मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
सलालाह ला रात्री साडेदहाला पोहोचलो. हमदान प्लाझा या हॉटेलमधे मी बुकिंग केले होते. सलालाह मधे टॅक्सीज कमी आहेत आणि मस्कतच्या तूलनेत त्या महागही आहेत. एअरपोर्टवरून जवळच असलेल्या हॉटेलवर जायला ७ रियाल द्यावे लागले.
ओमानी रियाल ( तसेच बहारिनी दिनार, कुवैती रियाल वगैरे ) हि एक खास करन्सी आहे. या एका रियालमधे
१००० बैसा असतात. सध्या विनिमयाचा दर एका ओमानी रियालला 160 रुपये आहे. पण ओमानमधे फुटकळ
खरेदीसाठी बैसाच वापरतात. सध्या भारतात परदेशी चलनावरची बंधने शिथिल झाली आहेत. पन्नास हजार
भारतीय रुपयांएवढे परकिय चलन, अगदी एअरपोर्टवरही मिळू शकते.
तर आधी आपण सलालाहची प्राथमिक माहिती घेऊ. सलालाह म्हणजे ओमानचे दक्षिण टोक. मस्कत आणि आसपासचा भाग ( कॅपिटल एरिया ) हा ओमानच्या उत्तरेला आहे. आणि तिथपासून सलालाह १,१०० किमी
दक्षिणेला आहे. मधला बराच भाग, काही तुरळक गावे व तेलविहिरी सोडल्यास, वैराण वाळवंट आहे.
मस्कत ते सलालाह उत्तम रस्ता असल्याने हा प्रवास रस्त्यानेही करता येतो. एवढ्या प्रवासाला साधारण १२ तास
लागतात. मधेही काही बघण्यासारखी ठिकाणे आहेत पण बहुतांशी भाग वाळवंटच आहे. इथे गवताचे पातेही
उगवत नाही. वाळवंटातील वाळू देखील मैद्यासारखी मुलायम आहे. ती मुठीत धरता येत नाही.
हा प्रवास मी २००० साली, माझ्या मित्रांबरोबर गाडीने केला आहे ( जून्या मायबोलीवर "सलाम सलालाह" असा
एक लेखही लिहिला होता. ) सध्या या मार्गावर नियमित बससेवा आहे. ती दिवसा व रात्रीही सुरु असते.
बसचा प्रवासही आरामदायी आहे. खर्च वाचवायचा असेल तर विमानाच्या ऐवजी बसनेही सलालाहला
जाता येईल. दिवसा प्रवास केला तर वेगळा निसर्ग दिसेल, रात्री केला तर हॉटेलचाही खर्च वाचेल.
सलालाह मात्र खास जागा आहे. धोफार पर्वतराजीच्या कुशीत सलालाह वसलेले आहे. मस्कतमधील पर्वतांपेक्षा
हे पर्वत वेगळे आहेत. मस्कतमधले पर्वत केवळ दगडाचे आहेत. त्यावर काहिही उगवत नाही. धोफार पर्वत मात्र
तसे नाहीत. त्यावर झाडे आहेत.
मस्कतमधे मार्च ते सप्टेंबर कडक उन्हाळा असतो हे मागच्या भागात लिहिले होतेच. त्या उलट सलालाह मधे
मात्र जुलै ते सप्टेंबर चक्क पावसाळा असतो. भारतीय मौसमी पावसाचीच एक शाखा त्या भागात पाऊस पाडते.
त्यामूळे तो काळ सलालाहला भेट देण्यासाठी सर्वात योग्य असतो. त्या काळात तिथले डोंगर हिरवेगार असतात, तसेच ठिकठिकाणी धबधबे असतात. पण त्याच काळात पावसाळी वातावरण असल्याने पर्वतांवर ढगही असतात.
तो काळ सोडला तरी सलालाह मधे अनेक छोट्या छोट्या नद्या वर्षभर वहात असतात. तिथे पाण्याच्या उपलब्धतेमूळे बरीच फळे होतात. केळी, पपया, संत्री, अननस, अवाकाडो, सिताफळे तर होतातच पण खास करून
नारळ जास्त होतात. या कारणामूळे त्या भागाचे आपल्या केरळशी साम्य वाटते.
तसेही तिथे केरळी समाज खुप आहे, एवढेच नव्हे तर केरळहून सलालाह ला जायला थेट विमानसेवाही आहे. सलालाहला दोहा, दुबई व अबु धाबीहूनही थेट विमानसेवा आहे. इतालीमधून चार्टर सेवाही आहे.
सलालाहच्या आजूबाजूला बघण्यासारखे बरेच काही आहे. मला धबधबे बघता आले नाहीत पण वाद्या आणि इतर ठिकाणे बघितलीच.
सलालाह प्रसिद्ध आहे ते धूपाच्या झाडासाठी. ही झाडे तिथल्या पर्वतांवर विपूल आहेत. त्यांच्यापासून मिळणारा धूप आणि त्याचे अत्तर ओमानी लोकांत खुपच लोकप्रिय आहे. हे अत्तर ते विपुल प्रमाणात वापरतात. या धूपाची धुरी वैयक्तीक स्वच्छतेसाठी पण वापरतात. पण विशेष म्हणजे, मस्कतला पावलापावलावर दिसणारी खजूराची
झाडे मात्र इथे नाहीत.
सलालाहमधे बर्याच गुहाही आहेत, तसेच काही आर्किओलॉजिकल साईट्स पण आहेत. इनक्रेडीबल ह्यूमन जर्नीज, अशी एक मालिका यू ट्यूबवर आहे. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे, इथिओपियातून ज्यावेळी मानव इतर खंडाकडे गेला, त्यावेळी त्याने सलालाह मार्फत प्रवास केला.
थोडे विषयांतर करतो.. इथिओपियातून वर सरकायचे तर रेड सी पार करायला हवा. सध्याही तो फारसा रुंद नाही
आणि त्या काळात तर आजच्यापेक्षा अरुंद होता. त्यामूळे त्याकाळच्या अप्रगत मानवाला तो पार करणे कठीण गेले नसणार. त्यानंतर एडन ( येमेन ) व सालालाह इथे वास्तव्य करून पुढे तो ओमानच्या पूर्व किनार्यावरून पुढे उत्तरेकडे गेला.
या पुर्व किनार्यावर सध्या फारशी वस्ती नाही कारण इथे गोडे पाणी नाही. पण त्या काळात समुद्राची पातळी
कमी होती आणि ठराविक अंतरावर गोड्या पाण्याचे झरे होते. त्या पाण्याचा वापर करतच मानव पुढे सरकला.
सध्या ते झरे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने समुद्राखाली गेले आहेत, पण ते आहेत.
समुद्राच्या खाली गोड्या पाण्याचे झरे असणे यावर माझा आधी विश्वास नव्हता पण तसे असू शकतात. कतार
रसकारची निर्मिती असलेल्या, "ब्लॅक गोल्ड" या चित्रपटात त्याचे चित्रीकरण आहे.
असो, तर परत वर्तमान काळात येऊ.
आम्ही २००० साली तिथे गेलो होतो तेव्हा १४ जण होतो. आमच्यासोबत मिसेस नायर म्हणून एक बाई होत्या. आमच्या बॅचलर ग्रुपमधे ते सहज मिसळून गेल्या होत्या. त्या या जागी आल्यावर एकदम ओरडल्याच, अरे वो देखो पांडवलेणी....!
१) ही हमदान प्लाझा मधली प्रशस्त रुम
२) ३ स्टार असूनही ५ स्टार सोयी होत्या. चक्क सिटींग रुम होती आणि दोन्ही रुममधे टिव्ही होता.
३) प्रति केरळ !
४)
६) हे एक ट्राफिक आयलंड आहे
७) हे सलालाहचे आदीवासी, कुठेही आणि कधीही दिसतात. मला एका उंच डोंगरावर उंट दिसला. ड्रायव्हरला विचारले, तिकडे कशाला गेलाय तो ? तर तो म्हणाला, उंट आहे म्हणून गेला.
8) सलालाह हे अशा धोफार पर्वतराजीच्या कुशीत वसलेय.
9) याला म्हणायचे वादी आणि जो बांधीव छोटा पाट आहे तो फलाज. आजूबाजूच्या खेड्यांचा तो पाण्याचा प्रश्न सोडवतो. त्याच्यातील पाण्याची पातळी बघून, त्याचा वापर कसा करायचा याचे नियम परंपरेने ठरलेले आहेत.
फलाजमधले पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते. या पाण्यावरच शेती पण होते.
१०) हिच ती सलालाहची प्रसिद्ध पांडवलेणी. ( मिसेस नायर नाशिकला राहिलेल्या होत्या. कुठल्याही गुहांना
पांडवलेणी म्हणायचे असे त्यांना वाटत असे. )
11)
12)
13)
या पाण्याने माझी कशी फजिती झाली होती ते लिहीलेच पाहिजे. मागच्या भेटीत मिसेस नायर म्हणाल्या या लिलिज मिळाल्या तर किती छान. मी म्हणालो, मी देतो आणुन. स्वच्छ पाण्यामूळे खोलीचा अंदाज आला नाही. ढोपरभर वाटलेले पाणी चांगले कंबरभर खोल होते. फुले मी आणली पण कपडे बदलण्यासाठी एका गुहेत जावे लागले होते.
15) गुहेतील आतला भाग अगदी स्वच्छ राखलेला आहे. चांदण्या रात्री शेकोटी भोवती कोंडाळे करून मित्रमंडळींशी गप्पा मारायला काय बहार येईल. ( ही सर्व ठिकाणे सुरक्षित आहेत. )
17) गुहेकडे जायचा रस्ता.
18) या बिचार्याला काय माहीत, मला पक्ष्यांचे फोटो काढता येत नाहीत ते !
19)
20)
21)
22)
23)
24) स्थिर भासत असले तरी हे पाणी वाहते आहे.
26) या वादीच्या काठाने तूम्ही निवांत चालू शकता ( काठ बांधून काढलेले आहेत. )
27) हवं तर एखाद्या झाडाखाली निवांत बसा.
28) किंवा एखादे टेकाड चढून जा.
29)
30)
31)
32) एखादा रानमेवाही मिळू शकतो.
33)
34)
35) हे डोंगर रुक्ष वाटत असले तरी यांच्या पोटातूनच पाणी सतत पाझरत असते.
मराठी टाईप करणे मधेच थांबवावे
मराठी टाईप करणे मधेच थांबवावे लागले.. जमेल तसे एडीट करतो.
सुपर्ब!!!! काय मस्त जागा
सुपर्ब!!!! काय मस्त जागा आहे.. आणी सविस्तर माहितीमुळे अजूनच गम्मत येतीये वाचायला
छान माहिती. तुम्ही म्हणताय
छान माहिती.
तुम्ही म्हणताय सलालाहला जर जुलै ते सप्टेंबर पाऊस असतो, तर मग इथल्या थंडीत (?) तिथे कसा असतो सिझन?
आऊट्डोअर्स, या दिवसात तिथे
आऊट्डोअर्स, या दिवसात तिथे बर्यापैकी थंडी असते. मस्कतमधेही असते. गरम कपडे घालावे लागतात इतपत थंडी असते.. किंवा गुजराथी हॉटेलात बाजरीच्या भाकर्या वाढतात एवढी थंडी असते.. असे म्हणू या.
फोटो केवळ अप्रतिम!! पाणी कसलं
फोटो केवळ अप्रतिम!! पाणी कसलं नीतळ आहे! आणि ते मोठ्ठं झाड बोराचं आहे होय? पानं पण जरा मोठ्ठीच आहेत नै! ग्रे हेरॉनला पण मोह आवरलेला दिसत नाहीये फोटो काढून घेण्याचा!
सगळे फोटो छान ! माहिती पण
सगळे फोटो छान ! माहिती पण छान.
छान.
छान.
आजच ह्या लेखमालेचे तीनही भाग
आजच ह्या लेखमालेचे तीनही भाग वाचून काढले. भन्नाट वाटले. ओमानमध्ये १४ वर्षे होतो... त्यातली ३ वर्षे सलालाहमध्ये ! त्यामुळे वाचनाना आणि चित्रे पाहताना काय वाटले असेल हे तिथे राहिलेल्याला सांगायची गरज नाही.
धन्यवाद सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल !
छान माहिती आणि फोटो!
छान माहिती आणि फोटो!
सुंदर
सुंदर
सुंदर फोटोज !
सुंदर फोटोज !
आभार सर्वांचे.. ओमान बद्दल
आभार सर्वांचे.. ओमान बद्दल लिहिताना माझा जरा मूड लागतो. आणि डॉक्टरसाहेब म्ह्णताहेत तसे, ओमानमधे राहिलेला माणूस, ओमानबद्दल जिव्हाळा बाळगून असतो.
दा तुमचे प्रवास व र्ण न
दा तुमचे प्रवास व र्ण न वाचुन द्न्ग व्हा य ला होते.
धुप च्य्य झाडान ब्द्द्ल नविन च क ळ ले
हा भाग पण छान. गुहेतला आतला
हा भाग पण छान. गुहेतला आतला भाग पण कसला स्वछ्य आहे . मस्तंच आहेत सगळे फोटो आणि वर्णन
फार मस्त फोटो आणि वेगळीच जागा
फार मस्त फोटो आणि वेगळीच जागा आहे..भूगोलाच्या करामती!
माझा फार वेगळाच प्रश्न आहे - त्या लेण्यांमध्ये वटवाघुळे असतात का? म्हणजे तुम्हाला वास वै आला का? आपल्याकडे अशा ठिकाणी वटवाघुळे फार असतात! मी त्यांच्या अस्तित्वाच्या विरोधात नाही. इथे ऑस्टिनला वटवाघूळांची सर्वात मोठी नागरी वसाहत आहे पण फार घाण वास येतो
वॉव, कस्ले क्रिस्टल क्लिअर
वॉव, कस्ले क्रिस्टल क्लिअर पाणी ..........
सर्व फोटो आणि वर्णन एकदम भारीये .... धुपाच्या झाडांची जरा अजून जरा डिट्टेलवार माहिती द्या की ...
सलालाह ला मी एक्दाच गेलोय ,
सलालाह ला मी एक्दाच गेलोय , वर लेखात म्हट्ल्याप्रमाणे विमान लँड होताना आपण केरळमधे उतरतोय असेच वाटते. तीथे डोंगरात येक टेबल लँड जागा आहे जिथे बंद कार न्युट्रल करुन उभी केली तर आपोआप चालते. तसेच काही ठिकाणी समुद्र किनार्यावर खडकांमधे पोकळ्या आहेत ज्यातुन लाटांचे पाणी कारंजासार्खे वर उडते आणि हसल्या सारखा आवाज येतो.
माझ्या कायम लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे तेथल्या मोठाल्या लॉबस्टर्स. तशा लॉबस्टर्स मला अजुन कुठेच मिळाल्या नाहित. आठवणी पुन्हा जाग्या केल्याबद्दल धन्य्वाद
किती शांत, निवांत जागा आहे!
किती शांत, निवांत जागा आहे!
मस्त फोटो आणि माहिती.. ही
मस्त फोटो आणि माहिती.. ही गुहा आणि वादी अजून पाहिली नाही, त्यामुळे कुठली आहे समजली नाही. जेव्हा जाणं होईल तेव्हा नक्की पाहीन
सुंदर.
सुंदर.
सुंदर फोटो आणि वर्णन.
सुंदर फोटो आणि वर्णन.
ही धुपाची झाडे आपण बघणार
ही धुपाची झाडे आपण बघणार आहोतच. ब्लो होल्स पण बघणार आहोत.
या गुहांमधे वटवाघळे अजिबात नाहीत. त्यांना आवश्यक असलेले सदाहरित जंगल इथे नाही. आणि तश्याही या गुहा अंधार्या नाहीत.
मस्त मालिका. ती गुहा
मस्त मालिका. ती गुहा वेताळाच्या घरा सारखी वाट्ते आहे. धुपाच्या झाडांमध्येमला पण इंटरेस्ट आहे. जास्त लिहा त्या बद्दल. झाडाखाली तिखट मीठ लावून पेरू विकणारा हवा होता.
खुप सुंदर फोटोज. पाणी किती
खुप सुंदर फोटोज. पाणी किती नितळ आहे.
प्रचि १४ मधील झाड उंबराचे आहे का?
खूप मस्त लिहीताय दिनेशदा.
खूप मस्त लिहीताय दिनेशदा. अजून लिहा. त्या नयजेरियन गोष्टी पण लिहा ना अजुन आणि लौकर
अश्विनी.. त्या लोकाना
अश्विनी.. त्या लोकाना सुगंधाचे फार वेड आहे. नेहमीच त्यांचे कपडे पांढरेशुभ्र असतात शिवाय गळ्याजवळचा जो बंद असतो, तो बहुदा अत्तरात बुडवलेला असतो.
नरेश, हो उंबराचेच.. पाय सोडूनी जळात बसला, या "औंदुबर" या कवितेतल्या ओळी आहेत.
लेखमालेचे तीनही भाग आत्ता
लेखमालेचे तीनही भाग आत्ता वाचले. मस्त प्रवासवर्णन आणि फोटोही !
दिनेश डोळ्याचं पारणं फिटलं
दिनेश डोळ्याचं पारणं फिटलं फोटो पाहून. सगळा परिसर त्यांनी किती स्वच्छ ठेवलाय ना?
रस्ते आणि फोटो क्र.४ मधले
रस्ते आणि फोटो क्र.४ मधले लँप पोस्ट्स सुंदर आहेत. सगळीकडे झाडे नाहीत का? फोटो क्र.५ , ६ मध्ये जशी हिरवीगार झाडे दिसताहेत तशी फोटो क्र. ७ आणि ८ मध्ये रस्त्याच्या आजूबाजूला रखरखाट वाटतो आहे.
संपदा.. शहरात हि मुद्दाम
संपदा.. शहरात हि मुद्दाम केलेली लागवड आहे. शहराबाहेरचे डोंगर फक्त पावसाळ्यात हिरवेगार होतात. एरवी असेच असतात. या हवामानातच धुपाची झाडे पोसतात आणि जास्त सुगंधी होतात.
Pages