लगानच्या "काले मेघा काले मेघा पानी तो बरसा दो..." या गाण्याची प्रचिती सध्या सगळ्यांनाच येत आहे.पण इथे ढग काळे असण्याऐवजी सफेद रंगाचे जमा झाले आहेत.गेल्या वर्षी अशीच स्थिती होती आणि त्याच्याही गेल्यावेळी पाऊस जुलैपर्यंत फरपटत गेला.आता पावसाची तेही मान्सूनसारख्या,ही गत का झाली? कोणी म्हणाले जागतिक तापमान वाढ,कुणी म्हणते प्रदुषण,कुणी जंगलतोड आणखी बरेच काही.माबोवरपण चर्चा झाली,बाहेरही बघितले पण याविषयावर गुरुवर्य डॉ.माधव गाडगीळांचा लेखपण आला,तरीही लोकांना पाऊस रुसला असेच वाटले. त्यासाठी जुजबी माहीतीचा हा लेख इथल्या वाचकांसाठी.या पावसामागची खरी गोम कळण्यासाठी आपल्याला दोन महत्वाच्या ठिकाणी जावं लागणार आहे.त्यातलं पहिलं ठिकाण तुम्ही दक्षिण अमेरीकेच्या पेरु,चिले किनारपट्टीचा भाग निवडू शकता आणि दुसरा भाग विषुववृत्तीय प्रशांत महासागर.
तिथे जाण्याआधी नेहमीप्रमाणे थोडासा-गृहपाठ.आपण आधी भौगोलिक स्थान बघूयात.इंडोनेशियाचा वरचा भाग(जाकार्ता आसपासचा प्रदेश),दक्षिण ऑस्ट्रेलियाचा (डार्विन) किनारा,भारताचा दक्षिण-पूर्व किनारा आणि मध्य अमेरीकेचा खालील पश्चिम भाग् आणि द.अमेरीकेचा पश्चिम किनारा या दोन्ही च्या मध्ये जो प्रशांत महासागराचा भाग येईल त्याला म्हणतात विषुववृत्तीय प्रशान्त महासागर(Tropical Pacific).आपल्याला भारताच्या चेन्नईतून प्रवासाचा ओनामा करुन याच विषुववृत्तीय प्रशांतातून(वि.प्र.) मार्गक्रमणा करीत माचू-पिचू किंवा सायलेंट व्हॅलीला थोडी वर्ष राहून परत भारतात परतायचं आहे.
भारतात विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला गिल्बर्ट वॉकर नावाचा 'साहेब' केंब्रिज मधून गणितविद्या शिकून भारतात १९०२-०३ च्या दरम्यान खगोलनिरीक्षणासाठी आलेला.त्यांना भारतात मान्सूनमध्ये बदल दिसले तेव्हा ठराविक काळाने येणारी दुष्काळी स्थिती पाहून मागच्या-पुढच्या वर्षांच्या पावसाशी संबंधीत नोंदी ठेवायला त्यांनी चालू केले.तेव्हा त्यांना इंडोनेशियाच्या वरचा प्रशांतसागरी भाग आणि भारताबाजूला घुसलेला बंगालच्या सागरातला प्रशांतचा भाग यात काही ताळेबंद हालचालींचा प्रकार सापडला जो वार्याच्या आणि समुद्राच्या तापमानाशी जोडला गेला होता.यालाच नाव दिलं गेलं 'वॉकर जलाभिसरण.(वॉकर सर्क्यूलेशन). यातच एक अभ्यासनिरीक्षण म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनार्यावरती(व समुद्रभागात) जास्त दाबाचे पट्टे तयात होतात तेव्हा भारतात पाऊस नगण्य असतो.
पुढे हिंदी महासागर्,बंगालचा उपसागर आणि विष.प्रशांत यांचा अभ्यास रोलंड मॅडन आणि पॉल ज्युलियन या तर्कटशास्त्री द्वयीने केला,त्यावरुन ३०-६० दिवसांचा एक झोका सापडला.त्याला नाव पडलं मॅडन-ज्युलियन दोलन याच 'वॉकर भिसरणा'चा आणि ३०-६० दिवसांच्या 'मॅ-ज्यु' दोलनांचा एकत्रित परीणाम म्हणून एक मोठे दोलन झाले होते,तिच ही दोन भावंडं जी भारतात पाऊस पाडण्यासाठी आणि दुष्काळ आणण्यासाठी निर्माण झाली.त्यातला ख्रिस्ती गोंडस मुलगा म्हणजे 'अल-निनो' आणि मुलगी म्हणजे 'ला-नीना'.नावाच्या उगमाबद्दल आणि त्यांना लावण्याबद्दल जरा वादच आहेत्,जसे वडलांना एक नाव आवडते आणि आईला वेगळे तसेच.असा निनॉ म्ह्णजे 'ख्रिस्ती छोटा मुलगा' तर नीना म्हणजे 'मुलगी'.
जे वारे उत्तर-द्क्षिण गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहत असतात,तेच वारे पृथ्विच्या परीवलनामुळे उत्तर गोलार्धातून दक्षिणेकडे वाहातात.हे व्यापारी वारे.व्यापारी वार्यांना मध्येच विषु.प्रशांताला पार करावा लागतो.असे येत असता वाटेत त्यांना तप्त प्रशांत सागर भेटतो.पण...असा पण इथेही आडवा येतो बरं.इथे समुद्राचा वरचा थर(Open Surface) आणि खालचा थर(Sub-Surface) तयार होतात.खालचा थर थंड तर वरचा गरम होतो.ही सायकल सतत होऊन गरम प्रवाह वरचढ(Dominant) होतात.ही झाली पायाभूत माहिती.
ला नीनाचे नृत्य -
व्यापारी वारे,वातावरणीय तापमान आणि समुद्राचा वरचा थर एकमेकांना भिडला की या अल-निनो दख्खनी दोलनाला(ENSO) सुरुवात होते.आता आपण पेरुवियन फिल्डमध्ये पोहोचलो आहोत असे समजू.या समुद्रात थंड पाण्याचा प्रवाह असतो.हा थंड पाण्याचा प्रवाह द.अमेरीकेच्या भागाकडे वाढू लागतो.हळूहळू एवढा तीव्र होतो की उष्ण पाणी भारत्,डार्विन(ऑस्ट्रेलिया) आणि इंडोनेशीयाच्या बाजूला जमा होतं.अर्थातच,वारे उष्णतेकडे धावतात.व्यापारी वार्यांत सोबत बाष्प असतं.परीणामी पाऊस भारताकडे सरकतो आणि द.अमेरीका,मध्य अमेरीका थंडीनं गुरफटून जातात.आता अशा वेळी द.अमेरीका किनार्याचे पाणी थंडाव्यामुळे खनिज आणि जीवसंपत्तीला अनुकूल होते आणि मोठ्या प्रमाणात पौष्टीक अन्नघटक पाण्यात वाढीला लागतात.परीणाम,उत्कृष्ट आणि मुबलक मासळी पैदास होण्याला पोषक वातावरण तयार होते.तुम्हाला पौष्टीक,चविष्ट आणि वैविध्यपूर्ण सीफुड खायचं असेल तर या दिवसात पेरु,द.अमेरीकेला भेट द्यायलाच हवी.मासे,बाकीचे जलचर आणि शैवालांचे प्रकार वाढल्याने पक्ष्यांची संख्या वाढते आणि मासळी,इतर समुद्री खाद्य्,पक्ष्यांची विष्ठा,पर्यटन या सगळ्याची भर पेरू,चिली व तत्सम द.अमेरीकी अर्थव्यवस्थातेमध्ये पडते.ENSO च्या या फेजला नाव आहे 'ला नीना' फेज. (आकृती-पहा)
२००० सालचा ला नीना-
नासाने जेसन नावाचे दोन उपग्रह आकाशात स्थिर केले आहेत.यांच्या कामांपैकी,एक काम आहे समुद्राची पाणी पातळी सतत मोजणे.जेव्हा पाणी उष्ण होते,त्या वरची हवा विरळ होते.अर्था अशा ठिकाणी हवेची पोकळी तयार होते.त्यावेळी नवी हवा ती जागा घेण्यासाठी जास्त दाबाकडून वाहात असते.जेव्हा उष्णतेने समुद्र भागावरची हवा विरळ होते,त्यावेळी तिथला जलभाग वर उचलला जातो,तर जिथे हवेचा दाब अधिक तिथला जलभाग खाली दबला जातो.जेसन उपग्रहांचं काम आहे की या वर खाली होणार्या पातळ्यांची उंची(अँप्लीट्यूड) मोजणे.जेव्हा उंची जास्त तो भाग तापलेला असतो.अर्थात उष्णतेकडे वारा वाहातो म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त.हा भाग इन्फ्रारेड मध्ये लाल रंगाने दाखवला जातो.तसाच जिथे कमी तापमान तिथे कमी पाऊस.म्हणजे जास्त हवेचा दाब्,त्या दाबमुळे समुद्राचा पृष्ठभाग खाली दबतो.जसे समजा आपण पाण्यात फुंकर मारली तर तिथला पाण्याचा भाग दबतो तर आजूबाजूचा वर उचलला जातो,तसेच.
वरील् आणि खाली दिलेल्या उपग्रह चित्रात निळा रंग कमी पाऊस वा थंड भाग दर्शवित आहे.तर लाल रंग उष्ण भाग वा जास्त पाऊस दर्शवित आहे.तर व्यापारी वारे वेगाने भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे वाहातात.
वरच्या चित्रात उजव्या बाजूला मध्य अमेरीका आणी द.अमेरीकेचा पश्चिम किनारा आहे.तर डाव्या बाजूला भारत्,इंडोनेशीया.जर ला-नीना पाहीला तर निळा भाग उजव्या बाजूला आहे म्हणजे समुद्रातले थंड प्रवाह वाढलेले दिसतात.तर भारताच्या बाजूला लाल रंग म्हणजे उष्ण भाग दाखवला आहे.
एल निनोचे (छोट्या मुलाचे) बालीश हट्ट-
अशीच चार ते सहा वर्ष निघून जातात आणि द.म.अमेरीकेचे नागरीक अस्वस्थ होऊ लागतात.एखादा नको असणारा पाहुणा यावा आणि 'अतिथी तुम कब जाओगे' म्हणण्याची वेळ येणार असेल तर काय करतील बिचारे? तर समुद्रामध्ये गरम पाण्याचे प्रवाह वाढतात.जसे वर सांगितले ते दोन भाग समुद्राचा पृष्ठभाग आणि त्या खालचा प्रापनधर्माने ( कन्वेक्शन) तापमान बदलतात.अगदी सौरजल तापकाप्रमाणे थंड पाणी गरम पाण्याची जागा घेत तापते तसेच.अशा रीतीने सर्व वि.प्र. तापून पाणी द.अमेरीकेकडे सरकू लागते.थंड पाण्यावर हे उष्ण पाणी वरचढ ठरते.वारा गरम भागाचा पाठलाग करतो या नियमाने,व्यापारी वारे द.अमेरीकेच्या किनार्यावर भयानक पाऊस वादळे देतात.सगळा समुद्र ढवळून निघतो.समुद्रसृष्टी,पक्षी प्राणी स्थलांतरीत होतात. आता आपण भारताकडे निघालेलो आहोत,अगदी जसे इतर जीव ती जागा सोडतात तसे आपणही चिली/पेरू देशांचा भरपूर आस्वाद घेऊन या एल नीनोपासून दूर निघालो आहोत.पण हाय रे..! तो भारतातही पाठ सोडेल तर हट्टी मुलगा कसला??आपण भारतात पोहोचतो आणि लक्ष्यात येतं याने 'पाऊसच नेलाय'! या बच्चमजींनी पाऊस तर नेलेला असतोच पण वणवे, युद्धं अशा भेटी पाठवून देतो.तर हा एल नीनो.(आकृती-पहा)
१९९७ चा सुपर एल नीनो
इथे ला-नीनाच्या विरूद्ध स्थिती आहे.अगदी उलटे.पाऊस उजवीकडे म्हणजे द.अमेरीकेमध्ये जास्त तर डाव्या बाजूला नगण्या आहे.मोठ्या प्रमाणात पसरलेले दोन्ही रंग त्यात्या प्रकारची ताकद दर्शवितात.१९९७ ला आलेला हा सर्वात मोठा निनो होता.व्यापारी वारे वेगाने उत्तर अमेरीकेवरून येऊन द.अमेरीकेकडे वाहतायत.
भारतात एल नीनोवेळी का नसतो पाऊस?-
जेव्हा बाष्प युक्त नैऋत्य मान्सून वारे भारतीय भूप्रदेशाकडे वाहतात,त्यावेळी एक प्रवाह नैऋत्येकडून (अंदमान कडून) वाहतो तर दुसरा आग्नेयकडून(बंगालचा उपसागर) जातो.हा जो गोंडस मुलगा आहे(अल नीनो) तो काय करतो-एक तर वरचे(उत्तर अमेरीकेवरून ) बाष्पयुक्त व्यापारी वारे ओढून घेतोच पण इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलीयाच्या च्या भागात झालेले खुले वातावरण मान्सूनचे आग्नेय बाजूचे (बंगालच्या उपसागराकडचे) बाष्प आणि काही मूळ बाष्प ओढून घेते.त्यामूळे नैऋत्य मान्सून आग्नेय भागाकडे सरकतो.म्हणजे अंदमानवरुन येणारा नेहमीचा मान्सून बंगालच्या उपसागराकडून चीनला जातो आणि चीन मध्ये पूरस्थिती आणवतो.(आत्ता चीन मध्ये पूर आला होता/आहे)आता राहीले उरलेले नैऋत्य कोरडे/बाष्पाविनाच वारे वर तसेच आपल्याकडे वाहाते.जे आता वाहत आहे.
जेव्हा 'एल निनो' भारतात,ऑस्ट्रेलीयात दुष्काळ आणि वणव्यांची स्थिती वाढवतो,त्याचवेळी द.अमेरीकेला पाऊस आणि भरपूर समुद्रजीवांची रेलचेल करतो.तर छोटी मुलगी किंवा ला नीना येते तेव्हा भारतात भरपूर पाऊस(लाइक मुंबई २६ जुलै) आणि द.अमेरीकेला प्रचंड बोचरी थंडी देतात.हेच वारे पुढे वर अमेरीकेत पोहचून ख्रिसमस जाम बर्फमय करतात.
आता जेव्हा वरच्या मॅडन-ज्युलियन(माधव ज्युलियन वाचाल) दोलनामुळे जूनला ओढ लागते तर जुलै परत वारे वाहू लागतात.साधारण साठ दिवसाचे दोलन जुलै आणि ऑगस्टमध्ये बरा पाऊस देते.जर नीनो ताकादीचा नसेल तर आणि तरच! जर हे मॅ-ज्यॉ दोलन जागतीक तापमान वाढीमुळे वाढले तर नोव्हेंबरमध्ये पाऊस वाढतो.(सीझन एक्सटेंशन) गेल्या वर्षीची आणि त्या आधीची दिवाळी आपण पावसात साजरी केली होती,आठवत असेल.
एल् निनो मध्ये व्यापारी वार्यांचा वेग कमी होतो व त द.अमेरीकेकडे जास्त वाहतात.तेच ला नीनामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिअयाकडे वेगाने धावतात.
एल-नीनो आणि इतर परीस्थिती-
एल-नीनो मुळे बर्याचदा युद्ध परीस्थिती उद्भवते,हे खरे आहे. १९६५,१९७२ ची आपली भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धे याचीच साक्ष देतात.१९९७ च्या सुपर एल-नीनो नंतर १९९८ च्या डिसेंबरला कारगिलचे युद्ध उद्भवले.तसेच आत्ताचा एल नीनो हासुद्धा १९९७ ला तुलनात्मक सुपर एल नीनो मानला जाऊ लागलेला आहे.याचे परीणाम इराक जिहाद मध्ये आपल्याला दिसतात.आफ्रिकन देशांमध्ये झालेल्या प्रमुख दंगली,युद्धे हे सगळे एल-नीनो च्या प्रभावाखाली घडलेले दिसले आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी आणखी अभ्यास या दिशेने वळवला.मगाशी सहज डेटा बघत होतो.१९१४ साली एक एलनीनो आला आणि संपून १९१८ ला ला नीना सुरु झाली. १९३९ ला एक एल नीनो चालू झाला आणि १९४५ ला-नीना आली. आता तुम्हीच बघा याबाबत सनावळ्यांबाबत काही आठवतय का?
हो!१९१४ ला पहिलं महायुद्ध सुरु होऊन ला-नीना आली त्यावेळेलाच ते संपलं.तसेच्,१९३९ च्या एल-निनो वेळी हिटलरने डाव साधला आणि १९४५ ला ला-नीना फेजनंतर दुसर्या महायुद्धाला पूर्णविराम मिळाला.
एल नीनो भारतासाठी आणखी दोन महत्वाच्या वर्षांची आठवण करुन देतो.तो म्हणजे १९६५-६६ आणि १९७२.आता पन्नाशीच्या पुढे असणारे याबाबत व्यवस्थित सांगू शकतील.त्या वर्षातले दुष्काळ महाप्रचंड होते.लाल भाकर्या खाव्या लागल्या,जनावरे,जनता आणि निसर्ग सगळ्यावरच मोठा प्रतिकूल परीणाम झाला.त्यात आपण याच परीस्थितीत युद्धस्थितीही भोगली.
पण गंम्मत पहा,तो लहान मुलगा दंगा घालतो तर 'मुलगी' मात्र पाऊस आणते.
तर असा हा दोन गोंडस छोट्या बहीण-भावाचा खेळ सगळ्या जगाच्या मान्सूनला ताब्यात ठेवत असतो.तेव्हा पावसाला दोष देण्याऐवजी जर पाणी वाचवलत बरं होईल असंच सांगणं.निदान ती 'छोटी मुलगी' उगवेपर्यंत तरी!
खालील प्लेट्स बघा.
१)सध्याची परीस्थिती दर्शवणारा नकाशा.(el nino)
तशी ही स्थिती महिन्यापूर्वीची आहे.लाल रंग जास्त पाऊस व उष्णता दाखवत आहे.निळा रंग कमी पाउस.
२)जुलै २००६ चा एल नीनो शेवट.भारतात मुंबईला झालेला पाऊस(लाल)दिसतो आहे.
(लाल भाग=कमी दाब=जास्त प्रमाणात पाऊस=वाढलेली समुद्रपातळी,
निळा-जांभळा भाग्=जास्त दाब=कमी प्रमाणाचा पाऊस=खाली गेलेली समुद्रपातळी)
(समुद्रपातळीची उंची-फरक,मिमि मध्ये)
(आकृती संदर्भ-मुक्तस्रोत नासा हवामान विभाग,अमेरीका)
हवामान या विषयाला अनुसरुनच
हवामान या विषयाला अनुसरुनच प्रतिसाद अपेक्षित आहेत.आणि काय?
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतरांगांवर हजारो पवनचक्क्या उभ्या केल्याने राज्यातला पाऊस कमी झाला असावा असे मला वाटते.जिथे जिथे पठार आहे तिथे पवनचक्कीचे भरघोस पीक येतेय.
घाईत वर वर वाचले पण नवीन
घाईत वर वर वाचले पण नवीन माहिती आणी धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. वाहता नसला तर फार बरे. परत भेटुच.
काटकर,तुम्ही आपल्याच राज्याचा
काटकर,तुम्ही आपल्याच राज्याचा विचार करत आहात आणि लेख पृथ्विसाठी लिहीलाय.पाऊस आपल्याकडेच नाही तर आणखी बर्याच ठिकाणी पडतो हे लक्ष्यात घ्या.पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी होतो हे म्हणणे त्या वेळी काही पुढार्यांचा आर्थिक स्वार्थ म्हणून पसरवले होते.प्रत्यक्षात ३किमी उंचीवर असणारे पाणीदार ढग,त्यांच्यापुढे छोट्या पवनचक्क्यांमुळे अडतात हे चुकीचे होते शिवाय वारा अडवण्याचा संबंध कुठेही येत नाही हे कुणीही सांगेल.तेव्हा हा समज मनातून काढून टाकावा आणि जास्तीतजास्त पवनचक्क्या वापरण्याला प्रोत्साहन द्या.शिवाय आपल्या घरावरसुद्धा एक मिनीपवनचक्की बसवून घ्या लाईट देईल मस्त.वीजबील पण शुन्य.
रश्मी आणि डीविनिता आपल्यामुळे धागा सुरु करता आला. इब्लिसदा तुमच्यामुळेही.पण 'हवामानाचे रहाटगाडगे' असे नाव तुमच्या पुरते वाचा मात्र.
हवामान या विषयाला अनुसरुनच
हवामान या विषयाला अनुसरुनच प्रतिसाद अपेक्षित आहेत.आणि काय?>>
छ्या विदाभाउ माबोकरांकडुन भलत्याच अपेक्षा ठवताय आपण..
मोदी, काँग्रेस, बुप्रा, अंनिस, धर्म, वेद इ. इ. असल्याशिवाय कसं कळणार की माबोवरचा बाफ (विषय कोणता का असेना) वाचत आहोत ते
छान लेख पण लवकर संपला असं
छान लेख पण लवकर संपला असं वाटलं.. अजून वाचायला आवडेल.. धन्यवाद विदाभाऊ!
सुंदर लेख !! सर्वसाधारण
सुंदर लेख !!
सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी ह्या लेखाचा खूपच उपयोग होईल .
सुधा गोवारीकरांचे मान्सूनवर आपला पाऊस असेच काहीतरी पुस्तक आहे त्यात खूप व्यवस्थित आणि सविस्तर माहिती आहे .
.पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी
.पवनचक्क्यांमुळे पाऊस कमी होतो हे म्हणणे त्या वेळी काही पुढार्यांचा आर्थिक स्वार्थ म्हणून पसरवले होते.प्रत्यक्षात ३किमी उंचीवर असणारे पाणीदार ढग,त्यांच्यापुढे छोट्या पवनचक्क्यांमुळे अडतात हे चुकीचे होते >> हेच लिहिण्यासाठी येणार होतो... बाकी मी नंतर सावकाश लिहिल.....
अरे भावड्यांनो, पवनचक्क्या
अरे भावड्यांनो, पवनचक्क्या वार्यातली उर्जा काढुन घेतात व त्यामुळे एका स्तरातल्या वार्याचा वेग मंदावतो, त्यामुळे वरच्या थरांवर व विंण्ड डायनॅमिक्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
कशी काढुन घेतात ? कृपया
कशी काढुन घेतात ? कृपया स्पष्ट कराल ..... वार्यामुळे तर चक्की चालते.. .. जर पवन चक्क्या वार्याला अडथळे करत असतील तर झाडे देखील करतातच
वरील चित्रात कुठेच पावसाळा
वरील चित्रात कुठेच पावसाळा दिसत नाही... जपान वर वादळ घोंघावत आहे
प्रचि :- http://www.sat.dundee.ac.uk/ वरुन घेतलेली आहे
आपण जर केवळ भारताचाच विचार
आपण जर केवळ भारताचाच विचार केला तर भारतात पावसाचे प्रमाण प्रदेशानुसार बदलते .
गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार महासागर ( वा उपसमुद्र ) ह्यांचे तापमान हे मान्सून च्या साक्रीयातेसाठी / Mansoon activity ( progress ) , formation of clouds साठीचे एक महत्वाचे कारण आहे .
बंगालच्या उपसागाराचे तापमान हे अरबी समुद्रापेक्षा वेगळे आहे त्यामुळेच पश्चिम किनारपट्टीवर येणारा पूस आणि पूर्वेकडे येणारा नैऋत्य मोसमी पाउस ह्यातही फरक आढळतो .
सर्वसाधारणपणे अर्ध्या महाराष्ट्रात पश्चिमेकडचा पाउस पोहोचतो तर त्याउलट महाराष्ट्राच्या पूर्व सीमेपर्यंतच बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे पाउस पोहोचवतात त्यामुळे मध्य भारतात भीषण परिस्थिती निर्माण होते .
ह्याशिवाय सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या रांगांमुळे अरबी समुद्रावरून थेट येणारे ढग आणि वारे अडवले जातात त्यामुळेच ह्या भागात मुसळधार पर्जन्य वृष्टी होते आणि ह्या रंगांच्या पूर्वेस म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रासारखे जे प्रदेश आहेत तिथे पर्जन्यछायेचा प्रदेश तयार झालेला आढळतो .
पोस्ट खूप मोठी झाली त्याबद्दल क्षमस्व .
हे जपान वरचे वादळ
हे जपान वरचे वादळ
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की वारा आडवत नाही परंतु वार्यातली उर्जा काढुन घेतल्याने त्याचा वेग मंदावतो.
हा डीटेल स्टडी.यात रेन क्लाऊडविषयी लिहले आहे.
http://www.telegraph.co.uk/earth/earthnews/9234715/Wind-farms-can-cause-...
राजू,लीलावती आभारी
राजू,लीलावती आभारी आहे.
उदयन,
सध्या एल नीनो प्रवाह थोडासा डावीकडे सरकला आहे.त्याने आग्नेयकडचा मान्सून आणि ट्रेड विंड्स यांचा गुच्छ वर सरकला आहे त्यामुळे दोनदिवसापासून चायना ते जपान दरम्यान डिप्रेशन झोन तयार झाला आहे.ज्याचे फळ म्हणजे आपल्याकडे येणारा पाऊस.पण तोही कमी बाष्पयुक्त असा आहे कारण एल नीनोने ओढून नेलेले हिंदी महासागरातले ढग.जेवढा वेळ वरचं वादळ टिकेल तेवढा वेळ भारतात जरा पाऊस अस्णार आहे.पण तोपर्यंतच.पाण्याचा प्रवाह परत द.अमेरीकेकडे सरकू लागला की परत पहिले पाढे तसेच असणार आहेत.
पवनचक्क्यांबाबत भारत अजून मागे असणार देश आहे.त्यामुळे तिकडच्या प्रचंड आकाराच्या विंड फार्मचा संबंध इथल्या आपल्या इवल्याशा भागात असणार्या पवनचक्क्यांसाठी कशासाठी?शिवाय लिंकमधल्या लेखात असेही म्हटले आहे यावर अधिक संशोधन व्हायला हवे.तेव्हा ते त्यांना करु दे.आपल्या राज्यातल्या पवनचक्क्या दुष्काळग्रस्त भागामध्येच बसवलेल्या आहेत.तेही जो प्रदेश पर्जन्यछायेचा आहे असा.त्यामुळे ढग पिंजणे,वार्याचा डायनॅमिक्स बदलणे या गोष्टींपासून बराचसा पर्जन्य असणारा भाग अलिप्त आहे.त्यामुळे असला विचार आतातरी मनातून काढून टाकणे योग्य.
आणखी एक.वार्याचे अनेक प्रवाह असतात.त्यातही थर असतात.ज्यातले पावसासाठीचे साधारण जमीनीपासून १.५-२ किमी उंचावरचे प्रवाह आणि पवनचक्क्यांची उंची यात ताळमेळ हवा.या दुष्काळीभागात पवनचक्क्या बसविल्या आणि जत,खानापूर तालुक्यात पावसाचं प्रमाण वाढलं असं दिसतं आहे की.(खरा संबंध कशाच नंतर पाहू) तेव्हा आपण शंभर पवनचक्क्या अरबी समुद्रात उभ्या करुन पाहू पाऊस कुठं जातो ते.जत,आटपाडी,नगर इकडं पवन्चक्क्या लावल्यात हो त्यामुळे तुमचं म्हणणं किमान आत्तातरी खोडून काढता युन राहिलं की,काटकर.
माहितीपूर्ण लेख,
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
अॅक्चुअली समुद्रातले गरम/थंड प्रवाह, त्यांचं तापणं अन समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहणं, अन ध्रुवीय बर्फाजवळ गेल्याने थंड होऊन खोल जाऊन उलट प्रवास. त्या अनुषंगाने हवेतली बाष्पाची हलचाल. मॉन्सून पडणारा प्रदेश, बारमाही पाऊस पडणारा प्रदेश इ. सगळी माहिती नीट वाचल्यावर मला तरी वाटलं होतं, की अॅक्चुअली धिस इज द 'मोटर' ऑफ द वर्ल्ड!
ही फिरते म्हणून जग जिवंत आहे!
अनुमोदन आणि आभार.
अनुमोदन आणि आभार.
विज्ञानदास अल-निनो आणि बाकी
विज्ञानदास अल-निनो आणि बाकी गोष्टीतर आहेतच पण बेसुमार जंगल तोड चालू आहे. त्याचा पण हा परिणाम आहे च की !! थोडक्यात Global Warming नी त्यामुळे Climate Change.
याविषयी थोड लिहाल का?
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की वारा आडवत नाही परंतु वार्यातली उर्जा काढुन घेतल्याने त्याचा वेग मंदावतो.
<<
यातले लॉजिक समजले नाही.
मला समजते ते हे :
"हवा सर्वत्र असते. हवा हलू लागली की तिला वारा म्हणतात." हे वाक्य ३रीच्या पुस्तकातले आहे.
नंतर वारा का वाहतो हे शिकल्यावर लक्षात आले, की अ ठिकाणची हवा, ब ठिकाणाकडे धाव घेते आहे.
का? तर ब ठिकाणचे तापमान वाढल्याने तिथली हवा विरळ, म्हणून हलकी होऊन वातावरणात उंचावर चालली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा तिथे ओढली जाते आहे.
आता, या ओढल्या जाणार्या हवेच्या हलचालीला वारा म्हणतात, अन या वार्याच्या हलचालीदरम्यान पवनचक्क्या लावल्यास त्या फिरतात. पण त्यामुळे हवा ओढली जाण्याचे मूळ कारण (=ब ठिकाणचे उच्च तापमान) कसे काय बदलू शकते? यामुळे वारा तर वाहणारच.
पवनचक्की त्या वाहत्या वार्याची उर्जा वापरते आहे हे बरोबर. पण उर्जा निर्मिती करणारा तो सूर्य तर वर तापतोच आहे ना? मग वार्यातली उर्जा कुठे शोषली गेली??
*अवांतरः
अल्टिमेटली, ऑल्मोस्ट सगळीच उर्जा सूर्याकडून, पर्यायाने अॅटॉमिक फ्यूजनपासून येते आहे.. लेट्स स्टार्ट युजिंग अॅटॉमिक एनर्जी
चांगला माहितीपूर्ण लेख आहे पण
चांगला माहितीपूर्ण लेख आहे पण अजून थोडं स्पष्टीकरण चालेल (निदान मला तरी).
प्रत्येक चित्राच्या खाली छोटंसं legend लिहिता येईल का? म्हणजे ह्या चित्रात नक्की काय दाखवलं आहे? लाल/निळ//हिरवा/पिवळा रंग काय आहे? चित्रात कोणते खंड दिसत आहेत? वारे नक्की कोणत्या दिशेने वाहत आहेत? अगदी पहिलीतल्या मुलाच्या पातळीवर उतरून लिहिलत तरी चालेल. आणि प्रत्येक चित्रासाठी माहितीची पुनरावृत्ती झाली तरी चालेल. सतत लाल निळ्याचे संदर्भ बघायला वर खाली जाणे त्रासाचे आहे.
ही माहिती घातल्याने लेख समजायला अधिक सोप्पा होईल आणि तुमचं म्हणणं जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल असं वाटतं.
सूचना/बदल स्वागतार्ह.थोडासा
सूचना/बदल स्वागतार्ह.थोडासा शॉ.कट टाकला.
अमित,
ग्लोबल वार्मिंगचा विषय काढलात.त्यातून वातावरण बदलाचा.वातावरण बदल म्हणजे तापमान वाढ.आता ही तापमान वाढ जंगल-तोड झाल्याने झाली हा त्याच्या अनेक कारणांपैकी एक मुद्दा.त्यासाठी खरे तर तुम्हालाच काही प्रश्नांची उअत्तरे द्यायला लावून,त्यातून पुढे स्पष्ट करण्याचा विचार होता.पण तो रहित करतो.
वातावरण तापणे म्हणजे वातावरणाच्या तापमानाची काही अंश से. वाढ होणे.आता जेव्हा वातावरणाचे तापमान वाढते तेव्हा त्याचा परीणाम तिन भूरुपांवर होतो-१)मातीची जमीन २)बर्फाळ जमीन ३) महासागर्/पाणी.
आता वातावरणाचं तापमान वाढलं तर या तिन्हीवर काय परीणाम होईल.जमीन जास्त तापेल.परीणामी कमी दाबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात तयार होईल.वारा समुद्राकडून जमीनीवर वाहण्यासाठी अनुकूल वातावरण तायार होईल.
महासागरात जास्त तापमान्,जास्त वाफ,परीणामी जास्त बाष्पयुक्त ढग तयार होतील.ते भूभागाकडे वाहू लागतील.राहीला बर्फ,वितळू लागेल.पुढे आपल्याला माहित्ये काय ते.
पण नियमानुसार तापमान वाढलं की बाष्प ग्रहण शक्ती वाढते.अर्थात याचा फायदा पाऊस पडण्यासाठी होईल. त्यामुळे जेवढं तापमान वाढ तेवढा पाऊस वाढ.त्यामुळे झाडाचा संबंध पावसाच्या दृष्टीने नगण्य आहे.हा आता हिवाळा कमी होईल्,त्याची इंटेन्सीटी कमी होईल.म्हणजे एक वेळ पावसाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू राहतील.हे दोन्ही मात्र प्रखर होतील.म्हणजे पाउस तीव्र असेल तसाच उन्हाळाही.हे म्हणजे तुम्ही गरम बाथरुमध्ये चश्मा चालून शिरलात तर काचेवर चटकन वाफ चढते,पण कोरड्या बाथरुमध्ये काचेवर वाफ जमायला तापमान आणि बाष्प दोन्ही वाढायला हवं.तसंच.
गेल्या काही शंभर वर्षांचा सातारचा(सातारा मध्यावर आहे आणि त्याचा डेटा 'सलग' उपल्ब्ध होता म्हणून ते घेतले) पाऊस खाली बघा.
ल
तापमान वाढ नसणार्या वर्षांमध्येही पाऊस खाली आला होता.तो का?
एल नीनो बर्याच कालखंडापासून चालणारा प्रकार आहे.मात्र त्याच्या ज्ञात नोंदी या साडेतीनशे वर्षांच्या आहेत.आणि गेल्या शंभर एक वर्षांच्या डेटवरुन तो फारच जळूसारखा चिकट आहे.अगदी छुप्पा रुस्तम टाइप म्हणाल तरी चालेल.आता दोन-तीन दशकात झालेल्या जागतीक तापमान वाढीचा त्याच्यावर होणारा परीणाम कितपत असेल? पण वाटत नाही तो फार बदल घडवेल म्हणून.अगदी एल निनो म्हणजे गलीव्हर आणि तापमान वाढ म्हणजे लिलीपुटच्या सैनिकांचे छोटे-छोटे तीरच म्हणा ना.
जंगल हा प्रकार जिथे डोंगर आहेत तिथेच आहे.गेल्या वर्षी पर्जन्याछायेच्या प्रदेशात मुबलक पाउस झाला, जिथे झाडांचं प्रमाण जवळपास तुरळक आहे.त्यामुळे जंगलतोडीचा परीणाम तापमान वाढीवर होईल पण पावसावर सध्या तरी कमीच.अर्थात मोठी जंगलतोड झालीच तर पाउस त्याची जागा तिथून बदलेलही.हा बराच कॉम्प्लेक्स मुददा आहे.यावर अपडेट्नुसार हळूहळू लिहीन पुढे.
ध.
एक मुद्दा राहीला आर्टीक
एक मुद्दा राहीला
आर्टीक खंडातून दर वर्षी लाखो लीटर बर्फाचे थंड पाणी समुद्रात उतरते ( पाणी लवकर गरम होत नाही आणि लवकर थंड ही होत नाही) आणि समुद्राची "घनता" कमी होत आहे. याचा देखील परिणाम वातावरणावर होत आहे
या थंड पाण्याचा प्रभाव अल निनो वर देखील पडतच असेल वरच्या बाजूने प्रेशर वाढत असेल अल निनो ला वरच्या बाजूस सरकण्यास अडथळा होत असेल
विदा मस्त लेख झाला आहे.
विदा मस्त लेख झाला आहे. बाकीच्यानी आपल्या परीने भर टाकलीच आहे. पण मला एक विचीत्र शन्का आहे, कृपया कुणाला माहीत असेल तर लिहावे.
जन्गल/ वृक्ष तोड झालीय, डोन्गर, टेकड्या कापले/ फोडले जात आहेत, यामुळे पर्यावरणावर परीणाम होतोच आणी पाणी पावसावर पण परीणाम होतो. पण नासिकपासुन मराठवाड्या पर्यन्त, खाली जळगाव -धुळे साईड फिरले तरी एवढी वृक्ष तोड झालेली दिसली नाहीये आणी मोठाले डोन्गर, टेकड्या पण आहेत, मग तरी इकडे दुष्काळ का? पाऊस का नाही? हेच गणित मला कळत नाहीये.:अरेरे:
धन्यवाद.रश्मी आणि उदयन लिहीतो
धन्यवाद.रश्मी आणि उदयन लिहीतो यावर नंतर.शिवाय लेखही अपडेट करतो.सुचना आल्यात काही त्याप्र्माणे
तोपर्यंत इतर अभ्यासू उत्तरं देतीलच.
रश्मी पाउस ही भारताचा विचार
रश्मी पाउस ही भारताचा विचार करता स्थानिक गोष्ट नाही . अनेक घटकांचा परिणाम एखाद्या विशिष्ट परिसरात होणऱ्या पर्जन्यमानावर होत असतो .
अधिक माहिती विज्ञानदास देतीलच
रश्मी,वरती लिलावतीताईंनी
रश्मी,वरती लिलावतीताईंनी त्यांच्या पहील्या पोस्टमध्ये शेवटच्या ओळीतून उत्तर दिलेले आहेच.तरी परत व्यव्यस्थित एकदा.याचं कारण सह्याद्री आहे.सह्याद्रीला ढग अडल्याने पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे,पश्चिमेचा पाऊस पर्वतरांग ओलांडून येईपर्यंत पूर्वेकडे मोकळेच ढग येतात.म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत आधी कोकणात पाऊस पडतो.मग सह्याद्रीचा घाट माथा.मग पुढचा टप्पा कोल्हापूर्,सातारा,पुणे,थोडासा नाशिक मग ढग पूर्ण मोकळे असतात.मग येतो उरलेला नाशिक्,उरलासुरला नगर् जिल्हा,सांगली,सातारचा मध्य भाग.आणि मग येतो मराठवाडा,विदर्भ्,सातारा गोल्डन हायवेच्या पलीकडचा भाग,सोलापूर,गुलबर्गा बाजूचा भाग.मग पुन्हा आग्नेय मान्सून(अंदमान) वरुन काही ढग आणि इतर नैऋत्येचे उरलेसुरले ढग.या भरल्या ढगांना त्यांना वाटेत दिसतं नागपूर आणि पूर्व महारष्ट्रातली काही घनदाट जंगलं.त्यांना मग परत पाऊस पाडायचा मोह होतो.मग ते डॉ.बंग आणि बाबा आमटेंच्या दाट वनांमध्ये भरपूर पाऊस पाडतात.मुळात महाराष्ट्रात जुना पूर्व महा. भाग आणि सह्याद्री अशी दोनच इंन्टेन्स जंगलांची स्थानं.त्यामुळे इतर प्रदेश कोरडा जातो.एल निनोचा बडगा एवढा आहे की त्याच्या अखत्यारीत जंगल कितीही अगदी आख्खा देश झाडंमय केला तरी पाऊस तुरळकच राहणार.तिकडे मोठाले(नगरकडच्या की काय तुम्ही) डोंगर टेकड्या आहेत पण सह्याद्री महाशयांसमोर त्यांची उंची कमी पडली आहे.समजले असेल असे वाटते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उदयन्,आपला प्रश्न सुंदर आहे.पण त्याचं उत्तर सोपं असावं असं वाटतं आहे.मला पुस्तकांचा संदर्भ आणि तज्ञांना(म्हणजे हवामान शास्त्रात ज्याचे केस पिकले अशी लोकं ) विचारावं लागेल.तरी जी जुजबी माहीती अस्थित्वात आहे त्यावरुन ही उत्तर देण्याचा प्रयत्न आहे.एल-नीनो हा म्हणजे नुसता छोटा पट्टा नसून त्याचं क्षेत्रफळ प्रशांत महासागरात बरच पसरलेलं आहे.त्यातला एक भाग पश्चिमेकडे पसरला आहे(भारत आणि ऑस्ट्रेलिया) तसाच तो उत्तरेकडेही सरकला आहे.पण तुम्ही जे म्हणताय त्यात आर्टीक सायक्लोन्सचा,'आर्टीक दोलना'चा भाग येतो.फारच काँप्लीकेटेड स्थित्यंतरं एकत्र येऊन तिथे हवामानची घडण झालेली आहे.एल नीनो मुळे उत्तरेचा बर्फ वितळतो असं काहींचं म्हणणं आहेच,काही याच्या उलटं म्हणजे एल नीनोमुळे बर्फ घट्ट होतो असंही म्हणतात. पण एल नीनोची एकूण व्याप्ती बघता थंड पाणी,त्याच्या प्रवाहात फार कमी प्रमाणात मिसळल्यासारखं आहे.हे मिसळणं तेही,मकरवृत्ताच्या बाजूला आहे.त्यामुळे निनो फेजवर त्याचा परीणाम होण्याऐवजी,निनोचीच दहशत बर्फाळ भागावरती बसलेली आहे.वरती जे देश आहेत्,उत्तर अमेरीका,कॅनडा,ग्रीनलँड् इ. त्यांना 'आर्टीक ऑसीलेशन्स' अधिक निनो चे उष्ण वारे यांचे मिश्र अनुभव येतात.तेव्हा तिथे असणार्या फेजनुसार थंडी कमी जास्त होत असते.शिवाय बर्फाळ वादळे होंणं हेही येतंच.यावरती संशोधन चालू आहे.पण हवामान संशोधन खगोलनिरीक्षणासारखेच वेळखाऊ असल्याने,वर्षानुवर्षाचे डेटा मिळेपर्यंत जुन्या डेटावरती अनुमान बांधत बसावे लागते.गेल्या वर्षी अमेरीकेत आणि कॅनडाला जो ऐतिहासिक थंडी पडली तिचं मूळ यातच कुठेतरी आहे.त्याविषयी नंतर केव्हातरी.
अल-नीनो हा विषुववृत्तीय भागात एकवटलेला आहे.अगदी विषुववृत्ताच्या आजूबाजूला.तसेच उत्तर आणि दक्षिण भागातून मध्य भागावर वाहणारे वारे मधल्या मध्ये त्याला अडवून ठेवतात.पुन्हा धरेची परीवलन गती मदतीला येते.तसेच विषूववृत्तावर सूर्याची प्रखरता अधिक असते.शिवाय पाण्यातले अंतर्गत प्रवाहही महत्तम नियंत्रण ठेवून असतात.तेव्हा जी काही एल नीनो ची इंटेन्सीटी असेल ती कर्क आणि मकरवृताच्या मध्येच्,मात्र त्यामुळे येणारे वातावरणातल्या हवामानातले बदल सर्वत्र परीणाम करत फिरतात.हे सगळं जाणून घेणं खुपच रोचक आहे,पण डेटा फारच किचकट असतो. माझ्या परीने समजावून दिले आहे.
मध्ये एकाठिकाणी असे वाचण्यात आले की समजा निनो कमी करण्यासाठी आर्टीक किंवा जवळपासचे बर्फ आणून प्रशांत महासागराच्या जिथे पाणी तापलेले आहे त्यात टाकायचे.पण त्याच्या मागचा प्रचंड खर्च बघितला की त्याची कल्पना रम्य होती असेच म्हणावे लागले.पुढे मागे कदाचीत आपण त्यावर उपाय शोधूसुद्धा,पण तोपर्यंत व्यवस्थित पाणी वाचवणे हाच पर्याय आहे.तिकडे याबाबत फार अवेअरनेस आहे,पण आपल्याकडे कांद्याच्या आणि ऊसाच्या भावावरतीच दिवस पळतात.हा आहे भारत!दुसरं काय..
(आर्टीक महासागरातून लाखो लिटर पाणी मिसळते जे म्हणताय त्याची लिंक देता का?)
कोण वेडा म्हणतोय की अल निनो
कोण वेडा म्हणतोय की अल निनो ला कमी करण्यासाठी थंड पानी टाका? या अलनिनो मुळेच उत्तरी भाग गोठला नाही..तेथील भाग गरम करण्यात अलनिनो चा देखील वाटा आहे
वरच्या तुमच्या माहीतीत लूप आहे उद्या लिहीतो त्यावर
विज्ञानदास __/\__ खूपच
विज्ञानदास __/\__
खूपच सुंदर माहिती देत आहात .
जमेल तशी भर टाकेन नंतर .
बरीच नविन माहिती उपलब्ध केली
बरीच नविन माहिती उपलब्ध केली आहे , धन्यवाद
गेल्या काही वर्षात पाऊस उशीरा सुरु होतोय पण जातोय पण उशीरा . अगदी नोव्हेंबर डिसेंबर मध्येही पडतोच आहे . मला वाटते आता मराठी आणि इंगजी दोन्ही कॅलेंडरमध्ये २-३ अधिक महिने टाकायला हवे तेव्हा चक्र जागेवर येईल.
ग्लोबल वॉर्मींगचा परिणाम कन्सिडर करावा लागेल ब-याचदा पाउस केरळ, कोकणात वेळेवर दाखल होतो पण हवा तसा पुढे सरकत नाही मग हवामान खात्याचे तेच तेच रटाळ अंदाज ऐकू वाटत नाही.
पावसाची तिव्रता भेडसावण्याचे प्रमूख कारण शहरी भाग सोडला तर पाण्याचा साठा करण्यासाठी पुरेसे बंधारे नाहीत. जी शेती आहे ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे,पावसाच्या दोन सरी आल्या तरी शेतकरी पेरणी करुन ठेवतो आणि नंतर पाण्यासाठी ढगाला डोळे लावून बसतो. मुळात प्रश्न पाउस येत नाही किंवा उशीरा येतो याचा नाही , तो नक्की कधी येणार हे कोणतेही तंत्रज्ञान स्पष्ट सांगू शकत नाही हा आहे.
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की
वार्यामुळे चक्की चालते ,चक्की वारा आडवत नाही परंतु वार्यातली उर्जा काढुन घेतल्याने त्याचा वेग मंदावतो.>>>>> @ धीरज - हे जरी खरे असले तरी ते घडते फार फार थोड्या प्रमाणात. उदाहरणार्थ एखाद्या टेकडीच्या माथ्यावर २५० kW च्या ४ पवनचक्क्या बसवल्या तर त्या १ मेगावॅट उर्जा काढुन घेतील पण त्या टेकडीवरुन वाहणार्या वार्यात १०० मेगावॅट ची उर्जा असेल.
तसेच पवनचक्क्यांच्या वर प्रचंड वातावरण आहे, त्यातल्या वार्याला काहीच अटकाव नसतो.
Pages