"आव्वाज कोणाचा, मोदीसाहेब?"

Submitted by बेफ़िकीर on 12 November, 2014 - 10:00

आदरणीय मोदीसाहेब,

वंदन!

आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात! अनेकदा राज्य ज्याच्यावर असे तो सतत राज्य त्याच्यावर आल्याने इतका वैतागलेला असे की त्याला लपलेल्यांना एकदाचे ओळखायची प्रचंड घाई झालेली असे. त्यामुळे तो प्रत्यक्ष चेहरा न बघताच, लांबूनच, नुसती कोणाच्या शर्टची झलक दिसली तरी त्याचे नांव घेऊन 'हा हा इस्टॉप' असे ओरडायचा. हे लक्षात घेऊन काही मुलांनी शक्कल लढवलेली होती. लपल्यानंतर शर्ट्सची अदलाबदल करायची आणि मुद्दाम शर्टचा थोडा भाग राज्य असलेल्या मुलाला दिसू द्यायचा. असे केल्याने तो चुकीच्या मुलाला ओळखल्याचे बोंबलून जाहीर करायचा. त्याने उल्लेखलेल्या नावाचा मुलगा जर तेथे निघालाच नाही तर सगळे जण 'अंड, अंड' करत बाहेर यायचे आणि 'राज्यकर्त्यावर' पुन्हा नवे राज्य यायचे.

पुढे जसजसे सगळे मोठे झाले तसतसे मग आपापल्या कामानिमित्त सगळेजण पांगले. कोणी नागपूरला गेला, कोणी बारामतीला, कोणी मुंबईला तर कोणी दिल्लीला!

आज, जवळपास पस्तीस वर्षांनी त्या सर्वांचे पहिल्यांदाच रियुनियन बघायला मिळाले.

आजही एक राज्यकर्ता निवडला गेला. त्याच्यावर 'राज्य' लादण्यात आले ह्याचा त्याला आनंद झाला होता हे एक ठसठशीतपणे जाणवलेले वेगळेपण! लपणार्‍यांची संख्या २८६ होती. त्यातले वेगळेपण असे की सगळे लपलेले खरे तर समोर बसलेले होते, पण ते त्यांच्या स्वतःच्या पक्षनिष्ठेपासून लपून बसलेले होते. लहानपणी हे लोक तिघे तिघे एकत्र जमून चकत असत. चकणे म्हणजे तिघांनी एकमेकांच्या हातात हात मिसळवणे आणि क्षणात ते सोडवून आपलेच दोन्ही तळवे पालथे किंवा उताणे करून इतरांना दाखवणे! तिघांपैकी ज्याच्या तळव्याची पोझिशन एकमेव असेल त्याच्यावर उदाहरणार्थ राज्य येत असे. आज हे राज्य कोणावर यावे हे 'सर्वानुमते' (?) आधीच ठरलेले असावे. ह्याचे कारण ज्याच्यावर राज्य आणायचे त्याच्या पक्षाचे नांव पुकारण्यात आले. 'चकणे' ह्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देण्यात आला व 'चकणे' ही एक क्रिया न राहू देता ती एक भावना म्हणून तिची पुनर्निर्मीती झाली मोदीसाहेब! तुम्ही हवा होतात आज इथे!

एक खूप मोठ्ठा फरक पूर्वीच्या लपाछपीत आणि आजच्या लपाछपीत जाणवला. तो म्हणजे, पूर्वी चकून राज्य कोणावर आले हे ठरवले जात असे. आज राज्य कोणावर यावे हे आधी ठरवून त्यावर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. वयंही वाढलीयत ना आता पोरांची, कोण चकत बसणार!

तर ज्याच्यावर राज्य आले आहे त्याच्यावर ते यावे की नाही ह्यावर सर्वांनी आपापले मत नोंदवायचे होते. पण त्याचे काय आहे मोदीसाहेब, जन्म घेणे आणि मरण पावणे हे दोन विषय सोडले तर उरलेल्या प्रत्येक विषयाला 'मानवी घटनेमध्ये' पळवाटा नेमून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पळवाट आज निवडण्यात आली.

'मत नोंदवणे' ह्या क्रियेला असलेली ही पळवाट! कशाल अमतेबिते नोंदवायची?

ज्या महाराष्ट्रावर राज्य करण्यात कोणालाच रस उरलेला नाही त्या महाराष्ट्राच्या माथी एक नवोदीत 'राज्यकर्ता' मारून नुसते विचारायचे, 'हा' तुम्हाला मंजूर आहे?

त्यावर उरलेल्यांनी हो किंवा नाही म्हणायचे.

'हो' म्हणणारे किती? इतके इतके! इतके इतके म्हणजे इतके इतके डेसिबल्स! नाही म्हणणारे किती? तर तेही इतके इतके! तेही इतके इतके म्हणजे डेसिबल्स! कोणते डेसिबल्स जास्त हे ओळखण्यासाठी एक मनुष्य नेमलेला! त्याला ज्यांचे जास्त वाटतील त्यांच्या डेसिबल्सनुसार तो 'राज्यकर्ता' बहुतेकांना मान्य आहे किंवा नाही हे ठरवणार! वर पुन्हा त्याला हे अधिकार की एकदा त्याने हे ठरवले की पुन्हा मत देण्याची गरज नाही हेही तोच सांगू शकणार!

मोदीसाहेब, तुमचा महाराष्ट्रातील मानसपूत्र देवेंद्र फडणवीस ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे आणि तुमचे ..... आणि हो...... भाजपच्या दशकानुदशके सुरू असलेल्या तमाम प्रतिमानिर्मीती प्रयत्नांचेही अभिनंदन!

वये वाढल्यामुळे नियम बदलले, बदललेले नियम घटनेनुसार होते, सगळे ठीक आहे!

पण मोदीसाहेब, 'भाजप'ने राज्य असे मिळवावे ह्याची लाज वाटली.

'राज्य देवेंद्रवर आणायचे की नाही' ह्यावर झालेल्या आवाजी मतदानात कोणता 'आव्वाज कोणाचा' हेच कोणाला समजले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींसारख्यांची जनमानसाला केव्हापासूनच माहीत असलेली मलीन प्रतिमा तुम्हाला दिल्लीश्वर बनवायला कारणीभूत ठरली होती. तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाने स्वतःची प्रतिमा तितकीच मलीन करून घेणे हे तुमच्या देवेंद्रला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यास कारणीभूत ठरले मोदीसाहेब!

लहानपणीच्या आणि आजच्या इस्टॉप पार्टी मधील सर्वात मोठा फरक हा होता मोदीसाहेब, की तेव्हा ज्याच्यावर राज्य असे तो त्याच्यावर राज्य आले म्हणून दु:खी असायचा, आज ज्याच्यावर राज्य आले आहे तो सुखी आहे.

मोदीसाहेब, शर्ट कोणी बदलले, अंड का झालं नाही, सहा महिन्यांनी पुन्हा देवेंद्रलाच राज्य मिळणार की कोणा इतरांना, हे सगळे राहूदेत! पण जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कपाटात असलेली खाकी अर्धी चड्डी दिसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीवर बिनदिक्कत हात ठेवू शकणारे भारतीय उद्योजक आणि गाजलेले परदेश दौरे ह्यातून अटलबिहारी वाजपेयी आठवतील, तेव्हा मोदीसाहेब, कोणाच्याही नकळत तुमची मान खाली झुकेल! नक्की झुकेल!

अहो एक साधे अकरा कोटी भारतीयांचे राज्य हे! गेले असते हातातून तर कोणाला मिळाले असते? कोणालाच नाही. ज्या तारेवरच्या कसरती तुमच्या जन्मजात जोकर असलेल्या अमित शहाने केल्या त्या जन्मापासून बोलबच्चनगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना कराव्या लागल्या असत्या. अहो कोणीही हे राज्य मागण्याआधी डोक्यावर पदर घेऊन, मुंडावळ्या बांधून तुमच्या हाताने कुंकवाची रेघ केसांमध्ये ओढून घेण्यासाठी आले असते.

मोदीसाहेब, यू वन महाराष्ट अ‍ॅन्ड लॉस्ट रिस्पेक्ट!

ह्यानंतर भाजप हा आवडता पक्ष असण्याचे कारण केवळ हेच असेल की त्याने काँग्रेसला एक पर्याय असू शकतो हे दाखवून दिले.

बाकी सहा महिन्यांनी तुम्हाला बाळासाहेबांचे चिरंजीवही पाठिंबा देतील कदाचित, पण देवेंद्रवर पुन्हा राज्य यावे म्हणून त्यांनी त्यांचा 'शर्ट बदलला नाही' ही वस्तूस्थिती तुम्हाला एकांतात खात राहील.

मोदीसाहेब, आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक प्रभावी पंतप्रधान मानतो कारण तुम्ही तुमची तयार केलेली 'जागतिक नेत्याची' प्रतिमा!

पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ,

निव्वळ वैयक्तीक बोलणे नाही तर पक्ष म्हणून काय विचार व कृती होती हे महत्वाचे.

निव्वळ बोलून ऊपयोग काय? जर मुळात विचार तसा नसेल तर त्या अनुशंगाने पावले देखिल पडत नाहीत.. याचा अर्थ फडणवीस, व शहा, ईतर भाजपा ज्येष्ट नेते, व मोदी यांच्यात एकमत नाही असे म्हणावे लागेल. (वेळे प्रसंगी मी मध्यस्थी करायला तयार आहे, असे अडवाणींचे वक्तव्य आले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती.)

एकूणातच सर्व प्रकरण अत्यंत अपरिपक्वपणे किंवा काहींच्या मनमानीने हाताळल्याचे दिसते. मुख्यत्वे विश्वासार्हता, व नैतीकता या आधारावरच या खेपेस मतदाराने भाजपाला निवडून दिले आहे हे लक्षात घेता, पक्ष म्हणून या चुका खूप महागात पडू शकतात.

<< निव्वळ वैयक्तीक बोलणे नाही तर पक्ष म्हणून काय विचार व कृती होती हे महत्वाचे. >> योगजी, तुम्ही म्हटलंत, <<आम्ही सेनेला बरोबर घेणार आहोत' निव्वळ असे एक विधान जरी शाह कं ने केले असते तरी घडलेल्या नाट्याचे स्वरूप निश्चीतच बदलले असते असे म्हणायला वाव आहे >>. मीं फक्त अशीं विधानं केलीं गेली होती , ही माहिती दिली एवढंच.

आत्ताच दे. फ. च्या फे.बु. पोस्टला आलेला रिप्लाय पाहीला -

जिंकून देखिल दुनिया सारी
औरंगजेब रडला होता
कारण दरबारात आवाज चढवून
त्याला शिवाजी राजा नडला होता।।

जिंकून देखिल मुंबई सारी
दाऊद इब्राहिम रडला होता
कारण त्याच्या समोर बंदुक धरून, त्याला
मन्या सुर्वे नडला होता।।

जाळून देखिल CST सारी
अजमल कसाब रडला होता
कारण त्याची मान हातात धरून त्याला,
तुकाराम ओबाळे नडला होता।।

जिंकून देखिल भारत सारा
नरेंद्र मोदी रडला होता
कारण 122 जागा जिंकुन सुद्धा
त्याला 63 जागा जिंकनारा उद्धव ठाकरे नडला होता।।

अजब आहे सगळे.

आज कोलकतामधे रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध २६४ धांवा करून विश्वविक्रम केला, याचा सर्वांत अधिक आनंद देवेंद्र फडणविसना झाला असावा; त्याना दिलासा देत मिडीयाचा सगळा झोत [ व रोंख] अचानक त्यांच्यावरून आतां रोहितकडे वळला आहे !!! Wink

<< छान कविता शेअर केलित.>> फक्त... पहिल्या तीन कडव्यातलं नडणं व चौथ्या कडव्यातलं 'नडणं' यांची जातकुळी एकदमच वेगळी आहे, असं वाटलं ! Wink

aquestion.JPG

अशी चर्चा आहे की सेनेने राष्ट्रवादी बरोबर डील केले आहे की सेनेने भाजपला पाठिंबा द्यायचा नाही जेणे करुन राष्ट्रवादीला बाहेरुन पाठिंबा देऊन त्यांना हवे तसे मिळवता यावे.

ही चर्चा योग्य वाटते कारण भाजपने सिंचन प्रकरणात जे घोटाळे बाहेर काढले त्यात दुसरा मोठा विरोधी पक्ष म्हणुन सेनेची भुमीका मिळमिळीत होती. आज जेव्हडा आवाज सेना करते याच्या १०% सुध्दा तेव्हा नव्हता.

हे जनतेच्या लक्षात येणार आहे का ? फक्त भाजपच्या विरोधात आता सगळे पक्ष एकत्र येऊन झोडपणार आहेत ?

ही चर्चा योग्य वाटते कारण भाजपने सिंचन प्रकरणात जे घोटाळे बाहेर काढले त्यात दुसरा मोठा विरोधी पक्ष म्हणुन सेनेची भुमीका मिळमिळीत होती. आज जेव्हडा आवाज सेना करते याच्या १०% सुध्दा तेव्हा नव्हता.

हे जनतेच्या लक्षात येणार आहे का ? फक्त भाजपच्या विरोधात आता सगळे पक्ष एकत्र येऊन झोडपणार आहेत ?

>> खडसेंचे विरोधी नेता म्हणून बरेच किस्से आहेत, ते तासनतास बोलायचे, इतरांना बोलूच द्यायचे नाहीत इ

भाजप जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत असेल तर त्याला सेना कसं काय जबाबदार. हे म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यासारखं आहे.

दिल्लीमध्ये जे केजरीवालने केले तेच भाजपने महाराष्ट्रात केले.

रच्याकने: केजरीवाल्चे 'सब मिले हुये हैं जी' चा अर्थ लक्षात येतोय हळू हळू

<< प्रवक्ते आले >> एका बाजूने << ... इतका हलकटपणा केवळ आणि केवळ भाजपासारखा आतल्या गाठीचा पक्षच करु शकतो. १५ वर्षापासुन सत्तेचे उपाशी बकाबका जे मिळेल ते तोंडात भरण्याचा प्रयत्न चालु आहे. किळसवाणा प्रकार फक्त असल्या वृत्तीचेच लोक करु शकतात आणि अश्या प्रकाराचे समर्थन त्याच वृत्तीचे लोक करु शकतात.>> असले ॠग्वेदी प्रवक्ते इथं आले कीं चहूं बाजूनीं असेही प्रवक्ते येणारच !!! Wink

नितीनचंद्र | 13 November, 2014 - 09:38
नरो वा कुंजरोवा म्हणत अधर्माशी लढण्याचा मार्ग स्वतः श्रीकृष्णाने सांगीतला आहे. भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.

भाऊ हे बघा प्रवक्ते आधीच सुरू झालेले Wink आता दुसर्यांना बोलून काय फायदा

एकाने चालू केले तर दुसरेही करणारच न्युटन की आईनस्टाईनचा नियम मायबोलीवर जास्त लागू पडतो Happy

भाऊ नमसकरसाहेब,

ॠग्वेदी प्रवक्ते इथं आले कीं चहूं बाजूनीं असेही प्रवक्ते येणारच ही जरा जातीवर टिका होते अस वाटत नाही का आपल्याला ?

दिल्लीमध्ये जे केजरीवालने केले तेच भाजपने महाराष्ट्रात केले.

रच्याकने: केजरीवाल्चे 'सब मिले हुये हैं जी' चा अर्थ लक्षात येतोय हळू हळू

तरी पण केजरीवाल बरोबर हा खासा न्याय आहे.

<< भाऊ हे बघा प्रवक्ते आधीच सुरू झालेले >> कुणीही कुणाचेही प्रवक्ते व्हावं पण प्रामाणिकपणे आपल्याला काय वाटतं तें इथं लिहीणार्‍या अनेकांवर केवळ त्याचं मत वेगळं आहे म्हणून बेधडक व अकारण ' किळसवाण्या वृत्ती'चा छाप मारणारे प्रवक्ते जरा दुर्मिळच ! Wink
<< ही जरा जातीवर टिका होते अस वाटत नाही का आपल्याला ? >> 'ऋग्वेद' यांची दि.१३ नोव्हे.२०१४ची पोस्ट उद्धृत केलीय म्हणून ॠग्वेदी प्रवक्ते म्हटलंय ! उगीचच भलताच अर्थ काढणं अनुचित !

भाजपा आता सेनेने अफझलखान वगैरे टिका केली तर ते गेले उडत हे मुद्दे काढत आहेत,
पण पवारसाहेबांनीही यांना हाल्फ चड्डीवाले म्हणत कंबरेखालची टिका केली होती ना?
चुकत असेल तर प्रकाश टाका.

शक्ती कपूर एक्दा एका sting operation मधे पकडला गेला होता एका पत्रकार मुलीने रचलेल्या सापळ्यात्.त्यानंतर एका TV show मधे तो स्वतःला काही बही पध्द्तीने defend करत होता.त्यावर महेश भटने त्याला खुप चांगला सल्ला त्याच show मधे दिला होता.don’t defend. it will serve no purpose.it will be hypocrisy if you try to defend yourself.अब गल्ती कियी हे तो किया हे. accept it and keep quiet.

<<<<अशी चर्चा आहे की सेनेने राष्ट्रवादी बरोबर डील केले आहे की सेनेने भाजपला पाठिंबा द्यायचा नाही जेणे करुन राष्ट्रवादीला बाहेरुन पाठिंबा देऊन त्यांना हवे तसे मिळवता यावे.

ही चर्चा योग्य वाटते कारण भाजपने सिंचन प्रकरणात जे घोटाळे बाहेर काढले त्यात दुसरा मोठा विरोधी पक्ष म्हणुन सेनेची भुमीका मिळमिळीत होती. आज जेव्हडा आवाज सेना करते याच्या १०% सुध्दा तेव्हा नव्हता.

हे जनतेच्या लक्षात येणार आहे का ? फक्त भाजपच्या विरोधात आता सगळे पक्ष एकत्र येऊन झोडपणार आहेत ?>>>>

विनोदाच्या धाग्यावर हलवा. मला अमोल पालेकरचा मेरी बीबी की शादी, सलमान-अक्षयचा मुझसे शादी करोगी हे सिनेमा आठवतात. भाजपशी आपले यापुढे जुळणार नाहे हे लक्षात आल्यावर मोठ्या मनाने सेनेने आपल्या एक्स-पार्टनरला न्यु पार्टनर शोधून दिला, स्वतःच्या पसंतीने. भाजपच्या पसंतीचा काही प्रश्नच नाही.

don’t defend. it will serve no purpose.it will be hypocrisy if you try to defend yourself.अब गल्ती कियी हे तो किया हे. accept it and keep quiet >

भक्तगण त्या शक्तीकपुर सारखे आहेत. Wink

लांगुलचालन करणार्या भक्तांसाठी एक माहीती
ध्वनीमतदान जे आधी झाले होते त्यावेळेला पाठिंबा देणार्या आमदारांची स्वाक्षरी असलेली यादी राज्यपाल आणि अध्यक्षांकडे सुपुर्त केली होती. त्यानंतर ध्वनीमत घेण्यात आले होते.

बोंबा मारण्याआधी माहीती तपासुन घ्यावी खास करुन भक्तांनी

सरकार बहुमतात आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
सांगा पाहु कसे ?

भाजपाचे १२३. बाकीचे कुठुन आलेत ? कोण कोण आहे ? स्पष्ट करा

<< सेनेने राष्ट्रवादी बरोबर डील केले आहे>>, <<लांगुलचालन करणार्या भक्तांसाठी एक माहीती >>, << भक्तगण त्या शक्तीकपुर सारखे आहेत. >>
माझा एक फुटबॉलवेडा मित्र आयआयटी खरगपूरमधे असताना मुद्दाम कोलकत्त्याला मोहन बगान वि. ईस्ट बंगाल या हाडवैर असलेल्या संघांतला सामना बघायला गेला. मोहन बगानच्या एका चालीचं कौतुक वाटून त्याने टाळ्या वाजवल्या. तो बसला होता त्या स्टेडियमच्या भागातल्या सर्व प्रेक्षकांच्या जळजळीत नजरा त्याच्याकडे वळल्या. त्याच्या बाजूच्या प्रेक्षकाने हा बंगाली नाहीं हें ओळखून तिरसटपणे एवढंच म्हटलं, ' क्या यहांसे डायरेक्ट नीचे जानेका है क्या ?'. गांगरून गेलेल्या त्या मित्राच्या नंतर लक्षांत आलं कीं अख्खा स्टेडियम मोहन बगान चाहते व ईस्टबंगाल पाठीराखे असा स्पष्ट विभागला गेला होता व तो ईस्ट बंगालच्या विभागात बसला होता; तिथें मोहन बगानच्या एखाद्या खेळीचं कौतुक करणं [ किंवा समोरच्या विभागात ईस्ट बंगालच्या खेळीचं ] म्हणजे देशद्रोहापेक्षांही घृणास्पद ! फुटबॉल समजून घेणं अगदींच दुय्यम !!
या धाग्याचा तसा फुटबॉल स्टेडियम होवूं नये इतकीच प्रार्थना ! Wink

बरोबर भाउ Wink
पाकिस्तानात पाठवुन निघुन जावे बोलणार्‍यांनी सुरुवात केल्याने आता ऐकायला देखील सुरुवात केली पाहिजे Biggrin

Pages