किस्सा ताजा आहे, छोटासाच आहे आणि आजच्या पिढीला बोधकारक आहे, म्हणून संबंधितांची परवानगी घेऊन आणि नावं बदलून इथे मांडतोय.
...
किस्सा आहे सलीमचा, आणि त्याच्या अनारकलीचा.
सलीम, माझ्या ऑफिसमधील माझा एक घनिष्ठ सहकर्मचारी मित्र. ज्याच्या अनारकलीचे नाव होते जान्हवी. त्यांचे प्रेम म्हणाल तर "एक उदाहरण" होते, जे मला कित्येकदा माझ्या गर्लफ्रेंडने सुनावले होते. उदाहरणार्थ - अरे त्या सलीमकडून काहीतरी शिक, तो बघ कसा त्या जान्हवीसाठी दर सोमवारी न चुकता गुलाबाचे फूल घेऊन येतो. भले तिचे केस बॉयकट का असेनात. आणि माझे केस काळेभोर लांबसडक असताना तुला कधी स्वताहून एक साधासा चमेलीचा गजरा आणायला सुचू नये. वगिअरे!
पण अश्या या आदर्श प्रेमी युगुल सलीम-जान्हवीचे नुकतेच ब्रेक अप झाले !
कारण ...... दोघांत तिसरा! पहिल्याला विसरा!
पण इथे त्या पहिल्याचे बुरे हाल होतात हा आजवरचा अनुभव ! आणि इथे तो पहिला, माझा मित्र सलीम होता. जान्हवीच्या आयुष्यात आता पीटर आला होता. तो देखील आमच्याच ऑफिसमधील बंदा, पण डिपार्टमेंट तेवढे वेगळे. बसायची जागा शेजारच्या बिल्डींगमध्ये. त्या पीटर ईंग्लंडमध्ये जान्हवीने काय एवढे पाहिले जे आमच्या सलीम हिंदुस्तानीमध्ये नव्हते, ज्यासाठी तिने कालपरवापर्यंत सलीमशी सुखासुखी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाला तिलांजली दिली या चर्चेला आता काही अर्थ नव्हता. आपली पुरुषप्रधान संस्कृती पाहता अश्या केसेस मध्ये मुलगा एकटा पडला तर त्याचा पुरुषी अहंकार सहजगत्या दुखावतो. त्यामुळे स्वताच्या जीवाचे बरेवाईट करण्याबरोबरच आपली माजी प्रेमिका आणि तिचा आजी प्रियकर या दोघांचाही काटा काढण्याचा विचार त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता असते. आणि सलीमची दणकट शरीरयष्टी पाहता या शक्यतेचीही शक्यता जास्तच होतीच.
बस्स याच पार्श्वभूमीवर आम्ही परवाच्या दिवशी जेवण उरकून ऑफिसच्या आवारात राऊंड घेत असताना आमच्या समोरून पीटर येताना दिसला.... एकटाच!
पीटरला पाहताच सलीम पुढे सरसावला आणि थेट त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. जणू गेले चार-पाच दिवस सलीम जिथेतिथे पीटरचाच शोध घेत होता आणि आज पीटर नेमका त्याच्या तावडीत सापडला. आता दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची होणार आणि प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर...... हा कॉलेजचा कट्टा नव्हता, तर ऑफिसचे आवार होते. इथे एक चूक आणि तुमची कारकीर्द उध्वस्त! सलीम पाठोपाठ मी सुद्धा पुढे सरसावलो. तशीच वेळ आली तर पटकन मांडवली बादशाह बनत मध्यस्थी करता येईल. पण घडले ते विपरीतच!
सलीम पीटरकडे बघत दिलखुलासपणे हसला. त्याचा हात हातात घेत बळजबरीचे हस्तालोंदन केले आणि त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटत म्हणाला, थॅंक्स डूड .. थॅण्क्स !!
माझ्या सोबतीने पीटर देखील थोडासा गोंधळून गेला. तसे सलीम छद्मीपणे हसत म्हणाला, "माझ्या मनात तुझ्याबद्दल जराही राग नाही. खरे तर मी तुझे आभारच मानायला हवे. तुझ्यामुळेच माझी वेळीच जान्हवीपासून सुटका झाली. ती कशी मुलगी आहे हे मला वेळीच समजले. हेच जर लग्नानंतर घडले असते तर ... पण आता मला दुसरी एखादी चांगली मुलगी शोधता येईल जी फक्त माझ्यावरच प्रेम करणारी असेल. चूक सुधारायचा मला एक मौका तुझ्यामुळेच मिळाला .."
पण इथेच थांबतो तो माझा मित्र कसला. त्यानंतर त्याने खरा हुकमाचा पत्ता फेकला. नजरेत सांत्वनाचे (ढोंगी?) भाव आणत पीटरला म्हणाला, "तुझ्याबद्दल मात्र जरासे वाईट वाटते रे. तुझ्या डोक्यावर आता आयुष्यभरासाठी एक टांगती तलवार राहणार. जी मुलगी मला सोडून तुझ्याबरोबर येऊ शकते ती भविष्यात तुला सोडून इतर कोणाबरोबरही जाऊ शकते .... आणि हो, तुला जर असे वाटत असेल की तू तिच्यावर भरमसाठ प्रेम करून तिला कायमचे बांधून ठेवशील तर ते प्रेम कालच्या तारखेपर्यंत मी सुद्धा तिला भरभरून दिले होतेच. पण काय फायदा झाला... सो, बेस्ट ऑफ लक डूड, बेस्ट ऑफ लक !
एक (नाटकी?) सुस्कारा टाकून सलीम पुन्हा त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटून पुढे निघून गेला तेव्हा पीटरची विचारमग्न मुद्रा माझ्या लबाड नजरेतून सुटली नाही.
पण खेळ इथेच संपत नव्हता. किंबहुना हा फर्स्ट पार्ट होता. त्यानंतर मला घेऊन सलीम तडक जान्हवीच्या विंगमध्ये शिरला आणि अंदाजानेच कॅंटीनच्या दिशेने गेला. ती तिथेच सापडली. त्याला पाहून ती हलकेच सटकू लागली तसे याने सराईतपणे तिला अडवले आणि तिलाही धन्यवाद म्हणतच तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. पुढचे काही मला ऐकू गेले नाही पण मागाहून जे काही सलीमकडून समजले ते असे - "जान्हू, मला सोडून तू पीटरच्या मागे गेलीस तिथेच माझे तुझ्याबद्दलचे प्रेम कायमचे संपले. जे प्रेम तुला थांबवू शकले नाही त्याची किंमत तिथेच शून्य झाली. पण आता तू मात्र विचार कर की तुला पीटरकडून कितपत प्रेम मिळेल. जसे तू मला सोडून त्याच्याबरोबर गेलीस तसे ईतर कोणाबरोबर जाणार तर नाहीस ना हि भिती त्याच्या मनात कायम राहणार आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी तू असे वागणार नाहीस हे त्याला पटवून देऊ शकणार नाहीस. तसेच उद्या पुढेमागे तो तुला सोडून जाण्याची शक्यताही तितकीच प्रबळ आहे. कारण तू स्वता कोणालातरी सोडून त्याच्याजवळ गेल्याने त्या परिस्थितीत तुझ्याकडे त्याला जाब विचारायचा नैतिक अधिकार शिल्लक नसणार... सो, बेस्ट ऑफ लक जान्हू, बेस्ट ऑफ लक !
ईति ब्रेक अप के बाद वाला किस्सा समाप्त !
मी सलीमचे हात हातात घेत स्वताच्या डोक्याला लाऊन जय गुरूदेव म्हणत मनोमन त्याच्या पाया पडलो.
"काडी तर व्यवथित टाकलीस, पण आता पुढे तुझे काय?", असे विचारताच त्याने खूप सुंदर उत्तर दिले.
म्हणाला, "रिशी, म्हटलं तर काडी आणि म्हटलं तर वस्तुस्थिती. मी फक्त मला जी जाणीव झाली ती त्या दोघांनाही करून दिली. दॅट्स ईट! माझे म्हणशील तर जान्हवीशी प्रेमप्रकरण चालू असण्याच्या काळात मला काही मुली आवडल्या होत्या, काही ठिकाणी समोरूनही ग्रीन सिग्नल मिळत होते. पण जान्हवीशी एकनिष्ठ असल्या कारणाने मी ते सारे इग्नोर केले. बस्स आता त्यापैकीच एकाला पिवळा सिग्नल द्यायचाय. आयुष्याच्या गाडीला ब्रेक नसतात रे. तुमची मर्जी असो वा नसो, ती आपल्याच वेगाने पळत असते. तिला लाल सिग्नल पडला आहे असे समजण्याची आपणच जी चूक करतो तीच आपल्या आयुष्यात अपघात घडवते....
"लाईफ मस्ट गो ऑन..." हे किती सहज सुंदर शब्दात आणि स्वताच्या उदाहरणासह सांगून गेला, माझा मित्र सलीम !
बस्स आजच्या धरसोड वृत्तीच्या लव्हबर्डसनी यावर शांतपणे विचार केला आणि कुठेतरी, एकाला जरी, याचा फायदा झाला, तरी माझी टंकलिखाणाची मेहनत वसूल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
माऊ, वेदिका ओके, जर बहुसंख्य
माऊ, वेदिका
ओके, जर बहुसंख्य वाचकांना तसे वाटत असेल तर त्या मताचा आदर केलाच पाहिजे
माऊ,
त्याऊनही शेवटच्या ओळीतील फिलॉसॉफी (भले या घटनेशी रिलेट न करता स्वतंत्रपणेही असेल) आवडली, त्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
तुमचा हा लेख इथे या अजून एका
तुमचा हा लेख इथे या अजून एका संकेतस्थळावर मायबोली चा संदर्भ देत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तो तुम्ही स्वतः अथवा तुमच्या परवानगीने प्रकाशित करण्यात आलेला आहे काय? नसल्यास तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता.
http://www.bedhundlahari.com/literature_read?i=story-breakup_ke_baad
http://www.bedhundlahari.com/data/stories/story-breakup_ke_baad.html
आयला हे आणि काय नवीन.. असे
आयला हे आणि काय नवीन.. असे कसे उचलतात.. मला नाही कल्पना याची काही.. बघायचा प्रयत्न करतोय पण सध्या मोबाईल वर असल्याने काहीतरी गंडतेय.. घरून बघून कळवतो.. इथे मला हे सांगितल्याबद्दल फार धन्यवाद. बाकी कारवाई म्हणजे काय करता येईल नक्की..
कारवाई - कॉपीराईट कायद्याखाली
कारवाई - कॉपीराईट कायद्याखाली करता येईल.
Pages