पहिला भाग http://www.maayboli.com/node/54353
हॉटेलच्या खोलीत शिरल्यावर आधी एक तास मस्त झोप काढली. उठल्यावर सगळ्यात पहीले काम होते ट्रॅव्हल एजंटचे ऑफीस गाठणे. भारतातून निघायच्या आधी तिथल्या एका ट्रॅव्हल एजंसीच्या एस्थर ग्रेस नामधारिणीशी जुजबी बोलणी झाली होती. म्यानमार मधे फिरण्याची सगळी अंतर्गत विमान तिकीटे ती आरक्षीत करणार होती. तसेच येंगॉन आणि बगॅनमधे एक दिवसाची टूर, गाईडसकट तिच्याकरवी घ्यायचे ठरवले होते. ही ट्रॅवल एजंसी इंटरनेटवर वाचल्याप्रमाणे तिथली नामांकित असावी. मुख्य रस्त्यावर दुमजली ऑफीस. वरच्या मजल्यावर वीस-पंचवीस डेस्कटॉपचा पसारा. पर्यटनासाठी नुकताच खुला झालेल्या म्यानमार मधे इतकी मोठी ट्रॅव्हल एजंसी असेल असे वाटले नव्हते. एस्थर ग्रेसला भेटायचे आहे म्हटल्यावर रिसेप्शन वरच्या मनुष्याने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मग काहीतरी आठवून वरती मोई मोईला भेटा म्हणे. थोडक्यात मोई मोईने गोर्यांना आपलेसे वाटावे म्हणून घेतलेले एस्थर हे टोपणनाव होते.
एस्थरने मग पटापट तिकीटे काढून लिहायला घेतली. काही वर्षांपुर्वी आपल्याकडेही हाताने लिहिलेलीच विमानाची तिकिटे होती हे अंमळ विसरायला झालेय पण तरी इतक्या वर्षांनी तसे तिकीट हाती आलेले बघून गंमत वाटली. तिकीटे झाल्यावर येंगॉनच्या उद्याच्या स्थळदर्शनाची सविस्तर माहिती विचारली. त्यात सकाळचा अर्धा दिवस ह्या पायातून त्या पायात जायचे होते. (पॅगोडाला ब्रह्मदेशी पाया म्हणतात.) दुपारी येंगॉनच्या स्कॉट मार्केट मधे शॉपींगचा थांबा, संध्याकाळी कंडावजी लेक, स्ट्रॅन्ड हॉटेल भागात फेरफटका आणि सगळ्यात शेवटी सुप्रसिद्ध श्वेडगोन पॅगोडा हा असा एकूण कार्यक्रम होता. एक श्वे-डगोन सोडला तर इतर पायादर्शन करण्यात मला विशेष स्वारस्य नव्हते. त्यापेक्षा दुसर्या महायुद्धात कामी आलेल्या इन्डो बर्मीज सैनिकांची तौक्यान वॉर सिमेट्री खूप सुरेख आणि निवांत आहे असे वाचलेले.
तसेच १८५७ च्या बंडानंतर रंगूनला स्थानबद्ध झालेल्या मुघलांच्या शेवटच्या बादशाहची बहादूर शाह जफरची कबर रंगून मधे आहे. मुघल जिथून भारतात आले ते आताचे उझबेकिस्तान कधीतरी बघायचे आहे. तेव्हा आता रंगूनमधे शेवटच्या मुघल बादशाहचा शेवट जिथे झाला ती जागा पाहायची उत्सुकता होती. त्यामुळे एस्थरला म्हटले तू मला सकाळच्या वेळातले सटरफटर पॅगोडा दाखवायच्या ऐवजी ही दोन ठिकाणे दाखव. तौक्यान सिमेट्री तिला माहीत होती पण बहादूर शहा जफर आणि त्याची कबर हे प्रकरण काही तिला समजेना. मुळात ठिकाण काय आहे हे समजावून सांगण्यापासून सुरूवात होती. मग आजुबाजुच्यांची मदत घेऊन झाली. मुस्लीम टुम्ब, इंडियन किंग, ब्रिटीश हिस्टरी पर्यंत इतिहास सांगून झाला पण एस्थरबाई 'बादुशाजाफा' च्या नावाचा स्वत:शीच जप करत स्मृतीला ताण देत होत्या. नं राहवून मग मी गुगलवर पहा...दिसेल असेही म्हटले पण ते तिच्या शान के खिलाफ असावे त्यामुळे तिने तो सोपा उपाय नं करता कुणाला तरी फोन लावला आणि मग पुढची पंधरा मिनिटे ती आणि पलिकडचा माणूस यात बादुशाजाफा प्रकरण नक्की काय आहे आणि तिथे जायचे कसे याची घमासान चर्चा झाली.
एकीकडे ही चर्चा सुरू असतांना मला नक्की कुठेकुठे जायचे आहे याची माझ्या मनात रुपरेषा आकार घेऊ लागली. श्वेडगोन पॅगोडा मी आजच पाहणार होतो. कंडावजी लेक - पॅलेस, स्ट्रँड हॉटेल परिसर, सुले पाया आणि स्कॉट मार्केट हे सगळे माझ्या हॉटेलच्या आजुबाजूलाच होते. बाकीचे पॅगोडा बघायचे नाहीयेत म्हटले तरी तौक्यान दूर आहे म्हणून एस्थर मला तिथे जायचे डे टुर चे ५० + तौक्यानचे २५ डॉलर आणखी द्यायला लावणार आहे, त्यापेक्षा आपणच आपले टॅक्सी बदलत फिरलेले काय वाईट? दोन पाच डॉलर मधे एका ठिकाणाहून दसरीकडे जायला टॅक्सी मिळतेय हे इथे येतांना नुकतेच समजलेले. एक ते 'बादुशाजाफा' हॉटेलच्या मदतीने शोधून काढले की झाले!
एस्थरने प्रदीर्घ चर्चा करून विजयी मुद्रेने फोन खाली ठेवला आणि मी तिला टुर नको चा माझा निर्णय सांगून अवसानघात केला. पण बगॅनची एक दिवसाची गाईड सकट टूर आणि पुढे इन-ले लेक जवळ नुआंग श्वे गावात एक दिवस राहायचे हॉटेल याचे तिच्या करवी आरक्षण करून टाकले. इतके सगळे होईस्तोवर संध्याकाळ व्हायला आली होती. आता तडक श्वेडगोन गाठणे भाग होते.
सकाळपासून येता जातांना मधूनच श्वेडगोनचा सोनेरी कळस ओझरता दिसत होता त्यामुळे बर्मा मधला हा सर्वात जुना पॅगोडा बघायची उत्सुकता आणखी वाढली होती. टॅक्सीचालकाने आत नेऊन सोडले. या प्रवेशद्वारापाशी वर जायला एस्कलेटर आहे म्हणाला. चपलाजोडे काढून ठेवायला एका कोपर्यात सोय केली होती. जोडे काढून तिथे दिले पण आत जाणारा रस्ता एकदम अंधारा, बोळसदृश. बाहेर बघितले तर दुसर्या बाजूला रोषणाईने झगमगलेले एक आणखी प्रवेशद्वार होते. मग आडवाटेच्या या मागच्या दरवाजाने आत जाण्यापेक्षा तिथूनच जाऊ म्हणत तिकडचा रस्ता धरला. वर जायला इथे प्रशस्त जिना होता. हेच मुख्य प्रवेशद्वार होते याची साक्ष दोन्ही बाजूंनी थाटलेल्या दुकानांनी दिली. पॅगोडाकडे जाण्याच्या या जिन्याला सुरुवातीपासून शेवटापर्यंत वर छत होते. त्यावर लाल सोनेरी रंगात कलाकुसरीचे नक्षीकाम आणि गौतम बुद्धाच्या जिवनातले प्रसंग छतावर रंगवले होते. शंभर दिडशे पायर्या चढून गेल्यावर समोर सुवर्णानी मढलेला श्वेडगोन दिसू लागला. परदेशीयांना ५ डॉलर तिकीट. बाकी सगळे स्थानिक लोक जात येत होते त्यांना प्रवेश मोफत होता. मी पैसे दिले मग समोरच्या माणसाने तिकीट हातात देऊन शर्टावर एक गोल स्टिकर डकवले.
मधोमध श्वेडगोन आणि त्याच्या आजूबाजूला लहानमोठी मंदिरे होती. काहींचे कळस आपल्या मंदिरांसारखे तर काही चायनीज पॅगोडा सारखे. अनेकांना लाकडातले कोरीवकाम करून सजवलेले. श्वेडगोन दिवसा सुर्यप्रकाशात चमकत होता आणि आता रात्री त्यावर चहूबाजूंनी दिवे सोडल्याने झळाळून उठलेला. सुवर्णांकीत पॅगोडाचा कळस हिर्या-माणकाने मढवलेला. ते बघायचे असल्यास दुर्बीण आवश्यक आणि तशी ती तिथे होती सुद्धा. पण या सगळ्या शिवाय या पॅगोडाच्या आत बुद्धाचे आठ केस आहेत म्हणून याचे महत्त्व जास्त. मोठ्या पॅगोडाला खेटून लहानलहान आणखी स्तूप होते. त्यांचे नूतनीकरण चालू असल्याने त्यांचे कळस ताडपत्रीने झाकून ठेवलेले. प्रदक्षिणा मारल्यावर समजले की चार दिशांना चार बुद्धांच्या मोठ्या मुर्ती होत्या (म्हणून चार प्रवेशद्वारे देखील.)
येंगॉनचे सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून देखील परदेशी लोक जेमतेम पाच दहा असतील नसतील. बहुतांश स्थानिक लोक होते. बहुतेक सगळे बाप्ये आणि बाया त्यांच्या पारंपारिक वेशात..म्हणजे लुंगीत. वरती शर्ट आणि खाली लुंगी (त्यांच्या भाषेत लोंगी). पुरुषांची चौकड्यांची तर बायांची फुलापानांची नाहीतर जरीची. एकूण अनेक लोक असले तरी शांत वातावरण होते. त्यात उदाधुपाच्या मंद सुगंधाने वातावरण आणखी पवित्र वाटू लागले. भाविक लोक प्रदक्षिणा मारत वेगवेगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेत होते. कुणी बाहेर मनोभावे तेलाच्या पणत्या उजळवत होते. कुणी तिथेच बसून बुद्धाला वाहण्यासाठी हार गुंफत होते तर कुणी देवाच्या दारी चार घटका बसून शांतता अनुभवत होते. एरवी राजेशाही भपका दाखवणारा सोनेरी रंग पण श्वेडगोनला मात्र त्याच सुवर्णाने नटवे नं बनवता तेजःपुंज बनवले होते. अशा वातावरणात कॅमेरा काढून फ्लॅश उडवायची इच्छा होत नव्हती पण हे प्रवासी कर्मकांड केल्याशिवाय मलापण मनःशांती लाभली नसती. तिथे आणखी थोडावेळ घालवला आणि मग परत जायचे ठरवले. जोडे खालती जमा केल्याने त्याच ठिकाणहून एक्झीट घेणे आता आवश्यक होते. पण चार दिशांपैकी नक्की कुठल्या बाजूचा तो अंधारा बोळ होता हे आता समजेना. सगळ्या दिशांचे दरवाजे आतल्याबाजूने एक सारखेच होते. घामट हवेमुळे आणि इतका वेळ हिंडल्याने थकवा आलेला. अंदाजपंचे एक दिशा धरली. थोडे पुढे गेल्यावर तिथे वरखाली जायला लिफ्ट दिसली पण म्हणजे रस्ता चुकला होता. पुन्हा परत येऊन दुसर्या दरवाजात घुसलो तो नशिबाने एस्कलेटर असलेला निघाला. म्हणजे ही दिशा बरोबर. एका खाली एक सलग तीन एस्कलेटर उतरून खालती आलो. जोडे घेतले आणि बाहेर पडलो.
सकाळचे जेवण विमानात केल्याने एव्हाना जबरदस्त भूक लागली होती. माझ्या हॉटेलात रेस्टॉरंट नसल्याने चेक ईन करतांनाच तिथल्या स्टाफने हॉटेलच्या चहूबाजूंना असलेल्या वेगवेगळ्या रेस्टॉरेंटस आणि एका खाऊगल्लीचा नकाशाच काढून दिला होता. एरवी परक्या देशात गेल्यावर तिथल्या स्थानिक जेवणाची चव बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही पण आज पहिल्याच दिवशी आपले भारतीय जेवण जेवायला मिळावेसे वाटत होते. तेव्हा हॉटेलच्या बाजूच्या रस्त्यावर असलेल्या इंडियन रेस्टॉरेंट मधेच जायचे ठरवले. पण तिथे जायच्या अगोदर रस्त्याच्या सुरुवातीलाच 'निलार बिर्याणी' असा मोठ्ठा फलक दिसला. येंगॉनची माहिती काढतांना या ठिकाणचा उल्लेख वाचलेला होता. बिर्याणी, समोसा आणि फालुदा हे भारतीय(!) पदार्थ बर्मीज लोकांतही तितकेच लोकप्रिय आहेत हेही वाचलेले. हॉटेलचा एकूण अवतार यथातथा होता पण आतमधे बर्यापैकी गर्दी दिसत होती. त्यामुळे जास्त विचार नं करता लगेच एक टेबल पकडले. थोड्यावेळाने ऑर्डर केलेली चिकन बिर्याणी पुढ्यात आली. चिकन उत्तम शिजवलेले होते पण बिर्याणी अत्यंत फिकी. त्यामुळे बिर्याणी नं खाता एखादा चिकनराईस खाल्ल्या सारखे वाटत होते. बरोबर काकडी टमाटो आणि एक अगम्य हिरव्या पानांची चटणी दिली होती. चटणी अजिबात प्रेक्षणीय नव्हती तरी पण समोर आलेल्या प्रत्येक नविन पदार्थाची चव घेऊन बघायची खाज असल्याने तिची चव घेतली अन गिळताही येईना आणि थुंकताही येईना अशी अवस्था झाली. गुढीपाडव्याचा कडुलिंबाचा पाला चविष्ट लागावा इतकं हे प्रकरण कडूजहाल होतं. बाटलीभर पाणी पिऊन लगेच फालुदाची ऑर्डर देऊन टाकली. फालुदाची पण तीच कथा. तिथे मसाले नाही इथे गोडपणा नाही. चमचाभर आईसक्रीम बरोबर त्यात मोठ्ठा कस्टर्डचा पीस पण तरंगत होता. फालुद्यात कस्टर्ड हे बहुतेक फालुद्याचे बर्मीज लोकांनी केलेले व्हेरिएशन असावे. तरी भुकेल्या पोटी सगळ्याचा फडशा पाडला. अन आपली हॉटेलची निवड चुकली का बर्मीज लोकांनाच असे कमी मसालेदार, अगोड पदार्थ आवडतात याचा विचार करत बिल चुकते केले आणि बाहेर पडलो.
हॉटेलवर परतल्यावर दुसर्या दिवशीचा प्लॅन आखायचा होता. बहादूरशहाच्या कबरीचा पत्ता गुगलून काढायचा होता. फ्री वायफायचा पासवर्ड घेतला पण नेटस्पीड इतकी स..लो..ओ... होती की बास! एक पेज लोड व्हायला लागणार्या वेळात कदाचीत त्या कबरीपर्यंत जाऊन परतही येता आले असते. इन मिन तीन ठिकाणांची माहिती काढण्यात तासभर गेला. मग सकाळी ६ चा गजर लावून मस्त ताणून दिली.
श्वेडगोन पॅगोडा (श्वेडगोन पाया)
श्वेडगोन सकाळच्या वेळी
श्वेडगोन पॅगोडा भोवतालची मंदिरे
मस्त
मस्त
व्वा झक्कास
व्वा झक्कास
मस्त लेखमालिका!
मस्त लेखमालिका!
सुंदर वर्णन.
सुंदर वर्णन.
मस्तच.
मस्तच.
मस्त..
मस्त..
छान आहे माहिती
छान आहे माहिती
मस्त
मस्त
धन्यवाद.
धन्यवाद.
झकास लिहिलंय. अगदी ओघवतं!
झकास लिहिलंय. अगदी ओघवतं!
मस्त!
मस्त!
जबरीच..
जबरीच..
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
हाहा, arjun., बुद्ध पण चिंकी
हाहा, arjun., बुद्ध पण चिंकी दिसतोय! बाकी, प्रवासवर्णन आवडलं!
आ.न.,
-गा.पै.