म्यानमा - भाग ४ http://www.maayboli.com/node/54388
म्यानमा - ५
येंगॉनचा आजचा तिसरा दिवस निवांत होता. तौक्यान वॉर सिमेटरी तेव्हडी बघायची राहिली होती. सकाळच्या रश अवर मधे अडकायला नको म्हणत दुपारी जायचे ठरवले. तौक्यान वॉर सिमेटरीला जायला जवळजवळ एक तास लागला. अतिशय व्यवस्थित देखभाल केलेली सिमेटरी होती. दुसर्या महायुद्धात ब्रिटिश साम्राज्याकडून जपानशी लढतांना कामी आलेल्या हजारो सैनिकांना इथे चिरविश्रांती देण्यात आली आहे. भारतीय, बर्मिज, ब्रिटिश...ब्रिटिश कॉमनवेल्थ मध्ये येणार्या आणखीन पण अनेक देशातले असतील. ६००० सैनिकांना इथे पुरण्यात आले. रांगामागून रांगा या शूरविरांच्या कबरी. युद्धातल्या प्रचंड नरसंहाराची जाणिव होउन अस्वस्थ व्हायला होत होते. अधिकार्यांपासून शिपायापर्यंत सगळे इथे एकत्र. मेलेल्या सैनिकांची १८ , १९ अशी वयं बघून काळजात लक्क झाले. इकडे मातीशी जवळ असणार्या कबरी आणि समोर आकाशाला स्पर्श करतील अशा उंच स्तंभांपासून बनवलेले रंगून मेमोरियल. ज्या सैनिकांची कबर नव्हती अशा जवळजवळ २७००० सैनिकांची नावे या स्तंभांवर कोरून अजरामर केली होती. जसे उत्तुंग शौर्य दाखवून हे सैनिक युद्धात कामी आले तसेच उत्तुंग त्यांचे स्मारक. अनेक भारतीय नावे बघून ऊर अभिमानाने भरून येत होता.
आपण नशिबवान की अजूनतरी युद्धाची होरपळ नसलेल्या शांततापूर्ण परिस्थितीत जगलो आणि जगतो आहोत. यांच्या सारख्या सीमेवर असणार्या हजारो लाखो शूरविरांमूळे!
------------------
येंगॉनचा मुक्काम संपला होता. इथून बगॅनसाठी सकाळचे विमान होते. म्यानमारमध्ये चार पाच अंतरदेशीय सेवा देणार्या विमान कंपन्या आहेत. एअर येंगॉन, एअर बगॅन, मँडले एअरवेज इ. सगळी तिथल्या एक एक गावाची नावं आणि तिथेच त्यांचे मुख्यालय. उद्या आपल्याकडे एअर पुणे, कोल्हापूर एअरवेज किंवा जयपूर एअरलाईन्स सुरू झाले तर...या कल्पनेनी गंमत वाटली. सिक्युरिटीत लिक्वीड चालत होते का अधिकार्याने गफलत केली कोणजाणे पण बॅगेत पाण्याची मोठी बाटली चुकून राहिली होती तरी त्याने काहीही नं बघता शिक्का मारला.
जसे जसे बगॅन जवळ येऊ लागले तशी झाडे तुरळक आणि जमिन रखरखीत दिसू लागली. त्या रखरखाटातूनच दूरवर अंतराअंतरावर बगॅनच्या मंदिरांचे कळस दिसू लागले. 'ओह ल्लूक' करून पली़कडची बाई चित्कारली म्हणून मी मान त्या दिशेला केली तर दूर चार पाच हॉट एअर बलून्स उडत चालले होते. बलून्स ओव्हर बगॅन! या एकमेव कंपनीचे ५-६ बलून्स रोज सकाळी बगॅनच्या परिसराची अस्मानी सफर घडवून आणतात आणि त्याचे बुकींग कैक महिने आधी केले तरच मिळते. (अर्थात मला ते मिळाले नव्हते.)
साधारणपणे अकराव्या शतकात बगॅन आणि आजूबाजूचा भाग समृद्धीच्या परमोच्च शिखरावर होता. अर्धाअधिक बर्मा व्यापून राहिलेल्या तेव्हाच्या पगान साम्राज्याची इरावड्डी (इरावती) नदीच्या काठावर वसलेली बगॅन ही राजधानी. त्या शे दोनशे वर्षांच्या काळात तिथल्या राजांनी या एका गावात जवळजवळ दहा हजार (!) लहान मोठी मंदिरे बांधली. त्यात बौद्ध स्तूप तर होतेच पण अनेक मंदिरांच्या स्थापत्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव होता-आहे. उत्तरेकडून होणार्या सततच्या आक्रमणांविरुद्ध टिकाव धरू नं शकल्याने तेराव्या शतकानंतर हे वैभवशाली साम्राज्य लयाला गेलं. काही मंदिरे शत्रूने उद्धवस्त केली होतीच..जी वाचली होती त्यातली पण अनेक भुकंपाच्या निसर्गकोपात जमिनदोस्त झाली. काळाचे घाव सोसत कुठल्याही देखभालीविना जी टिकून राहिली त्यांचे भाग्य विसाव्या शतकात फळफळले. म्यानमारच्या सर्कारने कंबर कसली (शेजारी थायलॅंडचे टुरिझम मधले उत्पन्न बघून?) आणि अनेक मंदिरांच्या रिस्टोरेशनचे काम सुरू झाले. काही मंदिरांची डागडुजी अजुनही सुरू आहे तर काही संपूर्णपणे नव्याने बनवली आहेत.
येंगॉनच्या एस्थर ग्रेस उर्फ मोई मोई करवी आजची दिवसभराची बगॅन टूर बूक केली होती. माझ्या नावाचा बोर्ड घेऊन गाईड उभी होती. हिचं नाव फ्यो फ्यो. "मिंगलाबा!" म्हणून हात जोडून हसत तिने स्वागत केले. Mingalarbar हा बर्मिज लोकांचा नमस्कार. फक्त शब्दात जिथे कुठे र असेल तो उच्चारायचा नाही त्यामुळे म्हणतांना मिंगलाबा..आणि त्यांचा देश पण उच्चारी म्यानमा किंवा बामा.
हॉटेलवर सामान टाकून लगेच बगॅनदर्शन सुरू होणार होते. अंदाजे २०-२५ किलोमिटरच्या परिघात बहुतांश महत्वाची मंदिरे आहेत. ही भटकंती स्वतःची स्वत: सायकलने, टांग्याचे कौतुक असल्यास टांग्याने किंवा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बघायचे असल्यास चारचाकीने करता येते. सकाळी चार तास काही मंदिरं फिरायची आणि दुपारी जेवण आराम करून पुन्हा बाहेर पडून फिरंती आणि शेवटी सुर्यास्त बघून पुन्हा हॉटेलवर परतायचं. या भागात दुपारी भयंकर गरमी व ऊन असते त्यामुळे फक्त सकाळी आणि संध्याकाळी भटकंती करायची हे फ्योफ्यो ने सांगितले. जी मंदिरे मला बघायची होती त्यांची एक यादी मी लिहून आणली होती ती फ्योफ्योला दाखवली. त्यातली बहुतेक सगळी त्या एका दिवसात बसवता येणार होती. जी शिल्लक राहणार होती ती दुसर्या दिवशी माझी मी बघायचे ठरवले.
थोडं पुढे गेल्यावर फ्योफ्यो म्हणाली पुढे रस्त्यात आठवडी बाजार भरला आहे, रस्त्यातच आहे तर बाजार आधी बघून घे. तिथे जवळ पोचलो तर चक्क भाजी बाजार होता. "आमच्याकडेही असाच असतो, तेव्हा मला नाही बघायचा" मी म्हटले. पण फ्योफ्योच्या मते हा अगदी बघण्या सारखा असतो. बरं म्हटलं कदाचीत आतमधे काही वेगळे असेल बघुयात. पण आत काहीही वेगळे नव्हते. भाज्यांची मांडणी पण तीच आणि भाज्याही त्याच. गोर्यां टुरिस्टांचे घोळके मात्र अगदी प्रत्यके आयल मधून फिरत होते. पाच मिनिटांत बाहेर आलो आणि फ्योफ्योला म्हटले मी तुमच्या शेजारी देशातून भारतातून आलो आहे, फिरंगी देशातून नाही. आमच्याकडेही साधारण असेच राहणीमान आहे जसे तुमचे. त्यामुळे तू मला बाजार, म्हशींचे गोठे वगैरे दाखवू नकोस. मला मंदिरांची माहिती दे, उत्तम फोटो काढता येतील अशा ठिकाणी घेऊन चल. मला ते जास्त मह्त्वाचे आहे. ठिक आहे म्हणून तिने ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायला सांगितली. जाता जाता तिने मग बगॅन बद्दल वरती जे लिहिले आहे ती माहिती दिली.
डांबरी रस्त्यापासून उजवीकडे वळत ड्रायव्हरने गाडी एका कच्च्या रस्त्यावर घेतली आणि ज्या ज्या दिशेनी नजर जाईल तिथे सगळीकडे मंदिरेच मंदिरे दिसायला लागली. एका स्तूपा सारख्या मंदिरावर चढून उंचावरून बघ फ्योफ्योने सुचवले. वरती चढलो. केवळ अवर्णनिय नजारा होता. क्षितीजापाशी सावली सारखे मोठे मंदिर आणि त्याचे प्रतिबिंब वाटावे असे समोर दुसरे. काही घोळक्यानी..काही जोडीजोडीनी तर एखादे झाडाआड एकटे..
१.
२.
३.
४.
आपण काही महत्त्वाची मंदिरे आधी बघून घेऊ, फ्योफ्योने सूचना केली आणि एका पिरॅमिड सदृश मंदिराकडे बोट केले. हे धम्मायांजी मंदिर. सगळ्या मंदिरात आकारने सर्वात मोठे. शिवाय मुळच्या ११व्या शतकातल्या शिल्लक असलेल्या मंदिरांपैकी एक. बर्मातल्या सगळ्या बौद्धमंदिरात चार दिशांना चार बुद्धांच्या मुर्ती असतात. पण धम्मायांजी मध्ये मात्र चौथ्या दिशेला गौतमासोबत पाचव्या मैत्रेय बुद्धाची पण स्थापना करण्या आली आहे. हा पाचवा मैत्रेय बुद्ध म्हणजे भविष्य काळात अवतार घेणार असलेला बुद्ध अशी माहिती तिने दिली.
५.
६.
हे सुलामनी मंदिर.
"सुलेमानी?" इति मीच
नाही. सु ला मनी.
इथे पण मंदिराच्या आत १००० वर्षांपुर्वीची बुद्धाची चित्रे अजुनही शाबूत होती.
७.
८.
९.
तिथून मग आमची गाडी आनंदा टेम्पल कडे वळली. हे मंदिर पण मूळच्या शिल्लक मंदिरांपैकी एक शिवाय आत असलेल्या बुद्धाच्या मुर्ती पण तितक्याच जुन्या त्यामुळे बुद्धधर्मियांना हे मंदिर जास्त मह्त्त्वाचे. मला बाहेरून आनंदा तितके आकर्षक वाटले नाही. कारण कुणीतरी त्याला अंगभर मारून ठेवलेला चुना आणि त्याला आणखी कुरूप बनवणारा सोनेरी कळस. आपल्याकडे जुन्या मंदिरांना ऑईलपेंट मारून 'जिर्णोद्धार' केला जातो तोच प्रकार. ज्या सोनेरी रंगात श्वेडगोन राजेशाही दिसत होता त्याच रंगात इथला कळस कुरूप. म्यानमारचे सर्कार लवकरच अजून काही मंदिरांना सोन्याने मढवायचे काम करणार आहे हे आणखी वर ऐकून आत्ताच बगॅनला यायची सुबुद्धी दिल्याबद्दल मी त्या समोरच्या बुद्धाला दंडवत घातले.
तर आनंदाच्या आत चार दिशांना चार बुद्ध आहेत (नवे काहीतरी सांग म्हणू नका!) पण हे थेट छतापर्यंत भिडलेले उंच. मुर्ती होत्या मात्र सुरेख. त्यापैकी दक्षिणमुखी बुद्धाच्या मुर्तीचा चेहरा जवळून बघितला असतांना दु:खी दिसतो तर दूरून बघतांना तोच चेहरा हसरा दिसतो.
आनंदा
१०.
आतील मुर्ती
११.
१२.
जवळून दु:खी (?)
१३.
दुरुन हसरा
१४.
रिस्टोरेशन ऑन प्रोग्रेस
१५.
एव्हाना सूर्य डोक्यावरूनही पलिकडे जात चांगलीच आग ओकू लागला होता. फ्योफ्योला म्हटले सध्यापुरते इतकेच पुरे. आता जेवुयात. लोनली प्लॅनेट मध्ये भलामण केलेल्या मून व्हेजिटेरियन रेस्टॉरंट मधे घेऊन चल म्हटले. तिथे गेलो तर तिथे तौबा गर्दी.. या मूनच्या शेजारच्या रेस्टॉरंटवर पाटी लागलेली - 'lonely planet might not talk about us....but lovely people do.' गर्दी खूप नव्हती पण मालकीणबाई आल्यागेल्याचे हसतमुखाने नम्रपणे स्वागत करत होत्या. सकाळपासून भरपूर चालल्याने भूक पण खवळलेली..पंपकीन सूप, बर्मा स्पेशल - टी लीफ सॅलड, तोफू विथ स्टर फ्राय व्हेजीज, भात आणि जोडीला चक्क पापड. जेवण अतिशय रुचकर होते. या सगळ्यात फ्योफ्यो बाईंना मात्र शुद्ध मांसाहारी असल्याने काय खावे प्रश्न पडला. शेवटी तिने एगराईस घेतला आणि चिवडत बसली.
दुपार हॉटेलमधे घालवून संध्याकाळी पुन्हा निघालो. रस्त्यात एक दोन स्तूप बघून झाले. सुर्यास्त बघण्यासाठी बेस्ट व्ह्यू मिळणारे मंदिर म्हणजे श्वेसनडाओ असे मी वाचलेले. पण तिथे खूप गर्दी असते..तुला चांगले फोटो काढता येणार नाही म्हणत फ्योफ्योने आमची गाडी नॉर्थ गुनी मंदिराकडे वळवली. इथे अगदी मोजके प्रवासी होते. पोस्टकार्डे विकणारी छोटी मुले ज्याच्यात्याच्या मागे लागत होती. माझ्या समोर एक ऑस्ट्रेलियन कपल होते त्यांच्या समोर एक पोरगा आला आणि खिशातून काजूबेदाणे काढावे तसे लाल निळ्या रंगाचे खडे काढून "घ्या ना एकदम स्वस्त आहेत" करत मागे लागला. एकाने तर मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या गच्चीत वाळवणं घातल्या सारखी चित्रे जमिनीवर मांडून एक प्रकारे दुकानच थाटले होते.
नॉर्थ गुनी
१६.
एक एक मजला वर चढत सर्वात वर तिसर्या मजल्यावर पोचलो. संध्याकाळचा भन्नाट वारा सुटला होता. हळू हळू जसा सूर्य क्षितीजापाशी येऊ लागला तसे आकाशाचे रंग बदलू लागले. निळ्याचा गुलाबी होत होत सगळा आसमंत केशरी रंगाने व्यापला गेला आणि त्याचबरोबर वार्याने उडणार्या धुळीमूळे समोरची मंदिरे हळू हळू धुसर दिसू लागली. त्या जादुई वातावरणात मंदिरांच्या महिरपी आड सूर्य लयाला गेला. संध्याप्रकाशाचे थोडे आणखी विभ्रम पाहात खाली आलो. मन भरले नव्हते अन त्यामुळे उद्या पहाटे सुर्योदय बघणे मस्ट आहे हे तिथेच ठरवून टाकले.
*** खालील सुर्यास्ताच्या फोटोत नॉर्थ गुनी सोबत दुसर्या दिवशी बघितलेल्या सुर्यास्ताची पण चित्रे आहेत.
१७.
१८. नॉर्थ गुनी मधून दिसत असलेला सुर्यास्त
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
वाह... मस्त सफर घडवतोयेस..
वाह... मस्त सफर घडवतोयेस.. सुपर फोटोज..
वितळलेल्या सोन्याचे आकाश.. सिंपली ऑसम!!!!
छान माहिती मिळतेय बर्मा बद्दल!!!!
ते पिरॅमिड सदृष्य देऊळ आणी फोटो नं १० मधल्या मंदिरा ची चर्च सदृष्य बांधणी खूप सुंदर आहे..
त्या १० नंबराच्या फोटो चे डीटेल्स आहेत का?? ( हिस्ट्री वाईज)
अतिशय सुंदर चित्रे आहेत ही
अतिशय सुंदर चित्रे आहेत ही सगळी. आणि लिहिलेय पण छान.
हा भाग पण छान. 'म्यानमा'चे
हा भाग पण छान. 'म्यानमा'चे रहस्य उलगडले.
शिवाय मुळच्या ११०० व्या शतकातल्या शिल्लक असलेल्या मंदिरांपैकी एक. >>> हे ११व्या शतकातले असे हवे आहे.
Khupach sundar. Ha bhaag
Khupach sundar. Ha bhaag vaachoon jaayache naakkee ase Tharavoon Taakaley mee.
मस्त सफर चालू आहे. नववा फोटो
मस्त सफर चालू आहे. नववा फोटो आव्डाला.
अप्रतीम!
अप्रतीम!
वाचत अस्ता अचानक पहिला फोटो
वाचत अस्ता अचानक पहिला फोटो दिसला आणि पुढे जायचे विसरलोच ...मस्त फोटो सुंदर वर्णन
काय अप्रतीम आहे हा परिसर
अनेकानेक धन्यवाद
मस्त!
मस्त!
हा भागही आवडला. फोटो अप्रतिम
हा भागही आवडला.
फोटो अप्रतिम !
सुरेख!!
सुरेख!!
मस्त
मस्त
फारच सुंदर.. कसले
फारच सुंदर.. कसले वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे.. एकदम एकाच जागी एव्हढी मंदिरे.. काही फोटो तर कातील आलेत.. ९ नंबरचा फोटो एकदम मस्त.
लोक नुस्तेच सिंगापूर युरोप,
लोक नुस्तेच सिंगापूर युरोप, थायलंड करीत असतात. हे फारच हटके आहे. युम्हाला तिथे जायची आयडिया तरी कशी आली..?
एकदम भन्नाट...
अर्जून, भाषेची काही अडचण आली
अर्जून, भाषेची काही अडचण आली का ?
ईम्ग्लिश तर असणारच ना...
ईम्ग्लिश तर असणारच ना... तसेही आग्नेय आशियातले लोक फार चिरकल्या सारखे आणि नाकात बोलतात.
छान, सर्वच भाग आवडले. हा भाग
छान, सर्वच भाग आवडले. हा भाग प्रचिंसाठी खुप आवडला.
रॉबीन, तो ब्रिटीश
रॉबीन, तो ब्रिटीश साम्राज्याचाच भाग होता म्हणजे इंग्लीश असणारच. पण सामान्यपणे भटकताना ती कितपत कामाला येते ते बघायचे होते. मी थायलंडला गेलो होतो ( त्याला १५ वर्षे झाली ) त्यावेळी गाईड सोडल्यास कुणालाच इंग्लीश येत नव्हते. अर्थात थायलंड्वर ब्रिटीशांचेच काय कुणाही परक्याचे राज्य नव्हते कधी.
मस्तच
मस्तच
मस्त. एकदम साधी आणि म्हणूनच
मस्त.
एकदम साधी आणि म्हणूनच आवडणारी वर्णनशैली आणि मस्त फोटो! मजा येते आहे वाचायला. नववा फोटो सुंदरच आलाय.
'आनंदा'ची शैली मला गोव्याच्या चर्चेस सारखी वाटली थोडीशी.
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.
वर्षूनील १० नंबरचे आनंदा टेम्पल आहे. त्याची आणखी अशी माहिती मला नाही.
रॉबीनहूड नेटसर्फिंग करतांना सापडले.
भाषेची अडचण खूप नाही आली. पाट्या सगळीकडे इंग्लिश मधे आहेत. हॉटेलमधले लोक, गाईड, दुकानदार, वेटर्स मोडके तोडके पण कामचलावू इंग्लिश बोलत होते. येंगॉनच्या टॅक्सीवाल्यांना बोललेले इंग्लिश जास्त समजत नव्हते पण त्यांना इंग्लिश पत्ते वाचता येत होते. जिथे जायचे तो पत्ता लेखी इंग्लिशमधे असला तर तिथे बरोबर घेऊन जात होते. बाकी लहान गावात अपेक्षा नव्हती आणि माफक खाणाखुणांनी काम व्हायचे.
सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन
सुंदर फोटो आणि प्रवासवर्णन देखील मस्त.
वा !!! मस्तच आहे फोटो. देवळं
वा !!! मस्तच आहे फोटो. देवळं खूप आवडली.
अश्विनी चूक दुरुस्त केली आहे.
अश्विनी चूक दुरुस्त केली आहे.
फारच आवडले. त्या एकाच परिसरात
फारच आवडले. त्या एकाच परिसरात इतकी मंदीरे असलेले पाहुन मजा वाटली. भारतात पण असे कधी पहायला मिळत नाही. सफरीबद्दल धन्यवाद!!
फारच मस्त काढलेत फोटो..
फारच मस्त काढलेत फोटो..
अतिशय सुंदर फोटो.
अतिशय सुंदर फोटो. प्रवासवर्णनही मजेत चालू आहे. येऊद्या अजुन!
arjun., सुरेख लेखमाला आहे.
arjun.,
सुरेख लेखमाला आहे. देवळांचे फोटो आवडले. देवळे बरीच स्वच्छ असावीत असं दिसतंय. टापटीप नजरेत भरली. आपल्याकडे अशी कधी होतील, देव जाणे!
हे निरीक्षण रोच आहे :
>> त्यापैकी दक्षिणमुखी बुद्धाच्या मुर्तीचा चेहरा जवळून बघितला असतांना दु:खी दिसतो तर दूरून बघतांना तोच
>> चेहरा हसरा दिसतो.
यावरून आठवलं की अजिंठ्यात एका गुफेत जी बुद्धमूर्ती आहे, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रकाशयोजनेनुसार बदलतात. आनंदमंदिरातील दक्षिणमुखी बुद्धमूर्ती दुरून आणि जवळून पाहतांना तिच्यावर भिन्न प्रकारे प्रकाश पडत असेल काय?
आ.न.,
-गा.पै.
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
आनंदमंदिरातील दक्षिणमुखी
आनंदमंदिरातील दक्षिणमुखी बुद्धमूर्ती दुरून आणि जवळून पाहतांना तिच्यावर भिन्न प्रकारे प्रकाश पडत असेल काय?>>>
मलाही काल असंच वाटलं.
प्रकाश नसावा, ओठांचा शेप
प्रकाश नसावा, ओठांचा शेप बदलतोय ! तो बघणार्याच्या अँगलनुसार बदलत असणार !
Pages