'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज सकाळी तुमचं डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला, “कुठे जाळणार?” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला? वैकुंठातच ना?”

मग त्याने कागदपत्रांवरचं तुमचं नाव वाचलं आणि तो शरमला. कागदावर शिक्के उमटवत एका उसन्या आस्थेने तो तुमची चौकशी करू लागला - तुम्ही आजारी होतात का? तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतात? शिक्के उमटवून त्याने सहीसाठी कागद बाहेर केला. मी दचकलो. तुमच्या डेथ सर्टिफिकेटवर तुमचं पूर्ण नांव आहे, काही ओळी सोडून त्याखाली माझं. मी त्या कागदावर सही केली आहे.

मी तुम्हांला बाबा म्हणत असे. तसं आपल्या बोलण्यातून ठरलं नव्हतं. तुम्ही मोबाईलवर सातत्याने एसएमएस पाठवत असा, त्यातल्या मजकुराखाली तुम्ही BABA असं लिहीत असा. आपण दोघं समोरासमोर असता औपचारिकतेची बंधनं तुम्हीच काढून ठेवली होतीत. तर सांगायचं ते हे की, मी तुम्हांला बाबा म्हणत असूनही मला तुम्ही कधीही वडिलांसारखे वाटला नाहीत. तुमची माझ्या मनातली प्रतिमा ही ’बाबा’ची नसून ‘आजोबा‘ची होती. माझ्या आयुष्यात मी कधीही प्रत्यक्षपणे न अनुभवलेले प्रेमळ आजोबा तुम्ही बनून राहिला होतात. तुमच्या परोक्ष मात्र मी तुमचा उल्लेख ‘तेंडुलकर‘ असाच करतो. पण फक्त आपल्या दोघांचं म्हणून जे एक विश्व होतं, त्या विश्वात, किंवा त्या नाटकात म्हणूया हवं तर, मी तुम्हांला बाबा म्हणत असे. आज ते नाटक संपलं आहे.

आज तुमच्या शांत आणि निश्चल कलेवराकडे पाहताना मला आपली पहिली भेट आठवली. मग येऊन शांत बसलो असता अजून एक भेट आठवली. ती त्या पहिल्या भेटीआधीची भेट. मी ती विसरूनच गेलो होतो.

नेहरू तारांगणाच्या तळघरात एक छोटं चित्रपटगृह आहे. २००० सालची गोष्ट असावी. ‘वास्तुपुरुष‘ या चित्रपटाचा मुंबईतल्या आमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या चित्रपटाचा खेळ चालू होता. चित्रपट संपून दिवे आले तसे तुम्ही सावकाश माझ्याकडे चालत आलात आणि म्हणालात, ”फारच सुरेख अनुभव होता. तुम्हीच सुनील सुकथनकर ना?” मी अतिशय दबून गेलो आणि म्हणालो की, मी सुनील नाही, पण मी त्याला शोधून आणतो. मग मी प्रेक्षकांच्या गराड्यात अडकलेल्या सुनीलला ओढून तुमच्याकडे पाठवलं. ह्या सगळ्यांत मी तुम्हांला माझी ओळख करून देण्याचं धाडस करण्याचा प्रश्नच नव्हता. विजय तेंडुलकर आपल्याशी प्रत्यक्ष बोलले, एवढ्यानेच मी आनंदून गेलो होतो.

आणि त्यानंतरची आपली भेट वर्षभरातच झाली. एकमेकांशी गप्पा मारलेली ती निवांत पहिली भेट. एके दिवशी सकाळी चेतन दातारचा मला फोन आला की, मी माझ्या कादंबरीचं हस्तलिखित घेऊन संध्याकाळी तुमच्याकडे जावं. मला वाटलं की तो माझी फिरकी घेत आहे. पण ते खरच होतं. तुम्ही चेतनच्या आग्रहावरून खरोखर ऐकायला तयार झाला होतात. त्या दुपारभर माझ्या मुंबईतल्या घरात बसून मी कादंबरी मोठ्याने वाचायची तालीम केलेली मला अजूनी आठवते. आपल्या पहिल्या भेटीतच मी तुम्हांला सांगितलं की, मला नाटकं वाचायला आवडत नाहीत, त्यामुळे मी तुमचं काहीएक वाचलेलं नाही. तुम्हांला ते एकदम मान्य होतं. त्या संध्याकाळी मी कादंबरीचा पहिला भाग वाचला आणि थांबलो. रात्र बरीच झाली होती आणि तुम्ही थकला होतात. दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या घरातला फोन खणाणला. तुम्ही होतात. संपूर्ण रात्र, मी वाचलेलं तुमच्या मनात रेंगाळत राहिल्याचं तुम्ही मला सांगितलंत. ती कादंबरी श्रीपु प्रकाशित करत असता मी कोणत्या दृष्टिकोनातून मौजेच्या संपादकीय परिष्करणाकडे पाहावं, ह्याबद्दल तुम्ही मोजकं बोललात आणि मला म्हणालात, ”तुम्ही लिहीत राहायला हवं, सातत्याने लिहीत चला.”

गेलेल्या माणसांचे आवाज माझ्या मनात राहतात. प्रत्येक माणसाबरोबर तो माणूस सतत म्हणत असलेल्या वाक्यांची स्मृती असते. गेल्या वर्षी श्रीपु भागवत गेले आणि पाठोपाठ आज तुम्ही. मला जास्तच एकटं वाटत आहे. ’लिहिणे म्हणजे लिहिता येणे नव्हे’, असं म्हणणारा श्रीपुंचा आवाज माझ्या मनात आहे. तुमच्या स्मृतींशी निगडीत मात्र खूप वाक्यं आहेत. तुम्ही मंत्राप्रमाणे अचूक उच्चारलेली वाक्यं. डोळ्यांत तीक्ष्ण नजर रोखून मऊ आणि कोरड्या आवाजात तुम्ही बोलायचात. मोजके आणि आवश्यक तेवढेच शब्द वापरत लिहायचात. "लेखक सदासर्वदा लिहीतच असतो, लिहायला बसला म्हणजे उतरवत असतो, लिहिण्यातून आता तुझी सुटका नाही”, हे तुम्ही वारंवार म्हटलेलं वाक्य, मनाशी नीट बाळगून मी पुढचं जगणार आहे.

आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेल्यावर त्याच्याविषयी सगळं नीट लिहून काढलं की मग त्याच्या जाण्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो, यावर माझा विश्वास आहे .

**

तुम्हांला जाऊन आता काही महिने झाले आहेत. दोन किंवा तीन. या मधल्या काळात तुमच्याविषयी सतत कुठे कुठे छापून येत होतं. श्रद्धांजलीच्या सभा झाल्या. तुमच्या नाटकांचे प्रयोग झाले. आपल्याला माहिती असलेला विजय तेंडुलकर नावाचा हा लेखक कसा होता, हे ढोबळमानाने या काळात मला समजत गेलं. म्हणजे निदान तसं वाटतं.

तुम्ही तुमच्या मनस्वी आणि रोखठोक लिखाणाने समाजाचा रोष ओढवून घेतला होता, तुम्ही त्या लिखाणापायी बरंच सहन केलं होतं, समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लेखक, चित्रकार, अभिनेते, कार्यकर्ते, राजकीय नेते यांच्याशी तुम्ही सातत्याने संवाद ठेवून होतात, तुमचं मित्रवर्तुळ आणि शत्रुवर्तुळ फार मोठं होतं, असं बरंच काही या मधल्या काळात वाचनात आलं. शिवाय काही अश्रुप्रपाती आणि स्मरणरंजक लेखही होते. तुमच्याविषयीच्या गूढकथा, दंतकथा आणि रहस्यकथा होत्या. ह्या सगळ्यांत जर काही मांडलं गेलं नाही, तर तो तुमचा लेखनविचार. तुमचा स्वतःचा लेखनविचार ह्या सगळ्यांत कुठेही नव्हता.

गेले काही महिने पुण्यात प्रयाग हॉस्पिटलमध्ये तुम्ही राहायला होतात. रात्रींमागून रात्री तुम्ही जागत असायचात. मध्येच तासभर झोपयचात. अश्या ठिकाणी मनाला बरं वाटेल, प्रसन्न वाटेल असं काहीतरी वाचावं, बघावं तर तिथेही तुम्ही ’डायरी ऑफ अ बॅड ईयर’, तेहेलका, मालेगाव जळिताचे रिपोर्ट असलं काहीतरी वाचत असायचात. लॅपटॉपवर नव्या फिल्म्स्‌ मागवून घेऊन बघायचात. तिथल्या नर्सेस रात्री चहा घेताना मला म्हणायच्या की तुमच्यासारखा पेशंट त्यांनी कधीही पाहिलेला नाही.

तुम्ही गेल्यामुळे एक अख्खं शतक जाणतेपणे पाहिलेली व्यक्ती आमच्यामधून गेली आहे. त्यामुळे तुम्ही सोबत बरंच काही घेऊन गेला आहात. भाभा फेलोशिपसाठी तुम्ही ’माझा काळ’ या विषयावर विस्तृत लिखाण करायला घेतलं होतं. विसावं शतक जगताना जाणत्या वयापासून जे जे अनुभवलं, पाहिलं ते एका चिकित्सक नजरेतून तुम्ही लिहीत होतात. थरथरत्या बोटांनी. लॅपटॉपवर. मी ते लिखाण वाचण्याची, निदान त्यातला काही भाग नजरेसमोरून घालता येण्याची वाट बघत होतो.

रात्री तुम्हांला झोप लागली नाही की तुम्ही गप्पा मारायला सुरुवात करायचात. तुमच्या घश्यामध्ये नळ्या घातलेल्या असल्यामुळे या गप्पा लिहूनच चालायच्या. एक वही होती. त्यात तुम्ही लिहायचात. मग ते वाचून त्याखाली मी लिहायचो. मला बोलता येत होतं, पण लिहिणंच जास्त प्रस्तुत होतं. शिवाय आयसीयूमधली शांतता आपल्याला भंग करायची नव्हती.

शब्द सुचतात. शब्द मनात रेंगाळतात. मग ते कागदावर उतरतात. शब्द आपल्या सभोवताली इकडून तिकडे वाहत असतात. घरातल्या कपाटांमधल्या पुस्तकांमध्ये ते साचून, गोठून असतात. जगात प्रत्येक वस्तूला असलेलं एक नाव. त्या नावाचा एक शब्द. आपण जगातच आहोत ते या शब्दांनी भरलेल्या बोगद्यात. काही मोजक्या ठिकाणचे मोजके शब्द महत्त्वाचे आहेत. बाकी पावसाच्या पाण्याप्रमाणे गटारात वाहून जाणारे आहेत. स्मृतिभ्रंश झालेल्या मनोरुग्णाच्या तोंडून गळावेत तसे टीव्हीमधून शब्द जागोजागी अव्याहत वाहत आहेत. त्यांना जायला जागा नाही. त्यांचा निचरा नाही. अशा असंबद्ध, मतिमंद शब्दांची दलदल सगळ्यांच्या मनामध्ये माजली आहे. काही नाजूक असे मोलाचे शब्द आहेत, जे अस्तंगत होत चालले आहेत. त्या शब्दांना जपायला हवं आहे. शब्दांनी जन्म घेतला की ते कलकल करायला लागतात. त्यांतल्या योग्य त्या शब्दांना बोलतं करत उरलेल्यांना शांत करत लिहावं लागतं. जगात लिहिणारी आणि न लिहिणारी अशी दोन प्रकारची माणसं आहेत. पण शब्दांपासून सुटका कोणाचीच नाही. सध्या अनावश्यक लिहिलं जात आहे. भारंभार छापलं जात आहे. शब्दांना वठणीवर आणणारी, त्यांना योग्य वागायला लावणारी माणसं संपत चालली आहेत. शब्दांची जबाबदारी स्वीकारणारे लोक नाहीत. राजकीय नेते आणि नटनट्या उसने शब्द बोलतात. संपादक दुसऱ्याच्या शब्दांची विल्हेवाट लावतात आणि झेरॉक्स मशिनवाले एकसारखा दुसरा शब्द बरहुकूम उमटवतात. शब्दांची जबाबदारी फक्त लेखकांची आहे. आपल्याला ती घ्यावी लागणार आहे आणि त्याला पर्याय नाही. कारण आपल्याला शब्द सुचतो, ह्या ताकदीची ती मोजावी लागणारी किंमत आहे.

तुम्ही एकदा गप्पा मारतांना झोपलात तेव्हा तुमच्या उशाशी ओरहान पामूक ह्या तुर्की लेखकाचं ’अदर कलर्स’ हे पुस्तक मिळालं. ओरहान पामूक हा आपल्या दोघांचाही आवडता लेखक. दरवेळी भेटल्यावर आपण त्याच्या कोणत्यातरी कादंबरीवर हटकून बोलत असू. त्याचा देश आणि त्याचं जगणं आपल्या देशाच्या सद्य मानसिकततेशी साम्य दाखवणारं आहे. आपलं अस्तित्व, आपली परंपरा, भाषा आणि जगणं ह्या सगळ्यांमधला पश्चिमी विचारांचा मिलाफ आणि संपूर्ण जगण्याचे तयार झालेले द्वैत ह्याचा नेमका व नाजूक वेध प्रत्येक कादंबरीत तो घेत असतो. ’अदर कलर्स’ ह्या पुस्तकात त्याचा संपूर्ण लेखनविचार आहे. त्याने नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाच्या पानांमध्ये तुम्ही बुकमार्क घालून ठेवला होता. मी तुमचं पान न हरवता ते पुस्तक घेऊन वाचायला लागलो आणि त्यापुढील कित्येक रात्री तुमचा डोळा लागला की तेच करत राहिलो .

लेखकाला आणि लिखाणाला महत्त्व न देणाऱ्या समाजामध्ये आपण जगत आहोत. अ‍ॅनलॉग मनस्थितीतून डिजिटल मनस्थितीत नव्यानं आलेला आपला समाज आता चित्र आणि फोटो बघणारा समाज झाला आहे. आपण आता वाचणारा समाज उरलेलो नाही. इतकं, की वाचणं हा आता कौतुकाचा विषय झाला आहे. बघणं ही रोजची सवय झाली आहे. तात्कालिक आणि चकचकीत शब्द रोज छापले आणि बोलले जात आहेत. संपूनही जात आहेत. साक्षर असलेले नट आणि नट्या लेखक झाले आहेत. मोजकं आणि महत्त्वाचं, शिवाय एका आंतरिक हतबलतेतून तयार होणारं झळझळीत साहित्य दुर्मिळ होत जात आहे. आज समाज एका वेगळ्याच वेगवान काळात जगत आहे आणि आपण लेखक चाचपडत आहोत. कसं जगायचं, कोणती भाषा - कोणते शब्द निवडायचे, कशावर विश्वास ठेवायचा आणि काय लिहायचं, कोणत्या काळामध्ये आपण जगायचं आहे, हे आता पुन्हा ठरवून घ्यावं लागणार आहे .

विसावं शतक संपताना काळाच्या अस्तित्वाची शकलं होऊन त्याचओं भीतीदायक विभाजन झालं आहे. पंधरासतरा वर्षांपूर्वीचे रंग - चव – वास - शब्द अनोळखी होत आहेत. मराठी माणसाच्या बौद्धिक दुटप्पीपणाला आणि स्किझोफ्रेनिक रसिक मनस्थितीला दुहेरी धार चढलेली आहे. जुन्या लोकप्रिय लेखकांची भुतं जागोजागी किंचाळत ठाण मांडून बसली आहेत. नव्या काळात कसं जगायचं, यंत्रं कशी वापरायची आणि रस्ते कसे ओलांडायचे याची सुतराम माहिती नसणारी माझ्या आईवडिलांची पिढी या भुतांच्या पोथ्या घेऊन त्यातच आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत बसली आहे. लिखाण आटलेले म्हातारे लेखक साहित्यसंमेलनं, त्याच्या विनोदी पाचकळ निवडणुका, त्यातली राजकारणं आणि माकडचाळे करत बसले आहेत. एखादा सच्चा लेखक म्हातारा होऊन संपूर्ण मरायला टेकला की मग काही दिवस त्याच्या पालख्या नाचवणारा आपला मराठी समाज आहे.

ह्या विस्कळीत काळातच नव्याने जन्मलेलं लिखाण आता हळूहळू तयार व्हायला हवं आहे. तुमचा काळ जसा एकसंध काळ होता तसा माझा नाही. हा तुमच्या आणि माझ्या लिखाणातला फरक असणार आहे. तुम्ही माझ्यापेक्षा थोड्या बऱ्या काळामध्ये जगलात. विरोध का होईना, पण तो तरी सजगपणे करायची शुद्ध समाजामध्ये होती.

ह्या अगडबंब आणि गोंगाटाने भरलेल्या समाजामध्ये बिळांमध्ये राहून लेखक लिहीत आहेत. ते थोडे आहेत आणि विखुरलेले आहेत. त्यांच्यातले बरेचजण संपत चालले आहेत आणि नवे लेखक तयार होण्याचं वातावरण आजूबाजूला नाही, कारण तडाखेबंद खपाचे लेखक सोडल्यास इतर कुणी लिहिलेलं वाचायची सवय आपण एकमेकांना लावलेली नाही. कुणी वाचावं म्हणून लिहिलं जात नाही हे खरं आहे, पण अतिशय योग्य वेळ साधून मोठ्या दैवी हुशारीने तुम्ही काढता पाय घेतला आहे.

लेखकाच्या मनात काय चालतं, लिखाणाची प्रक्रिया काय, लिहिण्यामागचं आणि न लिहिण्यामागचं कारण काय, ह्या विषयांवर तुम्ही सतत बोलत असायचात. शेवटच्या काही दिवसात थोडं जास्तच.

एकदा मध्यरात्री मला फोन करून तुम्ही म्हणाला होतात की, तुमच्या मनात झरझर काही सुचत जात आहे, डोकं चालू आहे पण शरीर अजिबात साथ देत नाही, लिहायला घेतलं तर बोटं थरथरतात, कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे अजिबात बघवत नाही. त्यावेळीसुद्धा तुम्ही सांगून मी तुमच्या मनातलं उतरून घेणं तुम्हांला मान्य नव्हतं. लेखन ही अत्यंत खाजगी आणि शारीरिक स्तरावरची गोष्ट आहे. टेपरेकॉर्डरवर एकांतात बोलून ते कुणाला उतरून घ्यायला देण्याचीही तुमची तयारी नव्हती. तुमच्यासाठी तसं करणं म्हणजे लेखनच नव्हतं. शेवटच्या पंधरा दिवसांत तुम्ही लिखाण थांबवलं होतं. पण तुम्ही अव्याहत लिहीत होतात. मनात. माझी माणसांशी मैत्री होणार असली तर फार चटकन होते. तुमच्याशीही झाली. तुमचा दबदबा होता. तुमच्या तीक्ष्ण आणि धारदार बुद्धीचं आकर्षण होतं. कुणाशी तयार होणारं नवं नातं आधी आकर्षण, मग बाहेरून होणारा विरोध, संकोच, माफक संशय असे टप्पे पार पाडत पाडत मग शांततेकडे जातं. तुम्ही आपलं नातं आपसूकच शांत टप्प्यावर वळवलं होतंत. कारण तुम्हांला वय नव्हतं. कोणतीही असुरक्षितता न बाळगता ,’माझ्या वयामुळे मला सन्मान द्या’ असे बालिश आग्रह तुम्ही धरत नसा. तुमच्याशी भांडता येत असे.

माझ्यासारखी बरीच तरुण मुलं तुमच्या सतत आजूबाजूला होती. प्रत्येकाशी तुमचा स्वतंत्र असा बौद्धिक व्यवहार होता. ज्यांच्याभोवती असं काही नव्हतं त्या माणसांनी अनेकदा तुमच्याविरुद्ध आमच्यापैकी प्रत्येकाला सावध केलं होतं. आमच्याबरोबर तुम्ही फिल्म फेस्टिवल्सना चित्रपट पाहत असा, आम्ही लिहिलेला शब्द आणि शब्द मन लावून वाचत असा. तुमच्या वाचनात आलेली अद्ययावत पुस्तके आणि लेखक ह्यांची आमच्याशी ओळख करून देत असा. आता ह्या सगळ्याचं आम्ही काय करणार आहोत?

आमच्याच पिढीचं असलेलं तुमचं कुटुंब तुम्ही गमावून बसला होतात. पण त्याविषयीची कोणतीही कणव तुमच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात शेवटपर्यंत नव्हती. तुमच्या स्वभावाप्रमाणेच तुमच्या आठवणीही भावुकपणे येत नाहीत. त्या तटस्थ असतात. बरेच वेळा मला तुमचा चेहरा न दिसत आवाज ऐकू येत राहतो. माझ्याकडे तुमचं हस्ताक्षर नाही.

तुमचं आयुष्य लिहिण्यात संपलं. लिहिणं आवडायला लागल्यापासून तुम्ही आयुष्यभर लिहीत होतात. मिळेल तसं, मिळेल तेव्हा. घरात कुटुंबाचा कोलाहल वाढला की सार्वजनिक बागेतल्या बाकावर बसून लिहायचात. रात्रीअपरात्री स्वयंपाकघराचं दार ओढून, दिवा जाळत लिहीत राहायचात. आजारपणातही लिहीत होतात. असं म्हणतात की तुम्ही लोकप्रिय लेखक होतात. तुम्ही कोणत्या समाजाला प्रिय होतात? तुम्हांलाही हे माहिती आहे की समाजातल्या बऱ्याचजणांना तुम्ही प्रिय नव्हतात. तुमच्या मनस्वी लिखाणाची किंमत तुम्हांला मोजायला लागली. ह्या समाजानेच ती तुम्हांला मोजायला लावली. तुमच्यावर चपला फेकून, तुमच्यावर खटले भरून, तुम्हांला सतत अस्वस्थ ठेवून आणि तुमच्याबद्दल सतत असुरक्षित राहून.

आपण ज्याला साधा भोळा मध्यमवर्गीय समाज म्हणतो, तो समाज त्याचे नियम ओलांडले तर एकतर तुम्हांला अनुल्लेखाने ठार मारतो किंवा झुंडीने एकत्र येऊन आरडाओरडा करून शरीराशिवाय तुम्हांला मारतो.

मागे वळून कढ काढत बसण्याचा तुमचा स्वभाव नव्हता. पण फार मोजक्या वेळी तुम्ही एखादे नाटक – एखादे पात्र कसं सुचलं ह्यावर बोलायचात. ‘अशी पाखरे येती‘मधली सरू सध्या तुम्हांला राहून राहून आठवत होती. सरूविषयी बोलताना तुम्ही मायेने हसायचात आणि तुमच्या डोळ्यांत ते हसू रेंगाळायचं. तुमच्या बहुतेक सर्व पात्रांना तुम्ही भेटला होतात. ह्या पात्रांनी तुम्हांला अंधारात दिवा दाखवला होता का?

तुम्ही लिहीत होतात. मी लिहितो. मला अजूनही मी का लिहितो ह्याचं कारण पूर्णपणे उमगलेलं नाही. पण मी निर्माण केलेल्या मोजक्या पात्रांनी मला अंधारात दिवा दाखवत ठेवलेला आहे. मी जर कधी दुसरं टोक नसलेल्या बोगद्यात शिरलो, तर इतर कुणाहीपेक्षा मला माझी पात्रं आठवतात. एरवी मी त्यांना विसरून गेलो असलो तरी मध्येच अश्या वेळा येतात की त्यांचं भान येतं. अनेकप्रसंगी ती पात्र साकारणाऱ्या नटांचे चेहरे आठवतात की ती पात्र आठवतात? मला अनेकवेळा काही कळेनासं होतं.

आज तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये रात्रींमागून रात्री गप्पा मारल्यावर मला हळूहळू हे लक्षात आलं आहे की मला लिहायला आवडतं. मला दुसरं काहीही करता येणार नाही. लिहिण्याइतकं तापदायक आणि आनंददायी दुसरं काहीही नाही. आपण अजिबात न बोलता त्या वहीमध्ये तासन्‌तास गप्पा मारायचो. तुमच्या शरीराला जोडलेल्या यंत्रांचा बारीक आवाज चालू असे रात्रभर. एखाद्या गोष्टीबाबत तुम्हांला संभ्रम असला किंवा बोलायचं नसलं तर तुम्ही एक प्रश्नचिन्ह काढून माझ्यासमोर धरत असा. अतिशय तल्लख, बुद्धिमान, लोकप्रिय आणि सामाजिक दबदबा असणार्‍या लेखकाची नियती त्या प्रश्नचिन्हात होती.

तुमच्या शरीराचे हालहाल होत होते. पहाटे कधीतरी मला जवळ बोलावून तुम्ही म्हणायचात की, मला इन्जेक्शन देऊन मारून टाक. अतिशय चेतनामय मन आणि दुबळं शरीर यांमुळे तुमची तडफड होत होती. अश्या वेळी मी घाबरून आयसीयूच्या कोपऱ्यात लपून बसायचो आणि माझा मला कशाचाच अर्थ कळेनासा व्हायचा. काहीतरी करून मला तुम्हांला समर्पक उत्तर द्यावं असं वाटायचं, पण काही कळत नसे. अश्या अवस्थेत न जगता, हे सगळं थांबवून मोकळं व्हावं, ही तुमची इच्छा मला खरंतर पूर्णपणे पटत होती. रात्री राउंडला आलेल्या डॉक्टरांना तुम्ही विचारायचात, ”मी यातून कधी बरा होणार? मी पूर्वीसारखा काम करू शकणार का? लिहू शकणार का? असं असेल तरच मला जगवा".

तुम्ही ओरहान पामूकच्या पुस्तकाच्या ज्या पानामध्ये बुकमार्क घालून झोपला होतात, त्यात नोबेल पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेलं भाषण होतं. ते भाषण तुमचंही आहे आणि माझंही आहे.

I write becasue I can not do normal work like other people. I write because I want to read books like the ones I write. I write because I am angry at all of you , angry at everyone. I write because I love sitting in a room all day writing. I write because I only partake in real life by changing it. I write becase I want others, all of us, the whole world, to know what sort of life we lived and continue to live in Istanbul, in Turkey. I write because I love the smell of pen, paper and ink. I write because I believe in literature, in the art of the novel more than I believe in anything else. I write because it is a habit, a passion. I write becasue I am afraid of being forgotten. I write becasue I like the glory and interest that writing brings. I write to be alone. Perhaps I write because I hope to understand why I am so very very angry at all of you, so very very angry at everyone. I write because I like to be read. I write because once I have begun an essay or a page or a novel I want to finish it. I write becasue everyone expects me to write. I write because I have childish belief in the immortality of libraries and in the way my books sit on the shelves. I write becasue it is exciting to turn all of life's beauties and riches into words. I write not to tell a stroy but to compose a stroy. I write because I wish to escape from a foreboding that there is a place I must go but just as in a dream, I can not quite get there. I write becasue I have never managed to be happy. I write to be happy.

तुम्ही गेलात नि काहीच दिवसात तुमच्याशी माझी गाठ घालून देणारा आपला मित्र चेतन दातारही गेला. चेतन गेला तेव्हा तुमच्या-माझ्यातला काहीतरी दुवा निसटला, असं माझं मन मला सांगत राहिलं. मी गेले काही दिवस कामामध्ये स्वतः ला बुडवून घेतलेलं आहे. पण खरं सांगायचं तर माझं मन अतिशय अस्वस्थ आहे. तुमच्याशी चालू असलेला माझा संवाद तुमच्या जाण्यानंतरही अखंडपणे माझ्या मनात चालूच राहिला. आपल्यातला कोणताही दुवा निसटून जाऊ नये म्हणून मी आज हे सगळं तुम्हांला लिहीत आहे. फार न बोलता कागदावर उतरवण्यावर आपल्या दोघांचाही विश्वास आहे म्हणून.

तुम्ही जाताना ओरहानशी माझी ओळख करून दिलीत. त्याच्या कादंबरीत मला सापडलेलं हे वाक्य .

Every man’s death begins with the death of his father.

***

The permission granted by The Nobel Foundation and Faber and Faber Limited, London to use an excerpt from Mr. Orhan Pamuk's Nobel Prize Address is gratefully acknowledged.

***

पूर्वप्रसिद्धी - 'आशय' (दिवाळी - २००८); 'लोकसत्ता' (२००९ ; आभार - श्री. कुमार केतकर, श्री. श्रीकांत बोजेवार)

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. सचिन कुंडलकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

सुरेख लेख! अगदी आवडला.
कुठले एक वाक्यं अधोरेखित करायला गेले तर अर्धा पाऊण लेखच अधोरेखित होईल.

<<तुम्ही माझ्यापेक्षा थोड्या बऱ्या काळामध्ये जगलात. विरोध का होईना, पण तो तरी सजगपणे करायची शुद्ध समाजामध्ये होती.>>

खरं आहे.

<<आमच्याबरोबर तुम्ही फिल्म फेस्टिवल्सना चित्रपट पाहत असा, आम्ही लिहिलेला शब्द आणि शब्द मन लावून वाचत असा. तुमच्या वाचनात आलेली अद्ययावत पुस्तके आणि लेखक ह्यांची आमच्याशी ओळख करून देत असा. आता ह्या सगळ्याचं आम्ही काय करणार आहोत?>>

ही अशी गोड मराठी हल्ली दुर्मिळ झालीय. तुम्ही करत असा ऐवजी सरधोपट 'तुम्ही करायचात' अशी वाक्यरचना होते हल्ली.
हल्ली 'असा' हा शब्द भूतकाळदर्शकापेक्षा बर्‍यापैकी विद्यर्थी अर्थाने वापरला जातो.
मला त्यामुळेच लेखातली ही भाषा खूपच भावली.

कुंडलकरांचे पूर्वीचे दोन लेख भाषेसाठी आवडले होते पण त्यांतल्या विचारांसाठी नाही. हा लेख मात्रं भाषा, विचार अश्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला.
शीर्षकही आवडले.

सचिनइतके नाही पण थोडेसे तेंडुलकर वाट्याला आले होते त्यामुळे सचिन काय म्हणतोय ते फारच पोचलं.

मराठीबद्दल साती +१

लेख मनापासून आवडला.

भाषेबद्दल अनुमोदन- काहीकाही वाक्यं अगदी तालासुरात ऐकू आली, इतकी सुरेख आहेत.

धन्यवाद इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल.

अतिशय सुंदर. ही लेखक मंडळी कसे काय असे अचुक लिहु शकतात याचे खुप आश्चर्य वाटत राहते.

लेख समयोचित आहे असेही वाटले पण असो.

सो स्वीट. आवड्ते लेखक व त्यांचे लिखाण. त्यात ते प्रियाचे बाबा.... तिचे लेखनही खूप आवडायचे. ही अशी स्वगतं आवड्त्या माणसांबद्दल मनात कायम उमटत असतात.

फार सुरेख!

तेंडुलकरांबद्दल लिहितानाच लेखक आणि लिखाण या संदर्भात जी भाष्य करतो कुंडलकर ती पुन्हा पुन्हा वाचावी आणि तरीही काही कळायचं राहून जावं अशी.

मस्तच..
हे सगळे लेख वाचताना कुंडलकर यांचे अजुन लिखाण वाचायची इच्छा होत आहे..
कोबाल्ट ब्लु कस आहे?
मराठी कि इंग्रजी मध्ये आहे?

लेख आवडला. तेंडूलकर लोभस होतेच, तसेच या लेखात उतरले आहेत.

लेखाच्या प्रारंभाबद्दल मात्र मला शंका आहेत.

अंतिम संस्कार करताना डॉक्टरचे सर्टीफिकेट लागते, नगरपालिकेचे नाही. ते नंतर जन्म मृत्यू नोंदणी अधिकार्‍याकडून घेता येते. त्यामूळे ते देताना तिथला कारकून असे प्रश्न विचारेल याची शक्यता कितपत आहे ? ( पुण्यात वेगळे नियम आहेत का ? ) हा भाग मला कृत्रिम वाटला आणि सनसनाटी सुरवात करण्यासाठी केला असेल, तर अनावश्यकही

दिनेश, इतरत्र माहित नाही पण पुण्यात वैकुण्ठ ला नेण्याआधी मनपाचा पास काढावा लागतो.कुण्डलकरांनी बरोबर लिहिले आहे. सनसनाटी कसली त्यात?

हा असा पास बंधनकारक करण्यामागे काय कारण आहे?
अशा प्रसंगात आणखी वेळखाउ सरकारी कागदपत्र घेण्याची धावपळ करायला लावणे कितपत योग्य आहे?

हा लेख फार आवडला. मुख्य म्हणजे काही सन्दर्भात रिलेट झाला.

काही काही वाक्य अप्रतिम उतरलित

दिनेश, तुम्ही म्हणताय ते डेथ सर्टिफिकेट!
ते लोकल ऑथॉरिटी बॉडीकडून चार पाच दिवसांनंतर मिळतं.
इथे उल्लेखलेला आहे तो अंतिमसंस्कार करायला लागणारा पास असावा बहुतेक.
तो स्मशानभूमीजवळ मिळतो.
मोठ्या शहरांत आवश्यक आहे.

आमच्यासारख्या लहान गावांत लागत नाही. केवळ डॉक्टरचे डेथ सर्टीफिकेट चालते. (खरे तर त्याचीही गरज पडत नाही)

ओके, मला फक्त शंका आली, कारण मुंबईत काही वर्षांपुर्वी पर्यंत ( माझ्या वडीलांच्या निधनापर्यंत तरी ) लागत नव्हता. आणि लेखातही डेथ सर्टीफिकेट हा शब्द आहे.

<<<<<<<कुंडलकरांचे पूर्वीचे दोन लेख भाषेसाठी आवडले होते पण त्यांतल्या विचारांसाठी नाही. हा लेख मात्रं भाषा, विचार अश्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला.
शीर्षकही आवडले.>>>>> + १
मनाला भिडला हा लेख.... धन्यवाद चिनुक्स येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल....

Pages

Back to top