त्याची गँग बाहेर पडली. आता सत्तूभाई आणि गँग आणि समोर रामूदादा आणि गँग असा सीन होता..

पक्याने हातात कोंबलेले मास्क विमनस्क मनःस्थितीत पाहत भरत तिथेच उभा होता.. कितीतरी वेळ.. आता हे नक्की काय आहे? त्याला आठवले..लहान मुलांचे साडे तीनशे लंगोट एका दिवसात फग्गीज कंपनीला शिवून दिले होते त्यांच्या जाहिरातीसाठी...म्हणजे साध्या लंगोटांपेक्षा फग्गीज कंपनीच्या चड्या घालून बाळ कसं हसरं राहतं अशी अ‍ॅड करायची होती त्यांना.. च्यायला, हसरं रहायला बाळाला चड्ड्या कशाला घालायला हव्या? आमच्या वस्तीत येऊन बघा.. एका हसर्‍या बाळाला लंगोट असेल तर शप्पथ!... पण या फडक्यापपेक्षा ते लंगोट तरी मोठे होते. हे कसे पुरायचे? शिवाय याला बांधायला अशा नाजुक नाड्या.. जरा बाळ कुशीवर वळलं तर दोन मिनिटात तटकन तुटतील.. त्यापेक्षा फग्गीज चड्डीला चिकटवायची सोय असते.. असा विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला..
ही देवाने नशीबाचे दरवाजे उघडायला दिलेली शेवटची संधी आहे!! नुसता आज्याने दिलेल्या पेटीचा विचार केला काय अन ही आयडीया आली काय!!.. देवाचाच संदेश..!! त्याने हात जोडण्यासाठी आभाळाकडे पाहिले अन नजर वरुन खाली येतानाच त्याला समोर एक देऊळ दिसले. तो लगेच घंटा वाजवून हात जोडून उभा राहिला.. आणि गाणे सुरु झाले..
(चाल : दिल्ली ६ मधलं..दरारे दरारे माथे पे मौला ; मर्‍हम्मत मुक्कद्दर की कर दे मौला.. मेरे मौला..)
"दमून भागून लांबून आलो आहे
काट्याकुट्यातून ठेचकाळलो आहे
भेगा भेगा पायाला या देवा..
डागडुजी नशीबाची कर ना देवा..
माझ्या देवा...
माझ्या देवा..
ही रापलेली कातडी नाही पायात मोजडी
कळकट कपडे नाही निजाया गोधडी
माझ्या देवा...
माझ्या देवा..
डागडुजी नशीबाची कर ना देवा..
माझ्या देवा...
माझ्या देवा..
केली आज्याची सेवा दिला त्याने मेवा
पेटी ती नशीबाची उघडू का देवा
माझ्या देवा...
माझ्या देवा..
डागडुजी नशीबाची कर ना देवा..
माझ्या देवा...
माझ्या देवा..
किती तू दयाळू किती मी गबाळू
तुझा संदेश मज नाही कळला रे देवा
माझ्या देवा...
माझ्या देवा..डागडुजी नशीबाची कर ना देवा..
माझ्या देवा...
माझ्या देवा..
ही शेवटची संधी नाही यायची पुन्ह्यांदी
आता तरी नक्की यश दे हातामंदी..
माझ्या देवा...
माझ्या देवा..डागडुजी नशीबाची कर ना देवा..
माझ्या देवा...
माझ्या देवा.."

(गाणे संपले.)

नमस्कार करुन त्याने डोळे उघडले... आता त्याच्यापुढे एकच लक्ष्य होते.. त्या फग्गीज ला स्पर्धा देणारी मास्कची कंपनी सुरु करायची! हवेशीर्..त्यासाठी पुरेशी छिद्र असलेली तरीही भरपूर उबदार. टिकाऊ..चिकटवण्यासाठी फेविकॉल लावलेली आणि फग्गीजपेक्षाही अधिक कापसाचा भरणा असलेली मास्क! इतक्यात समोर कसला तरी आवाज झाला आणि तो भानावर आला..

Lol इथे तासनतास एकही पोस्ट येत नाही, आणि आलं की एकावर एक दोन! आता काय करावं?

तर मीनुच्या आणि आशूच्या पोस्टच्या कालवणानुसार भारत जीपमध्ये बसून 'फग्गीज्'चे विचार करतोय आणि तिकडे दोन गँग एकमेकींसमोर उभ्या ठाकल्यात असं समजा..

आशू, गाणं वगैरे! सहीच.. हुशार आहे मुलगी Happy

लोकहो, लिहित असाल, तर रूमाल टाका
आणि रूमाल टाकलेला आहे, तोवर पुढच्याने लिहू नका..

आणि रूमाल टाकलेला आहे, तोवर पुढच्याने लिहू नका>>>
हे जास्ती महत्वाचे. नंदीनीमुळे हवेसारखे अनेक जण बुच कळ्यात पडले आहेत.

मी मात्र पोस्ट करण्याआधी कुणाचं काही पोस्ट आलंय का हे पाहीलं होतं. कुणी लंगोट .... आपलं रुमाल टाकून ठेवलाय का ते ही पाहीलं होतं.

मला वाटतं अशानं सूतकताई नीट होणार नाही. नंतर येणारं पोस्ट ज्याचं आहे त्याने वरच्या पोस्टशी सुसंगत बदल करुन टाकले तर जास्त बरं पडेल. संयोजक समिती याबद्दलचा काही नियम बनवून इथे टाकेल तर जास्त बरं होईल कदाचित..

आशे फग्गीज काय बरं बरं Wink काय विशेष.. ???

काय पण एकेकाची 'लक'शने.. Lol
केपी, नंदिनी, मीनू, आशू.. लई भारी. लगे रहो.

पण आता रूमाल (लंगोट, मास्क, फग्गीज, हग्गीज.. जे काय असेल ते) कुणी टाकलाय, ते नाही कळलं.

पण आता रूमाल (लंगोट, मास्क, फग्गीज, हग्गीज.. जे काय असेल ते) कुणी टाकलाय>>>
सध्या तरी कुणीच नाही. तुझा टाक बरे धुऊन. Proud

लोक्स, एक विनंती. हा sty चा धागा आहे. तेव्हा एकमेकांना काय सांगायचे असेल ते इतर बाफ वर सांगा. इथे फक्त sty च्या पोस्ट व त्यावरचे प्रतिसाद असू दे.

मीनु, ठिके, थोडे गोंधळ आहेत, पण लोक लिहित आहेत.. सूतकताईत गाठी पडणारच, त्या सोडवू आपण.

एकच पाळा, की लिहायला लागलात, की इकडे सांगा.. आणि नंतर लिहा लवकर.. नायतर तुम्ही लिहिताय म्हणून कोणीच लिहिणार नाही, आणि तुम्हीही नाही लिहिणार..

सध्या..
दोन गॅंग एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात आणि भारतच्या कानावर मंदीरातलं गाणं पडून तो फग्गीज मास्क करायला सरसावलाय.. आता पुढे.

............चिकटवण्यासाठी फेविकॉल लावलेली आणि फग्गीजपेक्षाही अधिक कापसाचा भरणा असलेली मास्क! इतक्यात समोर कसला तरी आवाज झाला आणि तो भानावर आला..
-------------------------------------
कुणी एक भक्त जमिनीवर पडला होता. चेहरा कसनुसा झालेला. वयाने भारतच्या आज्यापेक्षाही मोठा दिसत होता पण सुस्थितीतला दिसत होता. त्या भक्ताच्या हातातलं पुजेचं ताट त्या भक्ताबरोबरच खाली पडलं होतं. मोठ्ठा आवाज तोच होता. संपूर्ण देवळात भारत आणि तो जमिनीवर पडलेला भक्त एवढी दोनच माणसे होती. नाइलाजाने भारत त्या भक्ताची विचारपूस करायला धावला.

आजवर भारतने बघितलेल्या सर्व सिनेमांच्यात दाखवलं होतं त्याप्रमाणे त्या भक्ताची लक्षणे 'दिल का दौरा' चीच होती. भारतने ते पटकन ओळखलं. सिनेमा बघण्यात घालवलेला वेळ आणि पैसा असा कारणी लागत होता. भारत मनाने 'हिरो' क्याटेगरी असला तरी तब्येतीने सुकड बोंबिलच होता त्यामुळे भक्ताला उचलून कुठे घेऊन जाणं शक्य नव्हतं त्याला. आजूबाजूला माणसाचा मागमूस दिसत नव्हता. अचानक रस्त्यावरची रहदारी पण गायब झालेली होती.

भक्ताच्या खिशातून त्याचा मोबाइल डोकावत होता. त्यावरून भारतने भक्ताच्या ओळखीच्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण हाय रे दैवा... देवळात रेंजच येत नव्हती. इकडे भक्ताची अवस्था बिकट होत चालली होती. भारतने एक प्रयत्न म्हणून 'कदम कदम बढाये जा' हे गाणे म्हणून पाह्यले पण भक्त हा सैन्यातून निवृत्त झालेला नसल्याने त्या गाण्याचा उपयोग तर झाला नाहीच पण भारतच्या बेसूर्या आवाजाने भक्ताचा चेहरा अजूनच कसनुसा झाला.

या क्षणाला या भक्ताला मदत मिळायला हवी तर चमत्कारच घडायला हवा असा विचार भारतच्या मनात आला आणि 'टिंग!!' अशी घंटाही त्याच्या कानात वाजल्यासारखे झाले. भारतने खिशात हात घातला. आज्याची पेटी तशीच बंद आणि सुरक्षित होती. ती उघडून या भक्तासाठी मदत मागवायची की ती उघडून आपली 'नाकीनऊ' रूमालांची कंपनी सुरू करायची अशी काही क्षण भारतची द्विधा मनस्थिती झाली होती. पण भारत हा मगाशी सांगितल्याप्रमाणे मनाने 'हिरो' क्याटेगरीचा असल्याने त्याने स्वार्थ बाजूला सारून पेटी खोलली.

पेटीच्या आतमधे तीन बंद कप्पे होते. त्यांच्या झाकणांवर एक, दोन आणि तीन असे क्रमांक कोरलेले होते. पेटीच्या मुख्य झाकणाच्या आतल्या बाजूला काही ओळी लिहिलेल्या होत्या..

कमरा पहला है कठीण काल
गर तू करेगा सहि इस्तेमाल
तेराही होगा ये नाचीझ हमाल
भायेगा गर लालचका जाल
ए खुदा फिर तूही संभाल

पहिला कप्पा जपून वापरायला हवा असं या कोड्याचं उत्तर भारतला मिळालं. असंभव बघून बघून तोही हुशार झाला होता.

एक या कोरलेल्या क्रमांकावर भारतने बोट ठेवलं आणि त्या तळमळणार्‍या भक्तासाठी अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर इत्यादी गोष्टी मागितल्या.

जोरदार वारा सुटला आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाजही एकदमच सुरू झाला. क्षणार्धात इ.आर. मधे दाखवतात तशी अद्ययावत वैद्यकीय टोळी भक्ताच्या बाजूला जमली आणि भक्तासकट भारतला घेऊन इस्पितळाकडे कूच करती झाली.

वाटेत एका चौकात सिग्नल लागलेला असताना डाव्या बाजूच्या रस्त्यावर सत्तूभाय अ‍ॅन्ड पार्टी तर उजव्या बाजूच्या रस्त्यावर रामूदादा अ‍ॅन्ड पार्टी सिग्नलला उभे होते. त्यांच्यामधून घणाणा सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलन्स मात्र सरळ निघून गेली इस्पितळाकडे.

इस्पितळ आलं. हॉस्पिटल म्हणता यावं असं मोठं असल्याने त्याला आपणही हॉस्पिटल म्हणू. त्या हॉस्पिटलाचं नाव 'भारत हॉस्पिटल' होतं. ते बघून भारतला स्वतःचा उगाचच अभिमान वाटला. पेशंट भक्ताला लगेच इ.आर. मधे नेण्यात येऊन उपचार करण्यात आले. तासाभरात पेशंट भक्त नॉर्मलवर आला.

'काय नाव तुझं?' पेशंट भक्ताने भारतला विचारले. भारतने नाव सांगितले.
'आणि तुमचं?' त्याने विचारले.
'मी सम्राटसिंग बहुरूपी!' पेशंट भक्त उत्तरला.
ते नाव ऐकताच भारत तिनताड उडाला. मगनभाई, छगनभाई आणि अश्या अनेक ड्रेसवाल्यांना ज्याने ट्रेनिंग दिले होते, धंद्यात उभे केले होते तो साक्षात सम्राटसिंग बहुरूपी भारतच्या समोर होता.
भारतच्या तोंडाचा तसाच राह्यलेला आ पाहून सम्राटसिंगला लक्षात आले की याने आपल्याला ओळखलंय. सम्राटसिंग स्वतःवर खुश झाला. त्याला नावावरून ओळखणारे फार कमी लोक होते.
'हमे कैसे पहचानते हो?' त्याने विचारले.
भारतने आपल्या आज्यापासून सगळी कहाणी सांगायला सुरूवात केली. मधे मधे येणार्‍या जांभयांकडे दुर्लक्ष करून सम्राटसिंग कहाणी ऐकू लागला. शेवटी जेव्हा सत्तूभायच्या आर्डरीपाशी भारत पोचला तेव्हा भारतला एकदम आपल्यावरच्या प्रसंगाची आठवण झाली. सम्राटसिंगाला 'पायलागू' करून भारत तिथून बाहेर पडू लागला.

'ठहरो' म्हातार्‍या पण कडक आवाजात सम्राटसिंगने आज्ञा सोडली.
'तूने मेरी जान बचायी.. अब मै तेरे लिये कुछ करता हूं!' असे म्हणत त्याने आपला मोबाइल नर्सकडून मागून घेतला आणि एक नंबर डायल करू लागला...

इकडे..
त्यातून रामूदादा आणि त्याची गँग बाहेर पडली. आता सत्तूभाई आणि गँग आणि समोर रामूदादा आणि गँग असा सीन होता..

पुढे- सत्तूभाय तब्येतीनं हाडूक दिसला, तरी महा चिवट होता.. शिवाय चाकू, घोडा, हॉकीस्टीक असायच्याच सोबत.. अशा मारामारीत तर हमखास.. 'सालाऽऽ आपुनके एरीयाके भारतको पीटता है? कोन? वो राम्या? आयला! रामूदादा म्हणे!! $%^& कोणी उठावं अन् दादा बनावं च्यामारी! काय प्रेस्टिज, खानदानकी प्रंप्रा वगैरे हाय की नाय? थांब आत्ता उतरवतो भायगिरी तुझी लेका..'

इकडे रामूदादाकडे तोच सीन.. 'आयला पैसे माजे बुडवले त्या तीनपाट ड्रेसवाल्यानं आन् हे पाप्याचं पितर का खवळतंय? मरूदेतिच्या^&*# असं कोनपन चालून आलं आन् आपन मार खाल्ला असं एरीयात पसरलं, तर &^%$ काय इज्जत रायली आपली.. आता भिडायचंच, काय पन हो..'

दोघं एकमेकांसमोर उभे ठाकलेले.. खुनशी नजरेने एकमेकांकडे बघतायेत, अंदाज घेतायेत.. त्यांची पोरं पद्धतशीरपणे आजूबाजू पसरत आहेत, अंदाज घेत आहेत.. हवेत एक सुन्न शांतता पसरली.. हॉकी स्टीक, बीअरच्या बाटल्या, चाकू, गावठी- माल तर तयार.. तू वरचढ की मी असं गँगवॉर होतं ते, साधं नाय.. यानंतर कोणीतरी एकच दादा राह्यला असता हे नक्की.. आता फक्त पहिली हालचाल कोण कधी करतं हे बाकी होतं, की भिडलेच असते एकमेकांना सगळे.. इतक्यात...

'भैय्याऽऽऽऽऽ.....' अशी आर्त किंकाळी आसमंतात गूंजली!

आयला! स्टेज कशासाठी सेट केलंय आणि %^$# या भैय्या कुठून आला मध्येच? ही काय राखी-राखी खेळायची वेळे? लोक सटकलेच आणि आवाजाच्या रोखाने बघू लागले..

अठरा-एकोणीस वर्षाची बदन जैसे फूलोंकी शाख, घने बाल जैसे रात का अंधेरा, आँखे जैसे चँदा की चाँदनी, रंग जैसे केसरका दूध, होट जैसे गुलाब की पंखुडी, अशी युक्त एक सुकोमल नवयौवना आर्त साद घालत, पाच हजाराचा सिल्कचा ब्रोकेड वर्क केलेला जांभळा ड्रेस आणि तलम ओढणी सांभाळत रामूच्या दिशेने आली..

सगळे अ वा क! सत्तू आणि त्याची गँग तर गारदच!

ही? ही राम्याची बहीण? ही? हा राम्या हिचा भाऊ? हिचा?
बरंय ना.. भाऊ आहे ते.. सत्तूला गुदगुल्या झाल्या.. तो तिच्याकडे निरखून बघायला लागला..
काय लावण्य! जसं की स्वर्गाची अप्सराच! अ‍ॅ? हे काय? सत्तू तिच्या गळ्यातल्या फुलपाखराच्या लॉकेटवर अडखळला..

'खुशबू?' राम्या डाफरत होता तिच्यावर.. 'येडी का? इकडे का आली? कोणी आनली तुला? विक्या.. कुठाय तो? त्याने सोडली कशी तुला?' प्रश्नावर प्रश्न!
लांबसडक पापण्यांची फडफड करत खुशबू म्हणाली, 'भैय्या.. माँने पाठवलं मला.. तिला कळ्ळं तू कोनत्यातरी वॉरला गेलेला असनार.. तुला थांबवायला पाटवलं तिनं मला.. भैया, तुम्हे तुम्हारे माँ की कसम है भैय्या, इस लाडली बहनके खातीर, अपनी अकेली माँ की खातीर, चलो यहाँसे, ये वॉर हमे पीस कब देगा? उफ्फ' एक ड्वायलॉक टाकून स्वतःवरच खुश होत तिने राम्याकडे नजर टाकली..

राम्या वैतागला.. च्यामारी! ही आय पन ना.. नको तितं मधी येते.. आत्ता दाकवलं असतं सत्त्याला.. असं म्हणत त्याने सत्तूभायकडे नजर टाकली.. सत्तू अजूनही एकटक खुशबूच्या लॉकेटाकडेच नजर लावून..

'अबेऽऽऽ शरम कर.. काय बगतो आं? तुज्याकडे भन नाय काय रे?'
'खरंच नाय, रामू.. माजी भन, ल्हान असताना गेली बग.. तिच्याकडं बी असंच लॉकेट होतं रेऽऽऽ' सत्तू हमसाहमशी रडायलाच लागला एकदम! 'चंदाऽऽऽ कुटं गेलीस गंऽऽऽ मला टाकून????'

फारच हृदयद्रावक प्रसंग होता तो.. ३०-३५ माणसं हातात युद्धाची आयुधं घेऊन एकमेकांसमोर उभी ठाकलेली.. आणि त्यांचा एक प्रमुख रडतोय, तर एक भंजाळून नुस्ताच उभाय..

खुशबू हळूहळू चालत हील्सची टकटक करत सत्तूच्या जवळ आली अन् म्हणाली....

वैनी.. एक नंबर कहानी मे ट्विस्ट.. काय पण सिच्युएशन आणलीयेस.. गाण्यासाठी एकदम फीट.. माता किंवा आशु.. नाहीतर अँक्या ह्यांची पोस्ट मस्ट आहे आत्ता.. आणि ती पण एका खंग्री गाण्यासकट..

Pages

Back to top