आदरणीय मोदीसाहेब,
वंदन!
आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात! अनेकदा राज्य ज्याच्यावर असे तो सतत राज्य त्याच्यावर आल्याने इतका वैतागलेला असे की त्याला लपलेल्यांना एकदाचे ओळखायची प्रचंड घाई झालेली असे. त्यामुळे तो प्रत्यक्ष चेहरा न बघताच, लांबूनच, नुसती कोणाच्या शर्टची झलक दिसली तरी त्याचे नांव घेऊन 'हा हा इस्टॉप' असे ओरडायचा. हे लक्षात घेऊन काही मुलांनी शक्कल लढवलेली होती. लपल्यानंतर शर्ट्सची अदलाबदल करायची आणि मुद्दाम शर्टचा थोडा भाग राज्य असलेल्या मुलाला दिसू द्यायचा. असे केल्याने तो चुकीच्या मुलाला ओळखल्याचे बोंबलून जाहीर करायचा. त्याने उल्लेखलेल्या नावाचा मुलगा जर तेथे निघालाच नाही तर सगळे जण 'अंड, अंड' करत बाहेर यायचे आणि 'राज्यकर्त्यावर' पुन्हा नवे राज्य यायचे.
पुढे जसजसे सगळे मोठे झाले तसतसे मग आपापल्या कामानिमित्त सगळेजण पांगले. कोणी नागपूरला गेला, कोणी बारामतीला, कोणी मुंबईला तर कोणी दिल्लीला!
आज, जवळपास पस्तीस वर्षांनी त्या सर्वांचे पहिल्यांदाच रियुनियन बघायला मिळाले.
आजही एक राज्यकर्ता निवडला गेला. त्याच्यावर 'राज्य' लादण्यात आले ह्याचा त्याला आनंद झाला होता हे एक ठसठशीतपणे जाणवलेले वेगळेपण! लपणार्यांची संख्या २८६ होती. त्यातले वेगळेपण असे की सगळे लपलेले खरे तर समोर बसलेले होते, पण ते त्यांच्या स्वतःच्या पक्षनिष्ठेपासून लपून बसलेले होते. लहानपणी हे लोक तिघे तिघे एकत्र जमून चकत असत. चकणे म्हणजे तिघांनी एकमेकांच्या हातात हात मिसळवणे आणि क्षणात ते सोडवून आपलेच दोन्ही तळवे पालथे किंवा उताणे करून इतरांना दाखवणे! तिघांपैकी ज्याच्या तळव्याची पोझिशन एकमेव असेल त्याच्यावर उदाहरणार्थ राज्य येत असे. आज हे राज्य कोणावर यावे हे 'सर्वानुमते' (?) आधीच ठरलेले असावे. ह्याचे कारण ज्याच्यावर राज्य आणायचे त्याच्या पक्षाचे नांव पुकारण्यात आले. 'चकणे' ह्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देण्यात आला व 'चकणे' ही एक क्रिया न राहू देता ती एक भावना म्हणून तिची पुनर्निर्मीती झाली मोदीसाहेब! तुम्ही हवा होतात आज इथे!
एक खूप मोठ्ठा फरक पूर्वीच्या लपाछपीत आणि आजच्या लपाछपीत जाणवला. तो म्हणजे, पूर्वी चकून राज्य कोणावर आले हे ठरवले जात असे. आज राज्य कोणावर यावे हे आधी ठरवून त्यावर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. वयंही वाढलीयत ना आता पोरांची, कोण चकत बसणार!
तर ज्याच्यावर राज्य आले आहे त्याच्यावर ते यावे की नाही ह्यावर सर्वांनी आपापले मत नोंदवायचे होते. पण त्याचे काय आहे मोदीसाहेब, जन्म घेणे आणि मरण पावणे हे दोन विषय सोडले तर उरलेल्या प्रत्येक विषयाला 'मानवी घटनेमध्ये' पळवाटा नेमून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पळवाट आज निवडण्यात आली.
'मत नोंदवणे' ह्या क्रियेला असलेली ही पळवाट! कशाल अमतेबिते नोंदवायची?
ज्या महाराष्ट्रावर राज्य करण्यात कोणालाच रस उरलेला नाही त्या महाराष्ट्राच्या माथी एक नवोदीत 'राज्यकर्ता' मारून नुसते विचारायचे, 'हा' तुम्हाला मंजूर आहे?
त्यावर उरलेल्यांनी हो किंवा नाही म्हणायचे.
'हो' म्हणणारे किती? इतके इतके! इतके इतके म्हणजे इतके इतके डेसिबल्स! नाही म्हणणारे किती? तर तेही इतके इतके! तेही इतके इतके म्हणजे डेसिबल्स! कोणते डेसिबल्स जास्त हे ओळखण्यासाठी एक मनुष्य नेमलेला! त्याला ज्यांचे जास्त वाटतील त्यांच्या डेसिबल्सनुसार तो 'राज्यकर्ता' बहुतेकांना मान्य आहे किंवा नाही हे ठरवणार! वर पुन्हा त्याला हे अधिकार की एकदा त्याने हे ठरवले की पुन्हा मत देण्याची गरज नाही हेही तोच सांगू शकणार!
मोदीसाहेब, तुमचा महाराष्ट्रातील मानसपूत्र देवेंद्र फडणवीस ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे आणि तुमचे ..... आणि हो...... भाजपच्या दशकानुदशके सुरू असलेल्या तमाम प्रतिमानिर्मीती प्रयत्नांचेही अभिनंदन!
वये वाढल्यामुळे नियम बदलले, बदललेले नियम घटनेनुसार होते, सगळे ठीक आहे!
पण मोदीसाहेब, 'भाजप'ने राज्य असे मिळवावे ह्याची लाज वाटली.
'राज्य देवेंद्रवर आणायचे की नाही' ह्यावर झालेल्या आवाजी मतदानात कोणता 'आव्वाज कोणाचा' हेच कोणाला समजले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींसारख्यांची जनमानसाला केव्हापासूनच माहीत असलेली मलीन प्रतिमा तुम्हाला दिल्लीश्वर बनवायला कारणीभूत ठरली होती. तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाने स्वतःची प्रतिमा तितकीच मलीन करून घेणे हे तुमच्या देवेंद्रला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यास कारणीभूत ठरले मोदीसाहेब!
लहानपणीच्या आणि आजच्या इस्टॉप पार्टी मधील सर्वात मोठा फरक हा होता मोदीसाहेब, की तेव्हा ज्याच्यावर राज्य असे तो त्याच्यावर राज्य आले म्हणून दु:खी असायचा, आज ज्याच्यावर राज्य आले आहे तो सुखी आहे.
मोदीसाहेब, शर्ट कोणी बदलले, अंड का झालं नाही, सहा महिन्यांनी पुन्हा देवेंद्रलाच राज्य मिळणार की कोणा इतरांना, हे सगळे राहूदेत! पण जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कपाटात असलेली खाकी अर्धी चड्डी दिसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीवर बिनदिक्कत हात ठेवू शकणारे भारतीय उद्योजक आणि गाजलेले परदेश दौरे ह्यातून अटलबिहारी वाजपेयी आठवतील, तेव्हा मोदीसाहेब, कोणाच्याही नकळत तुमची मान खाली झुकेल! नक्की झुकेल!
अहो एक साधे अकरा कोटी भारतीयांचे राज्य हे! गेले असते हातातून तर कोणाला मिळाले असते? कोणालाच नाही. ज्या तारेवरच्या कसरती तुमच्या जन्मजात जोकर असलेल्या अमित शहाने केल्या त्या जन्मापासून बोलबच्चनगिरी करणार्या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना कराव्या लागल्या असत्या. अहो कोणीही हे राज्य मागण्याआधी डोक्यावर पदर घेऊन, मुंडावळ्या बांधून तुमच्या हाताने कुंकवाची रेघ केसांमध्ये ओढून घेण्यासाठी आले असते.
मोदीसाहेब, यू वन महाराष्ट अॅन्ड लॉस्ट रिस्पेक्ट!
ह्यानंतर भाजप हा आवडता पक्ष असण्याचे कारण केवळ हेच असेल की त्याने काँग्रेसला एक पर्याय असू शकतो हे दाखवून दिले.
बाकी सहा महिन्यांनी तुम्हाला बाळासाहेबांचे चिरंजीवही पाठिंबा देतील कदाचित, पण देवेंद्रवर पुन्हा राज्य यावे म्हणून त्यांनी त्यांचा 'शर्ट बदलला नाही' ही वस्तूस्थिती तुम्हाला एकांतात खात राहील.
मोदीसाहेब, आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक प्रभावी पंतप्रधान मानतो कारण तुम्ही तुमची तयार केलेली 'जागतिक नेत्याची' प्रतिमा!
पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.
-'बेफिकीर'!
राज्यात वस्तू आणि सेवा
राज्यात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्याशिवाय स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द न करण्याच्या पावित्र्यात राज्य सरकार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे निवडणूक काळात एलबीटी रद्द करण्याच्या आश्वासनावर फडणवीस सरकारने घुमजाव केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहून एलबीटी आणि जकात कर रद्द करण्यामागच्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती व्यापारी संघटनांना देणार असून राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करता येणार नाही याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस पुढे म्हणाले.
---
घ्या गंगाधर ही शक्तीमान आहे याचा अजुन एक पुरावा. आणि मुख्य म्हणजे जीएसटी खुद्द मुख्यमंत्र्यानीच वाचलेली दिसत नाही. त्यांच्यामते जीएसटी आल्यावर इतर टॅक्स रद्द होणार खर तर लोकल टॅक्स सुध्दा जीएसटी वेगळेच असणार आहेत. जीएसटी फक्त मनमोहनसिंग, चिदंबरम, आणि अरुण जेटली यांनाच माहीती असेल असे मी मानतो. कारण,त्यावर काम देखील यांनीच केले आहे. थोडेफार नरसिंह राव आणि यशवंत सिन्हा यांचे देखील योगदान आहे. ही लोक त्यावर कमेंट्स करत नाहीत पण ज्यांनी तो अजुन वाचला समजला देखील नाही असे लोक कैच्याकै स्वप्न जनतेला दाखवत नाहीनाही ते वचन देत सुटली आहेत.
धन्यवाद भाउ. मी देखील
धन्यवाद भाउ.
मी देखील मध्यावरच असतो पण समोरचा पळत जाउन टोक गाठत असल्याने मला देखील दुसर्या टोकावर जाउन उभे राहणे भाग ठरते
Pages