वैधानिक सूचना : हे प्रवासवर्णन तीन वर्षांआधी केलेले आहे. तरी यातील माहिती, प्रसंग, घटना आणि पात्रे यांचा आजच्या परिस्थितीशी संबंध मिळताजुळता असेल असे नाही.
म्यानमा -१
काहीतरी हटके ठिकाण बघायचे तेव्हा डोक्यात होते. गर्दी गजबज या सर्वांपासून दूर.. तरी आपल्या शहरी सुखसवयींना गोंजारणारे. गुगलवर एक एक शोधता शोधता ते ठिकाण अगदी शेजारीच मिळाले. म्यानमार.
पर्यटकांसाठी नुकताच खुला झालेला देश. नेटवर प्रवाशांनी जी माहिती लिहिली होती ती प्रथमदर्शनी विशेष उत्साहवर्धक नव्हती. "तिथे मोबाईल सिमकार्डची किंमत फक्त ६०० डॉलर्स आहे...विमानाची तिकीटे इंटरनेट वरून काढता येत नाहीत...दिडदोनशे किलोमीटरचे अंतर कापायला बसने फक्त ६-७ तास लागतात...देशातला फक्त काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे...एटीएम्स नाहीत... क्रेडीट कार्ड्स कुठेच स्विकारली जात नाहीत...पर्यटकांना सगळा व्यवहार रोखीने करावा लागतो आणि तो देखील फक्त नव्या कोर्या डॉलर्सच्या नोटांमध्ये."
शेजारी देश असूनही ब्रह्मदेशाबद्दल आंग सान सू की, लोकमान्य-गीतारहस्य आणि मंडालेचे जेल, मेरे पिया गये रंगून हे गाणे या पलिकडे मला काही माहिती नव्हती. ही जी तुटपुंजी बिनकामाची माहिती होती त्यात मराठी इतिहासाच्या पुस्तकात असलेले मंडाले हे मंडाले नसून मँडले होते आणि रंगूनचे नाव आता येंगॉन असे झाले होते (नाही म्हणायला "मेरे पिया गये रंगून, किया है वहासे टेलीफून" हे ती हिरॉईन गातगात सगळ्या जगाला का सांगत सुटली याचा खरा अर्थ सिमकार्डाची किंमत ऐकून समजला होता.)
पण माहिती काढत गेलो तशी प्रवासाशी निगडीत नवनवीन उत्साहवर्धक माहिती आणखी मिळत गेली. "मोबाईल सिमकार्ड परदेशी प्रवाशांसाठी गेल्या काही महिन्यांपासून फक्त वीस डॉलर्स मधे मिळू लागलेय. नुकतीच रंगून मधे दोनचार एटीएम उघडली आहेत. मोजक्या ठिकाणची मोजकी हॉटेल्स अॅगोडा सारख्या वेबसाईटवरून हल्ली बूक करता येत आहेत ईत्यादी."
थोडक्यात नव्यानवलाईची मिलिट्रीच्या धाकातली लोकशाही हळूहळू का होईना बदल आणत होती. पुढे हातात जेमतेम १० दिवस असल्याने माहिती काढलेली सगळी ठिकाणे त्यात बसवणे सुरू केले.
या प्रवासात सगळाच व्यवहार रोखीत असल्याने दहा दिवस पुरून उरेल इतकी सगळी रक्कम बरोबर न्यायची होती. काही हॉटेल्स वेबसाईट वरून आरक्षीत केली तरी पेमेंट ऑनलाईन होणार नव्हते त्यांचे पैसे तिथेच डॉलरच्या नोटा देत करायचे होते. कुठेही अगदी नावाला म्हणूनही क्रेडीट वा डेबीट कार्ड घेण्याची सेवा नव्हती. म्हणजे दुर्दैवानी जर का पैसे चोरी झाले तर खरोखर कुणी वाली नसणार. आता पैसे चोरी होऊ द्यायचे नाही ही काळजी घेणे एक वेळ सोपे, पण ते पैसे अर्थात डॉलरच्या नोटा कशा हव्यात याची नियमावली वाचून त्या नोटा मिळवणे हे एक कर्मकठीण. डॉलरच्या नोटांसंबंधीची नियमावली बहुतेक एखाद्या अस्सल पुणेकर दुकानदाराने बनवलेली असावी. प्रत्येक नोट कोरी करकरीत हवी. कळकट मळकट नोटा खपवून घेतल्या जाणार नाहीत. दुमड नं घातलेल्या, सुरकुत्यारहीत नोटा फक्त स्विकारल्या जातील. नोटेचे सर्व कोपरे जागच्या जागी हवेत, ते फाटलेलेच काय दुमडलेलेही नको. पेनाने रंगवलेली..भो़के पडलेली नोट चालणार नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा लहान फोटो असलेल्या जुन्या नोटा ह्या रुपाने नव्या असल्या तरी चालणार नाहीत. अमूक एक सिरीजच्या नोटा खोट्या असू शकतात त्यामुळे त्या आणू नये. (लिहितांनाही दम लागला!)
आमच्या मनी एक्स्चेंज वाल्याला हे सगळे क्रायटेरिया वाचून दाखवल्यावर त्याने आधी सांगितलेला भाव दुप्पट करून सांगितला नाही हे माझे नशिब. अर्थात या परिक्षेत पास होणार्या केवळ शंभराच्या नोटा त्याच्याकडे होत्या. त्याही नोटांना वरील नियमांची कडक चाळणी लावून अर्ध्या नोटा नापास करून आवश्यक तितके डॉलर एकदाचे मिळवले. शेवटी सगळा व्यवहार पूर्ण झाल्यावर समोरच्याने "कशाला चाल्लाय म्यानमारला?" हा प्रश्न विचारला पण मला मात्र त्याने मनातल्या मनात "कश्शाला चाल्लाय म्यानमारला!" म्हणून कपाळावर हात मारल्या सारखा वाटला.
एअर इंडियाने कोलकाता येंगॉन विमानप्रवास फक्त दिड तासाचा आहे. पण हव्या त्या तारखा जुळत नसल्याने आणि लो फेअरच्या नादाने थाई एअरवेजने तोच प्रवास आठ दहा तासांचा करावा लागत होता. कोलकाता - येंगॉन विमानाला बँकॉक मधे ४ तासाचा थांबा होता. विमानातून बँकॉकच्या विमानतळावर उतरल्यावर सगळ्यात आधी करन्सी एक्स्चेंज गाठले. काचेपलिकडच्या बाईला शंभराचे सूट्टे मिळतील का असा निरागस (!) प्रश्न विचारून बघितला, अर्थात तिने अजिबात दाद नं देता सुट्टे हवे असतील तरी अमेरिकन डॉलर्स विकून थाई बाथ घे आणि पुन्हा लगेच थाई बाथ विकून मग मी पाच दहा डॉलर्सच्या नोटा देईन असे बजावले. म्यानमार मधे प्रत्येक ठिकाणी द्यायचे प्रवेश कर पुन्हा आठवून तिला मुकाट हो म्हटले. मला सगळ्या नोटा मात्र नविन हव्यात असे सांगितल्यावर तिने हसत हसत " आय हॅव म्यानमार क्वालिटी" म्हणून ड्रॉवर मधले नवे कोरे पाच दहाच्या नोटांचे बंडल दाखवले. एकुणात माझ्या सारखे अडले नारायण तिथे रोज येत असणार. वट्ट २०० डॉलर्स तिला देऊन परत केवळ १८५ डॉलर्स घेतांना पैसे चोरीला जाण्याइतकेच दु:ख झाले पण म्यानमारमधल्या डॉलर्स मधेच चुकवायच्या रोजच्या किरकोळ खर्चांची चिंता मिटली होती.
येंगॉनच्या मिंगलाडॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी १२ वाजता विमान उतरले आणि विमानतळ बघून कोलकात्याहून निघून पुन्हा कोलकात्यालाच उतरल्यासारखे वाटले. टारमॅक वर जेमतेम चार पाच विमाने उभी होती. एकूणएक सगळ्या अनोळखी प्रादेशिक विमानकंपन्या. विमानतळावर ऑफिशियल मनी एक्स्चेंज होते. केवळ काही महिन्यांपुर्वी सुरू झालेले. हल्ली परदेशी नागरिकांकडूनही काही ठिकाणी म्यानमारची करन्सी चाट-च्यॅट (Kyat) स्विकारली जाते असे निघायच्या आधी वाचलेले. एक अमेरिकन डॉलर बरोबर ८५० चाट इतका हा म्यानमारचा दुबळा चाट. ६०० डॉलर्सच्या बदल्यात पाच लाख चाटचे नोटांचे पुडके हातात पडले. बाहेर येऊन टॅक्सी केली. मिटर वगैरे भानगड नव्हती. बहुतांश टॅक्सी जुनाट आणि मळकट. मुंबईतल्या काळीपिवळीशी सख्य दाखवणार्या, फक्त रंगाने पांढर्या इतकाच काय तो फरक. केवळ टॅक्सी नव्हे तर टॅक्सीचालक पण जणू मुंबईहून आलेला. ढगळ कपडे आणि तोंडात पानाचा तोबरा. दार उघडून रस्त्यावर पचकन थुंकण्यासकट सगळ्या लकबी डिट्टो. विमानतळ ते येंगॉनच्या मध्यवर्ती भागातल्या हॉटेलात जायला पाऊण एक तास लागणार होता. दमट घामट उन्हाळी हवा, रस्त्यातल्या रंगहीन इमारती, फुटपाथ नसलेले रस्ते आणि कानडीत लिहिल्यासारख्या बर्मिज भाषेतल्या पाट्या. दुसर्या देशात आलोय असे अजिबात वाटत नव्हते.
छान ... आवडले प्रवास वर्णन .
छान ... आवडले प्रवास वर्णन . अजून येऊ द्या. मलाही विनाकारण त्या देशाचे आकर्षण आहे...
चांगली सुरुवात लेखातच
चांगली सुरुवात
लेखातच म्हटल्याप्रमाणे फार तुटपुंजी माहीती आहे ह्या देशाबद्दल,
आवडेल वाचायला....
आपल्या माजी राष्ट्रपतीं के आर नारायण यांची अर्धांगिनी श्रीमती उषा ह्याच देशातल्या होत्या त्यांनी लिहीलेले एक बर्मी कथांचे पुस्तक वाचले होते ( फ्क्त पुस्तक वाचल्याचे आठवतंय पण बाकी काहीही नाही )
भारी लिहिलंय! अजून वाचायला
भारी लिहिलंय! अजून वाचायला आवडेल!
छान सुरवात. आपली नृत्याप्सरा
छान सुरवात. आपली नृत्याप्सरा हेलन ( सल्लूची सावत्र आई ) इथलीच. लोकमान्याना इथे ठेवले होते आणि त्यांच्या राजाची कबर आमच्या मालवणच्या घराच्या जवळ.. एवढेच माहीत होते मला.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त!
मस्त!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आज पाहिले हे भाग. सुरूवात
आज पाहिले हे भाग.
सुरूवात भारी झाली आहे!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय