आज फ्रेंण्डशिप डे च्या निमित्ताने कांदेपोहे या विषयावर एक सुमार निबंध लिहायचा मूड झालाय.... सहन करा !
कांदेपोहे हा न्याहारीचा प्रकार मला एवढा आवडतो, की कोणी मला भोजन म्हणून दिले तरी माझी ना नसते.
सुट्टीच्या दिवशी सकाळी, बिछान्यात कितीही आळसाने लोळत का पडलो असेना, "पोहे गरमागरम आहेत तोपर्यंत खाऊन घे" ही आईची साद क्षणार्धात झोप उडवायच्या अलार्मचे काम करते.
माझ्या ग'फ्रेंडच्या मते मला कांदेपोह्याचे ईतके बेक्कार व्यसन आहे की तिला भिती वाटते मी घरच्यांच्या सांगण्यावरून मुलगी बघायला गेलो आणि त्या मुलीच्या हातचे कांदेपोहे मला आवडले तर हिला सोडून मी तिच्याशी लग्न करेन.
मस्करी नाही करत, सिरीअसली, पण कांदेपोहे या अन्नप्रकाराशी मी ईतका जिव्हाळ्याने जोडलो गेलो आहे की या नावाचा माबो आयडी माझ्या पाहण्यात आला तेव्हा त्यांची एकही पोस्ट वाचायच्या आधीच त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आपलेपणा वाटू लागला.
असो, तर असे हे पोहे चव समजायची अक्कल आल्यापासून माझ्या आवडीचे. लहानपणी उठसूठ आईचा हात पकडून या त्या नातेवाईकांकडे येणे जाणे व्हायचे. नाश्ता म्हणून बहुतांश वेळा कांदेपोहेच मिळायचे. पण काही मोठाल्या कुटुंबांमध्ये जेमतेम कांदेपोहे असे काही मोजून मापून केले जायचे की प्रत्येकाला एकच प्लेट मिळावी. नाही म्हणायला एखादी प्लेट एक्स्ट्रा बनवली असायची, पण पाहुणा म्हणून ती गटकवायला माझी जीभ धजावायची नाही. मला तेव्हा अशी घरे फार गरीब, मध्यमवर्गीय, लाचार, अरसिक, बिच्चारी बिच्चारी, वगैरे वाटायची. अश्यावेळी आई देखील माझ्या कानात येऊन हळूच कुजबुजून जायची, ‘एकच प्लेट खायची आहे रे रुनम्या, तेवढेच आहेत पोहे, पुन्हा मागू नकोस..’ बस्स मग काय, पुन्हा पोहे मागितले तर आपण हावरट ठरू आणि आईची लाज घालवू या विचाराने मी आजवर पोटभर कांदेपोहे हादडायच्या कित्येक इच्छा मारल्या आहेत.
एक काळ होता हॉस्टेललाईफचा! आईच्या हातच्या जेवणापासून दूर राहायचा. एकूण एक भाज्यांना नाकं मुरडणारा, फक्त आईच्या हातचीच चपाती खाणारा, शक्य तितके मांसाहारावरच जगणार्या, अश्या माझ्यासाठी तो उदरभरणाच्या द्रुष्टीने कठीणच काळ होता. तेव्हाही या कांदेपोह्यांनीच साथ दिली होती. आठवड्यातील चौदापैकी किमान दहा नाश्ते मी कांदेपोह्यावर भागवायचो, आणि असे भागवायचो की त्यातच भागेल व मेसचे जेवण कमीतकमी खावे लागेल. कधी या गाडीवर तर कधी त्या गाडीवर, कधी स्टॉलवर तर कधी टपरीवर.. त्या दिवसांत एका गोष्टीचा साक्षात्कार मात्र झाला, की कांदेपोहे मी कोणाच्याही हातचे खाऊ शकतो, कुठेही आणि कसलेही खाऊ शकतो.
कांदेपोहे मला साधे सोपे म्हणजेच रेग्युलर पद्धतीतीलही आवडतात, तसेच त्यावर शेव, खोबर्याची टॉपिंग आणि कोथिंबीरची गार्निशिंग असेल तर क्या बात! कडेला लिंबाची फोड मस्टच! कांदेपोहे म्हटले की त्या नावाला जागणारे कांदे ओघाने आलेच पण सोबत बटाटा, शेंगदाणे, थोडीशी मटार, नावाला टोमेटो वगैरे असल्यास चव टप्प्याटप्याने वाढत जाते.
बरेचदा नेहमीसारखे सुकेसुके पोहे एक लिंबू काय तो पिळत खायचा मूड नसेल, तर पोह्यावर ग्रेवी म्हणून कडधान्याची उसळ, कांद्याचे कालवण, कटाची आमटी ते मटणाचा रस्सा अगदी काहीही चालते. फक्त ते माफक प्रमाणात असावे, डाळभातासारखे कोलसवले जाऊ नये एवढीच अपेक्षा.
खरे तर मला पोहे कुठल्याही प्रकारचे आणि कुठल्याही पद्धतीचे आवडतात. जाडेही आवडतात, पातळ वा दडपेही आवडतात. कारण मुळात मला पोहेच आवडतात.
दुधात वा भरपूर दूध असलेल्या चहात पोहे भिजवून, त्यात पोह्यांच्या निम्म्या वजनाची साखर टाकून खाण्यात जी काही मजा येते, एवढी झटपट बनणारी गोड न्याहारी अखंड महाराष्ट्रात दुसरी नसेल.
माझी एक दूरची आज्जी मटार घालून केलेल्या पोह्याचे समोसे छान करायची. मूळ समोसा या प्रकाराचा फारसा मोठा फॅन नसूनही त्यावर तुटून पडायचो. रेसिपी तेवढी विचारू नका, ती आपल्याबरोबर वर घेऊन गेली.
आयुष्यात कधी एक मराठी माणूस म्हणून धंदा करावासाच वाटला तर 'डोसाप्लाझा' मध्ये जसे विविध प्रकारचे डोसे मिळतात तसे 'कांदापोहे माझा' नावाची रेस्टॉरंट चेन काढेन ज्यात, शेजवान पोहे, पनीर पोहे, नूडल्स पोहे, चिकन पोहे, खिमा पोहे, असे विविध प्रकार मिळतील. त्यावर चमचाभर बटर किंवा चीजची एखादी स्लाईस किसून टाकायचे अनुक्रमे 10 आणि 20 रुपये एक्स्ट्रा घेईन. एक ट्रिपल शेजवानच्या धर्तीवर ट्रिपल मिसळ पोहे नावाचा प्रकार नक्की असेल ज्यात एका प्लेटमध्ये पोहे, सोबत शेव-फरसाण आणि वाटीमध्ये पातळ उसळ देण्यात येईल. सोबत गरमागरम वाफाळलेला आलं घातलेला चहा.. बस्स बस्स बस्स.. सगळ्या आयडीया ईथेच फोडण्यात अर्थ नाही. तुर्तास आवरते घेतो..
तर आता फ्रेंडशिप डे बद्दल,
खरे तर हा पाश्चात्य सण, जो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. का, कश्यासाठी, ते मला माहीत नाही, ना कधी जाणून घ्यायची गरज भासली. तसेच त्या विरोधात जाऊन कॉलेजातल्या मुलींशी मैत्री करायची सहजसोपी संधी गमवायची इच्छा नव्हती.
पण आता गेले ते कॉलेजचे दिवस! आता हा सण फक्त व्हॉटसप, फेसबूकवर सरसकट सर्वच मित्रमैत्रीणींना ‘हॅपी फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देण्यापुरता शिल्लक राहिलाय. त्यामुळे याचे पाश्चात्य सण असणे आताशा खटकू लागलेय किंवा खरेच गरज आहे का हा दिवस साजरा करायची असे विचार मनात येऊ लागलेत.
पण मग विरोध करायचा झाल्यास याला पर्याय सुचवणेही आले. तो देखील एखादा आपल्या संस्कृतीला अनुसरून आवश्यक संदर्भ देत. म्हणून मागे मागे डोकावत थेट पुराणकाळात पोहोचलो आणि तिथे मला कृष्ण-सुदामा मैत्रीची एक अजरामर कथा सापडली, जी सर्वांना माहीत असेलच.
मित्र फक्त न फक्त मैत्रीची भावना बघतो. उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, राजा-रंक, या गोष्टी मग गौण ठरतात. असा संदेश देणारी हि कथा प्रमाण मानत कृष्ण सुदामा भेटीचा दिवस मैत्रीदिन म्हणून साजरा करायला काय हरकत आहे.. कबूल आहे आता ती तारीख, वा तिथी नेमकी काय होती याचा शोध घ्यायला गेल्यास वाद आणि मतांतरे होतील जे आपल्याला नवीन नाही. पण मग का नाही आजचाच दिवस, मात्र आपल्या परंपरेला अनुसरून पोहे खाऊन साजरा करायचा.
हो पोहे खाऊन, तेच पोहे जे सुदाम्याने कृष्णाला निस्वार्थ मैत्रीची भेट म्हणून दिले होते. तेच पोहे जे मूठभर खाताच कान्हाची मैत्रीची भूक भागली होती. आयुष्यभराचे एखादे नाते जोडताना जे कांदापोहे खाल्ले जातात. एखाद्या मैत्रीच्या नात्यातील ओलावा आजही तितकाच शाबूत आहे हे दाखवताना जे पोहे भेट म्हणून दिले जातात. जे आवडत नाही असा भूतलावरचा माणूस विरळाच. आणि म्हणूनच जे पोहे आपल्या सर्वांना एका समान धाग्याने बांधून ठेवतात. यापुढे ते खाऊनच आजचा दिवस साजरा करूया. अनायासे रविवारही असतोच
तर माझ्या माबोवरील सर्व मित्रांना, नव्हे सर्वच माबोकरांना, मैत्री दिनाच्या खमंग, झणझणीत आणि चटकदार शुभेच्छा
- ऋन्मेऽऽष
इथे एक पोहे फॅन क्लब म्हणून
इथे एक पोहे फॅन क्लब म्हणून बाफ आहे. तो वाचून घ्या. पोह्यांचे बरेच वेरिएशन मिळतील.
बाकी मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
मस्तं निबंध! आवडला.
मस्तं निबंध!
आवडला.
छान लिहिलं आहे. छान
छान लिहिलं आहे. छान लिहितोस्/लिहिता. एंटरटेनिंग असतं. फार डोक्याला शॉट नाही.
मस्तं, अगदी मनापासून लिहिलेला
मस्तं, अगदी मनापासून लिहिलेला लेख.
लेखाच्या शेवटी मैत्रीचा आणि सुदामाच्या पोह्यांचा संबध फारच छान वाटला. तुम्हालाही मैत्रिदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
अरे वा .. मस्तच
अरे वा ..
मस्तच लिहिलय..
मैत्रीदिनाच्या तुलापन शुभेच्छा..
अगदी वीक पॉइंटलाच हात घातलास
अगदी वीक पॉइंटलाच हात घातलास की रे!
जाई हो, मला लिहितानाच कल्पना
जाई हो,
मला लिहितानाच कल्पना होती की असा पोहाफ्यानक्लब नावाचा प्रकार माबोवर अस्तित्वात असणार, पण तेव्हा शोधले नाही कारण मग आपले लिहायचा मूड गंडतो. रात्री शोधतो आणि चाळतो नक्की..
मनीमाऊ,
लिहितोस्/लिहिता... पैकी लिहिता वर काट मारा. कोणी अहो जाहो केले की माझ्या डोक्याला मात्र शॉट लागतो
इतकं चांगलं गोग्गोड तु कसे
इतकं चांगलं गोग्गोड तु कसे लिहितोस याचे गुपित शेवटी आज तु फोडलेसच.तुला खुपखुप कांदेपोहे खायला मिळोत आणि खुपखुप झणझणित व्हेरिएशन का काय त्या गर्लफ्रेंड मिळोत.
आमची आई आम्हाला नातेवाइकांकडे नेताना तिकडे आम्ही भूकभूक करू नये म्हणून अगोदर केळ्याची शिकरण पोळी खायला घालून नेत असे.
तुला धन्यचवाद... आजारपणातून
तुला धन्यचवाद... आजारपणातून उठल्याने तोंडाची चव गायब झालीय. हां लेख वाचुन जबरी कां पो केले, खाल्ले आणि मन जरा शांत झाले.
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा पण ते धागे जरा कमी काढ़!
छान लेख.
छान लेख.
ते जरा कांदेपोहे आणि
ते जरा कांदेपोहे आणि मैत्रीदिवस वेगवेगळे लिहीले असते तर जरा बरे झाले असते. पोह्यांवरचे लिखाण जास्त आवडले कारण मी पण पोहे फॅन क्लबचीच पर्मनंट मेंबर.
बाकी हे वाचून एक दोन जास्तीच्या आयड्या सुचल्यात. करुन बघाव्या म्हणतेय..!!
अरे,भुजिंगबद्दल कसं नाही
अरे,भुजिंगबद्दल कसं नाही लिहिलंस?
चिकन विथ पोहे?
मी तर ते खाण्यासाठी एकदा खास अगासीला जाणार आहे.
छान लिहिलं आहे..कांदे पोहे
छान लिहिलं आहे..कांदे पोहे म्हणजे माझाही जीव की प्राण...आता आज करावेच लागतील..:)
पोहे फॅन क्लब नक्की बघ..मस्त तो.पा.सु. धागा आहे..
जाता जाता ही माझ्याकडून भेट..
अशीच पोहे फॅन असणारी आहे एक
अशीच पोहे फॅन असणारी आहे एक मैत्रीण , रात्री दोन वाज्स्ता उठून सुद्धा खाईल.
घे कर ह्या पद्धती ने रुम्या.
ती पण त्यात बटाटे, वाटाणे, कूट, कॉर्ण असे सगळं एकत्र टाकूनच बनवणार. वर शेव, अनारदाना, खोचलेले खोबरं , भरपूर कोथींबीर.
आपण लांबून नमस्कार. करतो ते फक्त इतरांसाठी आणि कधी कधी एक दोन घास खाल्ले तर.
ऋन्मेष , मस्त लिहीलयसं रे .
ऋन्मेष , मस्त लिहीलयसं रे . पोहे माझा ही वीक पॅाईंट
शेवट आवडलाच.
मस्त. पोहे माझा ही वीक
मस्त.
पोहे माझा ही वीक पॅाईंट, मम हेमाताई. फक्त शाकाहारी तिखट कुठलाही पदार्थ घालून पोहे मी खाऊ शकते. गोड नाही आवडत. अगदी नुसते तेल, तिखट-मीठ पोहेपण चालतात. काही न घालता सुकेही चालतात.
मस्त लिहलयंस रे ऋ
मस्त लिहलयंस रे ऋ
हाहाहा शेजवान पोहे, पनीर
हाहाहा शेजवान पोहे, पनीर पोहे, नूडल्स पोहे, चिकन पोहे, खिमा पोहे, खास लोकाग्राहास्तव पोहे बरिटो ही डिश पण ठेव. नायतर असे बंडल पोहे कोण खाणार? बरिटोत गुंडाळले की दृष्टी आड सृष्टी.
मजेदार लेख!
आयुष्यात कधी एक मराठी माणूस
आयुष्यात कधी एक मराठी माणूस म्हणून धंदा करावासाच वाटला तर 'डोसाप्लाझा' मध्ये जसे विविध प्रकारचे डोसे मिळतात तसे 'कांदापोहे माझा' नावाची रेस्टॉरंट चेन काढेन ज्यात, शेजवान पोहे, पनीर पोहे, नूडल्स पोहे, चिकन पोहे, खिमा पोहे, असे विविध प्रकार मिळतील. तोपासु तुम्ही धंदा कराल तेव्हा करा पण हे सगळे पदार्थ मी बनविण्याचा प्रयत्न करिन म्हणतो.
कल्पना लैच भारी ! रितेशला मराठीत आणुन चित्रपट बनविण्यासारखीच
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा पण ते
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा पण ते धागे जरा कमी काढ़!
,>>>>>>>>>>
वत्सला मग नको मला तुमच्या शुभेच्छा, ईतना बुरा तो कोई दुश्मन भी ना सोचे
सर्वांचे आभार,
मोबाईलवर असल्याने सविस्तर रिप्लाय टंकत नाही,
पण एस आर डी, तुमचे विशेष आभार
मी माझी मैत्रीदिनाची आणि पोह्याची कल्पना मोदीजींना पाठवतोय, बघूया काय म्हणताहेत..
डुप्लिकेट. डुप्लिकेट
डुप्लिकेट. डुप्लिकेट
ऋन्मेऽऽष यांना माबोचे चेतन
ऋन्मेऽऽष यांना माबोचे चेतन भगत हे टायटल आणि पुरस्कार देण्यात येत आहे.
अभिनंदन !
पोह्याच्या निबंधाला जोरदार
पोह्याच्या निबंधाला जोरदार कडकडून सारखा चिमटा (सेम पिंच)
पोहे माझ्यासाठी सुद्धा जीव की प्राण डिश आहे. मी दिवस भर नाष्टा, लंच , डिनर मधे पोटभरे पर्यंत फक्त पोहेच सुद्धा आवडीने न कंटाळता खाऊ शकते.
मी एखाद्याकडे गेले तर त्याने माझासाठी पोहे बनवले की मला अपसुकच त्या माणसाबद्दल जिव्हाळा वाटू लागतो.
चतुर्थीच्या दिवशी हा लेख वाचला
उद्या मंगळवार
परवा पर्यंत पोह्यांपासून दुर रहावं लागेल आता
माऊ, काय हे! निषेध!
कसले टेम्प्टिंग दिसतायेत
कांदेपोहे म्हणजे जीव की प्राण
कांदेपोहे म्हणजे जीव की प्राण या कॅटेगरी मी येत नाही .
पण भुकेला आवडतात .बटाटा घतलेला असला तर जास्त आवडतात .
माझी बहिण फार अफलातून कांदेपोहे बनवते , तिच्या हातचे खाउन खाउन जास्त आवडतात.
पण , माऊ, काय हे! निषेध!
कसले टेम्प्टिंग दिसतायेत >>>> + १०००००
आज उपास , स्नॅन्क्स ची वेळ झालीय आता भूक खवळली फोटो पाहून .
ऋ , तुझ्या " कांदेपोहे माझा" उपक्रमाला शुभेच्छा. पुढे-मागे जर खरच अस काही चालु केलसं तर नक्की कळव .
वरील काही प्रतिसाद पाहून असे
वरील काही प्रतिसाद पाहून असे वाटतेय माझ्या हॉटीलात 'उपवासाचे साबुदाणा पोहे' सुद्धा सुरू करावेत
शाहीर धन्यवाद,
मागे बेफिकीर हे मला पुलं म्हणाले होते आणि आज आपण चेतन भगत.. आता तर मला खरेच असे वाटू लागलेय की माझ्यात काहीतरी प्रतिभा नक्कीच असावी जे मला पाहून लोकांना मोठमोठे लेखक आठवतात
कांदेपोह्याचे चांगले लिहिलय.
कांदेपोह्याचे चांगले लिहिलय. माउनी दिलेला फोटोही छान.
फ्रेन्डशीप डेचे मात्र तितकेसे पटले नाही. असो.
लिंबूकाका, तुमच्याकडून तर
लिंबूकाका, तुमच्याकडून तर त्या फ्रेंडशिप डे वर भलीमोठी पोस्ट अपेक्षित होती.. आणि तुम्ही असो बोलून निपटवलेत
एकदम छान लिहिलेस आज. उगाच
एकदम छान लिहिलेस आज. उगाच कोणताही खोटा वाद निर्माण न करता तु हल्ली लिहितोस ते वाचायला आवडते!
उगाच कोणताही खोटा वाद निर्माण
उगाच कोणताही खोटा वाद निर्माण न करता >>> हा हा, हो अॅक्चुअली आणि थँन्क्स.. खोटा वाद निर्माण करण्याची हुक्की कमी यावी ईतपत बरे लिखाण वरचेवर सुचावे हिच प्रार्थना
अरे ऋन्मेषा, मला खरच वेळ
अरे ऋन्मेषा, मला खरच वेळ नाहीये रे....
Pages