करशील का माझ्याशी लग्न ?

Submitted by 'घरटे हरविलेला ... on 14 August, 2014 - 05:18

नेहा,

कुठून आणि कशी सुरवात करू हे कळत नाही. पण विखुरलेला एक एक मोती जसा उचलून हातातल्या धाग्यात अलगदपणे गुंफून माळ तयार करावी तस-काहीस करणार आहे. काही वर्षांपूर्वी (२००५-६ असावे बहुधा) मी तुला खगोल मंडळाच्या कार्यक्रमात प्रथम पहिले तेंव्हाच तुझी हुशारी आणि निरागस हास्य मला आवडले होते. तशी आहेसच तू सुंदर ! कोणालाही आवडशील अशी. पण स्वतःच्या मनाची चलबिचल थांबवण्यसाठी एखद्या निस्तब्ध पाण्यात खडा टाकून ते पाणी ढवळून काढावे असे मला कधीच वाटले नाही. याउलट तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला.
अभियांत्रिकी अभ्यासात काही काळ निघून गेला. त्यानंतर काही फिरतीची नोकरी असल्याने खगोल मंडळात फारसे येणे झाले नाही. मध्येकधी एखादी फेरी झालीही असेल कदाचित, पण फारशी आठवत नाही. अंधारात जळणारा दिवा जसा मंदमंद होत अदृश्य व्हावा तश्या वेळेसरशी तुझ्या आठवणीही धुसर होत गेल्या. पुढे करियर आणि महत्वाकांक्षा यांच्यासमवेत उडणारे आयुष्याचे पान मला उच्चशिक्षणासाठी सातसमुद्र ओलांडून अमेरीकेला कधी घेऊन आले हे कळलेही नाही.

मध्ये आणखी काही वर्षे निघून गेली. वर्षभरा पूर्वी फेसबुकवर मंडळाची वेबसाईट दिसली. ती पाहताना नकळतपणे तुझ प्रोफाइल पेज समोर आल आणि हेमंतात एकामागूनएक येणाऱ्या प्रवाशी पक्ष्यांनी संपूर्ण किनारा जसा भरभरून यावा, तशा तुझ्या आठवणी पुन्हा उजळ होत गेल्या. आणि आता अधून मधून तुझ फेसबुक पेज धुंडाळताना तुझा मनमोकळा स्वभाव, तुझी सामाजिक जाणीव, एस्ट्रोफिसिक्सची तुझी आवड आणि तुझी भटकंती या सर्व गोष्टी पुन्हा समोर येतात. खरच ! फार सुंदर! सर्वाना आपलस करून जीवनात असीम गोडवा निर्माण करावा, अगदी अश्शीच आहे तुझी स्टाइल.

माझ शिक्षण तस जवळपास संपलय. वयही आता तिशीजवळ झुकलय. काही महिन्यात चांगली नोकरीही मिळेल आणि पुढील आयुष्य अगदी सुकर असेल यात कोणतीही शंका नाही. नवीन महत्वाकांक्षा अजूनही आहेत. आणखी नवनवीन शिखरं गाठायची आहेत. कला जोपासायची आहे, नवीन ठिकाणं पहायची आहेत, जगप्रवास करायचं आणि मनसोक्त जगून घ्यायचय. पण हे सर्व होताना महत्वाची गोष्ट अशी की, सहचारिणी शोधण्याची वेळही आता अगदी जवळ आली आहे. त्यामुळे एरवी स्थितप्रज्ञ असणारे माझे मन, अरेंज म्यारेज च्या समुद्र मंथनातून बाहेर येणारी बायको नक्की कंप्याटीबल असेल कि नाही? या विचाराने गलबलते आहे. आणि म्हणून इतरत्र मुली पाहण्या आधी, खरोखर माझ्या आईडीयल मुलीच्या चौकटीत बसणाऱ्या तुला हे सर्व सहजपणे समजून सांगण्यासाठीच हा खटाटोप मी केला आहे.

कदाचित तू मला आता ओळखतही नसशील अथवा विसरलीही असशील. त्यामुळे एखाद्या अनोळखी मुलाने अशा प्रकारे लग्नासाठी तुझ्याकडे संपर्क साधणे तुला आवडेल कि नाही? हे माहित नाही. पण खरं सांगायचं तर एकदाच मिळालेल्या ह्या आयुष्यात अधिकाधिक आवडणाऱ्या माणसांच्या सहवासात जीवन घालवणे म्हणजे खरोखरीचे आनंदाने जगणे नव्हे का? आणि म्हणून अशा प्रकारचा एकेरी प्रयत्न मी केला आहे. मी येत्या डिसेंबरमध्ये महिन्याभरासाठी भारतात परततोय. तेंव्हा बघशील मला एकदा भेटून? माझ्याशी बोलून? मला माहितीय की, आवडणाऱ्या सर्व गोष्टी मिळतीलच असं नाही आणि त्या मिळाव्यातच अशी माझी ईच्छाही नाही. त्यामुळे मला भेटून जर तुला खरंच माझ्या विषयी जवळीक वाटली आणि तुझी पूर्ण संमती असली तरच पुढील पाऊले टाकू. मी वाट बघतोय तुझ्या कॉफी इनव्हीटेशनची ..!

अभिषेक

काय वाटतं तुम्हाला ? हे पत्र पाठवू तिला ? तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय

(नावे बदलली आहेत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय वाटतं तुम्हाला ? हे पत्र पाठवू तिला ? >>> तिच जे काही उत्तर असेल ते स्विकारायची तयारी असेल तर नक्की पाठवा...

मनात काहीही ठेवु नये , सांगुन मोकळं व्हावं आणी दोन्ही उत्तरे ऐकायची तयारी ठेवावी. उगाच नंतर वाटायला नको की विचारलं असतं तर बरं झालं असतं.

विचारल्यावर दोनच उत्तरे संभवतात. हो किंवा नाही. तेव्हा बिंधास विचारा. तुम्हाला शुभेच्छा.

नवीन महत्वाकांक्षा अजूनही आहेत. आणखी नवनवीन शिखरं गाठायची आहेत. कला जोपासायची आहे, नवीन ठिकाणं पहायची आहेत, जगप्रवास करायचं आणि मनसोक्त जगून घ्यायचय.>>
Biggrin लग्न पण करायचय आणि ह्या वर लिहिलेल्या गोष्टीपण करायच्यात.. Wink
लग्न केलेल्या व्यक्तिंना आधी विचारुन बघा, हे सगळं लग्नानंतर जमतं का ते..... Light 1 घ्या!!

पाठवा हो बिन्धास्त. फारफार तर नाही म्हणेल. तुमची स्वप्ने आहेतच की बरोबर पुर्ण करायला पुढे. आणि हो म्हणाली तर तिच्यासह स्वप्न पहा.

हे इतकं बदला
आणि म्हणून आशा प्रकारचा एकेरी प्रयत्न मी केला आहे.
>>>आणि म्हणून अशा प्रकारचा एक

मला माहितीय की, आवडणाऱ्या सर्व गोष्टी मिळतीलच असं नाही
>>> तुमची ती एखादी गोष्ट आहे काय?
त्यापेक्षा
आवडणारे सर्व मिळेलच असं योग्य वाटतय का?

आणि
कुसुमाग्रजांनी म्हटलय तसं लवकर भावना व्यक्त करा....
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं…...

पाठवाच तुम्ही पत्र.. तुमच्या मनातलं तिला सांगायची संधी अजिबात सोडू नका. तिच्याकडून होकार यावा ही सदिच्छा.
(फक्त ती हो 'च' म्हणेल अशी वेडी आशा ठेवू नका.. नकार पचवायची तयारी असेल तरच पाठवा)

शुभेच्छा.

Happy ती मायबोलीवर आहे की नाही हे तरी आधी शोधायचं. नायतर अस क्राउडसोर्स केलेलं पत्र वाचायची बिचारी!

मनापासून शुभेच्छा!

पत्र बित्र सोडा.. तिचा नंबर मिळवा आणि सरळ कॉल करा..
(To be Honest..इतकी चांगली दिसणारी..इतकी चागल्या स्वभावाची मुलगी इतके दिवस/वर्षानंतर Single/Available for marriage असेल हे कठीणच वाटतय.. पण जसे टाटा स्काय वाले म्हणतात तसे पुछने मे क्या जाता है Happy )

शुभेच्छा!

हे असे सगळ्या जगाला विचारण्यात वेळ वाया दवडू नका. झट्पट मन मोकळ करा. कदाचित जमून जाईल. ती अजून रिकामी असेल तर.

माझ शिक्षण तस जवळपास संपलय. वयही आता तिशीजवळ झुकलय. काही महिन्यात चांगली नोकरीही मिळेल
>>>>>>>
तिशीजवळ झुकलात आणि शिक्षण आता जवळपास संपलेय आणि नोकरी मिळायची बाकी आहे. Sad
खोट नाही काढत आहे पण लग्नाची मागणी म्हणजे आधी नोकरी पगार बघितला जाणार, कारण तुमचे प्रेम असले तरी तिच्यासाठी हे अरेंज मेरेजच झाले.

असो, पण वेळ न दवडता क्लेम लावणे उत्तम. शिक्षणाकडे बघून तुमच्या चांगल्या नोकरीची आणि उज्ज्वल भविष्याची खात्री तिला वाटली तरी ती तुमचा क्लेम राखून ठेवेल.

क्लेम हा शब्द वापरला कारण चटदिशी प्रपोज आणि पटदिशी होकार हे म्हणजे अगदी परिकथेसारखे होईल नाही, म्हणून अपेक्षा जरा खालच्या लेव्हलवरच ठेवलेल्या बर्‍या.. स्वानुभव आहे हो, मी सुद्धा एकेकाळी खूप उडायचो, मुलगी हसली की फसली वगैरे वगैरे गैरसमज होते... असो.. जास्त अवांतर नको.. पण एक नमूद करू इच्छितो, काल्पनिक नावे, नेहा आणि अभिषेक आवडण्यात आली आहेत. Happy

शुभेच्छा !

<<माझ शिक्षण तस जवळपास संपलय. वयही आता तिशीजवळ झुकलय. काही महिन्यात चांगली नोकरीही मिळेल
>>>>>>>
तिशीजवळ झुकलात आणि शिक्षण आता जवळपास संपलेय आणि नोकरी मिळायची बाकी आहे>>
ऋन्मेऽऽष +११११ बरच बारकाईने वाचलत तर Happy
<< तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला>> तसच << अंधारात जळणारा दिवा जसा मंदमंद होत अदृश्य व्हावा तश्या वेळेसरशी तुझ्या आठवणीही धुसर होत गेल्या>> अस खूप काही काव्यात्मक वगैरे लिहिलेलं तिला आवडत का ? अशी आपली एक शंका Happy

ऋन्मेऽऽष =११११ बरच बारकाईने वाचलत तर
>>>>>>>

क्या करे, उसने तार हि ऐसे छेडी के पुराने दिन याद आ गये ..
पुराने म्हणजे आता मी म्हातारा नाही झालो हा.. पण अशी कित्येक पत्रे खिश्यात पडल्या पडल्या कुजवलीत म्हणून एक आपलेपणा .. Happy

अमा, मुग्धटली , कविता, कोक्या , रावी, गिरिकंद, शुभांगी, निक्षिपा चिखलु , चौकट राजा सीमंतिनी, रोहिणी ,मनस्मी आणि स्वराली,ऋन्मेऽऽष, नंदिनी, सुजा ! सर्वाना प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद.!

@स्वराली - काय add करू सविस्तर सांगशील ?
@अग्नीपंख/ गिरिकंद - लग्न केलेल्या व्यक्तिंना आधी विचारुन बघा, हे सगळं लग्नानंतर जमतं का ते >> अरे सपनोसेहि तो उडान होती हैं मित्रा ! जमेल हो हळूहळू !
@सीमंतिनी - ती मायबोलीवर आहे कि नाही हे माहित नाही. नसावी बहुधा !
@नंदिनी - अशक्य हसतोय मी पण !!!
@ऋन्मेऽऽष - भावना पोहोचल्या ! thanks !
@सुजा - कधी अस फार लांबलचक व काव्यात्मक बोलल्याच आठवत नाही ! पण आवडल्यास उत्तम !

आणखी नव्या विचांरासाठी रंगमंच सदैव खुला आहे.! आभार

तुम्ही ठरवलंच आहे का तिच्याशी लग्न करायचं? आय मीन- आर यू शुअर?
म्हणजे ती जर हो म्हणाली तर तुमचा निर्णय ठाम आहे ना? का तुम्ही तिला भेटून मग ठरवणार आहात?
उगाच नंतर गोंधळ नको. फक्त फेसबुक प्रोफाईलवरुन आणि जुन्या ओळखीवरुन तुम्ही निर्णय घेताय म्हणून विचारलं.

ओळख, मैत्री, बेस्ट फ्रेन्ड्स, नंतर प्रेम - अशी स्लो लोकल ट्रेन बोर्ड केली तर प्रेमाआधीच्या प्रत्येक स्टेशनात दोघांनाही उतरुन जायची मुभा असते आणि स्वतःच्या भावना पडताळून पाहाण्याचीही. तुम्ही डायरेक्ट बुलेट ट्रेनमध्ये चढला आहात!

सोप्या मराठीत फोनवर बोला. असली पत्रं १००-१५० पानाच्या कौटुंबिक मराठी कादंब्र्यातच असतात फक्त.

<तुम्ही ठरवलंच आहे का तिच्याशी लग्न करायचं? आय मीन- आर यू शुअर?
म्हणजे ती जर हो म्हणाली तर तुमचा निर्णय ठाम आहे ना? का तुम्ही तिला भेटून मग ठरवणार आहात?
उगाच नंतर गोंधळ नको. फक्त फेसबुक प्रोफाईलवरुन आणि जुन्या ओळखीवरुन तुम्ही निर्णय घेताय म्हणून विचारलं.>
अगदी पटल,
अर्थात प्रत्यक्ष भेटल्याशिवाय काहीच कळणार नाही त्यामुळे पत्र तर पाठवायला लागेल

नंदिनी तू आधी लिहीलेले काही बदललेस काय? लोक हसत का आहेत कळत नाही.

अमा - सीटीसी म्हणजे काय? कॉस्ट टू कंपनी?

हे मूळ पोस्टला:
तिच्याशी आधी कधी बोलला होतात काय? एवढी अस्सल मराठी आवडेल का तिला वगैरे एकदा विचार करा. सहचारिणी वगैरे जरा पोक्त भाषा वाटते. सर्वांना आवडेलच असे नाही. वय तिशीकडे झुकले आहे वगैरे आवर्जून लिहायची गरज नाही :). ती ओळखत असेल तर वयाचा अंदाज असेलच. नसला, तरी तुम्हाला जर माहीत असेल तिचे वय काय आहे, आणि वयात फरक जर असला तर तो कोणालाही खटकण्याएवढा मोठा नसेल तर हे मुळात लिहायची गरजच नाही.

असो. मी काही फार यशस्वी प्रेमपत्रे लिहीली आहेत असे नाही (किंबहुना मुळात लिहीलेच नाही. प्रेमपत्रच काय, प्रेममेल, प्रेमट्विट वगैरेही नाही :)), पण सहज जाणवले ते सांगितले. काही मुलींना साहित्यिक भाषा आवडेल (ती वरती चपखल जमली आहे), काहींना सहज समोर बसून बोलल्यासारखी. You probably know more about her than any of us.

विचारायलाच हवं. पण ती नाही म्हणाली तर दुसर्या एखाद्या मुलीशी लवकर लग्न करा. तीस म्हणजे ओव्हरड्युच झालय .

अमा - सीटीसी म्हणजे काय? कॉस्ट टू कंपनी?
>>>>
मी अमा नसलो तरी येस्स, तेच अभिप्रेत असणार.. सोप्या भाषेत पगार Happy

बाकी तू प्रेमपत्र लिहिली नसूनही मुद्दे नेमके काढलेस.
म्हणजे कागदावर उतरवले नसले तरी मनातल्या मनात विचार करून झालेला दिसतोय. Wink

तीस म्हणजे ओव्हरड्युच झालय .
>>>>
हा एक वेगळ्या धाग्याचा विषय बनेल - आजच्या जमान्यात मुलामुलींचे लग्नाचे योग्य वय.
पण माझ्या मते मराठी चाकरमानी (ईंजिनीअर वगैरे) मुलांसाठी हे वय चालसे.
मुलीही २७-२८ पर्यंत जातात.
माझ्या फ्रेंडसर्कलचे अनुभव सांगतोय.
माझ्यामते वय वाढल्याचे टेंशन त्यांना येते ज्यांना गर्लफ्रेंड नसते Wink

असे सगळ्यांना विचारून चर्चा करण्यासाठी लिहिलेले वेगळे आणि शेवटी स्वतःच्या मनातले फक्त तिच्याच साठी असे वेगळे असते ना ,असा त्या addition चा अर्थ आहे .

Pages