शेवटचा पाऊस

Submitted by संतोष वाटपाडे on 30 August, 2014 - 02:40

पाऊस पडला होता बाहेर
झापाच्या चिपटातून अजूनही
थेंब टपटपत होते सारवलेल्या अंगणात....

लालसर गढूळ पाणी
अख्ख्या वावरात तुंबलेलं होतं
बांधावरच्या वाकड्या बाभळी
अजूनही खाली मान घालून
केस वाळवत होत्या
निंबार्‍याखालच्या लापट शेळ्या
खुरेनं चिखल उकरताना
राहून राहून अंग झटकत होत्या...

विहिरीवरचा रहाट नेहमीसारखाच
आसूसलेला अतृप्त केविलवाणा
पावसाच्या थेंबानी बरबटलेला...
दाराबाहेर पितळी कळशीत
काळ्याकुट्ट तांब्याच्या हंड्यात
शेण गोळा करायच्या टोकरीत
गंजून ठिकर्‍या पडलेल्या टिपड्यात
तिनं पाणी गोळा करुन ठेवलं होतं....

मी तळपायाला चिकटलेला चिखल
हिरव्या हरळीवर घासत अंगणात आलो
ती बसली होती उंबर्‍यात
हातात काळीभोर जळालेली मिस्त्री घेऊन
गुडघ्यापर्यंत लुगडं वर करून
आणि असंख्य मुक्या विचारांच वादळ
वेड्या मनात सामावून

कधी नव्हे ते कपाळावरचं गोंदण
मी इतकं टक लावून बघताना
दूरपर्यंत साचलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी
तिच्या खचलेल्या डोळ्यात पहात होतो

कुडाला लागून ठेवलेल्या
धुण्याच्या टोकदार दगडावर पाय घासत
मी तीला बोललो ...आई....ए आई...
भानावर आली ती माझ्या हाकेने
हातातली मिस्त्री दातावर न लावताच फ़ेकली तिनं अंगणात
गुडघ्यावर झालेली ओलीचिंब जखम
फ़डक्याने बांधायला ती विसरली होती आज

तीला विचारलं मी मोठा श्वास घेऊन
किती लोक बोलवायचे गं जेवायला
सांग ना.....ती गप्प
दहावं नाही घातलं तरी
तेरावं जेवू घालावं लागेलंच ना

दुखर्‍या पायानं ती वळली
लंगडत लंगडत काहीतरी पुटपुटत
दगडाच्या चुलीजवळ जाऊन बसली

मी हातातल्या पत्रावळी घेऊन
बघत राहिलो बाबाच्या फ़ोटुकडं
बाबाला यावर्षीचा पाऊस नाही बघता आला......

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास..