बटाट्यांच्या काचर्‍या

Submitted by pltambe@yahoo.co.in on 13 April, 2014 - 20:15

बटाट्यांच्या काचर्‍या
 काचर्‍यांची भाजी xxx.jpg
आयत्यावेळी कामे वेळात कोणती भाजी करावी असा जर प्रश्न पडला तर त्याचे एकमेव उत्तर म्हणजे बटाट्यांच्या काचर्यां ची भाजी हे होय. त्याचीच रेसिपी आज मी येथे देणार आहे.
साहित्य : माणशी दोन बटाटे,माणशी एक कांदा,चवीनुसार लाल तिखटव मीठ,फोडणीसाठी तेल,मोहोरी,हिंग,जिरे,हळद व ५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याची साले काढून पातळ काप करून घ्यावेत व ते मिठाच्या पाण्यात ठेवावेत. कांद्याची साले काढून उभे काप करून घ्यावेत.मग गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तापल्यावर त्यान मोहोरी व जिरे टाकावे.मोहोरी तडतडल्यावर हळद व हिंग आणि कढीपत्याची पाने टाकून परतून घ्यावे,मग त्यात बटाट्याचे काप व कांद्याचे काप टाकून चवीनुसार तिखट व मीठ घालून परतत राहावे. मग कढईवर झाकण ठेऊन भाजी शिजवू द्यावी. बटाटे व कांदा शिजल्यावर झाकण काढून पुन्हा एकदा परतावे व बटाटा खरपुस झाल्यावर गॅस बंद करावा. केवळ १०-१५ मिनिटात ही बटाट्यांच्या काचर्यां ची खमंग व चविष्ट भाजी तयार होते व पोळीबरोबर खायला फारच छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी प्रचंड आवडती भाजी!!! कांदा टाकत नाही त्यामुळे काचर्‍या मस्त खमंग कुरकुरीत क्रिस्पी होतात. याबरोबर खरपूस मऊसूत चपात्या, मटकीची उसळ, सायीचं घट्ट दही साखर टाकून फेटलेलं / पिकलेली केळी, टोमॅटो मिरचीचं फोडणीचं वरण, आणि वाफाळता थोडा तुपकट भात!! आहाहा लिहीतानाच तृप्त झालेय. स्वर्गातही अस्लं पंचपक्वान्न मिळत नसेल Happy

मस्त .. आईकडे आम्ही याला ट्रीपची भाजी म्हणतो कारण शाळेच्या ट्रीपला अल्मोस्ट सगळ्यांच्या डब्यात हीच भाजी आणि पुरी.. Happy

लोकहो पण साले कशाला काढता, आयता फायबर मिळतो आहे तर. मी बर्‍याचदा सालींसकट खाल्लेली आहे. तशीही चांगली लागते. Happy

तुम्हीसुद्धा माझ्यासारख्याच खवय्या दिसता आहात.>> अगदी अगदी सर पण तुमच्यासारखं हौशीनं निगुतीने करण्याइतके पेशन्स आणि तितकीशी आवड मात्र नाही Happy

अन्जू मीसुद्धा सालासकट बटाट्याच्या काचर्‍या करते. फक्त बटाटे व्यवस्थित धुवून घेते आणि कांदा नाही. कांद्याने थोडी ओलसर होते. बिना कांदा मस्त कुरकुरीत काचर्‍या होतात. बाबांना मात्र कांदा आणि थोडा ठेचलेला (आणि खरपूस लाल केलेला) लसूण फोडणीला लागतो या भाजीला.

आई कधी कधी अख्खे धणेही टाकते पण मला मात्र प्लेन मसालेदार कुरकुरीत काचर्‍याच आवडतात.

कांदा बारीक चिरला नाही, केवळ उभाच चिरला (खेकडा भजीसाठी चिरू तसा) आणि बटाट्याच्या काचर्‍या कढईत सोडण्याआधी चांगला परतला तर भाजी अजिबात ओली होत नाही. एकदम खमंग होते.
लाल तिखटापेक्षा हिरवी मिरची घातली फोडणीत तर जास्त मजा येते.
तसेच फोडणीमधे स्वच्छ धुतलेली पाऊण चमचा उडीद डाळ सोडली तर एकदम वेगळाच स्वाद येतो.

अशी भाजी मी एकदा गुजरातेत खाल्ली होती
इतक्या अवघड पदार्थाची पाककृती दिल्या बद्दल धन्यवाद
नक्की करून बघेन

दोन वेरिएशन माझे लाडके..

१. चिंचेचा कोळ घालून ओली भाजी करणे.

२. बेसन पीठ लावून कोरडी भाजी करणे.

मी आज टिफीन मधे आणल्यात या काचर्या कुरकुरीत करुन....फक्त पॅन मधे तेल + जीरं + बटाट्याच्या काचर्या + थोडा एवरेस्ट चिकन मसाला + नॉर्मल मसाला + मीठ + किंचीत साखर घालुन मंद आचेवर तसच २०-२५ मिन ठेवल> मधुन मधुन हलवलं......एक सिरीयल पुर्ण संपल्यावर उठुन बंद केलं......भारी झालीय..... Happy