क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा.
पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात. अजून बाउन्स किती आहे, स्विंग किती आहे, बोलर किती जोरात आहे याचा अंदाज यायचाय. खेळायला आख्खा दिवस पडलाय. पहिला तास बोलरचा. बॅट्समन स्ट्राईक घेतो, बोलर स्वेटर काढून अंपायर कडे देतो, स्टेप्स मोजत रन-अप आखतो, आणि खरी गेम सुरू होते.
खेळपट्टी 'जिवंत' असेल तर पहिला डावपेच ठरलेला. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स. त्यात बॉल टाकल्यानंतर फॉलो थ्रू मधे पुढे अर्ध्या पिचपर्यंत जाउन बॅट्समनकडे खुन्नस वाली नजर. "आपल्याशी पंगा घेऊ नको" हा पहिला संदेश. दुसरा म्हणजे फ्रंट फूट वर यायची डेअरिंग आहे का, हा. बॅट्समनला ही लगेच याला धुवायचा आहे म्हणून वाट्टेल तशी बॅट फिरवण्याची गरज नसते. गावसकर म्हणायचा तसा 'पहिला तास बोलरला दिला की उरलेला दिवस तुमचा'. मात्र या पहिल्या तासातच बोलर बरोबर जी गेम चालते त्यातून वाचलात तर. एकतर स्विंग, बाउन्स, किंवा कट होणार्या नवीन चेंडूला खेळणे सोपे नसते, त्यात ५-१० ओव्हर्स चा स्पेल असलेला बोलर तुमचे कच्चे दुवे हेरून तुम्हाला उडवू शकतो.
बरेचसे शांत बॅट्समन अशा वेळेस बॅक फूट वर ठाण मांडून बसतात. आणि अशात मग एक प्रचंड वेगात फुल पिच स्विंग होउन येतो किंवा यॉर्कर येतो, आणि बॅट खाली जायच्या आत स्टंप घेऊन जातो. क्लासिक फास्ट बोलर्स विकेट! टेस्ट मॅच मधल्या अनेक जिवंत, सुंदर सीन्स पैकी माझा अत्यंत आवडता. भारतीय बॅट्समन नसेल तर जास्तच. विकेट्स मधे काहीही सपोर्ट नसताना सुद्धा काही फास्ट बोलर्सनी नवीन चेंडू, स्वतःचा वेग व दबदबा यांच्या जोरावर अशा विकेट्स काढलेल्या आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत. जेथे विकेट्स मधे सपोर्ट असतो तेव्हा तर हे आणखी जोरदारपणे होते.
या अशा काही क्लिप्स. यातील बहुतेक क्लिप्स मधे दोन्ही बाजू दिग्गज आहेत, आपापल्या टीममधले त्यावेळचे मुख्य खेळाडू आहेत आणि त्यांचे एकमेकांबरोबरचे द्वंद्व हे कधीकधी मॅचच्या पेक्षाही मोठे समजले गेलेले आहे.
पहिला होल्डिंग विरूद्ध बॉयकॉट
बॉयकॉट हा इतर तत्कालीन (व अनेक कालीन) इंग्लिश लोकांप्रमाणे स्विंग चांगले खेळणार पण जेन्युइन पेस पुढे बकरा, असा नव्हता. स्लो खेळणारा असला तरी तांत्रिकदृष्ट्या कायमच नावाजलेला होता व विंडीज विरूद्ध चे त्याचे रेकॉर्डही चांगले आहे. त्याविरूद्ध ऐन भरात असलेला "व्हिस्परिंग डेथ" होल्डिंग. त्याच्या तेव्हाचा रन-अप सुद्धा पाहण्यासारखा असे. गवतावरून तरंगत गेल्यासारखा तो जात असे. बहुधा तो जवळून बोलिंग करताना ज्या सहजपणे आवाज न करता पळत यायचा त्यावरून डिकी बर्ड ने ते नाव ठेवलेले होते त्याचे.
खच्चून भरलेले व मिळेल तेथून अजूनही लोक येत असलेले बार्बाडोस चे स्टेडियम. इंग्लंड विरूद्धचा सामना म्हणजे कायमच खुन्नस बाहेर काढायची संधी. होल्डिंग ने टाकलेली ही ओव्हर्स क्रिकेटमधली सर्वात भारी समजली जाते. यात इंग्लिश समीक्षकांची आतिशयोक्ती सोडली तरी ही क्लिप बघता ती सर्वात डेडली ओव्हर्स पैकी नक्कीच असेल. बॉयकॉट चा स्टंप ज्या पद्धतीने उडतो ते सध्याच्या हाय डेफिनिशन क्लिअर पिक्चर मधे, १५ कोनांतून बघायला व स्टंप मायक्रोफोन मधून ऐकायला काय मजा आली असती!
ही दुसरी क्लिप व्हिव रिचर्ड्स विरूध्द डेनिस लिली. या सिरीज चे महत्त्व इतके प्रचंड आहे की पुढच्या १०-१५ वर्षांत विंडीज ने जागतिक क्रिकेट मधे वर्चस्व गाजवले त्याची मुळे येथे होती. लिली, थॉमसन वगैरे प्रचंड वेगवान व आक्रमक बोलर्स नी वेस्ट इंडिज ला एवढे जेरीस आणले की रिचर्ड्सलाही म्हणे या सिरीजच्या मध्यावर मानसोपचार तज्ञ गाठावा लागला होता फॉर्म परत मिळवण्यासाठी (त्याबद्दल त्याचे मत येथे आहे). त्यावेळेस एकूणच लिली भयंकर जोरात होता. त्याचा रन अप बघताना नेहमी शिकार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात एखादा चित्ता जसा एकदम वेग व इंटेन्सिटी वाढवत जातो तसे वाटायचे. येथे डावपेच तोच. पहिले ३-४ बॉल्स बाउन्सर्स आणि मग एक एकदम आत येणारा. रिचर्ड्स येथे बॉडी लॅन्ग्वेज मधे कितीही बेदरकारी दाखवत असला तरी लिली नक्कीच जिंकला.
ते 'जागतिक वर्चस्वाची मुळे" वगैरे लिहीताना शाळेच्या इतिहासातील "दुसर्या महायुद्धाची मुळे व्हर्सायच्या तहात..." वगैरे आठवत होते. त्याचे कारण म्हणजे फास्ट बोलर्स चे महत्त्व क्लाइव्ह लॉईड ने येथे ओळखले व यानंतर लगेच स्वतःच्या टीम मधे त्याला प्राधान्य दिले. मग आधी क्रॉफ्ट, होल्डिंग, रॉबर्ट्स व गार्नर, नंतर क्रॉफ्ट च्या जागी माल्कम मार्शल आला. त्यापुढे वॉल्श व अँब्रोज निवृत्त होईपर्यंत विंडीज कडे कायमच किमान दोन जबरी फास्ट बोलर्स असत.
इम्रान वि ग्रेग चॅपेलः ८१ मधला इम्रान म्हणजे ऐन भरातला. तर चॅपेल थोडा उतरणीला लागलेला असला तरी अजूनही भारी. पुन्हा ठरलेला डावपेच. चॅपेल ला फ्रंट फूट वर येउ द्यायचे नाही. कारण कॉमेंटेटर ने अचूक टिप्पणी केल्याप्रमाणे "A Greg Chappell playing forward is a confident Greg Chappell".. हे पाह्ताना एक जाणवेल की २-३ बॉल्स चॅपेल जसे खेळला ते बघितल्यावर लगेच रिची बेनॉ ने इम्राने ने चॅपेलला 'वर्क आउट' केला आहे हे ओळखले होते. जाणकार कॉमेंटेटर्स जसे बराच काळ बघितलेल्या खेळाडूंचा आज किती फॉर्म आहे ते ओळखतात तसाच प्रकार. रिची बेनॉ ते म्हणतो आणि पुढच्या बॉल वर चॅपेल ची दांडी! चॅपेल म्हणजे वास्तविक प्रचंड "अॅनेलिटीकल" खेळाडू होता. त्याने स्वतःच त्याच्या प्रत्येक बॉल मधल्या "रिच्युअल" चे खूप वर्णन केलेले आहे. प्रत्येक बॉल नंतर क्रीजवरून बाजूला जाऊन आधीचा बॉल कसा होता, नंतरचा कसा असू शकतो याचे विश्लेषण डोक्यात करून, पुन्हा पुढच्या बॉल वर फोकस करून मग क्रीज मधे तो येत असे. त्यालाही या पेटंट डावपेचाने इम्रानने काढला यावरून प्रत्यक्ष पीच वर वेगळीच गेम चालू असते हे जाणवते.
'खडॅक!" त्याकाळात फक्त ऑस्ट्रेलियातील मॅचेस मधे ऐकू येणारा हा "बोल्ड" चा आवाज. भारतीय बोलर ने काढला तर अजूनच धमाल. १९९२ मधला कपिल म्हणजे खरे तर चांगलाच उतरणीला लागलेला. पण द आफ्रिकेतील व ऑस्ट्रेलियातील पिचेस मधल्या "ज्यूस" मुळे त्या एक दीड वर्षात तो जबरी फॉर्म मधे आला होता. या दोन्ही सिरीज मधे त्याने खूप विकेट्स काढल्या. त्यातही या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे त्याने सातत्याने अॅलन बॉर्डर ला उडवला होता. बॉर्डर तेव्हाचा सर्वोत्कृष्ठ फलंदाज समजला जायचा. त्यात कॅप्टन व घरी खेळताना त्याला कपिल ने टारगेट करणे म्हणजे संघाच्या मुख्य बोलर ची जबाबदारी तो बरोबर घेत होता. या मॅच मधे नवा चेंडू घेतल्यावर कपिल कडे बॉल आला आणि तेव्हाचे हे तीन सलग बॉल्स किती डेडली होते ते पाहा. आधी बोर्डर ला लेट स्विंग होणार्या बॉल ने उडवला - प्रतिस्पर्धी कॅप्टनचा त्रिफळा काढणे हे बोलर्ससाठी नेहमीच मोठे यश असते- आणि मग फॉर्म मधे असलेल्या डीन जोन्स ला दोन 'ब्रूटल' आउटस्विंगर्स. पहिला जेमतेम हुकला पण दुसरा बरोबर ऑफस्टंपवर!
आणि ही इशांत शर्मा विरूद्ध रिकी पाँटिंग. इशांत शर्मा अजूनतरी वरच्या लिस्ट मधल्या बोलर्स एवढा भारी नसला तरी २००८-२०११ तो व झहीर ही पेअर खूप जबरी जमली होती व भारताच्या एकूण कसोटी क्रिकेट मधल्या तेव्हाच्या वर्चस्वात त्यांचा खूप वाटा होता. इशांत शर्मा ने २००८ च्या पर्थ टेस्ट मधे दोन्ही डावात पाँटिंगला जसा काढला त्यावरून त्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे हे सिद्ध झाले.
"एक और करेगा?"
"हाँ, करूंगा"
२००८ च्या पर्थ कसोटीनंतर ही वाक्ये खूप फेमस झाली होती. त्याआधी पाच वर्षे जगातील सर्वात चांगला फलंदाज असलेल्या पाँटिंगला जवळजवळ तासभर आपल्या स्विंग व बाउन्स ने सतावल्यावर अनिल कुंबळे शर्माचा स्पेल बदलणार होता. पण असे म्हणतात की सेहवाग ने त्याला दिल्ली मधे सलग बर्याच ओव्हर्स बोलिंग करताना पाहिलेले होते व त्याने अनिल ला त्याला अजून एक देऊन पाहा म्हणून सुचवले. इशांतला ते अनिल ने विचारल्यावर तो लगेच तयार झाला, व त्याच ओव्हरमधे फायनली पाँटिंगने 'निक' दिली. द्रविड कडे बॉल गेल्यावर तो सुटणे शक्यच नव्हते. या कसोटीत दोन्ही डावात 'पंटर' ला इशांत अजिबात झेपला नाही. क्रिकइन्फोच्या या लेखातही त्याची आणखी माहिती मिळेल.
याही मॅच च्या आधी बरेच काही झाले होते या सिरीज मधे. मेलबर्न ला रीतसर हरल्यावर, दुसर्या टेस्ट मधे सिडनीला आपली बॅटिंग फॉर्मात आली, पण थोडे दुसर्या डावातील अपयश व बरेचसे ऑस्ट्रेलियन चीटिंग व अंपायर्सच्या चुका यामुळे सिडनीलाही भारत हरला. एकूणच आपली टीम भयंकर डिवचली गेली होती. अनिल कुंबळे सारख्या शांत खेळाडूनेही "या मॅच मधे एकच टीम खिलाडू वृत्तीने खेळली" असे म्हंटले होते. भारताचे (व पाकचेही) एक आहे - तुम्ही कितीही हरवा पण व्यक्तीशः कोणाला डिवचलेत तर काय होईल सांगता येत नाही. संदीप पाटील एरव्ही ब्याटी फिरवून आउट होईल. पण त्याला जखमी केलेत तर परत येउन त्याच बोलर्सना तुडवून १७४ मारेल. 'दादा' एरव्ही कंबरेवर बाउन्स होणार्या बॉल ला सुरक्षितरीत्या स्लिप मधे पाठवण्याचे काम आपल्या बॅटचे आहे अशा समजूतीत खेळेल, पण राग आला तर शोएब, अक्रम पासून फ्लिंटॉफ पर्यंत कोणालाही पुढे येउन भिरकावून देइल. जेन्युइन वेग विशेष खेळता न येणारा अझर जखमी व अपमानित झाल्यावर ओव्हरमधले पाच बॉल कोठेही पडले तरी एकाच बाजूला बाउंड्रीबाहेर काढेल, गावसकर एरव्ही ९४ बॉल्स मधे १० रन जेमतेम काढेल पण डिवचलात तर पुढच्या कसोटीत जगातील सर्वात भयंकर बोलिंग विरूध ९४ बॉल्स मधे शतक मारेल, असला प्रकार. येथे तर सगळा संघच डिवचला होता. त्यामुळे एरव्ही बघितले तर पहिल्या दोन टेस्ट हरल्यावर तिसरी 'पर्थ' ला म्हणजे शब्दशः दुष्काळात तेरावा महिना. पण येथे आपण ऑस्ट्रेलियाला धुवून काढले. जवळजवळ सर्व प्रमुख बॅट्समेननी थोडीफार कामगिरी केलीच पण मॅच काढण्यात इशांतचा ही खूप मोठा भाग होता.
आपापल्या जमान्यातील खतरनाक बोलर्स व नावाजलेले बॅट्समेन यांच्यातील हे द्वंद्व हे कसोटी क्रिकेट मधेच बघायला मिळते. बोलर्सना ५-१० ओव्हर च्या स्पेल मधे बॅट्समन कोणत्या बॉल ला कसा खेळतोय हे बघून त्याप्रमाणे त्याला आउट कसे करायचे हे ठरवता येते. नियमांनी जखडून टाकलेल्या व पाटा पिच वर दम नसलेल्या बोलिंग वर पट्टे फिरवून ३० बॉल्स मधे ६० धावा करणे हे बघण्यातही एक मजा आहे पण ती एकतर्फी आहे व बॅट्समन चे एकच कौशल्य त्यात कामी येते - कोणत्याही बॉल वर शॉट्स मारू शकण्याचे. खरा कस लागतो तो कसोटीत. हे आजकाल जरा कमी बघायला मिळत आहे. तरीही डेल स्टेन, मिचेल जॉन्सन सारखे लोक अजूनही थोडीफार कामगिरी करत आहेत. तुम्हालाही अशा काही क्लिप्स माहीत असतील तर द्या येथे.
उत्कृष्ट लेख
उत्कृष्ट लेख
मस्त !! इशान्तचा आजचा स्पेल
मस्त !!
इशान्तचा आजचा स्पेल पण ह्या लिस्ट मधे हवा :).
मस्त लिहिले आहे अमोल. तुझे
मस्त लिहिले आहे अमोल. तुझे क्रीडाविषयक लेखन एकदम सह्ही असते.
सुंदर लेख.............. एक
सुंदर लेख..............
एक उल्लेख राहुन गेला... दक्षिण आफ्रिके मधे श्रीशांत ने टाकलेला स्पेल... ज्यात जॅक कॅलिस सारखा फलंदाज बाउंसर वर आउट झालेला.. किमान अर्धा एक फुट हवेत उडी होती कॅलिस ची तो बॉल खेळण्यासाठी... ग्लोज ला लागुन पॉईंट कडे गेलेला बॉल आणि कॅच झाला.........
मस्तच रे. ह्यात अगदी उलट फिट
मस्तच रे. ह्यात अगदी उलट फिट होणारा 'स्टेन विरुद्ध तेंडूलकर' हा उल्लेख हवाच रे. That was exihibition of highest class of fast balling and Sachin offered best way to negotiate it.
वकारचे down under triangular series मधले toe crushing yorker वाले spell पण ह्यात चपखल बसले असते. त्यांचे video मिळतात का बघायला हवे.
गम्मतीची गोष्ट म्हणजे ह्यात मार्शलचा एकही स्पेल नाही. केवळ त्यावरून तो केव्हढा दादा माणूस होता हे लक्षात येईल.
मस्त॑ मस्त मस्त! आत्ताच काही
मस्त॑ मस्त मस्त!
आत्ताच काही वेळापूर्वी इशांतचा मोईन अलीची खल्लास भंबेरी उडवणारा बाउंसर पाहिला आणि तुझा हा लेख वाचला!
प्रत्येक विकेट बरोबर त्या मॅचचा एंड रिझल्ट काय लागला यावरही थोडे लिहिलेस तर मजा येईल.
क्या बात है फारएण्ड!!! संदीप
क्या बात है फारएण्ड!!!
संदीप पाटील, गांगुली, अझहर आणी गावसकर च्या बाबतीतले किस्से जर माहीत असतील तर ते ही शेअर कराल का? तुमच्या खास शैलीत वाचायला आवडतील.
सर्व क्लिप्स पहिल्या. क्लिप्स
सर्व क्लिप्स पहिल्या. क्लिप्स चपखल आणि लेखही खूप मनापासून लिहिलेला आहे. क्रिकेटवरील जुने व खोल प्रेम लेखात प्रकर्षाने दिसून आले.
हा दुसरा प्रतिसाद त्या 'डिवचल्यानंतर चांगले खेळण्याबाबत':
आपल्या खेळाडूंनी डिवचल्यानंतर एकदम पेटून वगैरे उठून घणाघाती हल्ला करणे हा प्रकार पटत नाही. हे म्हणजे ठरवून खेळल्यासारखे झाले. 'मी हा असा असा खेळणार, पण माझ्या नादाला लागलात तर मात्र मी पत्रास ठेवणार नाही' ही वृत्ती व्यावसायिकही नाही आणि देशप्रेमाने भारलेलीही!
'विशेष टीप - ह्या लेखात ह्या गोष्टीचा उल्लेख झाला म्हणून हे मत लिहिले असे नसून हे मलाही अनेक सामने बघताना अनेकदा दिसलेले होते.'
तेंडुलकर डिवचल्यासारखा एकदा झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता. गावसकरने मार्शल वगैरे तोफखान्यासमोर नव्वद चेंडूत की काही शतक केले होते त्या आधी त्याच्यावर एक दिवसीय सामन्यासाठी तो फिट नसल्याची टीका झाली होती. रवी शास्त्रीही असाच 'वैयक्तीक पातळीवर' गोष्टी नेणारा! अपवाद, अपवाद म्हणण्यापेक्षा असे नसलेलेही खेळाडू चिक्कार होते. कपिलदेव, वेंगसरकरसारखे! तसेच द्रविडसारखे! आजकाल सुदैवाने हा प्रकार जवळपास दिसत नाही. कोहली, रैना, युवराज व समकालीन / नव्या खेळाडूंना डिवचावे वगैरे लागत नाही.
ह्या प्रतिसादावर प्रतिसाद दिल्याने चर्चा भरकटेल असे वाटत असल्यास आधीच माफी मागतो. पण ह्या संपूर्ण लेखातील तो उतारा मला खूप महत्वाचा वाटला म्हणून मनमोकळेपणाने लिहिले.
गम्मतीची गोष्ट म्हणजे ह्यात
गम्मतीची गोष्ट म्हणजे ह्यात मार्शलचा एकही स्पेल नाही. केवळ त्यावरून तो केव्हढा दादा माणूस होता हे लक्षात येईल.<<<
हे विधान आवडले, पण काही अंशी पटले नाही. दूरान्तांनी समाविष्ट केलेल्या क्लिप्स त्यांना समाविष्ट कराव्याश्या वाटल्या त्या आहेत आणि (मनावर कोरला गेलेला आणि) मध्यंतरी गावसकरने कपिल शर्माच्या शो वर सांगितलेला किस्सा मार्शल किती भयानक होता आणि त्याचा तो स्पेल ह्या लेखात का हवा होता हे सांगणारा आहे. तो स्पेल टीव्हीवर पाहताना संताप संताप होत होता.
गावसकरने चौथ्या क्रमांकावर येण्याचा निर्णय घेतला. (टेस्ट मॅच)! ओपनिंग बोलर माल्कम मार्शल! सामना भारता चाललेला! पहिल्या(च) दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद! तिसरा चेंडू खेळायला गावसकर मैदानात! तो बाद वगैरे झाला नाही, पण त्याने सांगितलेला किस्सा असा की षटक संपल्यावर व्हिव्हियन रिचर्ड्स त्याच्याजवळून जाताना पुटपुटला की 'नो मॅटर अॅट व्हॉट नंबर यू प्ले, द स्कोअर इज स्टिल झिरो'!
असे अनेक स्पेल्स मनावर कोरले गेलेले आहेत. इम्रान, अक्रम, होल्डिंग, मॅकग्राथ, ग्रॅहम डिली, कपिलदेव इत्यादींचे!
सारांश - ह्या लेखात क्लिप नसणे हे दादा द्रूतगती गोलंदाज असण्याचे लक्षण असणे काहीसे पटले नाही.
ओ माय गूडनेस .. अनप्लेयेबल
ओ माय गूडनेस .. अनप्लेयेबल कपिल.. फार मजा आली ते तीन बॉल बघायला .. ज्या बॉलला विकेट नाही आली तो तर निव्वळ अप्रतिम होता..... मस्त फारेंडदा मस्तच थॅंक्स फॉर शेअरींग , अन्यथा माझ्या पिढीले लाईव्ह कपिल पाहिला तो रडतखडत खेळणारा ..
"तेंडुलकर डिवचल्यासारखा एकदा
"तेंडुलकर डिवचल्यासारखा एकदा झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता." - हेन्री ओलोंगा ला मार मार मारला होता. पण तो तसाही आक्रमक खेळाडू होता आणी नेहेमीच आक्रमक खेळायचा. त्यामूळे ते असं drastically contrary नाही वाटलं. तसंही क्वचित पेटून प्रतिसाद देणं हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. द्रविड तर वेगळच रसायन आहे. थोडसं अ-भारतीय म्हणावं ईतका प्रोफेशनल खेळाडू होता तो (चोख परफॉर्मन्स, accountability वगैरे). शास्त्री कधीच आवडला नसल्यामुळे प्रश्नच येत नाही. तो हल्ली सुद्धा कॉमेंट्री करताना एक्स्पर्ट मतं वगैरे द्यायला लागला की त्याचेच दाखले त्यालाच द्यावेत (ओपनिंग ला येऊन ३५ बॉल ५ धावा वगैरे) असं वाटतं. कोहली ईमोशनल आहे, पण रहाणे, पुजारा, भुवनेश मला थोडे द्रविड कॅटेगरीत वाटतात (आपलं काम खेळणं आहे).
असो. भरकटण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
>>>थोडसं अ-भारतीय म्हणावं
>>>थोडसं अ-भारतीय म्हणावं ईतका प्रोफेशनल खेळाडू होता तो <<<
तुमचे म्हणणे माझ्या म्हणण्याला पुष्टी देत आहे असे वाटविणारा प्रतिसाद!
>>>शास्त्री कधीच आवडला नसल्यामुळे प्रश्नच येत नाही. तो हल्ली सुद्धा कॉमेंट्री करताना एक्स्पर्ट मतं वगैरे द्यायला लागला की त्याचेच दाखले त्यालाच द्यावेत (ओपनिंग ला येऊन ३५ बॉल ५ धावा वगैरे) असं वाटतं. <<<
पूर्ण अनुमोदन!
>>>कोहली ईमोशनल आहे<<<
भावनिक असला तरी चांगले खेळायला त्याला भावनिक करावे(च) लागते असे वाटत नाही.
छानच लेख. विविध चॅनेल्सवर
छानच लेख.
विविध चॅनेल्सवर सुकाळ झाला नसताना आणि नेट तर अजिबातच हाताशी नसताना केवळ स्मरणाच्या आणि वर्षानुवर्षे जमवलेल्या कात्रणांच्या आधारावर आम्ही भाऊ तासन तास हिरीरीने चर्चा करत असू, त्याची आठवण झाली. मे महिना, आंबे खाऊन जड शरीर आणि उकाड्यातही सुखावायला वाहणारी समुद्रावरची हवा या मिश्रणात अंगणात सतरंज्या टाकून उशीरापर्यंत गप्पा चालत.
यात बोलरचे डावपेचात्मक यश म्हणून नव्हे पण डिवचले गेल्यावर उसळून उठणे म्हणून १९९६ विश्वकपातील वेंकटेश प्रसाद वि. आमीर सोहेल हे द्वन्द्व आठवले. सोहेल व अन्वरने सुरुवातीच्या षटकांत भारतीय गोलंदाजीच्या चिन्ध्या करायला सुरुवात केली होती पण अतिआत्मविश्वास आणि माजोरीपणा सोहेलला नडला. डिवचले गेल्यावरही विचलित न होता प्रसादने पुढचा चेंडू लेंग्थवर कटर टाकला. त्रिफळा उडाल्यावर सगळे हॉस्टेल ओरडत बाहेर आले होते.
रिचर्ड्स वि. लिली ही क्लिप जिलेट कप या तेव्हाच्या ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय स्पर्धेतील आहे ना? त्या परिच्छेदातील वर्णनावरुन विंडिज वि. ऑस्ट्रेलिया सीरीजबद्दल बोलताय असे वाटले. चु. भू. ..वगैरे
अझहरभाईजानचे पाच चौके लाइव्ह
अझहरभाईजानचे पाच चौके लाइव्ह पाहिले होते. त्यानंतर ते आज बघतोय. तितकीच मजा आली. ती इनिंगच सरस होती. मॅचफिक्सिंग प्रकरण आणि दादा गांगुलीच्या उदयाआधी, सचिनंतरचा आपला आवडता खेळाडू अझरमिया ..
लेखातला दादाचा उल्लेखही आवडला. आजही नेत्रसुखद फटकेबाजी म्हटली की आपला दादाच. आणि जो बाऊंसर त्याचा वीकपॉईंट तोच जर तो कवर सोडून सरसावला तर थेट सीमारेषेच्या पार.. अगदी अगदी ..
भारतीय संघाच्या लॉर्डसवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर दिवस बनला आजचा या लेखाने !
कोणीतरी इशांत शर्माच्या आजच्या विकेटची क्लिप शोधून एक आठवण म्हणून इथे टाका रे ..
बेफिकीर, अनुमोदन! तुम्हाला
बेफिकीर, अनुमोदन! तुम्हाला सहमती (दोन्ही प्रतिसादातून). कोहली खेळला पाहीजे आता. he is too good a player to be out of form for so long. कुणीतरी त्याला (अनुश्का) 'शर्मा'ना छोड डाल सांगायची वेळ यायच्या आत थोडे रन्स यावेत.
अमेयः खरय तुमचं म्हणणं. सोहेल - प्रसाद क्लिप कितीतरी वेळा परत पाहिलीये.. मस्त. ..... एक सदाशिव पेठी खवचटपणा करायचाच झाला (नाईलाज....पेठेचा गुण), तर ईतकाच की प्रसाद कटर्स सोडून दुसरं फारसं काही टाकायचाच नाही... सोहेल जरा जोषमें होश घालवून तो शॉट खेळला आणी आऊट झाला. तसंही प्रसाद लेगकटर च टाकणार होता.
संदीप पाटीलने बॉब विलीसला सलग
संदीप पाटीलने बॉब विलीसला सलग सहा चौकार एकाच षटकात मारले होते. नंतर त्याला वाटू लागले की गावसकरची स्तुती केली आणि रवी शास्त्रीला मुजरा घातला की संघातील स्थान पक्के होते. त्यामुळे त्याच्या 'षटकार'मध्ये तो केवळ तेवढेच छापू लागला. तेव्हाही ते वाचताना राग यायचा. तेव्हाचे आपले लोक इतर देशात गेले की अनेकदा अयशस्वी ठरायचे. अपवाद पाकिस्तान, तेथे नुसतेच ते अपयशी ठरायचे नाहीत तर पाकिस्तानी अंपायर्स त्यांना ठरवायचेही! तेव्हा मजेने म्हंटले जायचे, भारताचे अकरा खेळाडू विरुद्ध पाकिस्तानचा इम्रान खान आणि दोन अंपायर्स असा सामना चालू आहे.
"गावसकरची स्तुती केली आणि रवी
"गावसकरची स्तुती केली आणि रवी शास्त्रीला मुजरा" - हे स्थान सध्या धोनी चं आहे. ६ वर्षं, ५६ कसोटी खेळल्यावर आणी दुसर्यांदा ईंग्लंड दौर्यावर गेल्यावर सुद्धा जर ईशांत शर्माला धोनी ने हे सांगावं लागत असेल की तू ऊंच आहेस, बाऊन्सर्स टाक, तर कठीण आहे. आणी हे सांगितल्यामुळे पडलेल्या विकेट्स माझ्या नसून धोनीच्या आहेत (श्रेय) हे म्हणणं मला तरी श्रेय देण्यापेक्षा लांगूलचालन केल्यासारखं वाटलं
हे विधान आवडले, पण काही अंशी
हे विधान आवडले, पण काही अंशी पटले नाही. दूरान्तांनी समाविष्ट केलेल्या क्लिप्स त्यांना समाविष्ट कराव्याश्या वाटल्या त्या आहेत >> अमोलने ही जी exercise केली आहे ती मागे क्रिकेटच्या बाफावर चर्चिली गेली होती त्यावेळीही मार्शलचा असा स्पेल सहजपणे हाताळलेला उल्लेख कोणाला आठवलेला नव्हता त्या संदर्भात मी हे विधान केले होते, फक्त ह्या लेखाला उद्देशून नाही. अर्थात मार्शल ऐन भरात होता तेंव्हा मी फारच लहान होतो नि पेपर वगळता भारताच्या क्रिकेट मॅचेस वगळता लाईव्ह बघणे सहज शक्य नव्हते त्यामूळे काही ग्रेट मुकाबले मिस झाले नसतील, नाही असेही नाही. पण यु ट्युबवर शोधाशोध केल्यावर काही सापडले नव्हते नि क्रिकईंफो च्या मार्शलला उद्देशून केलेल्या फीचर पीसमधे बर्याच जणांनी जे म्हटले होते त्याचा हा after effect असावा.
तो स्पेल टीव्हीवर पाहताना संताप संताप होत होता. >> हे वाक्य कळले नाही, संताप का होत होता ?
हे वाक्य कळले नाही, संताप का
हे वाक्य कळले नाही, संताप का होत होता ?<<<
सामना भारतात!
गावसकरने चौथा क्रमांक स्वतःसाठी निवडणे!
पहिला व तिसरा फलंदाज एकाच पद्धतीने (स्लिपमध्ये किंवा कीपरने कॅच घेणे) बाद होणे!
टेस्ट मॅच हे क्रिकेटचे व्हर्जन तेव्हा 'सबकुछ' असणे! (आजकाल आपण टेस्ट मॅच काय, वन डे हारलो तरी काही वाटत नाही)
दिग्गज फलंदाजांनी निव्वळ पहिल्या दोनच चेंडूंवर हाराकिरी करणे!
(बहुधा तीन क्रमांकावर आलेला मोहिंदर होता)
अच्छा म्हणजे भारतीय संघाने
अच्छा म्हणजे भारतीय संघाने संताप केला होता तुमचा. मला वाटले कि रिचर्डस नि मार्शलशी काही संबंध आहे म्हणून प्रश्न.
धन्यवाद लोकहो. यातील क्लिप्स
धन्यवाद लोकहो. यातील क्लिप्स ही केवळ उदाहरणे आहेत - वेब वर फिरताना मला सापडलेली. इतर नक्कीच आहेत अशीच. यात अनेक मिसिंग असणारच आहेत. तुम्हीही द्या. उदयन - श्रीशांतचे उदाहरण जबरी आहे. मी ते घ्यायचा विचार करत होतो. अजून लिहीतो त्याबद्दल.
बेफिकीर - तुमचा वैयक्तिक डिवचण्याबाबतचा मुद्दा रास्त आहे. पण थोड्या वेळाने सविस्तर लिहीतो त्यावर माझे मत.
कपिलला परत बघताना खुप मजा
कपिलला परत बघताना खुप मजा आली. धन्यवाद अमोल. खुपच लवकर संपवला लेख.
होल्डिंगच्या रन अप बाबतचा
होल्डिंगच्या रन अप बाबतचा उल्लेख फार आवडला. खरंच तरंगल्यासारखा आहे.
एकेकाचे रन अप्स म्हणजे जणू नृत्यच!
होल्डिंग - अलगद, तरंगल्यासारखा
माल्कम मार्शल - तिरकस, भेदक
इम्रान खान - भंबेरी उडवणारा, लयबद्ध, पाठीचे स्नायू अत्यंत सिमेट्रिकली हालतील असा, हँडसम!
गार्नर - उंचीमुळे राक्षसी
कपिलदेव - हार्मोनियमवर सरगम वाजवल्यासारखा, शेवटची उडी आजतागायत कोणीही मारलेली नाही
मोहिंदर (फास्ट बोलर नव्हे, पण तरीही) - 'अरे, बॉल टाकण्याचे कॅन्सल केले काय अंपायरपर्यंत पोचताना'?
सिकंदर बख्त आणि बॉब विलीस - हे लांबलचक
जबरी फारेंडा..
जबरी फारेंडा..
मस्त रे फारेंडा... वकार
मस्त रे फारेंडा... वकार युनुसचे पण नाव यायला पाहिजे होतं
क्या ब्बात फारेण्डा !! सही
क्या ब्बात फारेण्डा !!
सही क्लिप्स !
कपिलची क्लिप भन्नाटच!
कपिलची क्लिप भन्नाटच! त्यावेळी जर आत्तासारखे कॅमेरे आनि टेक्नॉलॉजी असती तर ह्या क्लिप्स बघायला अजुन मजा आली असती...
मस्त रे फारेंडा. >>ते 'जागतिक
मस्त रे फारेंडा.
>>ते 'जागतिक वर्चस्वाची मुळे" वगैरे लिहीताना शाळेच्या इतिहासातील "दुसर्या महायुद्धाची मुळे व्हर्सायच्या तहात..." वगैरे आठवत होते. त्याचे कारण म्हणजे फास्ट बोलर्स चे महत्त्व क्लाइव्ह लॉईड ने येथे ओळखले व यानंतर लगेच स्वतःच्या टीम मधे त्याला प्राधान्य दिले.
>>>
हे मी वेस्ट इंडिज - भारत ७२च्या सिरीजनंतर लॉइडने वेगवान गोलंदाजच टीममध्ये ठेवायचे असे ठरवले असे वाचल्याचे आठवते. दिलीप सरदेसाई शेवटची सिरीज आणि गावस्कर पहिली सिरीज - भारत वेस्टइंडिजमध्ये जिंकला.
बर्याच लेखात थॉमसन हा आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज होता असे वाचले आहे, त्याच्या विरुद्ध खेळलेले अनेक जण लिहितात की तो सर्वात वेगवान गोलंदाज होता. असे असले तरी ऑल टाइम ग्रेट्स मध्ये थॉमसनचा का उल्लेख येत नाही.
ऑल टाइम फास्ट बोलर्समध्ये नेहेमी मार्शल, होल्डिंग, लिली, विलीस, फ्रेड ट्रुमन, इम्रान, हॅडली, डोनाल्ड, अक्रम, वकार, स्टेन यांचा उल्लेख असतो. कपिल, मॅग्रा हे त्यांच्या स्किलमुळे आत येतात पण ते फक्त वेगावर जगणारे गोलंदाज नव्हते. की थॉमसन हा त्या काळचा अख्तर होता?
हे मी वेस्ट इंडिज - भारत
हे मी वेस्ट इंडिज - भारत ७२च्या सिरीजनंतर लॉइडने वेगवान गोलंदाजच टीममध्ये ठेवायचे >> मला वाटते austrailia च्या ४-० किंवा ५-० series नंतर लॉईड ने हे ठरवले होते.
की थॉमसन हा त्या काळचा अख्तर होता? >> नाही. "थॉमसन हा आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज होता" त्या वेळचा नक्की होता. टायसन पण तेव्हढाच फास्ट होता असे त्या वेळचे लोक म्हणतात. स्पीड मोजायची टेक्निक वेगळी असल्यामूळे मला नाहि वाटत कालनिरपेक्ष तुलना करता येईल. त्याला फेस करणार्या बर्याच जणांनी तो त्यांनी फेस केलेला सर्वात फस्त बॉलर होता असे म्हटलय हेही खरय मात्र. all Time Great मधे त्याचे नाव नेहमी दिसत नाही ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा slinging action मूळे तो प्रचंड injury prone होता. consistently फार कमी वेळा सलग खेळू शकला. जेंव्हा तो फिट होता तेंव्हा लिली बरोबरची त्याची जोडी थरकाप उडवणारी होती असे आयडॉल्स मधे वाचल्याचे आठवते. तुला पटकन लक्षात येईल असे उदाहरण द्यायचे तर शेन बाँड आठव. He was considered as one of the best fast baller ever produced. पण तोही दुखापतींमूळे सलग खेळू शकला नाही नि त्यामूळे त्याचे नाव उल्लेखनीय मधेच राहते. तसेच थाँमसन चे झाले. दुसरी गोष्ट मला आठवते त्याप्रमाणे तो अगदी शेवटी पाकिस्तान वगळता sub continents मधे खेळला नाही त्यामूळे ते एक प्रश्नचिन्ह राहिलेच.
All Time Great वगैरे ला काही अर्थ नाहि खर तर. आधी विकेट्स cover केल्या जात नसत नि त्याचा फायदा बॉलर्स ना अधिक होत असे. हेल्मेट नि गार्डस असल्यामूळे नि नसल्यामूळे किती फरक पडला हे उघड आहे. ह्या उलट आजच्या बॉलर्स वर असणारा work load नि त्यांचे बारकावे टिपून त्याचा feedback batsman ना देणारी system हा प्रकार आहेच. तस्मात वेगळ्या काळातील बॉलर्स एकमेकांशी compare करणे हा फक्त मोकळ्या वेळाचा चाळा आहे नि त्यात काही अर्थ नाही.
जगप्रसिध्द............
जगप्रसिध्द............
Pages