मागिल भाग म्यानमा -५ http://www.maayboli.com/node/54416
म्यानमा - ६
दुसर्या दिवशी सकाळी सुर्योदय बघायला जायचे तर फ्योफ्यो मला नको होती. एकतर तिथे तिची गाईड म्हणून काही गरज नव्हती, दुसरे सुर्यास्तासाठी तिने निवडलेले नॉर्थ गुनी मला फोटो काढण्याच्या दृष्टीने तितके योग्य वाटले नव्हते. त्यामुळे माझ्या हॉटेलमध्ये चौकशी केली. पहाटे ४ वाजता तयार राहण्याच्या सूचनेसकट गाडी आणि ड्रायव्हर मिळाला. फोटो काढण्यासाठी तो तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल असेही म्हणाले.
या हॉटेलच्या एक दोन गंमतीदार गोष्टी आठवणीत आहेत. खोलीत पलंगाशेजारच्या टेबलावर एका कार्डवर सूचना होती. 'पाहुण्यांनी खोलीतल्या कोणत्याही वस्तूची मोडतोड केल्यास त्याची भरपाई तत्काळ मॅनेजमेंट कडे करावी लागेल' आणि त्या बरोबर एक फुलस्केप कागद भरून मोठ्ठी लिस्ट होती. बाथरूममधला मोठा आरसा फोडल्यास २८००० चाट, टेबलासमोरचा छोटा आरसा फोडल्यास १०००० चाट, टेबललॅंप तोडल्यास १२०००...चादर फाटल्यास इतके आणि खुर्ची मोडल्यास तितके...दरवाजाच्या हँडलपासून कपडे अडकवायच्या खुंटीपर्यंत अक्षरशः एकही वस्तू सुटली नसेल. 'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना' ही म्हण सत्यात उतरण्याची भरपूर शक्यता होती. खरं सांगतो ३ दिवस बाथरूमच्या फ्लशचे बटन सुद्धा मी हळूवार पणे दाबत असे.
याउलट कपाटात एक लिस्ट होती ज्यात कुठलाही कपडा दोन चार रुपयांत धुवून इस्त्री करून देत होते. येंगॉनच्या घामट हवेत वापरलेले सगळेच्या सगळे कपडे तात्काळ लाँड्रीला दिले. प्रवासात दिवसभर वणवण भटकल्यावर रात्री बाथरूममधे कपडे धूत बसण्याइतके कंटाळवाणे काम कुठले नाही. आता पुढच्या प्रवासात पुन्हा ते करावे लागणार नव्हते.
ठरल्या प्रमाणे पहाटे ४ वाजता गाडी आणि ड्रायव्हर लिन लिन तयार होते. इथे आल्यापासून ही द्विरुक्ती असलेली नावे ऐकण्याची आता सवय झाली होती. बाहेर अजूनही व्यवस्थीत अंधार होता. काही मंदिरे प्रकाशझोत सोडल्यामुळे उजळली होती. लिन लिनने गाडी बुलेथी मंदिराकडे घेतली. माझ्या सारखे काही आणखी उत्साही जीव हळूहळू येऊ लागले. तरी सुर्यास्ताच्या वेळ सारखी गर्दी आता अजिबात नव्हती. अगदी १०-१५ जण असतील नसतील. थोडे उजाडू लागले तेव्हा दूरवर डाव्या दिशेला बलून्स ओव्हर बगॅनचे फुगे फुलतांना दिसू लागले. एका मागोमाग एक करत पाच मिनिटांत ते पाच सहा बलून्स निघाले सुद्धा. ते हुकल्याची खंत पुन्हा एकदा वाटली. काल दुपारी इतकी गर्मी होती पण आत्ता सकाळी गारवा होता. सुर्योदयाची वेळ जवळ आली तसे दूरवर असलेल्या धुक्यातून काही मंदिरांचे कळस दिसू लागले. सगळ्यांचे कॅमेरे फटाफट सुरू झाले. त्या दिवशीचा सुर्योदय प्रत्यक्ष बघण्या ऐवजी कॅमेर्याच्या लेन्स मधूनच बघितला असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
हॉटेलकडे परततांना लिन लिनला मी बगॅनचे काढलेले फोटो बघण्याची उत्सुकता होती. त्याला दाखवल्यावर म्हणाला मलाही फोटोग्राफीची आवड आहे. पण महागाचा कॅमेरा परवडत नाही. मग स्वत:च्या मोबाईल मधे असलेले काही फोटो त्याने मला दाखवले. त्याला छाया प्रकाशाचे खरच उत्तम ज्ञान दिसत होते. मी तुला काही आणखी काही फोटोजेनिक स्पॉट्स दाखवतो म्हणाला. मग थोड्या आडवळणाच्या पायवाटांमध्ये गाडी घुसवत त्याने खरच एक दोन ठिकाणी नेले जिथून मला हवे तसे फोटो काढता आले. त्याला म्हटले तू मला पुढे दिवसभर फिरवू शकशील का? काल मी ऐतिहासिक सगळी मंदिरे बघितली आहेत आता मला तू नुसते गावात फिरव. नविन बांधलेली मंदिरे दाखव. तर सकाळी शक्य नाही पण दुपारी २ नंतर जमेल म्हणाला.
" तुला मंक्सचे फोटो काढायचे आहेत का? तर मी त्यांना पण आणू शकतो."
म्हणजे? मी नं समजून विचारले. म्हणजे तुला जर का बौद्धभिक्षूंचे नदी किनार्यावर किंवा मंदिराच्या बॅकग्राऊंडवर असे संध्याकाळच्या वेळी फोटो काढायचे असतील तर आपण तिथे ३-४ भि़क्षूंना घेऊन जाऊ.
"असे ते सन्यासी तयार होतात?"
""हो तयार होतात. फक्त त्यांना नंतर पैसे देतांना दक्षिणा दिल्यासारखे नम्रपणे द्यायचे. त्यांना असे पैसे घेण्याची मुभा नाही पण शेवटी त्यांनाही पोटापाण्याची सोय बघावीच लागते." लिन लिन ने माहिती पुरवली.
मला अशी अरेन्ज्ड फोटोग्राफी करण्यात काही रस वाटत नव्हता त्यामुळे मी त्याला नाही सांगितले. मग गावात फिरून संध्याकाळी एका वेगळ्या मंदिरातून सुर्यास्ताचे फोटो पुन्हा काढण्याचे ठरले.
८.
९.
१०.
११.
२ वाजता लिन लिन हजर होता. बगॅन लॅकरवेअरच्या भांड्यासाठी प्रसिद्ध आहे. काल फ्योफ्योने पण अशा एका दुकानात नेले होते पण तिथे मला किंमती बर्याच जास्त वाटल्या होत्या. लिन लिनला तसे सांगताच तो मला म्हणाला की मी तुला एक दोन ठिकाणी नेतो तिथे तुला आवडले पटले तर खरेदी कर. त्या लॅकरवेअरच्या दुकानात मागच्या बाजूला त्यांचे वर्कशॉप पण होते. तिथला मालक आधी भांडी कशी बनतात ते बघा म्हणाला आणि मागे नेऊन माहिती देऊ लागला. आधी बांबूपासून(किंवा लाकडापासून) हव्या त्या आकारचे भांडे बनवले जाते. मग थिटसी नावाच्या झाडापासून निघालेला जो डिंक असतो त्याचे त्यावर आवरण चढवायचे. ते वाळल्यावर कुशल कारागीर वूडकार्विंगची हत्यारे घेऊन त्यावर कोरीव नक्षीकाम करतात. ते झाले की त्या नक्षीत नैसर्गिक रंग भरतात. जितके हे कोरिवकाम नाजुक तितकी किंमत जास्त. खाण्यापिण्यासाठी वापरल्या जाणार्या भांड्यांत गरम सूपसारखे पदार्थ असले तरी काहीही होत नाही, अगदी रोजच्या जेवणात सुद्धा वापरा म्हणे. समोरच्या दुकानात सूप बोल्स, फ्लॉवर पॉट्स, अनेक आकाराच्या डब्या असं बरच कायकाय होतं. किंमती पण ठिक वाटल्या त्यामुळे इथली आठवण म्हणून काही खरेदी केली.
नंतर पुढे जात असतांना रस्त्यात लिन लिनने मी कुठून आलो....एकटाच फिरतो आहे का..घरी कोण कोण असतं वगैरे मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये चौकशा सुरू केल्या. भारताबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. अगदी शेजारी देश आहे हे सुद्धा माहित नव्हतं. मला तरी शेजारी असून म्यानमार बद्दल कुठे काय माहित होतं?
थोड्यावेळाने त्याच्या प्रश्नांना कंटाळून मग मीही त्याला विचारलं तुझ्या घरी कोण असतं..लग्न झालं आहे का वगैरे. तर म्हणाला,
आय हॅव अ गे फ्रेंड.
Oh ok..
he is guide.
बरं.
I want to marry but..नो मनी..
ऑ? गे मॅरेज होण्या इतका पुढारलेला आहे हा देश? इती मी अर्थात मनात.
look.. this photo.
अरेच्च्या फोटोत तर याच्या बरोबर मुलगी दिसतेय.
आणि लगेच तो गे फ्रेंड नसून ती गर्ल फ्रेंड असल्याचे लक्षात आले. र उच्चारत नसल्याने गर्लफ्रेंडची गे फ्रेंड झाली होती आणि इंग्लिश चांगले नसल्याने she चे he.
पुढची संपूर्ण संध्याकाळ लिन लिनने मला गावभर भरपूर हिंडवले. एकमेवाद्वितीय असा सुर्यास्त दाखवला. (ज्याचे फोटो गेल्या भागात आहेत.) या दोन्ही भागातले फोटो तुम्हाला आवडले तर तिथे घेऊन जाणार्या लिन लिनचे श्रेय त्यात जास्त आहे.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
** गेल्या भागात जे सुर्यास्ताचे फोटो आहेत ते बहुतेक सगळे लिन लिनने दाखवलेल्या मंदिरातून घेतले आहेत ज्याचे नाव माझ्या लक्षात नाही. बुलेथी येथून सुर्योदय बघितला होता, सुर्यास्त नाही. ही चूक तिथे सुधारली आहे.
वा ! मस्त फोटो आहेत
वा ! मस्त फोटो आहेत एकदम.
बलून्स आणि गुलाबी फुलांबरोबरच्च देवळाचा खूप आवडला.
गुलाबी फुले बऊगन्व्हिलिआची
गुलाबी फुले बऊगन्व्हिलिआची bougainvillea आहेत.
बाकी टूर अप्रतिम . एकूण खर्च किती झाला तेही सांगा नन्तर...
बोगनवेल .. आमच्याकडे
बोगनवेल .. आमच्याकडे म्हणतात..
या भागामधील एकुणएक प्रचि सुपर्ब.. लिन लिन चे तर आभारचमानावे लागतील.. हवी ती गोष्ट हव्या त्या ठिकाणी जुळून आली कि फोटोतली मजा वाढते.. लेख वाचताना १२वा प्रचि आल्यावर मनात म्हटल कि हा सर्वात क्लास अस लिहाव प्रतिसादात..पण त्या खाली जसजस गेली म्हटल कि सगळेच क्लास म्हणण्याखेरीज पर्याय नाही
परत एकदा एकुणएक प्रचि खर्रच्च सुपर्ब..
पुभाप्र..
मंदिरांचे बांधकाम पहाता
मंदिरांचे बांधकाम पहाता विटांच्या रचनेत रत्नागिरीच्या थिबा पॅलेससारखीच रचना आहे . ब्रम्ही आर्कितेक्चर.
छायाप्रकाशाच्या खेळामुळे मंदिरे आकर्षक दिसत असली तरी एकूणच भारतीय मंदिराप्रमाणे ती कोंदट , अस्वच्छ अंधारी असावीत असे त्यांच्या दारे खिडक्याच्या रचनेवरून वाटते. लेखकाने ब्याटरी मारावी.
अहाहा फोटो आणि मस्त वर्णन
अहाहा फोटो आणि मस्त वर्णन
आहाह!! वाह क्या बात है..
आहाह!! वाह क्या बात है.. प्रत्येक फोटो पुन्हा पुन्हा नजर भरून पाहातच राहावासा..
ऑसम ब्यूटी!!!
बलून, गुलाबी बोगनविला.. सोनेरी सूर्योदय, कळस.. केवळ अप्रतिम..
आता शब्द अपुरे पडले रे!!!
चौदावा तर लगेच स्केच काढावसं वाटेल इतका सुर्रेख!!!
मस्त मस्त मस्त..
बाय द वे, हे क्रमशःच आहे ना???
धन्यवाद हो रॉबीनहूड काही
धन्यवाद
हो रॉबीनहूड काही मंदिरांत टॉर्च शिवाय चालणे अशक्य व्हावे इतका अंधार होता. टॉर्च आणि बगॅन साठी सहज काढघाल करता येण्यायोग्य चपला/स्लिपर्सचा एक वेगळा जोड बरोबर न्यायला हवा कारण दर मंदिरा बाहेर चपलाबूट काढावे लागतात शिवाय जोड्यांत वाळू-माती अडकल्याने चालतांना त्रासदायक होते. ही माहिती नेटवर मिळाली होती ज्याचा खूप उपयोग झाला. खर्च साधारण एक लाखाच्या आत आला होता पण आता किंमती वाढल्या असू शकतील. थ्री स्टार हॉटेल्स ३ ते ५ हजारात होती. खाण्यापिण्याचा खर्च हजार रु रोज होत असेल. टॅक्सीचे बगॅनमध्ये ८ तासांचे १५०० रु. होत होते.
वर्षूनील, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
फोटो बद्दल बोलणे सोडून द्यावे
फोटो बद्दल बोलणे सोडून द्यावे आता... प्रत्येक फोटोला काय प्रतिक्रिया द्यायची..
मस्त आहेत फोटोही आणि अनुभव
मस्त आहेत फोटोही आणि अनुभव कथन देखील.
मस्त सुरु आहे लेखमाला.
मस्त सुरु आहे लेखमाला.
मस्त! लॅकरच्या भांड्यांचा
मस्त! लॅकरच्या भांड्यांचा नाही का फोटो काढला?
खुप सुंदर फोटो. जर त्यांचे
खुप सुंदर फोटो. जर त्यांचे पर्यटन ऑफिस भारतात असेल तर त्यांना जाहीरातीसाठी हे फोटो वापरता येतील !
भांड्यांचे फोटो नव्हते काढले.
भांड्यांचे फोटो नव्हते काढले. फक्त भांडी बघायची असतील तर घरात असतील त्यांचे फोटो काढून टाकता येतील.
गूगलला विचारलं. त्याने
गूगलला विचारलं. त्याने दाखवली. त्या बाजारात ती कलाकारी करताना फोटो काढले असते तर मजा आली असती
फारच सुंदर !! त्या बाजारात ती
फारच सुंदर !!
त्या बाजारात ती कलाकारी करताना फोटो काढले असते तर मजा आली असती >>> +१
एकंदरच बाजाराचे फोटो तुम्ही घेतलेले दिसत नाहीत.
अश्विनी के , लिंक टाका न
अश्विनी के , लिंक टाका न प्रतिसादात..
मी शोधायला गेली पण स्पेलिंग वगैरे चिकत असणार कि काय कोण जाणे पण मिळत नाही आहे मला.
टीना,
टीना, https://www.google.co.in/search?q=lacquer+utensils&sa=X&biw=1280&bih=891...
अश्विनी तुम्ही लिंक दिलीत ते
अश्विनी तुम्ही लिंक दिलीत ते वेगळे आहे. बर्मीज लॅकरवेअर वर भरपूर नक्षीकाम असते. हे इथे बघा
https://www.google.co.in/search?q=burmese+lacquerware&biw=1441&bih=710&s...
बघीतल्या लिंक दोन्ही..
बघीतल्या लिंक दोन्ही.. धन्यवाद