ब्रेक अप % के बाद !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2014 - 13:07

किस्सा ताजा आहे, छोटासाच आहे आणि आजच्या पिढीला बोधकारक आहे, म्हणून संबंधितांची परवानगी घेऊन आणि नावं बदलून इथे मांडतोय.

...

किस्सा आहे सलीमचा, आणि त्याच्या अनारकलीचा.

सलीम, माझ्या ऑफिसमधील माझा एक घनिष्ठ सहकर्मचारी मित्र. ज्याच्या अनारकलीचे नाव होते जान्हवी. त्यांचे प्रेम म्हणाल तर "एक उदाहरण" होते, जे मला कित्येकदा माझ्या गर्लफ्रेंडने सुनावले होते. उदाहरणार्थ - अरे त्या सलीमकडून काहीतरी शिक, तो बघ कसा त्या जान्हवीसाठी दर सोमवारी न चुकता गुलाबाचे फूल घेऊन येतो. भले तिचे केस बॉयकट का असेनात. आणि माझे केस काळेभोर लांबसडक असताना तुला कधी स्वताहून एक साधासा चमेलीचा गजरा आणायला सुचू नये. वगिअरे!

पण अश्या या आदर्श प्रेमी युगुल सलीम-जान्हवीचे नुकतेच ब्रेक अप झाले !
कारण ...... दोघांत तिसरा! पहिल्याला विसरा!

पण इथे त्या पहिल्याचे बुरे हाल होतात हा आजवरचा अनुभव ! आणि इथे तो पहिला, माझा मित्र सलीम होता. जान्हवीच्या आयुष्यात आता पीटर आला होता. तो देखील आमच्याच ऑफिसमधील बंदा, पण डिपार्टमेंट तेवढे वेगळे. बसायची जागा शेजारच्या बिल्डींगमध्ये. त्या पीटर ईंग्लंडमध्ये जान्हवीने काय एवढे पाहिले जे आमच्या सलीम हिंदुस्तानीमध्ये नव्हते, ज्यासाठी तिने कालपरवापर्यंत सलीमशी सुखासुखी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाला तिलांजली दिली या चर्चेला आता काही अर्थ नव्हता. आपली पुरुषप्रधान संस्कृती पाहता अश्या केसेस मध्ये मुलगा एकटा पडला तर त्याचा पुरुषी अहंकार सहजगत्या दुखावतो. त्यामुळे स्वताच्या जीवाचे बरेवाईट करण्याबरोबरच आपली माजी प्रेमिका आणि तिचा आजी प्रियकर या दोघांचाही काटा काढण्याचा विचार त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता असते. आणि सलीमची दणकट शरीरयष्टी पाहता या शक्यतेचीही शक्यता जास्तच होतीच.

बस्स याच पार्श्वभूमीवर आम्ही परवाच्या दिवशी जेवण उरकून ऑफिसच्या आवारात राऊंड घेत असताना आमच्या समोरून पीटर येताना दिसला.... एकटाच!

पीटरला पाहताच सलीम पुढे सरसावला आणि थेट त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. जणू गेले चार-पाच दिवस सलीम जिथेतिथे पीटरचाच शोध घेत होता आणि आज पीटर नेमका त्याच्या तावडीत सापडला. आता दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची होणार आणि प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर...... हा कॉलेजचा कट्टा नव्हता, तर ऑफिसचे आवार होते. इथे एक चूक आणि तुमची कारकीर्द उध्वस्त! सलीम पाठोपाठ मी सुद्धा पुढे सरसावलो. तशीच वेळ आली तर पटकन मांडवली बादशाह बनत मध्यस्थी करता येईल. पण घडले ते विपरीतच!

सलीम पीटरकडे बघत दिलखुलासपणे हसला. त्याचा हात हातात घेत बळजबरीचे हस्तालोंदन केले आणि त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटत म्हणाला, थॅंक्स डूड .. थॅण्क्स !!

माझ्या सोबतीने पीटर देखील थोडासा गोंधळून गेला. तसे सलीम छद्मीपणे हसत म्हणाला, "माझ्या मनात तुझ्याबद्दल जराही राग नाही. खरे तर मी तुझे आभारच मानायला हवे. तुझ्यामुळेच माझी वेळीच जान्हवीपासून सुटका झाली. ती कशी मुलगी आहे हे मला वेळीच समजले. हेच जर लग्नानंतर घडले असते तर ... पण आता मला दुसरी एखादी चांगली मुलगी शोधता येईल जी फक्त माझ्यावरच प्रेम करणारी असेल. चूक सुधारायचा मला एक मौका तुझ्यामुळेच मिळाला .."

पण इथेच थांबतो तो माझा मित्र कसला. त्यानंतर त्याने खरा हुकमाचा पत्ता फेकला. नजरेत सांत्वनाचे (ढोंगी?) भाव आणत पीटरला म्हणाला, "तुझ्याबद्दल मात्र जरासे वाईट वाटते रे. तुझ्या डोक्यावर आता आयुष्यभरासाठी एक टांगती तलवार राहणार. जी मुलगी मला सोडून तुझ्याबरोबर येऊ शकते ती भविष्यात तुला सोडून इतर कोणाबरोबरही जाऊ शकते .... आणि हो, तुला जर असे वाटत असेल की तू तिच्यावर भरमसाठ प्रेम करून तिला कायमचे बांधून ठेवशील तर ते प्रेम कालच्या तारखेपर्यंत मी सुद्धा तिला भरभरून दिले होतेच. पण काय फायदा झाला... सो, बेस्ट ऑफ लक डूड, बेस्ट ऑफ लक !

एक (नाटकी?) सुस्कारा टाकून सलीम पुन्हा त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटून पुढे निघून गेला तेव्हा पीटरची विचारमग्न मुद्रा माझ्या लबाड नजरेतून सुटली नाही.

पण खेळ इथेच संपत नव्हता. किंबहुना हा फर्स्ट पार्ट होता. त्यानंतर मला घेऊन सलीम तडक जान्हवीच्या विंगमध्ये शिरला आणि अंदाजानेच कॅंटीनच्या दिशेने गेला. ती तिथेच सापडली. त्याला पाहून ती हलकेच सटकू लागली तसे याने सराईतपणे तिला अडवले आणि तिलाही धन्यवाद म्हणतच तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. पुढचे काही मला ऐकू गेले नाही पण मागाहून जे काही सलीमकडून समजले ते असे - "जान्हू, मला सोडून तू पीटरच्या मागे गेलीस तिथेच माझे तुझ्याबद्दलचे प्रेम कायमचे संपले. जे प्रेम तुला थांबवू शकले नाही त्याची किंमत तिथेच शून्य झाली. पण आता तू मात्र विचार कर की तुला पीटरकडून कितपत प्रेम मिळेल. जसे तू मला सोडून त्याच्याबरोबर गेलीस तसे ईतर कोणाबरोबर जाणार तर नाहीस ना हि भिती त्याच्या मनात कायम राहणार आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी तू असे वागणार नाहीस हे त्याला पटवून देऊ शकणार नाहीस. तसेच उद्या पुढेमागे तो तुला सोडून जाण्याची शक्यताही तितकीच प्रबळ आहे. कारण तू स्वता कोणालातरी सोडून त्याच्याजवळ गेल्याने त्या परिस्थितीत तुझ्याकडे त्याला जाब विचारायचा नैतिक अधिकार शिल्लक नसणार... सो, बेस्ट ऑफ लक जान्हू, बेस्ट ऑफ लक !

ईति ब्रेक अप के बाद वाला किस्सा समाप्त !

मी सलीमचे हात हातात घेत स्वताच्या डोक्याला लाऊन जय गुरूदेव म्हणत मनोमन त्याच्या पाया पडलो.
"काडी तर व्यवथित टाकलीस, पण आता पुढे तुझे काय?", असे विचारताच त्याने खूप सुंदर उत्तर दिले.
म्हणाला, "रिशी, म्हटलं तर काडी आणि म्हटलं तर वस्तुस्थिती. मी फक्त मला जी जाणीव झाली ती त्या दोघांनाही करून दिली. दॅट्स ईट! माझे म्हणशील तर जान्हवीशी प्रेमप्रकरण चालू असण्याच्या काळात मला काही मुली आवडल्या होत्या, काही ठिकाणी समोरूनही ग्रीन सिग्नल मिळत होते. पण जान्हवीशी एकनिष्ठ असल्या कारणाने मी ते सारे इग्नोर केले. बस्स आता त्यापैकीच एकाला पिवळा सिग्नल द्यायचाय. आयुष्याच्या गाडीला ब्रेक नसतात रे. तुमची मर्जी असो वा नसो, ती आपल्याच वेगाने पळत असते. तिला लाल सिग्नल पडला आहे असे समजण्याची आपणच जी चूक करतो तीच आपल्या आयुष्यात अपघात घडवते....
"लाईफ मस्ट गो ऑन..." हे किती सहज सुंदर शब्दात आणि स्वताच्या उदाहरणासह सांगून गेला, माझा मित्र सलीम !

बस्स आजच्या धरसोड वृत्तीच्या लव्हबर्डसनी यावर शांतपणे विचार केला आणि कुठेतरी, एकाला जरी, याचा फायदा झाला, तरी माझी टंकलिखाणाची मेहनत वसूल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स ! निण्ण्यान्नवे टक्के सत्यघटना आहे. पदरचे दोनचार शब्द टाकलेत पण प्रसंगाशी छेडछाड नाही.
त्याने जसे हे घेतले त्यामुळेच मलाही हा प्रसंग हलकाफुलका करून लिहायचा मूड बनला.

पण आता त्याला एक फायनल टेस्ट पास करायची आहे. ती म्हणजे येत्या काळात त्या दोघांच्या आयुष्यात काय होतेय याकडे लक्ष न देता स्वताच्या आयुष्यावर कॉन्सट्रेट करणे. त्या दोघांच्या प्रेमप्रकरणातील अपयशाला आपले यश वा व्हायसे वर्सा न मानणे. यात एक मित्र म्हणून मी माझी भुमिका बजावेनच Happy

चांगलं लिहिलंय. फायनल टेस्ट सगळ्यात महत्वाची. त्रिकोणातल्या तिसर्‍या व्यक्तीचा राग करण्याचा संबंध नाही. त्या मुलीवरचा लोभ न आठवणे जमले आणि तिची प्रतारणा ह्याच्या आयुष्यात तिची किंमत शून्य करुन गेली तर तिच्यावर फुल्ली मारणे कठीण वा अशक्यही नाही.

हाहा . पीटर नाही तर अजून तिसर्या कुणाकडे जाईल ती . हे हल्ली इतकं common झालंय कि फक्त १ बॉयफ्रेंड म्हणजे काहीतरीच आणि १ girlfrriend म्हणजे हे काय ...........

दिनेशजी,
जर आपली कथा क्रमशः नसेल तर Wink .. लिंक मिळेल का?

सीमंतिनी,
हे नाबऔलखो मध्ये कसे आले असते? कोणाचे नाब आणि नक्कि कोणाचे लखो ? टोटल लागत नाहिये Uhoh

मोहिनी,
हाहा . पीटर नाही तर अजून तिसर्या कुणाकडे जाईल ती . हे हल्ली इतकं common झालंय कि फक्त १ बॉयफ्रेंड म्हणजे काहीतरीच आणि १ girlfrriend म्हणजे हे काय ...........
>>>>>>>>

दोघेही टाईमपास मोड मध्ये असतील तर येस्स,कोण काही फारसे दुखवून खुपवून घेत नाही. पण सिरीअस असल्यास, जे बरेच जण असतात, आणि सलीम सुद्धा होताच, तर मग त्यातून बाहेर निघणे सोपे नसते.
बरेचदा तर टाईमपास म्हणून सुरू झालेल्या नात्यातही वाढत्या सहवासानुसार भावनिक गुंतवणूक वाढीस लागते. आणि हो, दुखावलेल्या मनाबरोबरच दुखावलेल्या अहंकाराचा मुद्दाही विचारात घेता, झाले ब्रेकअप, आजकालच्या पोरांचे होतच राहते एवढा कॅज्युअल विचार करून नाही चालत. आपल्या जवळची कोणी व्यक्ती या फेजमधून जात असेल तर तिला सपोर्ट करत समजून घ्यायचा प्रयत्न करावा.

ऋन्मेष, पटली तुमची वरची पोस्ट. जो ह्यातुन जात असेल त्याच्यासाठी खरचं कठीण असेल हे . आजचा काळ किंवा कालचा जमाना असं काही नसतं ह्यात.

छान आणि हलकं फुलकं करत लिहीलय.
थोडस अवांतर...ह्यावरुन ओंकारातला एक प्रसंग / सीन आठवला. त्यात सलीम ऐवजी, करीनाचे वडील असतात आणि पीटर ऐवजी अजय देवगन. जी मुलगी स्वतःच्या बापाची झाली नाही ति तुझी काय होणर, असा काहीसा त्यांच्यातला संवाद अजय देवगनच्या डोक्यात संशयाचा किडा निर्माण करतो.

मस्त

तुमचा मित्र ऑथेल्लो कोळून प्यायलाय की काय?

ओंकारा हे शेक्सपिअरच्या ऑथेल्लोचे बॉलिवूड व्हर्जन. मुळातली क्लुप्ती विलिबाबाची.

मी स्वता ओंकाराची फक्त गाणीच ऐकलीत आणि त्यातील शिव्यांची नुसती चर्चा.. तसेच शेक्सपिअर वगैरे विदेशी कादंबरीकार वाचायचा प्रश्नच नाही.. पण माझ्या मित्राने यातील काय वाचलेय, पाहिलेय याची कल्पना नाही. विचारून बघतो.. मात्र मला त्याच्या या आयडीयेबरोबरच त्याचे ईम्प्लिमेंटेशन आवडले. मी आंखो देखा हाल साक्षीदार असल्याने सांगू शकतो, निव्वळ पर्रफेक्ट.! अन्यथा भल्याभल्यांना कळते पण वळत नाही अश्या स्थितीत येऊन अडकलेले पाहिलेय.

छान!

ती सलिमला सोडुन गेल्याची वेगळी काही कारण असु शकतात की. आधीच्या बॉयफ्रेंड ला सोडले म्हणजे ती वाइट आहे आणि नंतर येणार्‍यालाही सोडणारीच असेल अस कश्यावरुन?

अदिती,
सलीमच्या केस मध्ये ती वाईट वागली का नाही हे पर्टीक्युलर केस बाबत झाले. पण अश्यावेळी सोडून जाणारी मुलगी वाईटच असे मला म्हणायचे नाही ना लेखातही तसा रोख आहे. पण सलीमशी जे झाले ते वाईट झाले. अश्यावेळी तो कसा रिअ‍ॅक्ट झाला हे लेखाचे सार आहे. त्याने काही जान्हवीचे प्रत्यक्ष नुकसान नाही केले तर बस्स संशयाचा किडा सोडला. याउपर जर जान्हवी आणि पीटरचे प्रेम खरे असेल तर तो किडा त्यांच्या नात्याला किडवू शकणार नाहीच. Happy

राज,
धन्यवाद, ईंग्लिश सिनेमे बघणे होत नाही, पण या नावाची नोंद करून ठेवतो Happy

कोणी काही म्हणो पण त्या सलीम ने त्या पोरीची मस्त गोची करुन ठेवली.....मी गांधीवादी (म्हणजे एक थोबाडात खाली की दुसरा गाल पुढे करणार्यातली ) नसल्याने मला सलीम ची बाजु पटली....

दोघेही टाईमपास मोड मध्ये असतील तर येस्स,कोण काही फारसे दुखवून खुपवून घेत नाही. पण सिरीअस असल्यास, जे बरेच जण असतात, आणि सलीम सुद्धा होताच, तर मग त्यातून बाहेर निघणे सोपे नसते.
बरेचदा तर टाईमपास म्हणून सुरू झालेल्या नात्यातही वाढत्या सहवासानुसार भावनिक गुंतवणूक वाढीस लागते. आणि हो, दुखावलेल्या मनाबरोबरच दुखावलेल्या अहंकाराचा मुद्दाही विचारात घेता, झाले ब्रेकअप, आजकालच्या पोरांचे होतच राहते एवढा कॅज्युअल विचार करून नाही चालत. आपल्या जवळची कोणी व्यक्ती या फेजमधून जात असेल तर तिला सपोर्ट करत समजून घ्यायचा प्रयत्न करावा. >>>
होय .. सहमत आहे

<< येत्या काळात त्या दोघांच्या आयुष्यात काय होतेय याकडे लक्ष न देता स्वताच्या आयुष्यावर कॉन्सट्रेट करणे. त्या दोघांच्या प्रेमप्रकरणातील अपयशाला आपले यश वा व्हायसे वर्सा न मानणे. यात एक मित्र म्हणून मी माझी भुमिका बजावेनच >>

हे पटलं आणि आवडलं. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या मित्रालाही.

मस्त आहे!!!
पण शिर्षक वाचुन वाटलं की काही percentage मध्ये ब्रेक-अप आहे काय? ( Wink माबोवर काहीही अशक्य नाही)

percentage मध्ये ब्रेक-अप .. Lol

अ‍ॅक्चुअली ब्रेकअपची काहीतरी साईन सिम्बॉल टाकायचे होते.. उगाच आपले स्टाईल म्हणून .. तर हे % चिन्ह तसे वाटले. एक गोल (पक्षी- हार्ट) इकडे तर दुसरा तिकडे आणि मध्ये दरार .. Wink

प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
आतापर्यंत आलेले सर्वच.
सलीमला आता हा लेख दाखवू शकतो Wink , अन्यथा टवाळक्या होण्याची भिती होतीच मनात Proud

रिशी, म्हटलं तर काडी आणि म्हटलं तर वस्तुस्थिती. मी फक्त मला जी जाणीव झाली ती त्या दोघांनाही करून दिली. दॅट्स ईट! माझे म्हणशील तर जान्हवीशी प्रेमप्रकरण चालू असण्याच्या काळात मला काही मुली आवडल्या होत्या, काही ठिकाणी समोरूनही ग्रीन सिग्नल मिळत होते. पण जान्हवीशी एकनिष्ठ असल्या कारणाने मी ते सारे इग्नोर केले.

मे बी याच कारणाने त्याला तिने सोडलं असेल? खरंच प्रेम असतं तिच्यावर तर इतर मुली आवडणं व तिथून ग्रीन सिग्नल मिळण्याइतपत प्रगती झाली नसती. जान्हवीशी एकनिष्ठ आहे म्हणून दुसरी मुलगी आवडूनही तिला नकार देणं आणि जान्हवीच्या प्रेमात असल्यामुळे दुसरी कोणी मनातच न भरणं यात खूप फरक आहे. जनरली प्रेमभंग झालेल्या मुलामुलींच्या आयुष्यात 'अब ये प्यार न होगा फिर हमसे' अशी एक स्टेज येते ती सलीमच्या आयुष्यात न येता तो तर लगेच पिवळा सिग्नल दयायला उत्साहाने तयार आहे. त्यावरुन त्याचं जान्हवीवर प्रेम नसून केवळ ती एक 'कमिटमेन्ट' होती असं वाटतं.

<<आपली पुरुषप्रधान संस्कृती पाहता अश्या केसेस मध्ये मुलगा एकटा पडला तर त्याचा पुरुषी अहंकार सहजगत्या दुखावतो. त्यामुळे स्वताच्या जीवाचे बरेवाईट करण्याबरोबरच आपली माजी प्रेमिका आणि तिचा आजी प्रियकर या दोघांचाही काटा काढण्याचा विचार त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता असते. आणि सलीमची दणकट शरीरयष्टी पाहता या शक्यतेचीही शक्यता जास्तच होतीच.>>
बाप रे! सलीम आपला जीव घेईल अशी शक्यता असतानाही पीटर आणि जान्हवी एकत्र आले जिवावर उदार होऊन म्हणजे त्यांचं एकमेकांवर भलतंच गाढ प्रेम असलं पाहिजे नाही का?

Pages