"आव्वाज कोणाचा, मोदीसाहेब?"

Submitted by बेफ़िकीर on 12 November, 2014 - 10:00

आदरणीय मोदीसाहेब,

वंदन!

आमच्या सोसायटीत आम्ही लहानपणी एक खेळ खेळायचो! त्याला लपाछपी म्हणा, इस्टॉप पार्टी म्हणा नाहीतर डबडा ऐसपैस म्हणा! त्यात जे लपलेले असत, त्यांना ज्याच्यावर राज्य असे त्याने शोधून काढायचे असे. त्या खेळात अनेक गंमतीजमती केल्या जात! अनेकदा राज्य ज्याच्यावर असे तो सतत राज्य त्याच्यावर आल्याने इतका वैतागलेला असे की त्याला लपलेल्यांना एकदाचे ओळखायची प्रचंड घाई झालेली असे. त्यामुळे तो प्रत्यक्ष चेहरा न बघताच, लांबूनच, नुसती कोणाच्या शर्टची झलक दिसली तरी त्याचे नांव घेऊन 'हा हा इस्टॉप' असे ओरडायचा. हे लक्षात घेऊन काही मुलांनी शक्कल लढवलेली होती. लपल्यानंतर शर्ट्सची अदलाबदल करायची आणि मुद्दाम शर्टचा थोडा भाग राज्य असलेल्या मुलाला दिसू द्यायचा. असे केल्याने तो चुकीच्या मुलाला ओळखल्याचे बोंबलून जाहीर करायचा. त्याने उल्लेखलेल्या नावाचा मुलगा जर तेथे निघालाच नाही तर सगळे जण 'अंड, अंड' करत बाहेर यायचे आणि 'राज्यकर्त्यावर' पुन्हा नवे राज्य यायचे.

पुढे जसजसे सगळे मोठे झाले तसतसे मग आपापल्या कामानिमित्त सगळेजण पांगले. कोणी नागपूरला गेला, कोणी बारामतीला, कोणी मुंबईला तर कोणी दिल्लीला!

आज, जवळपास पस्तीस वर्षांनी त्या सर्वांचे पहिल्यांदाच रियुनियन बघायला मिळाले.

आजही एक राज्यकर्ता निवडला गेला. त्याच्यावर 'राज्य' लादण्यात आले ह्याचा त्याला आनंद झाला होता हे एक ठसठशीतपणे जाणवलेले वेगळेपण! लपणार्‍यांची संख्या २८६ होती. त्यातले वेगळेपण असे की सगळे लपलेले खरे तर समोर बसलेले होते, पण ते त्यांच्या स्वतःच्या पक्षनिष्ठेपासून लपून बसलेले होते. लहानपणी हे लोक तिघे तिघे एकत्र जमून चकत असत. चकणे म्हणजे तिघांनी एकमेकांच्या हातात हात मिसळवणे आणि क्षणात ते सोडवून आपलेच दोन्ही तळवे पालथे किंवा उताणे करून इतरांना दाखवणे! तिघांपैकी ज्याच्या तळव्याची पोझिशन एकमेव असेल त्याच्यावर उदाहरणार्थ राज्य येत असे. आज हे राज्य कोणावर यावे हे 'सर्वानुमते' (?) आधीच ठरलेले असावे. ह्याचे कारण ज्याच्यावर राज्य आणायचे त्याच्या पक्षाचे नांव पुकारण्यात आले. 'चकणे' ह्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देण्यात आला व 'चकणे' ही एक क्रिया न राहू देता ती एक भावना म्हणून तिची पुनर्निर्मीती झाली मोदीसाहेब! तुम्ही हवा होतात आज इथे!

एक खूप मोठ्ठा फरक पूर्वीच्या लपाछपीत आणि आजच्या लपाछपीत जाणवला. तो म्हणजे, पूर्वी चकून राज्य कोणावर आले हे ठरवले जात असे. आज राज्य कोणावर यावे हे आधी ठरवून त्यावर इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. वयंही वाढलीयत ना आता पोरांची, कोण चकत बसणार!

तर ज्याच्यावर राज्य आले आहे त्याच्यावर ते यावे की नाही ह्यावर सर्वांनी आपापले मत नोंदवायचे होते. पण त्याचे काय आहे मोदीसाहेब, जन्म घेणे आणि मरण पावणे हे दोन विषय सोडले तर उरलेल्या प्रत्येक विषयाला 'मानवी घटनेमध्ये' पळवाटा नेमून दिलेल्या आहेत. त्यातलीच एक पळवाट आज निवडण्यात आली.

'मत नोंदवणे' ह्या क्रियेला असलेली ही पळवाट! कशाल अमतेबिते नोंदवायची?

ज्या महाराष्ट्रावर राज्य करण्यात कोणालाच रस उरलेला नाही त्या महाराष्ट्राच्या माथी एक नवोदीत 'राज्यकर्ता' मारून नुसते विचारायचे, 'हा' तुम्हाला मंजूर आहे?

त्यावर उरलेल्यांनी हो किंवा नाही म्हणायचे.

'हो' म्हणणारे किती? इतके इतके! इतके इतके म्हणजे इतके इतके डेसिबल्स! नाही म्हणणारे किती? तर तेही इतके इतके! तेही इतके इतके म्हणजे डेसिबल्स! कोणते डेसिबल्स जास्त हे ओळखण्यासाठी एक मनुष्य नेमलेला! त्याला ज्यांचे जास्त वाटतील त्यांच्या डेसिबल्सनुसार तो 'राज्यकर्ता' बहुतेकांना मान्य आहे किंवा नाही हे ठरवणार! वर पुन्हा त्याला हे अधिकार की एकदा त्याने हे ठरवले की पुन्हा मत देण्याची गरज नाही हेही तोच सांगू शकणार!

मोदीसाहेब, तुमचा महाराष्ट्रातील मानसपूत्र देवेंद्र फडणवीस ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल त्याचे आणि तुमचे ..... आणि हो...... भाजपच्या दशकानुदशके सुरू असलेल्या तमाम प्रतिमानिर्मीती प्रयत्नांचेही अभिनंदन!

वये वाढल्यामुळे नियम बदलले, बदललेले नियम घटनेनुसार होते, सगळे ठीक आहे!

पण मोदीसाहेब, 'भाजप'ने राज्य असे मिळवावे ह्याची लाज वाटली.

'राज्य देवेंद्रवर आणायचे की नाही' ह्यावर झालेल्या आवाजी मतदानात कोणता 'आव्वाज कोणाचा' हेच कोणाला समजले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादींसारख्यांची जनमानसाला केव्हापासूनच माहीत असलेली मलीन प्रतिमा तुम्हाला दिल्लीश्वर बनवायला कारणीभूत ठरली होती. तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाने स्वतःची प्रतिमा तितकीच मलीन करून घेणे हे तुमच्या देवेंद्रला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यास कारणीभूत ठरले मोदीसाहेब!

लहानपणीच्या आणि आजच्या इस्टॉप पार्टी मधील सर्वात मोठा फरक हा होता मोदीसाहेब, की तेव्हा ज्याच्यावर राज्य असे तो त्याच्यावर राज्य आले म्हणून दु:खी असायचा, आज ज्याच्यावर राज्य आले आहे तो सुखी आहे.

मोदीसाहेब, शर्ट कोणी बदलले, अंड का झालं नाही, सहा महिन्यांनी पुन्हा देवेंद्रलाच राज्य मिळणार की कोणा इतरांना, हे सगळे राहूदेत! पण जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कपाटात असलेली खाकी अर्धी चड्डी दिसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीवर बिनदिक्कत हात ठेवू शकणारे भारतीय उद्योजक आणि गाजलेले परदेश दौरे ह्यातून अटलबिहारी वाजपेयी आठवतील, तेव्हा मोदीसाहेब, कोणाच्याही नकळत तुमची मान खाली झुकेल! नक्की झुकेल!

अहो एक साधे अकरा कोटी भारतीयांचे राज्य हे! गेले असते हातातून तर कोणाला मिळाले असते? कोणालाच नाही. ज्या तारेवरच्या कसरती तुमच्या जन्मजात जोकर असलेल्या अमित शहाने केल्या त्या जन्मापासून बोलबच्चनगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना कराव्या लागल्या असत्या. अहो कोणीही हे राज्य मागण्याआधी डोक्यावर पदर घेऊन, मुंडावळ्या बांधून तुमच्या हाताने कुंकवाची रेघ केसांमध्ये ओढून घेण्यासाठी आले असते.

मोदीसाहेब, यू वन महाराष्ट अ‍ॅन्ड लॉस्ट रिस्पेक्ट!

ह्यानंतर भाजप हा आवडता पक्ष असण्याचे कारण केवळ हेच असेल की त्याने काँग्रेसला एक पर्याय असू शकतो हे दाखवून दिले.

बाकी सहा महिन्यांनी तुम्हाला बाळासाहेबांचे चिरंजीवही पाठिंबा देतील कदाचित, पण देवेंद्रवर पुन्हा राज्य यावे म्हणून त्यांनी त्यांचा 'शर्ट बदलला नाही' ही वस्तूस्थिती तुम्हाला एकांतात खात राहील.

मोदीसाहेब, आजवर झालेल्या पंतप्रधानांमध्ये आम्ही तुम्हाला सर्वाधिक प्रभावी पंतप्रधान मानतो कारण तुम्ही तुमची तयार केलेली 'जागतिक नेत्याची' प्रतिमा!

पण कंपनीचे टारगेट एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण करून जगज्जेत्याच्या थाटात घरी आलेला बाप जेव्हा मुलांना आपला आदर्श वाटत नाही ना मोदीसाहेब, तेव्हा तो बाप कंपनीत प्रमोशन्स मिळवत असतो, पण घरातल्यांच्या मते तो इर्रिलेव्हंट झालेला असतो.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशांत आणि इतर :

मुद्दा बदलू नका
लोकानी भाजप घोटाळेमुक्त सरकार देईल म्हणून त्याला मत दिल . त्यानी त्यांच्या भाषेत "भ्रष्टवादी " लोकाना आत टाकायच म्हटल म्हणून मत दिल . आता त्यांचाच पाठिंबा घेण हा विश्वासघात नाही का ? यात ५ वर्ष थांबायचा प्रश्न कुठे येतो ?

नाहीतरी ५ वर्षे थांबून मग मतपत्रिकेद्वारे त्यांच्या ह्या गुन्ह्याचे प्रायश्चित त्यांना देण्यावाचून दुसरा काय पर्याय आहे म्हणे आपल्याकडे?

नुसते विश्वासघात विश्वासघात म्हणून ओरडून त्यांना पदच्युत का करता येणार आहे?

नुसते विश्वासघात विश्वासघात म्हणून ओरडून त्यांना पदच्युत का करता येणार आहे? >> नाही, पण यांचा हा रंग लोकांच्या स्मरणात रहावा म्हणुन ओरडत राहणे भाग आहे.

श्रीमान,

पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट!

समजा त्यांनी दरम्यानच्या काळात काही चांगली कामे केली आणि राज्य आहे त्यापेक्षा अधिक सुधारले तर ह्या ओरडण्याचा शुन्य उपयोग होईल.

भाजप व फडणविसांची कालच्या प्रकारात चूक झाली व महाराष्ट्रात तरी त्या चूकीची किंमत त्याना मोजावी लागणार याबाबत दुमत नसावं. पण त्यापुढे जावून केवळ कालच्याच प्रकारामुळे मोदी, फडणविस व भाजप यांवर साफ काट मारणं खरंच योग्य आहे का. विशेषतः, अत्यंत भ्रष्टाचारी, तुरुंगवास भोगलेलेही, बरेच नेते छाती काढून सर्वत्र माजोरीपणाने मिरवताना दिसत असताना आपण << जर मोदींवर विश्वास ठेऊन त्यांना निवडुण दिलय तर ५ वर्ष थांबा. त्यांना काम करु द्या. >> असं म्हणणंच शहाणपणाचं नाहीं का ?
शिवाय, कालच्या प्रकारामुळे शिवसेना व काँग्रेस यांचं पितळ उघडं पडलंय याचं कांहींसं श्रेयही अप्रत्यक्षपणे भाजपला जातच ना ! Wink

सद्य परीस्थीतीत भाजप येकट्याच्या जीवावर विश्वास ठराव जिंकु शकत नाही. मग इतर पर्याय
१. शिवसेनेचा बालहट्ट पुरवा आणि सतत पुढचे ५ वर्ष रडक बाळ राज्यात आणि केंद्रात सांभाळा
२. रा काँ चा बाहेरुन पाठींबा घ्या आणि सरकार चालवा. भरीव कामगिरी करुन पुढच्या निवडणुकीत जनतेसमोर जाणे.
३. फेरनिवडणुका घ्या आणि स्वतःला + जनतेला + मोदींना की जे भारताचे पंतप्रधान पण आहेत कामाला लावा.

यात भाजपान २ नंबरचा पर्याय वापरला हा मध्यम मार्ग आहे.

कालच्या प्रकारामुळे शिवसेना व काँग्रेस यांचं पितळ उघडं पडलंय याचं कांहींसं श्रेयही अप्रत्यक्षपणे भाजपला जातच ना !
भाउ शिवसेनेच मान्य पण काँग्रेसच कसल पितळ उघड पडल?

भाऊ ,
तुमच्यासारख्या माणसान या प्रकाराच समर्थन कराव याच वाईट वाटतय .

मीही या निवडणुकीत काही अपेक्षा ठेऊन भाजपला मत दिल होत , त्याचा मला आता पश्चात्ताप होतोय , म्हणून एवढा राग येतोय .
शेवटी पॉवर करप्ट्स हेच खर Sad

शिवसेनेचा बालहट्ट पुरवा आणि सतत पुढचे ५ वर्ष रडक बाळ राज्यात आणि केंद्रात सांभाळा>>>

Lol

सुशाच्या कॉमेन्ट्स भारी आहेत ह्या बीबीवर.

<< तुमच्यासारख्या माणसान या प्रकाराच समर्थन कराव याच वाईट वाटतय .>> केदारजी, कृपया गैरसमज नको. मीं भाजपच्या कालच्या कृतिचं अजिबात समर्थन करत नाहीय. पण ती चूक होती; महाराष्ट्र व देशाविरुद्ध केलेला तो भयानक गुन्हा होता, असा जो प्रचार सेना व काँग्रेस करताहेत तो अवाजवी आहे, एवढंच मला म्हणायचंय.

भाऊजी नमसकरजी, तुमच्या पक्षनिहाय अपेक्षांची पातळी शिवसेना, कॉंग्रेससाठी ऑलिंपिक-एशियाड लेव्हलची अणि भाजपसाठी राज्यस्तरीय स्पर्धा लेव्हलची आहे असं मला वाटतं.

भाऊ जी Happy ,
तुमच्याबद्द्ल गैरसमज नाहीये , मेबी आपल्या अपेक्षा वेगळ्या आहेत
माझ्या मते तरी तो गुन्हाच आहे .
एखादे वेळी त्यानी एल बी टी , टोल रद्द नाही करणार वगैरे गोष्टी केल्या असत्या तर ठीक होत .
किंबहुना माझा विरोध आवाजी मतदानाच्या पळवाटीला ही नाहीये फारसा , माझा विरोध एन सी पी ला बरोबर घेण्याला आहे .
ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मत मिळाली तीच जर तुम्ही पहिल्या दिवशी गुंडाळलीत तर काय अर्थ आहे Sad

केदार तुम्ही भाजपाला मत दिल जेणेकरुन ते सरकार बनऊन काहीतरी भरीव कामगिरी करतील. हे तर ते आत्ता पण करु शकतीलच ना. रहाता राहीला माघच्या भ्रष्टाचाराचे खोदकाम तर मला वाटत भाजपन पहिल्या गोष्टीला प्राधान्य दिलय पण दुसर काम करणार नाहीच अस कस म्हनुन शकतो आपण.
तुम्ही आधीच्या सरकार्वर राग होता म्हनुन भाजप हा पर्याय निवडलाय तर त्या पर्यायाला काहीतरी काम करु द्या की आणि काम करण्यासाठी भाजपन सरकार स्थापनेच्या निवडलेल्या पर्यायावरुन लगेच त्यांच्याबद्दल मत बनवणे हे मला तरी चुक वाटतीये. तस असेल तर आधीच्या सरकाराबद्दलच्या रागाची पण नीट कारणमिमांसा होणे गरजेचे आहे.

कालच्या प्रकारानंतर काँग्रेस बद्दलचा आदर दुणावला आहे. काँग्रेसने आवाजी मतदान घेउन सुद्धा प्रत्यक्ष मतदान घेतलेले आहे. तेलंगणाच्या वेळीस आवाजी मतदानात बहुमत मिळाल्यानंतर देखील प्रत्यक्ष मतदान घेण्याचे धाडस काँग्रेस ने दाखवले. अशी हिम्मत भाजपाच्या गटात अजिबात दिसली नाही. काँग्रेस १००० पटीने भाजपापेक्षा चांगली आहे हेच खरे आहे. राज्यपाल यांना थोडीशी धक्काबुक्की करण्याचे कारण घेउन भाजपाने लगेच ५ सदस्य निलंबित केले कारण मतदान घेतले तर ५ जागा कमी होतील विरोधी पक्षांचे इतका हलकटपणा केवळ आणि केवळ भाजपासारखा आतल्या गाठीचा पक्षच करु शकतो. १५ वर्षापासुन सत्तेचे उपाशी बकाबका जे मिळेल ते तोंडात भरण्याचा प्रयत्न चालु आहे. किळसवाणा प्रकार फक्त असल्या वृत्तीचेच लोक करु शकतात आणि अश्या प्रकाराचे समर्थन त्याच वृत्तीचे लोक करु शकतात.

NCPचा राग congressवर काढला? अवघड आहे.
आणि congress चे अजुन १२ निलम्बित होणार आहेत. मी तर मह्नतिये मोडींनी कायदाच करावा जिथे भाजपाची संख्याबळ कमी पडत असेल तिथे तिथे बहुमतसाठी १/३ सदस्य असले तरी चलतील. मग हे निलंबनाचे नटक तरी कशाला?
--
एक तांत्रिक प्रश्नः सभग्रुहाबहेर सदस्याने गैरवर्त्णुक केल्यास speakerला सदस्य निलंबनाचा अधिकार असतो का?

<< ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मत मिळाली तीच जर तुम्ही पहिल्या दिवशी गुंडाळलीत तर काय अर्थ आहे >> केदारजी, इथल्याच दुसर्‍या धाग्यावरचा माझा हा कालचा प्रतिसाद कदाचित माझं मत स्पष्ट करतो - << १] भाजपने काल विधानसभेत मखलाशी केली, यात शंकाच नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा त्यानी घेतला हें स्पष्ट आहे व तें लोक लक्षात ठेवणारच आहेत. मग निदान, ' आम्ही मागितला नसताना त्यानी पाठींबा दिला व तो आम्ही नाकारला नाहीं व त्यासाठी कोणतीही अट मान्य झालेली नाही ', इतकं तरी जाहिरपणे सांगण्याची हिम्मत भाजपकडून अपेक्षित होती; विशेषतः, फडणविसांच्या प्रतिमेशी हें नि:संशय विसंगत होतं; >> केदारजी, तुमच्या इतकंच अपेक्षाभंगाचं दु:ख मलाही असलं तरीही भाजपचा तो अक्षम्य गुन्हा न समजतां अपेक्षापूर्तिची भाजपला संधी मिळावी व व्यावहारिक दृष्ट्या सद्य परिस्थितीत तें महाराष्ट्राच्या हिताचंच ठरेल, असं मला वाटतं इतकंच.

शिवसेनेचा बालहट्ट पुरवा आणि सतत पुढचे ५ वर्ष रडक बाळ राज्यात आणि केंद्रात सांभाळा
>> बरोबर आहे पवारांसारखी गोंदस गुब्गुबीत हसरी बाळेच कुठल्याही आइबापाना आवडतात.

एकीकडे गुजरात मध्ये मतदान सक्तीचे करायचे... आणि महाराष्ट्रात आमदारांना मतदानच करू द्यायचे नाही... अहो मोदीसाहेब कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

'हे भविष्य माझ्या हाती... मी प्रचंड आशावादी...' अशी जाहिरात शरद पवार साहेबांनी का बनवली होती, हे आता सगळ्यांना कळलं असेल

केदार तुम्ही भाजपाला मत दिल जेणेकरुन ते सरकार बनऊन काहीतरी भरीव कामगिरी करतील. हे तर ते आत्ता पण करु शकतीलच ना.>> अरे पण गेल्या १५ वर्शात काम पोकळ होते म्हणुन नाही तर भ्रष्टाचार होता म्हणुन भाजपाला मतदान केलेत ना, भ्रष्टाचार हेच तर सर्व सम्यासांचे मुळ होते की.

अरुणाचल प्रदेशात चीनकडून होत असलेली घुसखोरी​ हा फारसा गंभीर विषय नाही. लष्कराकडून त्या त्या वेळेनुसार आवश्यक पावले उचलली जातात असे काँग्रेसचे प्रवक्ते दिग्विजय सिंग यांनी बुधवारी म्हटले आहे. अशाप्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चीनची अरुणाचलातील घुसखोरी हा प्रत्यक्षात नव्हे, तर मीडियासाठीच गंभीर प्रश्न आहे. तो खरोखरच अगदी छोटा प्रश्न आहे आणि तो लष्करप्रमुख किंवा प्रत्यक्ष तेथे असणारा कमांडर हाताळत असतो, असे सिंग यांनी नमूद केले. सीमेपासून बरीच दूरपर्यंत मोकळी जागाच असल्याने अनेकदा सैनिकांकडून ती ओलांडली जाते.
-----------
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/defence/articleshow/451301...

कालच्या घटनेनंतर भक्त आणि समर्थक यातील फरक स्पष्ट होईल.
समर्थक - नाराज असतील.
भक्त - त्यांची भक्ती कायम असेल.

एक मै और एक तू..
....
ये तो होना ही था..!

वास्तविक, अमीत शाह 'स्ट्रॅटेजी' शब्द गिरवीत होते त्याही आधी पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली होती. त्या बाबतीत ते सर्व धोरणी, धूर्तांचे बाप आहेत. खरे तर महा च्या निकालानंतर सेने शिवाय भाजपाला दुसरा पर्याय नाही (सत्ता मिळवण्यासाठी) हेच जनतेने सिध्द केले होते. महा च्या राजकारणात आजही सेनेचे अस्तित्व नाकारता येणार नाही हेच जनतेने अप्रत्यक्षपणे सांगितले होते. आणि ते न कळण्याईतके मोदी, शाह, फडणवीस आणि कं. अडाणी नाहीत. मात्र लोकसभेचे यश, मोदिंची वाढती लोकप्रियता, नव्याने मिळालेली ओळख, यामूळे फुगून गेलेल्या सर्व भाजप धोरणींनी निव्वळ स्वता:च्या अहंकाराला पोसले. आणि सर्व शक्ती, वेळ हे सेनेला शह व काटशह देण्यात घालवला. नेमकी तेच पवार साहेबांना अपेक्षित होते असे म्हणावे लागेल. त्या अर्थाने भाजपची स्टॅटेजी सेना निव्वळ एका विधानाने पवार साहेबांनी गारद केली. किंवा निव्वळ पाठींब्यावर भाजपचा पाठीचा कणा (strategy) साहेबांनी मोडला असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

खरे तर निकालानंतर ' आमच्यात कितीही मतभेद असले तरिही झाले गेले विसरून महा ला विकास देणारे सबळ व स्थायी सरकार देण्यासाठी आम्ही सेनेला बरोबर घेणार आहोत' निव्वळ असे एक विधान जरी शाह कं ने केले असते तरी घडलेल्या नाट्याचे स्वरूप निश्चीतच बदलले असते असे म्हणायला वाव आहे. लोकसाभेत काहिही निकाल आला तरी देखिल स्थानिक राजकारणाची गणिते वेगळी असतात व ती सांभाळावीच लागतात हे पक्षातील अगदी सर्वात खालच्या स्तरावरील कार्यकर्त्याला देखिल माहित असतेच. राष्ट्रीय पक्ष म्हणून कितिही लांबच्या पल्ल्यवार नजर असली तरिही या अशा समिकरणांना, त्यातही २५ वर्षाच्या युती संसाराला डावलून पुढे जाता येत नाही.
One has to adjust along the course...! (Strategy Basics).

आणि मग सेने शी 'तह' करयाचाच नव्हता तर ऊघडपणे मैदानात लढाईस ऊतरायला हवे होते- म्हणजे आवाजी मतदानाच्या कुबड्या घेऊन लंगडे सरकार देण्यापेक्षा मतनोंदणीस सामोरे जाऊन जे होईल त्याचा सामना करणे अपेक्षित होते. पण आता सत्य ऊघड झाले आहे- की त्या परिस्थितीत काय निकाल लागेल यावर भाजपाकडे कुठलीच strategy नव्हती. फार फार तर काय झाले असते- सत्ता गेली असती, पुन्हा निवड्णूका..? पण त्यामूळे जनतेचा रोश सेने ने ओढवला असता, राष्ट्रवादीच्या भवितव्यातील अस्तित्वावर निश्चीतच निर्णायक घाव पडला असता, आणि सत्ता गेली तर ज्या नैतिकतेचा डांगोरा मादी कं. पिटते किमान ती तोंडदेखली शाबूत राहिली असती. आणि निवडणूका पुन्हा झाल्याच असत्या तर याखेपेस बहुमत कुणाला मिळाले असते हे वेगळे सांगायची गरज नाही. आपली चूक झाली ती सुधारुया (अधिक टक्क्याने मतदान करून व एकाच पक्षाला निर्णायक बहुमत देऊन) असे म्हणून तशी कृती करण्या ईतकी जनता सक्षम आहे- त्या बाबतीत जनतेला कसलाही ईगो प्रॉब्लेम नाही. Happy

आजचं चित्र मात्र असं आहे की मानमर्यादा गेली, नैतीकता गमावली, विश्वासार्हता ही सत्ता सुरू होण्या आधीच संपुष्टात आली, आणि हाती आली दोन पायाची डुगडुगणारी खुर्ची! A strategic chaos! ऊघडपणे येन केन प्रकारेण आम्ही सत्ता मिळवूच असेही म्हणायचे नाही आणि तसे प्रयत्न केल्याचे मान्यही करायचे नाही- मग तुमच्यात व तुमच्या दृष्टीने इतर 'अस्पृष्य' असलेल्या पक्षांमध्ये फरक तो काय?

अनेक वर्षे सेना भाजप युती ची लंगडी खेळण्यात पार अटलजी, बाळासाहेबांपासून अलिकडे मुंढे साहेबांपर्यंत सर्वांचे केस पांढरे झाले एव्हडेही भाजप ला कळू नये याचे आश्चर्य वाटते. त्याहीपेक्षा कुतूहल याचे आहे की हे सर्व रुसवे फुगवे व नाटक सुरू असताना भाजपच्या खर्‍या 'प्रेरणास्त्रोताने' (think tank हा शब्द प्रयोग टाळला आहे.. कारण आम्ही संघाचा गरज पडल्यासच फक्त सल्ला घेतो असे भाजपाचे अधिकृत म्हणणे आहे.) एकदाही दोन शहाणपणाचे शब्द सांगितले नसतील का? सांगितले असले पण ते ऐकले नसतील तर दोघांसाठी चिंतेचा विषय आहे, मात्र सांगितलेच नसतील तर मात्र अजून एक संसार मोडकळीस आल्याची लक्षणे दिसताहेत असे म्हणावे लागेल.

आता कुणि म्हणेल या आधी देखिल सहा वेळा आवाजी मतदानाने ठराव झाले आहेत.
(http://www.loksatta.com/vidhansabha/maharashtra-assembly-as-devendra-fad...)
त्यामूळे त्याचा बाऊ करायची गरज नाही. शेवटी everything is fair in love, war and indian politics..!

दु;ख त्याचं नाहीच, पण एखाद्याच्या पाठींब्यावर एखाद्याचा कणा मोडावा (आणि ते एखादे म्हणजे कुणि सोम्या गोम्या नव्हेत!) अशी परिस्थिती पाहता यातून नेमके कुणाचेच भले होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे.

शिवाय , सेने मुळे हे सर्व घडले असेही भाजप समर्थक म्हणतील. मात्र याखेपेस कुठलीच आकडेवारी ऊपलब्ध नसल्याने, त्याच्या बळावर स्पष्टीकरण देणारा अभ्यासपूर्ण लेख माझा प्रिय मित्र जीएस यास लिहीता येणार नाही याचे वाईट वाटते. Happy

रच्याकने: या सर्व गदारोळानंतर सत्तेचा मलिदा हातून जाऊ नये म्हणून सेना सोडून भाजपात प्रवेश करणार्‍यांचे आधीच सेटींग चालू असेल व तसे घडले तर नवल नाही. 'अधिकृत' मतनोंदणीने पुन्हा ठराव झालाच तर नाटकात नविन प्रवेश घेतलेली ही पात्रे कामी येतील.

[बाकी वैयक्तीक मोदी यांच्यावर वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. पक्षात अनेक वर्षे काही डबाऐसपैस वा लपाछपी चा खेळ खेळण्यात त्यांनी वेळ वाया घालवलेला नाही हे सत्य आहे, त्याचा मान ठेवावाच लागेल.!].

नरेंद्र मोदी इज अ परसन टू बी प्रेज्ड ह्यात शंका नाही.

सेना बरोबर नको ही महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची ओरड होती. शेवटी त्यांच्याच कलाने शाह किंवा मोदींनी घेतले असल्यास तेच भोगतील जे भोगायचे ते असा दृष्टीकोन असू शकतो.

लोकसभेत आम्ही मोदींसाठी/ भाजपसाठी प्रचार केला याचे वैषम्य वाटावे अशी स्थिती आहे. गेल्या ६ महिन्यातला केंद्रातला कारभार म्हणजे पण कामे कमी दिखावा जास्त अशीच स्थिती आहे तेपण एकवेळ ठीक आहे मात्र महाराष्ट्रात युती तोडण्यापासून (तिकडे एनसीपीशी सेटिंग करून आघाडी पण तुटावी) ते राष्ट्रवादीशी मिलीभगत करून सरकार बनवेपर्यंत जे खेळ भाजपने केले ते पाहता हे लोक किती संधी साधू आणि लबाड आहेत ते दिसून येते. आता केंद्रात पण राज्यसभेत बहुमत नसल्याने हे एनसीपी, सपा, बसपाशी सेटिंग करत राहणार आणि युपीए-३ चे सरकार चालणार असे चित्र आहे. काहींना याची जाणीव आत्ता झाली मात्र आमच्यासारख्यांना प्रचारातच ते दिसून आले होते. लोकसभा प्रचारात पण मोदी राष्ट्रवादीला जास्त टार्गेट करत नसत, अपवाद वगळता त्यांच्या मतदारसंघात जायचे टाळत असत (प्रफुल पटेलांच्या मतदार संघात तर ठरलेली सभा ऐनवेळी रद्द झाली). भाजप सेनेला सोडून एनसीपीला जवळ करेल असे इशारे काहीजण तेव्हापण देत असत मात्र तरी काही एक आशा होती ती शहा-मोदींनी धुळीस मिळवली. भाजप आणि एनसीपीचे लोक बर्याच बिझिनेस मध्ये पार्टनर आहेत. सिंचन घोटाळा,कोळसा, आदर्शमध्ये भाजपही गुरफटली होती म्हणून हि प्रकरणे जास्त ताणू नये अश्या सूचना काही भाजपेयीना वरून मिळत (देवेंद्र, किरीट सोमय्या यांना भाजप श्रेष्ठी अश्या स्वरूपाच्या सूचना देतात असे आप'वाले सांगायचे तेव्हा हसू यायचं मात्र आता खरी गोम कळत आहे). देवेंद्र अभ्यासू , स्वच्छ प्रतिमेचे वगैरे तसेच मोदी, गडकरी हे मेहनती, कार्यकुशल वगैरे आहेत हे अजूनही वाटते मात्र हे आणि इतर सगळेच भाजपेयी धुतल्या तांदळा सारखे नाहीत यांचे पण विरोधकांशी साटेलोटे / हितसंबंध आहेत असेच दिसतेय.कॉंग्रेस'मुक्त भारत हे काही महान ध्येय असू शकत नाही. खास करून राज्यात तर कॉंग्रेसपेक्षा एनसीपीचे लोक भ्रष्टाचार, दादागीरीमध्ये अडकले असताना त्यांच्याशी चुम्बाचुम्बी करून वर 'तो मी नव्हेच' अशी निर्लज्ज धूळफेक भाजपेयी करत आहेत.एक आहे ज्या आवेगाने आधी कॉंग्रेसला विरोध करू वाटायचा तो आता राहिला नाही.उठता बसता इतरांना नैतिकता शिकवणारे भाजपेयी काय लायकीचे आहेत हे यानिमित्ताने दिसून आले, आपण लवकर जागे झालो याचे उलट समाधान आहे सगळ्यांचेच पाय मातीचे उलट बर्याच बाबतीत कॉंग्रेस भाजपपेक्षा उजवी असे म्हणायची वेळ या लोकांनी आणली आहे.

अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने आलेली निगरगट्ट मॅच्युरीटी आणि कशीबशी सत्ता मिळाल्यानंतरचे हपापलेपण ह्यात फरक राहणारच आहे साकल्य.

कॉंग्रेस'मुक्त भारत हे काही महान ध्येय असू शकत नाही.
>>किंबहुना, निदान भारताच्या राजकारणात हे ध्येयच असू शकत नाही!

सबका विकास सबके साथ वरून ही गाडी काँ मुक्त भारत वर आली तर ती रुळावरून घसरल्याचं लक्षण आहे. इंजिन शाबूत आहे.. गार्ड बहुतेक अजूनही 'दिवा' दाखवू पाहतोय.. पण मधल्या बोग्या नक्कीच तुटताहेत...!
याचा परिणाम पुढील विधान्सभा निवडणूकांवर होणार यात शंका नाही... मॅडीसन गार्डन वरील विमान अजून संपूर्णपणे जमिनीवर ऊतरलेले नसावे...!

<< ' आमच्यात कितीही मतभेद असले तरिही झाले गेले विसरून महा ला विकास देणारे सबळ व स्थायी सरकार देण्यासाठी आम्ही सेनेला बरोबर घेणार आहोत'निव्वळ असे एक विधान जरी शाह कं ने केले असते तरी घडलेल्या नाट्याचे स्वरूप निश्चीतच बदलले असते असे म्हणायला वाव आहे. >> योगजी, अमित शहांचं माहित नाहीं पण निवडणूक निकालांनंतर फडणविसानीं व केंद्रातल्या भाजप नेत्यानी अशा भावना जाहीरपणें व्यक्त केलेल्या मीं पाहिल्या व ऐकल्या आहेत. 'प्रचारादरम्यान सेनेने भाजपवर केलेल्या तिखट टीकेनंतर व मोदींना अफझलखान म्हटल्यानंतरही तुम्हीं सेनेबरोबर सरकार स्थापन कारणार का' अशा थेट प्रश्नालाही ' प्रचारात अशा गोष्टी होवून जातात पण सेना आमची नॅचरल भागीदार आहे व त्यांच्याबरोब सरकार स्थापनेचे प्रयत्न आम्ही करत आहोत ', अशा आशयाचं फडणविसानी मुलाखतींत केलेलं विधानही मीं पाहिलं व ऐकलं आहे.

बे.फी. जी, भाजपच्या सर्वसाधारण समर्थकांची हताशा छान मांडली आहे. मुळातच अशाप्रकारच्या एका व्यक्तीच्या न्यायबुद्धीवर अवलंबुन असणार्‍या मतदानाविरोधात (आवाजी मतदान) सर्वोच्च न्यायालयात निकाल लागलेला आहे. त्यामुळे अशा मतदानाने तकलादु विश्वासमत मिळवुन भाजपाने स्वतःची विश्वासर्हता काहि प्रमाणात नक्कीच गमावली आहे. सत्तेसाठी काहीही करणार्‍यांत हे पण आहेत आणि कितीही ओरडुन सांगत असतील तरी वेगळे नाहीत, हेच त्यांनी अधोरेखीत केले.

Pages