२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि आऊटडोअर्सने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. आऊटडोअर्सने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले. इप्सित स्थळी पोचून स्ट्रेचिंग करुन झाल्यावर फोन वरुन "गेट-सेट-गो" चा सिग्नल देऊन पळायला सुरुवात केली. थँक्स टू आयफोन आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी २०१४ च्या फेब्रुवारी पर्यंत कधी ५के, कधी ७के, कधी १०के अशी वेगवेगळ्या अंतराची पाच-सहा वेळेस 'रनिंग गटग' झाली. मनात विचार आला की जर आम्ही दोघी ह्या दोन टाईमझोन्समध्ये जमवू शकतो तर यात इतर "संयुक्तांना" सहभागी केलं तर??
विचार आल्यावर लगेच ठरवून संयुक्तामध्ये या कल्पनेचं सुतोवाच केलं आणि महिला दिनाच्या मुहुर्तावर लगेच धागा सुरु केला. आऊटडोअर्सला खरंतर खूप रिस्पॉन्सची अपेक्षा नव्हती. पण सांगायला आनंद होतोय की तिचा चांगलाच अपेक्षाभंग झाला.
आणि सुरुवात झाली एका अनोख्या संयुक्ता गटगच्या प्लॅनिंगला! आत्तापर्यंत आम्ही दोघीच करत असलेल्या गटगला आता थोडं मोठं स्वरुप येणार होतं. त्यानुसारच साधारण कल्पना होती 'एक वेळ - वेगवेगळी ठिकाणं'. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी या 'रनिंग गटग' मध्ये भाग घ्यायचा. अंतर ठरलं ५ किमी. आणि तारीख ३० मार्च २०१४! जपानमध्ये मी सकाळी ११.०० वाजता रनिंग सुरु करणार तेव्हा भारतात सकाळचे ७.३० झालेले असतील तर मध्य पूर्वेत सकाळचे ६.००. यातच अजून ५ वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली. सिंगापूर, युके, अमेरिका (इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट) आणि ऑस्ट्रेलिया.
काही जणींना रनिंगची सवय होती तर काही जणींना रोजच्या चालण्याच्या व्यायामाची. काही जणींनी आत्तापर्यंत कधी सुरुवात केली नव्हती पण ह्या गटग मधे भाग घ्यायच्या निमित्तानी सुरुवात करायची होती. काही जणींना आपण हे अंतर चालत निश्चित पार करु असं वाटत होतं परंतू धावण्याबद्दल विश्वास नव्हता. मग हे फक्त "रनिंग गटग" न करता "रनिंग/वॉकिंग गटग" करायचं ठरलं. म्हणता म्हणता ५२ जणी जमल्या.
इथे एक बाब आम्हांला खूप कौतुकाची वाटली. भारतात एक तर उन्हाळा सुरु झालेला आणि तसं म्हटलं तर चालण्या-पळण्यासाठी घराच्या अगदी जवळपास सोयीची जागा असेलच असं नाही. पण असं असूनसुद्धा भारतातल्या संयुक्तांनीच मोठ्या संख्येने या रनिंग/वॉकिंग गटगमध्ये भाग घेतला.
आत्ता पर्यंत आम्ही दोघीच जेंव्हा हे रनिंग गटग करत होतो तेंव्हा जपान आणि युएई ह्या दोनच देशातल्या वेळा आणि ऋतुंची चिंता करावी लागत होती. पण आता सगळ्याजणी मिळुन वेगवेगळ्या आठ टाईमझोनमधल्या संयुक्ता होत्या. त्यातुन सगळीकडचे ऋतुही पूर्ण वेगळे. जपानमध्ये मी ३० मार्चला सकाळी ११.०० वाजता सुरु करणार तेंव्हा ऑस्ट्रेलियाची लोकल वेळ होत होती भर दुपारी १.०० आणि सिंगापुरला लोकल वेळ सकाळी १०.००. पण अमेरिकेच्या इस्ट कोस्टवर तेंव्हा होत होते २९ मार्चच्या रात्रीचे १०.०० व वेस्ट कोस्टला संध्याकाळचे ७.००. तर युके मधे तेंव्हा वाजणार होते ३० मार्चच्या पहाटेचे ३.००. त्यामुळे अगदी एकाच वेळी सगळ्यांनी धावण्याचं गणित थोडं अवघड वाटायला लागलं. मग सगळ्यांच्या वेळेचा आणि त्या-त्या देशातल्या ऋतुंचा विचार करून तीन ग्रूप पाडले. पहिल्या ग्रूपमधल्या म्हणजे सिंगापूर, अमेरिकेतल्या पूर्व किनार्यावरच्या व ऑस्ट्रेलियामधील संयुक्ता आत्ता ठरलेल्या वेळेच्या तीन तास आधी एकत्र सुरु करतील. ठरलेल्या वेळेवर दुसर्या ग्रूपमधल्या संयुक्ता ज्या जपान, भारत, मध्य पूर्व व अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर होत्या त्या ठरवून एका वेळेस धावतील. युकेतल्या संयुक्तांची वेळ कोणाबरोबरच जमत नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या ३० मार्चला रविवारी सकाळी ७.३० ला एकत्र धावतील असं ठरवलं.
मध्य पूर्वेचे देश सोडल्यास सगळ्यांना सोईचा म्हणून रविवार ठरवला होता. पण कुवेतच्या एका संयुक्ताने आपल्याला रविवारी जमणार नाही म्हणुन शनिवारी एकटीने चालेन असं सांगून अप्रत्यक्ष भाग घेतला तर भारतातल्या एका संयुक्तेला सकाळी चालणं जमणार नव्हतं म्हणून तिनेही संध्याकाळी चालेन पण ठरलेलं अंतर चालून पूर्ण करेन असा संकल्प केला. त्या अगदी गटगमध्ये सगळ्यांच्या वेळेला सहभागी नसल्या तरी त्यांनी चालण्याचं ठरवलं होतं हेच पॉझिटिव्ह होतं.
बीबी उघडला, नावनोंदणी पण व्हायला लागली. तरी सगळ्यांना सतत मोटिवेट करत राहाणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे दर ३-४ दिवसांनी याच्याशी संबंधित चित्रं व त्याबरोबर संदेश टाकायचा असं ठरवलं जेणेकरून भाग घेतलेल्या संयुक्तांना ३० मार्चची, पर्यायाने सरावाची आठवण राहील आणि संयुक्तांचा उत्साहही वाढायला मदत होईल. मग एकमेकींचा उत्साह वाढवणं, टिप्स देणं, एकाच शहरात असणार्या संयुक्तांना भेटुन एकत्रच कुठे धावता/चालता येईल ह्या बद्दल चर्चा झडु लागल्या. हल्ली स्मार्टफोन्सवर चालण्या-धावण्याशी संबंधित बरीच चांगली चांगली अॅप्स मिळतायत. अंतराचा अंदाज येण्यासाठी हे गरजेचंही होतं. बहुतांशी जणी हे असं पहिल्यांदाच करणार होत्या त्यामुळे कोणतं अॅप चांगलं वगैरेची चर्चाही झालीच. ज्या आधीपासूनच अशी अॅप्स वापरत होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
गटगच्या दिवशी त्या-त्या ग्रूपमधल्या सगळ्यांनी एकाच वेळेस धावणं/चालणं अपेक्षित होतं. त्यामुळे गटगसाठी "गेट-सेट-गो" चा सिग्नल द्यायला व्हॉट्सअॅप वर ग्रूप्स करायचे असं ठरलं. पुन्हा एकदा थँक्स टू द टेक्नॉलॉजी त्याप्रमाणे दहा बारा दिवस आधीच बीबीवर लिहून नंतर वेळेत फोन नंबर्स मिळून ग्रूप करता यावा यासाठी सगळ्यांना संपर्कातून मेल टाकून फोन नंबर्स मागवले.
बीबी वेगळ्या अर्थाने पेटला होता. सगळ्याच जणी खूप उत्साहात होत्या. आणि मर्फीच्या नियमांनुसार १०-१२ दिवस आधी स्वत:चं आजारपण, मुलांचं आजारपण, ऑफिसमधल्या कामाचा ताण अश्या एकेक अडचणी यायला लागल्या. असं असलं तरी ठरलेल्या दिवशी धावायचा/चालायचा निश्चय अटळ होता.
ठरल्याप्रमाणे बरोब्बर दोन दिवस आधी व्हॉट्सअॅपवर तीन ग्रूप्स पाडले गेले. आणि तिथे चर्चेला सुरुवात झाली. टाईमझोनप्रमाणे जसं धावायचं/चालायचं ठरलं होतं, त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर तीन ग्रूप्स तयार केले. सगळ्यांचे फोन नंबर्स त्यावर अॅड केल्यावर तिथे एकच गडबड सुरु झाली. मायबोलीवर असतात त्याप्रमाणे इथेही बर्याच जणी रोमात होत्या.
हां-हां म्हणता गटगचा रविवार उजाडला. सिंगापूरमध्ये सकाळचे ७ वाजत होते तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे १० तर अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर शनिवारची संध्याकाळ. तिथल्या संयुक्ता त्यांच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु करणार होत्या. पहिला ग्रूप जपानच्या वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता सुरु करणार होता. ठरल्याप्रमाणे मी माझ्या ७.३० वाजता म्हणजे अर्धा तास आधी त्यांना पिंग करणार होते. पण त्या सगळ्या जवळजवळ तासभर आधीपासूनच उत्साहात तयार होऊन वेळ होण्याची वाट बघत होत्या त्यांचा उत्साह बघुनच हे गटग नक्की यशस्वी होणार ह्याचे सिग्नल्स मिळाले.
आमच्या ग्रूपची वेळ जवळ येत गेली तसे व्हॉट्सअॅपवर मेसेजेस यायला लागले. सगळ्यांना स्टार्टिंग पॉईंटला १५ मिनीटे आधी पोचून स्ट्रेचिंग करून तयार रहा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे सगळ्याजणी एकदम जय्यत तयारीत होत्या. माझ्या जपानच्या टाईमझोनबरोबर इतर ३ टाईमझोनमधल्या (भारत, युएई व अमेरिकेचा पश्चिम किनारा) संयुक्ता माझ्याबरोबर भाग घेणार होत्या. आम्ही ट्रॅकवर जायला निघायच्या आधीच पहिल्या ग्रूपमधल्या संयुक्तांचे कामगिरी फत्ते झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. मी १०.४० ला ट्रॅकवर जायला निघाले, भारतातल्या संयुक्ताही त्यांच्या नियोजित ठिकाणी जायला निघाल्या होत्याच. बरोबर ११ च्या ठोक्याला आऊटडोअर्सने 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि एका मोठ्या ग्रूपच्या गटगला सुरुवात झाली. सगळ्यांचा उत्साह ऊतू जात असल्याने काहीजणी प्रत्येक कि.मी.चा अपडेट देत होत्या तर काहीजणींनी ठरलेलं अंतर पूर्ण झाल्यावरच अपडेट्स दिले. तासाभरात व्हॉट्सअॅपवर मेसेजेसचा पूर यायला लागला. ठरल्याप्रमाणे जवळ जवळ सगळ्यांनीच या गटगमध्ये भाग घेऊन ते यशस्वी करून दाखवलं.
दुसर्या आणि तिसर्या ग्रूपच्या वेळेत तसं बरंच अंतर होतं. तिसर्या ग्रूपमध्ये फक्त युकेमधल्या संयुक्ता भाग घेणार होत्या. त्या त्यांच्या सकाळी ७.३० वाजता सुरु करणार होत्या. त्याप्रमाणे बरोबर ६.३० वाजता त्यांना पिंग करून तयारीला लागायची आठवण करून दिली. वेळेच्या आधी १५ मिनीटं पोचून स्ट्रेचिंग करायची आठवण करायलाही विसरलो नाही. बरोबर ७.३० वाजता त्यांनाही 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि त्यांच्या अपडेट्सची वाट बघत बसलो. ह्या गटग चा गड सर होण्याचा हा शेवटचा टप्पाच राहिला होता.तासाभरात त्यांचेही टार्गेट पूर्ण केल्याचे मेसेजेस ग्रूपमध्ये आले. आणि हे गटग खर्या अर्थाने यशस्वी झालं.
ह्या अनोख्या गटगमध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला.
आत्तापर्यंत आम्ही दोघीच असं ठरवून धावत होतो त्यामुळे आमच्यात को-ऑर्डिनेशन उत्तम आहे हे कळलं होतंच. पण आता वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या इतक्या जणी असणार होत्या. इतका सगळा घाट तर घातलाय, नीट पार पडेल नां? याची धास्ती होती खरंतर थोडी. पण सगळ्या भाग घेतलेल्या संयुक्तांनी ती भिती व्यर्थ ठरवली. त्यांचा उत्साह बघून आम्हांलाही हुरूप आला. या गटगनंतर असं गटग पुढेही करत राहू असा रिस्पॉन्स जवळपास सगळ्याच संयुक्तांकडून आला. त्यांच्या या सुचनेचा विचार नक्की करणार आणि पुढचं गटग अजून थोडं टार्गेट वाढवून करणार म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांचा नियमित सराव चालू राहील.
उत्साहाने भाग घेऊन हे गटग यशस्वी केल्याबद्दल संयुक्तातील सगळ्याच मैत्रिणींचे मनापासून आभार. तुम्ही नसतात तर आम्हांला इतका उत्साह आला ही नसता. त्यामुळे हे अश्या प्रकारचं गटग ठरवण्याची कल्पना आणि प्लॅनिंग आमचं असलं तरी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली ती सगळ्या संयुक्तांच्या सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभागामुळेच!
या आगळ्या वेगळ्या गटगचे अनुभव आम्हांला सार्वजनिक बीबी वर मांडायची संधी दिल्याबद्दल संयुक्ता संयोजकांचे मनःपूर्वक आभार
फारच कौतुकास्पद उपक्रम आहे
फारच कौतुकास्पद उपक्रम आहे हा!
आणि त्यात भाग घ्यायला मजा आली. यापुढेही असे उपक्रमामध्ये भाग घेण्यास माझा हात वर आहे!
अलिकडे मागे लागलेल्या शारिरिक व्याधी आणि त्यामुळे कमी झालेला व्यायाम/चालणे यामूळे आपण यात भाग घ्यावा किंवा नाही याबद्दल मी साशंक होते! पण मागील आठवड्यात लोकल वॉकिंग ग्रुप जॉईन केला आणि अगदी या गटगच्या दिवशीच नव्हे तर त्याच वेळी त्यांचा एक ५-६ किमीचा बुशवॉक असल्याचे समजले आणि सहकुटुंब सहपरिवार नांवे नोंदवून टाकली! त्याप्रामाणे वेळेत तिथे पोहोचलोही आणि मॉर्निंग टी आणि लंच असे दोन थांबे घेत उंच सखल भागातला बुशवॉक पूर्णही केला. माझ्या साडेआठ वर्षाच्या लेकीने अगदी आनंदाने यात भाग घेतला आणि ग्रुपमध्ये सगळ्यात पुढच्या फळीत ती चालत होती. ७० वर्षाच्या सासूबाईही सोबत होत्या. त्यांनीही अगदी वेळेत हा ट्रेक वजा वॉक पूर्ण केला. अपवाद फक्त धाकट्या लेकीचा होता. पण तिला नवर्याने आणि इतर ट्रेकरने पाठीवर घेतले तर काही अंतर ती चालली!
आता आम्ही या ग्रुपबरोबर नेहमी जाणार आहोत!
मी या उपक्रमाचा भाग म्हणून बुशवॉक करतेय हे ग्रुप-लीडरला सुरुवातीलाच सांगितले. ती हे सगळं ऐकुन खुप हरखुन गेली आणि मला माझ्या पेसने न थांबता चालण्याची परवानगी दिली! तसेच नवर्यानेही लहान लेकीची काळजी न करता फक्त वॉकवर लक्ष केंद्रित कर असे सांगितले होतेच. त्यामूळे मी साधारण अडीच तासात हा ट्रेक-वॉक पूर्ण केला!
यानिमित्त मी माझ्या फोनवर इंटरनेट घेतले (एकदाचे)! पण मी ज्या भागात होते तिथे रेंजचा प्रॉबलेम होता. त्यामूळे ट्रॅक करु शकले नाही. पण आता नियमित वॉकला जायचे ठरवले आहे. त्यावेळी या अॅपचा उपयोग होईलच.
ही अगदीच नवीन संकल्पना राबवण्याबद्द्ल आडो आणि मंजिरी यांचे कौतुक आणि आभार! एकमेकींचा उत्साह वाढवणार्या पोस्टी टाकणार्या संयुक्तांचेही आभार! हा उपक्रम असाच सुरु राहो!
फार फार मस्त वाटलं
फार फार मस्त वाटलं वाचून.
सहभागी व्हायला जमलं नाही ह्य. वेळेस, पुढच्यस गटग ला भेटू..
मस्त वाटलं हे वाचून!! या
मस्त वाटलं हे वाचून!! या वेळेला नाही जमले..पुढच्या वेळेस नक्कीच!!
मंजिरी आणि आऊट्डोअर्सचे खूप अभिनंदन!
माझ्या वेळेप्रमाणे मी २९
माझ्या वेळेप्रमाणे मी २९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता पळणार होते. >>> मो, एप्रिलच्या जागी मार्च कर प्लीज.
मस्त अनुभव आणि कल्पना. खूप
मस्त अनुभव आणि कल्पना. खूप छान अनुभव सगळ्यांचेच.
खूप मजा आली या उपक्रमात
खूप मजा आली या उपक्रमात सहभागी होताना.
ही संकल्पना राबवण्याबद्द्ल आडो आणि मंजिरी यांचे खूप आभार! एकमेकींचा उत्साह वाढवणार्या पोस्टी टाकणार्या संयुक्तांचेही आभार!
फारच कौतुकास्पद उपक्रम आहे
फारच कौतुकास्पद उपक्रम आहे हा! आणि त्यात भाग घ्यायला मजा आली >> +१
हि फक्त सुरुवात ठरो!!!
मस्तच.. अभिनंदन सगळ्यांचे..
मस्तच.. अभिनंदन सगळ्यांचे..
मी पण चालले ५ की मी ... ५५
मी पण चालले ५ की मी ... ५५ मिनीटे ..... सुरुवातिला नायके + मस्त चालल मधेच त्याला काय झाल माहीत नाही त्याने डोळे च मीटले ...पण मी मात्र ५ की मी पुर्ण केला..... मस्त फ्रेश फ्रेश ...एकटीच चालत होते..सुरुवातिला वाटले पुर्ण होणार नाही , म्हणजे बरोबर कुणी नाही म्हणुन , पण नन्तर मस्त स्पीड पकडला आणी केले पुर्ण ......
खूप मजा आली या उपक्रमात सहभागी होताना.
अ डो मन्जीरी ना खुप खुप धन्यवाद .....
काल मुळशीच्या रिसॉर्ट ला आले
काल मुळशीच्या रिसॉर्ट ला आले होते. आदल्या दिवशी खान्पान करून आज पळणार कशी अस वाटल होत पण बिना अलार्म उठले . निर्मनु श्य रस्त्यावर कुत्र्या ंची टोळी होती. स्पिड बूस्टर्स ! पण माझ्या मागे न धावता माझ्याबरोबर धावली ती थोडा वेळ. मोबाइल त्यावरच अॅप सगळ निट चालल. ३७.१९ मि ५ ़ के .
च ढ उतार होते . उन होत. गाण्ञ्यांऐवजी पक्षि होते. अधुनमधुन नाय्के ची बाइ कैतरी बोलत होती . आल्या वर आयत खायला होतं . सम टोटल लै मज्जा.
आडो आणि मं़जिरी साठी एकदा जोरदार टाळ्या!!
हा ़काल्चा रिपोर्ट आज परत इथे डकवलाय. आजचा कोटा ही चालून / पळून झालाय .:)
आऊटडोअर्स आणि मंजिरीने खरोखरच
आऊटडोअर्स आणि मंजिरीने खरोखरच अतिशय उत्तम संयोजन केलं ह्या उपक्रमाचं. अनेकानेक धन्यवाद दोघींना. >> ++
मजा आली या गटगला
पुढेही अश्या गटगमध्ये रेग्युलरली भाग घ्यायला आवडेल >>++
सगळ्या धावणार्या, चालणार्या
सगळ्या धावणार्या, चालणार्या मुलींचं अभिनंदन! पळतं पाऊल उपक्रम आवडला.
प्लीज मला पण पुढच्या वेळेस
प्लीज मला पण पुढच्या वेळेस सांगा.
राजसी, या गटगबद्दल संयुक्ता
राजसी, या गटगबद्दल संयुक्ता मध्ये रीतसर बाफ काढून सर्व गोष्टी ठरवण्यात आल्या, कुणीही संयुक्ता सदस्या यात भाग घेऊ शकत होती. तुम्ही अजून संयुक्ता सदस्या नसाल तर व्हा, म्हणजे तुम्हाला आपोआप पुढच्या उपक्रमाबद्दल कळेल व तयारी करता येईल. बर्याच संयुक्ता सदस्या आहार व व्यायामाचीही अनुदिनी नोंदवतात, तुम्हाला इच्छा असल्यास त्यातही भाग घेता येईल.
संयुक्ता सदस्य होण्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास इथे पहा.
भारी! सगळ्यांचे अभिनंदन!!
भारी! सगळ्यांचे अभिनंदन!!
काल मी रात्री मानुषीच्या
काल मी रात्री मानुषीच्या फेबुवर हे वाचले आणि वाटले होते की ती तिच्या मैत्रिणीबद्दल लिहिते आहे पण आत्ता कळले की हा गटग इथल्याच मायबोलिकरांचा आहे. खूप खूप छान उपक्रम. असा उपक्रम पुर्ण मायबोलिसाठी करता आला तर!!!
आउटडोअर्स , मंजिरी तुम्ही
आउटडोअर्स , मंजिरी तुम्ही दोघींनी ज्या रिलीजियसली हा उपक्रम राबवला त्याला तोड नाही. व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यापासून जे व्हॉटसअॅप वर नाहीत त्यांनाही व्यवस्थित लूप मधे ठेवण्याचे प्रयत्न, उपयुक्त टीप्स, प्रोत्साहनपर पोस्टर्स, प्रत्येकीच्या शंका,प्रश्न यांना उत्तरं. मला खरंच फार कौतुक वाटतयं तुमचं. धन्यवाद खूप खूप.
माझी स्टोरी - ५किमी ४९ मिनीटस. पावसामुळे ट्रेडमिल वर ५के करावे लागले. कधीतरी २ वर्षांपूर्वी एखाद मैल चालले असेन ट्रेडमिल वर. त्यामुळं त्या तंत्राशी जुळवताना पहिल्याच किमी ला १३ मि लागले. याआधी पहिला किमी ८ मिनीट,मग ९,१०,१०,८ असं ठरून गेलं होतं. शेवटचा किमी होता होता जे मस्त वारं सुटलेलं असायचं, तेव्हा जे काही वाटायचं त्याचं वर्णन करणं अशक्य आहे.ते फार मिस केलं . असो
सर्व सहभागी संयुक्तांचं मनापासून अभिनंदन !
हा उपक्रम नियमित झाला तर मी सहभागी असेनच.
किति भरि आहे तुम्हि सगळ्या .
किति भरि आहे तुम्हि सगळ्या . वाचुन फार मस्त वाटल.
पळापळी करणार्या सर्व
पळापळी करणार्या सर्व संयुक्ता मेंब्रांचं अभिनंदन !
इंटरेस्टींग उपक्रम.. !
कोण कोण पळालं त्याची यादीही शक्य असेल तर टाका..
मंजिरी आणि आऊटडोअर्स ने
मंजिरी आणि आऊटडोअर्स ने संयुक्तांना हेल्थ कॉन्शस केलं आहे
खूप मस्त उपक्रम झाला. त्या निमित्ताने व्यायामही नियमित व्हायला लागला आहे. एकाच वेळी अनेक संयुक्ता धावत/ चालत आहेत ही भावना खरंच भन्नाट होती. एक अभिनव गटग झालं खरंच.
गेल्या वर्षी डिसेंबरमधली मॅरॅथॉन मी ठरवूनही करू शकले नव्हते. व्यायाम असाच नियमित होत राहिला तर त्यात भाग घेता येईल असं वाटतंय! फिन्गर्स क्रॉस्ड!
मस्त धम्माल आली या
मस्त धम्माल आली या गटगला.
माझ्यासाठी विशेष ठरलेली बाब म्हणजे जिथे मी व्यायामाचे धडे गिरवले, त्याच शिवाजीपार्कवर योगायोगाने मला चालायला/ धावायला मिळालं. मला ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मी पूर्ण ५ किमी नाही करू शकले, शि.पा.ला साडेतीन फेर्या मारल्या. अश्या प्रकारच्या व्हर्च्युअल गटगमधे भाग घ्यायला मजा आली. आता हा ज्वर कायम राहो अशी इच्छा आहे.
वा! वा! एक नंबर! पराग +१.
वा! वा! एक नंबर!
पराग +१. कोण कोण सहभागी झालं त्यांच्या नावांची यादी टाका.
मस्त वाटलं हे वाचून. पुढच्या
मस्त वाटलं हे वाचून. पुढच्या वेळेस नक्कीच भाग घेणार.
पराग ,कोण कोण पळालं त्याची
पराग ,कोण कोण पळालं त्याची यादीही शक्य असेल तर टाका..>> श्रमपरिहार पार्टी च आयोजन करणारेस का
इन्ने.
पुण्यातल्यांना देईन..
पुण्यातल्यांना देईन.. बाहेरच्यांनी यायच्या जायच्या तिकिटाचं स्वतः बघावं..
श्रमपरिहारासाठी मी येईन हो
श्रमपरिहारासाठी मी येईन हो पुण्यात, माझं माझं तिकिट काढून
बाहेरच्यांनी यायच्या जायच्या
बाहेरच्यांनी यायच्या जायच्या तिकिटाचं स्वतः बघावं.. >>> ठीक आहे. मान्य.
पराग, श्रमपरिहाराचा मेनू
पराग, श्रमपरिहाराचा मेनू तेवढा लवकर टाकलास तर मी पण यायचा विचार करेन (माझ्या खर्चानेच)
श्रमपरिहार तीन वेळांना, तीन
श्रमपरिहार तीन वेळांना, तीन टाइम झोनांमध्ये वगैरे आयोजीत होणार नाही ह्यांची नोंद घ्या बर्का तिकीट काढायच्या आधी..

असो..
Pages