ड्रॅगनच्या देशात ११ - शांग्रीला (पृथ्वीवरचा स्वर्ग) : पुडाकुओ राष्ट्रीय उद्यान, सोंगझानलीन लामासरी आणि ड्रीम शांग्रीला

Submitted by इस्पीकचा एक्का on 16 December, 2014 - 01:00

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

सहलीचा दहावा दिवस उजाडला. आजचा पहिला कार्यक्रम होता पुडाकुओ राष्ट्रीय उद्यानाला भेट. या जागेची प्रसिद्धी पृथ्वीवरची जगातली सर्वात सुंदर नैसर्गीक जागा म्हणून आहे त्यामुळे मनांत खूपच उत्सुकता होती हे सांगायला नकोच. पण आतापर्यंत एवढे सुंदर प्रदेश पाहिले, आता अजून काय बघणार अशी उत्सुकताही मनांत दाटून राहिली होती. गडबडीने पण छानपैकी न्याहारी आटपली कारण राष्ट्रीय उद्यान म्हणजे आंत खाणेपिणे नाही, कचरा करणे नाही आणि अगदी झाडाची मोडलेली काडीही उचलायची नाही वगैरे नियम माहीत होते. शिवाय गाइडने खूप चालायची तयारी ठेवा असे सांगितले होते. म्हणजे शरीराच्या गाडीत पुरेसे पेट्रोल असणे जरूर होते.

पुडाकुओ अथवा पुदात्सो राष्ट्रीय उद्यान (Pudacuo / Pudatso National Park) शांग्रीला जिल्ह्यामधील २,००० चौरस किमी जागा व्यापून आहे. २५ जून २००७ पासून याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नैसर्गिक राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यात प्राचीन काळापासून फारसे मानवी संसर्गात न आलेले एक जंगल आहे. शिवाय त्यांत बिटा व शुडू नांवाची दोन सरोवरे आहेत. हे सर्व उद्यान समुद्रसपाटीच्या साधारणपणे ३.५ किमी वर आहे. चीनमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींच्या नमुन्यांपैकी २० टक्के या प्राचीन जंगलांत सापडतात एवढे समृद्ध हे जंगल आहे. शांग्रीलापासून तासाभराच्या चारचाकीच्या प्रवासानंतर आपण उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो.

तेथून उद्यानाची बस आपल्याला १३ किमी दूर मुख्य जंगलाच्या सुरुवातीस नेऊन सोडते. येथून हे विशाल उद्यान बघण्यासाठी बस, बोट व पायी चालणे असे तीन पर्याय आहेत. गाइडबरोबर चर्चा केल्यावर असे कळले की सगळा प्रवास पायाने केला तर ६ ते ८ तास लागतील शिवाय कमीतकमी १२ ते १५ किमी चालावे लागेल. मग गाइडशी चर्चा करून असा बेत केला की प्रथम ३ किमी चालत जायचे कारण हा भाग अगदी जवळून फारच सुंदर दिसतो. नंतर दहा एक किमी बसने सफर करायची. परतीच्या वाटेवर बोटीने बिटा सरोवराची चक्कर मारत यायचे आणि शेवटचे दीडदोन किमी परत पायी चालायचे. हे सर्व साधारण साडेतीन चार तासांत होईल व चालताना वाटेवर हवा तेवढा वेळ आपल्याला आवडलेल्या जागांवर थांबून निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेता येईल आणि फोटोत कैदही करून आणता येईल.

गाइडने पाणी बरोबर घेतल्याची खबरदारी घेतली आणि आम्ही चालू लागलो. येथून पुढे फक्त पाणी (तेही स्वतःजवळचे कारण येथून पुढे उपाहारगृहांना बंदी आहे) पिता येणारा होते. खाण्याचे पदार्थ नेण्यास व विशेषत: ते जंगलातल्या प्राण्यांना देण्यास बंदी आहे. मुख्य म्हणजे सर्व सहलभर वनरक्षक अभावानेच आढळले, तरीसुद्धा या कायद्याचे उल्लंघन करणारा एकही प्रवासी आढळला नाही... अगदी लहान मुले जमेस धरूनही. जागोजागी साधारणपणे २-३ किमी वर स्वच्छ स्वच्छतागृहे होती त्यामुळे इतर काही कारणानेही जंगलाची स्वच्छता खराब करण्याची कोणाला आवश्यकता वाटण्याची शक्यता नव्हती.

या पुलावरून आम्ही मंतरलेल्या चैत्रबनात प्रवेश केला आणि निसर्गाच्या कवेत केव्हा सामावून गेलो ते कळलेसुद्धा नाही.

.

.

सकाळची वेळ, अजून धुके पूर्णपणे निवळले नव्हते. समोर शांत सरोवर, पलीकडे लांबच लांब हिरवळ, त्या पलीकडे हळूहळू उंचावत जाणारे डोंगर, डोंगरांच्यावरचे घनदाट सूचिपर्णी वृक्षांचे दाट प्राचीन जंगल आणि या सर्वांवर भरून राहिलेली शांतता. सगळे प्रवासी शांतपणे हे सर्व पाहत पाहत पुढे तरंगत जात होते. चार चिनी मंडळी जमली की रेस्तरॉमधला होणारा गलबला आता माझ्या चांगला ओळखीचा झाला होता. पण येथे मात्र सर्व शांतपणे सृष्टीसौंदर्य पाहण्यात दंग झालेले होते. फारतर 'हे बघ, ते बघ' अश्या अर्थाची हलकी कुजबूज ऐकू येत होती.

.

.

या वनांत पायी चालणार्‍या प्रवाशांची पादत्राणे ओल्या मातीने खराब होऊ नये याकरिता सर्व जंगलभर लाकडी मार्ग बनवलेले आहेत. मुख्य म्हणजे एवढा पाऊस व सतत असणारा मातीचा ओलसरपणा असे असूनही ते मार्ग उत्तम अवस्थेत ठेवलेले आहेत...एकाही ठिकाणी मोडक्या अथवा उचकलेल्या फळीची अनवस्था दिसली नाही !

.

एका बाजूला होते संथ, शांत, धीरगंभीर सरोवर आणि त्याच्या काठापासून लाकडी मार्गापर्यंत पसरलेला हिरवागार गालिचा...

.

.

त्या गालिच्यावर उडवलेल्या रंगांच्या शिंतोड्यांसारखी दिसणारी असंख्य प्रकारांची व रंगांची रानफुलांची नक्षी...

.

.

.

.

.

आणि मधूनच दिसणारे व प्रवाशांची फिकीर न करता शांतपणे चरणारे रानटी घोड्यांचे कळप.

तर दुसर्‍या बाजूला प्राचीन "स्पॅनिश दाढीधारी" सूचिपर्णी वृक्षांचे जंगल (Spanish Bearderd Forest)! दुरून पाहिल्यास या झाडांना अगदी चिनी चित्रपटातील म्हातार्‍या 'कुंगफू मास्टर'च्या दाढीसारखी मोठी पांढरी दाढी आल्यासारखे दिसते. ही दाढी म्हणजे वृक्षांवर वाढणारे एका प्रकारचे Moss आहे.

.

मधूनच काही ठिकाणी भडक लाल-नारंगी रंगाची पाने नजिकच्या भविष्यात येणाऱ्या पानगळीची नांदी देत होती.

.

पूर्ण भरात असताना पानगळीचा मोसम अशी रंगांची उधळण करतो. (खालिल दोन चित्रे आंतरजालावरून साभार)

Photos of Pudacuo National Park, Shangri-La County
This photo of Pudacuo National Park is courtesy of TripAdvisor

.

Photos of Pudacuo National Park, Shangri-La County
This photo of Pudacuo National Park is courtesy of TripAdvisor

पायी फिरताना टिपलेली अजून काही प्रकाशचित्रे...

.

.

.

.

.

फिरता फिरता तीन किमी कसे संपले ते कळलेही नाही. उद्यानाच्या आतल्या मार्गावरून उद्यानाच्या बसेस सतत फेर्‍या मारत असतात. कोणत्याही मधल्या थांब्यावर प्रवासी चढू-उतरू शकतात. आम्हीही एका थांब्यावर बस पकडली आणि पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू केला.

प्रथम थोडावेळ जंगलातून प्रवास झाल्यावर एक विशाल कुरण लागले. चारी बाजूंनी दाट झाडी, मध्ये ते कुरण, त्यांतून वाहणारे झरे, मधूनच चरणार्‍या गुरांचा कळप आणि एखादे वन्य जमातीचे घर असा चित्रपट चालू झाला. काही शतके एक वन्य जमात येथे राहत असल्याने त्यांनाच फक्त उद्यानाच्या या भागात राहायला परवानगी दिलेली आहे.

.

.

.

.

आता तिसर्‍या भागात हेच जंगल पण बोटीने जरा दुरून पाण्यावरून बघायचे होते.

तेच डोंगर, तेच जंगल, तेच वृक्ष आणि तीच हिरवळ... परंतु पाण्यावरून थोडे दुरून ते दृश्य जरा अधिकच मनोहर दिसत होते.

.

.

.

.

हा प्रवास जरा लवकरच संपला असे वाटले, पण बोटीला परतायचे असल्याने नाइलाजाने उतरायला लागले. येथून पुढे चवथा पुन्हा चालायचा टप्पा सुरू झाला. इथल्या गवताळ कुरणावर निसर्गाने जरा जास्तच रंग शिंपडलेले होते !

.

जागोजागी मोक्याच्या ठिकाणी प्रवाश्यांना आरामात बसून निसर्गसौंदर्याचा आनंद घेता यावा यासाठी सोय केलेली होती.

आजपर्यंत खूप जंगले पाहिली. पण इतके भारून टाकणारे हे पहिलेच. श्रीकृष्ण गायी चरायला न्यायचा ते पुराणकाळातले नंदनवन असेच होते का? हा एक प्रश्न अचानक मनात चमकून गेला.

.

पाय निघत नव्हता. पण परत फिरणे भाग होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या तिबेटी घरांचे फोटो काढीत शांग्रीलाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. नवीनंच आलेल्या सुबत्तेमुळे बर्‍याच घरांचे नूतनीकरण चालू होते. एका वर्षाभरात या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक आकर्षक तिबेटी घरे दिसतील आणि कदाचित ही जागाही एक प्रवासी आकर्षण होईल असे दिसते.

.

.

.

पुढचा थांबा जेवणाकरिता होता. "येथे एक छान तिबेटी रेस्तरॉ आहे, चालेल का?" असे गाइडने विचारले. कालचा तिबेटी जेवणाचा अनुभव चांगला होता त्यामुळे लगेच होकार दिला. जेवण तर छान होतेच पण रेस्तरॉमधील नक्षीदार रंगरंगोटीही बघण्यासारखी होती.

.

.

.

पुढे जायचे होते सोंगझानलीन लामासरी बघायला. ही युन्नानमधली सर्वात मोठी लामासरी आहे. ३३.३ हेक्टर क्षेत्रफळावरच्या या बौद्धमठाची रचना ल्हासामधील पोताला पॅलेस (तिबेटी बौद्ध संप्रदायाचे मुख्य, सर्वात मोठे व सर्वात पुज्य ठिकाण) डोळ्यासमोर ठेवून केली आहे. त्यामुळे या जागेला भेट देऊन तिबेट भेटीची कमतरता काही अंशी भरून निघणार होती.

हे आहे लामासरीला घेऊन जाणार्‍या बसचे तिकिटघर.

.

आणि हा चिनी इंग्लीशचा नमुना.

त्यांना म्हणायचे आहे की "बसमध्ये कचरा करू नका / बस स्वच्छ ठेवा"... पण लिहीले आहे की "बसमध्ये सतत स्वच्छता करत रहा" !

लामासरीचे दूरून घेतेलेले एक मनोहर चित्र.

जसजसे आपण लामासरीच्या जवळ जाऊ लागतो तसे तिच्या भव्यतेची कल्पना येऊ लागते. हे आहे मुख्य प्रवेशदार.

.

तेथून पुढे चढण लागते व नंतर पायर्‍या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लामासरीत राहणार्‍या बौद्धभिक्षुंची घरे आहेत. प्रवेशद्वाराच्या आंत घर बांधायला अगदी छोटीशी जागा मिळणे हाही एक फार मोठा बहुमान समजला जातो. मात्र हे घर भिक्षूला स्वतःच्या कष्टाने बांधायला लागते. फारफारतर अगदी जवळचे नातेवाईक मदत करू शकतात, पण दाम देऊन काम करवून घेण्यास सक्त मनाई आहे. तसेच घरचा कितीही मोठा अथवा श्रीमंत असला तरी येथे येताना बौद्धभिख्खूला सर्वसंगपरित्याग करूनच यावे लागते.

टेकडीवरच्या विस्तीर्ण आवारात लामासरीच्या अनेक भव्य मुख्य इमारती आहेत.


.

.

आणि त्या अर्थातच तिबेटी कलाकुसरीने आणि मनोहर रंगांनी नुसत्या भरभरून ओसंडणार्‍या आहेत.

.

.

लामासरीच्या आवारातून शांग्रीला नगरीचे व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.


.

लामासरीचा पॅनोरॅमीक फोटो

हॉटेलवर परतेपर्यंत चार वाजले होते. शॉवर व कॉफी आटपून ताजातवाना झालो. पाच वाजता गाइड परत आली...आणि संध्याकाळच्या भरगच्च कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम जुन्या शांग्रीलाच्या चौकांकडे मोर्चा वळवला. कारण तेथे संध्याकाळी स्थानिक लोक एक मोठे रिंगण करून तिबेटी संगीताच्या तालावर नृत्य करतात ते बघायचे होते. हा कार्यक्रम दोन ठिकाणी होतो... प्रथम नविन मोनॅस्टरीच्या (आज वेळ नसल्याने आपण ह्या मोनॅस्टरीला उद्या भेट देऊ) प्रशस्त प्रांगणात गेलो. सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संगीताच्या तालावर तिबेटी नाचाची पावले टाकत होती. काटेकोर नाच करण्यापेक्षा मजा घेण्यावर जास्त भर होता. नागरिक आग्रहाने प्रवाशांना सामील होण्यास आमंत्रण करत होते. चीनच्या सुदूर प्रदेशांतून आलेल्या चिनी लोकांची तिबेटी नाच करताना होणार्‍या त्रेधातिरपिटीची मजा बघे आणि ते स्वत:ही घेताना दिसत होते !

दुसरा थांबा घेण्यासाठी शांग्रीलाच्या गल्लीबोळांतून निघालो....

आणि जुन्या शांग्रीला बाजारपेठेतील चौकात पोहोचलो. तेथे नाचगाणे तर चालू होतेच...

पण तिबेटी फास्टफूडचीही व्यवस्था होती. डोळ्यांबरोबर जिभेचेही चोचले पुरवले गेले ! +D

हे सगळे होईपर्यंत सात वाजत आले होते. साडेसातचा "ड्रीम शांग्रीला शो" बघायला निघालो. त्या कार्यक्रमाची गाइडने खूप स्तुती केली होती पण तेथे असे राजेशाही स्वागत होईल असे सांगीतले नव्हते !

.

या कार्यक्रमात शांग्रीलाच्या लोककलांची अत्यंत बहारदार पद्धतीने ओळख झाली.

याक नृत्य

ही शांग्रीलाची प्रसिद्ध गायिका (जणू तिथली लता मंगेशकर !), आपल्या धारदार, खणखणीत व गोड पहाडी आवाजाने तिने सर्व प्रेक्षागृह हलवून सोडले.

ह्या प्रसिद्ध गायकाच्या नावावर अनेक लोकप्रिय अल्बम्स आहेत. त्याच्या मधूर आवाजाला उपस्थित रसिकांचा पुरेपूर प्रतिसाद मिळला नसता तर आश्चर्य वाटले असते.

गाण्यांचे शब्द समजत नव्हते पण कान नक्कीच खूश होत होते.

कार्यक्रमाची अजून काही दृश्ये...

.

.

.

.

ड्रीम शांग्रीला कार्यक्रम त्याच्या नावाला पुरेपूर जागला... हे शांग्रीलातले स्वप्न कायमचेच स्मरणात राहील !

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुडाकुओ अथवा पुदात्सो राष्ट्रीय उद्यानाचे सारे फोटो पाहूनच पारणे फिटले डोळ्याचे ..... Happy

मस्त लेखमाला - मस्त फोटो ...