खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)
खरं सांगू, आम्हां ट्रेकर्सच्या मनातसुद्धा असाच एक ‘जिप्सी’ खोलवर दडलेला असतो. एरवी पोटापाण्यासाठी ‘नस्त्या उठाठेवी’ करतानाही, ‘सख्या सह्याद्री’ची ओढ स्वस्थ बसू देत नाही. अन्, कोणे एके दिवशी - वळणवेड्या रानवाटांची, रानफुलांच्या घमघमाटाची, रौद्र कातळभिंतींची, भारावून टाकणा-या दुर्गरचनेची, तंगडतोड माळरानांची, पूर्वजांच्या उत्तुंग कर्तृत्वाची गाथा सांगणा-या कोरीव लेण्यांची, कुण्या पाखरांच्या मोहक शीळांची, दाट अंधाऱ्या रानव्याची – ‘रानभूल’ मनी दाटून येते... गेल्या आठवड्यात असंच काहीसं झालं, अन् बेत शिजू लागला सह्याद्रीच्या आडवाटांच्या ट्रेकचा...
...‘फार दिवस ट्रेकला जाऊ दिलं नाही, तर या प्राण्याला (अस्मादिकांना) आवरणं मुश्कील होतं’, हे ऑफिसमधल्या अन् घरातल्या बॉसनी भोगलेलं असल्यानं ट्रेकसाठी सुट्टी लग्गेच मंजूर झाली. बहुतांशी ट्रेकर दोस्त संसारी कामांमध्ये अडकल्याने एकटा मिलिंद या ट्रेकला येऊ शकणार होता. छोट्या तुकडीनं भटकंती करण्याचे संभाव्य धोके गृहीत धरले. ट्रेकमध्ये पायथा – मध्य – शेवट अश्या ठिकाणी पाणी अन् वस्ती असेल, पण सह्याद्रीची अफलातून दृश्यं अन् तंगडतोड चाल असेल, अश्या अटी लादून घेतल्या. संदर्भपुस्तकं – गुगल मॅप्स - करायच्या ट्रेक्सची यादी यांचं रवंथ केल्यावर ट्रेक कुठल्या भागात अन् कसा असावा, हे हळूहळू स्पष्ट होवू लागलं.
लोणावळ्याच्या दक्षिणेला तेलबैला – घनगड – सुधागड असे नितांतसुंदर अन् ट्रेकर-प्रिय दुर्ग आहेत. या मुलुखात तथाकथित विकासाच्या रेट्यामुळे निसर्गाला ओरबाडून उभारलेली खाजगी पर्यटनस्थळे आली, अन् इथली दुर्गमता हरवू लागली. असं असलं, या मुलुखातल्या पायथ्याची कोकणपट्टी अन् सह्याद्रीच्या घाटमाथ्याला जोडणा-या काही जुन्या ‘घाटवाटा’ (दुर्गम पाऊलवाटा. डांबरी रस्ते नव्हेत) ट्रेकचा रसदार अनुभव देणार, या विश्वासावर आम्ही कूच केलं.
काळाच्या ओघात हरवलेली सह्याद्रीच्या कुशीतली ‘खडसांबळे लेणी’
भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत खोपोली – पाली रस्त्यावर आमची कार दौडत होती. तेजोनिधि लोहगोल गगनराज भास्कराच्या दिव्य तेजाने दूरवर तेलबैल्याच्या जुळ्या भिंती झगमगत होत्या.
ठाकूरवाडीपाशी पाठीवर सॅक चढवल्या. १०० मी उतरून खडसांबळे गावाजवळ नदी पार करून मागं वळून बघितलं, अन् थबकलोच.. उत्तरेला जवळच सुधागडच्या पहाडाशी लगट करत खोलवर धावलेली सह्याद्रीची मुख्य रांग, अन् पाठीमागच्या चिंचोळ्या खो-यात उठवलेल्या तेलबैल्याच्या खड्या कातळभिंती – असं देखणं दृश्य!
खडसांबळे गावापासून पाऊणेक तास अंतरावर लेणी लपली आहेत. थोडक्या चढाईनंतर पदरातून आडवं गेलो. उजवीकडे उतरणा-या डोंगरसोंडेला वळसा घालून पल्याड जंगलात कुठेतरी लेणी कोरली असणार होती. दिशाशोधनाचे फंडे वापरत, घनगडकडे जाणा-या नाळीच्या वाटेची दिशा डावीकडे सोडली.
ओढ्याच्या पात्रापलीकडे शेकडों फुलांनी घमघमणां-या करवंदीच्या जाळ्या होत्या. कधी बघितल्या नसतील, इतक्या १५ फूट उंचीच्या.
वैराण माळावरची आडवी वाट तुडवत सोंडेला वळसा घालून दाट रानात शिरलो. अखेरीस उभ्या कड्याच्या पोटात लेण्याची जागा दिसली. झाडो-यातून सूर्याची कोवळी किरणं अलगद उतरत होती.
इ.स. पूर्व दुस-या शतकात खोदलेले हे लेणं हीनयान बौद्ध शैलीतले (बुद्धाची पूजा ‘स्तूप’ चिन्हरुपाने करणारे) आहे. काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी मुंबई मराठी मिशनचे रेव्हरंड अॅबट यांनी १८८९ साली शोधून काढली. खडसांबळे लेण्यांना ‘पांडवलेणी’ किंवा पायथ्याच्या गावच्या नावावरून ‘नेणावलीची लेणी’ अश्या नावानी देखील ओळखतात. कातळात कोरून काढलेल्या प्रशस्त दालनात २१ विहार अन् एक स्तूप आहे. या लेण्याच्या पश्चिमेला अर्ध्या किमी अंतरावर दुर्गम जागी अजून १० विहार आहेत.
(संदर्भ: सांगाती सह्याद्रीचा)
लाल मुरुमाच्या स्तरात कोरल्या असल्याने लेणी फारंच भग्नावस्थेत आहेत आणि खोदाईची सफाई साधी आहे.
एखादं कोरीव पाण्याचं टाकं दिसलं खरं, पण साधारणत: अन्य लेण्यांमध्ये दिसणारी पाण्यानं भरलेली टाकी किंवा शिलालेख असंही काही दिसेना. कातळाची योग्य पत नसल्याने अन् पाण्याच्या अभावाने या लेण्या किती वापरल्या गेल्या असतील यात शंका वाटली.
म्हणून, कालांतराने कोरलेली भाजे - कार्ले अशी लेणी उंचावर कातळाची योग्य पत निवडून खोदली असावीत. लेण्यांच्या तोंडापाशी दगडांचा खच पडलेला.
बेचक्यात असल्यानं वारं नाही. अख्ख्या दालनात वटवाघळाच्या विष्ठेचा सडा पडलेला. त्यामुळे मुक्कामाचा बेत आखायला अयोग्य ठिकाण. पण, पुढची काही शतकं सह्याद्रीत लेणी खोदण्याचा जो भव्य उपक्रम चालू राहिला, त्यातला पहिल्या काही प्रयोगांपैकी एक - म्हणून इतक्या आडवाटेला जाऊन आम्ही ही लेणी धुंडाळली अन् खडसांबळे गावात परतलो.
तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अफाट दर्शन घडवणा-या ‘नाणदांड घाटा’ची चढाई
प्राचीन बंदर चौलपासून सह्याद्री घाटमाथ्यावर चढणा-या जुन्या घाटवाटांपैकी तीन व्यापारी घाटवाटा - नाणदांड घाट, नाळेची वाट अन् घोणदांड घाट या खो-यात आहेत, तर त्यांचे संरक्षक दुर्ग कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला अन् घनगड असे दिग्गज. सर्वात जलद चढणारी अन् वापरातली असली, तरी ‘नाळेची वाट’ चिंचोळ्या झाडीभरल्या घळीतून चढताना घामटं काढतो.
आम्ही मात्र उत्तरेला सुधागडपासून खोलवर आत गेलेल्या सह्याद्रीच्या भिंतीचं अन् तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अनोखं दर्शन घेण्यासाठी लांबची ‘नाणदांड घाटा’ची वाट घेतली. उन्हांचा ताव अन् आर्द्रतेनं जीव कासावीस होणार, हे गृहीत धरलंच होतं. पण पदरातून कातळावरून अन् गवताळ टप्प्यांवरून तासभर आडवं चालताना सागाच्या वाळकी पानं अचानक सैरभैर उधळू लागली, निळ्याशार आभाळात ढग दाटू लागले, शेतात राब जाळण्यासाठी पानं उतरवलेल्या झाडांची भूंडी खोडं लावू लागली अन् घिरक्या घालणा-या ससाण्याची वा-याच्या तडाख्यामुळे धडपड सुरू झाली. माथ्यावर ढगांनी सावली धरलेली, तर समोर सुधागड ते तेलबैल्याचं सुरेख ‘वसूल’ दृश्य..
‘नाणदांड घाटा’ची सुरुवात सापडताना थोडी खटपट करावी लागली. वाटाड्याच्या मदतीची गरज भासली नसली, तरी दिशाशोधनाचे तंत्र – मंत्र – यंत्र वापरून खो-याच्या उजव्या बाजूला चढणारी वाट घेतली. माथ्याकडचा कातळकडा अन् घळ लक्षवेधक होती. फेब्रुवारी असूनही झरे वाहते होते. भुंगे अन् मधमाश्यांची लगबग, आभाळातल्या ढगांचे मनोहारी लाटा अन् फुलांनी पेटलेल्या पलाशवृक्षांमुळे रानात जिवंतपणा होता.
हळूहळू चढत दाट जंगलातून डोंगरधारेजवळ जाऊ लागली. दक्षिणेची झाडीभरली घळ अन बलदंड कातळ लक्षवेधी होते. पण, घाटांच नाव 'नाणदांड' असल्याने वाट घळीतून न जाता, दांडावरून जाणार असे फंडे मारण्यात आले.
माथ्याकडून उतरलेल्या दांडावरचा मोठ्ठा कातळटप्पा हे ‘नाणदांड’ चढण्यासाठी अचूक दांड ओळखायची खूण.
झुडूपी रानातून आडवं जात, पुढे कारवी अन् घसा-यावरून उभं चढून गेलो. नाणदांड सोंडेवरच्या कातळटप्प्यावर पोहोचेस्तोवत चांगलीच धाप लागली. खडसांबळे गावापासून निघून अडीच तास झालेले, अन् घाटाच्या निम्म्या उंचीवर झाडो-रात सॅक्स टेकवल्या.
भिरभिरणा-या ढगांच्या सावलीत पाऊण तासाची विश्रांती अन् पौष्टिक जेवण गरजेचंच होतं. प्रत्येक पावलागणिक उभी होत जाणारी दांडाची उभी वाट चढल्यावर, कारवीतून जाणारी बारीक आडवी वाट धम्माल होती.
प्रत्येक पावलागणिक तेलबैल्याच्या जोडभिंती, सुधागडाचे तट-कडे अन दूरवर डोकावणारा पालीजवळचा सरसगड असं मोठ्ठं लोभस दृश्य बघून थरारत होतो. नाणदांड घाट आमच्यावर प्रसन्न झाला.
अन् सामोर आलं घाटमाथ्यावरचं केवणी गावाचं पठार. वणव्यात करपलेल्या माळामागे केवणी गाव अन् उठवलेला घनगड हे राकट दृश्य समोर होतं. गावकरी किती दुरुन पाणी आणतात, हे कळूनही केवणी गावात समोर आलेल्या पाण्याच्या कळशीचं अगत्य नाकारणं शक्य नव्हतं. केवणीच्या पठारावरून घनगडकडे जाताना खिंडीतून सह्याद्रीच्या रंगमंचावर दिसत होते तेलबैला - सुधागड अन् घनगड यांच्यासारखे कसलेले कलाकार.
सोबतीला तालेवार सोबत होती कोकणात कोसळलेल्या असंख्य रेखीव डोंगरधारा अन् घळी.
गवताळ माळावर दडलेली परीसंस्था (इकोसिस्टीम)
झाडावर बहरलेली ऑर्कीड्स, त्यावरून अवचित तरंगत जाणारा महाभृंगराज असं किती किती कवतिक सांगू आमच्या सह्याद्रीचं...
सह्याद्री - घनगडाचा कातळमाथा - ढग - ऊनसावली - गवत - गुराखी यांच्या कॅलिडोस्कोपचा अनोखा आकृतीबंध सामोरा होता. अंगावर एक सुखद शहारा आला. कितीतरी वेळ तिथे बसून राहिलो.
रात्रीच्या मुक्कामास एकोले गावच्या मारुती मंदिरात आसरा घेतला. पुनवेच्या टिपूर चांदण्यात गर्रम तांदळाची भाकर, पिठलं, कांदा अन् लाल मिरचीचा ठेचा यांची लज्जत काही औरच.
उतरायला ‘अंधारबन’ नावाची निबिड अरण्याची घाटवाट
आदल्या दिवशी घनगडच्या एका अंगाने परिक्रमा झाली होती. दुस-या बाजूच्या सह्याद्रीचं दर्शन घेण्यासाठी दुस-या दिवशी भल्या पहाटेचं निघालो. गाडीच्या मदतीने ८ – १० किमी दक्षिणेला पिंप्री गावाजवळील कुंडलिका नदीच्या अत्यंत देखण्या दरीपाशी पोहोचलो.
करकरीत कड्यांच्या दर्शनाने अक्षरश: थरारून गेलो. सह्याद्री-देवतेला मनोमन दंडवत केला.
पिंप्री पाझर तलावापाशी पोहोचलो, तर पाण्यावर धुक्याचे ढग रेंगाळले होते.
आजचा पल्लादेखील मोठ्ठा होता. वीर नावजी बलकवडे यांच्या स्मारकापासून कुंडलिका दरीचं अन् अंधारबन-नावजी अश्या सुळक्यांचं सुरेख दर्शन झालं.
कोवळ्या सूर्यकिरणांची ऊब हवीहवीशी वाटत होती.
पिंप्री गावापासून तब्बल दोन तास ‘अंधारबन’ जंगलाची आडवी चाल होती. कधी ओढ्यांच्या घळीतून, तर कधी पाचोळ्यातून सह्याद्रीच्या संवेदनशील टप्प्यांमधून दमदार पण सुखद चाल होती.
निसर्ग अभ्यासकांसाठी उत्तम अश्या या रानात कमीत कमी १५ प्रकारच्या पक्ष्यांनी आम्हांला साद घातली असेल. या रानाला स्वार्थी जगाची दृष्ट लागू नये अशी सह्याद्रीचरणी प्रार्थना अन् इथल्या निसर्गात कृपया ढवळाढवळ करू नये, अशी पर्यटकांकरता कळकळीची विनंती!
रानातून बाहेर पडल्यावर सूर्यकिरणांनी डोळे दिपले. घनगडच्या दक्षिण बाजूचं दूरदर्शन घेत हिर्डी गावचं लांबचलांब पठार तुडवलं, अन् शंकराच्या देवळापाशी थंड पाण्याच्या कुंडापाशी गावक-यांशी हितगुज केलं.
हिर्डी गावापासून साधारणतः ट्रेकर्स भिरा गावाकडे उतरतात. आम्ही मात्र गाडीपाशी परत येण्यासाठी कमी वापरातल्या वाटेनं नागशेत गावाकडे निघालो. उभ्या उताराच्या टप्प्यांवरून परत एकदा खडसांबळे लेणी डोकावली, अरे आणि मागे हे केवणी पठार, तो तेलबैल्याचा माथा अन् आमचा सखा घनगड.
तासाभराच्या उतराईनंतर धनगरवाड्यापाशी विसावलो. संत्री – चिक्की – खजूर यांच्या संजीवनीने परत एकदा उत्साहात निघालो अन् अंधारबन घाटाची उंची उतरली.
पिंप्री गावापासून अंधारबन जंगल – हिर्डी पठार आणि उरलेला घाट उतरायला साडेचार तास चाल झाली होती.
पाठीमागच्या सह्याद्रीच्या भिंतीचं वैभवाचं कवतिक करत असतानाच, सामोरं आलं एक निसर्गआश्चर्य. नागशेतच्या अलीकडे नदीच्या पात्रात खोल रांजणखळगे अन् कोंडजाई देवीचं स्थान. स्थानिक भाविक कोंडजाईला साकडं घालत होते.
शेवटचे दोन तास नदीच्या पात्रातून पश्चिमेला जात, खडसांबळे लेण्यांच्या डोंगराला वळसा घातला. नदीच्या पात्रापाशी धुणं धुणा-या पोरी, उन्हाने त्रासलेल्या म्हशी, उगीच इकडे तिकडे बागडणारे बगळे, नदी पात्रातल्या वाळूवर डोळा ठेवणारे कंत्राटदार, बहरलेला पळस, भान हरपून मनसोक्त क्रिकेट खेळणारी पोरं यांच्या बाजूने सणसणीत तापलेल्या बैलगाडी वाटेने आम्ही चिकाटीने किती चाललो याची मोजदातचं नाही, अन् सुधागडच्या पायथ्याला ठाकूरवाडीला कसं(बसं) पोहोचलो, ही वेगळी कथाच आहे.
खो-यातली गावं रस्त्यांनी जोडलेली नाहीत. म्हणून पाऊलवाटेवरून बाईक हातात घेवून जाणारा एक तरूण आम्हांला म्हणला, “आरं बाबा, असली चाल तुम्ही लोकंच करा.. आमच्यानं नाही व्हायची. तुम्हांला काय सरकारी अनुदान मिळतं का..”
त्याला काय अन् कसं समजवावं, की अरे ‘एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...’
टीप: तांत्रिक चढाई कुठेही नसली, तरी जबरदस्त चाल अन् आडवाटा यामुळे हा ट्रेक फक्त ट्रेकर्ससाठी आहे. सह्याद्री जैविकदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने इथे जबाबदारीने ट्रेकींग करावे, ही कळकळीची विनंती.
- © साईप्रकाश बेलसरे, २०१४
फोटोज: मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे
पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा, ११ एप्रिल, २०१४;
http://www.discoversahyadri.in/2014/04/KhadsambaleNandandAndharbanKondja...
अप्रतिम वर्णन आणि
अप्रतिम वर्णन आणि फोटो!
कुंडलिका दरीमधून बाहेर पडला पाहिजे होतास. अर्थात हाताशी २ दिवस हवेत.
मस्त!
मस्त!
सुंदरच! आभाळाचे अन डोंगरांचे
सुंदरच! आभाळाचे अन डोंगरांचे काही फोटोज तर ए१ आलेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम वर्णन
अप्रतिम वर्णन
मस्तच रे सुमीत.. छान भटकंती
मस्तच रे सुमीत.. छान भटकंती चालू आहे.. लिमयेचे दर्शन फक्त तुझ्या ट्रेकच्या फोटोतूनच होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कातील फोटो आणि सुंदर वर्णन...
कातील फोटो आणि सुंदर वर्णन... भन्नाट ट्रेक
अंधारबनची वाट एकच नंबर... पावसाळ्यात करण्या जोगी आहे का?
अप्रतिम वर्णन आणि
अप्रतिम वर्णन आणि फोटो...........
खुप मस्त ! अगदी छानच वाटलं हे
खुप मस्त ! अगदी छानच वाटलं हे फोटो बघून.
अप्रतिम वर्णन. इथे एकदा तरी
अप्रतिम वर्णन. इथे एकदा तरी जायला हवे आहे, असा मोह होतोय..
अप्रतिम लेखन आणि अ फा ट
अप्रतिम लेखन आणि अ फा ट फोटोज!!!
लोकप्रभाच्या अंकात हा लेख आणि फोटोज भाव खावून जात आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन येऊ देत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम लेखन आणि अ फा ट
अप्रतिम लेखन आणि अ फा ट फोटोज!!!>>+१
ekdum kadak.... photos are
ekdum kadak.... photos are awesome
मस्तच फे मार्च २०१३ मध्ये
मस्तच फे मार्च २०१३ मध्ये सुधागड ,तैलबैला ,ठाणाळे तीन ट्रेक झाले .एकदा खोपोली -पाली रस्त्यावरच्या पेडली कडून जायचे आहे .खडसांबळेसाठी ही माहिती उपयोगी पडेल .फोटो छानच .गुगलमैपसने इकडे घाटवाटेला काही उपयोग होतो का ?
खुपच सुंदर. फोटोज आणि वर्णन
खुपच सुंदर. फोटोज आणि वर्णन दोन्हीही.
शैलजा प्रितीभुषण लंपन वरदा सृ
शैलजा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रितीभुषण
लंपन
वरदा
सृष्टी
दिनेश.
कविन
प्रवीण सुश्मा
नरेश माने
प्रतिक्रिया वाचून खरंच छान वाटलं… खूप खूप धन्यवाद!!!
सूनटून्या::
खूप धन्यवाद…:)
ठाकूरवाडीपाशी गाडीपाशी परत यायचं असल्याने, कुंडलिकेच्या उत्तरेला अनवट वाटा धुंडाळत गाढवलोट नावाच्या घाटाने उतरलो. अर्थात, कोंडजाईच्या डोहाचा बोनससुद्धा मिळाला…
इंद्रा::![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!!! अंधारबनच्या वाटेवर ३-४ स-ण-स-णी-त ओढे आहेत. आमच्या फोटोत त्यातला सगळ्यात मोठ्ठा ओढा दिसेल. ऐन पावसाळ्यात नक्कीच रिस्की आहे. माझ्या ओळखीचे ट्रेकर्स पावसाळ्यात इथून कसेबसे परतले होते. अर्थात, जंगलाची खरी मजा ऊन तापायला लागल्यावरंच!!!!
पिंगू:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वृत्तांत वाचून तुम्हाला सह्याद्री भटकंतीची ओढ लागावी, हाच तर खरा हेतू आहे. योग्य ऋतू बघून, हा ट्रेक अवश्य करा.
Srd::
खूप धन्यवाद!!!
मी स्वत: जीपीएस वापरत नाही. स्थाननिश्चितीसाठी ट्रेकर्सना मदत व्हावी, म्हणून गुगलमॅपवर घाटवाट अंदाजे नोंदवली आहे.
योकु::![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्यावर सह्याद्रीची कृपा झाली असं म्हणावं लागेल, कारण ट्रेकला प्रचंड ऊन आणि आर्द्रता असेल, अश्या अपेक्षेनं गेलेलो… प्रत्यक्षात अफलातून वातावरण मिळालं फोटोज साठी…
जिप्सी::![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्यासारख्या एक्स्पर्टची दाद खूप मोलाची… खूप धन्यवाद!!!
लोकप्रभामध्ये संपादकांनी लेख आणि फोटोजची देखणी मांडणी केलीये…
कर्नाटकातील सह्याद्री कोणी
कर्नाटकातील सह्याद्री कोणी केला आहे का ?कुमारपर्वता नाही म्हणत पण काही सोप्या घाटवाटा ?
अप्रतिम
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खो-यातली गावं रस्त्यांनी
खो-यातली गावं रस्त्यांनी जोडलेली नाहीत. म्हणून पाऊलवाटेवरून बाईक हातात घेवून जाणारा एक तरूण आम्हांला म्हणला, “आरं बाबा, असली चाल तुम्ही लोकंच करा.. आमच्यानं नाही व्हायची. तुम्हांला काय सरकारी अनुदान मिळतं का..” >>>>>> लै भारी दोस्ता ......
सह्याद्री जैविकदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने इथे जबाबदारीने ट्रेकींग करावे, ही कळकळीची विनंती.>>>> हे विशेषच भावले .....
सुंदर फोटो, झकास वर्णन ..... संपूर्ण लेख अगदी जमून आलाय .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेकानेक शुभेच्छा ....
छान लिहिला हे लेख. फोटो पाहून
छान लिहिला हे लेख. फोटो पाहून तर लगेच bagpack उचलून निघावास वाटत आहे, आम्ही १२-१३ Apr ला सुधागड लाच होतो.
अप्रतिम वर्णन आणि भन्नाट
अप्रतिम वर्णन आणि भन्नाट फोटो...
फोटो क्लास आहेत
फोटो क्लास आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
सुंदर.
सुंदर.
या रानाला स्वार्थी जगाची
या रानाला स्वार्थी जगाची दृष्ट लागू नये अशी सह्याद्रीचरणी प्रार्थना अन् इथल्या निसर्गात कृपया ढवळाढवळ करू नये, अशी पर्यटकांकरता कळकळीची विनंती! <<< +१००००००००००
केवळ भन्नाट !!!!
केवळ भन्नाट !!!!
काय पायाला भिंगरी लावलीय यार
काय पायाला भिंगरी लावलीय यार . जबरदस्त , खतरनाक, भन्नाट.
याला वेड च पाहिजे...
डिस्कू….तू म्हणजे फार
डिस्कू….तू म्हणजे फार प्रॉब्लेम करून ठेवतोस राव… प्रत्येक ब्लॉगच्या वेळी कौतुकाचे नवीन शब्द आणायचे तरी कुठून !!!
या वेळी एवढीच प्रतिक्रिया !!!
अफाट ट्रेक म्हणून च फोटो आणि
अफाट ट्रेक म्हणून च फोटो आणि वर्णनही अफाट!
Srd:: महाराष्ट्रातला
Srd::
महाराष्ट्रातला सह्याद्री थोडाफार फिरला, तर धाप लागतीये आणि खूप सारं बाकी आहे.
पण, खरंय, महाराष्ट्राबाहेर सह्याद्री थोडातरी केला पाहिजे राव….
झकासराव
Sayali Paturkar
अश्विनी के
कंसराज
सुनिधी
सुंदर.
वैनिल
मित
मानुषी
प्रत्येक प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
मन:पूर्वक धन्यवाद!!!!
शशांकजी::![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमची इतकी सुंदर दाद वाचून खूप छान वाटले. धन्यवाद
अमित M., संदीप पांगारे, सह्याद्रीमित्र:::![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती सुंदर प्रतिक्रिया!!!
खूप खूप आभारी आहे.
भटकंती वृतांत वाचून सह्याद्रीची ओढ तुम्हाला अन मलाही लागावी,
इतकाच हेतू आहे, हे फोटोडॉक्युमेंटेशन करण्याचा
Pages