‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
छोटे छोटे ओहळ वाहत येऊन मिळतात,प्रवाह तयार होतात , तेही मिळत-जुळत जातात .महानद फोफावतो, रोरावत राहतो.
छोटे छोटे आडरस्ते उपरस्ते रस्ते एकत्र येऊन महामार्ग तयार होतो. रहदारीची गाज अव्याहत सुरू असते.
गतीशील जीवन वाहत राहते . आपण प्रत्येकजण त्याचा एक बिंदुमात्र अंश असतो.हरवलेली असते ती आपली समग्रतेची संवेदना . कोलाहलातलं महाकाव्य.
तिचा वेध घेण्याचा प्रयत्न गिरीश कुलकर्णी करतात तेव्हा ते प्रत्येकासमोर एक आरसा धरतात.
किंवा आजच्या वास्तवाच्या भाषेत कॅमेरा म्हणूया ! एक सेल्फी आरपार.
ही चित्रं नेत्रसुखद असतील व नसतील. नैतिक-अनैतिक-ननैतिक असतील.
पण ती अंगावर घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे , काहीसा समुद्रस्नानासारखा. समुद्रस्नान प्रत्येकालाच झेपेल असं नाही ! मर्ढेकर नाही का म्हणाले ‘’बरी तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी ऋचा ! ‘’
आपापल्या कोशात अशा आपापल्या परीच्या आरामदायी तऱ्हा असतात , आधीच त्रासलेल्या शरीर-मनाला त्याच बऱ्या वाटतात.
पण एक वेळ अशी येते, व्यक्तीच्या आणि समाजाच्याही वाढीच्या टप्प्यावर , की जुन्या ढिल्या जखमा फाडून आत डोकावणं आवश्यक असतं. ( पुन्हा मर्ढेकरच ! ) गतिमान प्रवाहात एक क्षण थांबणं , निरखणं आवश्यक असतं स्वत:च्या आणि भोवतालाच्या निरामयतेसाठी. ही विपश्यना एकांतातली नसते तर कोलाहलातलीच असते. विषाने विष मारण्याचा अभ्यास.
न-जाणो, या अनुभवांती काही सुंदर गवसेल ! सत्य,सौंदर्य, शिवत्व अचानक सामोरं येतं, आणि आयुष्याची अर्थमयताही .एक नवी आस्तिकता जाणवते. ही कोणाला भाबडी वाटेल, पण याच आस्तिकतेच्या बळावर आपण नवा दिवस सुरू करतो, नवी बाळं या निर्मम जगात जन्माला घालतो, नव्या कलाकृती घडवतो.
कुणीतरी म्हणालं होतं, ‘’ जीवनाची गूढता सुंदर, कलेतली अपरिहार्यता.’’ ते आठवतं.लेखक गिरीश कुलकर्णी व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी या दोघांना या दोन्ही गोष्टी भिडल्या असाव्यात !म्हणून त्यांनी ‘’हायवे: एक सेल्फी आरपार ‘’ आपल्यासाठी निर्मिला आहे.
आरभाट फिल्म्स आणि खरपूस फिल्म्स यांची ही निर्मिती ( निर्माते विनायक गानू ) आहे. आपली मायबोली अशा अर्थपूर्ण सिनेमाची एक मिडीया पार्टनर आहे ही तर अगदी व्यक्तिगत अभिमानाची बाब आहे ! विषयाला साजेशी गीतंसुद्धा मायबोलीचे वैभव जोशी यांची, संगीत अमित त्रिवेदी यांचं .या सर्वांनी आधुनिक मराठी संवेदनेच्या प्रयोगशीलतेवर विश्वास ठेवला आहे.
मात्र हा चित्रपट पाहणं , स्वत:च्या जाणिवेत भिनवणं हे आपलं फक्त रुक्ष कर्तव्यच आहे असं अजिबातच नाही, तो एक अनुभवावाच असा आविष्कार आहे. नात्यांचा विशाल पट, जगण्यातलं वैविध्य, स्तिमित करणारी आकस्मिकता यांनी भरलेला कलाविष्कार. आणि हे सगळं ओढून ताणून कुठून तरी आणलेलं नाही.
एक निर्मिती म्हणून मध्यंतरापर्यंत विस्कळित वाटू शकणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर विलक्षण जोर घेतो. प्रेक्षकाला थोडा दम काढायला लावणारी ही व्यूहरचना आहे. प्रवासात असल्याप्रमाणे हलणारा कॅमेरा कधीकधी सुखकारक नाही. अर्थात तो चित्रवास्तवतेचा भाग असू शकतो. पण याच कॅमेऱ्याने कवितेसारखेही कित्येक सूक्ष्म परिणाम साधणारे क्षण टिपले आहेत, चित्रप्रदर्शनातून फिरवल्यासारख्या फ्रेम्स नजरेसमोर झळकवल्या आहेत.
अभिनय सर्वांचेच उत्कृष्ट ! सुट्या टीम्स म्हणून आणि अंतिम कोलाजचा परिणाम साधताना प्रत्येकाने जीव ओतून काम केलं आहे . सुनील बर्वे, रेणुका शहाणे,नागराज मंजुळे, किशोर कदम, श्री.गिरीश कुलकर्णी व सौ. वृषाली कुलकर्णी ,मुक्ता बर्वे , किशोर चौगुले या अव्वल मराठी रंगकर्मींबरोबरच तिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी या हिंदी चित्रसृष्टीतील सुंदरींचा अंतर्भाव सिनेमाला एक व्यापक मिती देऊन गेला आहे.
तसा या सिनेमाचा हीरो आणि हिरॉइनही आहे हायवेच.पण म्हणजे काय ?
हा महामार्ग आहे आपल्याच विस्तारत जाणाऱ्या जाणिवेचा.हा अनुभव घेणं आवश्यक आहे आणि आनंददायीही !
हा आनंद काल आम्ही प्रीमियर शोच्या निमित्ताने मायबोलीकर म्हणून घेतला ! एकमेकांच्या धावत्या भेटीबरोबरच ‘संहिता’ नंतर आणखी एका अर्थपूर्ण सिनेमाच्या निर्मितीत मायबोलीचा सहभाग असल्याचा थरार अनुभवला.
सर्व शुभेच्छा तुम्हाला, टीम ‘’हायवे: एक सेल्फी आरपार ‘’!
असे प्रयोग या चित्रभूमीत होत राहोत आणि ते यशस्वी होवोत ( तसे ते यशस्वी होत आहेतही अलिकडे ) , तरच दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला हायसं वाटेल.
शेवटी, जिप्सीच्याच शब्दात माझ्याही भावना - ''एक उत्तम चित्रपटाचा प्रीमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासून आभार !''
-भारती बिर्जे डिग्गीकर
सुरेख परिक्षण.. ही विपश्यना
सुरेख परिक्षण..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही विपश्यना एकांतातली नसते तर कोलाहलातलीच असते. विषाने विष मारण्याचा अभ्यास.>> मस्तं लिहिलंय भारती
व्वाह ! भारती ताई, व्वाह
व्वाह ! भारती ताई, व्वाह !
सुंदर लिहिलंयत!
सुंदर लिहिलं आहेत भारती.. !
सुंदर लिहिलं आहेत भारती.. !
सुंदर लिहिलं आहेस भारती.
सुंदर लिहिलं आहेस भारती. सिनेमा मलाही आवडला. कोलाज मस्त जमलय. सगळे तुकडे शेवटी एकत्र जोडण्यातला बटबटीतपणा टाळला आहे. वाहत्या प्रवाहातले काही क्षण हायवेवर तात्पुरत्या मुक्कामाला आले आहे इतकंच. फार काही कोणाला आयुष्यातली गुढं उकलल्याचा किंवा गहन समस्या सुटल्याचा थोर अनुभव आलेला दाखवला नाही हे आवडलं.
हुमा कुरेशी आणि तो राजकारणी भाऊ यांचा तुकडा छानच जमलाय. तिस्का चोप्राच्या व्यक्तिरेखेचे काही पदर यायला हवे होते अजून असं वाटलं. अगदीच तरंगतं पीस झालय.
गिरिश कुलकर्णींचं लेखन आवडलं पण काम फारसं नाही आवडलं. एनारयी बेअरिंग जमलं नाही त्यांना.
बाकीच्यांची कामं सहज आणि म्हणूनच सुंदर. रेणुका शहाणेनी फार फार गोड काम केलय.
छानच लिहिलंय बघायलाच हवा हा
छानच लिहिलंय
बघायलाच हवा हा चित्रपट
भारती ताई... भारीच! अगदी
भारती ताई... भारीच!
अगदी चित्रपटा सारखच लिहिलं आहे.
मध्यंतरा नंतराचा हायवे मनात उतरत जातो. प्रत्येकाने अभिनयाची कमाल केली आहे.
माध्यम प्रायोजकांचे आभार.
भारती किति छान लिहिल
भारती किति छान लिहिल आहेस.सिनेमा पहायची उत्सुकता वाटली.
मस्त परिक्षण! चित्रपट बघेन का
मस्त परिक्षण!
चित्रपट बघेन का माहीत नाही पण परिक्षण आवडले. एखादा चित्रपट बघताना काय काय विचार मनात येत असतात. आपण गोष्टी रिलेट करतो, शोधतो, समजावुन घेतो, सगळ्या टिम ला नेमके काय म्हणायचे आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो...तो सगळा आलेख परिक्षणात उतरला आहे.
मस्त परीक्षण!
मस्त परीक्षण!
मस्तं परीक्षण केलंय. हा
मस्तं परीक्षण केलंय. हा चित्रपट पहावासा वाटतोय.
सुरेख लिहिलयं !
सुरेख लिहिलयं !
तुमचा अनुभव नेहमीप्रमाणेच
तुमचा अनुभव नेहमीप्रमाणेच सुंदर पोचवलात.
फोटो, प्रोमोज आणि मुलाखती यामुळे निर्माण झालेली उत्सुकता तुमच्या शाबासकीने ताणली गेलीये. बघायला हवा चित्रपट.
परीक्षणाची मांडणी इतकी
परीक्षणाची मांडणी इतकी प्रभावी झाली आहे की "हायवे" ज्या पद्धतीने या राज्यातील प्रेक्षकांपुढे विविध माध्यमातून समोर येत गेला आहे त्याहीपेक्षा भारती यांच्या लेखणीची करामत विलक्षणरित्या मनी भिडली आहे. चित्रपट प्रत्यक्ष पडद्यावर पाहाण्याआधीच तो आवडला असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. ["मांझी" न पाहाताही ती मध्यवर्ती भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी याने साकारली आहे हे समजल्याक्षणीच तो चित्रपट अत्यंत यशस्वी झाला असणार ही खूणगाठ मनी बांधली गेली होती....त्यापैकीच भारतीच्या चित्रपरीक्षणाचा हा नमुना होय.... त्यातही मर्ढेकरांच्या उल्लेखाने लेखाला चांदीच लागली आहे.]
असे दिसत आहे की "हायवे इफ़ेक्ट" आपल्या मनावर खूप पसरला आहे. चित्रपट आज सर्वत्र झळकला असला तरी मायबोली आणि अन्य माध्यमाद्वारे (तसेच चर्चेद्वारेही) मांडणीतील वैविध्य नेमके काय असेल याची उत्सुकता कमालीची मनी दाटून राहिली आहे....हे एक प्रकारे निर्माते दिग्दर्शक कथालेखक आणि कलाकार यांचे संयुक्त यशच म्हणावे लागेल....आज हा लेख त्याच उत्सुकतेला पूर्ण सहकार्य करीत आहे.
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारती, खूपच आवडलं लिहिलेलं.
भारती, खूपच आवडलं लिहिलेलं. मिळाला की नक्की बघणार.
छान लिहिलंय. उत्सुकता वाटतेय
छान लिहिलंय. उत्सुकता वाटतेय चित्रपटाबद्दल.
सर्वांचे मन:पूर्वक आभार !
सर्वांचे मन:पूर्वक आभार !
शर्मिला , अगदी पटलं हे डिटेलिंग. मला गिरीश कुलकर्णींचा अभिनयही मनापासून आवडला.
काल प्रीमियरचं वातावरण पाहताना कुठूनकुठून महाराष्ट्रातल्या छोट्या शहरातून येऊन मुंबईत आपलं नाणं पाडणाऱ्या या झुंजार लोकांचं कौतुक वाटत राहिलं .
काळ अभिजात मराठी कलाविष्कारांसाठी - त्यातून सिनेमासारख्या खर्चिक निर्मितीसाठी अनुकूल नाही. म्हणजे तशा अनेक सुविधा आहेत, शासनाचा पाठिंबा आहे, तरीही खूप व्यावसायिक यश मिळत असेल असं नाही वाटत . लोकांची अभिरुची बदलणे हे जिकिरीचं काम आहे. तरीही हे प्रयोग करत राहण्याच्या हिंमतीचं कौतुक!
छान लिहिलंय..आवडलं! हा सिनेमा
छान लिहिलंय..आवडलं! हा सिनेमा नक्की पाहायचा आहे..बघू कसं जमतंय ते!
चांगल लिहिलेय. आवडला हा नवीन
चांगल लिहिलेय. आवडला हा नवीन प्रयोग . काही काही गोष्टी तेव्हा पटल्या नाहित पण आता नीट वेळ दिल्यानंतर पटत गेल्यात .
( अवांतर - तू माझे कष्ट वाचवलेस
)
भारती ,चित्रपटपरीक्षण इतक
भारती ,चित्रपटपरीक्षण इतक सुपर्ब उतरलंय तुमच्या लेखनातून की माझ्यासारख्या काहीतरी वेगळ प्रयोगात्मक शैलीतल पाहण्यासाठी उत्सुक असणारया माबोकराची पावलं नक्कीच या चित्रपटाकडे खेचली जाणार यात काहीच शंका नाही .
छान उतरलंय
छान उतरलंय परीक्षण
चित्रपटाबद्दल तुर्तास काही सांगू शकत नाही.
आभार दिनेश,जिज्ञासा, भुईकमळ,
आभार दिनेश,जिज्ञासा, भुईकमळ, ऋन्मेष ! इथे जाई म्हणते आहे तेही खूप महत्वाचे आहे- ''काही गोष्टी नीट वेळ दिल्यावर पटत गेल्या ''.
एखाद्या पदार्थाची चव थोडी develop व्हावी लागते, तसा हा पदार्थ आहे, घाईत जजमेंटल न होणे ! मग खरंच मजा येईल.
आणि जाई, तूही लिहावंस ना. तुझी इतरही वैशिष्ट्यपूर्ण मतं असतीलच अशीच. मी खरं तर जवळजवळ न लिहायचं ठरवून काल आले होते, पण कोणतीही चांगली कलाकृती मला लिहायची 'अपरिहार्यता' निर्माण करते, त्यातून हे लेखन झालं ..
भारतीताई किती अप्रतिम
भारतीताई किती अप्रतिम लिहिलंत. फार सुंदर. आवडलं. ___/\___.
बघायला हवा चित्रपट.
सुरेख परीक्षण ..
सुरेख परीक्षण ..
भारती, किती किती सुरेख
भारती, किती किती सुरेख लिहिलंयस. फारच आवडलं परिक्षण.. सिनेमा नक्कीच पाहावासा वाटतोय तुझा जबरदस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिव्यू वाचून!!
भारतीताई, खुप सुरेख परीक्षण.
भारतीताई, खुप सुरेख परीक्षण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिस्का चोप्राच्या व्यक्तिरेखेचे काही पदर यायला हवे होते अजून असं वाटलं. अगदीच तरंगतं पीस झालय.>>>>>शर्मिला, +१००. अगदी हाच विचार मनात आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काही काही गोष्टी तेव्हा पटल्या नाहित पण आता नीट वेळ दिल्यानंतर पटत गेल्यात . >>>>>अगदी अगदी. सिनेमाघरातुन बाहेर पडल्यावर एक प्रश्नचिन्ह होते जे आता नीट वेळ दिल्यानंतर पटत गेल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या चित्रपटात सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे "घन तमी शुक्र बघ राज्य करी...." कवितेतुन रीलेट होणारे एक एक कॅरेक्टर्स आणि शेवट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घन तमी शुक्र बघ राज्य
घन तमी शुक्र बघ राज्य करी...." >>>> हे गाण रेणुकाच्या आवाजात ऐकायला किती गोड वाटत !!
भारती,सुरेख परिक्षण.
भारती,सुरेख परिक्षण. चित्रपटही मस्त घेतलाय. वास्तववादी.
केवळ जुन्याच नव्हे तर नविन कलाकारांचीही कामं छान झालीयेत.
आपण प्रत्येक जणच आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्यातच कसला ना कसला शोध कायम घेत असतो हे जाणवतं.
टिस्का चोप्राबरोबर एक मुलगा
टिस्का चोप्राबरोबर एक मुलगा आहे त्याच नाव काय आहे ? त्याला कूठेतरी पाहिलय पण नाव लक्षात येत नाहीये
जाई, तो समीर
जाई,
तो समीर भाटे.
भारतीताई,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख लिहिलं आहे. उमेशलाही परीक्षण आवडलं.
सर्वांना एक विनंती. कृपया कथेतले प्रसंग प्रतिक्रियांमध्ये लिहू नका. चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. इतरांनाही आस्वाद घेऊ द्या.
Pages