आदरणीय मोदीसाहेब,
वंदन!
आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात! अनेकदा राज्य ज्याच्यावर असे तो सतत राज्य त्याच्यावर आल्याने इतका वैतागलेला असे की त्याला लपलेल्यांना एकदाचे ओळखायची प्रचंड घाई झालेली असे. त्यामुळे तो प्रत्यक्ष चेहरा न बघताच, लांबूनच, नुसती कोणाच्या शर्टची झलक दिसली तरी त्याचे नांव घेऊन 'हा हा इस्टॉप' असे ओरडायचा. हे लक्षात घेऊन काही मुलांनी शक्कल लढवलेली होती. लपल्यानंतर शर्ट्सची अदलाबदल करायची आणि मुद्दाम शर्टचा थोडा भाग राज्य असलेल्या मुलाला दिसू द्यायचा. असे केल्याने तो चुकीच्या मुलाला ओळखल्याचे बोंबलून जाहीर करायचा. त्याने उल्लेखलेल्या नावाचा मुलगा जर तेथे निघालाच नाही तर सगळे जण 'अंड, अंड' करत बाहेर यायचे आणि 'राज्यकर्त्यावर' पुन्हा नवे राज्य यायचे.
पुढे जसजसे सगळे मोठे झाले तसतसे मग आपापल्या कामानिमित्त सगळेजण पांगले. कोणी नागपूरला गेला, कोणी बारामतीला, कोणी मुंबईला तर कोणी दिल्लीला!
आज, जवळपास पस्तीस वर्षांनी त्या सर्वांचे पहिल्यांदाच रियुनियन बघायला मिळाले.
आजही एक राज्यकर्ता निवडला गेला. त्याच्यावर 'राज्य' लादण्यात आले ह्याचा त्याला आनंद झाला होता हे एक ठसठशीतपणे जाणवलेले वेगळेपण! लपणार्यांची संख्या २८६ होती. त्यातले वेगळेपण असे की सगळे लपलेले खरे तर समोर बसलेले होते, पण ते त्यांच्या स्वतःच्या पक्षनिष्ठेपासून लपून बसलेले होते. लहानपणी हे लोक तिघे तिघे एकत्र जमून चकत असत. चकणे म्हणजे तिघांनी एकमेकांच्या हातात हात मिसळवणे आणि क्षणात ते सोडवून आपलेच दोन्ही तळवे पालथे किंवा उताणे करून इतरांना दाखवणे! तिघांपैकी ज्याच्या तळव्याची पोझिशन एकमेव असेल त्याच्यावर उदाहरणार्थ राज्य येत असे. आज हे राज्य कोणावर यावे हे 'सर्वानुमते' (?) आधीच ठरलेले असावे. ह्याचे कारण ज्याच्यावर राज्य आणायचे त्याच्या पक्षाचे नांव पुकारण्यात आले. 'चकणे' ह्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देण्यात आला व 'चकणे' ही एक क्रिया न राहू देता ती एक भावना म्हणून तिची पुनर्निर्मीती झाली मोदीसाहेब! तुम्ही हवा होतात आज इथे!
एक खूप मोठ्ठा फरक पूर्वीच्या लपाछपीत आणि आजच्या लपाछपीत जाणवला. तो म्हणजे, पूर्वी चकून राज्य कोणावर आले हे ठरवले जात असे. आज राज्य कोणावर यावे हे आधी ठरवून त्यावर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. वयंही वाढलीयत ना आता पोरांची, कोण चकत बसणार!
तर ज्याच्यावर राज्य आले आहे त्याच्यावर ते यावे की नाही ह्यावर सर्वांनी आपापले मत नोंदवायचे होते. पण त्याचे काय आहे मोदीसाहेब, जन्म घेणे आणि मरण पावणे हे दोन विषय सोडले तर उरलेल्या प्रत्येक विषयाला 'मानवी घटनेमध्ये' पळवाटा नेमून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पळवाट आज निवडण्यात आली.
'मत नोंदवणे' ह्या क्रियेला असलेली ही पळवाट! कशाल अमतेबिते नोंदवायची?
ज्या महाराष्ट्रावर राज्य करण्यात कोणालाच रस उरलेला नाही त्या महाराष्ट्राच्या माथी एक नवोदीत 'राज्यकर्ता' मारून नुसते विचारायचे, 'हा' तुम्हाला मंजूर आहे?
त्यावर उरलेल्यांनी हो किंवा नाही म्हणायचे.
'हो' म्हणणारे किती? इतके इतके! इतके इतके म्हणजे इतके इतके डेसिबल्स! नाही म्हणणारे किती? तर तेही इतके इतके! तेही इतके इतके म्हणजे डेसिबल्स! कोणते डेसिबल्स जास्त हे ओळखण्यासाठी एक मनुष्य नेमलेला! त्याला ज्यांचे जास्त वाटतील त्यांच्या डेसिबल्सनुसार तो 'राज्यकर्ता' बहुतेकांना मान्य आहे किंवा नाही हे ठरवणार! वर पुन्हा त्याला हे अधिकार की एकदा त्याने हे ठरवले की पुन्हा मत देण्याची गरज नाही हेही तोच सांगू शकणार!
मोदीसाहेब, तुमचा महाराष्ट्रातील मानसपूत्र देवेंद्र फडणवीस ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे आणि तुमचे ..... आणि हो...... भाजपच्या दशकानुदशके सुरू असलेल्या तमाम प्रतिमानिर्मीती प्रयत्नांचेही अभिनंदन!
वये वाढल्यामुळे नियम बदलले, बदललेले नियम घटनेनुसार होते, सगळे ठीक आहे!
पण मोदीसाहेब, 'भाजप'ने राज्य असे मिळवावे ह्याची लाज वाटली.
'राज्य देवेंद्रवर आणायचे की नाही' ह्यावर झालेल्या आवाजी मतदानात कोणता 'आव्वाज कोणाचा' हेच कोणाला समजले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींसारख्यांची जनमानसाला केव्हापासूनच माहीत असलेली मलीन प्रतिमा तुम्हाला दिल्लीश्वर बनवायला कारणीभूत ठरली होती. तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाने स्वतःची प्रतिमा तितकीच मलीन करून घेणे हे तुमच्या देवेंद्रला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यास कारणीभूत ठरले मोदीसाहेब!
लहानपणीच्या आणि आजच्या इस्टॉप पार्टी मधील सर्वात मोठा फरक हा होता मोदीसाहेब, की तेव्हा ज्याच्यावर राज्य असे तो त्याच्यावर राज्य आले म्हणून दु:खी असायचा, आज ज्याच्यावर राज्य आले आहे तो सुखी आहे.
मोदीसाहेब, शर्ट कोणी बदलले, अंड का झालं नाही, सहा महिन्यांनी पुन्हा देवेंद्रलाच राज्य मिळणार की कोणा इतरांना, हे सगळे राहूदेत! पण जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कपाटात असलेली खाकी अर्धी चड्डी दिसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीवर बिनदिक्कत हात ठेवू शकणारे भारतीय उद्योजक आणि गाजलेले परदेश दौरे ह्यातून अटलबिहारी वाजपेयी आठवतील, तेव्हा मोदीसाहेब, कोणाच्याही नकळत तुमची मान खाली झुकेल! नक्की झुकेल!
अहो एक साधे अकरा कोटी भारतीयांचे राज्य हे! गेले असते हातातून तर कोणाला मिळाले असते? कोणालाच नाही. ज्या तारेवरच्या कसरती तुमच्या जन्मजात जोकर असलेल्या अमित शहाने केल्या त्या जन्मापासून बोलबच्चनगिरी करणार्या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना कराव्या लागल्या असत्या. अहो कोणीही हे राज्य मागण्याआधी डोक्यावर पदर घेऊन, मुंडावळ्या बांधून तुमच्या हाताने कुंकवाची रेघ केसांमध्ये ओढून घेण्यासाठी आले असते.
मोदीसाहेब, यू वन महाराष्ट अॅन्ड लॉस्ट रिस्पेक्ट!
ह्यानंतर भाजप हा आवडता पक्ष असण्याचे कारण केवळ हेच असेल की त्याने काँग्रेसला एक पर्याय असू शकतो हे दाखवून दिले.
बाकी सहा महिन्यांनी तुम्हाला बाळासाहेबांचे चिरंजीवही पाठिंबा देतील कदाचित, पण देवेंद्रवर पुन्हा राज्य यावे म्हणून त्यांनी त्यांचा 'शर्ट बदलला नाही' ही वस्तूस्थिती तुम्हाला एकांतात खात राहील.
मोदीसाहेब, आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक प्रभावी पंतप्रधान मानतो कारण तुम्ही तुमची तयार केलेली 'जागतिक नेत्याची' प्रतिमा!
पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.
-'बेफिकीर'!
सोची आणि मुंबई एक दोन अडिच .
सोची आणि मुंबई एक दोन अडिच .
सहमत बेफीकीर
सहमत बेफीकीर जी..
महाराष्ट्रात प्रादेशीक पक्षांशिवाय सत्ता स्थापन करणे कठीन आहे. पुन्हा एकदा सिध्द झाले. अमीत शहा या माणसाला वाटले आपण एकटेच सत्ता स्थापण करु शकतो. मोदी लाटेचा फायदा होइल पण सगळाच गोंधळ झालाय. साधा हीशोब आहे इथे.
शीव सेना आणि रॉ कॉ ही काहि भागात फारच आणि कट्टर आहे. त्यामुळे कितिही झाले तरी सेना ५०/६० आणि रॉकॉ ५० /६०. थोडीशी पुढे मागे. हे पक्क आहे. म्हंजे आता कॉ कींवा भाजपा ला १७८/१८५ मधुन १४४ मिळवावे लागनार. जे फार कठीण आहे. कारण कितिही झाले तरी हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत त्यामुळे कमीत कमी ५०/६० जागा तर मिळनारच. म्हंजे एकाला ५०/६० मिळाल्या तर दुसरा १२०/१३० पर्यंतच जाणार. पुन्हा अपक्ष + बाकीचे पक्ष..
म्हणजे महराष्ट्रात प्रादेशिक पक्षाशिवाय पर्याय नाहि. जे मोदी आणि अमीत शहा ला अजुन समजत नाही आहे.
सुमारे दोनशे वर्षांनंतर
सुमारे दोनशे वर्षांनंतर महाराष्ट्राच्या ईतिहासात परत एकदा साडेतीन (फडणवीस, खडसे, तावडे आणि अर्धवट अमित शहा) शहाण्यांची नोंद होणार...
मस्त लेख बेफीजी!
मस्त लेख बेफीजी!
सुमारे दोनशे वर्षांनंतर
सुमारे दोनशे वर्षांनंतर महाराष्ट्राच्या ईतिहासात परत एकदा साडेतीन (फडणवीस, खडसे, तावडे आणि अर्धवट अमित शहा) शहाण्यांची नोंद होणार...
नाही नाही अडाणी, अंबानी, मंगलप्रभात लोढा हे तीन शहाणे आणि अमित शाह अर्धा शहाणा
बाकी फडणविस-खडसे वगैरे पटावरची प्यादी आहेत. त्यांना चालवणारे वेगळेच आहेत.
पण मोदींसाठी आज आवश्यकता
पण मोदींसाठी आज आवश्यकता सत्तेत टिकून रहायची होती ना, त्यामुळे त्यानी शर्ट लपवले (दाखवायच्या ऐवजी) असे का नाही वाटत तुम्हाला. सत्ता हातातून गेली की कुठलेच निर्णय अंमलात आणता येणार नाहीत की ध्येये गाठता येणार नाहीत. आजची खेळी मला तर फार मोजून मापून केलेली नि धोरणी वाटली.
आता घोटाळ्यांची चौकशी करुन
आता घोटाळ्यांची चौकशी करुन नॅचरली करप्ट पार्टीच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे धैर्य भाजप दाखवणार आहे का?
परत राष्ट्रवादीचे लोक सुरक्षित राहिले किंवा परत सत्तेत आले तर काँग्रेस काय वाईट होती असा विचार चुकीचा आहे का?
एक भाजप Sympatico असुनही आज मी अत्यंत निराश झालोय.
असे धैर्य ते दाखवतील, असं
असे धैर्य ते दाखवतील, असं तुम्हाला मुळातच वाटत होतं?
. सरकार तरले, पण मोदी हरले
. सरकार तरले, पण मोदी हरले हेच खरं!! मोदी-भाजपा समर्थकांची मनोभूमिका बेफिकीर यांनी योग्य शब्दात मांडली आहे. आज बर्याच जणांशी बोलताना हाच हताश-निराश सूर जाणवत होता.
आज सोशल मिडीयावर काँग्रेसच्या
आज सोशल मिडीयावर काँग्रेसच्या स्पष्ट, स्थिर भुमिकेचे कौतुक होतय,' यांच्यापेक्षा काँग्रेसच बरी होती' असे खुद्द भाजप समर्थकच म्हणत आहेत सोशल मिडीयावर.यातुनच भाजपने केलेल्या हलकटगिरीचा अंदाज येतो..
अगदी मनातलं बोलतात
अगदी मनातलं बोलतात
दुर्दैवी, दुर्दैवी आणि फक्त
दुर्दैवी, दुर्दैवी आणि फक्त दुर्दैवी !!!
मराठा गडी, (अप)यशाचा धनी !
म्हणजे? फ मराठा आहेत?
म्हणजे? फ मराठा आहेत?
पण कंपनीचे टारगेट एकाच
पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.>>>>>>>>>>>>>>>>>>एकदम झकास !!!
सत्ता मिळवण्यासाठी आणि
सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी आपण कुठ्ल्याही थराला जातो हे भाजपाने पुन्हा एकदा सिद्ध केले.
तत्वान्च्या निव्वळ गप्पा मारायच्या... आचरण करणे बन्धनकारक नाही.
नरो वा कुंजरोवा म्हणत
नरो वा कुंजरोवा म्हणत अधर्माशी लढण्याचा मार्ग स्वतः श्रीकृष्णाने सांगीतला आहे. भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.
बरोबर. घोटाळे संपवायचे
बरोबर. घोटाळे संपवायचे उद्दिष्ट कधीच नव्हते आणि नसेल.
नरो वा कुंजरोवा म्हणत
नरो वा कुंजरोवा म्हणत अधर्माशी लढण्याचा मार्ग स्वतः श्रीकृष्णाने सांगीतला आहे. भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.
-------- तसे करताना भाजपाने स्वतः घोटाळे करणे अपेक्षित नाही आहे. भाजपा घोटाळे मुक्त नाही आहे.
सध्यातरी सत्ता टिकवण्यासाठी काय वाट्टेल ते....
कॉन्ग्रेस परवडली पण
कॉन्ग्रेस परवडली पण काका-पुतण्या अज्जीबात नको. शेवटी अग अग म्हशीच्या चालीवर, "अरे अरे काका, प्रसन्ग आहे बाका, सुरक्षीत ठेवतो तुझा खोका, पण दे मला मौका" असे भाजपाने नवीन गाणे रचले. तिकडे दिवाकर देशमुख म्हणाले की भाजपा भक्त समर्थन करतायत. समर्थन कसले डोम्बल्याचे? इकडे स्वत:चेच केस उपटुन ता थैय्या करायची वेळ आलीय.:फिदी:
>>भाजप फक्त पांडवांच्या
>>भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. <<
पांडवांसारखंच भाजप नरकात जाणार का?
नरो वा कुंजरोवा म्हणत
नरो वा कुंजरोवा म्हणत अधर्माशी लढण्याचा मार्ग स्वतः श्रीकृष्णाने सांगीतला आहे. भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.>> भाजपा पांडव मग कृष्ण कोण आ.वं. नरेंद्र मोदी कां?
कृष्ण लाल कृष्ण सावळा कृष्ण
कृष्ण लाल कृष्ण सावळा कृष्ण कृष्णाचे अनेक रंग
नरो वा कुंजरोवा म्हणत
नरो वा कुंजरोवा म्हणत अधर्माशी लढण्याचा मार्ग स्वतः श्रीकृष्णाने सांगीतला आहे. भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.
>>
डोळ्यात टचकण पाणी आले बघा इतकी भक्तीभाव . बस कर रुलायेगा क्या
दिदे बस कर पगले, इतना भी
दिदे बस कर पगले, इतना भी हॅसाना नही रे!
सत्ता हातात आली की ९९ टक्के
सत्ता हातात आली की ९९ टक्के घोटाळे न करणारेही घोटाळे करतात असा इतिहास असल्याने स्वतःसाठी नवनवीन घोटाळ्याच्या संधी शोधत बसण्याऐवजी इतरांचे घोटाळे उघडे पाडण्याचे कष्ट कोण उपसत बसणार.
बाकी २१ व्या शतकातही चक्क राजकारण्यांनीही तत्वांना धरून वागावे अशी भाबडी अपेक्षा 'सामान्य माणसाचा प्रतिनिधी' आणखी किती काळ करत राहणार आहे कुणास ठाउक!
शब्द न् शब्द पटला बेफि..
शब्द न् शब्द पटला बेफि..
भाजप फक्त पांडवांच्या चालीवर
भाजप फक्त पांडवांच्या चालीवर लढतय. उद्दीष्ट आहे घोटाळेबाज काँग्रेसला संपवण्याचे.
>> अहो पण त्यानी त्यासाठी मित्र म्हणून कौरवाना घेतलय .
आमच्या भागात राष्ट्रवादीचे
आमच्या भागात राष्ट्रवादीचे गुठांमंत्री कॉलर ताठ करुन फिरत आहेत, शेवटी खरा वाघ पवारच, मराठाच फक्त वाघ असतात ,वगैरे बडबड करत आहेत, हे फक्त त्या फडणवीसांमुळे झाले..
पण कंपनीचे टारगेट एकाच
पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो....
नाही पटल हे ,
मोदींनी किती सभा घेतल्या महाराष्ट्र विधान्सभेसाठी? सगळ्याच गोष्टी मोदींनी करायच्या तर अमित शहा वगैरे टीमने काय काम करायच मग? भारतातल्या महत्वाच्या बहुतेक राज्यांमधे भाजपाची सत्ता आहे ती मोदींमुळ किती आणि भाजपामुल किती ही सगळ्यांनाच माहीत आहे.
येकंदरीत त्यांच विदेश धोरण पहाता ते वल्ड लिडशिपमधे सक्रीय सहभागी होउ शकण्याची शक्यता खुपच वाढली आहे. कोणताच देश येकट्याच्या जीवावर प्रगती करु शकण्याचे दिवस आता गेलेत. त्यांची मेक ईन ईंडीया ही कंसेप्ट चांगली आहे त्या द्रुष्टीने ते पावल उचलताना पण दिसतायत.
निवडणुका म्हण्जे राजकिय पक्षाचा शक्तिपात असतो. सलग ३ निवडणुका (लोकसभा + विधानसभा + विधानसभा फेरनिवडणुका) कोणत्याच पक्षाला सोसावणार नाहीत म्हनुन सद्य परीस्थितीत काढलेला हा मध्यम मार्ग असावा.
जर मोदींवर विश्वास ठेऊन त्यांना निवडुण दिलय तर ५ वर्ष थांबा. त्यांना काम करु द्या. सतत काय हे असच का केल ते तसच का केल. यालाच का हे दिल याच्याकडुनच का हे घेतल म्हनुन अगदीच हात पाय धुऊन पाठीमाघे लागु नका.
मला तरी येकच म्हण सुचतीये " पी हळद हो गोरी "
सुशांत +१ फुकटची सर्व्हर
सुशांत +१
फुकटची सर्व्हर स्पेस मिळतेय ना सोशल मिडीयामुळे सगळ्यांना त्यामुळे आपले मनात आले विचार की ते अभ्यासपूर्ण मते म्हणून उधळायचे सगळीकडे हे सर्रास सुरू आहे सध्या. फेसबुकावर तर ह्याहून भयानक परीस्थिती आहे.
Pages