संगीत-आस्वादगट :)

Submitted by चैतन्य दीक्षित on 29 July, 2014 - 08:35

नमस्कार मंडळी

शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
कार्यशाळा घेण्याइतपत माझी पात्रता नाही, पण मी जे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, त्याचा आनंद लुटतो, तोच आनंद इतरांनाही मिळावा, त्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, ज्यांना आधीच शास्त्रीय संगीताची गोडी वाटते त्यांना त्यातील तंत्राचा भाग अजून चांगल्या प्रकारे कळावा, अशा उद्देशाने एक शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणारा गट तयार करावा असे माझ्या मनात आहे. ज्यांना थोडं किंवा फार येतंय अशांनी त्यांच्यापेक्षाही थोडं किंवा अजिबात येत नाही अशांना ते ज्ञान देणं अशी शास्त्रीय संगीतविषयक देवाण-घेवाण व्हावी असा या गटाचा उद्देश असेल. गटाचे सर्वसाधारण स्वरूप (जे माझ्या डोक्यात आहे) ते पुढीलप्रमाणे. यात कुणाला काही सुधारणा सुचवावीशी वाटली किंवा पूर्णपणे वेगळी कल्पना मांडावीशी वाटली तर स्वागतच आहे.

१) स्थळ- पुणे
सुरुवातीला पुण्यातल्या मायबोलीकर आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यापैकी जे इच्छुक आहेत अशांचा एक गट तयार करायचा.
पुण्यात कुठे भेटायचे हे इच्छुक ज्या भागात राहतात त्यावरून ठरवावे लागेल.

२) वेळ- महिन्यातून एकदा/ दोनदा
सगळ्यांकडे किती वेळ उपलब्ध असेल याची खात्री नसल्याने महिन्यातून किमान एकदा भेटावे. सगळ्यांच्या वेळा जुळल्यास दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळाही भेटता येईल. किंवा जवळपासच्या भागात राहणारे मायबोलीकर स्वतंत्रपणेही भेटू शकतीलच.

३) उपक्रम- प्रत्येक भेटीच्यावेळी (आधी) एखादा राग/ ताल/वाद्य/ गायक- गायिका ठरवून त्या रागाची प्रस्तुती सगळ्यांनी मिळून ऐकणे. (कमाल ३० मिनिटे)
हे ऐकणे चालू असताना, शक्यतो कुठलेही स्पष्टीकरण टाळून, ऐकून झाल्यावर, रागाबद्दल/ तालाबद्दल ज्याला जी जी माहिती आहे ती त्याने द्यावी.
ज्याला त्यातला जो भाग उमगला तो भाग त्याने / तिने सगळ्यांना सांगावा.
गटात काही जण अगदीच नवखे असू शकतात ही शक्यता गृहित धरून शक्य तितक्या बेसिक पातळीवर स्पष्टीकरण द्यावे. बर्‍याचदा, आपण भिडस्त होऊन, माहिती असूनही काही बोलत नाही- यावरही मात करता येईल Happy

४) शक्य झाल्यास- काही तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून डेमो किंवा काही माहिती घेणेही जमेल असे वाटते आहे.
आपल्या मायबोलीवर शास्त्रीय संगीतातली अनेक जाणकार मंडळी आहेत उदा- दाद, अनिलभाई, अनिताताई, अगो, रैना, हिम्सकूल.सगळेच पुण्यात नाहीत खरे, पण ऑफलाईन त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळते का तेही पाहता येईल (हे अगदीच गृहित धरल्यासारखे लिहिले आहे खरे, पण अशी मदत मिळेल याची खात्री आहे).
जे पुण्यात आहेत त्यांना या गटात सामील होण्याची आग्रहाची विनंती _/\_

५) सुरुवातीला एक-दोन महिने या गटाचे भेटणे कितपत नियमित होते आहे ते पाहून पुण्यात नसलेल्या परंतु गटात येऊ इच्छिणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'स्काईप' द्वारे गटात घेणे शक्य आहे.

सुरुवात-
खालीलपैकी कोणत्याही एका दिवशी सुरुवात करता येऊ शकेल.

६ सप्टेंबर (शनिवार)- गणपतीचा काळ आहे त्यामुळे किती जणांना जमेल हे सांगणे अवघड आहे, पण गणपतीच्या मंगलमय दिवसात सुरुवात होऊ शकेल Happy

१३ किंवा २० सप्टेंबर (शनिवार)- गणपती संपून पितृपक्ष चालू असेल त्यामुळे घरी सण आहे म्हणून जमणार नाही इ. कारणे नसतील आणि बर्‍याच लोकांना जमू शकेल.

इच्छुकांनी मला वि.पु. मधून सांगितले तरी चालेल.
किंवा संपर्कातून ई-मेल केला तरी चालेल.

पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मला फार काही येतं असं नाही, पण शास्त्रीय संगीताचा आस्वाद अनेकांना घेता यावा हा एकमेव उद्देश मनात आहे. त्यामुळे जितके म्हणून मला येतंय/ माहिती आहे ते मी नक्कीच सांगू शकेन.
माझी खात्री आहे की मला योग्य वेळी योग्य ती मदत मायबोलीकर जाणकार आणि माझ्या परिचयातील कलाकार मंडळींकडून नक्की मिळेल.

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचं काय? Happy
आपलं वेळेचं गणित जमायला हवं स्काईपवर यायचं तर. (सिडनी, भारत)
पण मी तय्यार आहे. जमवुया. आणि जमेल तसं मी भाग घेईन.

सध्या लेकाने घरटं सोडून मेलबर्नला भूर्र करायचं ठरवलय. त्याची गाठोडी, तहान-लाडू, भूक लाडू ह्यात अडकलेय. ते एक दोन आठवड्यात सुटेल.
उपक्रमाची रूपरेषा आवडली.
ठरवून दहा मिनिटं प्रश्नं-उत्तर ह्यासाठी ठेवूया का? त्यायोगे, पुढल्या खेपीचं आयोजन अधिक उपयुक्तं असं करता येईल.

दाद,
सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
दर वेळी १० मिनिटे प्रश्नोत्तरासाठी ठेवता येतील.
आणि तुमची उपस्थिती असेल तर वेळ जमवूया. तुमच्या इथली स्थानिक वेळ आणि भा.प्र.वेळ यात किती तासांचा फरक आहे? त्यानुसार वेळ ठरवता येईल.
साधारण भा. प्र. वेळ दुपारी ४:३० म्हणजे तिकडचे किती? आणि ती वेळ सोयीची असेल का तुमच्यासाठी?

होय्यो होय्यो होय्यो Happy
सध्या साडेचार तासांचा फरक आहे. आम्ही पुढे आहोत. ५ ऑक्टोबरला तो फरक साडेपाच तासांचा होईल.
तुमची भाबडी प्रमाणवेळेनुसार साडेचार वेळ मला धावेल Happy
(आधी एकदा स्कायपुन बघायला हवं. माझ्या ग्रहदशेत नकटीची लग्नंच जास्तं आहेत)

कोणालाही भाग घेता येईल.
बेसिक पासून सुरुवात करायचा विचार आहे. पण क्वचित काही (बेसिक ठरणार नाहीत) असे विषयही निघू शकतील.
पण त्याबद्दलही शक्य तितक्या बेसिक पातळीवर बोलण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूया.

ओहो, मला पण खुप आवडेल यायला पण अजुन काही महिने बाहेर असल्याने जमणार नाहीये Sad
तोपर्यंत माबोवरच जर चर्चेचा वृत्तांत कोणी अपलोड करू शकल्यास बरे होईल.

मी मुंबईत.

किती वेळ कात्यक्रम असणार ? घरचे इतर , लहान मुले चालतील का ?

चिन्नू,
स्काईपचे कसे जमेल ते बघणार आहोतच.

लगो,
घरचे इतर, लहान मुले चालतील की नाही ते मुंबईकर कुठे भेटतात त्यावर अवलंबून असेल असे वाटते आहे.
बहुतेक तरी काही प्रॉब्लेम नसावा असा अंदाज आहे. मुख्य गोष्ट संगीताबद्दल जिज्ञासा असणे महत्वाचे.

पुणेकर,
कधी भेटायचे आपण? १३ सप्टेंबरच्या शनिवारी चालेल का?
(माझे घर) सिंहगड रस्ता/ (अवल यांचे घर) कोथरूड - यापैकी कोणता भाग जवळचा ठरेल? हेही सांगा.
त्याव्यतिरिक्त एखाद्याच्या घरी भेटणे शक्य असेल तर तेही कळवा.

मुंबईकर, कधी, कुठे, काय ऐकायला भेटुया?

चैतन्य, या धाग्यावर शास्त्रीय संगिताच्या मैफिलींबद्दल (प्रस्थापीत आणि हौशी) माहिती दिली तर चालेल का रे? म्हणजे कुणाला जायचे असल्यास जाता येइल.

माधव,

अवश्य माहिती द्या इथे.

पहिल्या भेटीत-
तानपुर्‍याबद्दल माहिती घ्यायचा विचार आहे.
प्रत्यक्ष तानपुरा माझ्याजवळ नाही, पण इलेक्ट्रॉनिक तानपुर्‍याच्या सहाय्याने, मैफिलीत तानपुर्‍याचा वापर कसा केला जातो हे समजावण्याचा प्रयत्न करावा म्हणतो.
त्यानंतर काही तरी ऐकणे होईल.
सुरुवातीला शक्यतो संपूर्ण राग ( आरोह अवरोहात सातही स्वर असलेला) ऐकावा असे वाटते आहे.
तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? पहिल्या भेटीत ऐकण्यासंदर्भात?

ज्यांना इले. तानपुरा/तंबोरा घेणे शक्य नाही, त्यांच्या साठी, Taanpura droid आणि pocket raaga ही अ‍ॅप आहेत. ती डालो करुन घ्यावीत

पुणेकर मंडळी...
लवकर कळवा.
जर प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नसेल तर दुसरा काही पर्याय आहे का ते पहावे लागेल.
प्रत्यक्ष भेटणे आणि प्रत्यक्ष ऐकणे हे इष्ट असे वाटते आहे.

चैतन्य, पहिल्या भेटीत सोप्पा राग घेता येतोय का ते बघ... जसा भूप. कोमल, तीव्र वगैरे भानगडी नाहीत, चाल-चलन सरधोपट आहे आहे.
रागाशी निगडीत एखाद दोन गाणी... फिल्म, नाट्य गीत, भावगीत इ.
आणि मग व्होकल किंवा वाद्य असं शास्त्रीय.
संपूर्ण शास्त्रीय ऐकणं असं अगदी जड होणर नाही.

तानपुर्‍याच्या बाबतीत, ....
कुमार तानपुरा लावणे ह्या बाबतीत खूप काटेकोर होते. काही काही घराण्याच्या गायकांना ते तानपुर्‍याच्या बबतीत बहिरे आहेत गायक... असं म्हणत असत.

तानपुरा लावणे म्हणजे रंगवण्यापूर्वी फलक तयार करणे... कॅनव्हास. तो समतल, ताठ हवा. सुरकुत्या नकोत. एकाच रंगाचा हवा... त्याची डायमेन्शन्सही रंगकर्मीस हवी तितकीच हवीत...
च्तसाच तानपुरा
सगळ्या तारा सुरात लागलेल्या हव्यात. ज्या रागात गंधार नाही असा राग गाताना जोडतारा (दोन मधल्या तारा ज्या षड्जात लावलेल्या असतात) ,... अगदी बर्रोब्बर सुरात लागल्या तर त्यातून गंधार ऐकू येतो. त्यासाठी एक तार किंचित कणसूर लावावी लागते.
वाजवणार्‍याने कसातरी एकतारीसारखा तो छेडून उपयोगी नाही. एकसंध तैलधारेसारखा नाद येत राहील असं छेडणं आवश्यक आहे. तानपुर्‍याचा आवाज गाणार्‍याला आवश्यक इतकाच हवा... अधिक नको अन कमीही नको.
म्हणून तानपुरा छेडणे हे सुद्धा एक तांत्रिक कौशल्याचं काम आहे.

एका प्रतिष्ठित गायकास (त्याच्या उमेदीच्या काळात) कुणा प्रसिद्धं बीन वादकामागे तानपुरा घेऊन बसले असता, भर मैफिलीत कानाखाली वाजवून घेण्याचा प्रसग् घडला आहे... कारण वाजवीपेक्षा अधिक जोरात (आवाज) तानपुरा छेडला म्हणून.

आजकाल इलेक्टृओनिक तानपुरे झाले आहेत. ते सहजी अत्यंत सुरात लागतात आणि सुरात रहातात. जुन्या लाकडी तानपुर्‍यांसारखी त्यांना सर्दी-बिर्दी होत नाही... आणि त्यांचे मूडही बिघडत नाहीत.

पण.. एखादा गरम मिजाजी मिरज-बिरज कडला जुना वयस्कर तानपुरा कुणी पहुचे हुए गायक आंजारून-गोंजारून लावतात... त्याचाही मूड बनतो... गडी रंगात येतो... झक्कास लागतो... तेव्हा तो बोलतो.

असा तानपुरा उभा धरून नुस्ता छेडत रहावा...
डावा हात भोपळ्यावर अन उजव्या हाताने छेडत असता तो कधीतरी अलगद खांद्यावर विसावतो. मग हात कान.. खांदा... सगळं शरीर त्या नादाने झिणझिणून उठतं. तानपुरा वेगळा रहात नाही. त्याचा षड्जं, पंचम आपल्या शरिरातून वहायला लागतात.
कान लावून निव्वळ तानपुरा ऐकणं ही एक आपली आपण अनुभवायची मैफिल आहे.

इतकच काय पण असा लागलेला तानपुरा अन गायक... हेच मुळात एक अद्वैत आहे. आम मैफिलींमधे हे बघायला मिळणं विरळा... गायकांचा रियाज बघायला-ऐकायला मिळणं ह्यासारखं भाग्यं नाही. ते अदृष्य राहून बघत आलं तर?
असो... फार लिहिलं.

क्या बात है दाद!!

असा तानपुरा उभा धरून नुस्ता छेडत रहावा...
डावा हात भोपळ्यावर अन उजव्या हाताने छेडत असता तो कधीतरी अलगद खांद्यावर विसावतो. मग हात कान.. खांदा... सगळं शरीर त्या नादाने झिणझिणून उठतं. तानपुरा वेगळा रहात नाही. त्याचा षड्जं, पंचम आपल्या शरिरातून वहायला लागतात.
कान लावून निव्वळ तानपुरा ऐकणं ही एक आपली आपण अनुभवायची मैफिल आहे.>> अगदी अगदी अस्संच!
अहाहा!...

तुझा प्रतिसाद वाचून काय वाटलं ते शब्दांत नाही सांगू शकत. मला तुझ्याइतकं छान पण नाही लिहिता येत.

स्स्स्स.. खूप दिवसांत तारा नाही छेड्ल्यात अशा Sad

वा दाद ! क्या बात है !!

पहिल्या भेटीत पूर्णपणे शास्त्रीय नकोच असं माझ्या गुरुजींनीही सुचवलं मला.
ग्रेट माईंड्स थिंक अलाइक Happy

लोकहो,
लवकर कळवा कधी शक्य होईल भेटणे ते.
अन्यथा, न भेटता लेखन-स्वरूपात काही करता येईल.
तुमच्या प्रतिसादावर ठरवूया.

दाद, कित्ती छान वाटलं वाचून हे. प्रत्यक्ष तानपुरा लावताना जर त्याचे चित्रीकरण करता आले तर किती छान !

चैतन्य.. लेखन रुपातही येऊ द्या.. ! भेटा तेव्हा भेटालच. तोवर एखादे नेटवर उपलब्ध असलेले गाणे घेऊनही लिहा.
म्हणजे सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल.

हिम्सकूल,
अरे वा ! हे फारच उत्तम होईल. आजोबांकडून खूपच छान माहिती मिळू शकेल.
साधारण तासभर कालावधी असेल असे डोक्यात आहे.

Pages