माबोवरील अनेक लेखकांच्या कविता / गझला मला खुप आवडतात.
माझ्यासारखीच आवड असणा-या मित्रांना आणि ओळखितील ईतरांसोबत, ही कला वाटावी असे मला वाटते.
ब-याचवेळा या कलेवर आम्ही, आमच्या अल्पमतीने थोडीफार चर्चाही करतो.
ईथे कला म्हणजे लेख, कथा, कविता, गझल, पा.कृ किंवा प्रकाशचित्र अपेक्षीत आहे.
यामधे पेटेंटेड किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठिचे कॉपीरायटेड मटेरीयल जसे की पी.एचडी संदर्भातले लेखन किंवा एखाद्या संशोधना संबंधी कॉपीरायटेड लेख अपेक्षीत नाही.
प्रत्येक कला ही त्या कला निर्मात्यासाठी अपत्याप्रमाणेच असते आणि ती निर्माण करताना निर्मात्याला प्रसवकळा या भोगाव्या लागतात ही जाणीव, एक वाचक म्हणून मला आहे.
म्हणूनच ही कला माझ्या मित्रांसोबत ईमेल ने शेअर करताना मी नेहमी त्याची माबोवरील लिंक आणि कला निर्मात्याचा माबो आय.डी आवर्जुन लिहित असतो.
पण मध्यंतरी, अनेक वेळा माबोवर असा मुद्दा उपस्थित करण्यात आला की,
जरी मुळ कला निर्मात्याचे नाव / माबो लि़ंक दिली असली तरी, शेअर करणा-याने जोपर्यंत कला निर्मात्याची स्पष्ट (explicit) परवानगी घेतलेली नाही, तोपर्यंत त्याने ती कला शेअर करु नये.
यातला, स्वतःच्या वेब साईट वर किंवा ब्लॉग वर विना परवानगी शेअर करू नये हा मुद्दा बरोबर आहे आणि तो मला पटला.
पण ई-मेल / फेसबुक व त्याप्रकारच्या ईतर "सोशल मिडिया" प्रकारात मोडणा-या माध्यमातून शेअर करताना, हे असे explicit परवानगी घेणे प्रत्येकाला - प्रत्येकवेळेला शक्य असते का? त्यात जर "लिखित"च हवे असेल तर तेवढा वेळ आणि संसाधने कोणाकडे आहेत? असली तरी ती तशी प्रत्येकवेळेला असतात का? हे असे सोशल मिडीयातून - मुळ कला निर्म्यात्याचा / कलेच्या मुळ स्रोताचा (वेब साईट लि़ंक वगैरे) योग्य तो उल्लेख करुन - समविचारी मित्रांसोबत कला शेअर करण्यात काय चूक आहे? अशी कला जी आधीच आंतरजालावर विनामुल्य उपलब्ध होती - जसे की माबोवरील कविता / गझल ई.
कला निर्मात्यांसाठी:
आपल्याला जर असे मुळ कला निर्म्यात्याचा / कलेच्या मुळ स्रोताचा (वेब साईट लि़ंक वगैरे) योग्य तो उल्लेख करुन साहित्य शेअर करण्यात काही अडचण वाटत नसेल, तर आपण http://creativecommons.org/choose/ इथे जाउन योग्य तो परवाना निवडु शकता आणि तो परवाना आपल्या प्रत्येक लेखनात टाकू शकता.
Creative Commons ही एक ना नफा संस्था आहे आणि हा परवाना सार्वजनीक वापरासाठी विनामुल्य उपलब्ध आहे.
यामधे आपल्याला एक लोगो, परवान्याचे एका ओळीत स्पष्टीकरण आणि तपशीलवार परवान्याचा स्रोत (लिंक) मिळते.
ते आपण आपल्या लेखात / ब्लोगवार HTML कोड स्वरुपात किंवा लोगो आपल्या प्रकाशचित्रात वॉटरमार्क स्वरुपात टाकू शकता.
क्रियेटीव कॉमन्स परवान्याचे प्रकार याप्रमाणे आहेतः
१. कला शेअर करु शकतो पण (विनापरवानगी) त्यावर आधारीत (derivative) नवी स्वतंत्र कला तयार करू शकत नाही आणि या कलेचा (विनापरवानगी) व्यावसाईक वापर करु शकत नाही.
२. कला शेअर करु शकतो पण (विनापरवानगी) त्यावर आधारीत (derivative) नवी स्वतंत्र कला तयार करू शकत नाही पण या कलेचा व्यावसाईक वापर करु शकतो.
३. कला शेअर करु शकतो आणि त्यावर आधारीत नवी स्वतंत्र कला तयार करु शकतो पण मुळ कलेचा किंवा या नवीन स्वतंत्र कलेचा व्यावसाईक वापर करु शकत नाही.
४. कला शेअर करु शकतो आणि त्यावर आधारीत नवी स्वतंत्र कला तयार करु शकतो त्याचबरोबर मुळ कलेचा किंवा या नवीन स्वतंत्र कलेचा व्यावसाईक वापर करु शकतो.
५. कला शेअर करु शकतो आणि त्यावर आधारीत नवी स्वतंत्र कला तयार करु शकतो पण मुळ कलेचा किंवा या नवीन स्वतंत्र कलेचा व्यावसाईक वापर करु शकत नाही. तसेच मुळ कला किंव यावर आधारीत नवी स्वतंत्र कला ही अगदी याच परवान्याने सार्वजनीक केली जाईल(Release with same license in Public Domain).
६. कला शेअर करु शकतो आणि त्यावर आधारीत नवी स्वतंत्र कला तयार करु शकतो व मुळ कलेचा किंवा या नवीन स्वतंत्र कलेचा तोपर्यंतच व्यावसाईक वापर करु शकतो जोपर्यंत ही मुळ कला किंव यावर आधारीत नवी स्वतंत्र कला ही अगदी याच परवान्याने सार्वजनीक केली जाईल(Release with same license in Public Domain).
अधिक माहितीसाठी, इथे पाहा http://creativecommons.org/licenses/
जर माबोवरील कथा लेखकांनी आणि कवींनी त्यांच्या कथा , कविता किंवा गझलेत हा परवाना दिला तर, माझ्यासारख्या वाचकांना ते साहित्य शेअर करणे सोपे जाईल.
तुमच्या सगळ्याच कलाकृतींना एकच परवाना देणे बंधनकारक नाही.
तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या लेखांना / कवितांना वेगवेगळे परवाने देऊ शकता.
हे परवाने आंतरजालीय चोरी रोखण्यासाठी नाहीत.
पण ज्या वाचकांना शुद्ध हेतुने तुमची कला शेअर करायची आहे त्यांच्यासाठी सोय आहे आणि ही सोय हा या परवान्यांमागच्या अनेक हेतुंमधील केवळ एक हेतु आहे.
यावर माबोवरील कला निर्मात्यांची मते काय आहेत ते जाणुन घ्यायला आवडेल.
स्पॉक, लेख समर्पक आहे. चर्चा
स्पॉक,
लेख समर्पक आहे. चर्चा वाचण्यास उत्सुक!
आ.न.,
-गा.पै.
पण ई-मेल / फेसबुक व
पण ई-मेल / फेसबुक व त्याप्रकारच्या ईतर "सोशल मिडिया" प्रकारात मोडणा-या माध्यमातून शेअर करताना, हे असे explicit परवानगी घेणे प्रत्येकाला - प्रत्येकवेळेला शक्य असते का? त्यात जर "लिखित"च हवे असेल तर तेवढा वेळ आणि संसाधने कोणाकडे आहेत? असली तरी ती तशी प्रत्येकवेळेला असतात का? <<<
ही कारणे निरर्थक वाटतात. कुणी एखादी कलावस्तू निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतलेत आणि तुम्हाला शेअर करण्यासाठी परवानगी घेण्याचे घेण्याचेही मोठे कष्ट वाटतायत. ही कारणे आळशीपणा, दुसर्याच्या कष्टांबद्दल बेफिकीरी असं बरंच काही दर्शवतात. नो सहानुभूती.
शेअर करणे म्हणताना वस्तू उचलून दुसरीकडे चिकटवणे की वस्तू जिथे आहे त्या जागेचा पत्ता म्हणजे लिंक देणे यावरही बरेच अवलंबून आहे.
बाकी वैयक्तिकरित्या सांगायचे तर मी क्रिएटिव्ह कॉमन्सचा कुठलाच सबगोलांकार परवाना देण्यात इंटरेस्टेड नाही. इथल्या लिखाणाची वा ब्लॉगच्या लिखाणाची लिंक शेअर केली जाऊ शकते पण निदान तिथे माझ्या नावासकट गोष्टी असतील. कॉपी पेस्टसाठी प्रत्येक गोष्टीसाठी माझी वेगळी परवानगी घ्यावी लागेल. लेखी/ इमेलवर.
ही कारणे निरर्थक वाटतात. कुणी
ही कारणे निरर्थक वाटतात. कुणी एखादी कलावस्तू निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतलेत आणि तुम्हाला शेअर करण्यासाठी परवानगी घेण्याचे घेण्याचेही मोठे कष्ट वाटतायत. ही कारणे आळशीपणा, दुसर्याच्या कष्टांबद्दल बेफिकीरी असं बरंच काही दर्शवतात. नो सहानुभूती.
>>
सहमत आहे पण एक मुद्दा निदर्शनास आणावासा वाटतोय,
मागे एकदा कोणीतरी माझा एक लेख शेअर करण्यासाठी माझी परवानगी मागायला मला एक मेल केला होता. पण मी तो मेल आयडी कधीतरीच उघडत असल्याने तब्बल साडेतीन महिन्यांनी मी तो पाहिला. मला परवानगी देण्यात काहीच हरकत नव्हती उलट ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे अशीच इच्छा होती. पण साडेतीन महिन्यानंतर मिळालेल्या माझ्या परवानगीला काही अर्थ उरला नाही कारण तो लेख प्रासंगिक होता.
असो,
माझ्यामते जे ईमानईतबारे परवानगी मागतात त्यांच्यासाठी हि सोय सुविधा ठरेल, जे असेच बिनदिक्कत तुमचे लिखाण फिरवतात ते या आधीही ते करत होतेच.
@नीधप , मुळात हे असे
@नीधप ,
मुळात हे असे लायसेंसींग वाचकाच्या परवाना न घेण्याच्या आळशीपणामुळे करायचेच नाही आहे.
आपली कला जास्तीत जास्त मुक्त राहुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणुन करायचे आहे.
क्रियेटीव कॉमन्स मधे बाय डीफॉल्ट मुळ लेखकाचे नाव (Attribution to original creator) आणि मुळ स्त्रोत (लिंक) देण्याचे बंधण आहे.
तो क्लॉज काढुन टाकता येत नाही. तो वर कोणत्याही प्रकारच्या परवान्यामधे सारखाच बंधनकारक आहे.
तिथे माझ्या नावासकट गोष्टी असतील. >> वरचा मुद्दा पाहा.
शेअर करणे म्हणताना वस्तू उचलून दुसरीकडे चिकटवणे की वस्तू जिथे आहे त्या जागेचा पत्ता म्हणजे लिंक देणे यावरही बरेच अवलंबून आहे. >> तुमच्या वाचकांनी फक्त तुमच्या ब्लॉग वर येऊनच तुमचे लिखान वाचावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो वेगळा मुद्दा आहे जो इथे कवर केलेला नाही.
मुळात हे असे लायसेंसींग
मुळात हे असे लायसेंसींग वाचकाच्या परवाना न घेण्याच्या आळशीपणामुळे करायचेच नाही आहे. <<
वरती जी कारणे आली त्याचा मला लागला तो अर्थ तोच होता.
आपली कला जास्तीत जास्त मुक्त राहुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणुन करायचे आहे.<<
हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. क्रिएटिव्ह कॉमन्स चा परवाना देण्याने कलाकृती निर्माण करणार्यासाठी प्रचंड प्रसिद्धी मिळते असे काही नाही.
चोरणारे चोरतातच. छोट्या ठिकाणच्या स्थानिक वर्तमानपत्रांमधे स्थानिक वार्ताहराच्या नावावर मोठ्या मोठ्या पेपरांमधे प्रसिद्ध झालेले लेख छापलेले असतातच.
असो.. मला पटत नाही असा सरसकट सगळ्याच गोष्टींना परवाना देणं. त्यामुळे मी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे कुणाचंही काही बिघडत नाही. माझे लिखाण हे काही इमेल फॉरवर्डस, फेसबुक शेअरिंग वगैरे, व्हॉटसॅप शेअरींग वगैरे औकाद असलेले नाही. असो.
.
.
नीधप, >> माझे लिखाण हे काही
नीधप,
>> माझे लिखाण हे काही इमेल फॉरवर्डस, फेसबुक शेअरिंग वगैरे, व्हॉटसॅप शेअरींग वगैरे औकाद असलेले नाही.
मान्य.
पण प्रस्तुत प्रकरणात केवळ लिखाण अपेक्षित नाही. बाकीच्या कलाकृतींचाही समावेश आहे. उदाहरणार्थ तुमच्या आसनं समर्पयामि मधली तांब्याच्या तारेची रचनाकृती घ्या. कोण्या एखाद्याला ती उचलून पुढे फेरफार करून त्यातून दुसरी कलाकृती निर्माण करावीशी वाटली तर त्याने तुमची परवानगी घ्यायला पाहिजे. असं समजा की तुम्हाला परवानगी देण्यास काहीच हरकत नाहीये. आता जर तुमच्या अशा शेकडो कलाकृत्या असतील तर प्रत्येक वेळेस परवानगी घेत बसणे म्हणजे निव्वळ कालापव्यय आहे. म्हणून उपरोक्त सहा परवाने निर्माण केले आहेत.
आ.न.,
-गा.पै.