१०२४ सदाशिव..
अशीच एक ऑफीसमधली मिटींग चालली आहे. मला ना एक अतिशय वाईट सवय आहे, हाताला सतत चाळा लागतो. कुणीतरी जे बोलतंय, ते ऐकता ऐकता मी हातातल्या डायरीमधे काहीतरी उगीच रेघोट्या मारतेय. मधेच मी माझं नाव लिहीलं "मीनाक्षी हर्डीकर.." क्षणभरात काय मनात आलं की त्या खालीच माझं माहेरचं नाव लिहीलं, मधल्या नावासहीत "मीनाक्षी गंगाधर माधवी" मज्जाच वाटली कित्येक वर्षांनी हे नाव लिहीलं. त्यापुढे ओघानंच आला घरचा पत्ता "१०२४ सदाशिव पेठ, आपटे वाडा, पुणे ३०". मला माहितीये तुम्ही सगळे हसाल, पण खरं सांगू का? एकदम समाधानी वाटलं. आपलं नाव आणि पत्ता लिहील्याचं समाधान. जेवण तर आपण जेवतोच की, पण मग भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटंत नाही त्यातलाच प्रकार.
१०२४ सदाशिव..आपटे वाडा... २५ वर्षामधे किती ठीकाणी, किती वेळा हा पत्ता लिहीला. सगळीकडे, शाळेत, कॉलेजात. त्यावेळी असं वाटंत होतं, की हाच आपला हक्काच्या घराचा पत्ता आहे अगदी जन्मभरासाठी.. नागनाथपाराकडून ज्ञानप्रबोधिनीकडे जाताना डाव्या हाताला 'प्रियांका टेलर्स' दुकान आहे. त्या दुकानाला लागूनच अलिकडे एक बोळ आहे 'वर्षा ऑप्टीशियन' अशी पाटी असलेला. हाच वाड्यात जाण्याचा रस्ता, आत जाणारा एक बोळ. बोळंच म्हणायचो आम्ही त्याला. बोळाच्या सुरुवातीला उजवीकडे एक जीना आहे वर जाणारा. इकडे वर तीन बिर्हाडं, एकेका खोल्यातली. तशी वाड्यातली जवळजवळ सगळीच बिर्हाडं एकेका खोलीतली. दोनचं बिर्हाडं अपवाद आणि तिसरा अपवाद मालकांचा.
बोळातून सरळ जाताना डावीकडे अजून चार बिर्हाडं. मग उजवीकडे वळलं की अंगण...अंगणात तीन बाजूंना अजून काही खोल्या आहेत. आणि समोरच्या बाजूला वर जाणारा जीना या जीन्यावरुन वर गेलात की समोरचंच घर आमचं १८*१० ची एक खोली. खोलीच्या तीन बाजूला भिंती, दर्शनी बाजूला एक मोठ्ठी खिडकी आणि दार. हे दार कायम उघडंच पाहीलंय मी... वर्षानुवर्ष. नो कडीकुलूप भानगड. तशी वाड्यातल्या सगळ्याच घरांची दार घरात कुणी असेल तर उघडीच. पण त्यातही काही पर्दानशीन घरं होती. बरीच सगळी पर्दानशीन. पण आमचं घर सताड उघडं. इकडे कसला आडपडदा नावाचा प्रकारंच नाही. अरे हो! इथे शेजारी शेजारी ४ खोल्या आहेत त्यापैकी आमच्या शेजारची खोली हे प्रियांका टेलर्सचं वर्कशॉप. आमच्या चारही घरांसमोर एक जोडलेली गॅलरी वजा जाण्यायेण्याचा रस्ता आहे. वाड्यातल्या सगळ्याच घरांना कारणाकारणाने कुलूपं लागलेली पाहीलीत, गावाला गेले असताना, सगळे मिळून बाहेर गेलेत.. इ. अपवाद आमच्या घराचा.
या घराशी माझ्या आयुष्यातल्या किती तरी आठवणी निगडीत आहेत. लग्न होईपर्यंतच्या पंचवीस वर्षातल्या सगळ्या आठवणी इथल्याच.. काही आठवणी आम्हा घरातल्या पाच जणांच्या आईबाबा, मी, माझी बहीण आणि आज्जी यांच्या.. मग इतर आठवणी माझ्या वाड्यातल्या सगळ्या रक्ताच्या नसलेल्या, पण रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळच्या असलेल्या, नातेवाईकांच्या, मैत्रिणींच्या, जांभळाच्या झाडाच्या, अंगणातल्या झाडांच्या, जांभळाच्या झाडाच्या पानातून डोकावणार्या आभाळाच्या. नवनविन मोठ्या इमारती होण्याआधीच्या आणि नंतरच्या सुद्धा..
मी अशी खूप वेळा हरवून जाते. किती तरी वेळा या रस्त्यावरुन मैत्रिणीबरोबर जाताना मी आवर्जून त्यांना माझं घर दाखवायला घेऊन जाते. (आता हे काय लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु किंवा अजून कुणा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचं घर आहे का ..? :D) पण खरं म्हणजे मलाचं ते पहायचं असतं पुन्हा पुन्हा... वाड्यात गेलं की बोळात शिरल्या पासून माझा शोध सुरु होतो. पूर्वीचं काही आहे का पाहण्याचा.. खरं म्हणजे, ती पूर्वीची माणसं शोधण्याचा.. मला माहीतीये की तिथे आता पेइंग गेस्ट राहतात. वाड्यात तसं आता पुर्वीच्या बिर्हाडापैकी एक प्रियांका टेलरंच तेवढा राहीलाय. बाकी सगळ्या खोल्यातून पेइंग गेस्ट.
अशीच काही महिन्यांपुर्वी एका मैत्रिणीला घेऊन घर दाखवायला गेले. मोडकळीला आलेला जीना वर चढून जायला आणि आमच्या घराचं (हो! अजूनही आमचं घरंच म्हणते मी...) दार बंद व्हायला एकच वेळ.. खिडक्या सुद्धा बंद बाहेर उभं राहून दोन वाक्य बोललो .. इतक्यात दार उघडून एक मुलगा बाहेर आला. कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. आता दार थोडसं उघडं राहील्यासारखं. मग अगदीच रहावलं नाही दार हलकेच ढकललं. हे राम.. इतकं करुनही मला यात आपण दुसर्या कुणाच्या खोलीचं दार बिनधास्त उघडतोय, हे योग्य नाहीये वगैरे असलं काही वाटलं नाही. तीच ती आमची खोली. आम्ही जागा सोडण्यापूर्वी शहाबादी फरशी काढून कोटा बसवला होता. बाकी आत आता नुसत्या दोन तीन कॉट.. गॅलरीत उभं राहून मोबाईलवर बोलणार्याचं बोलणं एव्हाना संपलं होतं. तो आमच्याकडेच पहात होता. मला खरं म्हणजे काय म्हणावं ते कळेना.
अचानक तो म्हणाला "तुम्ही रहात होतात का इथे?"
"हो"
"बरीच वर्ष आपण ज्या घरात राहतो ते घरंच आपलं वाटतं त्यातून वाड्यातलं घर विसरणं अवघडच. माधवी का तुम्ही"
"हो. मी त्यांची मोठी मुलगी. पण तुम्हाला कसं कळलं?"
"तिथे लिहलंय ना जिन्यावरच्या पत्र्याखालच्या लाकडावर"
मी पहातंच राहीले जिन्यात माझ्या आवडत्या जागी उभं राहून खडुनं लिहीलेल्या नावाकडे.. "माधवी"..
नॉस्टॅल्ज
नॉस्टॅल्जिक केलंस मीनू..

शुक्रवार पेठेत राहत होतो, ते ठिकाण अजूनही उगीचच बघायला जातो. तिथं सापडत काही नाही मग, अन खिन्न होऊन परत येतो.
--
बेशिस्तीला फक्त रिक्षावालेच जबाबदार नाहीत.
रस्ता अडवून वेड्यावाकड्या उभ्या राहिलेल्या रिक्षांत बसून आपणच त्यांना मदत करतो.
मीनू खूप
मीनू
खूप छान लिहिले आहेस.मी कधी वाडयात राहिले नाही.पण सुट्टीत आजोळी जायचो.तिथे छान वाडा होता.
पिंपळाचा पार होता.विहिर होती.
तो वाडा विकल्यापासून तिकडे आम्ही कोणीच गेलेलो नाही.
या लेखाने खूप हळवं केलं .
मीनू फारच
मीनू
फारच छान पुन्हा १०२४ च्या आठवणी जाग्या केल्यास.
मिलिन्द गुजर
मिलिन्दा
मिलिन्दा मस्त वाटलं तुझी प्रतिक्रीया वाचून आणि तुला अनेक वर्षांनी पुन्हा भेटुन .. तुझ्या विचारपुसमधे तुला निरोप लिहीलाय.
~~~~~~~~~
मस्त
मस्त लिहिलयस मीनू...
वाडा
वाडा गेल्यामुळे चांगले सहजीवन असते हे मुलांना कळतच नाही.
खुप आवड्ले.
मस्त, अगदी
मस्त, अगदी मनापासून लिहिलं आहेस.
सुंदर लेख,
सुंदर लेख, वाचुन 'माझ्या' अमरावतिच्या घरि पोहोचले आणि आता पुन्हा तिथे जाता येइल कि नाही या विचाराने डोळ्यात टचकन पाणि आले.
सर्वांनाच
सर्वांनाच प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद..
मिनू.. फारच
मिनू.. फारच सहजसुंदर व मनापासुन लिहीले आहेस.. या लेखातल्या तुझ्या भावना वाचकांपर्यंत तर पोहोचतातच.. पण त्याचबरोबर प्रत्येक वाचकाला स्वतःच्या लहानपणीच्या घराची आठवण आणुन देण्यासही भाग पाडतात.. अतिशय सुंदर ललितलेख...
खुप छान
खुप छान लेख...
मला पण आमचा वाडा ७६८ सदाशिव पेठ आठवला. खुप चांगले दिवस होते आणी खुप आठवणी आहेत आजुनही. आजही आमचे घर पुण्यात मध्यवर्ति भागामध्ये आहे. सर्व नातेवाइकांना एक आधार होता विसावा घेण्यासाठी. कारण मंडइ, चितळे, जयहिंद, कजरी, गाडगीळ आणी इतर सगळे जवळच.
तसेच मित्र मंडळी पण मस्त पेकी वाड्याच्या दारात कट्यावर बसुन मजा करायचो. वाडा म्हणला की सर्व लोकांची एक मेकांना माहीती असायची. एकदा तर एक तक्रार आली आम्हां सर्व मित्रांकडे की कोणी एक व्यक्ति रात्री वाड्यात येतो आणि काय करतो ते माहीत नाही. मग काय आम्ही लावली फिल्डिंग एका रात्री आणी त्या चोरास पकड्ले आणी भरपुर चोप दिला.
वाड्यात खेळ खुप खेळलो. क्रिकेट त्यात खुपच आवडीचा खेळ. खुप काचा फोड्ल्या आणी मग पळुन पण जायचो. कधी कोणाची काच भरुन दिली नाही. चेंडु जायचा त्या वेळी, पण पुन्हा खेळ चालु दुसर्या दिवशी. कोणी विचारले तर आम्ही नव्हतो सांगायचे.
वाड्यात वेगवेगळे उत्सव साजरे केले. त्यात गणपती विशेष होते. वर्गणी मागायला जायचे सर्वांकडे पण जास्तीत जास्त आम्हा मित्रांनाच भरावी लागत होती शेवट्च्या दिवशी कारण अखेरची मिरवणुक वाजत गाजत आणी नाचत. सर्व भाडेकरु होते आणि वर्गणीला ही गरिबच असायचे.
तो चोर काय
तो चोर काय करायचा ते नाही सांगितलेत
ए आम्ही
ए आम्ही पलिकडच्या गल्लीत रहायचो..
कानिटकर वाडा, ८९२ जुना सदाशिव, चव्हाणांच्या गिरणीसमोर. आता तिथे सेवानंद नावाची बिल्डिंग आहे.
माझ्या आजीच्या वडिलांचा वाडा तो. वाड्यातलं आमचं घर (म्हणजे आमचं मेन घर.. मी, आई-बाबा दुसरीकडे रहायचो), तिथल्या सुट्ट्या सगळं आठवलं. मी तशी तिथे खरीखरी खूप कमी राह्यले पण वाडा पाडला तेव्हा तिथे रहाणार्या माझ्या चुलतभावाइतकीच मी पण भिरभिरी झाले होते.
वाडा असं नाही पण आम्ही आधी रहायचो तो फ्लॅट.. शुक्रवारातला. अकरा मारूतीच्या गल्लीतला. अजूनही प्रमोदबनच्या इथून गेलं की आपल्या घरात गेल्यासारखं वाटतं. सरस्वती मंदीरचं ग्राउंड, रतन सायकल मार्ट सगळं सगळं अजून आपलंच वाटतं..
सध्या आहोत(म्हणजे आता बाबा असतात आणि पुण्यात गेल्यावर मी) त्या घरात रहायला लागून २० वर्ष होऊन गेली, कानिटकरांचा जुना वाडा पाडून बिल्डिंग त्या नंतर बांधलीये पण अजूनही त्या घराला नवं घर आणि प्रमोदबन ला प्रमोदबन नी वाड्यातल्या काकाच्या फ्लॅटला जुनं घर म्हणलं जातं.
----------------------
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे
ये क्या
ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है.
हद्-ए-निगाह तक जहां गुबार ही गुबार है
ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशीपे है जहां, ना गम पे इख्तियार है.
तमाम उम्रका हिसाब मांगती है जिंदगी
ये मेरा दिल कहे तो क्या ये खुद्से शर्मसार है
बुला रहा है कोइ मुझको,चिलमनोंके उस तरफ
मेरे लिये भी क्या कोइ उदास बेकरार है?
बालपणीच्या घरी उमराव जान जेव्हा येते तेव्हा तिला तिच्या घराच्या खुणा पटू लागतात अन बालपणाची दृष्ये वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर मिक्स होऊ लागतात , तेव्हाचे हे गाणे (अजूनही )डोळ्यातून पाणी काढते.
तसे मीनूच्या लेखाने सर्वच जण आपापल्या बालपणाच्या घरात जाऊन भावविभोर झालेत !
meenu, खुप छान
meenu, खुप छान लिहीले आहेस गं. मी वाड्यात वाढलेली नाही तरीदेखिल आपले बालपण, आपले घर, खोली ह्या गोष्टींच्या कुठेतरी खोलवर आठवणी आपल्या हृदयात दडलेल्या असतात. कितीही वर्षांनी गेलो तरी तो परिसर आपल्याशी बोलतो. आपल्या आयुष्यातील जुना काळ आपल्या डोळ्यासमोर आणतो.
आमच्या जुन्या घराची जागा आम्ही बिल्डरला डेव्हलप करायला दिली. जुने घर पाडतांना खुप वाईट वाटले. आता जेव्हापण माहेरी जाते, मला जुन्या घराचीच आठवण येते. कारण माझे अवघे बालपण त्या घरातच गेले. अजुनही स्वप्नात जुने घरच येते. आजी, घरासमोरील बाग, आंगण, झोपाळा सारे सारे.
मनाला
मनाला स्पर्शुन जाणारं आहे हे.....
--------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
मीनु , छान
मीनु ,
छान लिहीलस , या आठवणी आपल्याला बालपणात पोचवतात.
मीन्वा, प्रत्येक वाचकाला
मीन्वा,
प्रत्येक वाचकाला स्वतःच्या लहानपणीच्या घराची आठवण आणुन देण्यासही भाग पाडतात..
अतिशय सुंदर लेख !
कदाचित मी ही तुमचा वाडा पाहिला असणार, कारण मी नारायण पेठेत ,मोदी गणपती जवळच्या एका वाड्यात राहत होतो,खुप मस्त वाटायचं ...
छान लिहिलयस ग!
छान लिहिलयस ग!
मीन्वा, छान लिहिलं आहेस गं!
मीन्वा, छान लिहिलं आहेस गं! मीदेखील १६४६ सदाशिव मध्ये रहायचे अनेक वर्षं! बादशाही बोर्डिंगच्या अगदी शेजारी. तुझ्यासारख्याच त्या वाड्याच्या आठवणी मनात खूप खोल रुतून बसल्या आहेत!
आज तो आनंद पुस्तक मंदिरचा वाडाही शिल्लक नाही आणि तेथील माणसे तर कधीच पांगली. पण तरीही त्या रस्त्यावरून जाताना संपूर्ण कायापालट झालेल्या टिळक रोडवरच्या जुन्या खुणा आजही मी वेड्यागत शोधत असते. १६४६ची आठवण मनात जतन करत असते!
आत्ता झक्कींची प्रतिक्रिया वाचल्यावर कळलं की ते व आम्ही समोरासमोर रहायचो म्हणून!
मीन्वा, या लेखाने मला ५३२
मीन्वा, या लेखाने मला ५३२ सदाशिव.. आठवलं, हे घर माझ्या मैत्रिणीचं.... पण स.प. महाविद्यालयात असतानाच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ, माझा, या दोनखोल्यात गेलाय... असाच बोळ, अशीच बिर्हाडं, मागच्या वाड्याकडे उघडणारी खिडकी...... माझ्या मैत्रिणीला त्या घराबद्दल विशेष आपुलकी नव्हती पण मला मात्र तिथे नेहमीच छान गाsssर वाटायचं
कंप्लीट नॉस्टॅल्जिया !
माझे बाबा-आई आत्ता जिथे
माझे बाबा-आई आत्ता जिथे रहातायत त्या घरातच आजोबांचं अचानक सगळ्यांना सोडून देवाघरी जाणं, मग आई-बाबांचं लग्न, आमचा तिघींचा जन्म, शाळा शिक्षण, नातेवाइकांची शिक्षणं, आजीचं आजारपण आणि तिचं आम्हाला सोडून जाणं....तिथेच झालं. आता आमची माहेरपणंही तिथेच होतात. बाबा अजूनही भाडेकरूच आहेत. ५४ वर्षं होतील तिथे त्यांना..
मी इथे इतकी नॉस्टॅल्जिक होते....त्या दोघांचं काय होईल जर कधी वाडा सोडायचा झाला तर या विचाराने एकदा माझी रात्रीची झोप गेली होती.
मस्त लेख!
मीन्वा, खूप छान लिहिल आहे आणि
मीन्वा, खूप छान लिहिल आहे आणि तुम्ही लकी आहात एकाच घरात २५ वर्ष राहायला मिळाल.
क्वार्टसमधील लाईफ खूप वेगळ असत सिव्हिलियन पेक्षा.
मी आजपर्यंत जितक्या घरात राहीली ती मोजायला सुरुवात केली आणि त्या घरातील आठवणी. माझ्या वडीलांचा ट्रान्सफरेंबल जॉब होता आणि आम्ही क्वार्टसमध्ये राहत होतो त्यामूळे वाडा, चाळ ह्या संस्कृतीचा मला नेहमी हेवा वाटतो आणि ज्यांना एकाच घरात इतकी वर्ष राहता येते त्यांचाही.
मिन्वा , छान गो बाय....
मिन्वा , छान गो बाय....
आम्ही ११४६ पेरुगेट वाले.... माझे दोन्ही मामा आजही तिथे राहातात्,सगळ्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या पुण्यातच ...
ते आज्जीचे घर, त्यातली काळ्या पांढरी लादी, रात्री डोंगरची काळी मैना घ्या ओरडणारा, तो गाडीवाला, पुरंदरे प्रकाशनच्या वाड्यात नाना पाटेकर येणार होता त्याला बघायला, सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत वाट बघणारे आम्ही,सगळी मामे आणी मावस भावंड, २५ पैसे तास करत पेरुगेट चौकी बाजुच्या, सायकल वाल्या कडुन भड्याने सायकल घेउन शिकलो ....
एकदम च भारी राव....
छानच लिहिलंय ... भिडलं !
छानच लिहिलंय ... भिडलं !
छानच लिहिलंय....आमच्या
छानच लिहिलंय....आमच्या चाळीतल्या घराचि आठवण झाली.....
मस्त लिहिले मि पन अमरवतिला
मस्त लिहिले मि पन अमरवतिला अस्तना १ वर्श रहिले
Pages