नमस्कार मंडळी
शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
कार्यशाळा घेण्याइतपत माझी पात्रता नाही, पण मी जे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, त्याचा आनंद लुटतो, तोच आनंद इतरांनाही मिळावा, त्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, ज्यांना आधीच शास्त्रीय संगीताची गोडी वाटते त्यांना त्यातील तंत्राचा भाग अजून चांगल्या प्रकारे कळावा, अशा उद्देशाने एक शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणारा गट तयार करावा असे माझ्या मनात आहे. ज्यांना थोडं किंवा फार येतंय अशांनी त्यांच्यापेक्षाही थोडं किंवा अजिबात येत नाही अशांना ते ज्ञान देणं अशी शास्त्रीय संगीतविषयक देवाण-घेवाण व्हावी असा या गटाचा उद्देश असेल. गटाचे सर्वसाधारण स्वरूप (जे माझ्या डोक्यात आहे) ते पुढीलप्रमाणे. यात कुणाला काही सुधारणा सुचवावीशी वाटली किंवा पूर्णपणे वेगळी कल्पना मांडावीशी वाटली तर स्वागतच आहे.
१) स्थळ- पुणे
सुरुवातीला पुण्यातल्या मायबोलीकर आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यापैकी जे इच्छुक आहेत अशांचा एक गट तयार करायचा.
पुण्यात कुठे भेटायचे हे इच्छुक ज्या भागात राहतात त्यावरून ठरवावे लागेल.
२) वेळ- महिन्यातून एकदा/ दोनदा
सगळ्यांकडे किती वेळ उपलब्ध असेल याची खात्री नसल्याने महिन्यातून किमान एकदा भेटावे. सगळ्यांच्या वेळा जुळल्यास दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळाही भेटता येईल. किंवा जवळपासच्या भागात राहणारे मायबोलीकर स्वतंत्रपणेही भेटू शकतीलच.
३) उपक्रम- प्रत्येक भेटीच्यावेळी (आधी) एखादा राग/ ताल/वाद्य/ गायक- गायिका ठरवून त्या रागाची प्रस्तुती सगळ्यांनी मिळून ऐकणे. (कमाल ३० मिनिटे)
हे ऐकणे चालू असताना, शक्यतो कुठलेही स्पष्टीकरण टाळून, ऐकून झाल्यावर, रागाबद्दल/ तालाबद्दल ज्याला जी जी माहिती आहे ती त्याने द्यावी.
ज्याला त्यातला जो भाग उमगला तो भाग त्याने / तिने सगळ्यांना सांगावा.
गटात काही जण अगदीच नवखे असू शकतात ही शक्यता गृहित धरून शक्य तितक्या बेसिक पातळीवर स्पष्टीकरण द्यावे. बर्याचदा, आपण भिडस्त होऊन, माहिती असूनही काही बोलत नाही- यावरही मात करता येईल
४) शक्य झाल्यास- काही तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून डेमो किंवा काही माहिती घेणेही जमेल असे वाटते आहे.
आपल्या मायबोलीवर शास्त्रीय संगीतातली अनेक जाणकार मंडळी आहेत उदा- दाद, अनिलभाई, अनिताताई, अगो, रैना, हिम्सकूल.सगळेच पुण्यात नाहीत खरे, पण ऑफलाईन त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळते का तेही पाहता येईल (हे अगदीच गृहित धरल्यासारखे लिहिले आहे खरे, पण अशी मदत मिळेल याची खात्री आहे).
जे पुण्यात आहेत त्यांना या गटात सामील होण्याची आग्रहाची विनंती _/\_
५) सुरुवातीला एक-दोन महिने या गटाचे भेटणे कितपत नियमित होते आहे ते पाहून पुण्यात नसलेल्या परंतु गटात येऊ इच्छिणार्या मित्र-मैत्रिणींना 'स्काईप' द्वारे गटात घेणे शक्य आहे.
सुरुवात-
खालीलपैकी कोणत्याही एका दिवशी सुरुवात करता येऊ शकेल.
६ सप्टेंबर (शनिवार)- गणपतीचा काळ आहे त्यामुळे किती जणांना जमेल हे सांगणे अवघड आहे, पण गणपतीच्या मंगलमय दिवसात सुरुवात होऊ शकेल
१३ किंवा २० सप्टेंबर (शनिवार)- गणपती संपून पितृपक्ष चालू असेल त्यामुळे घरी सण आहे म्हणून जमणार नाही इ. कारणे नसतील आणि बर्याच लोकांना जमू शकेल.
इच्छुकांनी मला वि.पु. मधून सांगितले तरी चालेल.
किंवा संपर्कातून ई-मेल केला तरी चालेल.
पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मला फार काही येतं असं नाही, पण शास्त्रीय संगीताचा आस्वाद अनेकांना घेता यावा हा एकमेव उद्देश मनात आहे. त्यामुळे जितके म्हणून मला येतंय/ माहिती आहे ते मी नक्कीच सांगू शकेन.
माझी खात्री आहे की मला योग्य वेळी योग्य ती मदत मायबोलीकर जाणकार आणि माझ्या परिचयातील कलाकार मंडळींकडून नक्की मिळेल.
-चैतन्य दीक्षित
चैतन्य खूप छान विचार आहे.
चैतन्य खूप छान विचार आहे. मलाही सहभागी व्हायला आवडेल..............................................................................................................................
दाद, शक्यतो गूगल hangout
दाद, शक्यतो गूगल hangout करुया.
अगदीच नेट स्पीड कमी झाला आणि problem आला तर फोनचा ऑप्शन ठेवूया.
चैतन्य विपुत तुझा नंबर देऊन
चैतन्य विपुत तुझा नंबर देऊन ठेव.
मलापासून क्षमा मागते. मी भाग
मलापासून क्षमा मागते. मी भाग घेऊ शकले नाही. पण उत्सुकता आहे, काय काय झालं? कुणीतरी अपडेट द्या नं.
काल पहिली भेट फार सुरेल झाली.
काल पहिली भेट फार सुरेल झाली. चैतन्य, स्वरमुग्धा, कुलु, सई, दक्षिणा, मी, शशांक, मयुरेश(माबो आयडी विसरले), चैतन्सचे स्नेही राघवेंद्र(नाव बरोबर ना) आणि दक्षिणाचे स्नेही पराग आणि हो, गंधार असे सगळे जमलो होतो.
कुमार गंधर्व, अमिर खॉं साहेब, किशोरी ताई यांच्या सूरांना शोधत गेलो. सोबत चैतन्य ची बासरी आणि पराग , राघवेंद्र यांचेही सूर होतेय.
चैतन्यने सुरुवातीला भूप रागाची माहिती सांगितली, सईने त्याचे स्वर गाऊन दाखवले आणि मैफिल जमत गेली. चैतन्यने आयोजन फार रेखीव केले होते, योग्य त्या सर्व गोष्टी जय्यत तयार होत्या. विविध ऑडिओ क्लिप्स, इ. तानपुरा. कुलुनेही छान ऑडिओ क्लिप्स एेकवल्या. वेगवेगळ्या गमती जमती, अनुभव, कलाकारांचे जीवन-विचार-त्यांचे झोकून देणे यावरही गप्पा झाल्या.
जरी पहिला आस्वाद भूपचा घ्यायचा ठरवला असला तरी यमन, मारवा, दरबारी यांचीही थोडी ओळख झाली.
पाच वाजता सुरू झालेली मैफल साडेआठ पर्यंत चालू होती.
शेवटी ही न संपणारी जादू आहे याचे भान ठेऊन किशोरीताईंचा भूप एेकतच, अगदी जबरदस्तीनेच उठलो.
संपूर्ण मैफलीतला गंधार (चैतन्यचा गोड मुलगा) छान मस्त होता. संगीत लहान मुलांनाही किती शांत अन उत्साही करते ते पुन्हा जाणवले
स्वराच्या चहाने जिभेची तृषा पण निभाली
दाद, अनिलभाई, भुंगा तुम्हाला मिस केलं. पुढच्यावेळी नक्की भेटूत.
एकंदरच एक छान, वेगळा, मस्त अनुभव. धन्यवाद चैतन्य आणि सर्व मित्रमैत्रिणींनो ___/\___
व्वा! मस्तच !! :)
व्वा! मस्तच !!
अवल, वृत्तांताबद्दल
अवल, वृत्तांताबद्दल धन्यवाद.
कालच्या गप्पातला थोड़ा तांत्रिक भाग.
मध्यम आणि निषाद हे स्वर वर्जित असूनही
भूप कल्याण थाटात का आहे?
=> केवळ तीव्र मध्यम आणि निषाद हे कल्याण थाटाचे लक्ष्ण नसून
धैवत आणि गंधार हे दोन स्वर कसे हाताळले जातात ह्यावर राग भूप कल्याण थाटात अंतर्भूत आहे. (कुलदीपच्या गुरूनकडून समजलेली माहिती).
आपण ज्या भुपाळया म्हणतो त्या बह्वंशी देसकार रागातील आहेत.
या दोनही रागांचे स्वर सारखेच असले तरीही वादी संवादी स्वर वेगळे असून, रागाचे चलनही वेगळे आहे. अधिक माहितीसाठी राजन पर्रीकर यांच्या वेबसाईटवरचे लेखन व पं. रामाश्रेय झा यांच्या ऑडियो क्लिप ऐकल्या. थोडेसे डोक्यावरुन जाणारे होते, पण आज ना उद्या त्यातला माथितार्थ लक्षात येईल अशी आशा आहे.
भूप रागत आरोह अवरोहात प्रत्येकी ५ च स्वर असल्याने गाताना रागविस्तार करणे अवघड जाते. पंचमावरून गंधारावर येताना क्वचित् मध्यमाचा आभास तर षद्जावरुन धैवतावर जाताना क्वचित् निषादाचा आभास जाणवतो (किंवा तसे गायन केले जाते) परंतु, गाताना आभास न होता मध्यम व निषाद हे स्वर ठळकपणे गायले गेले तर तो भूप राग न राहता शुद्ध कल्याणाकडे झुकतो. परागने सांगितल्यानुसार अशा रागगायनाला गमतीत 'सर्वश्रुती भूप' म्हणतात
_/\_ मी अत्ता पाहिला हा ग्रुप
_/\_
मी अत्ता पाहिला हा ग्रुप आणि हा उपक्रम मस्त आहे...
मी पण पुण्यातच असते. कालच भेटले होतात सगळे.. मी थोडं आधी पाहिला हवं होतं...
असो..... पुढच्यावेळी मलाही सहभागी व्हायला आवडेल..
हे मी मिसलो काल.. जमलेच नसते
हे मी मिसलो काल.. जमलेच नसते असेही.. पुढच्या वेळेस पण कळवा.. जमल्यास नक्की यायला आवडेल..
ओहो... (किती मजा आली
ओहो... (किती मजा आली असेल).
भूप आणि देसकार अशी चर्चा रंगली म्हणजे सगळे 'पहुचे हुए' लोक होते असं दिसतय. मस्तं... शिकायला मिळणार.
पुढल्या वेळी थोडं आधीची वेळ ठेवता आली माझ्याकडे, प्लीज...
गंधारचं कौतुक ऐकलं आहे... धाकुल्याचे कान आत्तापासून तयार होतायत... क्या बात है... जियो!
वृत्तांत वाचून आणखीनच बेचैन
वृत्तांत वाचून आणखीनच बेचैन झालो कि राव !
ओहो... (किती मजा आली असेल).
ओहो... (किती मजा आली असेल). >>>> चैतन्यची बासरी म्हणजे कानाला, मनाला स्पर्शणारे तलम रेशमी सूर ...
आणि पराग व राघवेंद्र यांचे सुरेल गायनही अशीच अनुभूति देणारे ... खूपच श्रवणीय आणि संस्मरणीय संध्याकाळ ..
हिमस्कूल, पद्मजा पुढच्या वेळी
हिमस्कूल, पद्मजा पुढच्या वेळी नक्की कळवतो.
हिमस्कूल, पद्मजा पुढच्या वेळी
हिमस्कूल, पद्मजा पुढच्या वेळी नक्की कळवतो.
पुढच्या वेळी मलाही सहभागी
पुढच्या वेळी मलाही सहभागी व्हायला आवडेल.
चैतन्य, पुढच्या वेळेस कळव..
चैतन्य, पुढच्या वेळेस कळव.. यायला नक्की आवडेल..
ह्या साठी कस्काय वर गट असेल तर त्यात मला आपले म्हणा
नशीबवान आहात तुम्ही सारी
नशीबवान आहात तुम्ही सारी मंडळी...जी प्रत्यक्ष हजर राहून या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद लुटत होती. सईकडून सविस्तर वृत्तांत समजला....सांगताना तिला झालेला हर्ष तिच्या प्रत्येक वाक्यात जाणवत होता...कित्येक दिवसांनी अशा पातळीच्या गटगला हजेरी लावायला ज्याना मिळाली ते सारेच खुष तसेच समाधानी झाले असणार हे नि:संशय. कुलु याबाबतीत मला प्रत्यक्ष बोलला होता...जरी ते थोडक्यात होते तरी. मी भाच्याच्या लग्नात तब्बल एक दहा दिवस गुंतलो असल्याने ह्या आस्वादगटाच्या वृत्तांताकडे आलो नव्हतो....पण आज वाचले सारे....आणि आनंद अर्थातच झाला.
चैतन्य दीक्षित यांचा आखणीमधील उत्साह वाखाणण्यासारखाच आहे. प्रतिसाद आणि त्यावरील मते याचा विचार करता पुढील बैठकीसाठी त्याना अधिक हुरूप येईल यात शंका नाही....शुभेच्छा.
खूपच छान चर्चा !! पंचमावरून
खूपच छान चर्चा !!
पंचमावरून गंधारावर येताना क्वचित् मध्यमाचा आभास तर षद्जावरुन धैवतावर जाताना क्वचित् निषादाचा आभास जाणवतो (किंवा तसे गायन केले जाते) परंतु, गाताना आभास न होता मध्यम व निषाद हे स्वर ठळकपणे गायले गेले तर>> भूपात प - ग मींडेत आभास असतो. शुद्ध कल्याणात सुद्धा मध्यम आणि निषाद अगदी ठळक लावला जात नाही. तर प वरून ग वर मींड घेताना मध्यमास स्पर्श केला जातो. भूपापेक्शा नकीच हा नीट जाणवतो.
दुसरे ओळ्खता येइल असे लक्षण म्हणजे - म्हणजे प (ग)रे, सा. यमन टाईप चा हा स्वर समूह शुद्ध कल्याणात जाणवतो, (कल्याण अंग highlight करण्यासाठी).
तशी बरीच छान रे़कॉर्डिंग आहेत. पण उदाहरण म्हणून ऐका - मल्लिकार्जुन मन्सूर, मोगुबाई कुर्डीकर, भीमसेन - शुद्ध कल्याण.
भूपात पण प रे असतं पण यमन style मध्ये नाही.
वा वा मस्तच वृत्तांत, झकास
वा वा मस्तच वृत्तांत, झकास मैफिल जमली असणार अगदी. शास्त्रीय संगीताच्या विस्कळीतपणे चाललेल्या तोंडओळखीत असा काही पडाव यावा जिथे केवळ श्रवणभक्तिनेही खूप काही साध्य व्हावे अशी कधीपासून इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही सगळे या अनुभवातून किती समृद्ध झाला असाल या कल्पनेनेच छान वाटत आहे.
या यात्रेत अधिकाधिक सहभागी होवोत ही शुभेच्छा.
व्व्वा!! बहोत ही खूब! मला
व्व्वा!! बहोत ही खूब! मला येता येणार नव्हते म्ह्णून इथे प्रतिसाद दिला नव्हता.
पण चैतन्य आणि मंडळी अभिनंदन. सुरुवात एकदम छान झालेली दिसतेय.
मला पण यायचंय. पण सध्या
मला पण यायचंय. पण सध्या अडकलीये. पुढील वेळी.
काल खरंच अपेक्षेपेक्षा सुंदर
काल खरंच अपेक्षेपेक्षा सुंदर रंगली बैठक. पहिल्यांदाच भेटत होतो, निव्वळ भूपापासून सुरुवात करायची इथपर्यंतच काय ते ठरलं होतं. पण प्रत्यक्षात बाहेर पडेतोवर सगळेच अगदी सूरमय होऊन गेले होते
रितसर नांदीपासूनच सुरूवात झाली. 'वटवट'च्या पुल आणि लालजी देसाईंनी गायलेल्या भूपातल्या नांदीनं वातावरण प्रसन्न करून टाकलं. त्यानंतर चैतन्यनं रागाची वैशिष्ट्ये आणि इतर तांत्रिक माहिती सांगताना माझी एक चुकीची समजूतही दुरुस्त केली. मी आजवर भूपाळ्या ह्या भूपातच बांधल्या जात असाव्यात या गैरसमजात होते. तर ते तसं नसून प्राचीन काळी भाट राजेलोकांना जागे करण्यासाठी गात ती गीते म्हणजे भूपाळी असं आहे. भूपासाठी गायलेली ती भूपाळी. आणि आपण सहसा ऐकतो त्या भूपाळ्या देसकारात असतात, भूपात नव्हे. पं. रामाश्रय झांनी बारीकसारीक तपशीलांनी विषद केलेली कल्याण थाटाची वैशिष्ट्ये ऐकली. पुढे भूपाच्या अनुषंगानं कुमारांचं 'सुजन कसा मन चोरी' ऐकणं मस्ट होतंच आणि ती मेजवानी चैतन्यनं तयारच ठेवली होती.
ओघाओघाने चर्चेत मारवा, दरबारी कानडा आणि यमन आपसूकच येत गेले. केवळ साडेतीन मिनिटात सामर्थ्याने केलेल्या समग्र रागदर्शनाची उदाहरणे म्हणुन आमीरखाँ साहेबांचे मारवा आणि दरबारी कानडा ऐकवले. त्यांच्या गायकीच्या खासीयती आणि एकुणच प्रत्येक रागातल्या स्वरावल्या पराग वनारसेने गाऊन छान उलगडून सांगितल्या. चैतन्यने बासरीवर भूप, यमन यांची स्वरुपं, आलापीच्या ताना आणि गमकेच्या ताना यातला फरक दाखवला. शशांकनी बासरीवर सुजन कसा मन चोरीची झलक ऐकवली. राघवेंद्रनी किर्तन परंपरेतली एक रचना फार प्रभावी गायली. शशांकनी 'गानयोगी'तला खॉसाहेब अब्दुल करीम खाँच्या अखेरच्या प्रवासाचा एक हृद्य उतारा वाचला. याशिवाय पराग, चैतन्य आणि कुलदीप यांनी भीमसेनजी, किशोरीताई, कुमारजी, जसराजजी, अली अकबर खॉ यांच्या गायन-वादनातल्या खासीयतीही सांगितल्या.
परागचा आवाज सॉफ्ट तर राघवेंद्रचा खडा, पण दोघेही तयारीने गाणारे. चैतन्य उत्तम बासरी वाजवतो. त्याच्याकडचे आणि कुलदीपकडचे त्या त्या रागांचे रेफरन्सेस मी, आरती आणि दक्षिणासारख्या कानसेनांना मदतीला येत होते. मयुरेश, शशांक आणि स्वरा यांचाही रागांचा अभ्यास ठळकपणे जाणवला. समारोप अर्थातच अजरामर 'सहेला रे' ने झाला.
या सगळ्या दरम्यान गंधारचा आमच्यातला वावर फारच प्रसन्न होता. या चिमुकल्या श्रोत्यानं सगळ्यांना खुश करून टाकलं
किती सुंदर वृत्तांत हा सईचा !
किती सुंदर वृत्तांत हा सईचा ! प्रत्येक ओळ संगीत आस्वाद गटाकडून मिळालेल्या देखण्या अशा मेजवानीने भिजली आहे. वृत्तांत देणारी व्यक्ती संगीताच्या प्रेमाने पछाडलेली असली म्हणजे तिची बोटेही त्या सायंकाळचे वर्णन करताना स्वरांनी किती ओथंबून जातात कौतुकाने, त्याची प्रचिती म्हणजे सईचा वरील प्रतिसाद.
रागदारीच्या वैशिष्ट्याने नटलेल्या मैफिलीचा शेवट "सहेला रे..." ने झाला तेही संगीत-श्रीमंतीचेच एक लक्षण होय.
सई... किती सुरेख शब्दबद्धं
सई... किती सुरेख शब्दबद्धं केलायस वृत्तांत. जियो
वाह! काय मस्त उपक्रम सुरु
वाह! काय मस्त उपक्रम सुरु केला आहे! अशा खूप साऱ्या मैफिली रंगू देत!
मला नुकताच शोध लागला आहे की विविध भारती आणि all india radio ची इतर काही स्टेशन्स इंटरनेटवर ऐकता येतात. तर त्यात विविध भारती वर दर रोज सकाळी ७.३० (भा.प्र.वे) वाजता संगीत सरिता नावाचा कार्यक्रम लागतो. त्यात रोज एका रागाची ओळख असते - रागाची माहिती, आरोह- अवरोह आणि त्या रागातल्या दोन रचना (गायन/वादन).१५ मिनिटाचा कार्यक्रम असतो. फार मजा येतेय ऐकायला!
एकूणच ही साईट सापडल्यापासून माझ्याकडे हा रेडीओ चालू आहे सतत!
लिंक: http://allindiaradio.gov.in/Vividh.htm
अरे वा! मस्तच! समस्त संगीतमय
अरे वा! मस्तच! समस्त संगीतमय वृत्तांत आवडले.
तुम्ही पुणेकर बाकी नशीबवान आहात!
अरे वा, जिद्न्यासा मस्त साईट
अरे वा, जिद्न्यासा मस्त साईट
पुणे स्टेशन कुठे लागत असेल तर
पुणे स्टेशन कुठे लागत असेल तर ते ही शोधायला पाहिजे.. रोज सकाळी १० ते १०:३०, दुपारी १:०० आणि रात्री ९:०० ला पण क्लासिकल असते.. तसेच दर रविवारी रविवासरीय संगीत सभा म्हणून खास नॅशलनवरुन प्रसारित होणारा कार्यक्रम पण असतो.
वा ...अवल आणि सई.......
वा ...अवल आणि सई....... सर्वांचेच वृत्तांत छान!
हा तर उत्तमच उपक्रम आहे यात
हा तर उत्तमच उपक्रम आहे यात शंकाच नाही..
अजून एक करता येइल...गटातल्यांपैकी जे कलेच सादरीकरण करू इछीत असतील त्याला एकेकाला कला सादर करायची संधी द्यावी...
आम्ही कुटुम्बा मध्ये संगीत भिशी सुरू केली आहे...एकेकाला कलेचे सादरीकरण करतो...याचा एक फ़ायदा असा होतो कि जो रियाज़ात नसतो तो त्या निमीत्तने जोरदार रियाज़ करू लागला..
Pages