==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
खूप दिवसांपासून चीन बघण्याची इच्छा होती. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा योग जुळून आला. एकदा जायचे नक्की झाले आणि मग आंतरजलावर अभ्यास सुरू केला. चारपाच टुर एजन्सीच्या ईटिनेररीज बऱ्या वाटल्या पण एकही मला पाहिजे असलेली सर्व ठिकाणे असलेली नव्हती. पण आता टूर कस्टमायझेशन ही काही फार नावीन्यपूर्ण गोष्ट राहिली नाही त्यामुळे चिंता नव्हती. सगळ्यांना ईमेल पाठवल्या. त्यातल्या एका, China Highlights चा, प्रतिसाद चांगला होता. टूर व्यवस्थापिकेने चीनवरून फोन करून अगदी अगत्याने सर्व माहिती विचारली... केवळ भेट देण्याची ठिकाणेच नाही तर पर्यटनांसंबंधीच्या आवडी, खाण्याच्या आवडी (नुसते शाकाहारी-मांसाहारी नव्हे तर कुठल्यावारी शाकाहारी आहात हे सुद्धा नोंदवून घेतले!), अगदी allergies सुद्धा ! असो, आतापर्यंत तुमच्या ध्यानात आलेच असेल मी कोणती टूर कंपनी निवडली आणि का ते.
नंतरचाही अनुभव चांगला होता. मूळ ईटिनेररीमध्ये मी बरेच फेरफार केले, अर्थात त्यामुळे खिशावर दडपण आले. पण विचार असा की आपण काय परतपरत चीनला थोडेच जाणार, एकदा काय करायचे ते करून घ्या. तरीसुद्धा तिबेट राहिलेच. तेथील राजकीय परिस्थितीमुळे परदेशी प्रवाश्यांकरीता भेटीचे नियम कडक आहेत. कमीतकमी ५ जण, तेही एकाच देशाचे, एकाच ग्रुपने, एकाच वेळी आगमन-निर्गमन करणारे असल्याशिवाय तिबेटचे स्पेशल परमिट मिळत नाही. त्यामुळे थोडा नाराज झालो. पण इतर सर्व मनासारखे (अगदी गुरुवार,शनीवारला शाकाहारी जेवण, व्हेजिटेबल तेलातले, फिश ऑइल न वापरण्याची जबाबदारी गाईड घेईल, वगैरे !) ठरल्याने बरे वाटले.
शेवटी अशी ठरली ईटिनेररी:
बायजींग - शियान - लिजीयांग - शांग्रीला -गुइलीन - यांगशुओ - चेंगदु - चोंगचिंग - यांगत्से नदीवर क्रूझ -यिचांग - शांघाई.
काय गंमत असते पहा. हा काही माझा पहिला परदेश प्रवास नव्हता, पण चीन म्हटल्यावर जरा धाकधूकच वाटली ! शिवाय चाललो आहोत पण कम्युनिस्टांनी काही गैरसमजुतीने अडकवले तर काय असा एक विचारही मनाला चाटून गेला !!! पण मुळातच मर्द मराठा असल्याने असल्या विचारांना फारसा थारा न देता पुढील तयारीला लागलो. चिनी लोकानांही याची कुणकुण लागली असावी कारण सर्व काम फारच सहजपणे होऊन आठवड्याभरात व्हिसा हाती आला. नंतर मात्र प्रवासाचा दिवस कधी येईल असे झाले.
शेवटी तो दिवस उजाडला आणि दम्माम, सौदि अरेबिया - दुबई - बायजींग असा प्रवास Emiratesने सुरू झाला. दम्माम ते दुबई प्रवास ठीक झाला, झाला परंतु खरा दणका दिला दुबई विमानतळाने. साधारणपणे दुबई विमानतळ आंतरराष्टीय दर्जाची सेवा देतो असा माझा सर्वसाधारण अनुभव आहे. पण तेथे check-in करायला गेल्यावर हवाईसुंदरीने गोड हसून सांगितले की तुमची window seatबदलून तुम्हाला aisle seat देण्यात आली आहे. दरवेळेस, दर रूटच्या किमान पहिल्या प्रवासाला मला खिडकीजवळची सीट हवी असते म्हणून मी जवळजवळ तीन आठवडे अगोदर ती बुक केली होती. आणि ही बया मला हसत सांगतेय की माझी सीट बदलली? ते सुद्धा साडेसहा तासांच्या long haul प्रवासाला! माझ्यातला मर्द मराठा परत जागा झाला. जरा (नाही बरीच)हुज्जत घातली. मी ऐकतच नाही हे बघितल्यावर तिने "सुपरवायझरला बोलवते मग बघा" अशी धमकी दिली. मी म्हणलो, "बोलवच". मग सुपरवायझरने मला असंख्य कारणे सांगितली आणि मीही त्याला एमिरेटसच्या फ्लाईट मगॅझीनमधली त्याच्याच CEO ची quality, customer care, etc. वरची वचने ऐकवली. काही वेळाने त्याच्या ध्यानात आले की हा काही ऐकणार्यातला नाही. शिवाय विमानाला दोन अडीच तास होते, दम्मामहूनच माझे लगेज थ्रू-चेकइन झाले होते आणि माझ्या online seat reservation चे एमेरिटसने केलेले confirmation माझ्या मोबाइलवर होते, त्यामुळे आपला गड पक्का होता. शेवटी त्याने कुठेतरी एक फोन करून माझी मूळ सीट मला देऊ केली. हे प्रकरण दुबईला झाल्याने इतका बाणेदारपणा जमला. दम्मामला हे जमणे कठीण होते. असो, याचा मला प्रवासात किती फायदा झाला ह्याची थोडीबहुत कल्पना विमानातून काढलेल्या फोटोंवरून येईलच. A-380 मधून १० किमी वरून उडताना डोळ्यांना जे हिमालय, तिबेट आणि चीनचे दर्शन झाले ते वर्णनातीत होते. A-380 मधून उडण्याची ही माझी पाहिलीच वेळ आणि तीही बहुदा विमानबदलामुळे, ही आणखी एक अनपेक्षित आनंदाची बाजू.
विमानाचा मार्ग
.
बलुचिस्तान
.
काश्मीर
आणि येथून पुढे बलवन्त हिमगिरीचे अचाट रुपडे असे काही सुरू झाले की डोळा मावेनासे झाले आणि केवळ नशिबात होते म्हणून कधी नाही ते दुबईला घातलेल्या हुज्जतीचे चीज झाल्याचे वाटले.
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०१
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०२
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०३
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०४
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०५
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०६
इथून पुढे तिबेटचे रखरखीत पठार सुरू झाले. जगातले सर्वात उंच पठार. जणू जगाची पाठच.
तिबेट ०१
.
तिबेट ०२
मेनलँड चीन सुरू... बहुतेक झिन्जियान्गचा वाळवन्टी भाग असावा.
चिनी वाळवंट
विमान वेळेवर पोहोचले. विमानतळावर चोख व्यवस्था होती. सर्व कामे शिस्तीत झाली. इमिग्रेशन ऑफिसर हसून वेलकमपण म्हणाला. चला मनावरची चीनची उरलीसुरली भीती पळून गेली. मार्गदर्शक नावाची पाटी घेऊन उभा होता. चिनी ढबीचे पण सहज समजेल असे इंग्लिश बोलत होता. टुरचा पूर्णं मूड जमला. इंग्लिश बोलणारा मार्गदर्शक ही चीनमध्ये luxury नसून अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे नंतर सततच्या अनुभवाने समजत गेले. अगदी बायजींग व शान्घाईसारख्या शहरांतही स्टार्ड हॉटेलच्या स्टाफमध्ये एखादाच / एखादीच कामचलाऊ इंग्लिश बोलू शकतो/ते. अन्यथा sign language वर भागवावे लागते. कधी कधी ते ही कसे तोकडे पडते आणि कशी मजा होते(आता मजा वाटते, त्या वेळी तसे वाटले नाही !) ते पुढे कधितरी येईलच.
बायजींग मध्ये दूषित वातावरणामुळे सर्व वर्षभर केव्हाही धुके असू शकते. बायजींग ऑलिंपिकच्या वेळेस याचा फार गाजावाजा झाला होता हे आठवत असेलच. विमानतळावरून हॉटेलवर जाताना याचा प्रत्यय आला. शिवाय आंतरजाल माझ्या बायजींगमधील ४ दिवसांत सतत ढग व पाऊस दाखवत होते. परंतू वरूणराजाशी आमचा थोडाबहुत वशिला आहे. आजपर्यन्त त्यांनी आमची सहल कधीच खराब होऊ दिली नाही. तेव्हा त्यांची आठवण काढून बाकी सर्व नशिबावर सोपवले.
जगप्रसिद्ध बायजींग धुके
हॉटेलवर आल्यावर प्रथम शॉवर घेतला आणि ChaoYang Acrobatic Show बघायला बाहेर पडलो. तिकिटे आंतरजालावरून बुक केली होती. The China Guide (www.thechinaguide.com)नावाची एक एजन्सी हे काम करते, शिवाय तिकिटे छापील किंमतीच्या १५-२०% स्वस्त देते. थिएटरवर एजन्सीचा/ची गाईड तुम्हाला भेटतो/ते, तेथेच पैसे द्यायचे आणि तिकीट घ्यायचे... आंतरजालावर फक्त बुकिंग करायचे. फारच सोयीचा व्यवहार. मी तीन रात्रींच्या वेगवेगळ्या तीन शोंची तिकिटे अशीच बुक केली होती. चीनमध्ये जिथे जाल तिथे छान शोज आहेत. पर्यटन व्यवसाय उत्तम रीतीने डेव्हलप केला आहे हे वारंवार जाणवते.
बायजींग मध्ये आवर्जून बघावा असा शो म्हणजे ChoYang Acrobatic Show (ChaoYang Theater, 36, Dongsanhuan North Road.Phone; 010 65068116. Time: 7:15 - 9:15 pm. Tickets: 180 to 880 RMB (Chinese Yuan). 1 yuan = approx 9 INR.)
शो इतका छान होता आणि त्याची CD पण विकत मिळते म्हटल्यावर फोटोकडे दुर्लक्ष झाले नाही तरच नवल. त्यामुळे हे फक्त नमुन्यादाखलचे फोटो. मात्र पुढील भागांतील outdoor फोटो ही कसर पुरेपूर भरून काढतील अशी अपेक्षा आहे. या शोमधील सर्वच कलाकार नावाजलेले असून अनेक जागतिक स्तरावरची बक्षिसे त्यांनी पटकावलेली आहेत.
.
.
.
.
(क्रमशः)
==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...
==============================================================================
माबोवर स्वागत. ही मालिका इथे
माबोवर स्वागत.
ही मालिका इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
माबोवर सक्रीय असणार्या अल्पसंख्यांक अश्या डॉक्टरांच्या लीगमध्येही स्वागत.
दुसर्या धाग्याविषयी अॅडमिनच्या विपूत लिहून ठेवलेत तर तो एक्स्ट्रा धागा रद्दं करतील.
http://www.maayboli.com/user/3/guestbook
ही अॅडमिनच्या विपूची लिंक आहे.
मस्त! हिमालयाचे वरुन
मस्त!
हिमालयाचे वरुन घेतलेले फोटो मस्त आहेत.
त्या शो बद्दल थोडक्यात माहिती आली असती फोटोसोबत तर बरं झालं असतं.
माबोवर स्वागत. प्लस
माबोवर स्वागत.
प्लस माझ्यातर्फेही..
लिखाण फोटो नेहमीसारखेच कम्प्लीट पॅकेज
विमानातुन घेतलेले फोटोज
विमानातुन घेतलेले फोटोज अफलातुन आले आहेत. दुबईत हुज्जत घातलीत ते खरंच बरं झाले. लेख सुध्दा मस्त.
त्या शो बद्दल थोडक्यात माहिती आली असती फोटोसोबत तर बरं झालं असतं.>>>> +१
रच्याकने, तुम्ही चीनच्या राजधानीचा उल्लेख बायजिंग असा केला आहे, पण बहुतेक ते बिजींग असावे असे मला वाटत आहे.
मस्त! फारच छोटा भाग
मस्त! फारच छोटा भाग वाटला.
थोड्यावेळानी कळले की बायजींग म्हणजेच बिजिंग! हे चीनी उच्चार का तिथेपण आता नामांतर झाले?
ओहोहो!!!! स्वागतम!! सुस्वागतम
ओहोहो!!!!
स्वागतम!!
सुस्वागतम!!!
उत्तम लेखमालेचे साक्षीदार होणार आम्ही.
बिजींग बायजिंग ईंटरेस्टींग,
बिजींग बायजिंग ईंटरेस्टींग, पण ते तिथे फिरून आलेत म्हणजे त्यांना आतली पक्की खबर असणार
जगप्रसिद्ध बायजींग धुके >> दाट म्हणून प्रसिद्ध आहे का? पण फोटो मस्त आलाय..
छान सुरुवात, पुढील आऊटडोअर भागाच्या प्रतीक्षेत!
सुंदर सुरवात. पुढच्या
सुंदर सुरवात. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत. हिमालयाचे दर्शन खासच. चीनच्या भेटीची आखणी करायची आहे मला पण ( नजीकच्या भविष्यात )
..पहिल्या फोटोत थोडा डार्कनेस आणता येईल पिकासा वापरून.
अप्रतिम
अप्रतिम
सर्व प्रतिसादकांसाठी अनेक
सर्व प्रतिसादकांसाठी अनेक धन्यवाद !
* चीनच्या राजधानीच्या नावाचा उच्चार: हा तेथे बायजिंग अथवा बैजिंग अथवा त्यामधला काहीसा असाच केला जात होता.
* चाओ यांग थिएटर: हे तेथिल कसरतींच्या कार्यक्रमांसाठी जगप्रसिद्ध आहे. जवळजवळ सर्वच कलाकार केवळ जागतिक स्तराचे कसरतपटूच नाहित तर सुवर्णपदकांने गौरवले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कसरतींचे वर्णन करणे माझ्या शाब्दीक कुवतीबाहेरचे होते. तो कार्यक्रम प्रत्यक्ष अथवा कमीत कमी चलत्चित्राव्दारे पाहिल्याशिवाय कसरत किती कौशल्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण असू शकते याची कल्पना येऊ शकणार नाही. चीनच्या भेटीत अजिबात न चुकवावा असा हा सोहळा आहे !
या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती (तिकीट विक्रीसह) त्याच्या या संस्थळावर मिळू शकेल.
* जगप्रसिद्ध बायजींग धुके: जलदगतीने झालेल्या प्रगतीचा दुष्परिणाम म्हणून वाढलेल्या वायूप्रदूषणाचा हा परिणाम आहे. ह्या कुप्रसिद्ध धुक्याने बायजींग ऑलिंपिक्सवरही घोक्याचे सावट आणले होते हे आठवत असेलच !
* फोटो: सर्व फोटो कोणतीही प्रक्रिया न करता त्यांच्या मूळ स्वरूपातच (रॉ) धाग्यात टाकलेले आहेत. याची मुख्य कारणे 'माझे प्रोसेसिंगबद्दलचे अज्ञान' आणि 'ते शिकण्याबद्दलचा आळस' ही आहेत !
@दिनेशः तुमच्या चीनच्या सहलीसाठी शुभेच्छा !
सर्व प्रतिसादकांचा आणि वाचकांचा सहलीतला सहभाग असाच पुढे चालू रहावा हीच इच्छा आहे. कारण त्यामुळे सहलीचा आनंद नि:संशयपणे व्दिगुणित होईल !
मस्त! लेख आवडला. पुढील
मस्त! लेख आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
ते धुकं वायुप्रदुषणामुळे आहे हे वाचून वाईट वाटले आणि भीतीदायकही!
झकास फोटोज... आणि पुढील
झकास फोटोज... आणि पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
बायजिंग मधले धुके खरंच प्रसिद्ध आहे.. ऑलिंपिक्सच्या वेळेस त्याचा चांगलाच गवगवा झाला होता...
हिमालया चे फोटो बघून तुम्ही
हिमालया चे फोटो बघून तुम्ही घातलेल्या हुज्जतीबद्दल धन्यवाद
मस्त..
मस्त..
मायबोलीवर स्वागत ! आपली इतर
मायबोलीवर स्वागत !
आपली इतर उत्तमोत्तम प्रवासवर्णने माबो वर देखील येवुद्यात !
आभार!
मस्त आहेत फोटो.. पुढचे भाग
मस्त आहेत फोटो.. पुढचे भाग लवकर येउ देत
मस्त फोटोज ! किती दिवस लागले
मस्त फोटोज !
किती दिवस लागले एकुण ?
अरे वा! छान सुरूवात... झकास
अरे वा! छान सुरूवात...
झकास फोटो.
सर्व तयारी स्वतः करून कुठल्याही ग्रूप-टूरच्या फंदात न पडता गेलात हे वाचून मस्त वाटलं.
इस्पिकचा एक्का..... परदेश
इस्पिकचा एक्का.....
परदेश पर्यटन म्हणजे सर्वसाधारण युरोप आणि अमेरिका प्रामुख्याने नजरेसमोर येते....पूर्वेकडील म्हटल्यास जपान कोरीया आदी. पण चीनचा प्रवास आपण करायचा अशी तुमच्या मनी ज्या क्षणी भावना आली ती कशी आली त्याबद्दल वाचायला मला खूप आवडेल. खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही...असे वाटावे की शेजारील सीटवर आपण बसलो आहोत आणि तुम्हीच चीनच्या पर्यटन विशेषाचे कौतुक करीत आहात.
नकाशात बिजिंग (किंवा बायजिंग) चा उल्लेख येणे स्वाभाविक आहे.....तुमच्या प्रवासपट्ट्यात नसलेले तिथे एक गाव दिसत्ये....बिजिंगच्या खाली...."शानडोंग" Shandong.... या गावातील एका हायस्कूलमधील शिक्षक पतीपत्नी माझ्या परिचयाचे झाले होते.....रेडिफमाध्यमातून. भारत आणि विशेषतः येथील विविध प्रांतात बोलल्या जाणार्या भाषा संदर्भात त्याना जाणून घेण्यात फार औत्सुक्य होते. चीनमध्येही आपल्यासारखीच प्रांताप्रांतात बदलत जाणारी भाषा आहे हे देखील त्यानी सांगितले.
तुम्हालाही चीनी भाषेच्या विविधतेचा असा काही अनुभव आला का ? सामाजिक पातळीवर फुलबागांचे वेड फार जपले जाते असे या जोडप्याने सांगितले होते. त्याबाबतीत चीन आघाडीवर असल्याचे तुम्हाला दिसले असेलच.
बेजिंग हा उच्चार जास्त
बेजिंग हा उच्चार जास्त प्रचलित आहे पण बायजिंग असे तिथले स्थानिक लोक म्हणतात.
इ.ए. - खूप सुंदर सुरवात. तुमचा मर्द मराठेपणा आवडला. दुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून चिन का नाही गाठले? मग हिमायल दिसला नसता म्हणून का?
पुढील वेळी तिबेट सफर घडो.
दुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून
दुबई ऐवजी तुम्ही सिंगापुराहून चिन का नाही गाठले? मग हिमायल दिसला नसता म्हणून का?
>> Bee. He was flying from Dammam (Saudi) so via Dubai is logical route. Dammam - Singapore - Beijing is not practical at all. Even I doubt if there is direct flight to Singapore from Dammam.
मंदार, मला वाटले ते पुण्याहून
मंदार, मला वाटले ते पुण्याहून मुंबई आणि नंतर चीन असा प्रवास करीत होते. दम्मम दिसले नाही कुठे वाचताना. धन्स.
आमच्यासाठी तुम्ही जी बरीच
आमच्यासाठी तुम्ही जी बरीच हुज्जत घातली आणि आम्हाला हिमालयाची विलोभनीय दृष्य दाखवली त्याबद्दल मनापासून आभार .........
पुढच्या भागाची वाट पहातोय.
धन्यवाद ! चिनी
धन्यवाद !
चिनी भाषा
भाषाशास्त्राच्या दृष्टीने सर्व चीनमध्ये बोलली जाणारी भाषा ही एकच भाषा नसून तेथे बोलल्या जाणार्या सायनो-तिबेटन भाषाकुलातील शेकडो भाषाचा समुह आहे. त्यापैकी अनेक अश्या आहेत की त्या भाषीक दृष्ट्या एकमेकीपासून इतक्या वेगळ्या आहेत आणि एका भाषकाला दुसर्याची भाषा समजत नाही ! अर्थात चीनसारख्या जवळजवळ ९६ लाख किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या खंड्प्राय देशातील १३५ कोटीपेक्षा जास्त जनता एकच एक भाषा वापरेल असे शक्यच नाही.
मात्र त्यातल्या सर्वात जास्त वापरल्या जाणार्या मांदारीन या चिनी भाषेच्या प्रमाणित आवृत्तीला सरकारमान्य भाषेचा दर्जा आहे आणि शिक्षणात व सरकारी व्यवहारात तीच वापरली जाते.
चिनी भाषा न येणार्या परदेशी माणसाला चीनमध्ये भाषा ही खुप मोठी समस्या आहे. कारण अगदी मोठ्या शहरांतील तारांकित हॉटेल्समध्ये आणि पर्यटक स्थळांवरही मोजकेच इंग्लिश बोलणारे कर्मचारी असतात. रस्त्यावर भेटणार्या सर्वसामान्य माणसांत तर इंग्लिश बोलणारा माणूस भेटणे खूपच दुर्मिळ आहे. तेव्हा चीनमध्ये फिरताना आपली आणि चीनी भाषा जाणणारा मार्गदर्शक सतत बरोबर असणे ही चैन नसून आवश्यकता आहे !
वाह्,सुंदर फोटोज आणी माहिती..
वाह्,सुंदर फोटोज आणी माहिती..
बी, Beijing चा स्थानिक उच्चार ,'पै चिंग' असा आहे.. मँडरिन मधे .. याचा अर्थ आहे नॉर्दन कॅपिटल
दिनेश , तुझ्या चीन च्या सफरीत ट्रांसलेटर हवीये का??
मस्त! लेख आवडला.
मस्त! लेख आवडला.
लेख सुंदर. आणि हिमालय दर्शन
लेख सुंदर. आणि हिमालय दर्शन अप्रतीमच!