सृष्टीचं कौतुक! (फोटोसहित)(पूर्वप्रकाशित "मेनका" पर्यटन विशेषांक जुलाई २०१५)

Submitted by मानुषी on 4 August, 2015 - 04:35

हा लेख "मेनका" मासिकात जुलाईच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यांनी इथे अप्लोड करायला परवानगी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
// सृष्टीचे कौतुक \\

वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
या काव्यपंक्तींत सुचवल्याप्रमाणे निसर्गाचं चक्र अव्याहतपणे आणि नियमितपणेही चालूच रहाते. असंच एक निसर्गचक्र ...पण अमेरिकेतलं... मी पहिल्यांदाच अनुभवलेलं....... त्याचंच हे कौतुक!
आतापर्यंतच्या सर्व अमेरिका वाऱ्या समरमधेच झाल्या. पण या वेळी मात्र २०१३ मधला कडाक्याचा हिवाळा आणि पाठोपाठ येणारा २०१४ मधला स्प्रिंग म्हणजेच वसंत......हे दोन्ही ऋतु अनुभवायला मिळाले. दोन्ही ऋतूतली स्थित्यंतरे, या दोन्ही ऋतूतल्या निसर्ग छटा आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात!

इथे भारतात माणसांचा महापूर पहायला निर्ढावलेल्या आपल्या डोळ्यांना तिकडे अमेरिकेत माणसांचीच कमतरता जाणवते. कारण अमेरिकेला लाभलेला प्रचंड मोठा भूभाग आणि त्याच्या उलट मुळातच अत्यंत कमी लोकसंख्या!

त्यातच या अतिथंड हिवाळ्यातली रविवार सकाळ असावी. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर या खिडकीच्या फ़्रेममध्ये एक अतीव सुंदर पण नीरव, अविचल, स्तब्ध असं एक स्थिरचित्र दृष्टीस पडते.
मला तर लहानपणी खेळलेल्या "स्टॅच्यू" गेमची आठवण झाली. इथे संपूर्ण दृश्यालाच कुणीतरी "स्टॅच्यू" घातलेला!
कधी तरी या स्थिरचित्रात ...........दूरवरच्या नागमोडी सडकेवरून जाणारी एखादी चुकार कार क्षणिक आणि सूक्ष्म हालचाल निर्माण करायची.
झाडांचे खराटे आपले निष्पर्ण भुंडे हात आकाशाकडे रोखून निस्तब्ध अविचल उभे!

हिवाळ्यातला हा दिवस अगदी छोटा. संध्याकाळी पाच वाजताच अंधारून यायला लागतं. पण निसर्गाची अद्भुत रूपं न्याहाळण्यातली मजाही तितकीच अद्भुत!

आम्हा उष्ण कटिबंधातल्या जनतेला बर्फ़ पडतो त्याचीच नवलाई! तो कसा पडतो हे बघणंही अगदी मनोरंजक!
बर्फ़ पडतो तेव्हा सुरवातीची चिमुकली बर्फ़ुलं....ज्याला आपण फ़्लरीज म्हणतो............अगदी निवांतपणे स्वत:भोवती हळुवारपणे गिरक्या घेत, अलगद तिरक्या रेषेत खाली येत रहातात. पण मग जरा जोर वाढला की स्नोचे मोठे मोठे चंक्स अगदी सरळ रेषेत खाली येऊन धराशायी होतात. हळूहळू सभोवताल बघता बघता सफ़ेद होऊन जातं.............गुपचुपच!
त्यात हा प्रकार जर रातोरात घडला तर बातमी या कानाची त्या कानाला कळत नाही. सकाळी जाग आल्यावर खिडकीबाहेर नजर गेली तर सगळीकडे पांढरी शुभ्र दुलई अंथरलेली!
इतका हा गुपचुप चालणारा प्रकार!

नाहीतर आपला भारतीय पर्जन्य राजा कसा ताशे वाजंत्र्यासह वाजत गाजत येतो! इथे इतका हिमवर्षाव झाला पण ना ढगांचा ताशा, ना सरींची वाजंत्री!

हळूहळू घराबाहेर पार्क केलेल्या गाड्यांवरही बर्फ़ पडत रहातो..........जसा तो सगळीकडेच पडतो! पण मग कधी तरी तो थांबतोही. मग एकेक गाडी निघून गेल्यावर, वरून पाहिलं तर एक छान स्प्रे पेंटिंग केलेल्या आकृत्यांनी भरलेलं सृष्टीच्या कॅनव्हासवरचं एक भलं मोठं चित्र दृष्टीस पडतं! बाकी सगळं पांढरं धोप आणि निघून गेलेल्या वाहनांचे काळे चौकोन.
लहानपणी कागदावर पिंपळपान ठेऊन वरून चाळण आणि ब्रशने केलेलं स्प्रे पेंटिंग आठवलं!

स्नो पडायला सुरवात झाली की तापमान अर्थातच शून्याखाली गेलेले. मग काही ठिकाणी ओघळणारे थेंब जागेवरच गोठतात आणि त्या निसर्गाच्या सुंदर चमत्काराने आपली नजरबंदीच होते..... त्या जागेवर हिर्‍यामोत्यांचं झुंबरच जडवल्यासारखं दिसतं! कुठे मौक्तिकमाला!


लोलक बर्फ़ाचे,
बर्फ़ाचे झुंबर
तोरण बर्फ़ाचे
दारोदारी!

.................असाच बर्फ़ पडत रहातो आणि अचानक कॅनडा गीजचं हॊंकिंग ऐकू यायला लागतं. घरासमोरच्या प्रचंड मोठ्या मोकळ्या मैदानावर या गीजच्या झुंडीच्या झुंडी उतरताना दिसतात. ही बदके कॅनडातल्या मायनस ३०/४० अंश तापमानाला कंटाळून इकडे वॉशिंगटन डीसी परिसरात स्थलांतर करून येतात.
तिथे कॅनडात त्यांच्या उदरनिर्वाहाचीच पंचाइत होते. आणि इकडे मात्र त्यांना चरायला पोटभर अन्न मिळते. यातली काही परत जातात, काही इथेच डीसी परिसरात रहातात.

इथल्या थंडीत अधून मधून कानी पडणारं गीजचं हॉन्किन्ग आणि सी गल्सचा चीत्कार या व्यतिरिक्त आजुबाजूच्या आसमंतात फ़ारसे आवाज ऐकूच येत नाहीत. सतत नीरव शांतता!

हळूहळू काळ सरतो, दिवसामागून महिने जातात............थंडी कमी होते, बर्फ़ाने विश्रांती घेतलेली असते .....आणि........पुन्हा नजरबंदी!!

माझ्या रोजच्या फ़िरण्याच्या रस्त्यावरच्या भुंड्या निष्पर्ण खराट्यांना अचानक चहु अंगांनी रंगीत कणांचे धुमारे फ़ुटून हे खराटे मोहरायला लागल्याचं जाणवतं!
ओहो.......... ही तर वसंताच्या आगमनाची चाहुल! हिवाळ्यातले चार पाच महिने कडाक्याच्या थंडीत बऱ्यापैकी घरातच घालवल्यावर या येऊ घातलेल्या वसंत ऋतूची प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट पहात असतो.
अंगावरच्या लोकरीचे थर हळूहळू कमी होत जातात. किंबहुना या थरांना आता सगळेच कंटाळलेले असतात.
सभोवार थोडी थोडी हालचाल दिसू लागते. वातावरणात चैतन्य जाणवू लागते.


साधारणपणे आपल्या रंगपंचमीच्या सुमारासची आकाशातली रंगपंचमी.

येऊ घातलेल्या वसंताने हिवाळ्याची काहीशी डिप्रेसिंग अशी व्हाइटिश ग्रे शेड पुसून टाकून वातावरणात रंगांची उधळण करायला सुरुवात केल्याचं जाणवतं. ही कडाक्याच्या हिवाळ्याची राखाडी छटा मेट्रो स्टेशनात आणखीनच गडद म्हणजेच काळ्या रंगात परिवर्तित झालेली आढळते. मेट्रो स्टेशनातून शांततेत बाहेर पडणाऱ्या काळ्या कपड्यातल्या माणसांच्या झुंडी पाहून बिळातून शांतपणे शिस्तीत पण घाईघाईत बाहेर येणाऱ्या मुंगळ्यांचीच आठवण यावी. पण निसर्गाप्रमाणेच माणसंही हिवाळ्यानंतर उत्फ़ुल्ल मनाने रंगित वस्त्रप्रावरणं परिधान करायला लागतात!

रस्त्याच्या दुतर्फ़ा उभे असलेले खराटे लाल, पिवळ्या, गुलाबी, लव्हेन्डर अश्या रंगांच्या सजायला लागतात. काही झाडं अशी रंगीत फ़ुलांनी नटतात तर काही अगदी पांढऱ्या धोप फ़ुलांनी!


ही पांढरी फ़ुलं ल्यालेली ही झाडं लांबून जणु खराट्यांना मुरमुरे लावल्यागत दिसतात.

आतापर्यंत खराट्याच्या रूपात उभी असलेली ही झाडं वसंतात अचानक फ़क्त फ़ुलांनीच कशी काय बहरतात.. पानं का नाही येत फ़ुलांबरोबर? अशी आपली एक उगीचच उत्सुकता माझ्या मनात होती.
याबद्दलचं एक बोटॅनिकल ट्रुथ मला गवसलं.................
अफ़ाट थंडीमुळे इथे झाडांना फ़ुलायला वेळ फ़ार कमी मिळतो.
म्हणूनच जेव्हा वसंताची चाहूल लागते तेव्हा ही झाडे म्हणतात, " चला रे...आधी फ़ुलून घेऊ या! कम ऒन गाइज...लेट्स ब्लूम..............स्प्रिन्ग हॅज अराइव्ह्ड! पानं बिनं.... ती नंतर येतीलच!"
असो...........यामागचं शास्त्रीय कारण असं आहे:
आपले नोबेल पारितोषिक प्राप्त भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ "सर जगदीशचंद्र बोस" यांनी सिद्धच केलं आहे की वनस्पतींना जीव असतो. त्या विचारही करतात.
त्यानुसार हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळणार हे झाडांना माहिती असते. त्यामुळे हिवाळ्यात मेपलसारखी झाडे पानातली साखर खोडात परत म्हणून खोडात गोड रस तयार होतो आणि आपल्याला ब्रेकफ़ास्टसाठी पॅनकेकवर घ्यायला मस्तपैकी मेपल सीरप मिळते.
तशीही पाने झाडावर राहिली तर त्यावर बर्फ़ पडणार व तो बर्फ़ पानांवरच साचून रहाणार. तो पेलायची क्षमता त्या पानात नसतेच. आणि या बर्फ़ामुळे पानांना श्वासोच्छ्वास करता येणार नाही.
म्हणून या पानांचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा तोवर तयार झालेली साखर साठवून ठेवलेली बरी .............असा विचार खोड करते.
वसंत ऋतूत हळूहळू तापमान वाढायला लागते, तशी झाडांना जाग येते. पण सालाबादप्रमाणे यंदाही इथे उन्हाळा थो्डाच वेळ असणार आहे याची झाडाला कल्पना असते.
शिवाय आधी तयार झालेली साखर झाडाच्या खोडात असतेच. त्यामुळे फ़ुले येण्यासाठी जी साखर एरवी पाने तयार करतात त्याची वाट पहाण्याची गरज नसते.
त्यामुळे असलेली साखर वापरून झाडे थेट फ़ुलेच तयार करतात. फ़ुलांपैकी जे महत्वाचे अवयव असतात ते म्हणजे स्त्रीकेसर, पूंकेसर आणि बीजकोष.
आणि पाकळ्या म्हणजे तरी काय? रूप बदलेली पानंच ती! अशी फ़ुलं तयार करून झाड आपल्या (वनस्पतीच्या) पुढच्या पिढीची तयारी करून ठेवते.
तेच झाडाचे पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्वाचे काम. ते एकदा झाले की नंतर पाने तयार करून पुढच्या मौसमाची तयारी करता येते!
(हे सर्व स्पष्टीकरण "दिनेश" यांच्या मदतीमुळे! धन्यवाद दिनेश. )

इकडे हिवाळ्यात वर उल्लेखल्याप्रमाणे सी गल्सचा चीत्कार आणि गीजचं हॉन्किन्ग याव्यतिरिक्त आसमंतात फ़ारसे आवाज जाणवत नाहीत.
पण वसंताच्या चाहुलीबरोबर रस्त्याकडेच्या खुरट्या झुडुपातून चिमण्यांचा चिवचिवाट आणि छतावर, झाडांवर कावळ्याचं कर्कश्य ओरडणं ऐकू यायला लागलं.
या चिमण्या आपल्या भारतीय चिमण्यांपेक्षा अंमळ मोठ्याच वाटल्या आणि कावळ्याचं ओरडणंही टर्र टर्र असं वेगळंच वाटलं.
मग असंही वाटलं.....बरोबर आहे, काव काव असं मराठीतून ओरडायला हे भारतीय कावळे थोडेच आहेत. अमेरिकन कावळे मराठीतून कावकाव कसं करतील?
विनोदाचा भाग सोडल्यास असे काही फ़रक बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार, बदलत्या ऋतूंप्रमाणे जाणवणारच!

पण आता ऑफ़िशियली स्प्रिंग सुरू झाला आहे. रात्री साधारणत: आठ वाजेपर्यंत दिवसाचा उजेड असतो. दिवस मोठा झालेला असतो. आता रस्त्यावर माणसं दिसू लागतात. सायकलिस्ट्स, रनर्स, जॉगर्स, कुत्र्यांना फ़िरवणारी माणसं!
आता छान वाटतं या माणसाच्या अस्तित्वाच्या जिवंत रसरशीत खुणा बघून! नाहीतर संपूर्ण हिवाळाभर माणसाच्या अस्तित्वाच्या खुणा म्हणजे मुक्याने गुपचुप उभी असलेली घरं आणि सडकेवरून भुर्र भुर्र धावण्याऱ्या गाड्या!

दर वर्षी या वसंताच्या आगमनाची दवंडी पिटणारा एक दूत म्हणजे वॉशिंग्टन डीसीत चालणारा "चेरी ब्लॉसम महोत्सव".


१९१२ साली जपानने अमेरिकेला चेरी ब्लॉसमची ३००० झाडं भेट दिली. ही रोपटी पोटोमॅक नदीच्या ’टायडल बेसिन’ या ठिकाणी नदी किनारी लावली गेली.
आणि नंतर जतन केली गेली. ही रोपटी अमेरिका आणि जपानच्या मैत्रीचं प्रतीक होती. तरीही यातली काही जगली नाहीत, मग जपानने पुन्हा आणखी काही रोपटी भेट दिली.
नंतर १९२७ साली पहिला "चेरी ब्लॉसम महोत्सव" साजरा झाला. आणि नंतर आजतागायत चालूच आहे.
यात दोन्ही देशांची वैशिष्ठ्ये दाखवणारे सांस्कृतिक कार्यक्रम, परेड्स, कधी सामुहिक योगासनं ...असे विविध कार्यक्रम चालतात.
या महोत्सवाला दर वर्षी संपूर्ण जगातून लाखो लोक भेट देतात.
ही चेरी ब्लॉसमची फ़ुलं, हा बहर... अत्यंत नाजुक असतो. हा बहर कधी फ़ुलणार याची साधारण भाकितं वर्तवली जातात. आणि पर्यटकही हा संपूर्ण बहर अनुभववायला आतुर असतात.
त्यामुळे साधारणपणे चार वीकेन्ड्स हा महोत्सव या बहराच्या कालावधीतच चालतो. हळूहळू सृष्टीच्या नियमानुसार हा बहर पोटोमॆक नदीच्या पात्रात गळून पडतो आणि काठाजवळच्या पाण्याला गुलाबी करून टाकतो!
काठावर उभ राहून नदीपात्रात नजर टाकली तर पाण्यात ठिकठिकाणी या अश्या गळून पडलेल्या बहराच्या गुलाबी लहरी दिसतात!
या वसंताची जाणीव आजूबाजूचा बदलता निसर्ग करून देतो. तसंच आपल्या आजूबाजूच्या वातावरणातही हे बदल दिसायला लागतात. आजूबाजूच्या घरांच्या बाल्कन्यांमधे, अंगणात छोट्या छोट्या रंगीबेरंगी खुर्च्या दिसायला लागतात. बागकामाच्या पूर्व तयारीच्या खुणाही दिसतात. रंगीत कुंड्या, बागकामाची हत्यारं यांनी अंगणं, बाल्कन्या अगदी सजून वसंताच्या स्वागताची तयारी करतात. कुंड्या, खुर्च्यांप्रमाणेच बागकामाची हत्यारंही रंगीबेरंगी, रोपांना पाणी घालण्याच्या झाऱ्याही अगदी रंगित! ज्याला इकडे स्प्रिंगी कलर्स म्हणतात!
समोरचं तरुण जोडपं भल्या पहाटेच आपापल्या सायकली काढून, सुसज्ज होऊन बेसबॉल खेळायला जाताना दिसलं की आपलंही मन उल्ल्हसितच होतंच!
तसंच शेजारच्या घरात एरवी एक तरुण जोडपंच दिसतं पण वसंत ऋतूत, त्यांना बागकामात मदत करायला, नवीन रोपटी रोपायला, त्यांच्याबरोबर वसंतसहली करायला त्या जोडप्यातल्या कधी मुलाचे, कधी मुलीचे आई वडील दिसतात! सगळे मिळून छान बागकाम करतात. नवीन रोपं रोपतात.

वसंतातल्या एखाद्या वीकेन्डला बाहेर पडून तुम्ही वॉशिन्ग्टन डीसीहून शेजारी असलेल्या अ‍ॅनापोलिस या समुद्रसपाटीवरच्या सुंदर टुमदार शहराच्या दिशेने कूच करा............तुम्हाला वाटेत भेटतील, मोठमोठ्या खाजगी एस यू व्हीज! ज्यांच्या मागे जोडलेल्या ट्रेलर्सवर छोट्या बोटी, होडकी ठेवलेली दिसतील. आणि गाडीत संपूर्ण कुटुंब! आता हे कुटुंब समुद्रात बोटिंग करून, कधी किनाऱ्यावर सूर्यस्नान घेत हा सुंदर वसंतातला ऊबदार वीकेन्ड सार्थकी लावणार!
कधी या गाड्यांच्या मागे दोन छोट्या दोन मोठ्या अश्या सायकलीही लावलेल्या आढळतील! हे कुटुंब आता खास सायकलींसाठी तयार केलेल्या सायकल ट्रेल्सवर सहकुटुंब सायकलिंग करेल!
असे सुंदर सायकल ट्रेल्स वॉशिंग्टन डीसीतही आहेत. जिथे फ़क्त सायकलिस्ट्सच भेटतील. या ट्रेल्सवर बाकी काहीही नाही भेटलं तरी म्हशी नक्कीच आडव्या येणार नाहीत किंवा वेडं वाकडं ट्रॅफ़िकही लागणार नाही.
त्यामुळे या सुंदर उत्साहवर्धक वातावरणात आपण अगदी निर्वेधपणे, मनसोक्त सायकलिंगचा आनंद लुटू शकतो!

हळूहळू सगळी मैदानं गजबजायला लागतात. अश्याच एखाद्या मैदानावर गेलं की जाणवतं .................अरे........अमेरिकेत माणसं रहातात आणि ती आरडा ओरडाही करतात!
खूपश्या मैदानांवर बेसबॉल या खेळाला प्राधान्य दिसलं. बहुतेक मैदांनांवर पालक आपापल्या पाल्यांना अगदी व्यवस्थित त्या त्या खेळाचे कपडे बूट आणि साधने(स्पोर्ट्स गिअर) यासकट आणताना दिसले. आणि आपल्या पाल्याला त्याच्या ग्राउंडवर सोडून पालकही रनिंग जॉगिंग इत्यादि व्यायाम करताना दिसले.
क्रिकेट मात्र नावालाही कुठेच दिसलं नाही.

आणि असा हा आसमंतात, चराचरात भरून राहिलेला.... विंटरनंतर नेमेचि येणारा....... वसंत ऋतु अनुभवला की सुप्रसिद् आंग्ल कवी "शेली" याच्या Ode to the West Wind या काव्यातील अखेरच्या या अजरामर पंक्ति ओठावर आल्याशिवाय रहात नाहीत!

The trumpet of a prophecy! O Wind,
If Winter comes, can Spring be far behind?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चु म्मे श्व री..
वर्णन क्लास आणि फोटो तर वाह वाह! ..
अतिशय मस्त लिहिलय मानुषी तु..मज्जाच मज्जा केली असणार न तु तिथं..सुखी तु Happy

धनवंती, जागू, शशांक, टिना, आत्मधून, मार्गी, मनिमोहोर, क्रिश्नन्त, ललिता प्रीति, सामी, मी नताशा, आशिका
सर्वांना खूप धन्यवाद!

क्या बात है!!! जियो मानुषीताई!!!!!
फोटो आणि लेख खुप म्हणजे खुपच आवडला. Happy

मी पण अनुभवले इथल्या ऋतूंचे बदल.. सुरवातीला खूप अप्रूप वाटलं...पण असलं सुंदर लिहिण जमलच नसतं मला.. खूपच सुरेख टिपलेत हे बदल तुम्ही.. मस्तच लिहिलंय.

Pages