घोरवडेश्वर:: प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'

Submitted by Discoverसह्याद्री on 5 April, 2014 - 03:58

… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी!!!

घोरवडेश्वरला जाण्यासाठी पुणे-लोणावळे लोहमार्गावरील बेगडेवाडी (शेलारवाडी) स्थानकापाशी उतरायचं, किंवा पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाट्याच्या टोलनाक्याच्या अलिकडे दोनेक कि.मी. वर घोरवडेश्वरचा पायथा गाठायचा. ’गारोडी’, ’गरोडी’ किंवा 'शेलारवाडी लेणी' या नावाने देखील ओळखला जाणारा हा डोंगर. दक्षिणेला पायथ्यापासून १५० मी.(५०० फूट) उठावलेल्या डोंगरमाथ्यावर झेंडा फडकताना दिसतो. डावीकडे उंच टेपाड अन उजवीकडे जरा बुटकं टेपाड अश्या जोडशिखरांचा हा डोंगर म्हणजेच आपलं गन्तव्य.
वाटेवरून दिसतो मस्त नजारा..

माथ्यावर पोहोचायला आपापल्या आवडीनुसार २-३ वाटा आहेत. काहींना कमानीतून द्वारपाल नंदीमहाराजांच्या आज्ञेने चढणारा पायर्‍यांचा सोपान रुचतो. तर काहींना थेट खिंडीचा रोख धरून पाऊलवाट तुडवायला आवडतं. गिर्यारोहकांच्या सरावाचे कातळ अन अर्धवट खोदलेल्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूनं झाडीतून उभी वाट चढते. तर बहुतेकांना अमरजाईच्या देवळाअलीकडची धोपट वाट बरी वाटते. निसर्गमित्र संस्थेच्या प्रयत्नामुळे थोडकी झाडं जगली आहेत. जमलं तर माथ्याजवळच्या झाडांसाठी पाण्याचा एखाद कॅन घेऊन चढू लागायचं. खुणेच्या पिंप्रीच्या झाडाजवळून वीस-पंचवीस मिनिटांत आपण माथा गाठतो.

माथ्यावरून सभोवतालच्या परिसराचा अप्रतिम नजारा दिसतो.

पश्चिमेला बघताना इंद्रायणी अन पवना नद्यांच्या खो-यांना विभागणा-या डोंगररांगेतले दिग्गज लोहगड-विसापूर-भातराशी-तळेगावचा CRPF चा डोंगर लक्ष वेधतात.

हीच रांग पुढे घोरवडेश्वर, देहूरोडची अय्यप्पा टेकडी अन निगडीची दुर्गा टेकडी असे पल्ले गाठते. वायव्येला कुंडेश्वर - तासूबाई शिखरं, उत्तरेला भंडारा - भामचंद्र लेणी, तर दक्षिणेला पुरंदर - कानिफनाथ - सिंहगड - राजगड - तोरणा असे तालेवार डोंगर खुणावतात.
ऋतूचक्राची कमाल..

घोरवडेश्वरच्या डोंगराचं रुपडं खरं पालटतं ते मॉन्सूनच्या आगमनानंतर. कळाकळा आग ओकणा-या सूर्यनारायणाच्या दाहातून आसमंताची सुटका झालेली असते. एरवी उंच आभाळात भाव खाणारे ढग आता मात्र घोरवडेश्वरच्या माथ्याला ढुशा देवू लागतात. वाटतं - एखाद्या ढगाच्या पुंजक्यावर आरूढ होऊन विहंगासम मुक्तपणे विहरावं...

उजाड, ओसाड, ओका-बोका दिसणारा अवघा डोंगर हिरवागार होतो. झर्‍यां-ओढ्यांतून, नदी-नाल्यांतून ’पर्जन्य-चैतन्य’ खळाळत सुटतं. वृक्ष-लता, पशु-विहंग अवघे आनंदतात. पावसाचा 'संजीवनी’ स्पर्श झाला, की उन्हामुळे अन वणव्यानं रापलेल्या कांतीची ’कात’ टाकून देऊन डोंगरउतार रोमारोमांतून फुलू लागतात.
प्राचीन घाटवाट-दुर्ग-लेणी अश्या पाऊलखुणा शोधताना..

हा डोंगर श्री घोरवडेश्वराच्या देवस्थानामुळे सुपरिचित असला, तरी ही मुळात हिनयान बौद्ध लेणी (म्हणजे मूर्तीपूजेऐवजी बुद्धाची चिन्हरूपाने पूजा करणा-यांची) आहेत. नालासोपारा सारख्या प्राचीन बंदराकडून कोकणपट्टी पार करून पांथस्थ कोंडाणे लेण्यात विश्रांती घेत असतील. द्वारपाल राजमाची किल्ल्याच्या परवानगीनं कोकण दरवाजा किंवा बोरघाटाने घाटमाथा गाठून कार्ले-भाजे-बेडसे अश्या निसर्गरम्य लेण्यात मुक्काम करत असतील. लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना अश्या दुर्गाचं संरक्षण असल्याने व्यापार अन धर्मप्रचारात अडथळा येत नसेल. पुण्याच्या दिशेनं प्रवास करताना घोरवडेश्वर-भंडारा-भामचंद्र अशी बौद्ध लेणी दिमतीला असतील... प्राचीन काळच्या व्यापारी वाटा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात दुर्ग आणि पांथस्थांच्या विश्रांतीसाठी अन धर्मप्रचारासाठी खोदलेली कातळकोरीव लेणी अश्या नेहमीच्या ’घाटवाट-दुर्ग-लेणी’ जोड्या शोधताना मजा वाटते.
हीनयान बौद्ध लेण्यांचं वैभव..

खिंडीच्या पूर्वेला (डावीकडे) वळल्यावर दोन विहार आहेत.

कातळात कोरलेल्या विठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती आपण ओळखतो. पायापाशी नव्याने ठेवली आहे तुकोबारायांच्या सुबक मूर्ती.

या विहाराच्या वरील बाजूस पावठ्या अजून एका दुर्गम विहारापाशी नेतात.

खिंडीत पुरातत्व खात्याच्या निळ्या फलकापासून पुढं सरकलं की सामोरं येतं एक अप्रतिम निसर्गदृश्य! भन्नाट वार्‍यानं मन मोहरून जातं. अगदी क्षितिजापर्यंत नजर जाते. खालची छोटी छोटी शेतं, नाजूक, अवखळ निर्झर, गर्द झाडोरा सारं सारं डोळे भरून पाहावं नि तृप्त व्हावं. सारा परिसर हिरवागार झालेला. धबधबे, कधी धुके नि हिरवा गालिचा…

पलीकडच्या दरीचं सौंदर्य देहभान हरपून पाहिलं की हलकेच पावलं पुढे पडतात. डोंगरातील कातळ मन मोहवतो.

खिंडीतून पश्चिमेला (उजवीकडे) गेल्यावर कातळात थोड्या उंचावर दोन विहार अन कोरीव कोनाडे दिसतात. पाण्याच्या पोढी (टाके) पासून आपण येतो मुख्य चैत्यगृहापाशी पोहोचतो. लेण्यांचा दर्शनी भाग कोसळल्यामुळे, बाहेरून जाड भिंत बांधली आहे.

हे शैलगृह प्रशस्त आयताकृती आहे. जमीन समतल आहे. पूर्वीच्या ’दागोबा’च्या जागी उत्तर काळात ’श्री घोरवडेश्वरा’ची स्थापना करण्यात आली आहे. शैलगृहात ७ खोल्या असून डावीकडील एका खोलीच्या दारावरील ब्राम्ही शिलालेखानुसार, ‘धेनुकाकट’ या वसाहतीतील इसमाने हे लेणे खोदवले. कार्ले येथील लेखांमध्येदेखील असाच उल्लेख आढळतो. ’धेनुकाकट’ हे लेणी समूहाच्या परिसरातील बौद्ध-ग्रीक व्यापार्‍यांच्या तत्कालीन वसाहतींचे नाव होते, असे अनुमान काढतात.
(संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)

’श्री घोरवडेश्वरा’च्या अंधार्‍या देवालयात (शैलगृहात) आता वीज आली आहे. इथलं देवस्थान जागृत मानतात. महाशिवरात्रीच्या उत्सवास खूपच गर्दी असते.

बाहेर विसावलो की चाफ्याचं झाड व टपोरी फुलं श्रमपरिहार करतात. पुढील लेण्यांकडे वळावं तो कातळावरची निसटती वाट पुढे झुडुपांतून ठळक होत जाते. पाण्याची दोन टाकी व एक निवासी विहार पाहून, आपण येऊन थबकतो कातळ-कोरीव पावठ्यांपाशी! थोडक्या अवघड वाटेनं सरळ गेलं, तर पायथ्याचं टाकं अन कातळाआड दडलेला भन्नाट विहार थक्क करतो. अफलातून जागा!!!

मागं फिरलो, की उभ्या कातळावरील पावठ्या वरील अंगाच्या लेण्यांपाशी घेऊन जातात. या वाटेवर पावसाळ्यात पाणी व शेवाळे असल्याने, पर्यटकांनी जपून जावे.

सामोरं येतं आणखी एक महत्त्वाचे कातळकोरीव सभागृह. शैलगृहाबाहेर नंदी, तुळशीवृंदावन व दीपस्तंभाची स्थापना करण्यात आली आहे

या समतल शैलगृहात एकूण चार खोल्या आहेत. हे देखील आयताकृती शैलगृह आहे. दर्शनी भागातील म्हणजे डावीकडून तिसर्‍या खोलीत ’श्री घोरवडेश्वरा’चेच स्थान आहे.

या खोलीच्या दाराजवळ व पायापाशी असे शिलालेख आहेत. (या लेखाचा उजवीकडील भाग नव्या लोखंडी दरवाज्याच्या सिमेंटमुळे लुप्त पावला आहे.) ‘(शके) १३६१ सिद्धार्थी संवत्सरे श्रावण शुद्ध’ या लेखात इ.स. १४३९ (१५ वे शतक) मध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला जेंव्हा या लेण्यांचे ‘रुपांतर’ करण्यात आले, त्याचा उल्लेख आहे. (संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)

खांबविरहीत या शैलगृहाला खोल्यांच्या भिंतीवर कोरलेल्या अर्धअष्टकोनी स्तंभांच्या जोड्यांवरील कोरीव-खोदीव, ओबड-धोबड हत्ती व सिंहांनी पेलले आहे. (येथे अजिंठा किंवा अंकाई लेण्यांमधील शिल्पं आठवतात.) स्तंभांचे पाय जलकोशासारखे आहेत.

लेणी पाहून, सरळ जाणा-या पायवाटेने पुढं उतरून खिंडीत पोहोचता येतं. डोंगरावर पूर्वेला दुर्गम जागी एक विहार पहायला चांगलीच खटपट करून पोहोचावे लागते.

पश्चिम डोंगरावर एक, वायव्य उतारावर एक गुहाटाके, उत्तर उतारावर एक, माथ्यावर एक, पश्चिम उतारावर एक आणि पूर्वेकडे दोन अशी विपुल टाकी आढळतात.

असे हे अप्रतिम ठिकाण ‘लेणे’ म्हणून अपरिचित आहे. येणारे लोक ‘श्री घोरवडेश्वरा’चे दर्शन घेतात, पण लेणी मात्र दुर्लक्षित करतात. पुणे परिसरात चतु:शृंगी डोंगर, पाताळेश्वर, भंडारा डोंगर, येरवडा (गांधी स्मारक) येथील साधी शैलगृहे अभ्यासकांसोबत पर्यटकांनीही पाहिली पाहिजेत. कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांप्रमाणे येथे उत्तुंग कृती नसेल कदाचित. पण प्राचीन अन् प्रेक्षणीय म्हणून या लेण्यांचे महत्त्व कुठेच कमी नाही.
प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'

इथे जायला निमित्त लागत नाही, ऋतू-काळ-वेळेचं गणित सांभाळायची गरज नाही...

…कधी उल्कापात बघायला माथ्यावरच्या कातळावर रात्र काढायची..
…कधी सलग रोज कित्येक दिवस घोरवडेश्वरला गेलो, तर ठराविक आडवळणावर तोच तो रानससा दचकून धूम ठोकायचा…
.. कधी सभोवतालच्या परीसरातल्या बदलांची भीती वाटते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, दुपदरी मुंबई हायवे, लष्करी तळामध्ये छात्रांच्या इमारती, बिर्ला शाळा, तळेगावच्या इमारती, सोमाटणे फाट्यावरची विशाल गणेशमूर्ती अन टोलनाका, गहुंजेचं क्रिकेट स्टेडीयम, हिंजवडीचं आय. टी. पार्क अशी आसपास गर्दीच गर्दी…
…टळटळीत उन्हात माथ्यावरच्या करवंदीच्या जाळीत हिरवीगार करवंदं दाटलेली. रोज फक्त एकंच टप्पोरं करवंद पिकायचं. मोठ्ठ्या कवतिकानं त्या एकाच करवंदाचा आस्वाद घ्यायचा..
.. कधी महाशिवरात्रीनंतरचा बेताल कचरा, तर प्रेमी युगुलांचा सुळसुळाट त्रस्त करतो..
…कधी करियरसाठी कित्येक महिने लांब जाताना, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून घोरवडेश्वरला 'अलविदा, फिर मिलेंगे' करायचं…
.. कधी उन्हाळ्यात एखाद्या वणव्याने आख्खा डोंगर करपताना विलक्षण हळहळ वाटते..
…कधी इंजिनीयरींच्या पी.ल.मध्ये माथ्यापल्याडच्या टाक्याजवळ सतरंजी पसरून अभ्यासात बुडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण निस्तब्ध शांततेची भीती वाटून गाशा गुंडाळून तडक निघालो…
.. कधी एका साहसवीराने लेण्यांपर्यंत बाईक चढवलेली आठवते.
…कधी आईनं बांधून दिलेले दोन घास दोस्तांबरोबर खायचे, अन फालतू जोक्सवर खिदळत बसायचं..
… कधी सामोरी येते समृद्ध वसुंधरा - आपल्या उदरी दडवलेल्या बीजांमधून नवीन जग साकारणारी..

दोस्तांबरोबर अन जिवलगांबरोबर घालवलेल्या अश्या कित्येक कित्येक क्षणांची, साध्या-सोप्या आठवणींची हुरहूर आता मनात रुंजी घालत राहते.

खरंच, या डोंगराशी काहीतरी अनोखं 'मैत्र' जुळलंय!!!

पूर्वप्रकाशित:: http://www.discoversahyadri.in/2014/04/Ghorwadeshwar.html
- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे) 2014

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहे. फोटो सुरेख! Happy

एक दुरुस्ती - तो शिलालेख ब्राह्मी लिपीतला नव्हे तर नागरी लिपीतला आहे.

आणि धेनुकाकट च्या ऐवजी तुम्ही चुकून धेनुकाटक लिहिलं आहे, तेवढं प्लीज 'काकट' करा.

घोरावडेश्वराच्या मागच्या बाजूच्या रस्त्याने वर गेलात तर हरित क्रांती आढळेल, अनेक ग्रीन विजन इ. चे लोक येऊन उन्हाळ्यात पाणी वर चढवणे, झाडे लावणे, चर खणणे अशा गोष्टी नियमितपणे करतात. महाशिवरात्रीनंतर येऊन कचरा गोळा करतात. .. आम्ही कुटुंबीय ही त्यात असतो.

वरदा::
इतिहासतज्ज्ञाच्या नजरेला लेखातल्या ढोबळ त्रुटी जाणवणं साहजिक आहे…
लग्गेच दुरुस्ती केली आहे. Happy Happy
खूप खूप धन्यवाद!!!

शाम्भवी
सृष्टी
ज्योति_कामत
शैलजा
दिनेश.
मानुषी::
साधे-सोप्पे अनुभव आणि फोटोज शेअर केलेत. ते आवडले, हे वाचून छान वाटले.
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!! Happy

पुण्याचीविनिता::
खरंय तुमचं… घोरवडेश्वर हिरवागार करण्यासाठी खूप उत्तम उपक्रम चालू आहे. ती एक लोक-चळवळंच बनली आहे!!! Happy
तुम्ही कुटुंबीय सक्रिय असता, हे वाचून मस्त वाटले. अभिनंदन!!! Happy

तुझा प्रत्येक शब्द हा "ट्रान्स" मध्ये घेऊन जाणारा असतो…स्पेशली तुझ्या कोणत्याही लेखाचा शेवट !! ध्यानावस्थेत माणूस जसा उन्मनी अवस्थेत जातो तसा तुझ्या ह्या लेखाचा शेवट आहे !! एकदा त्यात गुंगत गेलो की बाहेर येणं मुश्किल… अन हल्ली कातिल शब्दांना कमालीच्या सुंदर फोटोंचा साज चढला आहे…आत्ताचे म्हण किंवा तुझ्या पुढच्या येणा-या नाणदांडच्या लेखाचे…आत्तापर्यंत मेंदूला एक सुखाची झुळूक होती आता डोळ्यांनाही हे भाग्य लाभणार आहे !!!
शेवटी एकच सांगावसं वाटतं… एका सुंदर कलाकृतीशी "नव्याने" जडलेलं "मैत्र" !!!

अप्रतिम फोटो आणि सुंदर वर्णन. Happy

पावसाळ्यात तर ग्रेट भेट असते ह्या डोंगराची.
माझी पसंती अमरजा देवळाच्या मागुन जाणार्‍या रस्त्याला. Happy

तुझ्या लेखणीचा तर मी आधीपासुन फॅन आहे आणि आता फोटोग्राफीचाही.
अप्रतिम वर्णन आणि भन्नाट फोटोज.

तुझ्या पुढच्या येणा-या नाणदांडच्या लेखाचे>>>>तो लेख संग्रही ठेवण्याइतका सुरेख आहे. Happy

ओंकार, प्रतिसाद खुप आवडला रे. Happy

अप्रतिम फोटो वर्णन दोन्ही. नुकतंच मी महेश तेंडुलकर याचं 'भटकंती अनलिमिटेड' हे पुस्तक वाचयला घेतलेय आणि त्यात ह्या स्थानाबद्दल वाचलं आणि हा तुमचा लेख आणि फोटो मला बघायला मिळाले, खूप छान वाटतंय.

क्लासच... लेखणीला कॅमेर्‍याने उत्तम साथ दिली आहे.

ओंकार +१

मनीमोहोर
ललिता-प्रीति
झकासराव
जयु
Sayali Paturkar
रंगासेठ
अन्जू
अश्विनी के
कंसराज
bedekarm
इंद्रधनुष्य:::
खूप छान वाटलं सगळ्या प्रतिक्रिया वाचून…
फोटोज गेल्या १० वर्षांत वेगवेगळ्या ऋतूंमध्ये काढले आहेत.
येत्या पावसाळ्यात आमच्या घोरवडेश्वरला अवश्य भेट द्या, असं आमंत्रण!!!
खूप खूप धन्यवाद!!! Happy

जिप्सी:: त्रिवार धन्यवाद!
एक्स्पर्टकडून दाद फार मोलाची!!! Happy

सह्याद्रीमित्र::
तुला सरस्वती वरदान आहे, ओंकार!!! कसलं भारी लिहितोस…
अरे, खूप साधे-सोप्पे मनापासून एन्जॉय केलेले अनुभव फक्त एकत्र मांडलेत.
ब्लॉग लिहिण्याचा एक हेतू हा, की थोड्या दिवसांनी मीच ब्लॉग सहज वाचायला घेतला तर त्या वातावरणात त्या आठवणींमध्ये, त्या "ट्रान्स"मध्ये जावे… तो इफ़ेक्ट तुझ्यापर्यंत पोहोचलेला असावा… Happy
खूप खूप धन्यवाद!!! Happy