गुन गुन गायिए !

Submitted by kulu on 13 January, 2015 - 06:53

गुन गुन गायिए !

स्वीस एअर च्या कृपेमुळे रविवारी सकाळी ११:३० ला येणारा मी शनिवारी रात्री १०:३० लाच दिनेशच्या घरात वहिनीला जागे करत प्रवेश करता झालो. बरंच झालं. रविवारी पहाटे ६:३० ला किशोरीताईंची मैफल होती. पहाटे पावणेपाचालाच वहिणीने हाक दिली, मी तयार होऊन पावणे-सहाला पार्ले टिळकला हजर. प्रभावळकरांच्या कृपेने पटकन जाऊन एक चांगली जागा पकडली. मनात उत्सुकता होती...... ताईंची मैफल! एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेच्या आधी असते तशी सात्विक लगबग सगळीकडे होती.! पावणे सातला सगळी मंडळी हजर झाली. संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तबल्याच्या साथीला भरत कामत, व्हायोलीनवर मिलिंद रायकर आणि तानपुऱ्यावर तेजश्री आमोणकर नि नंदिनी बेडेकर! गाभारा सजला होता, गानसरस्वती आता त्यात विराजमान होणार होती ! ताई आल्या..... नेहमीप्रमाणे काळी साडी, काळे कुळकुळीत केस, बाणेदार नाक, तेजस्वी मुद्रा, आब असलेली चाल आणि पूर्ण पाठीवरून घेऊन पुन्हा उजव्या हाताच्या घट्ट मुठीत पकडलेला सोनेरी किनारीचा पदर! आता मंदिर पूर्ण झालं. ताईनी नतमस्तक होऊन श्रोत्यांना आणि रंगदेवतेला नमन केलं!

....... ताईंनी स्वरमंडल छेडलं आणि त्यातून अवघा तोडी सांडला! ताईंच्या पहिल्या आ बरोबर जणू सगळं जग त्यांनी कवेत घेतलं. मेरे मन याहू रटे ही तोडीतली धीरगंभीर विलंबित बंदिश! "जीवनात खूप दु:ख आहे आता तरी हरीनाम जप " असा काहीसा अर्थ! ताईंच्या स्वरांचं वर्णन मी काय करणार! आर्त आणि आवाहन करणारे ते स्वर सगळीकडे भरून राहिले. ताईंच्या आवाजातलं कंपन पहिल्या दहा मिनिटांत गेलं आणि मग सुरु झालं ते तोडी होणं! प्रत्येक श्रुती तोडी होऊन आलेली. प्रत्येक स्वरवाक्याला त्या त्या जागेवर समर्थन होतं. उगीच सुचतंय म्हणून आणि श्रोत्याला आचंबित करण्यासाठी श्रुतींची permutations-combinations ताईंनी कधीही वापरली नाहीत! जर त्या स्वरवाक्याला रागाच्या त्यावेळच्या भावविश्वात जागा नसेल तर ते स्वरवाक्य ताईंच्या गळ्यातून कधीही येत नाही! तोडीतला पंचम ऐकणं म्हणजे एक अद्भुत आनंद पण ताई मोठ्या सॅडीस्ट! मध्यमावरून पंचमावर जाणार असं वाटतंय तोपर्यंत ताई पंचमाला अलगद स्पर्शुन कोमल रिषभावर समेवर येऊन पोहोचल्या पण! पंचमाचा आभास ही फक्त theoretical वाटावी इतकी कठीण गोष्ट ताई मात्र अगदी सहजतेनं गातात. आणि मग तो आंदोलित कोमल धैवत म्हणजे दु:खात हुळहुळणारा जीवच! असं किती सांगावं ! ताई ताना घेताना पण जेव्हा सा-प, म-ध अशा अवरोही ताना घेतात तेव्हा षड्जावरून पंचमावर अशा जातात की जणू हवेत अलगद विहरणारं पीस! तिथे मींडीचा आभास होतो पण ती मींड नसते. गुन गुन गायिए या दृताबरोबर तोडी चा अविष्कार संपवला ताईनी! एकसलग तोडी तास-सवातास झिरपत होता!

मध्ये १० मिनिटे मध्यंतर मागताना ताई म्हणाल्या "जाणार नाही ना कुठे? मी आलेच दहा मिनिटांत. जाऊ नका हं!" पुन्हा जेव्हा आल्या तेव्हा देखील "का माझ्या श्रोत्यांना ऊनात बसवलंय, त्याना इकडे स्टेजवर आणा. केव्हढी जागा आहे इथं. तुम्ही येत नाही इथं तोवर मी गाणार नाही हं!" असा लहान मुलाप्रमाणे हट्ट धरणाऱ्या, श्रोत्यांना वंदन करणाऱ्या ताईंना जेव्हा लोक गर्विष्ठ म्हणतात तेव्हा अशा जन्मजात बिनडोक लोकांच्या डोक्यात मी तंबोरे का फोडत नाही हा प्रश्नच आहे! पु लं नी म्हटल्याप्रमाणे "काही लोकांना नाक हे मुरडण्यासाठीच दिलेले असते" आणि तोंड हे चरण्यासाठी! हो, कारण पुढे ताई तोडी गात असताना माझ्या मागे बसलेली बाई दुसरीला "वडे कित्ती टेस्टी आहेत " हे सांगत होती. डोक्यात कांदे बटाटे असणे हा नुसता वाक्प्रचार नसून ते प्रत्यक्षात असतं हे मला त्यावेळी कळलं! ज्या लोकांना शास्त्रीय संगीत आवडत नाही अशा लोकांपेक्षाही मैफलीला येऊन कोरडी राहणारी आणि चरणारी ही ढोरं जास्त दुर्दैवी!

असो! मध्यंतर झाल्यावर ताईंनी स्वरमंडलावर ललत पंचम छेडला! खरं स्वर-मंडल वापरावं ताईंनीच! स्वर-मंडलावर राग सेट करणं हे ताईच करू जाणे! स्वर आणि स्वराची वर्तुळात्मक आस , यामुळे आपल्याकडे २२ श्रुती सोडूनही एका सप्तकात स्वरांची अनेक रूपे संभवतात! त्या त्या रागाला त्या त्या स्वराची फक्त ती आणि तीच श्रुती! त्यामुळे ताईंच्या स्वरमंडलावर देखील गंधार, पंचम असं स्टोकॅटो न ऐकू येता त्यातून तो एक रागच ऐकू येतो! ललत पंचम हा ताईंना आंदन दिलेला राग आहे. त्यामुळे इतर कुणाचा ललत पंचम मी ऐकला नाही आणि ऐकणार पण नाही! या ललत पंचमनं सकाळच्या झुलत्या ऊनाला एक प्रभा आली!

यावेळी दोन गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली म्हणजे मिलिंद रायकरांचं व्हायोलीन! असं गाणारं व्हायोलीन कधीही ऐकलं नाही! ताईंच्या स्वरवाक्याला रायकरांनी व्हायोलीनवर खूप मुरब्बीपणे पूर्ण केलं आणि तेही पूर्ण श्रुतींसहित! आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेजश्री आमोणकरचा गोड आवाज! इतक्या सुंदर आकाराच्या ताना घेतल्या तिने की ताईनी देखील वाहवा दिली! पुढे एकदा तिचा आवाज फुटल्यावर सर्वांसमक्ष ताईनी "जिथंपर्यंत आवाज जातो तिथंपर्यंतच गां" असं सांगितलं! ह्यालाच गुरु म्हणतात!

असो! पावणे सातला सुरु झालेली मैफल १० ला संपली. ताईंचं वय ८४ या गोष्टीला Biological fact याउप्पर काही महत्व नाही! साक्षात संगीताला वयाची बाधा नसते! ताईंच्या गायानामुळ साक्षात अवघ्या ब्रह्मांडातली ऊर्जा माझ्यापर्यंत प्रवाहित झाली. आता ती आयुष्यभर पुरेल!

(ताईंचा तोडी आणि ललत पंचम इथे ऐका http://mio.to/album/Kishori+Amonkar/Prabhat+%28Navras%29+%282000%29
हे आधीचे रेकॉर्ड आहे. मी मैफल रेकॉर्ड केली नाही )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mee aaj vaachatoy he, tehee airport varoon… mastach lihit rahaa, aikat rahaa, shikat rahaa aaNi gaatahee rahaa.

दिनेश....तुमच्या वरील वाक्यात थोडीशी भर घाला...."आणि प्रत्यक्ष समोर भेटणा-या सदस्यांशी या विषयावर बोलतही रहा..". [मला हा आनंद मिळाला आहे.]

कुलू ,अगदी सुरीली शब्दमैफल जमवलीत ..किती छान स्वरावलोकन ...सुरांचे झंकारते अदभुत फुलघोसच हाती आणून दिलेत तुम्ही .
ताईंच्या ललत पंचमसाठी तर खूप खूप आभारी .

छान ! और गुन गाते रहिये .. किशोरीताईंचं गाणं म्हणजे बुद्धिमत्ता, भाव आणि गाण्याची शुद्धता यांचा मिलाफ़.

स्वर-मंडलावर राग सेट करणं हे ताईच करू जाणे! स्वर आणि स्वराची वर्तुळात्मक आस , यामुळे आपल्याकडे २२ श्रुती सोडूनही एका सप्तकात स्वरांची अनेक रूपे संभवतात! >> हो. ताई आणि बडे गुलाम अली ! तंबोरा आणि स्वर मंडल चांगल जुळलं के राग अगदी 'feel' होतो. प्रत्यक्ष समारंभात तर ते काही औरच लागतं. आणि होय, तुम्ही म्हणताय तसं, २२ पेक्षा जास्त श्रुती आपल्या संगीतात वापरतात. स्वरस्थान (श्रुती) , स्वर-लगाव, स्वर-लगावाची दिशा, कण स्वर, स्वर-उच्चारण सगळे मिळून एखाद्या रागाचा स्वर बनतो.

No offence, फक्त एक सांगावं वाटलं, ती बंदिश 'बेगुन गुन गाइये' अशी आहे. Happy

धन्यवाद षड्जपंचम ! Happy

फक्त एक सांगावं वाटलं, ती बंदिश 'बेगुन गुन गाइये' अशी आहे>>> हो अगदी खरं. इथं मी किशोरीताईंचे गुणगान करत्तोय म्हणुन मी गुन गुन गाईए असं लिहीलं ! Happy

Pages