माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. नुकतेच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्या दिवशी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची एक जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्याने बाबांकडे गळ घातली आणि प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. या माणसाला आपली जागा द्यायची नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.
आमच्याच इमारतीतील एका कुटुंबासंबंधित किस्सा:
आमच्या इमारतीतील एक आजी कर्करोगाने आजारी आहेत. घरात त्यांचे पती, मुलगा, सून आणि दीड वर्षाची नात आहे. त्या आजींना भेटायला म्हणून काही लोक बाहेरगावाहून आले आणि मुक्कामाला चक्क त्यांच्याच घरी राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा, आंघोळीला पाणी काढून द्या, वर त्यांना मधुमेह असल्याने त्याची पथ्य सांभाळा हे त्या कुटुंबाने करत बसायचं का? लोकांना इतकी साधी अक्कल नसते?
सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.
श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथी शेजारीण आईला म्हणाली. "तुमाला आता नौ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुमाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?" समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.
वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्याच दिवशी, "तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!" तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.
माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्या खवैय्यांची पंगत बसली." बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."
"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण". त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्याला पोहोचेपर्यंत थार्यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.
लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.
खरे आहे असे अनेक लोक आपल्या
खरे आहे असे अनेक लोक आपल्या आजुबाजुला असतात. अशा लोकांवर धड रागावता पण येत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
प्रसंगाचे गांभीर्य समजुन घेऊन वागण्याचा पोच पुर्वीपेक्षा कमी होत चालला आहे खरा.
माझे साबु गेल्यावर ३ महिन्यात
माझे साबु गेल्यावर ३ महिन्यात साबा गेल्या, तीनही महिने त्या आजारी अंथरुणावर होत्या आम्ही जोडलेले फ्लॅट घेऊन एकत्रच रहात होतो अणि अक्षरश: मी व माझा नवरा सगळे त्यांचे करत होतो. मोठा दिर व जाऊ नोकरी चे निमित्त करून ५ किलोमीटर वरून स्वत:च्या घरून फक्त रविवारी संध्याकाळी १५ मिनिटांसाठी यायचे व मोजून १५व्या मिनिटाला आम्हा कुणाकडेही न बघता निघून जायचे. त्या जायच्या आधी १५ दिवस मोठा दिर अचानक आमच्या अपरोक्ष आला व अनेक एफडीज् वर साबांच्या सह्या घेऊन गेला. साबुंचे सर्व पैसे स्वत:च्या खिशात टाकले. बँकेतील जावेने नवर्याला मदत करून सर्व पैसे काढून घेतले. आम्हाला पैसे कधीच नको होते तसा विचार ही मनात नव्हता. पण जी बाई आजारी आहे ती आपली आई आहे, तिचाही विचार केला नाही.
अरे बापरे. प्रतिसादात
अरे बापरे. प्रतिसादात लेखापेक्षा अधिक भयानक किस्से येणार तर.
>>>> अरे बापरे. प्रतिसादात
>>>> अरे बापरे. प्रतिसादात लेखापेक्षा अधिक भयानक किस्से येणार तर. <<<<
काळवेळ बघुन बोलण्याचा पाचपोच नसलेले हा वर तुम्ही दिलेला एक प्रकार, तर मढ्याच्या ताळवेवरचे लोणी खाऊ पहाणारे हा डीविनिता यांचेकडील दुसरा प्रकार, दोनही प्रकारची भरपूर उदाहरणे मिळतील.
ही इथे सांगुन काय उपयोग? काही जण म्हणतीलही की "सहानुभुती गोळा" करताय... पण तिकडे दुर्लक्ष करा. कारण ही वाचून, आपणाकडून तसे वागणे/बोलणे झालेले नाही/भविष्यात होऊ नये इतका मेसेज ज्यानेत्याने आपापल्या वकुबानुसार घेतला तरी पुरेसे आहे. त्याने धाग्याचे सार्थक होईल.
(No subject)
मी आखाती देशामध्ये राहते जिथे
मी आखाती देशामध्ये राहते जिथे माझ्या नवरया चा मित्र(langoti यार) एकटाच राहतो. त्याने त्याचे कुटुंब मुंबई ला ठेवले आहे. (पैसा वाचविण् साठी ). तो आमच्याकडे येउन नेहमी खात पीत असतो. माझा सुद्धा नंतर मायदेशी परत जाण्याचा विचार आहे पण अजून कधी ते ठरविलेला नाही. तिथे माझे सासरी राहायचे तर खूप कटकटी आहेत आणि वेगळे राहता येणार नाही म्हणून माझा निर्णय होत नाही आहे. तर या मित्राची आंतरीक इच्छा आहे कि मी इथून लवकरात लवकार परत जावं म्हणजे त्याला माझ्या नवर्यासोबत वेळ मजेत घालवता येइल. हि इच्छा आंतरिक असल्याने मी कधी काही बोलले नव्हते पण एके दिवशी माझा नवरा नसताना तो मला तोंडावर म्हणाला," तू कधी परत जाते आहेस मी याचीच वाट बघतोय म्हणजे मला आणि तुझ्या नवर्याला एकत्र राहता येईल आणि मज्जा येइल."
माझ्या बद्दल माझ्याच जाण्या बद्दल माझ्या तोंडावर बोललेला ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. मी सुद्धा ताड्कन उत्तर दिला कि तुझी हि इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही मी जरी गेले तरी तुम्हाला सुध्धा एकत्र राहू देणार नाही हे नक्की . माझा असा उत्तर ऐकून थंड झाला तो.
एखाद्या नवरा बायकोची ताटातूट व्हावी म्हणून प्रार्थना करणारा मित्र हा खरा मित्र असू शकतो का?
पण याचबरोबर, चांगले /जगावेगळे
पण याचबरोबर, चांगले /जगावेगळे अनुभव देखिल येऊद्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक माझ्याकडून देतो.
पुणे मुक्कामी माझा सख्खा मामा कँसरने वारला. ते मुळात चिपळूणला रहाणारे, उपचाराकरता पुण्यात मुलाकडे आलेले.
त्याचा मुलगा व सून नोकरी व लहान मुलांचे सांभाळून त्याचे सर्व काही करीत होते. मामी देखिल येऊन थांबलेली होतीच.
मामा जाऊ शकेल पण त्यांची इच्छा गावाकडे चिपळूणला जायची आहे, सबब मी उद्या सकाळी त्यांना अॅम्ब्युलन्स मधुन सोबत डॉक्टर/नर्स घेऊन चिपळूणला जाणार आहे असा मामेभावाचा फोन मला रात्री दहाचे सुमारास आला. त्याला सांभाळून रहाण्यास सुचवून, वेळोवेळी परिस्थिती कळविण्यास सांगितले.
प्रत्यक्षात पहाटेचे सुमारास कर्वेरोडवरील हॉस्पिटलमधे मामा गेला. पहाटे चारला मामेभावाचा तसा फोन आला तेव्हा तो भोसरीतील त्याचे घरी होता. तेव्हा परिस्थितीचा अंदाज घेत लिंबीशी चर्चा करून मी तत्काळ परत मामेभावाला फोन लावून, त्याचेशी चर्चा करून, बरोबर काय काय घे, ठरवलेली अॅम्ब्युलन्स मिळणारे का वगैरे विचारुन घेतले व हॉस्पिटलपाशी अमुक वाजेस्तोवर पोहोच असे सांगितले.
दुसरा फोन मी माझ्या पुण्यात रहाणार्या लहान भावासमान असलेल्या एका अत्यंत जवळच्या मित्राला केला व त्यास तत्काळ उठून हॉस्पिटल गाठून तिथुन कागद/माहिती घेऊन मृत्यूवार्ता देऊन डेडबॉडीचा ट्रान्झिट पास घेण्यास सांगितले. कोथरुडमधे रहाणार्या त्याने ते सर्व केले, इतके की झेरॉक्स हव्या तर कसब्यातल्या एका ओळखीच्या दुकानदाराला घरातुन उठवुन आणुन सर्व केले, व सव्वासात वाजेस्तोवर तो परत हॉस्पिटलमधे सर्व कागदपत्रे घेऊन हजर होता. तोवर आम्ही तिथे पोहोचलो.
आधी कल्पना अशी होती की मामेभाऊ अॅम्ब्युलन्समधुन जाईल, व त्याचि कार घेऊन मागोमाग मी जाईन. तोवर स्कूटी तिथेच कुठेतरी पार्क करू. प्रत्यक्षात ऐनवेळेस मी विचार बदलल, व माझी जुनाट सुमो बरोबर घेतली. तो निर्णय योग्य ठरला, कारण अॅम्ब्युलन्स मधे एकदोघेच बसू शकत होते, मामेभावाच्या गाडीत त्याचि आई/२ मुले/बहिण असे असणार होते, व तरीही एकदोन जण व भरपूर सामान होते, ते सुमोत घातले, लिम्बी बरोबर होतीच. बरोब्बर साडेआठला आम्ही पुणे सोडले.
खेडशिवापूरला एका धाबा कम हॉटेलपाशी थांबायचे आधीच बजावून सांगितले होते, त्यानुसार मी त्यांना तिथे थांबवून आधी नाष्टा/चहापाणी करायला लावले व लहान मुलांकरता दुध/पाणी/बिस्किटे वगैरेची बेगमी करून घेतली. वाटेत अर्थातच डिझेल वगैरे भरले होते. या सर्व ठिकाणी वडिलकीच्या नात्याने मी पैसे खर्च केले होते.
नाते वडिलकीचे असले, तरी माझी परिस्थिती तेव्हाही व आत्ताही असे अचानक उद्भवलेले काही हजारातील खर्च करण्याची नव्हतीच नव्हती. पण मला वा लिम्बीला पैश्याच्या त्या गोष्टीचे सोयरसुतक नव्हते, व आत्ताची वेळ देवदयेने निभावुन नेली जाते आहे, आपण सोबत करतो आहोत, उपयोगी पडतो आहोत यातच पराकोटीचे समाधान होते.
होताहोईतो, मजलदरमजल करीत आम्ही चिपळूणांस पोहोचलो, सर्व उरकुन चिपळूणातल्या घरी परतायला पाचसाडेपाच झाले असतील.
त्यारात्री आम्ही तिथेच मुक्काम केला (ज्याबद्दल मी माझ्या एका धाग्यावर लिहीले आहे) व दुसरे दिवशी सकाळी निघालो.
अन इथेच, माझा धाकटा भाऊ त्या अवस्थेतही परिस्थितीचे भान कसे ठेऊन होता याचे उदाहरण घडले. वरीस विस्तृत माहिती त्याच करता दिली.
झाले असे की निघताना भावाने मला एकी बाजूला बोलावुन घेतले व माझे हातात हजाराच्या दोन नोटा कोंबत म्हणला ठेव हे. मी म्हणू लागलो की अरे असे कसे घेऊ या वेळेस, तो म्हणाला ते काही नाही, वेळ सर्वांवर येत्ये... दोघांनाही खरे काय ते माहित होते, माझी खरेच परिस्थिती नव्हती, पण त्याची उच्चारणाही न करता, मी खर्चाचा/मागण्याचा कशाचाच उल्लेखही केला नसताना त्याने वाटखर्चास म्हणून माझे हातात दोन हजार कोंबले. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. त्याच्या डोळ्यात पाणी का होते माहित नाही, पण माझ्या डोळ्यातील अश्रुत काही अश्रू माझ्या कमनशिबी परिस्थितीकरताही होते की अशा मर्तिकाच्या अवस्थेतही मला माझ्या धाकट्या मामेभावाकडून त्याने दिलेली रक्कम घ्यावी लागावी. दोघेही मुकाटपणे आपापल्या कामाला लागलो. नंतर दहाव्याबाराव्याला मला येता येणे कठीण आहे असे त्यास सांगून, व त्याने ते समजून घेऊन मी परतलो.
आत्यंतिक दु:खी अवस्थेतही सोबत आलेल्याची आर्थिक परिस्थिती जाणवून घेऊन व्यवहार सांभाळणार्या भावाचे कौतुक मी करायचे नाही तर कोणी करायचे?
लिंबूकाका, खूप छान अनुभव
लिंबूकाका, खूप छान अनुभव सांगितलात!
गेल्यावर्शी नवर्याचे धाकटे
गेल्यावर्शी नवर्याचे धाकटे काका दीर्घाजाराने वारले .
सगळ्या भावंडात ते लहान .
नवर्याची आत्या भावाच्या अन्त्यदर्शनला आली .घरात पाय ठेवल्याबरोबर टाहो फोडला .
" अस कस रे झालं , माझा सगळ्यात लहान भाउ..." ई.ई.
५-१० मि. फार जोरजोरात रडारड झाली .
" आत्या शांत हो ! " वगैरे करून त्याना सोफ्यावर बसवलं
१०-१५ मि. नी काकाना उचललं . त्याना पाणी वगैरे देउन गेटबाहेर पडेपर्यन्त ,मागच्या मागे आत्या टुण्टुणीत .
त्याच्या मुलीशी ( दोघींच फारस पटत नाही ) वाद घालायला सुरुवात . तु कधी आलीस , मी कधी आले ई.ई.
सगळ्या बायका घरात येउन बसल्या , तर आत्याबाईनी गप्पा चालु केल्या
सगळ्याना हसतमुखाने "काय गं? कशी आहेस ? बरी आहेस ? , बरेच दिवसानी भेटलीस ? मुलं काय म्हणतायत?" सगळ्याची विचार्पूस . काकीकडे एका शब्दाने विचारणा नाही . लक्श पण दिल नाही.
मला सगळा प्रकार विचित्र वाटला . मी आपलं भूवया उन्चावत नणदेकडे बघितलं.
तिने " फार लक्श देउ नकोस" असे हावभाव केले.
चांगला धागा असे म्हटले नाही
चांगला धागा असे म्हटले नाही पाहिजे पण योग्य धागा.
असे अनेकानेक अनुभव आले.
१) नवरा पहाटे साडेचारला गेला आणि साडेसातला बिल्डिंग मधला एक घरे बळकावणारा गुंड माणूस दुखवटा द्यायला आला. तो आता माझा फ्लॅट पण बळकावणार कि काय ह्या भीतीने मला झोप येत नसे नंतर काही दिवस.
२) जे नातेवाईक पुण्याहून आले त्यांची काहीही मदत नाही दिवसभर बसणे बोलणे खाणे इतकेच. त्यांच्यात्यांच्यातच. मी ओळखीच्या एका लोकल मित्राला सांगून सर्वांसाठी ब्रेकफास्ट ऑरगनाइज केला तर एक पुणेरी वहिनी म्हणे ती चांगली मॅनेजर आहे.
३) एक प्रसिद्ध गायिका ज्या दुखवट्याच्या सभेला आल्या होत्या( फॅमिलीची ओळख आहे) सभा संपल्यावर
घरी जेवण नसणार म्हणून त्यांना चायनीज खायला हॉटेलात नेले व नंतर त्या चारमिनारला शॉपिन्ग करायला गेल्या.
४) एका बाईंनी वेगळा सेपरेट दहावा/ चौदावा- शांत ऑरगनाइज केली देवळात व आम्हे घरची पूजा सोडून तिथे यावे असा खूप आग्रह केला.
५) ह्यांचे पती रवीच्या डिपार्चरनंतर आपण परत एकत्र येऊ पूर्वीसारखे असे बोलते झाले डिपार्चर!!
६) व डील वारल्यावर आलेले पाहुणॅ दोन दिवसांनी हैद्राबाद दर्शन ला गेले.
६) सावत्र साबा. आता तुझे तू संभाळ मी काही इथे तुझ्यासोबत येउन राहणार नाही. असे म्ह्णाल्या. वार्यावरच सोडले एकूण.
येतात अनुभव शिकतो माणूस.
नुकतच काही महीन्यांपुर्वी
नुकतच काही महीन्यांपुर्वी शेतावर काम करत असताना वडीलांच निधन झाल. त्या १० दिवसात बरेच चांगले वाईट अनुभव आले.
मुखाग्नि देउन घरी आल्यावर येकाने ( जवळचा नातलग) सगळ्यांसमोर मला माझा पगार विचारला. कारण काय तर त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते आणि त्यांच्या भावी जावयाला भरपुर गलेलठ्ठ पगार होता हे त्यांना सगळ्यांना सांगायचे होते. आणि तो त्यांनी खुप आनंदाने सांगितला पण.
तेराव्यापर्यंत येक कुटुंब दररोज घरी येउन जायच. त्या काकु आणि त्यांची नुकतच लग्न झालेली मुलगी घरात मदत पण करुन जायच्या. आम्ही घरातले बाकी कोणीच ओळखत नव्हतो त्यांना.
काही दिवसानी त्यानी मोठ्या भावाला काही पैसे देउ केलेत. भावाने कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की पाटलानी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाला खुप मदत केली होती पण शेवटच्या वर्षाचा निकाल चांगला निकाल लागुनही मुलाला अजुन नोकरी मिळालेली नव्हती म्हनुन सध्या पुर्ण पैसे नाही देउ शकत. जसे जमेल तसे देतो. त्यांनी सांगितलेला मदतीचा आकडा खुपच मोठा होता. माझे वडील सगळा हिशोब लिहुन ठेवायचे त्यात भावाला अशी काही मदत केल्याची नोंद सापडली नाही. भावाने ते पैसे नाकारले. त्यांनी पुण्याला येउन मला पण सगळ काही सांगितल. पण जर माझ्या वडीलांनी कुठच काही नोंद केलेली नाहीये आणि कोणाला काही सांगितलेल्च नाहीये तर आम्ही ते पैसे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्या काकांना हिशोबाच्या वह्या ज्या अत्यंत खाजगी आहेत त्या पण दाखवल्या. तरी त्या काकांनी त्यांचा मुद्दा काय सोडला नाही. आता तर त्यांच्या मुलाला नोकरीपण मिळाली आहे. आम्हाला यावर अजुन काहीच उपाय सापडला नाहीये. ते कुटुंब तस खुप चांगल वाटल या ५-६ महीन्यातल्या परीचयावरुन तरी. ते खोट बोलतील अस वाटत नाही पण वडील याची नोंदच करणार नाहीत अस पण होणार नाही अशी खात्री पण आहे.
काही मित्र आणि येका चुलत भावाने खुप मदत केली या सगळ्या काळात.
माझे वडील गेले तेव्हा चांगले
माझे वडील गेले तेव्हा चांगले अन् वाईट असे दोन्ही अनुभव आले.
चांगला अनुभव -
वडील हॉस्पिटलमध्येच वारले त्यामुळे घरी आणण्यासाठी अँब्युलन्स केलेली. तिथे भावांसोबत आमचा शेजारी ज्यांच्यासोबत आमचा घरोबा आहे तो संदिपदादा होता हा दादा रिक्षा चालवतो. अँब्युलन्स खर्च या दादानेच केला. काही दिवसांनी जेव्हा मी त्याला पैसे देत होते तरी त्याने घेतले नाही आणि मी बळजबरी केल्यावर तो रडु लागला. त्याची परिस्थिती मला माहित असल्यामुळे मी त्याला पैसे घेण्यास सांगत होते पण त्याला माणुसकी महत्वाची होती पैशांपेक्षा.
वाईट अनुभव
गावावरुन सगळे नातेवाईक आले होते अंतयात्रेला. तस आमच गाव ठाण्याहुन दिड तास अंतरावर. सकाळी ९-१० वाजेपर्यंत सगळेच जमलेले. माझ्या चुलत मामाची सारखी घाई चालु होती की 'लवकर आवरा, जास्त रडत बसु नका, आम्हाला गावाला परत जायचय'. त्याला एव्हढी घाई होती की त्याने वडीलांना अंघोळ घातल्यावर ओल्या कपड्यांवरच नविन आणलेले कपडे चढविले. कुणितरी टोकलं तर त्यालाही ओरडुन गप्प केलं.
मला अश्या दु:खद दिवसात बरेच
मला अश्या दु:खद दिवसात बरेच चांगले अनुभव आलेत. ती लोक कधीच विसरणार नाही.
त्या दिवसातले वाईट अनुभव मी तिथेच सोडुन दिले....
बाप रे निल्सन हर्षद हिशोब
बाप रे निल्सन
हर्षद हिशोब देवघेविचा ठेवतात बहुतेक, मदतीचा नसेल ठेवला बाबांनी.
असे अनुभव थोड्याफार फरकाने
असे अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकाला येतातच. परंतु ते येथे लिहीणे योग्य वाटत नाही. कित्येकदा अगदी जवळचे नातेवाईकच यात असतात.
कित्येकदा अगदी जवळचे
कित्येकदा अगदी जवळचे नातेवाईकच यात असतात. >>> असे जवळचे नातेवाईक फक्त नात्यानेच जवळचे असतात
नातेवाईकांचे फारसे वाईट अनुभव
नातेवाईकांचे फारसे वाईट अनुभव नाहीत, पण कुणी वारल्यावर शववाहिनी मागविली असता ठरलेले भाडे दिले तरी देखील चालक लोक हक्काने वरची बक्षिसी वसूल करतात असा अनुभव आहे.
माझ्या पाहाण्यातली एक केस
माझ्या पाहाण्यातली एक केस वाईट गल्लीत सुरू होऊन आता चांगल्या रस्त्याला लागलेली आहे.
आमच्या जवळच एक बंगल्यांची पन्नास वर्षं जुनी कॉलनी आहे. प्रत्येक बंगला १बी एच के. त्यामुळे बिल्डरांनीही फारसा इंटरेस्ट अजूनपर्यंत दाखविलेला नाही. बंगले शाबूत आहेत.
एका बंगल्यात आई बाप, दोन मुलगे, एक धाकटी मुलगी. मुलगे मोठे झाले, लग्न करून वेगळे झाले. वडील automobiles मध्ये होते. मुलगे ऑटो पार्टस् बनवण्याच्या उद्योगात शिरले. दोघेही सुखवस्तू आहेत. बहिणीचं लग्न होऊ शकलं नाही. ती आईवडिलांबरोबरच आयुष्यभर राहिली. शिक्षिकेची नोकरी. आईवडिलांच्या म्हातारपणाच्या आजारपणात भरपूर खर्च झाला. आता तिच्याकडे पुंजी फारच थोडकी आहे. कालांतराने आई व मग वडील वारले. पण मृत्युपत्र केलं तर मृत्यूला आमंत्रण असतं अशा भोळसट कल्पनेमुळे वडिलांनी कधी मृत्युपत्र केलं नाही.
बहिणीनेच आईवडिलांचं सगळं केलं हे विसरायला वेळ लागला नाही. दोघेही भाऊ घराच्या हिश्श्याबाबत बहिणीच्या मागे लागले. बहीणीला पहिल्यापासूनच आत्मविश्वास नव्हता. तिची तर खराब हालत झाली. एक तर हिच्याकडे केस लढायला पैसे नाहीत. वर कायदा आंधळा असतो. त्यात माणुसकीला स्थान नाही.
मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी भावांचं मन वळवायचा प्रयत्न केला. पण ते काही बधेनात. मग एक मस्त प्रपोजल आलं. ज्या लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात त्या मुलांचं रीहॅबिलिटेसशन करणार्या एका NGOनी हिच्या दिवाणखान्यात आपलं back office थाटलं. बहीण आता त्याच NGOचं पूर्ण वेळ काम करते. त्यामुळे कमर्शियल काम रेसिडेन्शियल जागेत कसं चालू शकतं वगैरे complication नाही. जर ते ऑफिस हलवावं लागलं तर जी bad publicity होईल ती आपल्या धंद्याला पेलवणार नाही हे लक्षात आल्यामुळे त्या दोघा भावांचाही आवाज बंद ! बहिणीलाही चार पैसे मिळतात. आज या गोष्टीला तेरा वर्षं झाली आहेत.
बहीण साठीची आहे, भाऊ साधारण पासष्टीचे. यापुढे तिच्या आयुष्यात तिला काही त्रास होणार नाही याची व्यवस्था झाली आहे.
स्वामींनी म्हटलंच आहे. ठकासी असावे महाठक, उद्धटासी उद्धट.
वरचे काही प्रसंग खरच वाईट
वरचे काही प्रसंग खरच वाईट आहेत, अश्या वेळी माणसं कीती खरी खोटी वागतात हे समजतं .मला फार काही अनुभव नाहीत असे ,सुरवातीला वाटायचे लोकं अश्या दु:खद प्रसंगी अशी कशी विचित्र वागतात. दु:खद प्रसंगीही वैयक्तीक स्वार्थ आणि हेवेदावे काढुन आधिच दु:खात असलेल्या व्यक्तीला आणखी त्रास देतात. पण जेव्हा अश्या विचित्र पोच नसलेल्या लोकांचे स्वभाव जरी माहीत असले तरी, त्या प्रसंगात फार राग येतो आणि तो दु:खाच्या प्रसंगी दाखवताही येत नाही.पण जेव्हा अशी लोकं आपले जवळचे ,लांबचे नातेवाईकच असतात त्याचे खुप वाईट वाटते.
पण लिंबुटिंबु यांच्यासारखा जगावेगळा अनुभवही अनेकदा येतो .
एरवी पण ही माणसं अशीच वागत
एरवी पण ही माणसं अशीच वागत असतात, फक्त दु:खद प्रसंगी आपल्या मनाचा हळवेपणा अधिक वाढलेला असतो त्या वेळी हे प्रसंग ठळक होतात आणि मनात घर करून बसतात.
बापरे प्रत्येकाचे अनुभव वाचुन
बापरे प्रत्येकाचे अनुभव वाचुन खरंच काटा आला .
अमा >>>डिपार्चर,शॉपिंग, चायनिज सगळ्च खतरनाक .
@लिम्बुटिम्बु आत्यंतिक दु:खी
@लिम्बुटिम्बु
आत्यंतिक दु:खी अवस्थेतही सोबत आलेल्याची आर्थिक परिस्थिती जाणवून घेऊन व्यवहार सांभाळणार्या भावाचे कौतुक मी करायचे नाही तर कोणी करायचे?>>+१
आत्यंतिक दु:खी अवस्थेतही सोबत
आत्यंतिक दु:खी अवस्थेतही सोबत आलेल्याची आर्थिक परिस्थिती जाणवून घेऊन व्यवहार सांभाळणार्या भावाचे कौतुक मी करायचे नाही तर कोणी करायचे?>>+१
कुणीतरी व्यवहार सांभाळावाच लागतो. त्याशिवाय त्या दु:खातून बाहेर येता येत नाही. जमीनीवर पाय ठेवून बाहेर आणणारा कुणीतरी असावा लागतो, असे व्यवहाराला धरून वागण्यालाही "पाचपोच"च म्हणतात. शेवटी समोरचा कसा वागतोय, ते आपल्या चष्म्यानुसारच पास/नापास ठरत असते, हेच खरे.
अजुन पर्यन्त अशा आत्यंतिक
अजुन पर्यन्त अशा आत्यंतिक दु:खी आणि वाईट गोष्टीं चे अनुभव आले नाहित.स्वार्थी व मतलबी नातेवाइक मित्र-
मंडळी चे अनुभव आहेत.
माझे दोन्ही मुल बाहेर देशात आहेत त्यावरुन मात्र लोकांचे सहानुभुती कारक बोलनी ऐकावी लागतात.तुमचे पुढे कसे
होनार मुल परतुन येनार नाहित. वय झाल्यावर तुम्हाला कोन सांभाळणार तिकडच्याच मुलिंशी लग्न केलतर वगैरे..
अशी"पाचपोच" नसलेली बोलनी ऐकायला नको वाटतात.
लेखातील आणि प्रतिसादांतील
लेखातील आणि प्रतिसादांतील अनुभव विचार करायला लावणारे आहेत...
कुणीतरी व्यवहार सांभाळावाच
कुणीतरी व्यवहार सांभाळावाच लागतो. त्याशिवाय त्या दु:खातून बाहेर येता येत नाही.
>>>>>
सहमत आहे,
निष्कर्श काढायच्या आधी एकदा हा निकषही लावून बघावा.
तसेच बरेचदा दूरचे नात्यातले लोक वेळात वेळ काढून येतात, तेव्हा ते देखील पुरेसे समजावे.
बाकी जे खरेच दुखात असतात त्यांना इतर कोण कसे वागताहेत की ढोंगे करताहेत याने ना फरक पडत असावा ना त्याकडे त्यांचे लक्षही जात असावे.
आपणच एखाद्याला आपल्या जवळची व्यक्ती समजायचे आणि आपल्या दुखात त्यांनी सहभागी व्हावे हा हट्ट धरणे हे देखील योग्य नाही. तुम्ही त्यांच्याशी आपली असलेली जवळीक किती होती हे ओळखायला चुकलात यात त्यांचा काय दोष..
वगैरे वगैरे बरेच लिहिता येईल ..
यात वरच्या कोणाच्या भावना खोडायचा हेतू नाही.
माझा असाच काहीसा अनुभव आहे,
माझा असाच काहीसा अनुभव आहे, चांगला की वाईट काय की!
तर झाले असे की थोरला भाउ वारला, तेव्हा अंत्यकर्माच्या तयारीकरता एका मित्राला पाचशे रुपये देऊन वैकुंठ स्मशानभूमित पुढे पाठविले. अॅम्ब्युलन्स वगैरे मी योजिली होती. सर्व यथासांग पार पडले.
पुढे चारपाच महिन्यांनी माझा एक नातेवाईक मला फोनवरून सांगू लागला की अंत्यविधीचे वेळेस त्याचे पाचसहाशे खर्च झालेत, व हे पैसे उधार/देणे ठेवू नयेत म्हणूनच केवळ मागतोय !
अर्थात, इकडचे तिकडचे करून मी त्यास ते पैसे देऊन टाकले.
पण मग माझ्यापुढे प्रश्न उभाराहिला की ज्या मित्राकडे मी आधीच ५०० रुपये दिले होते तो तर आत्यंतिक विश्वासू होताच व जवळपास सर्व रचना त्यानेच केल्या होत्या, तर या नातेवाईकाने पाचसहाशे कशाकरता खर्च केलेत? एक तर मित्र खोटा पडत होता वा नातेवाईक तरी. मी खोटेपणाचा निर्णय लावण्याच्या भानगडीत पडलो नाही, पण शंकेची पाल आजही मनात चुकचुकतच राहिली आहे. व जो नि:ष्कर्ष माझे मनात उद्द्भवलेला आहे, तो उघड सांगणे योग्य वाटत नाही.
आज २०१४ मधे तुम्हा कुणाला ५०० रुपड्यांची तितकीशी किंमत वाटणार नाही, पण मी ही कथा १९९४ मधील सांगतो आहे, ज्यावेळेस पाचशे रुपये खूप मोठे होते व ती मागणी पुरविताना माझी व लिंबीची दमछाक झाली होती.
दुसरे असे की नातेवाईक जे सांगत होता की "अंत्यविधीचे वेळेस त्याचे पाचसहाशे खर्च झालेत, व हे पैसे उधार/देणे ठेवू नयेत म्हणूनच केवळ मागतोय" याचे नेमके उलट संस्कार आमचेवर झालेला की कुणाचे अंत्यविधीत काही खर्च केला तर तो परत मागू नये ! आता काय खरे नी काय खोटे ?
सहा महिन्यांपूर्वी आई अचानकच
सहा महिन्यांपूर्वी आई अचानकच गेली तेव्हा मला मात्र तो धक्काच होता. पण वरचे अनुभव वाचून वाटतंय की हे धक्का वगैरे ही बरेच जणांना कवटाळता येत नाही. दुनियादारी खाडकन भानावर आणते. आईच्या वेळी चुलत भाऊ आणि वहिन्यांनी मात्र खूपच जपलं मला.
limbutimbu तुमचे अनुभव मनाला
limbutimbu तुमचे अनुभव मनाला स्पर्श करणारे आहेत. कठिन प्रसंगी दुसर्यांना मदत करण्याचे चांगले संस्कार
आहेत तुमच्यावर.
"नेकी कर और दर्या में डाल."
मला वाट्ते आता पाचपोच हा शब्द
मला वाट्ते आता पाचपोच हा शब्द प्रयोगच फारसा वापरला जात नाही.
माझे सासरे असेच अचानक वारले ५२ व्याच वर्शी व हार्ट एटॅकनेच. तेव्हा रवी २७ व मी आणि नणंद १८- १९ जस्ट एस वाय मध्ये होतो वगैरे. तर अचानक वडील गेल्याने तो हादरलेलाच होता. वडिलांचा पगार झालेला. तर गोदरेजच्या कपाटात उजव्या बाजूस बारकी खाच असते त्यात त्या पगारातले उरलेले पैसे सापडले होते अचानक. तेव्हा पासून मी नेहमी ती जागा उगीचच तपासून बघत असते.
पूर्वी लग्नकार्याच्या निमित्ताने पुण्या मुंबईचे लोक हैद्राबादेस ट्रेन ने येत. एक लग्न उरकून एक वर्हाड असेच परत जात होते तर सर्व गाडीत बसलेले. गाडी फलाटाला लागलेली व आता निघायची. तर एकांना जबरदस्त हार्ट अॅटेक आला व ते तिथेच गेले. तर रवी व मित्रांनी धावपळ करून त्यांचे व्यवस्थित विधिवत फ्युनरल करवले. आलेले लोक पाहुणे असल्याने त्यांना फारशी माहिती नव्हती. ८० च्या दशकातली कथा.
एक दोन मित्र असेच एक्स्पर्ट होते म्हणजे कोणी वारले तर तिथे जाउन सामान आणायचे, आवश्यक ते करायचे इत्यादि बायको त्यांची भात पिठले पाठवत असे. तेव्हा मराठी समाज एकमेकांना धरून असे.
रवीचा एक कलीग होता उत्तरांचलचा. रवी गेल्यावर त्यानेच फ्युनरलचे बुकिण्ग वगैरे केले व मला नंतर म्हणे साब के लिये कितना हॉटेल बुकिन्ग किया था और आज ये किया. मग आम्ही अश्रुपात हे आहेच. यू रिअली लूज काउंट ऑफ हाउ मेनी टाइम्स यू क्राय. मग ते इतरांना एंबरासिगं पण होते. डेथ सर्टिफिकेटही गुलाबी रंगाच्या कागदावर छापून आले. सरकारी प्रेम!!
Pages