पाचपोच

Submitted by कोकणस्थ on 13 January, 2015 - 00:13

माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.

हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. नुकतेच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची एक जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्याने बाबांकडे गळ घातली आणि प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. या माणसाला आपली जागा द्यायची नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.

आमच्याच इमारतीतील एका कुटुंबासंबंधित किस्सा:
आमच्या इमारतीतील एक आजी कर्करोगाने आजारी आहेत. घरात त्यांचे पती, मुलगा, सून आणि दीड वर्षाची नात आहे. त्या आजींना भेटायला म्हणून काही लोक बाहेरगावाहून आले आणि मुक्कामाला चक्क त्यांच्याच घरी राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा, आंघोळीला पाणी काढून द्या, वर त्यांना मधुमेह असल्याने त्याची पथ्य सांभाळा हे त्या कुटुंबाने करत बसायचं का? लोकांना इतकी साधी अक्कल नसते?

सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्‍यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.

श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथी शेजारीण आईला म्हणाली. "तुमाला आता नौ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुमाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?" समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.

वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्‍याच दिवशी, "तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!" तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.

माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्‍या खवैय्यांची पंगत बसली." बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."

"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण". त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्‍याला पोहोचेपर्यंत थार्‍यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.

लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील धाग्याचे जोडीने/समांतर माझा येथिल धागा जरुर नजरेखालून घालावा...
मरणोत्तर अन्तिमसन्स्कारान्चे अनुभव व त्यावरील भाष्य
http://www.maayboli.com/node/8676

अमा, रवि नी त्याच्या मित्राचे काम भारीच.
माझी आई नेहेमी सांगायची, बाकी कशात सामिल झाला नाहीस तरी चालेल, पण अंत्यविधीच्या कामात जरुर जरुर सहभागी होऊन होता होईल तितकी जास्तीतजास्त मदत कर. ते कधीही टाळू नकोस. आजवर मी ते पाळत आलोय.

अमा, रवि नी त्याच्या मित्राचे काम भारीच.>> तो एक अतिशय चांगला व डिपेंडेबल मित्र होता. एका ची आई गेल्यावर एक दीड तासाच्या नोटीसवर त्याने मित्राला स्वतः ड्राइव्ह करून सोलापुरास अंत्यदर्शनाला नेले होते. रात्रीचे ड्राइव्ह करून.

तुझे देखील कौतूक लिंबाजी पंत.

लग्न कार्य आणि मर्तिक ह्या दोन्ही वेळी आपण समाजाचा किती अतूट भाग आहोत ते समजून येते. किती खोल धागे दोरे बांधलेले असतात ते समजते. निदान भारतात तरी हे खरे आहे. जोडलेली माणसे भेटून जातात. सहभागी होतात काही वाइट अनुभव येतातही पण ओवरॉल एक मृत्यू अनुभवून आपण खूप शिकतो हे ही खरे आहे.

माझा अनुभव काही दुखद वगेरे नाही पण संतापजनक नक्कीच आहे.

माझ्या साबांचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे ८-१० दिवस मुक्काम हॉस्पिटलमधे होता. त्यांचे मामा-मामी भेटायला आले होते. मामी एका हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्टिव मेंबर आहेत. त्या संघटनेच्या आश्रमातच त्या रहातात.

माझ्यात आणि मामींच्यात खालीलप्रमाणे संवाद झाला
मामी - तु काय करतेस?
मी - नोकरी
मामी - असे नाही म्हणजे सकाळी
मी - (मनातल्या मनात - सकाळी काही करायला वेळ कोणाकडे असतो) लेकीचे आवरून तिला शाळेत पाठवते. मग स्वतःचे आवरून ऑफीसला जाते.
मामी - नाही म्हणजे देवाचे काय करतेस?
मी - काही नाही. माझा विश्वास नाही.
मामी - $#$@$$%&^&**& (माझे बरेच बौधीक घेतले)

थोड्या वेळाने
मामी - तु कुंकू, मंगळसुत्र काहीच घालत नाहीस. मला हे आवडले नाही.
मी - (एव्हाना माझे डोके आऊट झाले होते) मामी हे ज्याच्यासाठी घालायचे तो ६ फुटी नवरा बरोबर असतो म्हणून असल्या छोट्या छोट्या मी गोष्टी घालत नाही.

मग मामींनी त्यांच्या संघटनेची काही पत्रके मला दिली आणि त्यात लिहिल्याप्रमाणे वागण्यास सांगितले.

माझा मुद्दा असा आहे की देव मानणे, कुंकू, मंगळसुत्र इत्यादी वापरणे ह्या वैयक्तीक गोष्टी आहेत. त्यावर मतभिन्नता असू शकते. मामींच्या वयाच्या बाईला माझे वागणे नावडू शकते. आणि मला हे सर्व करायला सांगणे हे त्यांच्या संघटनेच्या कामाचा एक भाग असू शकते पण ही चर्चा करण्याची ती जागा नव्हती. आजारी भाच्चीला भेटायला आलात तिची चौकशी करा, तिच्या जवळ बसा. ते सोडून काहीतरी फलतू वाद घालणे सर्वस्वी चुक आहे.

मी माहेरी गेले, की तिथली बाजूची १ आंटी कायम विचारायची, कब जा रही हो वापिस? अगदी काल आले सांगितलं तरी Uhoh
एका खेपेस तर नवरा चीन ला गेलेला असल्याने मी महिनाभर सुटी काढून गेलेले असताना तिला संशय आलेला की हिला "नवर्याने टाकली की काय" Biggrin तशा आशयाचे प्रश्न ती विचारायची...

"नवर्याने टाकली की काय">>> :खो खो:
आपल्या घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांनाच जास्त चौकशा असतात.

मी असते तर तोंडावर काही तरी सुनावलं असतं >>> रीया, माझीपण तिच इछा होती पण असा फालतूपणा करायला जमत नाही न Sad इन फॅक्ट माझ्या नवर्याला पण टेन्शन आले होते की मी आता भडकते का काय म्हणून Proud

कब जा रही हो वापिस?>>> माझी लेक ३-४ वर्षांची असताना माझी बहीण घरी आली लगेच असं विचारायची Proud अर्थात तिला असे विचारायचे असे की मावशी तू किती वेळ आहेस दंगा कराया Happy

<मामी - तु कुंकू, मंगळसुत्र काहीच घालत नाहीस. मला हे आवडले नाही<>
अवांतर- या मामी रामतीर्थकर मामी तर नव्हेत?

>>असे जवळचे नातेवाईक फक्त नात्यानेच जवळचे असतात

अक्षरशः +१०००००००.....असल्या सर्व नातेवाईकांच्या नावाने कित्येक वर्षांपूर्वीच आंघोळ करून मी मोकळी झालेय.

Pages