" गट्टु भाग-३"

Submitted by संतोष वाटपाडे on 1 June, 2015 - 09:02

लहान मुलांना फ़ार लवकर कंटाळा येतो कुठल्याही गोष्टीचा. त्यात जर एखादी गोष्ट करताना चिडचिड होत असेल तर विचारालाच नको. गारगोट्या रांगेत लावून थकली होती गट्टु. लावता लावता काही गोट्या गडबडत दूर जात होत्या. रांगत जाऊन त्यांना पुन्हा एकत्र ठेवताना तारांबळ उडत होती तिची. मी मधे हात घातला तर तेही आवडत नव्हते. शेवटी अगदीच असह्य होऊन तिने पायाने सगळ्या गारगोट्या लाथाडून दिल्या आणि माझ्या पसरलेल्या पायांवर पालथी झोपली. खुप गंमत वाटत होती लाडुबाईची. मी तिच्या पाठीवर हात फ़िरवताना फ़ुगलेल्या गुलाबी गालांकडे एकटक पहात होतो. मला गट्टु रडल्याचे कधी आठवलेच नाही. एकदा फ़क्त आईची घरकामातली स्लीपर पायात घालून घरात फ़िरत असताना पडली होती हॉलच्या आणि किचनच्या मधे. आणि नेमके त्याच वेळेला मळ्यातून दोन तीन भाऊबंद आलेले होते नानांशी गप्पा करायला. त्यांच्यासमोर तिला खुप अपमानास्पद वाटले असेल कदाचित. एक तासभर हुंदके देऊन देऊन रडत होती गट्टु. त्यानंतर नाही रडली कधी. कितीही राग आला तरी फ़क्त गालाचे फ़ुग्गे फ़ुगवून बसून राहते खाली मान घालून वेडुबाई.
पाठीवर फ़िरणार्‍या माझ्या हळुवार हाताच्या स्पर्शाने तिचे डोळे आता बोलायला लागले होते. माझ्याकडे बघता बघता पेंगायला लागली होती हळूहळू. पिलाला थापटताना आईला काय सुख मिळत असेल याचा अनुभव घेत होतो. डोळ्यावर झोप होती तरी तिने माझ्या दोन्ही पायांना घट्ट पकडून ठेवले होते.

माधवीचे किचनमधले सर्व काम उरकले. ओले हात साडीच्या पदराला पुसत ती दबक्या पावलांनी हॉलमधे आली. माझ्या पायांवर झोपलेलं पिलु पाहून हसु येत होतं तिलाही. पण माझ्या पायाला मुंग्या आल्या म्हणून मी डोळ्यांनी खूणवून तिला उचलायला सांगितले. माधवी खाली वाकून गट्टुला उचलणार तेवढ्यात तिची लांबसडक वेणी माझ्या चेहर्‍याला स्पर्श करुन गेली. माधवीची वेणी ओढल्यानंतर ती खुप रागावते हे मला माहित होते तरीही मोह न आवरल्याने मी ओढलीच वेणी हळूच. "आई..ग्गं" किंचाळली ती नकळत....गट्टुची झोप मोडली तिच्या आवाजाने...उचलून घेतल्याबरोबर गट्टु माधवीला अगदी पटकन बिलगली. आईचा स्पर्श मुलं किती पटकन ओळखतात!! मी माधवीकडे हसून बघत होतो...आज ती चिडली नव्हती...कारण शनिवारचा काही वेळ माझ्यासोबत घालवावा अशी तिचीही मनोमन इच्छा होती.

गट्टुला खांद्यावर घेऊन नानांची चाहूल घेण्यासाठी माधवी दाराकडे गेली. लोखंडी फ़ाटकाचा आवाज कानावर आल्याबरोबर माधवीने वळून मला वाकुल्या दाखवल्या. मी कळून चुकलो होतो कुणीतरी आलंय. वरच्या खोलीत जाण्याच्या माझ्या इराद्यावर पाणी फ़िरणार असे दिसत होते. ."काय करतेय गट्टु..झोपली कि काय" दुरुन आवाज आला. शेजारच्या गल्लीतल्या कुलकर्णीकाकू आल्या होत्या. वयाने अगदीच काही जास्त नव्हत्या पण लहानसहान मुले त्यांना काकू म्हणायची म्हणून आम्हीही सगळे काकूच म्हणायचो त्यांना. काकू त्यांच्या बंगल्यात नर्सरी स्कूल चालवत होत्या. त्यांचे यजमान एल आय सी ऑफ़िसमधे कोणत्यातरी पोष्टवर होते. मी कधी विचारले कारण हे एल आय सी वाले कधी गळ्यात पडतील याचा भरोसा नसतो. कॉलनीतली सगळीच लहान मुले काकूंकडे जमायची सकाळच्या वेळी. त्यांच्या बागेत खेळणीही बरीच होती खेळण्याकरता.

गट्टु मान वर करुन त्यांच्याकडे पहात होती. मीही उठून दारात गेलो.माधवीने गट्टुला माझ्या कडेवर दिले.आता गप्पा रंगणार याचा अंदाज आला होता मला. नाना झोक्यावरुन उठले. हातातल्या पेपरची व्यवस्थित घडी करुन टीपॉयखाली टेवला. तोवर काकू हॉलमधे येऊन सोफ़्यावर बसल्या होत्या. माधवीने स्टीलच्या गोल ग्लासात त्यांना पाणी दिले प्यायला. गट्टुला मांडीवर घेऊन मी समोर बसलो त्यांच्या. दोन डोळे माझ्याकडे रोखलेले होते हे कळायला उशिर लागला नाही. "गट्टु नीट बैस बाबांच्या मांडीवर....बाबांना जास्त त्रास देऊ नकोस" टोमणा कानावर आला. मी समजायचे ते समजून घेतले. कुण्या स्त्रीसोबत मी अघळपघळ गप्पा मारायला सुरुवात करण्याआधीच अशी सुचना आकाशवाणी झाल्यासारखी कानावर ढम्मकन आदळते. पाय गोळा करुन सभ्य माणसासारखा मी बसून राहिलो समोर. नानांनीच विषयाला हात घातला. "संतोषचे अजून हो नै चाललंय....तुम्हीच सांगा त्याला काय ते"....गॅसवर चहाचे आंदण ठेवून माधवी माझ्याशेजारी येऊन बसली होती. गट्टुला उचलून स्वतःच्या मांडीवर घेईन असे वाटले होते मला...पण नाही घेतले शहाणीने....बराच वेळ काकु काही काही समजावून सांगत होत्या मला...सर्व डोक्यावरुन गेले...कळले ते एकंच कि "तुमची गट्टु मला खुप आवडते तिला माझ्याकडे खेळायला पाठवा"

आमचा सर्वांचा आवाज ऐकुन वरच्या मजल्यावरुन आई जिना उतरत खाली आली. आईला पाहिल्याबरोबर गट्टुचे दोन्ही हात वर झाले. आईकडे जाण्यासाठी गट्टु नेहमीच उत्सुक असते. आईने तिला उचलून घेतले आणि कुलकर्णीकाकूंच्या शेजारी जाऊन बसली. काकूंना खुप आवडायची गट्टु. त्यामुळेच त्यांचा हट्ट चालला होता कि दिवसातून काही वेळ तरी तिला पाठवाच नर्सरी स्कूलमधे. घरात मी एकटा विरुद्धपक्षात होतो त्यामुळे लवकर माघार घेऊन मी तयार झालो गट्टुला काहीवेळ काकुंकडे पाठवायला. एव्हाना सर्वांचीच चहाची वेळ झाली होती. माधवीने ट्रेमधे चहाने भरलेले बुटके बुटके कप आणुन टिपॉयवर ठेवले. बुटक्या कपांचा इतिहास आहे जरासा. सांगेन कधीतरी नंतर. पाहुणे वगैरे घरी आल्यानंतर खास हे कप काढले जातात आमच्याकडे. सुंदर नक्षी असलेले पण कमी चहा बसेल अशा पद्धतीने बनलेले हे कप होते.

प्रत्येकाच्या हातात कप देऊन तीही चहा घेऊन बसली. आईच्या मांडीवर बसलेल्या गट्टुचे काय काम चालले असेल ओळखा....!!! येस्स आईचे मंगळसुत्र हातात पकडून तीने वाट्या ओठात पकडल्या होत्या. अशा गर्दीत तिला चांगलेच फ़ावायचे. इवल्या इवल्या बोटात अडकलेले मंगळसुत्र ओले होऊन जायचे पण ही काही सोडत नव्हती. पुढचे दात खारुताईसारखे काही न काही चावायला मागतात कि काय कोण जाणे!!! चहा पिऊन झाल्यावर कुलकर्णीकाकू उठल्या. गट्टुच्या गालावर हात फ़िरवत त्यांनी तिला लाडाने गोंजारले.त्या बाहेर निघाल्या तर माधवी त्यांना सोडायला अगदी लोखंडी गेटपर्यंत गेली.हळू आवाजात काय बोलल्या कळले नाही पण येताना माधवी हसत होती. या बायकांच्या हसण्यावर खरोखर पी.एचडी करायला पाहिजे. काहेच विजयमिश्रित, संभ्रमित, सौख्यपुर्ण लाजाळू स्मित म्हणू या हसण्याला.. मी दरवाजा अडवून उभा होतो....असली संधी सहसा सोडत नाही...माधवी दारात आल्यावर तिचे गाल ओढायचेच असे ठरवले होते. नशीब कधी कधी साथ नाही देत....लोखंडी फ़ाटकापासून थोडं पुढं आल्यावर किचनमध्ये जायला एका दरवाज ठेवलाय....ती भामटु पटकन त्या दाराने आत शिरली....पोपट झाला माझा पुन्हा एकदा...

उतरलेला चेहरा लपवत मी आईशेजारी सोफ़्यावर बसलो. गट्टु बरीच फ़्रेश झाली होती... आमच्या दस्तुरखुद्द बेगमसाहेबांना अबोलीचा गजरा हवा होता बर्‍याच दिवसाचा...पण ऑफ़िसहून येताना रोज उशिर होतो मला यायला....आज त्यांना खुश करायची संधी दवडणार नव्हतो मी.....गट्टुला देवघरातून मी फ़ुलांची परडी आणायला सांगितली....आवडीचे काम करायला मिळेल म्हणून दुडुदुडु धावत जाऊन छोटीशी परडी घेऊन आली गट्टु. मी वर्‍हांड्यातल्या चप्पलबॉक्सवर बसून तिची वाट बघत होतो. खुप मोठं ओझं असल्यासारखी पायर्‍या उतरून ती खाली आली. तिच्या आवडीचे मिकीमाऊस सॅंडल्स तिच्या पायात घालून उठेपर्यंत परडी घेऊन गट्टु बागेकडे जायला निघालीही होती. दाराजवळ टांगलेली बागेच्या फ़ाटकाची चावी घेऊन मीही छोट्या गेटमधून रोड वर आलो. गट्टु एक्सप्रेस फ़ाटकाजवळ थांबून माझी वाट बघत होती..कुलुप खोलून मी वॉलकंपाऊंडच्या कोपर्‍यावर उभ्या दुधी रंगाच्या गोलाजवळ ठेवले. रात्रीच्या अंधारात हे चारही कोपर्‍यातले हे गोल लाईट खुप छान दिसतात.

फ़ाटक लोटून आत गेल्याबरोबर खाली जमिनीवर पसरलेल्या फ़ुलझाडांची रंगीत फ़ुले गट्टु बोटात पकडून तोडायला लागलीबागेत खेळताना नेहमीच या फ़ुलांजवळ जायला तिला बंदी असते. आता मात्र पुर्ण बाग तिच्या हाताखालून जाणार होती..." बाळा ती फ़ुलं नाही घ्यायचीत..." बस्स एक वाक्य पुरेसं होतं....उठली लगेच ती...इतकं शहाणं बाळ खरंच आजवर मी कुठे पाहिलं नाही. अबोलीची झाडे तारकंपाऊंडला खेटून लावलेली होती आईने. मी जवळ जाऊन काही फ़ुले गट्टुला तोडुन दाखवली. एका हातात परडी घट्ट पकडून दुसर्‍या हाताने गट्टु अबोलीची फ़ुले झाडावरुन काढत होती. काही निळीगार पानेही चुकून हातात येत होती. अबोलीची झाडं फ़ारशी उंच वाढलेली नव्हती त्यामुळे सर्व फ़ुलं अगदी हाताजवळ मिळत होती गट्टूला. अगदी मन लावून ती एकेक फ़ुल परडीत टाकत होती. एखादं फ़ुल चुकून जमिनीवर पडलेच तर लगेच ते उचलून हाताने झटकून पुन्हा परडीत टाकायची लगबग होती.. फ़ुलांवरुन उडणार्‍या काळ्या भुंग्याची मात्र तिला भिती वाटायची खुप. दूरुनही त्या भुंग्याचा आवाज यायला लागला कि ही इकडे तांडव करायला सुरुवात करते. एकदा तिच्या पांढर्‍या बंडीला भुंगा चिकटला होता. त्याचे टोकदार पाय बंडीमधुन गट्टुच्या पोटाला टोचले होते तेव्हापासून ती भुंग्याला खुप घाबरते . (क्रमश:)

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श्श्श!!!

आणि आधीच भानुप्रिया एवढं मोठ्ठं नाव असताना त्याला अजून एक 'जी' नका लावू, प्लीज!