विषय क्रमांक २ : "किमयागार अशोकमामा"

Submitted by अमेय२८०८०७ on 7 July, 2014 - 05:55

'रसिक, विचक्षण, सज्जन, संयमी, आश्वासक, मायाळू, असीम, आनंदकंद, प्रतिभावान, सुगम'....म्हंटले तर शब्दकोशातले शब्द...नाही म्हंटले तर काही नाही! हल्ली जगण्याच्या संज्ञा वेगाने बदलत आहेत आणि शब्दार्थही. किंबहुना जिथे प्रत्येक हृदयातच काहीना काही बोच आहे तिथे नित्य पाझरत असणार्‍या कडवट, विषादी भावनांमुळे सरळ साध्या शब्दांनाही एक विषारी छटा मिळाली आहे. समूहात राहूनही माणसाचे 'बेट'च नव्हे तर त्या 'बेटावर राहणारा एकटा माणूस' अशी अवस्था झाली आहे. रक्ताच्या नात्यांमध्ये संवाद दुष्कर होऊ लागलेत. सुखाची व्याख्या करणारी वर्तुळे आकसत आकसत जखडणार्‍या पाशांसारखी संकुचित होत चालली आहेत. "नाहीच कुणी अपुले रे..." हा ग्रेसांचा पीळ पाडणारा उद्गार आपल्याच काळजाचा प्रतिध्वनि आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती असताना कोल्हापूरच्या अशोक पाटील म्हणजेच 'अशोकमामांचा' सहवास ही मात्र माझ्यासाठी एका मरुस्थलासारखी अनपेक्षित आणि जीवनातील चांगुलपणावर पुन्हा भरभरून विश्वास टाकण्याला उद्युक्त व्हावे असे वाटण्यासारखी उबदार, प्रवाही घटना ठरली आहे.

विशेष म्हणजे आभासी, मायाजाल, तद्दन खोटे अशा शेलक्या विशेषणांनी संभावना होणार्‍या माध्यमातून ही ओळख फुलली, दृढ झाली आणि प्रत्यक्ष भेटीतल्या संवादांमुळेही संवेदनेवर कुठे ओरखडा उमटला नाही याचे मला प्रचंड समाधान वाटते. सूर जुळतील असे वाटत असताना इतर बर्‍याच जणांना प्रत्यक्ष भेटून पदरी निराशाच आली आहे (इतरांना माझ्याबाबतीतही असे होत असेलच!). यात त्यांच्या व्यक्तित्वात असणार्‍या तरलता आणि पारदर्शितेचे मोठे योगदान आहे. जिथे संपूर्ण सृष्टी जगवणारा प्रकाशही 'तरंग' आणि 'कण' या द्वैतामध्ये वावरतो तिथे माणसांचे काय सांगावे? पण या द्वैताचा लवलेशही मामांच्यात सापडत नाही, ते अंतर्बाह्य तसेच आरपार आहेत. अर्थात दोन व्यक्तींच्या तारा जुळण्यासाठी, सहवास सुकर होण्यासाठी केवळ आवडी-निवडी जुळून भागत नाही. मैत्री या शब्दाला त्यापल्याड जाणारा अर्थ आहे आणि अशोकमामांशी जुळलेला बंध त्या व्यापक अर्थाशी संयोग साधतो असे मला नेहेमी वाटते.

आयुष्याचे टक्के टोणपे खाऊनही, पावसापेक्षा उन्हाच्या जास्त झळा सोसूनही न सुकलेले, न वठलेले असे हे सदाहरित झाड आहे. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती आली, की स्वतःशीच निवृत्त होत जाणारी अनेक माणसे दिसतात. खास करून ज्यांना फारसे छंद नाहीत किंवा दैनंदिन जीवनात आन्हिकांखेरीज महत्त्वाचे काही नाही अशांबाबत ही गोष्ट जास्त ठळकपणे जाणवते. आमच्या मामांनी मात्र निवृत्तीनंतर जणू काही कात टाकली आहे. इजिप्शियन तत्त्वप्रणालीत असलेला 'आफ्टरलाईफ' हा शब्द सध्याची मामांची दैनंदिनी पाहिली की मला हटकून आठवतो. कामाच्या धकाधकीत, अनेक कर्तव्यांचा हिशेब नेकीने चुकवण्याच्या नादात जे काही करायचे राहून-विसरून गेले होते ते आता मुक्तपणाने करणारे मामा पाहिले की शाळा सुटल्यावर घरी येऊन, कपडे-दप्तर भिरकावून खेळायला धावणार्‍या मुलाचीच आठवण व्हावी. त्यांचा आनंदही तितकाच निखळ आणि निरागस आहे. त्या अर्थाने मामा पुनर्जन्माचे रहस्य एकाच जन्मात समजून घेत आहेत.

मामांविषयी लिहिताना साहित्यापासून सुरूवात केल्याशिवाय पर्याय नाही. तसे ते अनेक प्रांतांत मस्त मुशाफिरी करतात आणि चर्चा-आस्वादासाठी कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाहीच ! हां आता 'वैदिक गणित' किंवा पूर्वीच्या 'आमची माती आमची माणसे'वाल्यांचा आवडता विषय 'गव्हावरील तांबेरा' अशा विषयांवर त्यांच्याशी माझी अजून चर्चा झालेली नाही म्हणा, पण या विषयांवरही चार-दोन वाक्ये तरी ठासून बोलण्याएवढी माहिती त्यांच्याकडे नक्कीच असेल असा विश्वास आहे (गरजूंनी प्रयोग जरूर करून पहावा). एखादा गायक आवडता राग गाताना जरा अधिकच खुलतो तसे साहित्यविषयक चर्चा सुरू झाली की मामा जरा जास्त सरसावून बोलतात. खरेतर नोकरी म्हणून त्यांनी एक अत्यंत रखरखीत म्हणावा असा ऑडिटर पेशा निवडला होता. विविध शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक कारभारांचे मूल्यमापन आणि परीक्षण करणार्‍या अत्यंत गद्य पेशात राहूनही त्यांच्यातील हळवेपण वाहते ठेवण्याच्या योजनेबद्दल जगःनियंत्याचे दोन्ही हात जोडून आभार मानायला हवेत. या तगलेल्या संवेदनशीलतेमुळेच साहित्यातील रुची सजग राहिली आणि ते अफाट वाचन करू शकले. विविध लेखकांच्या रचना, जीवनपट, लेखनाची मूलतत्त्वे यांबद्दल माहिती पडताळून पाहण्याचा मामा म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश आहेत. लेखनाविषयी कुठलीही शंका असो मामांना बिनदिक्कत फोन करावा, बोलते करावे (त्यासाठी फार मिनत्याही कराव्या लागत नाहीत) आणि पुढची काही मिनिटे खळाळत्या झर्‍याच्या पाण्याचे तुषार अंगावर उडाल्याचा सुखद अनुभव यावा असे बरेचदा घडते. कुठलीही माहिती थातुरमातुर नसणार आणि शंकेचे पूर्ण समाधान होईपर्यंत संवाद साधला जाणार याची अगदी खात्रीच बाळगावी. अर्वाचीन मराठी साहित्यावर पोसला गेलेला त्यांचा पिंड अशावेळी झगझगीत होतो.

जी.एंचे लेखन आणि व्यक्तिमत्त्व हा मामांचा हळवा कोपरा. गूढ-गंभीर अंधारयात्रा वाटावे अशी लेखनकळा लाभलेल्या जी. एंच्या लेखनाबद्दल आदर असला तरी आपुलकी निर्माण होत नव्हती. त्यांच्या साहित्याचा शोध अर्ध्यातच संपवावा असे वाटू लागले होते. त्यांनी निर्माण केलेले जग हे एका हिरव्या-धुरकट काचेपलीकडे आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी अखेर काचेला नाक लागून थांबावेच लागते की काय असा विचार येऊ लागला होता. अशा स्थितीत मला मामांची साथ लाभली. जी.एंच्या लेखनाशी आणि त्याच्या निर्मितीमागील अनेक स्रोतांशी परिचित असलेले मामा माझ्यासाठी ती काच भेदून पुढे जाण्यासाठी, अंधारवाटांवर न भुलण्यासाठी एका तेजस्वी दीपज्योतीप्रमाणे प्रकाशदायी ठरले. त्यांच्यामुळे जी.ए. पुन्हा, वेगळ्या मनोभूमिकेतून वाचले गेले. ते प्रभावीपणे करत असलेले अभिवाचन - खास करून 'तुती' आणि 'कैरी' सारख्या अस्वस्थ करणार्‍या कथा अजून ऐकण्याचा योग आलेला नाही पण त्यांच्याशी जी.ए. या लेखनप्रकृतीबद्दल झालेल्या अनौपचारिक चर्चा एका आनंदाच्या ठेव्याप्रमाणे मी जपून ठेवल्या आहेत.

मागे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रसुरक्षेच्या व्यूहरचनेबाबत वाचन करताना 'फोर्स मल्टीप्लायर' हा शब्द मिळाला. 'तितक्याच उपलब्ध साधनसामग्रीने ईप्सिताहून अधिक साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी' असा याचा अर्थ समजून घेता येईल (उदा. दळणवळणाची साधने, नागरी व सैनिक मनोबल इत्यादी). मामा हे असेच माझ्यासहित अनेकांच्या आनंदाचा 'फोर्स मल्टीप्लायर' आहेत. करायचं ते दणक्यात या वृत्तीने त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. साधी यू ट्यूबवरील पाच मिनिटांची ध्वनिचित्रफीत असो वा एखादा अभिजात चित्रपट, त्याच ओढीने, संपूर्ण समरसतेने पाहणारे मामा सर्वांना हातचे राखून न ठेवता आनंद वितरीत करतात, अनेकपटींनी वाढवतात. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आगळे समाधान दिसते, जे पाहणे मला खूप आवडते.

संवाद ही त्यांची अविच्छिन्न गरज आहे. लेखन असो की संभाषण दोन्हीतून अनेकांशी संवाद साधण्यात रममाण होत राहण्यात त्यांना आनंद मिळतो. "काही बोलायाचे आहे...आणि बोलणार आहे" हे त्यांच्या असण्याचे लक्षण आहे. आंतरजालावरील त्यांचा वावर पाहिला की थक्क व्हायला होते. एकाचवेळी चॅटींग, एखाद्या लेखावर उत्कट प्रतिसाद, फोनवर तावातावाने चर्चा, शेजारघरातील लहानग्याला खेळवणे असे नाना उद्योग एकहाती करताना त्यांना पाहिले की त्यांच्यात अतिमानवीय गुण आहेत का काय असे वाटू लागते. (बी एस एन एल मामांच्या नेटवापरामुळे अमर्यादित डेटाप्लॅन अधिक महाग करणार असल्याची अफवा आहे!) 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्न पडावा इतक्या उर्जेने सगळे कार्यक्रम अष्टौप्रहर चाललेले असतात आणि एखादा उदासीन आत्मादेखील नकळत त्या उर्जेच्या भोवर्‍यात खेचला जातो. मामांची भेट व्हायच्या आधी आणि भेटीनंतर दोन्हीवेळा धाप लागते. पहिल्यांदा त्यांच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेच्या पायर्‍या चढून जावे लागते म्हणून आणि भेटीनंतर त्या दोन-चार तासात झालेल्या देवाणघेवाणीतून येणार्‍या सकारात्मक थकव्यामुळे! खुद्द मामा मात्र रात्री अपरात्रीही तितक्याच उत्साहाने वावरत असतात. एखाद्या लेखावर किंवा कवितेवर रात्री दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी त्यांनी लिहिलेला दीर्घ प्रतिसाद पाहून झोपेचे इंद्रिय या माणसाला बसवलेलेच नाही की काय अशी शंका बळावत जाते. जागण्याचे - आणि अखंड कार्यरत राहून जागण्याचे - एखादे मॅरॅथॉन झाले तर मामा आरामात ढाल जिंकून परततील आणि पुन्हा कॉम्प्युटर सुरू करून कामाला लागतील.

अभिजात इंग्रजी तसेच जागतिक भाषातील चित्रपट आणि संगीत ह्या त्यांच्या आणखीन दोन आंतरसाली. जुन्या हॉलीवूड चित्रपटांबद्दल बोलताना तर त्यांचा पार 'हरितात्या' होतो. म्हणजे, " अरे इथे ही विव्हीयन ली अशी त्वेषाने बोलतेय आणि तिथे तो तगडा क्लार्क गेबल मिशीतल्या मिशीत हसत कोपर्‍यात उभा", अशी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग वर्णिल्यासारखी सिनेमाची कथा सांगितली जाते. कथा सांगून संपल्यावर त्या कलाकारांचे इतर सिनेमे, आपसातील संबंध, शूटींगवेळच्या गमतीजमती, पहिल्यांदा तो सिनेमा पाहिला त्याची कथा इत्यादी अनेक 'उपकथानके' जोडली जातात. चित्रपटांवर बोलणे हे एक संपूर्ण पॅकेज डील असते मामांसाठी आणि या सर्व गोष्टी आत्ता आपल्या डोळ्यांदेखत घडतायत अशी अनुभूती समोरच्याला मिळत राहते. तीच गोष्ट हिंदी चित्रपटांविषयी. दिलीपकुमार आणि मधुबाला हे त्यांच्या आवडीचे दोन स्तंभ आहेत आणि बाकी इमारत या पायाभोवती वाढलेली आहे. मधुबाला या नावाविषयी काही वावगे बोलणे हा मामांचे शत्रुत्व स्वीकारण्याचा एक जवळचा मार्ग आहे. अशा माणसाला उकळत्या तेलाप्रमाणे भाजणार्‍या चिरदाही शब्दांचा सामना करायची मानसिक तयारी असावी हे एक जाताजाता सुचवल्याशिवाय राहवत नाही.

मामांच्या संगीत या आवडीसाठी तर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. चार सहा हजार गाण्यांचा गीत,संगीतकार, गायक यासहित परिपूर्ण डेटाबेस मेंदूत बाळगून असणारे मामा एक चालतीबोलती म्युझिकल लायब्ररी आहेत. अलीकडेच फेसबुकवरील एका स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले त्यावेळी त्यांचा निरामय आनंद पाहणे ही एक अपार आनंददायक घटना होती.

ही निरामयता हेच मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी वाटणार्‍या आकर्षणाचे प्रमुख कारण आहे. अभियांत्रिकीत "नॉन डिस्ट्रक्टीव टेस्टींग" असते. उत्पादित वस्तूंत काही दोष राहून गेले आहेत का ते पाहण्यासाठी एक्स-रे आणि इतर माध्यमांतून चाचण्या करतात. मामांचे याच्या उलट आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीत गुण कुठले आहेत हे शोधण्याचा त्यांचा प्रयास असतो आणि त्या गुणांचे भरपूर कौतुक करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. अनेकविध विषयांवर ज्ञान बाळगून असलेले अनेक आहेत. उत्कृष्ट वक्ते, प्रतिभावान लेखक, व्यासंगी वाचकही भरपूर मिळतील पण हे सर्व असूनही एक माणूस म्हणून काहीसे वरचढच असणारे मात्र शोधून सापडणार नाहीत. याबाबतीत मामा 'लाखों में एक' आहेत. आयुष्यात कधीही न भेटलेल्याला एका भेटीतच आपलेसे करण्याचा परीस मामांना सापडलाय आणि त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला त्याच्या स्पर्शाचा फायदा मिळतो. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता संवादासाठी सदैव तत्पर असलेले मामा आमच्या भाव विश्वाचे 'किमयागार' आहेत. त्यांची अनेक रुपे आपल्यापरीने लोभस आहेतच पण या सर्वांचा परिपाक म्हणून एकसंधपणे जाणवणारे व्यक्तिदर्शन अधिक आनंददायी आहे, चकित करणारे आहे. 'द सम इज डेफिनिटली मोअर दॅन द पार्ट्स!'

त्यांच्या थोड्या अधिक निकट असणार्‍या आम्हा मित्रांच्या त्यांच्याविषयी दोन जबरदस्त तक्रारी आहेत. एक म्हणजे अर्थातच प्रकृतीची जाणता-अजाणता होणारी हेळसांड आणि दुसरी म्हणजे त्यांचा स्वतंत्र लेखन करण्याचा सूक्ष्म कंटाळा. दोन्हीबाबत बोलून थकलो आहोत पण अजून ते बधलेले नाहीत. वर्षभरापूर्वी एका गंभीर आजारातून उठलेल्या मामांनी प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी आणि आवडीच्या विषयांवर विपुल लेखन करावे या भावना सर्वांतर्फे मी पुन्हा एकदा त्यांच्यापर्यंत पोचवू इच्छितो. सरस्वती प्रसन्न आहे, आशयाची वानवा नाही आणि वाचनास उत्सुक वाचकवर्ग असूनही त्यांचे सकस स्वतंत्र लिखाण उंबराच्या फुलाप्रमाणे दुर्मिळ असते ही बाब मला कधी कधी हताश करते. प्रकृतीबद्दल एक अत्यंत स्वार्थी कारण असेही आहे की मी सध्या योजल्याप्रमाणे साताठ वर्षांनी कायमचे म्हणून घरी परतेन तेव्हा आणखीन एका मित्राच्या साथीने आम्हा तिघांना अनिर्बंध हिंडण्यासाठी- गप्पागोष्टींसाठी त्यांनी तंदुरुस्त असावे ही सदिच्छा आहे.

मामांनी असेच सदैव हसते खेळते असावे आणि आपल्या सहवासातील शीतलता प्रत्येकाला भरभरून द्यावी हे मागणे फारसे आवजवी नाहीच....त्यामुळे परमेश्वर, दैवी शक्ती जे काही असेल ते ती सहज मान्य करेल यात शंका नाही, नाही का? आणि मामांसाठी तर मी परमेश्वरावर विश्वास ठेवायलाही तयार आहे. कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत पाठीवर निर्मळ आशीर्वाद देतील असे समर्थ हात न उरल्याची खंत व्यक्त केलीय पण माझ्यासाठी मामांच्या रुपात मैत्रीचे, समुपदेशकाचे, ज्येष्ठाचे, नात्यातील ओलाव्याचे आणि एका आधारवडाचे हात नेहेमी पुढे असतील या भावनेची सोबत सदैव असणार आहे. त्यामुळेच त्यांच्याशी असलेले नाते चिरकाळ टिकणारे आहे, टिकणार आहे.

'स्कार्लेट ओ हाराची' जिगीषा
'अल्थीयाची' असण्याची गरज
झिवॅगोच्या मनातील कापरे द्वंद्व
बालपणीच्या 'कैर्‍या' आणि 'तुतींचा' आंबटगोड स्वाद
संगीताच्या शुद्ध स्वरातील आरोहाप्रमाणे
आयुष्यभर भिनत राहील अंगात
आणि मी
घराच्या दिशेकडून येणार्‍या झुळूकेप्रमाणे
तुझी आठवण जागवत बसेन
मनःपटलावर 'शाश्वताच्या रंगांचा'
अमीट खेळ पाहताना....

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामांविषयी मोजक्या शब्दात लिहिण कठीणच आहे.
पण जमलं तुला. चांगलं लिहिलं आहेस. Happy

मामा ग्रेट आहेत अस आप्ण त्यांना म्हणलं की हॅ तुमचं आपलं कैतरीच म्हणुन ते दुसरं आख्यान लावतात. Happy

चित्रपट, साहित्य ह्या बाबतीत त्यांच्याकडुन बरीच नवीन माहिती, नवा दृष्टीकोण मिळतो.

खुप छान लेख. अशोकमामांचे व्यक्तिचित्रण अत्यंत समर्पक शब्दात उतरवले आहे. त्यांना भेटण्याची संधी कधी मिळाली नाही पण मायबोलीवरील त्यांचे अनेक प्रतिसाद वाचले आहेत. तुमच्या लेखामुळे आज त्यांची अजुन जवळुन ओळख झाली. स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा.

अमेय - पुन्हा एकदा लेख वाचला.

अतुल - तुझा प्रतिसाद हा सुद्धा एक लेखच झाला.. खूप छान!

अशोकमामां आणि त्यांचा भाचेकंपनी साठी आता कोल्हापूरची खेप करावी लागणार आहे...

मामाश्रीना शब्दात रेखाटणहे कठीण काम . हे शिवधनुष्य तू पेललस याबद्दल सर्वात आधी अमेयदा तुझ अभिनंदन !

अगदी तंतोतत उतरले आहेत मामा तुझ्या लेखणीतून.
मामाश्रीमध्ये असलेल्या त्या अनोख्या उर्जेची ओळख सासवडलाच झाली होती . केवढा तो उत्साह आणि ती ऊर्जा
प्रत्येकाची आस्थेन विचारपूस , आवर्जून दिलेल्या पुस्तकांची भेट सार काही लख्ख लक्षात आहे
साध्या साध्या गोष्टीच कौतुक करताना खुल्या दिलाने करायच , येणारा दिवस तितक्याच उत्साहाने जगायचा , आणि निर्मळ मन ही मामाश्रींची मुख्य वैशिष्ट्ये
इंग्रजी साहित्य , चित्रपट , जीएन्च साहित्य यावरची त्यांची पकड़ वाखणण्याजोगी आहे .

विशेष म्हणजे आभासी, मायाजाल, तद्दन
खोटे अशा शेलक्या विशेषणांनी संभावना
होणार्या माध्यमातून ही ओळख फुलली, दृढ
झाली आणि प्रत्यक्ष
भेटीतल्या संवादांमुळेही संवेदनेवर कुठे
ओरखडा उमटला नाही याचे मला प्रचंड
समाधान वाटते.>>>>>> ह्याला शंभर टक्के अनुमोदन
नेटवरती काही चांगली माणस भेटली त्यात मामा एक आहेत

मामाश्रींना उदंड आयुष्य लाभों ! Happy

हे मामा म्हणजे ते होनासूमी चे अपडेट्स देणारे ना? (प्रतिसादातून वाटतेय, मी पुर्ण प्रतिक्रिया वाचल्या नाहीत).

आजकाल देत नाहीत अपडेट्स...

अमेय, अफाट व्यक्तीमत्वाला इतक्या कमी शब्दात उतरवायचे शिवधनुष्य लीलया पेललत, मस्तच लिहिलंय.

तुम्ही हे लिहिल्यावर, अरेच्चा! मामांवर लिहायला मला का नाही सुचले म्हणणारे आणि भाषा-प्रभू असलेले अनेक भाचे / भाच्या आहेत. तुम्ही हे लिहील्याबद्दल त्यांच्या कृतक-कोपास / रोषास सामोरे जायला तयार आहात ना / की आधीच झालं सामोरे जाउन.... Wink

अमेय _/\_ उत्तम लिहिलंयस रे! खुप आवडला लेख.
मामांना शब्दांत बांधणं खायचं काम नाही, पण तुला सहज जमलंय.. Happy
तू शब्दप्रभू आहेस शिवाय मामांचा सहवासही उदंड लाभतो तुला, शेवटची कविता अतिशयच सुरेख. रांगोळीतल्या रेखीव रंगांसारखी मामांची प्रत्येक आत्मिय गोष्ट अगदी चपखल रेखलीस ओळींमधे.

अतुल आणि भारतीताई, तुमचे प्रतिसाद लेखाला चारचाँद लावतायत.

उत्साहाचा, व्यासंगाचा, सकारात्मकतेचा, माणुसकीचा आणि आनंदाचा निर्मळ ठेवा आहेत मामा म्हणजे. आपल्या प्रत्येकाच्या फ्रेंड्सलिस्टची अ‍ॅसेट!!

अमेयदादा लेख मस्त लिहिला आहे . नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही . लेख खूप आवडला . अगदी मनापासून लिहिला आहे हे जाणवते. Happy

अमेयदा.... सर्वप्रथम दंडवत स्वीकारा ....
आभाळ ओंजळीत बसवायचा प्रयत्न केलात आणि निभावलात सुद्धा !

अशोक पाटील नावाच्या या सदैव गजबजलेल्या मानवी बेटाला मी सर्वप्रथम मीमराठीवर (व्हर्चुअली) आणि मग एका मीमच्याच एका स्नेहसंमेलनाच्या निमीत्ताने पुण्यात भेटलो. पण खरं सांगु का.? त्यांच्याशी ओळख होण्यासाठी प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नसते. तुमची ओळख होणे महत्वाचे ती झाली की मग तासनतास कानाला फोन लावून शांतपणे ऐकत राहण्याची तपश्चर्या हवी. एवढं साधलं की अशोककाका तुमचे आणि तुम्ही त्यांचे होवून जाता. गंमत बघा, आंतरजालावर त्यांना ओळखणारे बहुतेक सगळे जण त्यांना मामा म्हणतात, काका-काकाश्री म्हणणारा पुतण्या मी एकटाच असेन...

मला कधी कधी प्रश्न पडतो, या माणसाला माहीत नाही असे या जगात काही असेल काय? कारण हा माणुस शास्त्रीय संगीतापासून अर्थकारणापर्यंत कुठल्याही विषय तितक्याच अधिकारवाणीने बोलु शकतो. जी.ए. हा त्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे जो त्यांना कुठल्याही परिस्थितीत बोलके करु शकतो. तुम्ही हवं ते सगळं लिहीलेच आहे, पण त्यांच्याबद्दल बोलताना त्यांची अजुन एक आवड, व्यसन म्हणा हवे तर ... पण विसरलात खरे .....

अशोककाकांबद्दल बोलताना ऑड्रीचा उल्लेख न करणे हा गुन्हा आहे देवा.

कालच्या जानेवारीमध्ये डेनव्हरवरून येताना मी त्यांच्यासाठी ऑड्रीच्या दहा फोटोंचा संच असलेले एक कॅलेंडर आणले होते. त्यानंतर एक दिवस त्यांचा फोन आला. इतकं भरभरून बोलले की बस्स....
दिल खुश हो गया !!

त्यांना माणसांचं व्यसन आहे आणि सुदैवाने आपण माणसांत मोडतो हे आपलं भाग्य ! खुप सुंदर लिहीलय तुम्ही. मनापासुन शुभेच्छा !!

खूपच छान लेख ! मी तशी मायबोलीवर नविनच त्यामुळे फारसा परिचय मामांशी नाही. परंतु त्यांच्या बर्याच प्रतिसादावरून ते अतिशय ज्ञानी , दुसर्यांचे भरभरून कौतुक करणारे , अतिशय सकारात्मक दृष्टीकोन असणारे वाटतात .
ह्या लेखातून तुम्ही छान मामांचे व्यक्तिमत्व मांडले आहे .

छान

विशाल, अतिशय सुंदर प्रतिसाद Happy वाचता वाचताच एक सहज स्मितरेखा उमटली चेह-यावर.. तुझ्यासोबत त्याचं श्रेय विषयवस्तू म्हणुन मामांनाही.. Happy

अमेय, लेख खूपच छान लिहिलास. जसे मामा आहेत तसाच! Happy
खरचं त्यांच सगळ्या विषयातलं ज्ञान बघून आश्चर्य वाटतं, त्यांचा थोडा सहवास मलाही लाभला आणि त्यावेळी चित्रपट, अभिनेते-अभिनेत्री, गायक त्यावेळची परिस्थीती वगैरे सर्व माहिती ते इतकी पटापट सांगत होते, की जणू समोर सगळं लिहिलेलं हे वाचून सांगत आहेत. आणि एवढं असूनही 'ग' ची जराही बाघा ह्या माणसाला नाही. Happy
मामा ,________/\_________. Happy

येक नंबर. मामाश्री लै भला मानूस. फकस्त लिवायचा कंटाळा करतूय बगा. म्या कवाधरनं सुपारी द्याचं म्हंतूय. हेंना किड्न्याप करा नि येका खोलीत बंद करा. येवस्तित खायला-प्यायला द्याचं, खोलीत मधुबाला, इन्ग्रिडचे फटू लावायचे इन्स्प... इन्स्प्रे... इन्स्प्रिरेशन का काय म्हंत्यात त्येच्यासाठी. रोज येक कायतरी लिवल्याखेरिज अजाबात खायाला द्याचं नाय. आमच्या संगती भटकंती करत्यात तवा लै काय काय सांगत बसत्यात पर लिवनार कवा म्हन्लं का शंबर कारनं द्येत्यात. कोन हाय का सुपारी घेनारं? है कोई माई का लाल, या लाल की माई?

मामांचे याच्या उलट आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीत गुण कुठले आहेत हे शोधण्याचा त्यांचा प्रयास असतो आणि त्या गुणांचे भरपूर कौतुक करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. अनेकविध विषयांवर ज्ञान बाळगून असलेले अनेक आहेत. उत्कृष्ट वक्ते, प्रतिभावान लेखक, व्यासंगी वाचकही भरपूर मिळतील पण हे सर्व असूनही एक माणूस म्हणून काहीसे वरचढच असणारे मात्र शोधून सापडणार नाहीत. याबाबतीत मामा 'लाखों में एक' आहेत. आयुष्यात कधीही न भेटलेल्याला एका भेटीतच आपलेसे करण्याचा परीस मामांना सापडलाय आणि त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला त्याच्या स्पर्शाचा फायदा मिळतो. >>>>>

कोण आहे रे तिकडे, शिपै ... अमेयरावांना १०० गावे इनाम देवून टाका Happy

Happy
मामांनी खरंच आता सर्वांचं सांगणं गांभीर्याने मनावर घ्यावं आणि लिहायला लागावं.

मंदार, तुम्हाला त्यांच्या किडनॅपिंगसाठी इथली किमान शंभर तरी मंडळी मदत करतील यात शंका नाही. दाराखालून लिहिलेले किमान इतके इतके ताव बाहेर सरकवल्याशिवाय जेवणाचे ताट द्यायचे नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छित विषयांची यादी तयार करून ठेवावी आणि ती नीट पूर्ण झाल्याशिवाय सुटका करू नये. याशिवाय सोबत एक रेकॉर्डरही ठेवावा, म्हणजे समजा लिहून हात भरून आले तर तो वेळ वाया न जाता व्याख्यानेही जोडीने तयार होत राहतील. ही कदाचित कायमसाठीच व्यवस्था करावी लागेल असा माझा अंदाज आहे.

मला वाटतं की आपण सगळ्यांनी, 'मामा नसेल लिहायचे तुम्हाला तर चालेल पण मग आम्ही तुमच्यावर लिहू आणि दर आठवड्याला मायबोलीवर प्रसिद्ध करून सोडू' म्हटले कीच आपले काम होईल.

उगाच किड्न्याप आणि कोंडायबिंडायची गरज नाही...

अरे वा, अमेय खुप छान आणि अगदी परफेक्ट लिहिलत.
खरोखर प्रचंड सकारात्मकता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मामा. प्रचंड वाचन, स्मरणशक्ती, चपखल उदाहरणे, अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद, सर्हुदयता, नेमके सार शोधता येण्याची क्षमता अन अत्यंत विनम्रपणा. सगळ्या गोष्टी म्हणजे मामा. एक कडक सॅल्युट मामा. धन्यवाद अमेय Happy

अशोक मामांवरचा लेख.. सुरेख जमलाय, अमेय.
मायबोलीवरचा मामांचा आस्वादक, मिमांसक, अन तरीही संयमी वावर माझ्यासाठी अत्यंत अनुकरणीय आहे.
मामांची अनेक अधिक बाजुंनी छान ओळख करून दिली आहेस.

Pages