भाषिक संभ्रम

Submitted by नवनाथ राऊळ on 4 July, 2015 - 12:48

संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)

हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)

१. हिंदीपेक्षा (किंबहुना इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा) मराठी ही संस्कृत भाषेला सख्खी आहे असे नेहमी वाटते (एक मराठीभाषिक म्हणून नाही तर तटस्थपणे). उच्चार आणि लिखाण दोहोंबाबत संस्कृत भाषेस मराठीच सर्वांत जवळची आहे. (व्याकरणाच्या दृष्टीने पाहणे हा वेगळ्या चर्चेचा विषय ठरावा.)

२. संस्कृत, मराठी आणि हिंदी या तिन्ही देवनागरी लिपीत लिहील्या जात असल्या तरीही केवळ संस्कृत आणि मराठीतील मुळाक्षरे समान आहेत आणि हिंदीतील मुळाक्षरांची संख्या कमी आहे. 'ञ', 'ङ', 'ज्ञ', 'ण', 'ळ' सारखी मुळाक्षरे हिंदीत नाहीत (असे स्वतःच एका स्नेही हिंदीभाषिकाने सांगितले), ना त्यांचा उच्चार केला जातो.

३. नुक्ता (़) वगैरे Foreign particles हिंदीत घुसली आहेत (अरबी भेट). त्यामानाने मराठी विशुद्ध राहिली आहे. 'चिंच'मधल्या दोन्ही 'च'चा आणि 'जिजाबाई'मधल्या दोन्ही 'ज'चा यथायोग्य उच्चार मराठीत होतो. 'चलां कल्पतरूंचे आरव' आणि 'चला हवा येऊ द्या' या दोन्हीमधला 'च' वेगवेगळा उच्चारण्याची सोय मराठीत आहेच आणि त्यासाठी नुक्त्यांबिक्त्यांची गरज भासत नाही.

४. उच्चारांचाही हिंदीत अभाव (खरंतर अशुद्धता) आहे. 'ज्ञ' ला 'ग्य' म्हणतात. 'ण' वगैरे अनुनासिकांची चुकून एखाद्याला ओळख असलीच तर त्यांना पाहून एकच 'नाऽऽ' असे काहीतरी ऐकू येणारा उच्चार करतात. 'कृ' ला 'क्रि' म्हणतात. (क्रिश्न भगवान, हमपर क्रिपा करें.. ध्रितराष्ट्र, अम्रित, ब्रिहन्मुंबई, वगैरे)

• ('वृषभ' अचूक उच्चारणारा हिंदीभाषिक शोधून दाखवाच!
यावरून मला हल्ली शंकाच वाटू लागली आहे.. तिचं निरसन झालं तर उत्तमच! - 'रिषभ' हा वेगळा शब्द किंवा वेगळ्या अर्थाचा शब्द अस्तित्वात आहे का?
तसेच 'संस्कृत' योग्य की 'सन्सक्रित' याचा उलगडा झाल्यास बरे होईल.)

५. 'ॉ', 'ॅ', 'ँ', '्' वगैरेंचा वापर मराठीत होऊन तिची समृद्धी झाली आणि सर्वसमावेशकता वाढली आहे (आणि ही Foreign particles नाहीत). आंग्लादि पाश्चिमात्य भाषांचे बहुतेक सर्व शब्द मराठीत जवळपास अचूकपणे लिहीता तसेच उच्चारताही येतात.

६. गैस (गॅस), चैनल (चॅनल), बैट (बॅट), बैंक (बँक), फौंट (फाँट्), कंप्युटर (कॉम्प्युटर), कोस्मैटिक्स (कॉस्मॅटिक्स्), पैंथर (पँथर), सैमसंग (सॅमसंग), डैझल(डॅझल्), रौक (रॉक), आकलन्ड (ऑकलंड), मैथेमैटिक्स (मॅथमॅटिक्स्), टैंक्स (टँक्स), इंग्लैंड (इंग्लंड), साईंस (सायन्स्), लाईसैंस (लायसन्स), ग्रैज्युऐसन (ग्रॅज्युएशन), वगैरे आंग्लभाषिक शब्द हिंदीभाषिकांच्या तोंडून ऐकताना गंमतच वाटते (त्यांच्या 'हँस क्यूँ रहे हो' ला उत्तर देता देता नाकी नऊ आले आहेत...). हिंदी ऐकाराचं गाजलेलं 'वैशाली' प्रकरण तर सर्वश्रुतच आहे.

७. 'श', 'ष' ही मुळाक्षरे हिंदीत निव्वळ लिहीण्यापुरतीच असावीत अथवा त्यांचा उच्चारच निषिद्ध असावा. हिंदीभाषिक मंडळी सरसकट 'स'चाच उच्चार करताना दिसतात. आणि त्यातून परकीय भाषेतील शब्दही सुटत (खरंतर वाचत) नाहीत.

माझा रोख हिंदी भाषेकडे आहे, भाषिकांकडे नाही हे इथे नमूद करू इच्छितो.

ही हिंदी भाषेची असमर्थता आहे का?
की या हिंदी भाषेतील त्रुटी आहेत?
की माझ्या शंकाच पुर्वग्रहदूषित आहेत?
की हे साहजिकच आहे?
आणि अपभ्रंश (हिंदीत अपभ्रन्श) ही अशुद्धता मानावी का?

भाषाशास्त्र, उच्चारशास्त्र, वगैरेंशी माझा काडीचाही संबंध नाही, सबब जाणकारांनी चुकीचे काही आढळल्यास मोठ्या दिलाने क्षमा करून त्याकडे निश्चितच अंगुलीनिर्देश करावा. शिवाय शंकांचे निरसन करता आले तर दुधात साखर!

(खरंतर हा विषय मांडायला मायबोली हे उचित ठिकाण आहे का, याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. कारण ही चर्चा (झालीच तर) एकांगी किंबहुना एकतर्फी होईल असे वाटते. तरीही जाणकारांची मते जाणून घेताना ज्ञानात भर पडून तदनुषंगिक पुर्वग्रह दूर झाल्यास आनंदच आहे. चूकभूल देणे घेणे. हिंदीप्रेमींनी रोष न धरावा.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या आणि टण्यासदृश्य मायबोलीकरबांधव यांसी,
विशेष विनंत्या -
१. माझे उपरोक्त लेखन हे ज्ञानदानासाठी नसून केवळ ज्ञानार्जनासाठी आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.
२. कृपया त्यास शोधनिबंधाची वागणूक देऊ नये. ती तद्दन निरीक्षणे आहेत.
३. 'जगी सर्वज्ञानी असा गुगल आहे' या गृहितकाचे यथेच्छ उपयोजन टाळावे.

पूर्वग्रहदूषीत आणि बरीचशी चुकीची माहिती देणारा लेख.

वर टण्या यांनी काही मुद्द्यांचे खंडन केलेले आहेच.

४. उच्चारांचाही हिंदीत अभाव (खरंतर अशुद्धता) आहे. 'ज्ञ' ला 'ग्य' म्हणतात
'ज्ञ' चा उच्चार मराठीत द् + न् + य असा केला जातो. आणि संस्कृतातही तोच उच्चार आहे असा आपला दावा असतो. जो निखालस चुकीचा आहे!

संस्कृतात 'ज्ञ' चा उच्चार ज् + न् + य् असा केला जातो.

थोडक्यात, 'ज्ञ' चा उच्चार मराठी आणि हिंदीतही संस्कृतपेक्षा वेगळा केला जातो.

अर्थात, वेगळा म्हणजे चुकीचा किंवा अशुद्ध नव्हे!!

(अवांतर - ग्यानबा-तुकाराम हा गजर कुठल्या भाषेतील???)

<<< तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)

त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे>>>
पहिल्या दोन परिच्छेदांतली ही वाक्ये/वाक्यांश, लेखकाचे काही प्रतिसाद आणि

लेखातला <<भाषाशास्त्र, उच्चारशास्त्र, वगैरेंशी माझा काडीचाही संबंध नाही, सबब जाणकारांनी चुकीचे काही आढळल्यास मोठ्या दिलाने क्षमा करून त्याकडे निश्चितच अंगुलीनिर्देश करावा. शिवाय शंकांचे निरसन करता आले तर दुधात साखर!>> हा शेवटचा परिच्छेद यांचा मेळ बसत नाही. लेखातल्या आणि प्रतिसादांतल्या अनेक वाक्यांत ठाम निष्कर्षाचा आविर्भाव दिसतोय. माझ्याच समजून घेण्यात घोळ असूही शकतो. पण दिसतोय खरा.

गुगलवरून शोधून इथे कोणी लिहिलेय कोणास ठाऊक. मी माधुरी पुरंदरेंचा संदर्भ दिलाय. माझ्याकडे असलेल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकाचा संदर्भ दिलाय. आता राज्यवार हिंदी बदलत असल्यास कल्पना नाही.

तसंच लिपी आणि भाषा यांच्याबाबतही घोळ आहे. चंद्रकोर हे स्वरचिन्ह संस्कृतात आहे हेॐ चा संदर्भ देऊन लक्षात आणून दिलेत त्याबद्दल आभार. पण अ‍ॅ आणि ऑ हे उच्चार संस्कृतात नाहीत, मराठीत नव्हते हे तरी मान्य आहे का?

माझा भाषाशास्त्राचा अभ्यास अगदी आत्ताच सुरू झालाय, खूपच तोकडा आहे. पण भाषेचा अभ्यास म्हणजे बोलल्या जाणार्‍या भाषेचा. व्याख्याच मुळी जी बोलली जाते ती भाषा.

तेव्हा लिपी आणि भाषा यांची या लेखात सरमिसळ आणि गल्लत अनेकदा झाली आहे असे वाटते.

>>>टण्या आणि टण्यासदृश्य मायबोलीकरबांधव यांसी,<<<

Lol

कालपासून एकेक असली वाक्ये ऐकायला मिळत आहेत ना!

काही मुद्दे.
१)ज्ञ हे जोडाक्षर ज् आणि ञ या दोन वर्णांच्या संयोगाने बनले आहे. म्हणून ज्ञानेश, ज्ञान यांचे दाक्षिणात्य स्पेलिंग jnanesh, jnaan हे अधिक बरोबर आहे. ग्य,(हिंदी) ग्न(गुजराती), द्न्य(मराठी) हे उच्चार संस्कृतलेखनाबरहुकूम नाहीत, पण म्हणून ते चुकीचे आहेत असा दावा करता येणार नाही. ती त्या त्या भाषेने स्वीकारलेली उच्चारशैली आहे.
२)अ‍ॅ, ऑ, हे उच्चार मराठीसाठी पूर्णपणे परकीय आहेत. फारफार तर बंगाली(बंगाली प्रभावाखालील अन्य उडिया, अहोमी वगैरे भाषा) आणि कोंकणी या दोन भाषा हे उच्चार नैसर्गिकपणे देशी, तत्सम, तद्भव शब्दांतही वापरतात.
३) ऋ चा उच्चार रि किंवा रु सारखा किंवा त्यांमधला नाही. तो खरे तर आपण 'अ'साठी ओठ उघडतो त्यापेक्षा कमी उघडून आणि जिभेचा शेंडा वर टाळूला ट आणि त या उच्चारांच्या मधल्या जागेत पूर्ण न टेकवता किंचित आतल्या बाजूला वळवून टेकवल्यासारखा करून टाळू आणि जिभेच्या शेंड्यामधल्या फटीतून उच्छ्वास जाऊ देणे या प्रकारचा आहे. म्हणजे अर्र म्हणताना जीभ वळते तसा. त्यामुळेच तो स्वर आहे, व्यञ्जन नाही. व्यंजनाला हा स्वर जोडता येतो आणि त्यापासून अक्षरे बनतात, जोडाक्षरे नव्हेत. उर्दूतले फिक्र्, (फिक्र) फक्र हे उच्चार आठवून पाहा. या बाबतीत गुजराती लोक साधारणत: योग्य उच्चार करतात, पण त्यांचा उच्चार 'र'ला जवळचा होतो.
४)श्र, क्र, त्र, प्र या व अशा जोडाक्षरांमध्ये आपण र् हे व्यंजन वापरतो. 'र्' हे व्यंजन पूर्वी' र्‍' असे लिहिले जात असे. 'चामुंडराजें करवियलें' या श्रवणबेळगोळा येथील शिलालेखात ते स्पष्टपणे दिसते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जेव्हा बालबोध (देवनागरीला तेव्हा बाळबोध म्हणत. मोडी ही वेगळी लिपी होती.)टाइप-सेटिंग प्रथमच किंवा नव्याने होत होते, तेव्हा 'र' साठी 'र्‍' हाच टाइप (फाँट)वापरलेला दिसतो. तसेच सावरकरांनी आपल्या भाषा आणि लिपिशुद्धीच्या प्रयत्नात याच 'र्‍' चा पुरस्कार केला होता. अशी 'र्‍'युक्त अक्षरे ही जोडाक्षरे आहेत. मराठीने ती जोडाक्षरेच मानावीत. इतर भाषा काहीही करोत.
५) ळ् हे व्यंजन अभिजात संस्कृतपूर्व अशा आर्ष संस्कृतामध्ये आहे, अभिजात संस्कृतात नाही. आर्ष संस्कृत हे फक्त ऋग्वेदात आणि समकालीन संस्कृतात सापडते. आर्ष संस्कृत ही पाणिनीय संस्कृताची जननी आहे आणि तिचे साम्य 'जुना अवेस्ता' या पारसी धर्मग्रंथाच्या जुन्या पारसी भाषेशी आहे. सध्याची फारसी भाषा या जुन्या अवेस्तन भाषेशी अगदीच थोडे साम्य दाखवते. ती वेगळी म्हणून गणली जाते. जशी मराठी ही संस्कृतापासून वेगळी आहे, तसे अभिजात संस्कृत हे आर्ष संस्कृतापासून वेगळे.
६)ब्राह्मी लिपी ही सध्या भारतातल्या बहुतेक सर्व लिप्यांची अगदी देवनागरीसकट, जननी किंवा आजी-पणजी मानली जाते.
७)पाणिनी हा वायव्यप्रांतातला असल्याने आणि त्याच्या काळातले कुठलेच नागरी लिपीतले लेखन(शिलालेख वगैरे) उपलब्ध नसल्याने असे मानता येऊ शकते की त्याच्या काळात त्याच्या प्रदेशात प्रचलित असलेल्या खरोष्टी, अरेमाइक वगैरे लिप्यांतून त्याने लेखन केले असावे. म्हणजे अभिजात संस्कृतचा मूलाधार 'अष्टाध्यायी', ही मूळ नागरीव्यतिरिक्त अन्य लिपीत लिहिली गेलेली असू शकते.
चूभूदेघे.
भाषातज्ज्ञांनी यावर आपली मते मांडावीत.
टण्या यांचा प्रतिसाद आवडला.

छान चर्चा !

रच्याकने, माझ्या कानडी मित्रांकडे कन्नड लिपी मधून लिहिलेली संस्कृत पुस्तके मी पहिली आहेत. (असच सांगावस वाटल म्हणून सांगितल)

आमच्या इथे सगळी स्तोत्रांची पुस्तके, भगवद्गीता, कानडी लिपीतूनच असतात.>>> अमच्याकडे तमिळमध्ये!! शाळेतल्या बाईनं तमिळ श्लोक मला वाचता येत नाही, तुम्हीच शिकवा नाहीतर इंग्लिशमधेय लिहून पाठवा असा निरोप पाठवल्यावर gurubhrama guruvishnu असले इंग्लिश अगम्य लिहून पाठवल. म्हटलं, हे तर संस्कृत आहे. आपल्याला शिकवता येईल की.

हीरा, सुंदर पोस्ट.

ज्ञ चा उच्चार ग्य असा आहे, हे मागे किरणनेही इथे लिहिले होते.

वृषभ म्हणजे बैल असा अर्थ घेताय ना ? रीषभ म्हणजे संगीतातला स्वर रे पण आहे. त्याचा उच्चार मराठीतही रीषभ असाच करतात. ( तो बैलाच्याच आवाजातून आलाय असे समजतात. )

सर्वसामान्य हिंदी भाषिक असे चुकिचे उच्चार करतात हे खरे आहे पण उत्तम निवेदक ( हरीष भिमाणी, सरीता सेठी वगैरे ) योग्य तेच उच्चार करत असत. सध्याचे निवेदक मला माहीत नाहीत.

वर सातीने त्र हा स्वर लिहिला आहे तो हिंदीतला अ आहे. अ, भ साठी काही वेगळी अक्षरे हिंदीत होती, आता ती वापरली जात नाहीत ( कुणाला प्यार झुकता नही चे पोस्टर आठवतेय का ? काही जण ते प्यार भुकता नही, असे वाचत असत. )

उर्दू बद्दल तूमचे मत कशावरुन ठरले ? मला आठवतेय त्या प्रमाणे मुन्शी प्रेमचन्द त्यांचे लेखन या लिपीतच करत असत. ( लिपी, भाषा नाही ! )

दिल्लीत जी हिंदी बोलली जाते त्यावर पंजाबी, हरयाणवी लोकांचा जास्त प्रभाव आहे. भोजपुरीचाही आहे. मी राजस्थानात यापेक्षा सुंदर हिंदी ऐकली आहे. त्यांचे अक्षरोच्चार जास्त नेमके होते.

अचूक निरीक्षण, सुयोग्य मुद्दे.
हेच सर्व माझ्याही मनात पुर्वीपासून येत होते. तुम्ही छान शब्दरूप दिलेत.
(जाता जाता: मराठी भाषिकांचे "चूकीचे" हिंदी बोलण्यावर हात हात भर लिहून आनंद घेणारे तथाकथित "मराठीजन" , या विषयावर किति काय लिहितात ते बघणे औत्सुक्याचे आहे! )

साती, अश्विनी के, नीधप, ललिता-प्रीती, निधी, दिनेश धन्यवाद.
दिनेश, ज्ञ चा उच्चार फक्त हिंदीत ग्य असा आहे. तोच बरोबर असे नाही. मराठीत द्न्य असा तर गुजरातीत ग्न असा आहे. संस्कृतात खरे तर ज्+ञ असा असायला हवा. पण निरनिराळ्या प्रांतांतल्या संस्कृतपठणात त्यांच्या त्यांच्या उच्चारपद्धतीनुसार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तो होतो. दक्षिणेकडे साधारणतः ज्न म्हणतात .
वृषभ आणि ऋषभ हे एकाच अर्थाचे, पण दोन वेगवेगळे शब्द आहेत. संगीतातले सात सूर षट्ज (षड्ज), ऋषभ,गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद या पैकी ऋषभचे हिंदी पद्धतीप्रमाणे रिशभ झाले आहे.
हिंदीच्या देवनागरी लिपीत पूर्वी अ,ख,झ,ल, श हे त्यावेळच्या मराठी देवनागरी पेक्षा वेगळे लिहिले जात. हिंदीत 'अ'ला आणखी एक काडी असे. सध्याचा मराठी ख हा हिंदी देवनागरीतून घेतला आहे. पूर्वी मराठीत तो 'रव' असा अगदी जोडून लिहीत. 'माखाडी सारवर रवातो' असे कोडे सांगून याचा अर्थ काय म्हणून विचारीत. तो अर्थ 'मारवाडी साखर खातो' असा असे. हिंदीतला झ हा थोडासा भ सारखा दिसे.(मुले शाळेत झाँसी की रानी चा उच्चार भांसी की रानी असा करीत.) तोही लिप्यांच्या एकसूत्रीकरणात बदलला. सध्याचा मराठी ल हा हिंदीतून घेतला आहे. पूर्वीचा मराठी ल हा काना नसलेला, दोन ओवरलॅपिंग कंस आणि उजवीकडच्या कंसाला शिरोरेघेपासून शेंडी(सरळ रेघ) असा होता. पूर्वीच्या मराठी 'श'ची गाठ शिरोरेखेत नसे. शिरोरेखेपासून खाली छोटी शेंडी (रेघ) आणि त्याला गाठविरहित बाकीचा 'श' जोडलेला असे होते.
उर्दूबद्दल माझे काही मत असे नाही. 'ऋ' हा स्वर व्यंजनाच्या शेवटी आल्यास साधारण कसा उच्चार होईल याच्या कल्पनेसाठी फक् र् (एकत्रित उच्चार) फिक् र् (एकत्रित उच्चार) ही उदाहरणे दिली होती.
मुन्शी प्रेमचंद उर्दू लिपीत लिहीत हे आपली माहिती योग्यच आहे. एकोणिसाव्या शतकातली खडी (ड खाली नुक्ता) बोली ही पुष्कळदा उर्दूच्या लिपीतून लिहिली जात असे. (मला वाटते की 'संगम' सिनेमातले ते सुप्रसिद्ध प्रेमपत्र राजेंद्रकुमार उर्दू लिपीत लिहितो. आता पुन्हा सिनेमा पाहून खात्री करून घेतली पाहिजे. संगम नसला तरी १९५० दरम्यानच्या काही हिंदी सिनेमांत उर्दू लिपीतून लिहिलेले कागदपत्र लोकांनी पाहिले असतील.)
धन्यवाद.

मन प्रसन्न होऊन गेले अगदी....लेखाचा विषय, त्याची मांडणी (लेखकाची त्यामागील ज्ञानार्जनाची तळमळही जाणवली आहे) शिवाय एकामागोमाग एक असे येत गेलेले तितकेच तोलामोलाचे प्रतिसाद यानी भाषावृद्धीसाठी अगदी आवश्यक असलेले वातावरण सदस्यांनी निर्माण केला आहे. मायबोलीवर खूप छान विषय आला आहे.

फक्त हिंदीची या निमित्ताने अवहेलना होऊ नये इतकेच. उच्चार आणि लिखित रुप यामध्ये अभ्यासक विविधता शोधत असतात जे भाषा अभ्यासाच्या दृष्टीने योग्य आहे. तरीही सर्वसामान्यांसाठी भाषण कौशल्य, श्रवण, वाचन यांच्याबरोबरीनेच भाषा उच्चारणालाही तितकेच महत्त्व देणे क्रमप्राप्त होते. वर कित्येक सदस्यांनी उच्चारणासंदर्भातील बरीच योग्य अशी उदाहरणेही दिली आहेत ती छानच आहेत. शब्द उच्चारणात संस्कृत, हिंदी आणि मराठीचा ताळमेळ सवयीने आणता येतो. अनन्यसाधारण महत्त्व आहे उच्चारणाला. वरील काही शब्दांचे वाक्यात रुपांतर वापर करताना जाणवते की र्‍हस्व, दीर्घ, तालव्य, दंततालव्य, अनुस्वार यांच्या उच्चारांकडे किती लक्ष देणे गरजेचे ठरते. उच्चारण अस्खलित आणि ओघवते असेल तर समोरील लोकांच्यावर त्याचे प्रतिबिंब खोलवर उमटते.

भाषिक संभ्रम ही काही चुकीची समजूत आहे असे मानू नये...किंबहुना अशा संभ्रमापोटीच भाषेची जडणघडण होत जाते. मी गॅस, चॅनेल, बॅट, फॉन्ट, कॉस्मॅटिक्स असा उच्चार करतो ते शुद्ध आणि माझा त्रिवेदीनामक सहकारी (जो उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहे...) तो गैस, चैनेल, बैट असे म्हणतो म्हणून मागासलेला असे मानणे शुद्ध वेडेपणाचे ठरते. भाषेतील ही विविधता उलटपक्षी आनंददायी ठरली पाहिजे. चेष्टेचा विषय नको.

मला वाटते की 'संगम' सिनेमातले ते सुप्रसिद्ध प्रेमपत्र राजेंद्रकुमार उर्दू लिपीत लिहितो.

>>> जावेद अख्तर, गुलझार हे देखील माझ्या मते उर्दू लिपीतच अधिक लेखन करतात.

आपल्याला सिंह चा उच्चार सवयीने सहज जमतो, पण ह च्या पुर्वी अनुस्वार येणे थोडे नियमबाह्य आहे कारण वर्णमालेत ह हा क, त, त, ट, प यापैकी कुठल्याच गटात येत नाही. माझ्या ओळखीतले काही जण, माला सिन्हा ला माला सिन्व्हा म्हणत असत. केनयामधेही सिंह या अर्थी सिम्बा हा शब्द आहे.

आपल्याकडच्या भाषात ज आणि य चा घोळ घालतात ( जसोदा / यशोदा, यशराज / जसराज , यमुना / जमुना ) तसा पोर्तुगीज भाषेतही आहे. स्पेलिंगनुसार माराकुजा असते ते उच्चारात माराकुया होते ( याचा अर्थ पॅशन फ्रुट हो )

क आणि ग चाही असाच घोळ घालतात ( मला वाटते तामिळ लिपीत कोबाल आणि गोपाल सारखेच लिहितात. )
मल्याळीमधे त आणि द चा घोळ घालतात ( सविता ची हमखास सविदै होते )

व हे अक्षरही अनेकांना उचारता येत नाही... ( दिल्लीत जाऊन वसंत विहार का बसंत बिहार त्याची खात्री करा बघू. )

गुजराथीत, स आणि ह चा घोळ आहे. . ( हाडी हारी छे, हाहू ए आपी, हाहू हवारे हवारे आवी हथी ! )

तात्पर्य.. दोष भाषेचा वा लिपीचा नसून उच्चारणाच्या परंपरेने चालत आलेल्या पद्धतीचा आहे.

अंश,वंश, कंस, सिंह, हंस, मांस या सर्वांमध्ये आपण अनुस्वाराचा उच्चार 'अंउव्' असा करतो. उत्तरेकडे तो 'ङ' किंवा 'न्' ('ङ्' वाङ्मयमधला) असा होतो. 'ङ' साठी इंग्लिशमध्ये अक्षर नसल्याने इंग्लिश स्पेलिंगमध्ये काही लोक 'n' तर काही लोक 'm' वापरतात. इतरभाषक लोक या शब्दांचा उच्चार या स्पेलिंगप्रमाणे करतात. म्हणजे सिन्ह किंवा सिम्ह. हिंदीत किंवा आपापल्या भाषेत लिहिताना अंश, कंस, सिंह असेच लिहितात. म्हणजे मनमोहन सिंग नव्हे तर मनमोहन सिंह. अनुस्वाराचा उच्चार 'ङ्'सारखा करण्याने आपल्याला सिंह शब्द सिंघ सारखा ऐकू येतो. 'ह' सोडून बाकी सगळे श स वाले अनुस्वार 'न्' होतात.

पूर्वाचलात ञ चा उपयोग अजून होतो, असे बिनिवाले यांनी लिहिले आहे. आपल्याकडे तर अंकलिपीत द्यायलाही शब्द नाही उरला. त्यांच्यामते अनुस्वाराच्या ऐवजी जर जोडाक्षरे वापरात राहिली असती तर हि अक्षरे टिकली असती. उदा पंच असे लिहिण्याऐवजी आपण पञ्च असे लिहायला हवे.

नारायणराव या शब्दाचा जसा उच्चार होतो, म्हणजे नारायड्राव.. तसाच प्रकाश संतांनी लिहिला आहे ना ?

<<<मंत्रपुष्पांजलीतील 'आंतादापरार्धात् एकराळिती'>>>

हे तर फार नंतरचे झाले. अग्निमीळे पुरोहितं अशी तर ऋग्वेदाची सुरुवात.

तसेहि वेदातले अनेक प्रदीर्घ व इतर उच्चार मराठीत नाहीत.

मलयाळम मध्ये बरेच संस्कृत शब्द आहेत. असे माझ्या एका मल्याळी मित्राने ३५ वर्षांपूर्वी सांगितले, उदा. डोके दुखते आहे हे मल्याळम मधे कसे म्हणायचे हे एखाद्या जुन्या मल्याळी माणसाला विचारा. आजकालच्या भारतात सर्व भाषांमधे डोके दुखते याला हेडेक हाच शब्द आहे म्हणे.

नियम हे अपवाद वगळूनच बनत असतात.. अपवादांचा टेकू लावून बनवले जात नाहीत...
प्रस्तुत चर्चेत संस्कृत प्रमाण मानून हिंदी आणि मराठीची संस्कृतशी जवळीकता हा विषय अभिप्रेत होता.. त्या ओघाने इतर भाषांबाबत चर्चा झाली तरी विषयांतर न होणे अपेक्षित होते.. पण तसे झाले नाही..
बहुतांश हिंदीभाषिकांच्या उच्चारांवर उर्दूचा प्रभाव जाणवतो.. त्या अनुषंगाने पुढे विनाकारण उर्दूची चर्चा होऊ नये यासाठी माझे मत आधीच सांगितले होते जे ठामच राहील.. (तिथेच झोके घेत बसल्यास विषयांतर होईल.) हिंदी, मराठी, संस्कृत तिन्हींची लिपी देवनागरीच आहे.. त्यामुळे इतर लिप्यांबद्दल चर्चा अपेक्षित नव्हती.. तरीही ती प्रतिक्रियांमधून ओघवती झालीच.. लिपी हा विषय नाही हे सुरूवातीलाच म्हटलं होतं, तरीही फाटे फुटलेच...

प्रतिक्रिया नीट वाचायचा आळस केला नसता तर नुक्ता, अँ, ऑ वगैरेंवर माझं मत मांडूनही त्याचप्रकारच्या पुनरावृत्त प्रतिक्रिया आल्या नसत्या.. ॉ,ॅ, ँ हे उच्चार परकीय आहेत हे कधी नाकारलंय.. केवळ त्यांचं लिखाण मराठीत देवनागरी धाटणीत होतं हे आणखी किती वेळा सांगावं..?

तेलगू-तमिळच का हिंदी जरी संस्कृतला मराठीपेक्षा जास्त जवळची दिसून आली तरी तसे मान्य करायला आनंदच आहे. पण तसं वाटलंच आणि पटलंच तर.! स्वतःच्या विपर्यासाला इतरांच्या आविर्भावाचा मुलामा चढवू नये... माझी मते, निरीक्षणे, शंका स्पष्ट होत्या.. स्षष्ट मांडल्या.. चुक किंवा बरोबर असणे या नंतरच्या गोष्टी आहेत..

माझा कुठल्याही भाषेवर रोष नाही.. (पंजाबी तर शिकतोच आहे.. चांगलीच जमतेय असं पंजाबी सहकारी सांगतात..) उर्दूतही लिहीतो थोडं फार.. पंजाबीत 'ळ' आहेच.. हरयाण्वी, राजस्थानी भाषांसारखा खणखणीत 'ण' क्वचितच इतर भाषांत असेल.. हे अर्थातच उच्चारांबद्दल बोलतोय (लिखाणाबद्दल माहित नाही).. तरीही विषयांतरच आहे.. असो..

दिनेश, हीरा.. Happy आपल्या प्रतिक्रियांत बऱ्यांच प्रश्नांची उत्तरे सापडली.. धन्यवाद... सावरकरी र असं शाळेत असताना शिक्षकांनी म्हटलं होतं ते आठवलं..

सावरकरी 'र' इथे मायबोलीवरही बर्‍याच जणांना माहित नाही.
आणि आम्ही सांगितलं तरी वेड्यात काढणारे लोक आहेत.
Happy

वी-| साव-| क-| बालमंदी-| असे आमच्या शाळेचे नाव होते.
Happy

अ‍ॅ, ऑ हे लिखाण मराठी धाटणीचे सुरुवातीला नव्हते. इंग्लिश उच्चारांचे मराठीत लेखन करता यावे म्हणून ते नवीन बनवले गेले. जुनी पुस्तके वाचली तर क्यांप, प्याण्ट, कालेज असे लिहिलेले सापडेल. कारण तेव्हा ही चिह्ने मराठीने स्वीकारली नव्हती किंवा अशी चिह्ने या खास उच्चारांकरिता वापरता येतील याची कल्पना तेव्हा कुणाला आली नव्हती. (हे श्रेय बहुधा सावरकरांचे आहे. बहुधा. संस्कृतातल्या चंद्रबिंदूचा उच्चार अ‍ॅ किंवा ऑ असा होत नाही. त्यामुळे तिथून ते घेण्याचा प्रश्न येत नाही. ॐ किंवा हूँ मध्ये चंद्रबिंदू आहे पण तिथेही त्याचा उच्चार अ‍ॅ किंवा ऑ असा नाही. बिंदूशिवाय नुसते चंद्रकोरीचे चिह्न संस्कृतात नाही.

Pages