अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद (पांवस)
आजारपण हे काही आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. कुणाकुणाची आजारपणे लिहून काढायची म्हटली तर प्रत्येकाचा एकेक ग्रंथ होईल इतकी विविधता अणि व्यापकता त्यात आहे.
पण याच आजारपणाचा उपयोग आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी कोणी करुन घेतल्याचे ना ऐकिवात आहे ना पहाण्यात आहे.
पांवसचे पूजनीय श्री स्वामी स्वरुपानंद यांनी हा अनुभव स्वतः घेतला व तो "अमृतधारा" या अगदी छोटेखानी पुस्तकात लिहून ठेवला. अतिशय सुरेख व प्रासादिक साकीवृत्तात हे सर्व त्यांनी लिहिले आहे. हे सगळे अनुभव म्हणजे एका साधकाचा सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास म्हणायलाही हरकत नाही.
स्वामींजींचे नाव श्री. रामचंद्र विष्णु गोडबोले. १९०३ चा जन्म. पांवस हे जन्मस्थळ.
तरुणवयात स्वामीजींनी महात्माजींच्या चळवळीत भाग घेतला होता. सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे १९३२ साली अल्पकाळ ते येरवडा कारागृहातही होते. याआधी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी बाबामहाराजांकडून परमार्थसाधनेची दीक्षाही घेतली होती. त्यानुसार ते पारमार्थिक साधनाही करीत होते.
पुढे १९३३मधे साध्या तापाचे निमित्त होऊन ते खूप आजारी पडले - पण पुढे काही महिने त्यांना इतका अशक्तपणा आला की अंथरुणातून उठणेही अशक्य झाले. या आजारपणाचा त्यांनी असा फायदा उठवला की सर्वसामान्य माणसाने चकितच व्हावे. शरीराच्या अतिशय विकल अवस्थेत त्यांनी मातेला (जगदंबेला) अशी उत्कटतेने हाक मारली की त्या सगळ्या आजारपणात जणू मातेनेच त्यांना सांभाळले असे वाटते.
या सगळ्या अनुभवाचे एक भावविलक्षण कथन यात आहे. स्वामींजींची अति आर्त प्रार्थना, त्यावर आईने त्यांना कसे सांभाळले याचे अनुभव व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्यात झालेला एक अंतर्बाह्य बदल - ज्याचे त्यांनी एका त्रयस्थपणे केलेले वर्णन. हा बदल म्हणजे साधकावस्थेतील रामचंद्र गोडबोले हे खर्या अर्थाने परमहंस पदी आरुढ झालेले एक सिद्धपुरुष बनले तो होय.
ही सगळी यात्रा आपण वाचत असताना आपल्या लक्षात येते ते हे की -
--- साधकाच्या अंगी किती आर्तता, समर्पण भाव आवश्यक आहे.
--- किती प्रकारच्या स्थूल, सूक्ष्म बंधनात आपण अडकलेले असतो
--- साधनेत किती चिकाटी हवी
---- आपुले मरण पाहिले म्यां डोळा - हा बहुतेक सर्व संतांचा अनुभव असतो -जो स्वामीजींनीही घेतल्याचे दिसून येते.
---- कुठलेही चमत्कार हे त्या संतांचे संतत्व वा सिद्धत्व सिद्ध करीत नसतात; तर भगवद्गीतेसारख्या अनेक अद्वैत ग्रंथात सांगितलेली ज्ञानाची लक्षणे ज्याच्या ठायी दिसतात तेच खरे संतत्व.
---- या संतत्वाची लक्षणे कोणती तर - अखंड समाधान, शांति, प्रसन्नता, ईश्वरशरणता हीच होत.
----- संपूर्ण ईश्वरशरणतेमुळे प्राप्त झालेली कमालीची नि:संदिग्धता व अविचल समाधान.
----- सर्व सृष्टीत त्या परमेशाचे दर्शन घेण्याची अद्भुत कला.
----- ज्या जगदंबेमुळे हे ऐश्वर्य प्राप्त झाले तिच्याठायी असलेली ज्ञानोत्तर भक्ति.
अशा विविध पैलूंनी युक्त असा हा छोटासा ग्रंथ कुणाही भाविकाचे अंतःकरण सहज काबीज करतो, स्वामीजींविषयीचे प्रेम, आदर, श्रद्धा वाढीस लावतो.
कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वामीजींच्या ठिकाणी जे आढळून यायचे ते त्यांचे अबोल संतत्व, साधननिष्ठा.
"सदा स्वरुपानुसंधान हेचि भक्त हेचि ज्ञान" - हे ज्यांनी स्वतः आचरले व तेच इतरांनाही सांगत होते त्यामुळे अनेक सुशिक्षित स्वामीजींच्या शिष्यवर्गात सामील झाले व त्यांना सद्गुरु स्थानी मानून साधनेत रत होऊ लागले.
स्वामीजींचा परमार्थ हा अजिबात कर्मकांडी नव्हता तर परमार्थ साधनेनी लाभलेली अंतर्मुखता व त्याच अधिष्ठानावर असलेली निष्काम कर्माची प्रयोगशीलता अशा पद्धतीचा होता. सोऽहं च्या बोधाला भक्तीची जोड होती, कर्मयोगाकडे नेणारी वाटचाल होती. सर्व कर्मे करीत असतानाही आतली शांति ढळणार नाही असा एक विलक्षण परमार्थ स्वामीजी शिष्यांना शिकवून राहिले होते.
जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-सत्कविवर होईन
स्वानुभवान्तःस्फूर्त नवरसी सत्य-काव्य निर्मीन ||१||
अशा अतिशय उदात्त, उत्तुंग विचाराने या ग्रंथाची सुरुवात होते.
निज-अंथरुणी होतो खिळुनी निजुनी चातुर्मास
नित्य विनवणी यावी म्हणुनी निर्भयता जीवास ||
पळापळाने करुनि मोकळा काळरुप गळफास
निर्भयतेचे पाठ शिकवते आज मला षण्मास ||
यावत् सावध तावत् सोऽहं-स्मरण अखंडित जाण
अढळ भाव सर्वथा असो मग जावो राहो प्राण !||
अखंड अभ्यासाविण साध्य न ती समता चित्ताची
असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची ||
शुक्ल पक्ष भृगु-वासर रात्रौ आषाढींची नवमी
अठराशे छपन्न शकाब्दी मृत्यु पावलो आम्ही ||
अनन्यभावे कड्यावरुनि जै उडी घेतली खाली
भक्त-वत्सला माउली मला फुलासारखी झेली ||
मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसे दिले त्वा सोंग
करीन संपादणी तशी मी राहुनिया नि:संग ||
जगज्जननि तव भक्ति-सुधेची पावन भिक्षा घाल
दारि पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल ||
स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वाया
स्वप्नी अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया||
ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे
जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ||
प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे |
भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे ||
मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी
तरिच तत्वता क्षणांत हाता येते सहज-समाधि ||
सहज-समाधि संतत साधी न लगे साधन अन्य
सुटुनी आधि-व्याधी-उपाधि होते जीवन धन्य ||
सुहास्य -वदन प्रसन्नदर्शन निर्मल अंतःकरण
मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ||
एवं षड् विध सज्जन-लक्षण अंगि बाणता पूर्ण
होतो वश परमेश वाहतो जगदम्बेची आण ||
नसानसांतुनि ते संताचे नाचे अस्सल रक्त
जाण साजणी आजपासुनी आम्ही जीवनन्मुक्त ||
आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव
लीला-लाघव हे अपूर्व तव पाहे तो चि सदैव ||
Looking at Thy Feet,
Playing with Thy Poetry,
Living in Thy Kingdom,
O Mother, I am happy.
हे जगन्माते,
तुझ्या चरण-कमलांचे दर्शन घेणारा,
तुझ्या काव्याशी क्रीडा करणारा,
तुझ्या साम्राज्यांत वास्तव्य करणारा,
असा मी, सुखी आहे.
--------------------------------------------------------
Writing through Thy Hand,
Thinking through Thy Mind,
Feeling through Thy Heart,
O Mother, I am Free!
हे जगन्माते,
तुझ्या हाताने लेखन करणारा,
तुझ्या चित्ताने चिंतन करणारा,
तुझ्या अन्तःकरणाने भाव अनुभविणारा
असा मी, बंध-मुक्त स्वतंत्र आहे !
----------------------------------------------------
Nourished by the Nector of Thy Knowledge,
Clad in the robe of Thy Love,
Before Thee I dance, O Mother,
In the Temple of Eternity
तुझ्या ज्ञानामृताने ज्याचे पोषण झाले आहे,
तुझ्या भक्ति-प्रेमाचे भरजरी वस्त्र ज्याने परिधान केले आहे,
असा मी, हे जगन्माते,
अनन्तत्वाच्या-शाश्वताच्या राउळात तुजपुढे नृत्य करीत आहे.
------------------------------------------------------------------------------
या व अजूनही अशा अनेक अमृतधारांमधे सुस्नात होताना मला तरी कायमच निर्मळतेचा, प्रसन्नतेचा अनुभव येतो. देहाच्या (आणि सहाजिकच मनाच्याही) विकल अवस्थेत एखादी व्यक्ति परमार्थातील गौरीशिखर गाठू शकते हे एक फार मोठे आश्चर्यच आहे. याला केवळ भगवद-लीला म्हणून सोडून न देता त्यातील समर्पणभावाचा लक्षांश जरी आपल्याला लाभला तरी आपले जीवन धन्य होऊन जाईल असे वाटते.
प्रत्यक्षात स्वामीजींना पहाणार्या व्यक्तिंशीही बोलण्याची संधी मला मिळाली होती, कै. वैकुंठराव (मामा) पडवळ यांनाही जवळून पहायचा सुयोग प्राप्त झाला होता. त्या सर्व मंडळींकडून त्यांच्या विषयींचे विविध अनुभव ऐकायला मिळाले -(ज्यात चमत्काराला बिल्कुल स्थान नव्हतेच तर अंगारे -धुपारे वा मंत्र-तंत्र यालाही नव्हते)
१९३३च्या आजारपणानंतर पांवसमधील श्री. देसाई यांनी स्वामीजींना स्वतःच्या घरी येऊन रहा म्हणून विनंती केली - त्यानंतर स्वामीजी १९७४ पर्यंत देसाई यांच्या "अनंत निवास" या वास्तूमधे रहात होते. या मधल्या काळात एक दोनदा ते रत्नागिरीला गेले असतील तेवढेच. या जवळजवळ ४० वर्षाच्या काळात एक अतिशय साधे, ईश्वरशरण व सिद्धावस्थेतील जीवन कसे असते याचा जणू धडाच स्वामीजींनी घालून दिला. अनेक भाविकांना त्यांनी सोऽहंची दीक्षा देऊन अनुग्रहित केले.
आपले संबंध आयुष्य त्यांनी तेथील ज्या एका खोलीत काढले व सतत सोऽहं नाद आळवला त्या पवित्र खोलीत त्यांचे चैतन्यमय दर्शन घेण्यासाठी अजूनही अनेक भाविक येत असतात. याच वास्तूत त्यांनी "अभंग ज्ञानेश्वरी" सारख्या अनेक पारमार्थिक ग्रंथांची निर्मिती केली.
त्यांचा परमार्थातील अधिकार ध्यानात घेऊन परिव्राजकाचार्य श्री श्रीधरस्वामी महाराज, श्री. गोळवलकर गुरुजी तसेच परमार्थातील अनेक अधिकारी व्यक्ती स्वामीजींना भेटून गेल्या होत्या.
आपल्या वाट्याची विहित कर्मे करीत असतानाच जर योग्य प्रकारे परमार्थाची साधना कोणी करेल तर तो याच जन्मात शाश्वत सुख नक्कीच भोगू शकेल हे त्यांचे सांगणे होते. अर्थातच स्वामींजींसारख्या अधिकारी व्यक्तिचे मार्गदर्शन याकरता अतिशय जरुरीचे आहे.
"खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो" - हे त्यांच्या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले त्यांचेच एक वचन सर्व काही सांगून जाते.
स्वामींजींचे अजूनही बरेच वाङ्मय उपलब्ध आहे. तेही अतिशय मननीय व आचरणीय आहे. १५ डिसेंबर हा स्वामीजींचा जन्मदिन - त्या निमित्ताने या "अमृतधारा" आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे
म्हणूनी वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे ||
हरि ॐ तत् सत् ||
-------------------------------------------------------------------------------------------
शशांकजी, किती सुंदर परिचय
शशांकजी, किती सुंदर परिचय करून दिलात स्वरूपानंद स्वामींचा. अमृतधारा संग्रही ठेवायला हवे. पावसला जायची पण खूप इच्छा आहे, आईला घेऊन, कधी योग येतो बघूया?
अतिशय सुंदर शांत असे
अतिशय सुंदर शांत असे समाधीस्थळ आहे स्वामी स्वरुपानंदांचे..!!
Apratim! Khup dhanyavad!
Apratim!
Khup dhanyavad!
खुप छान!स्वामी
खुप छान!स्वामी स्वरुपानंदांच्या रसाळ लेखनाचा परीचयही रसाळ.अभंग ज्ञानेश्वरी लिहिणारे स्वामी,आजारपणामुळे स्वतः आळंदीला कधी गेले नाहित.अस वाचल होत.
खूप छान परीचय. पावस कधी
खूप छान परीचय. पावस कधी जाय्चा योग येतोय?
_/\_ शशांकजी, अमृतधाराबद्द्ल
_/\_ शशांकजी, अमृतधाराबद्द्ल प्रथमच वाचते आहे. आभार हा परिचय इतक्या छोट्याशा पण सुंदर लेखात करून देण्यासाठी. स्वामीजींची अभंग ज्ञानेश्वरी कधीतरी विशीत वाचली होती, तिच्यामुळेच मूळ ज्ञानेश्वरीची गोडी लागली. पावसच्या या महान संताबद्द्ल कमीच लिहिलं गेलं आहे.. अजूनही लिहा.
अभंग ज्ञानेश्वरी लिहिणारे
अभंग ज्ञानेश्वरी लिहिणारे स्वामी,आजारपणामुळे स्वतः आळंदीला कधी गेले नाहित.अस वाचल होत. >>>> अगदी खरे आहे, शोभनाताई ---- १९३३ नंतर स्वामीजी पांवस सोडून कुठेच जाऊ शकले नाहीत पण त्या सोऽहंच्या अखंड अनुसंधानाने त्यांनी जणू माऊलींनाच पांवसला आणून संस्थापित केले असे त्यांचे कालातीत मोठेपण ...
मला तर ते माऊलींचाच अवतार वाटतात....
१९५०-७० चा काळ पाहिला तर पांवस हे दुर्गम भागातच म्हणायचे, त्यामुळे फारच कमी लोकांना ते माहित होते व दुसरे असे की संतांना ओळखण्यासाठी आधी आपल्या अंगात काही तरी सद्गुण, सद्भाव पाहिजे -- नाही तर आपल्याला ते इतर सर्वसामान्यांसारखेच वाटणार .....
स्वामीजींची अभंग रचनाही (संजीवनी गाथा) अतिशय भावपूर्ण व उद्बोधक आहे.... कधी तरी त्याविषयीही लिहीन मी ....
बुवाबाजीमुळे सुशिक्षित मंडळींमधे परमार्थाबद्दलचा एक प्रकारचा जो तिटकारा निर्माण झाला तो दूर करुन त्यांना सत्प्रवृत्त करण्याचे मोठे काम स्वामीजी त्या एका खोलीत बसून शांतपणे करीत होते. शुद्ध परमार्थाची ओळख ते समाजाला करुन देत होते. प्रसिद्धीची हाव त्यांनी कधीही बाळगली नाही ना कुठले चमत्कार केले - माणसे घडवण्याचा मोठाच चमत्कार मात्र जरुर केला...
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार ......
सुंदर लेख लिहिला आहे. पावसला
सुंदर लेख लिहिला आहे. पावसला आतापर्यंत कितीतरी वेळा जाणे झाले आहे. कधी अगदीच नाही तर कंटाळा आला म्हणून आम्ही पावसला जाऊन येतो. सुरूवातीचे अगदी छोटेसे मंदिर असल्यपासून ते आताचे भव्य मंदिर उभारताना पाहिले आहे.
बर्याच कोकण दर्शन टूर ऑपरेटर्स "इथे दहाच मिनिटे थांबायचंय" असं सांगतात. अशावेळेला घाईगर्दीत पाहण्यासारखे हे ठिकाण नाहीये असं ओरडून सांगावंसं वाटतं मला. तिथल्या समाधी मंदिरामधे तासभर बसलं की मनाला विलक्षण शांतता लाभते . मी काही फारशी आध्यात्मिक वगैरे प्रवृत्तीची नाही, पण तरीही या ठिकाणी एक पॉझिटीव वातावरण नक्कीच असतं, जे प्रत्येकाला जाणवतं. स्वामी स्वरूपानंदाचे जितके साहित्य वाचले आहे त्यावरून तरी मनामधे खूप चांगला बदल घडवलेला आहे.
अवांतरः पावसच्या मंदिरामधे गेले कित्येक वर्षे मुगाच्या खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो. कुठल्याही प्रकारचे पैसे द्या वगैरे पंडेगिरी जबरदस्ती इथे चालू नसते हे अजून एक विशेष. समाधी मंदिरामधे रोजच्या रोज केली जाणारी पूजा व त्यासाठी फुलांची पानांची केलेली आकर्षक रचना देखील पाहण्यासारखी असते.
समाधी मंदिरामधे रोजच्या रोज
समाधी मंदिरामधे रोजच्या रोज केली जाणारी पूजा व त्यासाठी फुलांची पानांची केलेली आकर्षक रचना देखील पाहण्यासारखी असते. >>> +१
रच्याकने, शशांक मस्त लेख. फक्त १ दिवस उशीरा पोस्टायला हवा होता.
काल म्हणजे १५ डिसेंबरला स्वामींचा जन्म दिवस असतो. असे पण योग्य वेळी हे पुष्प अर्पण केले गेलेय.
व्वाह! सुंदर आहे लेख!. सकाळी
व्वाह! सुंदर आहे लेख!. सकाळी माबो उघडताच वाचायला मिळाला.
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
बर्याच कोकण दर्शन टूर
बर्याच कोकण दर्शन टूर ऑपरेटर्स "इथे दहाच मिनिटे थांबायचंय" असं सांगतात. अशावेळेला घाईगर्दीत पाहण्यासारखे हे ठिकाण नाहीये असं ओरडून सांगावंसं वाटतं मला. तिथल्या समाधी मंदिरामधे तासभर बसलं की मनाला विलक्षण शांतता लाभते . मी काही फारशी आध्यात्मिक वगैरे प्रवृत्तीची नाही, पण तरीही या ठिकाणी एक पॉझिटीव वातावरण नक्कीच असतं, जे प्रत्येकाला जाणवतं. स्वामी स्वरूपानंदाचे जितके साहित्य वाचले आहे त्यावरून तरी मनामधे खूप चांगला बदल घडवलेला आहे.
अवांतरः पावसच्या मंदिरामधे गेले कित्येक वर्षे मुगाच्या खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो. कुठल्याही प्रकारचे पैसे द्या वगैरे पंडेगिरी जबरदस्ती इथे चालू नसते हे अजून एक विशेष. समाधी मंदिरामधे रोजच्या रोज केली जाणारी पूजा व त्यासाठी फुलांची पानांची केलेली आकर्षक रचना देखील पाहण्यासारखी असते.
....हेच लिहायला आले होते.
खरा परमार्थ सांगणार्या
खरा परमार्थ सांगणार्या विभूतींचे विचारधन तुम्ही कोणताही आव न आणता माबोकरापर्यंत पोचवत आहात.
हे तुमचे काम कौतुकास्पद आहे.
१९५०-७० चा काळ पाहिला तर
१९५०-७० चा काळ पाहिला तर पांवस हे दुर्गम भागातच म्हणायचे.>>
तरीवर पूल नव्हता. त्यामुळे तरीच्या एका बाजूला बस सोडायची. मग १० पैसे देऊन होडीतून तर ओलांडायची. मग दुसर्या बसमधून ८ कि.मी. वर पावसला जायचे.
पण त्याचा एक मोठा फायदा व्हायचा. इतकी आडवाट करून येणारा देवावर विश्वास ठेवणारा अथवा स्वामींचा भक्तच असे. हौशे नवशे व गवसे यांचे प्रमाण जवळपास नसेच. ट्रीप म्हणून येणारा तर औषधालाही सापडायचा नाही!!!
सुंदर लेख दादा ! कालच आपला
सुंदर लेख दादा !
कालच आपला विषय झाला होता पावसचा आणि आज हा लेख वाचनात आला. _/\_
हे पुस्तक पुण्यात कुठे मिळेल?
हे पुस्तक पुण्यात कुठे मिळेल?
नेर्लेकर बुक डेपो, बुधवार
नेर्लेकर बुक डेपो, बुधवार पेठ, दगडूशेठ गणपतीच्या समोर
किंवा
आंबेवाले देसाई, शनिपार चौक,
येथे मिळायची शक्यता आहे असे वाटते. पूर्वी तरी तिथे मिळत असे. पण माझी ही माहिती फार जुनी आहे.
पुण्यातील लोकांना एका दिवसात
पुण्यातील लोकांना एका दिवसात जाऊन येता येईल का ?
राहण्याची सोय आहे का ? असल्यास कृपया येथे माहिती नोंदवून ठेवता येईल का ?
एका दिवसात जाऊन येणे फार
एका दिवसात जाऊन येणे फार दगदगीचे होईल असे वाटते. राहवयाची सोय चांगली आहे. ट्र्स्ट्ने सोय केलीच आहे तसेच देसाईचे पण एक लॉज आहे. देसाई बंधू आंबेवाले यांचेकडे फोन करून याबाबत अधिक माहिती मिळू शकणे शक्य आहे. भाट्याला पण दोन होटेलस आहेत. पावसचे वैशिष्ट्य म्हणजे वेळ पाळण्यातील काटेकोरपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा व विशेष म्हणजे तिथल्या सेवेकर्यांची नम्रता. एकंदरीत॑च तेथे शिस्त फार आहे.
धन्यवाद शामजी
धन्यवाद शामजी
आंबेवाले देसाई, शनिपार
आंबेवाले देसाई, शनिपार चौक,पुणे - ही श्री. भागवतांनी दिलेली माहिती अगदी बरोबर आहे. तिथे स्वामीजींचे इतर ग्रंथही मिळतीलच.
एका दिवसात जाऊन येणे फार दगदगीचे होईल असे वाटते. राहवयाची सोय चांगली आहे. ट्र्स्ट्ने सोय केलीच आहे तसेच देसाईचे पण एक लॉज आहे. देसाई बंधू आंबेवाले यांचेकडे फोन करून याबाबत अधिक माहिती मिळू शकणे शक्य आहे. >>>>> पूर्ण अनुमोदन. पावसला जाऊन ध्यान-नाम-वाचन अशी काही साधना करण्यासाठी एक-दोन दिवस मुद्दाम काढून गेलात तर फार बरे होईल. स्वामीजींचे चैतन्यस्वरुपातले दर्शन आवश्यक आहेच पण त्याचबरोबर तेथील प्रसन्न, प्रशांत वातावरणाचा काही लाभ घेता आला तर ते पहावे.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
शशांकजी नक्कीच, गेलो तर धावती
शशांकजी नक्कीच, गेलो तर धावती भेट न देता जास्त वेळ थांबता येईल असाच प्रयत्न राहिल. _/\_
शशांकजी, 'अम्रुत धारा' हे
शशांकजी,
'अम्रुत धारा' हे पुस्तक गद्य आहे कि पद्य ओवि आहेत?
गिफ्ट द्यय्चे आहे, म्हणुन विचारत आहे.
धन्यवाद.
शशांकजी, 'अम्रुत धारा' हे
शशांकजी,
'अम्रुत धारा' हे पुस्तक गद्य आहे कि पद्य ओवि आहेत? >>>> साकीवृत्तात असलेले - पद्य आहे ..
सुंदर लेख !
सुंदर लेख !
"खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो" - हे त्यांच्या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले त्यांचेच एक वचन सर्व काही सांगून जाते.
२००९ ला पावसला गेलो होतो .
शशांकजी, सुन्दर लिहिलयत! या
शशांकजी, सुन्दर लिहिलयत! या वर्षी मे महिन्यात जाण्याचा योग आला होता. खुप छान अनुभुती होती ती.
तुम्ही मागे लिहीलेल्या लेखातील सद्भक्त मामा / वैकुंठ राव पडवळ यान्ची आठवण झाली. .. खरे तर तुमच्या त्या लेखानेच उत्कट इच्छा झाली होती जाय्ची.
<<"खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो" - हे त्यांच्या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले त्यांचेच एक वचन सर्व काही सांगून जाते.<<
खरोखर! अगदी बोधपुर्ण आहे हे!