संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)
हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)
१. हिंदीपेक्षा (किंबहुना इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा) मराठी ही संस्कृत भाषेला सख्खी आहे असे नेहमी वाटते (एक मराठीभाषिक म्हणून नाही तर तटस्थपणे). उच्चार आणि लिखाण दोहोंबाबत संस्कृत भाषेस मराठीच सर्वांत जवळची आहे. (व्याकरणाच्या दृष्टीने पाहणे हा वेगळ्या चर्चेचा विषय ठरावा.)
२. संस्कृत, मराठी आणि हिंदी या तिन्ही देवनागरी लिपीत लिहील्या जात असल्या तरीही केवळ संस्कृत आणि मराठीतील मुळाक्षरे समान आहेत आणि हिंदीतील मुळाक्षरांची संख्या कमी आहे. 'ञ', 'ङ', 'ज्ञ', 'ण', 'ळ' सारखी मुळाक्षरे हिंदीत नाहीत (असे स्वतःच एका स्नेही हिंदीभाषिकाने सांगितले), ना त्यांचा उच्चार केला जातो.
३. नुक्ता (़) वगैरे Foreign particles हिंदीत घुसली आहेत (अरबी भेट). त्यामानाने मराठी विशुद्ध राहिली आहे. 'चिंच'मधल्या दोन्ही 'च'चा आणि 'जिजाबाई'मधल्या दोन्ही 'ज'चा यथायोग्य उच्चार मराठीत होतो. 'चलां कल्पतरूंचे आरव' आणि 'चला हवा येऊ द्या' या दोन्हीमधला 'च' वेगवेगळा उच्चारण्याची सोय मराठीत आहेच आणि त्यासाठी नुक्त्यांबिक्त्यांची गरज भासत नाही.
४. उच्चारांचाही हिंदीत अभाव (खरंतर अशुद्धता) आहे. 'ज्ञ' ला 'ग्य' म्हणतात. 'ण' वगैरे अनुनासिकांची चुकून एखाद्याला ओळख असलीच तर त्यांना पाहून एकच 'नाऽऽ' असे काहीतरी ऐकू येणारा उच्चार करतात. 'कृ' ला 'क्रि' म्हणतात. (क्रिश्न भगवान, हमपर क्रिपा करें.. ध्रितराष्ट्र, अम्रित, ब्रिहन्मुंबई, वगैरे)
• ('वृषभ' अचूक उच्चारणारा हिंदीभाषिक शोधून दाखवाच!
यावरून मला हल्ली शंकाच वाटू लागली आहे.. तिचं निरसन झालं तर उत्तमच! - 'रिषभ' हा वेगळा शब्द किंवा वेगळ्या अर्थाचा शब्द अस्तित्वात आहे का?
तसेच 'संस्कृत' योग्य की 'सन्सक्रित' याचा उलगडा झाल्यास बरे होईल.)
५. 'ॉ', 'ॅ', 'ँ', '्' वगैरेंचा वापर मराठीत होऊन तिची समृद्धी झाली आणि सर्वसमावेशकता वाढली आहे (आणि ही Foreign particles नाहीत). आंग्लादि पाश्चिमात्य भाषांचे बहुतेक सर्व शब्द मराठीत जवळपास अचूकपणे लिहीता तसेच उच्चारताही येतात.
६. गैस (गॅस), चैनल (चॅनल), बैट (बॅट), बैंक (बँक), फौंट (फाँट्), कंप्युटर (कॉम्प्युटर), कोस्मैटिक्स (कॉस्मॅटिक्स्), पैंथर (पँथर), सैमसंग (सॅमसंग), डैझल(डॅझल्), रौक (रॉक), आकलन्ड (ऑकलंड), मैथेमैटिक्स (मॅथमॅटिक्स्), टैंक्स (टँक्स), इंग्लैंड (इंग्लंड), साईंस (सायन्स्), लाईसैंस (लायसन्स), ग्रैज्युऐसन (ग्रॅज्युएशन), वगैरे आंग्लभाषिक शब्द हिंदीभाषिकांच्या तोंडून ऐकताना गंमतच वाटते (त्यांच्या 'हँस क्यूँ रहे हो' ला उत्तर देता देता नाकी नऊ आले आहेत...). हिंदी ऐकाराचं गाजलेलं 'वैशाली' प्रकरण तर सर्वश्रुतच आहे.
७. 'श', 'ष' ही मुळाक्षरे हिंदीत निव्वळ लिहीण्यापुरतीच असावीत अथवा त्यांचा उच्चारच निषिद्ध असावा. हिंदीभाषिक मंडळी सरसकट 'स'चाच उच्चार करताना दिसतात. आणि त्यातून परकीय भाषेतील शब्दही सुटत (खरंतर वाचत) नाहीत.
माझा रोख हिंदी भाषेकडे आहे, भाषिकांकडे नाही हे इथे नमूद करू इच्छितो.
ही हिंदी भाषेची असमर्थता आहे का?
की या हिंदी भाषेतील त्रुटी आहेत?
की माझ्या शंकाच पुर्वग्रहदूषित आहेत?
की हे साहजिकच आहे?
आणि अपभ्रंश (हिंदीत अपभ्रन्श) ही अशुद्धता मानावी का?
भाषाशास्त्र, उच्चारशास्त्र, वगैरेंशी माझा काडीचाही संबंध नाही, सबब जाणकारांनी चुकीचे काही आढळल्यास मोठ्या दिलाने क्षमा करून त्याकडे निश्चितच अंगुलीनिर्देश करावा. शिवाय शंकांचे निरसन करता आले तर दुधात साखर!
(खरंतर हा विषय मांडायला मायबोली हे उचित ठिकाण आहे का, याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. कारण ही चर्चा (झालीच तर) एकांगी किंबहुना एकतर्फी होईल असे वाटते. तरीही जाणकारांची मते जाणून घेताना ज्ञानात भर पडून तदनुषंगिक पुर्वग्रह दूर झाल्यास आनंदच आहे. चूकभूल देणे घेणे. हिंदीप्रेमींनी रोष न धरावा.)
चिन्ह की चिह्न?
चिन्ह की चिह्न?
संस्कृतात चिह्न. मराठीत चिन्ह
संस्कृतात चिह्न. मराठीत चिन्ह चालते. जसे ब्राह्मण बरोबर आणि ब्राम्हण चूक, किंवा ब्रह्म बरोबर, ब्रम्ह चूक; प्रह्लाद बरोबर प्रल्हाद चूक तसेच. पण आता मराठीने हे सर्व शब्द लिहिण्याच्या दोन्ही पद्धती स्वीकारल्या आहेत.
हिंदी-मराठी: मराठीपेक्षा
हिंदी-मराठी:
मराठीपेक्षा हिंदीनेच संस्कृत शब्द जसेच्या तसे (तत्सम)जपून ठेवले आहेत. मराठीने आपले शुद्धलेखन सोपे होण्यासाठी संस्कृतातले सर्व इकार, उकार दीर्घ करून टाकले. संस्कृतमधून मराठीत आलेले तद्भव रूपांतले अनुस्वारही आपण गाळून टाकले आहेत. भीति, नीति,शक्ति, मति हे शब्द हिंदीत संस्कृतातल्याप्रमाणेच र्हस्वान्त लिहितात. मराठीत मात्र ते दीर्घान्त झाले आहेत. अणुरेणु, तनु, गुरु हे शब्द आपण दीर्घान्त लिहितो. हिंदीत ते संस्कृतातल्या प्रमाणे र्हस्वान्त आहेत. पंच पासून पांच शब्द आला, दंत पासून दांत, कांस्य पासून कांसे. परंतु या शब्दांतले संस्कृतशी जवळीक दाखवणारे अनुस्वार आपण काढून टाकले. हिंदीत मात्र ते आहेत आणि उच्चारित आहेत, साय्लेंट नाहीत. हिंदीत दीपावली किंवा दीवाली लिहितात. आपण दिपावली किंवा दिवाळी लिहितो. सीमा, पूजा या शब्दांचे उच्चार हिंदीत आवर्जून पूsजा, सीsमा असे दीर्घ होतात. आपण मात्र सिमा, पुजा असे उच्चार करतो.
मराठीत तत्सम शब्दात 'य' जोडून जोडाक्षर बनले असेल तर आपण आधीच्या व्यंजनाचे उच्चारात हटकून द्वित्त करतो. उदा. पुण्ण्य, कृत्त्य, सत्त्य,इ. (संस्कृतात अशी मुभा आहे म्हणा,) पण हिंदीत मात्र तत्सम शब्दांमध्ये असे द्वित्त होत नाही. हिंदीत उच्चारांचा दोष एक काढता येईल तो म्हणजे मंगला, कल्पना,रचना, हे शब्द मंग्ला, कल्प्ना, रच्ना असे उच्चारले जातात. पण आता आपल्याकडेही असेच उच्चार दिसू लागले आहेत. इत्यलम्.
माफ करा, हीरा. आपण
माफ करा, हीरा.
आपण "टण्यासदृष्य मायबोलीकर आयडी" आहात काय? आय मीन आपण लेखकाच्या मूळ सिद्धांतांशी अॅग्री करून नाही राहीला आहात
(टेल मी अबाऊट द व्याक्रण इन द अबाउव्ह स्टेटमेंट. )
पोलाइट घोस्ट, आपला प्रतिसाद
पोलाइट घोस्ट, आपला प्रतिसाद 'स्माइलीयुक्त' आहे. त्यामुळे तो गंभीरपणे लिहिला नसावा असे मानू. म्हणून फार गंभीर न होता एकच वाक्य. होय. मूळ सिद्धान्तातच गडबड आहे. बेसिकमें लोच्या.
>>>टण्या आणि टण्यासदृश्य
>>>टण्या आणि टण्यासदृश्य मायबोलीकरबांधव यांसी,<<<
टण्यासदृश्य म्हणजे टण्यासारखे दिसणारे असा अर्थ होतो का?
माफ करा, माझा मराठीशी संबंध मध्यंतरी बरीच वर्षे तुटला होता, जेंव्हा गेल्या १५ २० वर्षात परत मराठी वाचणे, सिनेमा बघणे असे सुरु केले तेंव्हा मराठी खूपच बदललेले व संस्कृतपेक्षा जास्त प्रमाणात बरेचसे इंग्रजीशी मिळते जुळते असल्याचे दिसले. र्ह्स्व दीर्घाचा तर बट्याबोळ (की बट्ट्याबोळ) केला आहेच. नपूंसक लिंगी तें व तो चे अनेकवचन ते सारखेच लिहीतात. समजून घ्यायचे.
तर आजकाल नवीन मराठी लिखाणात चहा मधल्या च खाली नुक्ता देतात का? लावण्या म्हणजे पेरणी व लावण्या म्हणजे लावण्यवती यात फरक करून लिहीतात का?
की आजकालच्या मराठीत सबकुच चलता है!
हीरा.. तुमच्या या वाक्यामुळे
हीरा.. तुमच्या या वाक्यामुळे काही संभ्रम नाहीसे झाले.
>>> ळ् हे व्यंजन अभिजात संस्कृतपूर्व अशा आर्ष संस्कृतामध्ये आहे, अभिजात संस्कृतात नाही. आर्ष संस्कृत हे फक्त ऋग्वेदात आणि समकालीन संस्कृतात सापडते. आर्ष संस्कृत ही पाणिनीय संस्कृताची जननी आहे <<<
ऐकिव माहितीनुसार संस्कृतमधे "ळ" नाही इतकेच माहित होते, तर अग्निमीळे मधिल ळ किंवा पुरुषसुक्तातील ळ कसा काय असा प्रश्न मी मागे इथेच कुठे तरी विचारला होता. तसेच प्रत्यक्ष कुणाशी चर्चा केल्यावर ळ ऐवजी ड वापरावा असेही उत्तर मिळाले होते. पण मनाला ते पटत नव्हते.
वरील मजकुरामुळे त्याचे उत्तर मिळाले. धन्यवाद.
नंतर अभिजात संस्कृतमधुन ळ का काढला गेला असावा या शंकेचे निरसन शक्य झाल्यास करावे ही विनंती.
>>> लावण्या म्हणजे पेरणी व
>>> लावण्या म्हणजे पेरणी व लावण्या म्हणजे लावण्यवती यात फरक करून लिहीतात का? <<<<
कसा करायचा? झक्की तुम्हीच सांगा...
मी उच्चारानुसार लिहायचे (आय मीन टाईपायचे ठरवलेले आहे) तर दुसर्या लावण्यवतीतील ण्य लावण्ण्य असा किंवा लावंण्य असा लिहावा असे वाटते. तुमचे काय मत?
>>>> माझा भाषाशास्त्राचा
>>>> माझा भाषाशास्त्राचा अभ्यास अगदी आत्ताच सुरू झालाय, खूपच तोकडा आहे. पण भाषेचा अभ्यास म्हणजे बोलल्या जाणार्या भाषेचा. व्याख्याच मुळी जी बोलली जाते ती भाषा. <<<<
भरत, व्याख्या बरोबर आहे. फक्त त्याचमुळे मला एकच अडचण भासते ती म्हणजे हिंदीबाबत, हिंदी लिहितानाच्या देवनागरी लिपीत अमुक नाही म्हणून आम्ही तमुक तमक्या पद्धतीने उच्चारणार नाही असे दिसते, तेव्हा हिंदी भाषा ही "बोलण्याच्या" / "उच्चाराच्या" कलाकौशल्याने "भाषा" म्हणून विकसित होत्ये का त्यांनी स्विकारलेल्या लिपीच्या मर्यांदांच्या चौकटीतच केवळ बोलली जात्ये हा प्रश्न उरतोय.
अन जर केवळ लिपीच्या नियमबद्ध चौकटीत राहुन बोलली जात असेल, तर तुमच्या व्याख्येच्या विपरित घडत नाहीये का? मी कदाचित चुकत असेन पण वरील मूळ लेखाचा गाभा मला वाटते हाच असावा.
अॅ, ऑ सारखे उच्चार मराठि "बोलीभाषेत" आधी स्विकारले गेले की "लिपीत" हा आधी अंड की आधी कोंबडी यासदृष प्रश्न असेलही, पण अंतिम परिणामस्वरुप बघितले तर अॅ, ऑ सारखे उच्चार मराठिने बोलीभाषेतही स्विकारलेच शिवाय त्या अनुषंगाने लिपीतही सुधारणा करुन घेतली. जेव्हा कि हिंदी मधे हे उच्चारच "त्याज्य" ठरवून "वाळीत" टाकल्याप्रमाणे नाकारले गेले/जातात.
हे असे का हा प्रश्न पडूच नये व त्यावरही चर्चा होऊच नये असेही नाही ना?
लिंबुटींबू जी :- मी
लिंबुटींबू जी :-
मी उच्चारानुसार लिहायचे (आय मीन टाईपायचे ठरवलेले आहे) तर दुसर्या लावण्यवतीतील ण्य लावण्ण्य असा किंवा लावंण्य असा लिहावा असे वाटते. तुमचे काय मत? >>>> - >>> - >>>
गंमत अशी आहे की उच्चार करताना जोडाक्षराच्या पूर्वीचे अक्षर ही थोडे जोर लाऊन बोलले जाते.
ऊदा. लावण्ण्य मधे फक्त ' ण्ण्य ' वरच जोर आहे असे नाही तर ' व ' वर ही जोर आहे.
' मी लावण्याला दिवे लावण्यास सांगितले ' मधील 'ण्ण्य' व्यतिरिक्त 'व' चा उच्चार ही वेगवेगळा आहे,
हे वाक्य थोडे मोठयाने उच्चारल्यास फरक लक्षात येईल.
बाकी तुमच्या आर्ष / अभिजात संस्कृत या बद्द्ल च्या सखोल अभ्यासा बद्द्ल कौतुक वाटले !
हीरा, तुम्ही खूप छान विस्तृत
हीरा, तुम्ही खूप छान विस्तृत माहिती देत आहात. इतकी की असे काही आम्हांस शिकावयास मिळालेच नाही, कुणी सांगितलेच नाही असेही म्हणता येईल. धन्यवाद.
फक्त कायेना, की "शुद्ध मराठी कोणती?", "पुणेरी पेठी मराठीलाच आम्ही शुद्ध समजुन आमच्यावर लादून का घ्यावे" वगैरे वादांमुळे आता जे जे होईल ते पहावे अन उगी रहावे अशी परिस्थिती आहे.
>>> मी लावण्याला दिवे
>>> मी लावण्याला दिवे लावण्यास सांगितले ' मधील 'ण्ण्य' व्यतिरिक्त 'व' चा उच्चार ही वेगवेगळा आहे,
हे वाक्य थोडे मोठयाने उच्चारल्यास फरक लक्षात येईल <<<
व्वा, चारुदत्तजी, अचूक उदाहरण व विश्लेषण दिलेत. असा विचार कधी केलाच नव्हता. पण मग लिपीमधे हे फरक कसे दाखवावे? मराठीकरता देवनागरीत आपण तशी सोय ठेवली आहे का?
>>>> बाकी तुमच्या आर्ष / अभिजात संस्कृत या बद्द्ल च्या सखोल अभ्यासा बद्द्ल कौतुक वाटले ! <<<
अहो तो मी नव्हे, हीरा यांचा सखोल अभ्यास आहे. हे वाक्य हीरा यांना हस्तांतरीत करतो.
'य'युक्त जोडाक्षर असलेल्या
'य'युक्त जोडाक्षर असलेल्या फक्त तत्सम म्हणजे संस्कृतामधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांमध्येच , पुन्हा एकदा फक्त याच शब्दांत 'य' आधीच्या व्यंजनाचे द्वित्त होते. तद्भव म्हणजे संस्कृतापासून उगम पावलेल्या (आणि थोडे फेरफार झालेल्या) शब्दांत आणि देशी शब्दांत असे द्वित्त होत नाही. उदा. कृतकृत्य हा शब्द आपण कृतकृत्त्य असा उच्चारू शकतो. साहित्य, अदम्य, दुर्दम्य, आधिक्य, व्याख्या, नाट्य, मिथ्या वगैरेमध्ये पण असेच. पण रमेश किंवा मधू यांना हाक मारताना रम्म्या, मद्ध्या अशी नाही मारायची. ती रम्या, मध्या अशीच पाहिजे. कारण ही तद्भव रूपे आहेत. दाता हे दातृ शब्दाचे प्रथमा एकवचन आहे. पण मराठीत आपण दाता हेच मूळ रूप मानून चालवतो. म्हणून दात्याला हा शब्द तद्भव बनतो. म्हणून द्वित्त होत नाही. तसेच पिता, भ्राता,कर्ता या शब्दांचे. पुण्य हा कोणतेही रूपांतर न झालेला संस्कृत शब्द आहे म्हणून पुण्ण्याची मोजणी असा उच्चार चूक नाही. पण पुणे हा तद्भव किंवा देशी शब्द, म्हणून पुण्ण्याला जायचे आहे हे चूक. हेच भाता, गुंता, काथ्या,कोयता यांची रूपे करताना. साकल्ल्य, कैवल्ल्य, शल्ल्य हे ठीक. पण मळ्ळ्यात, गाण्ण्यात, टोपल्ल्यात, (टोपलाचे विभक्तीरूप), डब्ब्यात हे चूक. लावणी हा देशी शब्द. म्हणून लावण्या हे बरोबर. लावण्य हा संस्कृत शब्द, म्हणून लावण्ण्य हे ठीक. (म्हणजे चूक नाही. असे द्वित्त करण्याची मुभा आहे.)
हीरा, माहितीपूर्ण
हीरा, माहितीपूर्ण प्रतिक्रियांसाठी खूप खूप धन्यवाद..
फार छान माहिती अतिशय सुंदर विश्लेषणासह आपण देता आहात.. खूप काही नवीन समजले.. शिकावयास मिळाले...
जमल्यास अपभ्रंश ही अशुद्धता मानावी का? यावर प्रकाश टाकावा...
म्हणजे मुख्य भाषेची बोलीभाषा बोलणाऱ्यांना बऱ्याच वेळा 'शुद्ध भाषा बोल' वगैरे ऐकावयास मिळते (माझा वैयक्तिक अनुभव) म्हणून...
उदा. आम्ही पोह्यांना 'फाँव' म्हणतो.. (प्रत्यक्षात उच्चार काहीसा वेगळा आहे..)
फोवं.
फोवं.
डब्ब्यात बरोबर की डब्यात?
डब्ब्यात बरोबर की डब्यात?
फोवं की फवे?
फोवं की फवे?
साती, तुम्हाला माहित आहे..!
साती, तुम्हाला माहित आहे..! ऐकून बरं वाटलं..
हिंदी डिब्बा आणि मराठी डबा यांतूनच अलिकडे 'डब्बा' प्रचलित झाला असावा..
मराठीत डबा, डब्यात, डब्याला..
नवनाथ, सक्कली सक्कली चायत
नवनाथ, सक्कली सक्कली चायत फोवं घालून खदल्याशिवाय दिवस चालू होयाचा नाय तवा. भिस्कीटा ना पाव आता आले.
हेरी आमी पोरां काय निसदी चाय खायाची नाय.
(नवनाथ, तेव्हां सकाळी सकाळी चहात पोहे घालून खाल्ल्याशिवाय दिवस चालू व्हायचा नाही.बिस्कीटे आणि पाव आता आले.
एरवी आम्ही मुले काही नुसता चहा प्यायचो नाही )
फोंव् : दक्षिण कोंकण
फोंव् :
दक्षिण कोंकण (सिंधुदुर्ग) ते थेट दक्षिण कन्नड पर्यंतच्या विस्तारित कोंकणात फोंव् - फाँव् हाच शब्द प्रचलित आहे आणि कोंकणी भाषेत तो प्रमाण शब्द आहे. सिंधुदुर्गात कुठे कुठे फोंवे, फोंये असेही म्हणतात.
Pages