आज फ्रेंण्डशिप डे च्या निमित्ताने कांदेपोहे या विषयावर एक सुमार निबंध लिहायचा मूड झालाय.... सहन करा !
कांदेपोहे हा न्याहारीचा प्रकार मला एवढा आवडतो, की कोणी मला भोजन म्हणून दिले तरी माझी ना नसते.
सुट्टीच्या दिवशी सकाळी, बिछान्यात कितीही आळसाने लोळत का पडलो असेना, "पोहे गरमागरम आहेत तोपर्यंत खाऊन घे" ही आईची साद क्षणार्धात झोप उडवायच्या अलार्मचे काम करते.
माझ्या ग'फ्रेंडच्या मते मला कांदेपोह्याचे ईतके बेक्कार व्यसन आहे की तिला भिती वाटते मी घरच्यांच्या सांगण्यावरून मुलगी बघायला गेलो आणि त्या मुलीच्या हातचे कांदेपोहे मला आवडले तर हिला सोडून मी तिच्याशी लग्न करेन.
मस्करी नाही करत, सिरीअसली, पण कांदेपोहे या अन्नप्रकाराशी मी ईतका जिव्हाळ्याने जोडलो गेलो आहे की या नावाचा माबो आयडी माझ्या पाहण्यात आला तेव्हा त्यांची एकही पोस्ट वाचायच्या आधीच त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आपलेपणा वाटू लागला.
असो, तर असे हे पोहे चव समजायची अक्कल आल्यापासून माझ्या आवडीचे. लहानपणी उठसूठ आईचा हात पकडून या त्या नातेवाईकांकडे येणे जाणे व्हायचे. नाश्ता म्हणून बहुतांश वेळा कांदेपोहेच मिळायचे. पण काही मोठाल्या कुटुंबांमध्ये जेमतेम कांदेपोहे असे काही मोजून मापून केले जायचे की प्रत्येकाला एकच प्लेट मिळावी. नाही म्हणायला एखादी प्लेट एक्स्ट्रा बनवली असायची, पण पाहुणा म्हणून ती गटकवायला माझी जीभ धजावायची नाही. मला तेव्हा अशी घरे फार गरीब, मध्यमवर्गीय, लाचार, अरसिक, बिच्चारी बिच्चारी, वगैरे वाटायची. अश्यावेळी आई देखील माझ्या कानात येऊन हळूच कुजबुजून जायची, ‘एकच प्लेट खायची आहे रे रुनम्या, तेवढेच आहेत पोहे, पुन्हा मागू नकोस..’ बस्स मग काय, पुन्हा पोहे मागितले तर आपण हावरट ठरू आणि आईची लाज घालवू या विचाराने मी आजवर पोटभर कांदेपोहे हादडायच्या कित्येक इच्छा मारल्या आहेत.
एक काळ होता हॉस्टेललाईफचा! आईच्या हातच्या जेवणापासून दूर राहायचा. एकूण एक भाज्यांना नाकं मुरडणारा, फक्त आईच्या हातचीच चपाती खाणारा, शक्य तितके मांसाहारावरच जगणार्या, अश्या माझ्यासाठी तो उदरभरणाच्या द्रुष्टीने कठीणच काळ होता. तेव्हाही या कांदेपोह्यांनीच साथ दिली होती. आठवड्यातील चौदापैकी किमान दहा नाश्ते मी कांदेपोह्यावर भागवायचो, आणि असे भागवायचो की त्यातच भागेल व मेसचे जेवण कमीतकमी खावे लागेल. कधी या गाडीवर तर कधी त्या गाडीवर, कधी स्टॉलवर तर कधी टपरीवर.. त्या दिवसांत एका गोष्टीचा साक्षात्कार मात्र झाला, की कांदेपोहे मी कोणाच्याही हातचे खाऊ शकतो, कुठेही आणि कसलेही खाऊ शकतो.
कांदेपोहे मला साधे सोपे म्हणजेच रेग्युलर पद्धतीतीलही आवडतात, तसेच त्यावर शेव, खोबर्याची टॉपिंग आणि कोथिंबीरची गार्निशिंग असेल तर क्या बात! कडेला लिंबाची फोड मस्टच! कांदेपोहे म्हटले की त्या नावाला जागणारे कांदे ओघाने आलेच पण सोबत बटाटा, शेंगदाणे, थोडीशी मटार, नावाला टोमेटो वगैरे असल्यास चव टप्प्याटप्याने वाढत जाते.
बरेचदा नेहमीसारखे सुकेसुके पोहे एक लिंबू काय तो पिळत खायचा मूड नसेल, तर पोह्यावर ग्रेवी म्हणून कडधान्याची उसळ, कांद्याचे कालवण, कटाची आमटी ते मटणाचा रस्सा अगदी काहीही चालते. फक्त ते माफक प्रमाणात असावे, डाळभातासारखे कोलसवले जाऊ नये एवढीच अपेक्षा.
खरे तर मला पोहे कुठल्याही प्रकारचे आणि कुठल्याही पद्धतीचे आवडतात. जाडेही आवडतात, पातळ वा दडपेही आवडतात. कारण मुळात मला पोहेच आवडतात.
दुधात वा भरपूर दूध असलेल्या चहात पोहे भिजवून, त्यात पोह्यांच्या निम्म्या वजनाची साखर टाकून खाण्यात जी काही मजा येते, एवढी झटपट बनणारी गोड न्याहारी अखंड महाराष्ट्रात दुसरी नसेल.
माझी एक दूरची आज्जी मटार घालून केलेल्या पोह्याचे समोसे छान करायची. मूळ समोसा या प्रकाराचा फारसा मोठा फॅन नसूनही त्यावर तुटून पडायचो. रेसिपी तेवढी विचारू नका, ती आपल्याबरोबर वर घेऊन गेली.
आयुष्यात कधी एक मराठी माणूस म्हणून धंदा करावासाच वाटला तर 'डोसाप्लाझा' मध्ये जसे विविध प्रकारचे डोसे मिळतात तसे 'कांदापोहे माझा' नावाची रेस्टॉरंट चेन काढेन ज्यात, शेजवान पोहे, पनीर पोहे, नूडल्स पोहे, चिकन पोहे, खिमा पोहे, असे विविध प्रकार मिळतील. त्यावर चमचाभर बटर किंवा चीजची एखादी स्लाईस किसून टाकायचे अनुक्रमे 10 आणि 20 रुपये एक्स्ट्रा घेईन. एक ट्रिपल शेजवानच्या धर्तीवर ट्रिपल मिसळ पोहे नावाचा प्रकार नक्की असेल ज्यात एका प्लेटमध्ये पोहे, सोबत शेव-फरसाण आणि वाटीमध्ये पातळ उसळ देण्यात येईल. सोबत गरमागरम वाफाळलेला आलं घातलेला चहा.. बस्स बस्स बस्स.. सगळ्या आयडीया ईथेच फोडण्यात अर्थ नाही. तुर्तास आवरते घेतो..
तर आता फ्रेंडशिप डे बद्दल,
खरे तर हा पाश्चात्य सण, जो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. का, कश्यासाठी, ते मला माहीत नाही, ना कधी जाणून घ्यायची गरज भासली. तसेच त्या विरोधात जाऊन कॉलेजातल्या मुलींशी मैत्री करायची सहजसोपी संधी गमवायची इच्छा नव्हती.
पण आता गेले ते कॉलेजचे दिवस! आता हा सण फक्त व्हॉटसप, फेसबूकवर सरसकट सर्वच मित्रमैत्रीणींना ‘हॅपी फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देण्यापुरता शिल्लक राहिलाय. त्यामुळे याचे पाश्चात्य सण असणे आताशा खटकू लागलेय किंवा खरेच गरज आहे का हा दिवस साजरा करायची असे विचार मनात येऊ लागलेत.
पण मग विरोध करायचा झाल्यास याला पर्याय सुचवणेही आले. तो देखील एखादा आपल्या संस्कृतीला अनुसरून आवश्यक संदर्भ देत. म्हणून मागे मागे डोकावत थेट पुराणकाळात पोहोचलो आणि तिथे मला कृष्ण-सुदामा मैत्रीची एक अजरामर कथा सापडली, जी सर्वांना माहीत असेलच.
मित्र फक्त न फक्त मैत्रीची भावना बघतो. उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, राजा-रंक, या गोष्टी मग गौण ठरतात. असा संदेश देणारी हि कथा प्रमाण मानत कृष्ण सुदामा भेटीचा दिवस मैत्रीदिन म्हणून साजरा करायला काय हरकत आहे.. कबूल आहे आता ती तारीख, वा तिथी नेमकी काय होती याचा शोध घ्यायला गेल्यास वाद आणि मतांतरे होतील जे आपल्याला नवीन नाही. पण मग का नाही आजचाच दिवस, मात्र आपल्या परंपरेला अनुसरून पोहे खाऊन साजरा करायचा.
हो पोहे खाऊन, तेच पोहे जे सुदाम्याने कृष्णाला निस्वार्थ मैत्रीची भेट म्हणून दिले होते. तेच पोहे जे मूठभर खाताच कान्हाची मैत्रीची भूक भागली होती. आयुष्यभराचे एखादे नाते जोडताना जे कांदापोहे खाल्ले जातात. एखाद्या मैत्रीच्या नात्यातील ओलावा आजही तितकाच शाबूत आहे हे दाखवताना जे पोहे भेट म्हणून दिले जातात. जे आवडत नाही असा भूतलावरचा माणूस विरळाच. आणि म्हणूनच जे पोहे आपल्या सर्वांना एका समान धाग्याने बांधून ठेवतात. यापुढे ते खाऊनच आजचा दिवस साजरा करूया. अनायासे रविवारही असतोच
तर माझ्या माबोवरील सर्व मित्रांना, नव्हे सर्वच माबोकरांना, मैत्री दिनाच्या खमंग, झणझणीत आणि चटकदार शुभेच्छा
- ऋन्मेऽऽष
ऋ. .. सुपर लाईक हा लेख.. पण
ऋ. .. सुपर लाईक हा लेख.. पण ज्या देशांत पोहेच नसतील मिळत तिथे हा लेख वाचायचा, वर्तून फोटो ही बघायचा,, ,,ऊफ..क्या टॉर्चर है
आत्ताच्याआत्ता खावेसे वाटताहेत..

कृष्ण सुदामा रेफरंस एक्दम अॅप्ट रे.. बहोत खूब!!!
थोड्या वेळापुर्वी उरकल
थोड्या वेळापुर्वी उरकल माझं..
हा तुम्हा सर्वांना नैवेद्य
हायला! मला वाटलं
हायला! मला वाटलं मैत्रीदिनापासून सुरुवात करुन कांदेपोह्यांपर्यन्त पोहोचलास कुठेतरी..... पण अजून कशाचाच कशाला पत्ता नाहिये तर.....
आईग्ग टीना का जळवत आहात.. आज
आईग्ग टीना का जळवत आहात.. आज हाल झालेत माझे खाण्याचे सकाळपासून.. तुमच्या फोटोत पोह्याच्या बाजूला शेव दिसतेय ना तो अन तेवढाच आज माझा सकाळचा नाश्ता होता आणि जेवणाचे तर विचारूच नका..
बागुलबोवा

फ्रॅण्डशिप डे ने सुरुवात करणारे कांदापोहेच्या वाटेला जात नाहीत.. कॉफी ते कॅण्डल लाईट डिनर असा रूट घेतात..
आणि तो माझा घेऊन झालाय
ऋन्मेष, निबंध झकास जमला
ऋन्मेष, निबंध झकास जमला आहे.
त्यावर चमचाभर बटर किंवा चीजची एखादी स्लाईस किसून टाकायचे अनुक्रमे 10 आणि 20 रुपये एक्स्ट्रा घेईन<<< मस्त!!!
सगळ्या आयडीया ईथेच फोडण्यात अर्थ नाही<<<
कातील फोटो!! का त्रास देताय
कातील फोटो!! का त्रास देताय सकाळी सकाळी?
आता नाश्त्याला करावेच लागणार...:)
ऋन्मेष , मस्त लिहितोस रे.
ऋन्मेष , मस्त लिहितोस रे.
धन्यवाद, अश्विनी देवकी
धन्यवाद, अश्विनी देवकी
अवांतर - आज गटारी झाली की महिनाभर हे पोहेच साथ देणार आहेत
भावा! गहिवरवलंस! हा घे झब्बू
भावा! गहिवरवलंस! हा घे झब्बू - http://khaintartupashi.blogspot.in/2009/04/blog-post_30.html
मेघना मस्त लेख... तुम्ही
मेघना मस्त लेख... तुम्ही उल्लेखलेले दूध प्लस दही प्लस पोहे प्लस मिरचे फोडणी नि काय काय असे कधी खाल्ले नाही.. भारीच लागत असावे.. पण आपले साधे दूध पोहे आणि त्यात गोड झेपते तितकी साखर हे माझ्या आवडीचे आहे. मुख्य म्हणजे झटपट आपले आपण करून खाऊ शकतो. कांदा कापता येत नाही म्हणून हळहळायची गरज पडत नाही
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
आपले साधे दूध पोहे आणि त्यात गोड झेपते तितकी साखर हे माझ्या आवडीचे आहे.>>> सेम हिअर..
छान लिहिलंयस रे ऋणम्या
छान लिहिलंयस रे ऋणम्या
धन्यवाद..
धन्यवाद..
कसे येतात हे जुने जुने धागे वर..
की आता संत वॅलेंटाईन डे जवळ आला आहे तर फ्र्याण्डशिपडे सारखेच त्यासोबतही एखादा मेनू जोड असे मेनू सुचवायचे तर नाही ना?
आई देखील माझ्या कानात येऊन
आई देखील माझ्या कानात येऊन हळूच कुजबुजून जायची, ‘एकच प्लेट खायची आहे रे रुनम्या, तेवढेच आहेत पोहे, पुन्हा मागू नकोस.
>>> याच्यासाठी धागा वरती आणला असावा असा अंदाज.
समजले नाही यात काय विशेष?
समजले नाही
यात काय विशेष?
रेसिपी तेवढी विचारू नका, ती
रेसिपी तेवढी विचारू नका, ती आपल्याबरोबर वर घेऊन गेली.>>>ज्या तर्हेने लिहिलंयस त्यामुळे हसू आले रे.
मस्त लेख.
फ्रेंडशिप डे निमित्त वर काढतो
फ्रेंडशिप डे निमित्त वर काढतो लेख
Society च्या गेटवर already
Society च्या गेटवर already आहे असं फक्त पोह्यांच दुकान.
20हून अधिक प्रकार मिळतात पोह्यांचे.
अरे वाह मस्त .. इथे नाही कुठे
अरे वाह मस्त .. इथे नाही कुठे पाहिले..
छान लिहिलं आहे .
छान लिहिलं आहे .
Pages