मुगाच्या डाळीची खिचडी,पापड

Submitted by pltambe@yahoo.co.in on 19 April, 2014 - 23:36

मुगाच्या डाळीची खिचडी,पापड

 खिचडी,वांग्याचे भरीत व कडबोळी आणि पापड xxx.jpg
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ (मोड आलेले हिरवे किंवा पिवळे मूग सुद्धा चालतील) ,दोन वाट्या तांदूळ , चवीपुरते मीठ,गुळाचा बारीक खडा ,लाल तिखट, दोन चमचे गोडा मसाला ,बचकभर भाजून किसलेले सुके खोबरे ,भाजून घेतलेले एक चमचा जिरे फोडणीसाठी एक डाव तेल.मोहोरी,जिरे,हळद ,मेथ्या दाणे (मोड आलेली मेथी असेल तर जास्त चांगले,किंवा कासुरी मेथी घातली तरी चालेल), हिंग ,असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर,कढीपत्त्याची १०-१२ पाने,ओल्या नारळाचा चव,खिचडीबरोबर तोंडीलावणे म्हणून कडबोळी,लिज्जत पापड(भाजून किंवा तेलाचे बोट लावून मायक्रो ओव्हन मधून काढलेला) ,तळणीच्या सांडगी मिरच्या (दहयातले कांदा घालून केलेले डांगर सुद्धा खिचडी बरोबर तोंडीलावणे म्हणून उत्तम लागते)व साजूक तूप.
कृती : प्रथम मुगाची डाळ व तांदूळ धुवून घेऊन अर्धा तास आधी भिजत ठेवा. सुके खोबरे व जिरे भाजून घेऊन मिक्सर मधून कच्चा मसाला वाटून घ्या,जाड बुडाच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात प्रथम मोहोरी व जिरे टाकून ते तडतडल्यावर फोडणीत मेथ्या दाणे,हळद व हिंग घालून परता,मग कढीपत्त्याची पाने व थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा परता,शेवटी भिजत ठेवलेली मुगाची डाळ व तांदूळ घालून चांगले परतून घ्या,आता त्यात कच्चा मसाला,गोडा मसाला ,चवीनुसार लाल तिखट,मीठ,गूळ घालून पुन्हा एकदा परतून घ्या व ते मिश्रण प्रेशर कुकरमध्ये काढून घेऊन त्यात सहा वाट्या पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या देवून शिजवून घ्या.
सर्व्ह करतेवेळी डिश मध्ये खिचडी काढून त्यावर दोन चमचे साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव भुरभुरून
टीप : खिचडी सोबत तोंडीलावणे म्हणून ३-४ कडबोळी,एखादी चकली,दोन तळणीच्या सांडगी मिरच्या एखादा पापड यापैकी जे असेल ते द्यावे. खिचडीसोबत तोंडीलावणे म्हणून या सर्व गोष्टीमुळे खिचडीची लज्जत वाढते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<खिचडी सोबत तोंडीलावणे म्हणून ३-४ कडबोळी,एखादी चकली,दोन तळणीच्या सांडगी मिरच्या एखादा पापड यापैकी जे असेल ते द्यावे. खिचडीसोबत तोंडीलावणे म्हणून या सर्व गोष्टीमुळे खिचडीची लज्जत वाढते.>> Happy

सर,

सुप्रभात! एकसे एक पाककृती देत आहात. लक्षात घ्या, वरवर पाहताना ह्या सर्व आम माणसाच्या रोजच्या जेवणातील पदार्थांच्या पाककृती वाटतील. पण अनेकदा बॅचलर्सना स्वतःच्या हाताने काही करावे लागते, अनेकदा वेळ कमी असतो, अनेकदा एखादी व्यक्ती एकटीच असते आणि कंटाळलेली असते, अश्या वेळी अश्या पाककृती करता येतात, पण त्या माहीत नसल्या तर? त्या अर्थाने हे धागे महत्वाचे आहेत.

मुगाच्या डाळीची खिचडी आणि गोड गुजराथी शैलीतील कढी हेही एक मस्त काँबिनेशन आहे.

धन्यवाद!

खिचडी कढी जाम आवडते.
जरा फोटो मोठे करून द्या ना. पिकासावरुन फोटो कसे योग्य आकारात द्यायचे याचा चांगला धागा आहे माबोवर, अगदी पेंट मध्येही री साईझ ऑप्शन आहे तो वापरुन अगदी ३ एम बी चा फोटोही १०० के बी च्या आत येतो मग थेट अपलोडही होऊ शकेल पिकासाशिवाय.

डाळ व तांदुळाचे समप्रमाण घेऊन गुळ न घालता देखील छान होते. मसूर, तूर, मूग डाळींचे मिश्रण देखील मस्त लागते.
खिचडी चा फोटोत रंग एकदम सही आला आहे.
अशा खिचडीसमवेत टोमॅटो सार, गोड लिंबू लोणचे ही, मस्त लागते.

या खिचडीबरोबर ताकातील कढी सुद्धा छान लागते. पुण्याच्या 'दुर्वाँकूर' मध्ये मिळते.त्याचप्रमाणे दहयातील कांदा-वांग्याचे भरीतही छान लागते. रात्री केलेली ही खिचडी उरलीच तर दुसरे दिवशी ही शिळी खिचडी गर्मदूध व दही घालूनही छान लागते.

ऑल टाइम फेवरेट.....मस्त फोटो

जरा फोटो मोठे करून द्या ना. पिकासावरुन फोटो कसे योग्य आकारात द्यायचे याचा चांगला धागा आहे माबोवर,>>>>> लिंक मिळेल का

या खिचडीबरोबर ताकातील कढी सुद्धा छान लागते. पुण्याच्या 'दुर्वाँकूर' मध्ये मिळते.>>आहाहा!! मस्त लागते.
माझ्या भावाने एकदा तिथे विचारले होते कि 'तुमच्याकडे फक्त खिचडी आणि कढी मिळेल का?' Happy

वर प्रतिसाद दिलेल्या अमेय यांची गुजराती कढीची रेसिपी इथेच आहे मायबोलीवर. ती कढीही मस्त लागते खिचडीबरोबर. http://www.maayboli.com/node/41154

सध्या मी अजिबात तांदूळ न वापरता किन्वा आणि डाळी घालून खिचडी करते, ती ही मस्त लागते.

हात सडीचा तांदूळ वापरुन पहा. फक्त तो सहलीकडे मिळत नाही. पुण्याच्या मार्केट यार्द मध्ये मिळतो ७० रुपये किलो.