‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
छोटे छोटे ओहळ वाहत येऊन मिळतात,प्रवाह तयार होतात , तेही मिळत-जुळत जातात .महानद फोफावतो, रोरावत राहतो.
छोटे छोटे आडरस्ते उपरस्ते रस्ते एकत्र येऊन महामार्ग तयार होतो. रहदारीची गाज अव्याहत सुरू असते.
गतीशील जीवन वाहत राहते . आपण प्रत्येकजण त्याचा एक बिंदुमात्र अंश असतो.हरवलेली असते ती आपली समग्रतेची संवेदना . कोलाहलातलं महाकाव्य.
तिचा वेध घेण्याचा प्रयत्न गिरीश कुलकर्णी करतात तेव्हा ते प्रत्येकासमोर एक आरसा धरतात.
किंवा आजच्या वास्तवाच्या भाषेत कॅमेरा म्हणूया ! एक सेल्फी आरपार.
ही चित्रं नेत्रसुखद असतील व नसतील. नैतिक-अनैतिक-ननैतिक असतील.
पण ती अंगावर घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे , काहीसा समुद्रस्नानासारखा. समुद्रस्नान प्रत्येकालाच झेपेल असं नाही ! मर्ढेकर नाही का म्हणाले ‘’बरी तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी ऋचा ! ‘’
आपापल्या कोशात अशा आपापल्या परीच्या आरामदायी तऱ्हा असतात , आधीच त्रासलेल्या शरीर-मनाला त्याच बऱ्या वाटतात.
पण एक वेळ अशी येते, व्यक्तीच्या आणि समाजाच्याही वाढीच्या टप्प्यावर , की जुन्या ढिल्या जखमा फाडून आत डोकावणं आवश्यक असतं. ( पुन्हा मर्ढेकरच ! ) गतिमान प्रवाहात एक क्षण थांबणं , निरखणं आवश्यक असतं स्वत:च्या आणि भोवतालाच्या निरामयतेसाठी. ही विपश्यना एकांतातली नसते तर कोलाहलातलीच असते. विषाने विष मारण्याचा अभ्यास.
न-जाणो, या अनुभवांती काही सुंदर गवसेल ! सत्य,सौंदर्य, शिवत्व अचानक सामोरं येतं, आणि आयुष्याची अर्थमयताही .एक नवी आस्तिकता जाणवते. ही कोणाला भाबडी वाटेल, पण याच आस्तिकतेच्या बळावर आपण नवा दिवस सुरू करतो, नवी बाळं या निर्मम जगात जन्माला घालतो, नव्या कलाकृती घडवतो.
कुणीतरी म्हणालं होतं, ‘’ जीवनाची गूढता सुंदर, कलेतली अपरिहार्यता.’’ ते आठवतं.लेखक गिरीश कुलकर्णी व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी या दोघांना या दोन्ही गोष्टी भिडल्या असाव्यात !म्हणून त्यांनी ‘’हायवे: एक सेल्फी आरपार ‘’ आपल्यासाठी निर्मिला आहे.
आरभाट फिल्म्स आणि खरपूस फिल्म्स यांची ही निर्मिती ( निर्माते विनायक गानू ) आहे. आपली मायबोली अशा अर्थपूर्ण सिनेमाची एक मिडीया पार्टनर आहे ही तर अगदी व्यक्तिगत अभिमानाची बाब आहे ! विषयाला साजेशी गीतंसुद्धा मायबोलीचे वैभव जोशी यांची, संगीत अमित त्रिवेदी यांचं .या सर्वांनी आधुनिक मराठी संवेदनेच्या प्रयोगशीलतेवर विश्वास ठेवला आहे.
मात्र हा चित्रपट पाहणं , स्वत:च्या जाणिवेत भिनवणं हे आपलं फक्त रुक्ष कर्तव्यच आहे असं अजिबातच नाही, तो एक अनुभवावाच असा आविष्कार आहे. नात्यांचा विशाल पट, जगण्यातलं वैविध्य, स्तिमित करणारी आकस्मिकता यांनी भरलेला कलाविष्कार. आणि हे सगळं ओढून ताणून कुठून तरी आणलेलं नाही.
एक निर्मिती म्हणून मध्यंतरापर्यंत विस्कळित वाटू शकणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर विलक्षण जोर घेतो. प्रेक्षकाला थोडा दम काढायला लावणारी ही व्यूहरचना आहे. प्रवासात असल्याप्रमाणे हलणारा कॅमेरा कधीकधी सुखकारक नाही. अर्थात तो चित्रवास्तवतेचा भाग असू शकतो. पण याच कॅमेऱ्याने कवितेसारखेही कित्येक सूक्ष्म परिणाम साधणारे क्षण टिपले आहेत, चित्रप्रदर्शनातून फिरवल्यासारख्या फ्रेम्स नजरेसमोर झळकवल्या आहेत.
अभिनय सर्वांचेच उत्कृष्ट ! सुट्या टीम्स म्हणून आणि अंतिम कोलाजचा परिणाम साधताना प्रत्येकाने जीव ओतून काम केलं आहे . सुनील बर्वे, रेणुका शहाणे,नागराज मंजुळे, किशोर कदम, श्री.गिरीश कुलकर्णी व सौ. वृषाली कुलकर्णी ,मुक्ता बर्वे , किशोर चौगुले या अव्वल मराठी रंगकर्मींबरोबरच तिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी या हिंदी चित्रसृष्टीतील सुंदरींचा अंतर्भाव सिनेमाला एक व्यापक मिती देऊन गेला आहे.
तसा या सिनेमाचा हीरो आणि हिरॉइनही आहे हायवेच.पण म्हणजे काय ?
हा महामार्ग आहे आपल्याच विस्तारत जाणाऱ्या जाणिवेचा.हा अनुभव घेणं आवश्यक आहे आणि आनंददायीही !
हा आनंद काल आम्ही प्रीमियर शोच्या निमित्ताने मायबोलीकर म्हणून घेतला ! एकमेकांच्या धावत्या भेटीबरोबरच ‘संहिता’ नंतर आणखी एका अर्थपूर्ण सिनेमाच्या निर्मितीत मायबोलीचा सहभाग असल्याचा थरार अनुभवला.
सर्व शुभेच्छा तुम्हाला, टीम ‘’हायवे: एक सेल्फी आरपार ‘’!
असे प्रयोग या चित्रभूमीत होत राहोत आणि ते यशस्वी होवोत ( तसे ते यशस्वी होत आहेतही अलिकडे ) , तरच दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला हायसं वाटेल.
शेवटी, जिप्सीच्याच शब्दात माझ्याही भावना - ''एक उत्तम चित्रपटाचा प्रीमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासून आभार !''
-भारती बिर्जे डिग्गीकर
सर्वांना एक विनंती. कृपया
सर्वांना एक विनंती. कृपया कथेतले प्रसंग प्रतिक्रियांमध्ये लिहू नका. चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. इतरांनाही आस्वाद घेऊ द्या....>>> चिन्मय,केला बदल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि
पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि तुझे विशेष , चिन्मय , तुझ्यामुळे हे असे समारंभ दोन वेळा अनुभवले आणि आनुषंगिक लेखन झालं..
वा! मस्त लिहिलं आहे,
वा! मस्त लिहिलं आहे, भारतीताई!
रेणुकाचे गुणगुणणे व सहज वावर खूप छान व आश्वासक वाटतो याबद्दल अनुमोदन.
चित्रपट अतिशय सुरेख आहे.
चित्रपट अतिशय सुरेख आहे. परीक्षण मांडणी प्रभावी आहे. चित्रपटा ला जो सन्देश दायचा आहे तो परिक्षण मधे प्रभावीपणे मांडलाय. एक अर्थपूर्ण चित्रपट चे प्रिमीयर पास दिल्याबद्दल मायबोलीचे आभार.
खूप छान लिहील आहे... मायबोली
खूप छान लिहील आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोली वर वाचून खूप उत्सुकता निर्माण झाली होती..शेवटी काल बघितलाच
आणि अर्थातच खूप खूप आवडला.मध्यांतर झाल्यावर गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी,सुनील बर्वेच्या बायकोचं काम केलेली अभिनेत्री आणि producer वगेरे आले होते.छान बोलले गिरीश कुलकर्णी,त्यांचं एक वाक्य होत कि ,हा सिनेमा बघताना प्रत्येकाचा angle वेगळा असेल, आणि ते अक्षरशः पटलं.
सगळ्यांनीच अभिनय उत्कृष्ठ केलाय.मला अजून एकदा बघायला लागेल अस वाटतेय.:)
मायबोली मुळे एका उत्तम
मायबोली मुळे एका उत्तम सिनेमाच्या प्रिमियर शो ला उपस्थीत रहायची संधी मिळाली म्हणून मायबोलीचे आभार.
भारती ताई खूप छान लिहिले आहे. एकदम मनातले विचार मांडलेत.
सर्वांचे पुन: मन:पूर्वक
सर्वांचे पुन: मन:पूर्वक धन्यवाद ! सामी , तुझे अशाहीसाठी की तू मध्यंतरात आग्रहाने बाहेर नेल्याने एक छानशी फोटो मेमरी शिल्लक राहिली आपल्या भेटीची
जिप्सीच्या सौजन्याने अर्थात .
आज पाहिला एकदम
आज पाहिला एकदम मस्त....परफेक्ट कास्टिंग ही या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू ....सर्वाच्या भुमिका सहज आहेत पण नंबर एक
मुक्ता व तिच्या सोबतची आक्का. मुक्ता ने ते पात्र जबरदस्त उभा केल आहे. नागराज सुद्धा भाव खाऊन जातो....तर पु.ल.नी म्हटल्या प्रमाणे मला माणसे वाचायला आवडतात तसा हा 'हायवे' आहे.
पुन्हा एकदा पाहणार आहे. ..
चित्रपट पाहून आल्यावर परत
चित्रपट पाहून आल्यावर परत वाचलं परीक्षण. सुरेखच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंतर सगळ्यांनी इतकं लिहिलं आहे ह्या चित्रपटाबद्दल की आता स्वतंत्र धागा उघडून वेगळं परीक्षण काय लिहायचं असं वाटतं आहे म्हणून इथेच चार(शे) शब्द लिहिते ( चालेल का भारती.. ? )
ह्या चित्रपटाविषयी अनेक उल्लेखनीय गोष्टी सांगता येतील. बरेचदा चित्रपटाच्या ट्रेलरवरुन चित्रपट जसा असेल असं वाटतं तसा तो निघत नाही आणि मग अपेक्षाभंग होऊन चित्रपट आवडत नाही. इथे तसा अपेक्षाभंग अजिबात होत नाही. एकाच वेळी हायवेवरुन प्रवास करणार्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्यात असतील असं वाटलं होतं. प्रत्यक्षात तसंच झालं.
अर्थात ह्या सगळ्या गोष्टी एका चित्रपटात एकत्र गुंफल्या आहेत म्हणजे त्यांच्यामधून वाहणारं एखादं समान सूत्र हवंच. ते काय असेल, चित्रपटाचा शेवट नक्की कसा करतील ह्याची उत्सुकता मनात होती पण गंमत म्हणजे फास्ट फॉर्वर्ड करुन डायरेक्ट शेवटच बघायला मिळाला तर असं मात्र एक क्षणही वाटलं नाही. पहिल्या काही दृष्यांमध्येच ही जाणीव झाली होती की 'जर्नी इज इंपॉर्टंट दॅन डेस्टिनेशन !', आपल्याला आत्ता हा प्रवास एंजॉय करायचा आहे.
ह्या जाणिवेचं श्रेय सगळ्यांच्या खणखणीत अभिनयाला तर आहेच पण त्याहून थोडंसं जास्तच गिरीश कुलकर्णींच्या लेखनाला आणि उमेश कुलकर्णींच्या दिग्दर्शनाला आहे. कथा, पटकथा, संवाद अत्यंत विचारपूर्वक लिहिलेले आहेत. ह्यातल्या प्रत्येकाची गोष्ट रुढार्थाने पूर्ण झाली नाही तरी एक वर्तुळ पूर्ण करते. उदाहरणार्थ हुमा कुरेशी हिने साकारलेल्या अभिनेत्रीची गोष्ट ज्या बिंदूवर सुरु होते त्याच बिंदूवर संपते. मात्र अत्यंत उपरोधिक पद्धतीने पात्रांची अदलाबदल करुन ! टिस्काच्या गोष्टीतले सुरुवातीचे संवाद एका अतिशय सुंदर पद्धतीने पडद्यावर जिवंत होतात आणि ते वर्तुळ पूर्ण होतं. मनोमन दाद दिली ह्या प्रसंगांना !
असं प्रत्येकाचं वर्तुळ कसं पूर्ण होतं हे पाहणं जितकं रंजक आहे तितकंच ह्रद्य आहे.
रुपकं अतिशय ब्रिलियंटली वापरलेली आहेत. एकमेकांच्या अस्तित्त्वाची जाणीव न ठेवणारं, गतिमान, स्वकेंद्रित, समांतर आयुष्यांचा प्रवास दाखवणारं 'हायवे' हे एक रुपक तर ठप्प करुन टाकणारा ट्रॅफिक जॅम हे दुसरं. त्याचबरोबर पाण्यातल्या माशाला घेऊन प्रवास करणारी गरोदर बाई, पिंजर्यात बंद असलेले मुके पक्षी, विस्कळीत- गोंगाटमय दुपार आणि अंतर्मुख करणारी- हुरहुर लावणारी शांत संध्याकाळ / रात्र, अज्ञात भविष्यकाळाची नवीन पण आश्वासक सुरुवात दर्शवणारी धुक्यातली पहाट, 'ये बाहेरी अंडे फोडूनी' ह्या ओळीचा पुरेपूर प्रत्यय देणारं एक मनाला चटका लावून जाणारं दृष्य ही रुपकं विशेष लक्षात राहिली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसंच ह्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांना छेद देताना जगण्यातली विसंगती ज्या पद्धतीने दाखवून दिलीय त्याला हॅट्स ऑफ !
चित्रपटातील गाणी आणि त्यांचे शब्द ह्या सगळ्या प्रवासात अगदी चपखल विरघळले आहेत. सुरुवातीचं नामावली येतानाचं गाणं चित्रपटाचा मूड परफेक्ट सेट करतं.
एकुणात एक वेगळा, लक्षवेधी चित्रपट आहे जो सगळ्यांनी नक्की पाहावा.
*************
हा चित्रपट मायबोलीकरांसोबत बघता आला, प्रिमियर शो बघता आला ह्याचा आनंद फार मोठा आहे. ही संधी दिल्याबद्दल मायबोली आणि चिनूक्सला धन्यवाद
अगो , चालेल नाही धावेल! कथा ,
अगो , चालेल नाही धावेल! कथा , कथाप्रसंगावर लिहायचं नाही ही मर्यादा असताना नव्याने लिहिणं कठीणच , पण तू छानच लिहिले आहेस.
"जर्नी इज इंपॉर्टंट दॅन डेस्टिनेशन !', आपल्याला आत्ता हा प्रवास एंजॉय करायचा आहे."
हे तुझं वाक्य वाचताना जावेद अख्तर अाठवला .. हमारे शौक की ये इंतहा थी , कदम रक्खा के मंझिल रास्ता थी..
रूपकं हा तर एक स्वतंत्रच विषय , त्यांचा उल्लेखही समर्पक तू केलेला ..
महेश कुमारांशी सहमत , मुक्ता ला-जवाब !
धन्यवाद भारती..
धन्यवाद भारती..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज पाहीला हायवे! इतके दिवस
आज पाहीला हायवे! इतके दिवस सगळी परीक्षणं नुसती वरवर वाचली होती न जाणो आपल्या काही अपेक्षा असायच्या आणि मग अपेक्षाभंग व्हायचा पण अगोने लिहिल्याप्रमाणे आजीबात अपेक्षाभंग झाला नाही! पुन्हापुन्हा पाहावा असा सिनेमा झाला आहे. मला स्वतःला हा सिनेमा माझ्या laptop वर एकटीला पाहायला जास्ती आवडेल. अगोने वर्णन केलेली रूपकं आता लक्षात यायला लागली आहेत! अशा अनेक गोष्टी निसटल्या असतील!
गिरीश कुलकर्णी यांचा NRI सुरुवातीला पटत नाही पण शेवटी पूर्णपणे खरा वाटतो. रेणुका शहाणे त्या सगळ्या कोलाहलाला तिच्या पात्राच्या अंगीभूत ममतेने ज्या प्रकारे तोलून धरते ते फार आवडलं! मुक्ता बर्वे तर बेस्ट आहे! खरतर सगळ्यांचीच कामे छान! पण मला सुनील बर्वेचं काम खूप खूप म्हणजे प्रचंड आवडलं!!! नो वर्ड्स! फार सुरेख काम केलं आहे though it is not his type of role. Hats off! त्याने आणि त्याच्या बायकोने दोघांनीही फार छान काम केलं आहे.
आता सिनेमा डीव्हीडीवर येण्याची वाट बघते आहे!
(No subject)
जिप्स्याने काढलेला फोटो
हा फोटो तेव्हा का शेअरला नव्हता! तो जिप्स्याने काढलेला नसूनही संस्मरणीय आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages