तुम मुझे यूं भुला ना पाओगे...(रफी पुण्यस्मरण)

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2015 - 13:41

mohd-rafi.jpg

मला क्लासिक गणल्या गेलेल्या पुस्तकांचं, चित्रपटांच हे वैशिष्ट्य वाटतं कि काळागणिक त्यातुन नवनवीन शक्यता दिसु लागतात. त्यामुळे त्यांच्यावर जुनेपणाची कळा कधी येतच नाही. रफीच्या गायकिचा मला जाणवलेला हा विशेष आहे. परवाच एक दुर्मिळ म्हणता येईल असं रफीचं गाणं अचानक ऐकायला मिळालं. राजकपूरसाठी रफी गात होता. "मेरा नाम जोकर" मधुन हे गाणे कापले गेले आहे. पण "सदके हीर तुझपे" ऐकुन अक्षरशः थक्क झालो. राजकपूरला त्याच्या आवडत्या मुकेशला या गाण्यासाठी घेताच आलं नसतं हे जाणवलं. राजकपूरने देहबोलीतुन आणि रफीने आवाजातुन दर्द उभा केला आहे. त्यानंतर आणखि एक अलिकडेच ऐकलेले गाणे म्हणजे "रहेगा जहां मे तेरा नाम" हे के. आसिफ च्या त्याच्याकडुन अपुर्ण राहिलेल्या "लव्ह अँड गॉड" चित्रपटातील गाणे. यात तर मन्नाडे आणि तलतसारखी मोठी माणसे आहेत. पण शेवटी "सबका दामन भरने वाले" अशी रफीने सुरुवात केली कि वातावरणच बदलुन जाते. अशा या हिन्दी चित्रपटसंगीताच्या बादशहाला काळाच्या पडद्याआड जाऊन आज ३१ जुलैला तब्बल चौतीस वर्षे झाली पण या माणसाच्या आवाजाची नशा आजही उतरत नाहीय. किंबहुना माझे रफी व्यसन तर वाढतच चालले आहे असे मला वाटते. आज रफीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रफीसारख्या गाणार्‍या गायकांचा एक काळ येऊन गेला त्याचा परामर्श घ्यायचा मानस आहे. खरं तर या गायकांना घेताना ही माणसे रफीची जागा घेऊ शकत नाहीत हे त्या संगीतकारांनादेखिल माहित असणारच. पण आवाजाशी असलेलं काहीसं साम्य कदाचित त्या संगीतकारांना भुरळ पाडत असावं.

१९७३ साली आलेल्या "मेरे गरीब नवाज" चित्रपटात "कस्मे हम अपनी जान की खाये चले गये" हे नितांतसुंदर गाणे गाऊन अन्वरने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रफीसारख्या गाणार्‍या गायकांमधला हा बहुधा पहिला गायक. आणि रफीच्या हयातीत ज्याचा उदय झाला असा एकमेव गायक. पहिल्या गाण्याने अन्वरने खुप आशा निर्माण केली होती. त्यानंतर त्याला गायला मिळालं ते एकदम राजेश खन्नासाठी. "जनता हवलदार" मधलं "तेरी आंखों कि चाहत में" खुप गाजलं. पण पुढे फारसं काहीच झालं नाही. "विधाता" मध्ये अगदी सुरेश वाडकर बरोबर दिलीपकुमारसाठी अन्वर "हाथों कि चंद लकिरों का" गायला. पण त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. दिलीपकुमारच्या अभिनयातील धार रफीच्या आवाजाने वाढत असे. रफीचा आवाज दिलीपकुमारसाठी जास्त धारदार होत असे. ही किमया अन्वरला करता आली नाही. "तकदीर है क्या मै क्या जानुं" म्हणताना ती धार तेथे नव्हती. पुढे "मोहोब्बत अब तिजारत बन गयी है" सारख्या एखाद्या गाण्याचा अपवाद वगळता हा गायक लुप्त होऊन होऊन गेला.

पुढे रफी पैगंबरवासी झाल्यानंतर काही वर्षांनी "पर्बतोंसे आज मै टकरा गया" म्हणत शब्बीर कुमार येथे प्रवेश केला. "तुमने दी आवाज लो मै आ गया" म्हणणार्‍या या गायकाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी साक्षात लता बरोबर "गुलामी" मध्ये "जिहाले मिस्किन माकुन बारंजीश" साठी गाण्याची संधी दिली. हे गाणं आजदेखिल लोकप्रिय आहे. पण पुढे विशेष काही घडलं नाही. "कुली" "मर्द" सारख्या चित्रपटांमध्ये शब्बीरकुमार अमिताभसाठी गायला. मात्र किशोर गेल्यावर अमिताभचा आवाजदेखिल हरपल्यासारखाच झाला होता. शब्बीरकुमारला वापरुन तेथे रफीसदृश आभास निर्माण होणार नव्हता. अभिताभची सुपरस्टार म्हणुन कारकिर्द संपत आली होती. त्याकाळात अभिताभसाठी गायली गेलेली गाणी लोकप्रिय झाली नाहीत. "डॉन"चे दिवस संपले होते हेच खरं. पुढे शब्बीरकुमार देखिल मागे पडला. रफीचा काहीसा आभास होत असला तरी बरेचदा त्याच्या गाण्यात लाडिकपणाचा भाग असायचा. जो काहीवेळा त्रासदायक वाटत असे. त्यातल्या त्यात लक्ष्मीकांत प्यारेलालने त्याला बर्‍यापैकी कह्यात ठेवलं होतं हे "जिंदगी हर कदम इक नयी जंग है" ऐकताना जाणवतं.

नंतर मोहम्मद अझीजचा उदय झाला. "मय से मीनासे ना साकी से" सारखी गाणी, गोविंदाचा डान्स, त्यावेळची त्याची लोकप्रियता यामुळे ऐकली गेली. पण मुळात हिन्दी चित्रपट्संगीताचा पडता काळ सुरु झाला होता. मोहम्मद अझीजने गायलेल्या गाण्यांपैकी फारशी गाणी मलातरी आठवत नाहीत. पुढे "उंगलीमे अंगुठी अंगुठीमे नगीना" अशी गाणी येऊ लागली. तीसुद्धा "वो जब याद आये बहोत याद आये" हे रफी कडुन गावुन घेणार्‍या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडुन. त्यामुळे आम्हीदेखिल १९८० ही स्वतःसाठी चित्रपटसंगीताची मर्यादा आखुन घेतली. त्याबाहेर जाऊन ऐकण्याची वेळ क्वचितच आली. काहीसा भारी आणि जड आवाज असलेला मोहम्मद अझीज काय किंवा काहीवेळा उगाचच लाडीकपणे गाणारा शब्बीरकुमार काय, यांनी त्या त्या वेळी काळाची गरज पूर्ण केली. दोघेही काही काळ गायले. मोठमोठ्या स्टार्ससाठी गायले. मात्र संगीताचे सुवर्णयुग संपले होते. यथावकाश यांचाही काळ संपला.

पुढे केव्हातरी सोनु निगमला रफीची गाणी गाताना ऐकले. ऑर्केस्ट्रात काहीवेळा काहीजण हुबेहुब गायकाचा आवाज काढत गाणे गातात. त्यासारखीच मला हीदेखिल एक बर्‍यापैकी नक्कल वाटली. या सर्व गायकांबद्दल पुर्ण आदर बाळगुन मला असे सांगावेसे वाटते कि या सर्वांना डाव्या हाताच्या करंगळीवर रफी उचलु शकला असता. रफीच्या आवाजाची जादुच अशी होती कि अनेक वर्षे हिन्दी चित्रपटसृष्टीने जेथे जेथे म्हणुन त्या आवाजाशी काही साम्य आढळेल तेथे तेथे त्या आवाजाचा पाठलाग केला. त्यांना संधी दिली. पण बहुतेकांना हे शिवधनुष्य पेलता आले नाही. रफीची रेंज, त्याची विविधता, कलाकाराच्या अभिनयानुरुप, त्यांच्या व्यक्तीमत्वानुसार आवाज देण्याची आश्चर्यकारक क्षमता, रफीचे शास्त्रिय संगीतावरील हुकमत, सर्व तर्‍हेची गाणी गाण्याची सहजता, त्याच्या आवाजातील मखमल, त्याच्या आवाजातील गोडवा हे सारं आणि त्याहीपेक्षा शब्दात न सांगता येण्यासारखं खुप काही दैवी असं रफीकडे होतं. त्यामुळे आज चौतीस वर्षांनंतरदेखिल "जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" हे रफीचे म्हणणे खरे ठरल्याचे दिसुन येत आहे.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख. रफी साहेबांच्या गाण्यांबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच !

रफीची रेंज>>> दुनिया के रखवाले, आसमाँ से आया फरिश्ता, ये दुनिया अगर मिलभी जाए तो क्या है

सर्व तर्‍हेची गाणी गाण्याची सहजता, त्याची विविधता>>> मन तडपत, आजा आजा मैं हू प्यार तेरा, चाँद मेरा दिल, ये दुनिया ये महफिल

कलाकाराच्या अभिनयानुरुप, त्यांच्या व्यक्तीमत्वानुसार आवाज देण्याची आश्चर्यकारक क्षमता>>> मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मन रे तू काहे ना धीर धरे (देव आनंद), तेरी बिंदिया रे (अमिताभ बच्चन), राजेंद्र कुमार ( ये मेरा प्रेमपत्र पढके), दर्दे दिल (ॠषी कपूर)

रफीचे शास्त्रिय संगीतावरील हुकमत >>> मधुबन में राधिका, नाचे मन मोरा, अजहूं ना आये बालम

त्याच्या आवाजातील मखमल>>> हमिंग वॉईस...चौधवी का चॉंद, अपनी तो हर आह इक तुफान है, दिन ढल जाए, दिल का भंवर करे पुकार

ही वर उल्लेखलेली फक्त उदाहरणार्थ आणि आता या क्षणी आठवलेली काहीच गाणी!

व्यक्तिशः त्यांची मराठीतली गाणी फारशी आवडली नाहीत, पण हिंदीतली नेमकी कुठली जास्त आवडतात याला काही मोजदाद नाही. देव आनंदच्या यशस्वी कारकीर्दीत मोहम्मद रफीचा मोठा वाटा होता म्हणणं अतिशययोक्ती ठरणार नाही. किंबहुना भारत भूषण, राजेंद्र कुमारच्या सुद्धा (कणेकरांची 'फिल्लम्बाजी' मधली दुनिया के रखवाले आणि भारत भूषण वरची टीका आठवली)

शब्बीर कुमार, मोहम्मद अझीज, सोनु निगम चा या लेखात उल्लेख होणं एकदम साहजिक आहे. पैकी शब्बीर कुमार, मोहम्मद अझीज एकीकडे आणि सोनु निगम दुसरीकडे. या दोन्ही गटातला मोठा फरक म्हणजे पहिल्या गटाने आपली संपूर्ण कारकीर्द प्रति-मोहम्मद रफी म्हणुन घालवली. दोघांच्याही आवाजात मर्यादा होत्या. सोनु निगम ने त्याची सुरुवात प्रति-मोहम्मद रफी म्हणून केली खरी (आठवा त्याची सुरुवातीची 'अच्छा सिला दिया तुने' वगैरे गाणी) पण आजच्या घडीला हे सगळं पुसुन टाकण्यात तो यशस्वी झाला. स्वतःची वेगळी ओळख बनवली. इतकी की जावेद अली (कहने को जश्न्-ए-बहारा, एक दिन तेरी राहों में, ) वगैरेंसारखी मंडळी सोनुच्या स्टाईलने गाऊ पाहतात. सोनु निगमच्या गाण्यांबद्दल इकडे लिहित नाही, धागा भरकटेल चांगलाच Happy

हे मना, हा छंद जीवाला, प्रकाशातले तारे तुम्ही वगैरे काही मराठी गाणी चांगली आहेत त्यांची. सरसकट सगळी चांगली नाहीत हे मात्र मान्य.

एवढंच काय... 'नगाड़ा बजा' पण जावेद अलीच्या आवाजात आहे फ़क्त सुरुवातीच्या काही ओळी सोनु निगम च्या आवाजात आहेत.
म्हणून म्हणालो की धागा भरकटेल Happy

मला संगीतातलं फारसं कळत नाही. फिल्मीसंगीत हेच विश्व आहे.

रफीसाहेबांबद्दल थोरामोठ्या़ंकडून ऐकलंच होतं आणि आजही रफीसाहेबांची गाणी परिचित आहेत. त्या वेळी सर्वात एक नंबर म्हणजे रफी असं वाटायचं. नंतर किशोर कुमारची माहीती झाली तेव्हां हळू हळू किशोर आवडू लागला. एकदा कधीतरी अनिल विश्वास यांचं रफींबद्दलचं मत वाचलं आणि खूप राग आला. पण नंतर मन्नाडे आणि तलत महमूद ऐकल्यानंतर रफींबद्दलचं प्रेम तसूभरही कमी न होता कुठेतरी तलतच्या जादुई आवाजाची भुरळ पडली. मन्नाडेची शास्त्रीय संगीतावरची अभूतपूर्व कमांड माझ्यासारख्या अडाण्यालाही जाणवू लागली.

अर्थात रफीसाहेबांनी अशी काही गाणी गायली आहेत की इतर कुणी गायली असती तर ऐकवली नसती. पण केवळ मैत्रीखातर, कुणाला प्रोत्साहन म्हणून त्यांनी अशी गाणी गायलीत हे ऐकलं की आदर वाढला.

मेरे मेहबूब तुझे , रंग और नूर की, ये महलों ये तख्तों, जिन्हे नाज है हिंद पर वो कहा है... अशी हजारो गाणी आहेत. २६००० गाण्यातून काय काय निवडणार !

मुलायम, रेशमी,नितळ आवाजाची देणगी लाभलेला असा कलाकार पुन्हा लवकर सापडेल असं वाटत नाही.

प्रति-मोहम्मद रफी >>> वरच्या लेखात न आलेलं नाव म्हणजे विपिन सचदेवा (भयाण आहे, पण काय करणार?) आणि देबासिस दासगुप्ता. दोघंही रफीचं कव्हर व्हर्जन गाण्यातच रमले.

सुरेख आणि सुरेल आठवण अतुल. रफी सरांच्या गाण्यांबद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे. साक्षात अनुनयाचा आवाज .शिवाय ते एक दरियादिल माणूस होते याबद्दलचे अनेक किस्से वाचले आहेत . त्यांना प्रणाम. आमची आयुष्यं सुंदर केली या गंधर्वांनी.

मस्तय लेख. Happy

सात स्वरांचा एकच स्वर बनला तर तो किती विविध भावना दाखवू शकतो याचे सुरीले बहारदार उदाहरण म्हणजे रफीजींचा सूर.>> वाह!!

Pages

Back to top