पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - १
बरोब्बर एक वर्षापूर्वी म्हणजे २०१३चे वर्ष संपताना आणि २०१४ चे वर्ष सुरु होताना मी माझ्या घरात नव्हते. मी होते पूर्वांचलात! तिथे घालवलेले ते पंधरा दिवस म्हणजे माझ्या विचारांना कलाटणी देणारे, एक वेगळेच आयुष्य दाखवणारे दिवस म्हणायला हवेत. या पंधरा दिवसात आम्ही चार राज्यात, सुमारे अडीच हजार किमी फिरलो, चौदा धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांना भेटलो, तिथल्या लोकांच्याच घरी राहिलो, त्यांचेच जेवण जेवलो, त्यांच्या आयुष्यात थोडे डोकावून पाहिले आणि खूप काही अनुभवले. मग आज एक वर्षाने, इतक्या उशिरा मी त्याबद्दल का लिहितेय? खरंच सांगायचं तर या विषयावर मी भरपूर लिहिलं आहे. त्याचे चक्क एक अख्ख पुस्तक "फोटो सर्कल सोसायटी" ने प्रकाशित केले आहे. मात्र पूर्वांचलातल्या लोकांनाही वाचता यावे त्यामुळे ते पुस्तक इंग्रजीत आहे. त्यावेळची वर्तमान पत्रे इत्यादीनेही या प्रवासाची दखल घेतली होती, पण त्यांचे आयुष्य एखाद दोन दिवसांचे. 'ईशान्यवार्ता' या मासिकासाठी एक मालिका लिहीली. एका दिवाळी अंकासाठीही लिहून झाले. इतके सगळे लिहिल्यावर मलाच वाटले की आपण या विषयावर अतीच लिहीतोय. लोकांना वाटेल की काय ही एकाच विषयावर लिहीत बसलीये! म्हणुन माझ्यापुरत मी ठरवून टाकलं की बास आता अजून यावर काही लिहायचे नाही.
पण मुक्ता यांचे अरुणाचल बद्दलचे लेख वाचले आणि मला जाणवले की मायबोली वाचक आणि ब्लॉगवाचक यांच्यापर्यंत माझे अनुभव पोचलेलेच नाहीत. मी आधी जे लिहिलंय ते फक्त कार्यकर्त्या स्त्रीयांबद्दल होते. आमचे अनुभव असे माझ्या टिपणवही शिवाय कुठे नोंद केलेच नव्हते. आज वर्षभराने देखील ते मला व्यवस्थित आठवतात. ते देखील यानिमित्ताने लिहायचा प्रयत्न करेन. महत्वाचं म्हणजे पूर्वांचलाबद्दल लोक जितके अधिक वाचतील, जितके अधिक जाणुन घेतील तितके इथल्या लोकांना आपण अधिक समजून घेऊ, आपलीशी वागणून देऊ. 'भारतीय असुनही इतर राज्यांकडून आपल्याला सापत्न वागणुक मिळते ' हे इथल्या बर्याच जणांच दु:ख आहे, त्याची सामाजिक, भौगोलिक अनेक कारणं असतील पण तरिही एक भारतीय समाज म्हणुन आपण ती कारण दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या एखाद्या लेखाने लगेच काही मोठा बदल वगैरे होणार नाही हे खरेच, पण ते वाचून एका जरी व्यक्तीला पुर्वांचलाबद्दल ओढ वाटली, तिथले प्रश्न समजावून घ्यावेसे वाटले तर ते खूप आहे.
ही लेख मालिका लिहायला घेतली याचे श्रेय 'फोटो सर्कल सोसायटी', माझे सगळे सहकारी , आम्हाला पूर्वांचलात मदत करणारे अनेक जण यांच्याबरोबरच मुक्ता यांनाही द्यायला हवे.
------------------
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस निवडला गेलाय तो १९व्या शतकात महिलांना समान हक्क मिळवुन देण्याच्या झगड्याला बळ मिळावे म्हणुन साजरा केलेल्या दिवसाची आठवण म्हणुन ! आज सुमारे एक शतकानंतर महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. ही वाटचाल वाखाणण्याजोगी असली तरीही त्यांना माणुस म्हणुन समान हक्क मिळाले आहेत असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. आजही अनेक स्त्रियांना रोजच्या आयुष्यात विविध प्रकारे झगडावे लागते, त्यांना मनोबल देण्यासाठी आणि आजच्या काळातल्या, समाजासाठी झटणाऱ्या तेजस्वीनी महिलांना मानवंदना देण्यासाठी यापेक्षा योग्य दिवस कुठला असेल?
पण सध्या शहरात महिला दिन साजरा करण्यात एक प्रकारची सवंगता येत चालली आहे. खरेदीवर सुट, उगाच भेटी, नसते उत्सवीकरण यात घुसले आहे आणि त्यामुळे या महिला दिनाचे जे विशेष महत्व आहे ते कमी होत चालले आहे असे वाटते. "फोटो सर्कल सोसायटी" या ठाण्याच्या फोटोग्राफर्सच्या संस्थेने मात्र २०१२ सालचा महिला दिन वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची कल्पना मांडली आणि तिला मूर्त रूपही दिलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांच्या कार्याचे प्रकाशचित्रण करून जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवणे हा एक आगळा वेगळा प्रयोगच होता. फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकारांनी काढलेल्या फोटोंचे हे प्रदर्शन 'विद्युल्लता' खूप वाखाणले गेले आणि प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षी महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांचे कार्य प्रकाशचित्रांच्या स्वरूपात 'विद्युल्लता' या प्रदर्शनात मांडले गेले. समाजसेवा, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान, व्यावसाय, विविध सरकारी सेवा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्विनींपासून ते अगदी भाजी/ मासे विक्रेत्या, कचरा उचलणाऱ्या स्त्रियांपर्यंत सगळ्यांचेच कार्य या प्रदर्शनाद्वारे पुढे आणले गेले. आजवर महिलांना कराव्या लागलेल्या कष्टांची आठवण ठेवत आताच्या काळातल्या विद्युल्लतांना फोटोग्राफर्सनी दिलेली ही एक मानवंदना होती.
साधारण ऑगस्ट २०१३ मध्ये एका मिटिंग मध्ये विद्युल्लताच्या शूटसाठी पूर्वांचलात जायची इच्छा आहे असे संजय म्हणाले. तेव्हा अगदी मनात आले की आपल्याला या प्रोजेक्टवर काम करता आले तर किती छान. तेव्हा एका अदृश्य शक्तीने 'तथास्तु' म्हटले असावे पण मला ते तेव्हा ऐकू आले नव्हते. नंतर दोन एक महिन्यानंतर जेव्हा मला 'हे फोटोशुट जमेल का' असे विचारले गेले, तेव्हा 'अर्थातच!' असा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पण काही क्षणातच मला घराच्या विचाराने जमिनीवर आणले. घरी येऊन मी नवर्याशी बोलले कारण प्रश्न 'पंधरा दिवस लेकीला सांभाळायला कोण' असा होता. पण त्याने लगेचच ती जबाबदारी स्वत:कडे घेतली आणि मी पूर्वांचलात जाण्यास मोकळी झाले.
२०१४ सालच्या विद्युल्लता फोटो प्रदर्शनासाठी फोटो सर्कल सोसायटीने एक पाऊल पुढे टाकून महाराष्ट्राबरोबरच पूर्वांचलातल्या मेघालय, असम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या चार राज्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे कार्य प्रकाशचित्रित करायचे ठरवले होते. आम्ही तीन महिला फोटोग्राफर - मी, संघमित्रा बेण्डखळे, वेदिका भार्गवे, दोन पुरुष फोटोग्राफर - श्री. संजय नाईक, कुमार जयवंत आणि अ.भा.वि.प. चे श्री. आशिष भावे अशा सहा जणांनी १५ दिवस पूर्वांचलात फिरून तिथल्या चौदा स्त्रियांना भेटून त्यांचे कार्य जाणून घ्यायचे असा प्लान होता. असा प्लान पुर्ण ठरायच्या आधी संजय नाईक, प्रविण देशपांडे, श्री अरुण करमरकर, आशिष भावे आणि या प्रोजेक्टला मदत करणारे अनेक जण यांच्या अनेक बैठका झाल्या. अरुणजी सुमारे १९८० सालापासून पूर्वांचलासाठी कार्यरत आहेत. त्यांचे मौलिक सल्ले या प्रोजेक्ट मध्ये खूपच महत्वाचे होते. कोणत्या राज्यात कोणाला भेटायचे, कुठून कुठे जायचे , कुठे रहायचे, या सगळ्या प्रवासाचे प्रायोजक इत्यादी बर्याच गोष्टी ठरवल्या गेल्या. खर सांगायचं तर हे ठरवण्यात आमचा काही विशेष हातभार नव्हता. मात्र फोटोग्राफर म्हणुन ज्यांची नावे पुढे आली त्यात आम्ही तिघीही होतो.
एकदा जायचे ठरल्यावर थोडी माहिती गोळा केली, इतर तयारी सुरु केली. तिथे पंधरा दिवस सलग प्रवास! इथल्या चार राज्यातल्या, दुर्गम भागातल्या चौदा स्त्रियांना भेटायचे होते, त्यांच्या कामाचे प्रकाशचित्रण करायचे होते. निघायच्या आधी आमची सगळ्यांची जी मिटिंग झाली त्यात अनेक गोष्टी कळल्या. सुरुवातीला पाच राज्यांचे प्लानिंग होते पण त्याच वेळेस नागालँड इथे जाणारा रस्ता बंद असल्याचे कळले आणि आम्ही केवळ चार राज्यांचा प्रवास प्लान केला. इथूनच पुर्वांचलातल्या दुर्गम भागात जायचे म्हणजे काय अडचणी येऊ शकतात याची चुणूक दिसायला लागली. संजय, आशिष आणि अरुणजी यांनी पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितले की गोष्टी आयत्या वेळेस बदलतील, प्लान बदलावे लागतील, अनेक अडचणी येऊ शकतील त्याची तयारी ठेवा. आम्ही अर्थातच जे होईल त्याला सामोरे जायला तयार होतो.
आम्हाला सामानाबद्दल फार काळजीपूर्वक प्लान करावा लागला. कारण एकतर आम्ही जाणार होतो भर थंडीत, त्यामुळे थंडीचे गरम कपडे वगैरे घ्यायचे होते. पण आमचा मूळ उद्देश होता फोटोग्राफी, त्यामुळे आमचे अवजड कॅमेरे, लेन्स, ट्रायपॉड, फ्लॅश , रिफ़्लेक्टर, लॅपटॉप या अति आवश्यक गोष्टी बरोबर घ्यायच्या होत्या. वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही मुंबईहून जायचा आणि परतीचा प्रवास विमानाने करणार होतो. त्यामुळे हे सगळे सामान काळजीपूर्वक घेऊन जाणे आणि तिथे वागवणे यासाठी बरीच काळजी घ्यावी लागली, तिथे फिरतानाही गाडी असणे जरुरीचे झाले.
शेवटी एकदाचा आमचा जायचा दिवस उगवला. आदल्या रात्री संघमित्रा आणि वेदिका माझ्याकडे येऊन थांबल्या होत्या. पहाटे साडे तीन ला आम्ही घर सोडलं आणि विमानतळावर पोचलो. संजय आणि कुमार वेगळ्या गाडीने पोचले. वेदिका, कुमार पहिल्यांदाच विमानप्रवास करणार असल्याने एकदम नवख्यासारखे वावरत होते. थोड्या वेळाने आशिषही येऊन पोहोचले. त्यानी सगळ्यांचे प्रेस कार्ड बनवून आणले होते. आदल्या मिटिंगच्या वेळेस आमची माहिती आणि फोटो घेऊन ज्यांचे कार्ड नाही त्यांचे बनवून आणतो असे त्यांनी सांगितले होतेच. पण आज आणताना मात्र ज्यांच्याकडे आधीच प्रेस कार्ड आहे त्यांचेच कार्ड त्यांनी बनवून आणले आणि मी व वेदिका प्रेस कार्डशिवायच राहिलो!
तर शेवटी विमानात बसून आम्ही उडालो! आणि काही तासातच “Ladies and gentlemen, welcome to Guwahati Lokapriya Gopinath Bordoloi international airport. Outside temperature is 14 degree Celsius. “ अशी आमच्या वैमानिक कॅप्टन रुचा शर्मा यांनी घोषणा केली. विद्युल्लताच्या फोटोशूट साठी जाताना वैमानिकही स्त्री असावी हा एक मोठाच योगायोग होता!
आम्ही विमानतळाबाहेर आलो आणि एक थंड शिरशिरी अंगावरून गेली आणि इथे भरपूर थंडी असणार याची आम्हाला पुन्हा एकदा आठवण झाली. बाहेर येऊन आमच्या गाडीच्या ड्रायवरला शोधले. आसामचे गोविंदजी ! ते भेटल्यावर आशिष अगदी खुलून असामीत बोलायला लागले. आपण खूप दिवसांनी आपल्या गावात किवा शहरात जाऊ तेव्हा कसा 'आलो बाबा आपल्या माणसात परत ' असा एक भाव असतो अगदी तसाच आनंद आशिषच्या चेहर्यावर झळकत होता. बरोबरच आहे म्हणा सुमारे दहा वर्ष ते इथे पुर्वांचलात राहून कार्य करत होते. इथल्या अनेक भाषा त्यांना मुखोद्गत होत्या. सध्याच्या त्यांच्या पिएचडीचा विषयही पूर्वांचलाशी निगडीत होता. त्यामुळे हा भाग त्यांना अधिक आपलासा वाटत असणारच.
आमचे सामान गोविंदजीनी गाडीवर बांधले आणि झायलो गाडीतून आमचा प्रवास सुरु झाला. आता पुढचे बारा दिवस आम्ही याच गाडीत असणार होतो. एक अनोखा प्रवास ज्यामुळे आमचे अंतरंग ढवळून जाणार होते.
विशेष आभार - फोटो सर्कल सोसायटी
भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/52352
वॉव! फार भारी! ही लेखमाला
वॉव! फार भारी! ही लेखमाला देखील छान होणार! पुढील भाग वाचण्यास उत्सुक!
सुरूवात मस्त झाली आहे .. सगळी
सुरूवात मस्त झाली आहे .. सगळी मालिका वाचायची खूप उत्सुकता आहे ..
मस्त लिहिते आहेस.
मस्त लिहिते आहेस.
थँक्यु जिज्ञासा, सशल, सायो.
थँक्यु जिज्ञासा, सशल, सायो.
हे सगळे लवकरात लवकर लिहून पूर्ण करण्यासाठी विश मी लक. दहा बारा भाग तरी होतील असे वाटतेय.
मस्त..पुढचे भाग वाचायची
मस्त..पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे.
जबरी!! सुरवात एकदम छान!
जबरी!! सुरवात एकदम छान!
एव्हढं जड सामान कसं बसवलं विमानप्रवासात? आयमीन कॅमेरे वगैरे चेकईन केले की बरोबर ठेवले?
मस्त सुरुवात. कसा कसा प्रवास
मस्त सुरुवात.
कसा कसा प्रवास झाला - खरा आणि विचारांचा - ते वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मूळ विद्युल्लता प्रोजेक्टातले फोटो पण येणारेत का?
मस्त सुरुवात.
मस्त सुरुवात.
मस्त.. लिखाणाचा मूळ मुद्दा
मस्त.. लिखाणाचा मूळ मुद्दा पटला. आमच्यापर्यंत ही माहिती डिटेलवार पोचली नव्हती. आता मालिका पूर्ण वाचणार आहे.
मस्त झालीये सुरुवात!
मस्त झालीये सुरुवात!
वाह, तुझ्या या प्रवासा च्या
वाह, तुझ्या या प्रवासा च्या पुढच्या भागा च्या प्रतिक्षेत आहे..
सुरुवात एकदम मस्त. पुढचे भाग
सुरुवात एकदम मस्त. पुढचे भाग वेळेत यायला डोक्यावर बसायची गरज असेल तर सांग.
पराग, Bsk , मृदुला, अमितव,
पराग, Bsk , मृदुला, अमितव, सेनापती...,शैलजा , वर्षू नील, आऊटडोअर्स थँक्यु
एव्हढं जड सामान कसं बसवलं विमानप्रवासात? आयमीन कॅमेरे वगैरे चेकईन केले की बरोबर ठेवले? >> पॅकींग स्कील्स माझी एक रोल करता येणारी सुटकेस आणि एक मोठी सॅक इतकेच सामान झाले होते. ट्रायपॉड आणि रिफ्लेक्टर सुटकेसमधे होता, ती चेकइन केली. हँडबॅग मधे कॅमेरा आणि त्याचे सर्व साहित्य, दोन चार्जर्स, एक अॅपल एअर लॅपटॉप ( त्यामुळे हलका) आणि कपड्याचा एक सेट इतके साहित्य होते. त्याचे वजन मात्र १२/ १५ किलो होते. ही बॅग जवळपास पुर्ण प्रवासभर मला चिकटूनच होती . गाडीत बसलेलो नसु तेव्हा माझ्या खांद्यावर.
कसा कसा प्रवास झाला - खरा आणि विचारांचा - >> नक्कीच. तोच प्रयत्न आहे.
विद्युल्लता प्रोजेक्टातले फोटो >> हो ते येतीलच पण त्या बरोबर आमचे, इतर सटरफटर , पॉइंट अँड शूट कॅमेराने मेमरीज म्हणुन काढलेले फोटोही येतील ( अॅडेड बोनस)
पुढचे भाग वेळेत यायला डोक्यावर बसायची गरज असेल तर सांग >> हो तीन, चार दिवसात पुढचा भाग आला नाही तर डोक्यावर बसच. ही मालिका पूर्ण करायचीच आहे, लवकरात लवकर कारण पुढच्या कराय्च्या बर्याच गोष्टी आल्यात.
सावली, मस्त सुरुवात ! पटापट
सावली, मस्त सुरुवात ! पटापट लिही पुढचे भाग
अरे वा.. पूर्वांचल वरची एक
अरे वा.. पूर्वांचल वरची एक लेखमाला संपली की दुसरी तयार !
लिहित रहा, वाचतोय
मस्त झालिये सुरुवात . पुढच्या
मस्त झालिये सुरुवात . पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत . आयुष्यात एकदा सेव्हन सिस्टर्सची ट्रिप करायच ठरवल आहे
वॉव! खुप मस्त पुढच्या भागा
वॉव! खुप मस्त
पुढच्या भागा च्या प्रतिक्षेत. विचारांचा प्रवास कसा झाला हि उत्सुकता
मस्त सुरुवात. तुझी
मस्त सुरुवात.
तुझी फोटोग्राफीविषयीची पॅशन जाणवतेय.
मस्ट झालीये सुरुवात! मुक्ताची
मस्ट झालीये सुरुवात! मुक्ताची लेखमाला संपली अन अरेरे झालं पण लगेच अरे वा झालं.. छान लवकर लव्कर येऊ देत पुढचे भाग ...
बर्याच प्रतिकुल परिस्थितीला
बर्याच प्रतिकुल परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल ना . पुलेशु.
अगो, मित, जाई., श्री, मेघ,
अगो, मित, जाई., श्री, मेघ, मंजू, बाजिंदा थँक्यु.
फोटोग्राफीविषयीची पॅशन जाणवतेय >>
प्रतिकुल परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल ना >> नाही बाजिंदा. अजिबात नाही. तिथल्या लोकांनी आणि आपल्या इथुन तिथे समाजसेवेसाठी गेलेल्या लोकांनी इतकी मदत केली आणि इतकं जपलं की आम्हाला अजिबातच त्रास झाला नाही. पण हे मात्र जाणवलं की आपल्याला ( म्हणजे मला म्हणा हवं तर) प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय याची जाणीव नसते. तिथे आम्ही ज्यांना भेटलो त्या लोकांचे जीवन पाहुन प्रतिकूल परिस्थिती कशी असु शकते याची नुसती एक झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर बोलती बंद झाली होती. असो त्याविषयी लेखांमधे येईलच.
मस्त! आणि धन्यवाद!
मस्त!
आणि धन्यवाद!
सावली उर्फ स्वप्नाली तुम्ही
सावली उर्फ स्वप्नाली तुम्ही खूप छान लिहिला हा लेख. तुमच्या टिमची छान ओळख करुन दिली आणि तुमच्या कामाचीसुद्धा. ह्या विषयावर लेखन कितीही झाले असले तरी प्रत्येक लेखक वेगळा असतो. प्रत्येकानी आपले अनुभव लिहायलाचं हवे.
मी आवर्जुन तुमचे लेख वाचेन. आणि विपूमधे नवीन लेखाची नोंद केली तर जास्त बरे होईल कारण मी नेहमी इथे येत नसतो. लोकांना आवडत नाही
तुम्ही आत्ता कुठे अहात? जपान की भारत?
मुक्ता, बी धन्यवाद बी, आता
मुक्ता, बी धन्यवाद
बी, आता मी भारतातच असते.
पुढचा भाग लिहीला आहे.
http://www.maayboli.com/node/52352
छान! मालिका वाचायला आवडेल.
छान! मालिका वाचायला आवडेल.
मस्त झालीये सुरुवात!
मस्त झालीये सुरुवात!
अजून एक आवर्जुन वाचणेबल
अजून एक आवर्जुन वाचणेबल मालिका.....
सुंदर छायाचित्रांच्या प्रतिक्षेत !
मी अभाविप मधे होतो तेव्हा आशिष पुर्णवेळ कार्यकर्ता होता. आम्ही बरेच दिव्स सोबत काम केले होते.
सुरेख, सुजा, अतरंगी धन्यवाद.
सुरेख, सुजा, अतरंगी धन्यवाद.
अतरंगी, अरे वा. या प्रोजेक्टसाठी त्यांनी आम्हाला खुप मदत केली.
या मालिकेत देणार असलेली सगळीच प्रकाशचित्रे लौकीकार्थाने सुंदर वगैरे नसतील / नाहीत. त्या स्त्रीयांचे काम दिसेल अशा प्रकारचे चित्रण आणि छोट्या पॉइंट अँड शूट कॅमेर्याने टिपलेल्या मेमरीज आहेत. पूर्वांचलाचे निसर्गचित्रण करायला आम्हाला अजिबातच वेळ मिळाला नाही. जो काही निसर्ग पाहिला तो गाडीच्या खिडकीतुनच.
या मालिकेत देणार असलेली सगळीच
या मालिकेत देणार असलेली सगळीच प्रकाशचित्रे लौकीकार्थाने सुंदर वगैरे नसतील / नाहीत. त्या स्त्रीयांचे काम दिसेल अशा प्रकारचे चित्रण आणि छोट्या पॉइंट अँड शूट कॅमेर्याने टिपलेल्या मेमरीज आहे>>>>>>>>
असेच फोटो पहायला आवडतील. लौकीकार्थाने सुंदर नसली तरी त्यात जिवंत पणा आणि एक छान अनौपचारीकते चा स्पर्ष ( informal /casual touch) असतो.
मस्त! लकी यु! अरुणाचल आणि आता
मस्त! लकी यु!
अरुणाचल आणि आता हे लेख. मजा येणार.
Pages