(मंदाक्रांता वृत्त -गागागागा लललललगा गालगा गालगागा )
आकाशाशी धुरकट असा पुंजका काल होता
त्याच्यापाशी चमकत उभा पांढरा गोल होता
चांदी काही अविरतपणे पेरली तारकांनी
अंधाराला विरळ करण्या यत्न केलेच त्यांनी...
स्वर्गी जेव्हा फ़िरत असतो हा सखा चांदण्यांचा
कंठी त्याच्या गडद दिसतो हार मोती मण्यांचा
अंगी वस्त्रे तलम असती शुभ्रवर्णी ढगांची
कोणालाही भुरळ पडते पौर्णिमेलाच त्याची....
पाणी थोडे खळखळत होते नदीतील जेव्हा
वारा वेडा दरवळत होता वनी सौम्य तेव्हा
पाने काही रजतकण हातामधे घेत होती
झाडांखाली निळसर अशा तेवल्य़ा कैक वाती....
थोडे थोडे धुसर दिसले चांदणे पेटलेले
पाषाणांशी लगट करण्या मेघही खेटलेले
रात्रीसुद्धा भिरभिरत होते खुळे कैक पक्षी
जाताजाता पसरवत मागे नभी छान नक्षी .....
सृष्टी सारी भिजवत शशी चालला दूर होता
त्याच्यामागे घुटमळत फ़ैलावला धूर होता
रानामध्ये सळसळत गेला नशाधुंद वारा
एकांताशी हसत दिसला एकटा धृवतारा....
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
कविता चांगली वाटली. दुसरे
कविता चांगली वाटली. दुसरे कडवे सर्वात विशेष.
परंतु,
तिसर्या कडव्यात काही ओळींमधे अडखळायला झाले.... यतिभंग हे कारण असावे.
मंदाक्रांता या वृत्ताचे जसे गण (म, भ, न, त, त, ग, ग) आहेत
त्या पद्धतीनेच शब्दरचना होणे अत्यावश्यक आहे.
त्याचप्रमाणे यति देखील योग्य पद्धतीने अत्यावश्यक.
माझ्या मते,
तुम्ही वर दिलेल्या लगावली ऐवजी मंदाक्रांता वृत्ताचे गण स्पष्ट करणारी
"मंदाक्रांता वदति तिजला मा भ ना ता त गागा"
अशासारखी ओळ किंवा वृत्ताचे गण देणे संयुक्तिक वाटले असते.
स्पष्ट मताचा कृपया राग नसावा.
होय. पण उर्दु प्रमाणे
होय. पण उर्दु प्रमाणे शायरीचा प्रभाव वाढल्याने एका गुरुला दोन लघु घ्व्तले तरी त्याचे नाव आजकाल पारंपारिकच वापरतात.
होय सर...यति भंग
होय सर...यति भंग झालाय....पहिला प्रयत्न होता या वृत्तात.... यापुढे कधी नव्याने लिहिल तेव्हा चुक नक्कीच सुधारलेली असेल....खुप खुप आभार