ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

suhasg,

आपला इथला प्रतिसाद आवडला आणि पटला. ज्योतिषशास्त्रातील ज्ञान अद्ययावत असणे जरुरीचे आहे. विनाकारण पाश्चात्यांस कमी लेखणे चुकीचे आहे.

वराहमिहिराने ग्रीक ज्योतिर्विदांचं उदाहरण देऊन निरीक्षण नोंदवलंय की शास्त्रांत पारंगत असल्यास यवन व म्लेंच्छही ऋषींप्रमाणे पूजनीय आहेत.

म्लेच्छाः हि यवनाः तेषु सम्यक शास्त्रं इदं स्थितं ।
ऋषिवत् तेऽपि पूज्यन्ते किं पुनः दैवविद् द्विजः ॥

-वराहमिहिर (बृहत्संहिता २.१३)

आ.न.,
-गा.पै.

srd ,
रवि ,गुरु , शनि हे ग्रह पत्रिकेत महत्वाचे आहेत पण रवि महिनाभर , गुरु वर्षभर , शनि अडीच वर्षे एका राशीत असतो . त्यामुळे महिन्याभरात एकाच लग्न राशीवर जन्म घेणाऱ्या सगळ्याचेच एक सारखेच भविष्य सांगावे लागेल .
त्यामुळे मंद गती ग्रहांपेक्षा जलद गती ग्रहांमुळे कुंडली वेगळेच रूप घेते हे व. दा . भटांचे म्हणणे पटते .
तसेच हे ग्रह कोणत्या ग्रहांशी काय योग करत आहेत हे पण जास्त महत्वाचे आहे . उदा समज राहू मेषेत आहे व रवि पण महिनाभर मेष राशीत आहे . काही जणाच्या पत्रिकेत रवि-राहू अंशात्मक युती असेल . मग अशावेळेस रवि चे फळ सांगताना वेगळे सांगावे लागेल .
limbutimbu ह्यांनी म्हटले तसे चंद्र पत्रिकेत महत्वाचा आहेच .

गामा, छान अचुक उदाहरण Happy

>>>>"माझा काही फारसा विश्वास नाही पण थोडंफार वरवर काय आहे ते म्हटलं जरा बघू " <<<<< अहो असे ढीगभर भेटतात...... अर्थात दरवेळेसच "काटकसर" वा "कंजुषी" हे कारण नसते, तर बर्‍याचदा वेगवेगळ्या माध्यमातुन वाचल्या/ऐकलेल्या गोष्टींमुळे अन अन्निसच्या प्रचारामुळे साशंक झालेल्या अशांच्या मनात अश्रद्धाच काठोकाठ भरलेली असते. पण ज्योतिषाने हे देखिल लक्षात ठेवायला हवे की काठोकाठ भरलेली बाब जरा ही डचमळली तरी सांडुन जाऊ शकते.
आपल्या ज्ञानाने/व्यासंगाने व धर्मावरील निष्ठेने जातकाची अशी अश्रद्धा डचमळवुन सांडवुन टाकायला लावणे हे काम ज्योतिषाने कर्तव्य म्हणून करणे आवश्यक आहे असे माझे मत.

अन्विता, बरोब्बर. मंदगति अन जलदगति ग्रहांचा/कारकत्वाचा विचार सूक्ष्मपणेच करावा लागतो. पण माझा यावर अजुन पुरेसा अभ्यास व्हावयाचा आहे.

मात्र सहज आठवले म्हणून, एक उदाहरण सान्गतो, कदाचित पूर्वीही सांगितले असेल, तर मी ज्यांचे भालचंद्र ज्योतिर्विद्यालय या संस्थेत ज्योतिष शिकायला जात होतो, ते श्री काका अवचट गुरुजी.
दर रविवारचे वर्गाला जायचो, तेव्हा एकदा ते समोर व्हरांड्यात भेटले, मी व मित्राने अर्थातच आमच्या कुंडल्या त्यांचेपुढे केल्या (मांडून दाखविल्या), त्यांनी अंश विचारले ते सांगितले.
त्यांनी माझ्याच वहीच्या पहिल्या पानावर काही एक आकडेमोड दोन उभ्या रांगात केली, खरे तर आकडे मांडले. व मला व्यसनाबाबत प्रश्न विचारले, तेव्हा सांगितले की मला कसलेच व्यसन नाही, जे होते सिगारेटचे ते ८३ सालीच सोडले.
ते पुढे म्हणाले की तुला सावध रहायला लागेल, व मादक द्रव्य/पिणे वगैरेचे व्यसन लागेलच लागेल.
मी म्हणले की असे होणे शक्यच नाही. मी दारू पिण्याचा तिरस्कार करतो.
ते थोडेसे हसले, तेव्हा त्यांचेकडून/ एका ज्योतिषाकडून वाचेद्वारे उच्चारित शब्दाबद्दलचा आदर/श्रद्धा असल्याने मी विचारले की ठीक आहे, तसे तर तसे, पण मग ते कायमचे असणार की त्यातुन बाहेरही पडेन?
त्यांनी पुन्हा एकदा कुंडलीत व माझ्या नजरेत बघितले, व सांगितले की लक्षात ठेव, गुरूच्या "अमुक अमुक स्थानगत भ्रमणानंतर तू त्यातुन आपसुक बाहेर पडशील, बाहेर पडण्यास सुयोग्य अशा गोष्टी तुझे समोर येतिल, मात्र त्या संधि तू अजिबात चूकवू नकोस.

इतर सर्वसाधारण विचारल्या जाणार्‍या बाबींची चर्चा झाल्यावर त्यांनी पुढे सांगितले की सिंहस्थ मी बघु शकणार नाही. अन हळवे होत विचारले की तुम्ही माझी आठवण ठेवाल ना?
आम्ही सटपटलो होतो, पण त्यांना अर्थातच असे का म्हणता, वगैरे बोलुन, हो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवू म्हणून सांगितले.
(मला याक्षणी त्यांचे जाण्याचे नेमके साल, वगैरे आठवत नाही, पण पेपरमधे छोटी बातमी आली होती ती वाचली, अन तेव्हा सिंहस्थ लागायला एखाददोन महिने शिल्लक होते असे पुसटसे आठवते)
वरील उदाहरण देण्याचे कारण की वरील दोन्ही बाबी सत्य ठरल्या. केवळ ढोबळ मानाने मांडलेली कुंडली, समोर व्यक्ति हजर, व काही आकडेमोड यांचे सहाय्याने त्यांनी वर्तविलेल्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या महत्वाच्या दोन्ही बाबी अचूक खर्‍या ठरल्या हा स्वानुभव आहे.
तेव्हा ढोबळ कुंडली मांडून/ सिक्स्थ सेन्सचा (अंतर्ज्ञान-अंतर्स्फुर्तीचा) आधार घेत भविष्य नक्कीच वर्तविता येऊ शकेल हे मान्य करावे लागते, मात्र त्यामागे तितकी निरपेक्ष साधना व अभ्यास हवा. अन्यथा अपुर्‍या ज्ञानामुळे जातक आपल्याकडून फसविला जातोय असे होण्याबरोबरच आपण स्वतःलाच फसवतो आहोत असे होईल जे आयुष्याच्या अखेरीस मनाला खाऊ लागेल.
मी त्यांना ती आकडेमोडीची पद्धत विचारली होती, त्यावेळेस ते म्हणाले होते की तू अजुन खूप लहान आहेस, व जसजसा याच विषयात रहाशील, तसतसे तुझे तुलाच आपोआप उमगुन येईल, मात्र मी आत्ता तुला वरवरही काही एक सांगून उपयोग नाही.
दुर्दैवाने मी कित्येक वर्षे जपुन ठेवलेले ते पहिले पान कालौघात काही कारणांनी नष्ट झाले, व आज अभ्यासास माझे समोर ती आकडेवारी नाही, व त्यांनी काय केली ती नजरेसमोर येतही नाही. असो.

अजुन एक म्हणजे, भविष्य विचारुन घेतल्यानंतर मी त्यांना "दक्षिणा" दिली नव्हति (तेव्हा खिशात पैका नसायचाच Sad फक्त रेल्वेचा पास व दोनचार रुपये असले तर असले.), विचारले होते, पण ते नको म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात माझे, तेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यावर एकदमच घेईन म्हणाले, अन तेव्हाच तो विषय आला होता सिहंस्थाचा.
काहीच दक्षिणा न दिल्याची / उतराई न झाल्याची रुखरुख आजही मनाचे सांदीकोपर्‍यात आहेच आहे. असो.

Anvita ,मान्य आहे की या तिघांचा योग महिनाभर तरी तोच राहाणार परंतु रवीचे स्थानमहात्म्य आणि दिवसातून बारा वेळा कुंडली फिरवतो .असा तो गतिमान आहे .

बुध ,चंद्र ,शुक्र वैयक्तिक परिणाम करतात .
रवि :व्यवस्थापनाच्या बरोबर का विरुध्द ठरवतो मग ते कुटुंबात असो वा समाजात .किती मुख्यमंत्र्यांच्या कुंडलीत रवि (+बुध)लग्नी आहे ?
रवि फक्त अंमलबजावणी करतो .मोठा नोकर .२८ ते ५८ पर्यंत .नंतर अस्त .
गुरू: याची जोड /वजन लागतेच .नाव होणे जिवंतपणी अथवा नंतरही .
शनि: दूरदर्शीपणाने धोरण ठरवतो .योजनाबध्द काम .नम्रपणा .

(लग्न ,मुले ,मित्र आणि स्वभाव या वैयक्तिक गोष्टी धरल्या नाहीत) .
आताच लिंबुटिंबूचे ही वाचतोय .(+)एकंदर चर्चा निकोप होत आहे .आनंद वाटतो .

चंद्र /बुध ज्योतिषकारक ग्रह आहेत .(३/१०स्थानी) .बुध आकडेमोड गणित करत फार खोलात जातो .मर्म कळते .चंद्रवाले ठोकतात जास्ती अभ्या स करायच्या भानगडीत पडत नाहीत .

प्रश्नशास्त्र का आणि कसे भाग- 3

वारंवार विचारला जाणारा दुसरा एक प्रश्न म्हणजे ‘ एकच प्रश्न पुन्हा लगेचच वा काही काळानंतर विचारल्यास तेच उत्तर मिळेल का?
.................................
आपण एखादा रहस्यमय (सस्पेन्स) चित्रपट जेव्हा पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपली उत्कंठा शेवट पर्यंत टिकून असते, चित्रपटच्या अगदी शेवटी रहस्याचा उलगडा होतो आणि आपली उत्कंठा संपते. आता कल्पना करा की हाच चित्रपट आपल्याला पुन्हा बघायला लागला तर काय होईल ? रहस्याचा उलगडा आधीच झालेला असल्याने त्या चित्रपट पाहण्यातली सारी मजाच निघून जाईल नाही का?

कदाचित आपल्याला हा चित्रपट शेवट पर्यंत पाहवणार सुद्धा नाही. आता कोणी हा चित्रपट दुसर्‍यांदा बघितलाच तो बघताना त्याचा उद्देश (व्हू पॉइंट) पूर्णपणे वेगळाच असेल, तो कदाचित त्या चित्रपटातले स्पेशल इफेक्ट्स, संगीत, लोकेशन्स वा कलाकारांचा अभिनय अशा इतर गोष्टी असा असू शकतो, त्यातला मूळच्या रहस्याचा थरार अनुभण्यासाठी नक्कीच नाही. पहिल्यांदा हा चित्रपट पाहताना आपण त्याच्याशी जितके एकरूप झालेलो असतो तितके एकरूप होणे दुसर्‍यांदा होणे शक्यच नाही.

प्रश्नाच्या बाबतीत देखिल अगदी असेच काहीसे होते,जातक तोच दुसर्‍यांदा विचारतो त्यामागचे मुख्य कारण हेच असते की पहिल्यांदा मिळालेले उत्तर त्याला पसंत पडलेले नसते, त्या उत्तरावर त्याचा विश्वास नसतो, त्याला हवे असलेले उत्तर न मिळाल्यानेच हा अविश्वास निर्माण झालेला असतो, हा अविश्वास म्हणजेच ‘शंका’, ही शंकाच जातकाच्या अव्यक्त मन व व्यक्त मत यांना जोडणार्‍या मार्गातला अडथळा बनते.

.................................

म्हणून ‘प्रश्न शास्त्र /होरारी’ मध्ये ‘ एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यास मनाई आहे. याचा अर्थ असा नाही की एखादा प्रश्न आयुष्यात फक्त एकदाच विचारता येईल. तो प्रश्न नक्की दुसर्‍यांदा विचारता येईल पण तो केव्हा (आणि कसा) ते आपण पुढच्या भागात पाहू.

................................

संपूर्ण लेख व या या लेखमालेतील आधीचे दोन भाग माझ्या ब्लॉग वर वाचा.

प्रश्नशास्त्र का आणि कसे भाग- 1

प्रश्नशास्त्र का आणि कसे भाग- 2

http://suhasgokhale.wordpress.com/

>>>> प्रश्नाच्या बाबतीत देखिल अगदी असेच काहीसे होते,जातक तोच दुसर्‍यांदा विचारतो त्यामागचे मुख्य कारण हेच असते की पहिल्यांदा मिळालेले उत्तर त्याला पसंत पडलेले नसते, त्या उत्तरावर त्याचा विश्वास नसतो, त्याला हवे असलेले उत्तर न मिळाल्यानेच हा अविश्वास निर्माण झालेला असतो, हा अविश्वास म्हणजेच ‘शंका’, ही शंकाच जातकाच्या अव्यक्त मन व व्यक्त मत यांना जोडणार्‍या मार्गातला अडथळा बनते. <<<<

अत्यंत अचुक शब्दात मांडलय हे Happy छानच विवेचन.

धन्यवाद, लिंबूटिंबूजी. या विषयावर लिहण्यासारखे माझ्याकडे बरेच काही आहे, बघुया त्यातले कितपत शक्य होते ते. माझा ब्लॉग वरच्या लेखातला अगदि थोडासाच भाग इथे डकवला आहे, संपूर्ण लेखमाला क्रमश: वाचल्यास समजायला सोपे जाईल.

धन्यवाद, srdजी. माहीती बरीच आहे , वाचकांना काय आवडेल हे ठरवणेच मुश्किल. आपल्या काही सुचना (विषय, मांडणी, इ.) असल्यास अवश्य कळ्वा, म्हणजे योग्य ते बदल करता येतील.

जन्मकुंडली ठरवतेच जातकाची सांपत्तीक स्थिती आणि परदेशगमन योग .हल्ली बरेच जण परदेशांत तात्पुरत्या करारावर जातात आणि मग ते अमुक एक देश अथवा कंपनी वगैरे प्राधान्य देऊ इच्छितात .परंतु तीच संधी येण्यास दिरंगाईपण चालत नाही आणि मग आलेला जॉब घेतात .त्यांना मार्गदर्शन गोचरी /अथवा प्रश्नकुंडलीने होऊ शकेल .

प्रश्नकर्त्याला फक्त उत्तर हवे असते की मी थांबू का नको .त्याच्यासाठी पध्दत (केपी ,गोचरी ,नवमांश , गायत्रीजप ,टारो इ०) महत्त्वाची नसते .

ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी Suhasg काही केस स्टडी देता येतील वेगवेगळ्या पध्दतींच्या .

धन्यवाद, srdजी. माझ्या ब्लॉग वर केस स्टडीज दिल्या आहेत: परदेश गमन, नोकरी , हरवले सापडले इ.
मी प्रश्नाकुंडली म्हणजेच 'होरारी' पद्धतीने प्रश्न सोडवतो, त्या साठी के.पी. व पाश्चात्य होरारी तंत्र वापरतो, त्यात शेवटच्या टप्प्यात ग्रह गोचर तपासतो, फक्त एकट्या गोच्ररी ने निर्णय करत नाही, काही जोखमीच्या प्रश्नांसाठी 'टरशरी प्रोग्रेशन' , 'सोलर आर्क' , 'युरेनियन प्लानेटरी पिक्चर्स' अशा इतर ही काही पद्धतींचा वापर करता येतो.

जरुर,या केस स्ट्डीज मी पुरेशा विस्ताराने लिहल्या आहेत जेणे करुन त्या समजायला सोप्या जाव्यात. प्रत्येक पायरी का ? कशासाठी इ. सांगीतले आहे . बरोबर आलेल्या भाकितांपेक्षा चुकलेली भाकितें मला जास्त काही शिकवून गेली आहेत, त्यातून माझ्या झालेल्या चुकां तर कळल्याच शिवाय 'दिल्ली बहोत दूर है,आपल्याला अजून बरेच काही शिकायचे आहे ' ही जाणीव / टोचणी पाय जमीनीवरच राहण्यास मद्त करते हे मह्त्वाचे!

srd , चांगला विषय सुचवलात तुम्ही.
गोखल्यांच्या ब्लॉग वरील केस पण वाचली चांगली लिहिली आहे.

मी स्वत: बारा वर्षे अमेरिकेत होते . आता भारतात शिफ्ट झालो आहोत . अर्थात इकडे परत यायचे हे आधीपासून आमचे ठरलेच होते. त्यामुळे स्वखुशीने परत आलो.

मी पण ह्या विषयावर लिहायचे आहे ठरवले (पत्रिकेच्या दृष्टीकोनातून )बघू कधी जमते ते.

प्रश्नशास्त्र का आणि कसे -भाग 4

प्रश्नाची जन्मकथा

जशी प्रत्येक मनुष्य जीवाला एक जन्मवेळ असेते तसा प्रत्येक प्रश्नालाही एक जन्मवेळ असते. नऊ महिन्यांच्या गर्भावस्थे नंतरच जीव जन्माला येतो तसेच प्रत्येक प्रश्नालाही काही गर्भावस्था असावी लागते. प्रश्न आधी मनात तयार होऊन ,रुजावा लागतो, मुरावा लागतो. उगाचच मनात आले, गाठ ज्योतिषी, विचार प्रश्न असा प्रकार नसावा.
..................

"मुलगी अजून कॉलेजात शिकते आहे किंवा अजून स्थळे बघायला सुद्धा सुरवात ही केलेली नाही अशा वेळी केवळ उत्सुकता म्हणून विवाहा संदर्भात प्रश्न विचारणे इष्ट नाही, चुकीचे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते."

.....................

" सेकंड इयर इंजिनियरिंग मध्ये शिकत असलेल्या सौरभ साठी त्याच्या तीर्थरूपांनी मला ‘इन्फोसीस मस्त कंपनी आहे, आमच्या सौरभ ला तिथेच नोकरी लागेल काय?’ असा प्रश्न विचारला होता, मी त्यांना ‘असा प्रश्न आता विचारू नका .. आधी त्याचे शिक्षण पूर्ण होऊद्या, प्रश्ना साठी ही योग्य वेळ नाही ..” असे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे आपले एकच म्हणणे होते “ त्या अमक्या ज्योतिषाने सौरभ ला इन्फोसीस मध्येच नोकरी लागणार असून , पुण्यातच पोस्टिंग होईल, वार्षिक 5 लाखाचे प्याकेज मिळणार .. असे अगदी छातीठोक पणे सांगितले आहे…तुम्हाला विचारून एकदा खात्री करून घ्यायची होती”. अर्थातच अशा ‘प्रिमॅच्युअर’ प्रश्नांना मी कधीच उत्तर देत नसल्याने मला त्यांना नकार द्यावा लागला , त्यांना ते रुचले नाही, शेवटी जाता जाता “तुमचा ज्योतिषाचा अभ्यास अजून चालूच आहे वाटतंय ” असा कुत्सित टोमणा मारायला पण कमी केले नाही. खरेच इतके सूक्ष्म भविष्य, इतक्या छातीठोक पणे सांगण्या इतपत अभ्यास माझा आजही झालेला नाही."

..............

"‘मला संतती होईल का ‘ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी निदान त्या व्यक्तीचे लग्न तरी झाले आहे का हे बघायला नको? आणि समजा विवाह झालेला असला तरीही त्या व्यक्तीचे वय काय ते ही विचारात घेतले पाहिजे, रजोनिवृत्ती झालेल्या विवाहितेस संतती होण्याची शक्यता किती असेल? "

...........................

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग वर : http://suhasgokhale.wordpress.com/

सुहास

वाचला भाग ४ था.

शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याने मी परदेशी जाणार(परदेशयोग) का ? विचारल्यास प्रश्नकुंडली पाहावी का जन्मकुंडली ?

दोन्ही वापरता येतील. जन्मकुंड्लीची मुख्य समस्या जन्मवेळेची अचुकता, प्रश्नकुंड्लीची मुख्य समस्या 'प्रश्नकर्त्याची तळमळ किती आहे हे ठरवणे. ज्याचे weightage जास्त त्या कुंड्लीचा वापर प्राधान्याने करायचा ,उर्वरीत कुंडली confirmation साठी वापरायची. या उदाहरणात सर्व प्रथम परदेशी कशा साठी जाणार ते निश्चित केले पाहिजे, (पुढील शिक्षण/ नोकरी), त्यानंतर त्या कारणा साठी 'परदेशी जाण्याचे पोटेन्शीयल (आर्थिक पाठबळ, पात्रता निकष पूर्ण करण्याची क्षमता इ.), तपासायला पाहीजे,

एक गोष्ट आठवली ती सांगतो .सत्तर सालाची आहे .चारी नावाचे ज्योतीषी सायन माटुंगाच्या दरम्यान राहायचे .कोणी त्यांच्याकडे जाऊन जन्मवेळ ,तारीख सांगून प्रश्न विचारला की लगेच पेन उचलून एका कागदावर कुंडली मांडून(पंचाग न उघडता) ऊत्तर लिहून एक तासात निरसन करायचे . हे कसं शक्य आहे यावर ते सांगत मी वाराणसीचा ज्योतिष शिकलेलो आहे आम्हाला ग्रहगतीचे श्लोक पाठ आहेत आणि म्हणून दाखवत .

प्रश्नशास्त्र का आणि कसे -भाग ५

आडवळणाने विचारलेले प्रश्न (प्रश्ना मागचा प्रश्न )

काही वेळा जातक जो प्रश्न विचारतो तो त्याचा खरा प्रश्न नसतोच, त्याला दुसरेच काहीतरी विचारायचे असते, पण ते तसे स्पष्टपणे विचारायचे धाडस त्याच्या अंगी नसते. काही वेळा आपली खासगी बाब दुसर्‍या समोर उघड करण्याची तयारी नसते तर काहींना आपल्या समस्या नेमके पणाने ,स्पष्ट शब्दात मांडता येत नाहीत. काहीजण तोंडच उघडत नाहीत तर काही इतके पाल्हाळ लावतात की त्यांना नेमके काय विचारायचे आहे समजणे मुश्कील होऊन बसते.

विवाहाच्या संदर्भात एक वारंवार विचारला जाणारा ‘आडवळणी’ प्रश्न म्हणजे “माझा प्रेम विवाह होणार आहे का ठरवून केलेला असेल?” बहुतांश वेळा हा प्रश्न विचारते वेळी त्या व्यक्तीचे एकतर्फी किंवा चोरटे प्रेमप्रकरण चालू असते व त्या चोरट्या (हो, चोरट्याच, कारण उघड प्रेम करणारे, ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणारे प्रेमवीर, ज्योतिषाला प्रश्न विचारायला जात नाहीत!) प्रेमाची फलश्रुती काय असा खरा प्रश्न असतो, तेव्हा असा आडवळणाने जाणारा प्रश्न विचारण्या पेक्षा सरळसरळ ‘इच्छित व्यक्तीशी माझा विवाह होईल का ?” असा प्रश्न विचारल्यास अचूक उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते.

विवाहाच्या संदर्भात एक विचारला जाणारा आणखी एक ‘आडवळणी’ प्रश्न म्हणजे “माझा भावी पती / पत्नी दिसायला कसा/कशी असेल ? “ बहुतांश वेळा इथेही जातकाला आपल्या चालू प्रेमप्रकरणा बद्दलच विचारायचे असते, पण सरळसरळ विचारायचे धाडस नसते म्हणून असा आडवळणी प्रश्न विचारून खुंटा बळकट करण्याचाच प्रयत्न असतो.

...........................

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग वर : http://suhasgokhale.wordpress.com/

सुहास

या प्रश्न ज्योतिषावर आमचे ज्योतिषी मित्र राजीव उपाध्ये यांनी प्रश्न ज्योतिष व प्रचितीचे गौडबंगाल लिहिलेले जाम आवडले.

सुहासराव, अगदी दुखर्‍या नसांवर अचूक बोट ठेवले आहे तुम्ही Happy

प्रकाशराव, तो लेख, अर्थातच एकतर्फी असल्याने पटला नाही. हां, वरवर विचार केला तर नक्की पटेल.
याचे मूळात कारण असे की, ज्योतिषी प्रश्न विचारायला त्या डोम्बार्‍यासारखा डमरु वाजवित गर्दी जमवित नाही. जातकास खरोखर अडचणीची परिस्थिती असुन तिचे निरसन करण्याबाबत त्याचे मनात खरोखर प्रश्न मनात उद्भवला असेल तरच त्या प्रश्नाचे वाचेद्वारे उद्गारण्याची वेळ लक्षात घेऊन त्या प्रश्नकुन्डलीवरुन उत्तराचे काही जवळ जाता येईल हे नक्की. तुम्ही वा ते लेखकमहोदय, नशिब आमचे थोर की रेल्वे स्टेशनवर असलेल्या वजनाच्या मशिनमधुन बाहेर पडणार्‍या तिकीटामागिल भविष्यकथनाशी "मूळ" शास्त्राची तुलना अजुन करीत नाही आहात, पण एकन्दरीत पहाता, ते देखिल अशक्य नाहीच्चे. Proud असो.

लिंबूटींबूजी, 'प्रश्ना मागचा प्रश्न' हुडकून काढणे हेच मोठे कौशल्याचे काम असते. जसे रोगाचे अचूक निदान होणे म्हणजे अर्धा आजार दूर झाल्यातच जमा तसेच 'प्रश्न' काय ते नेमके कळले की मग कोणता 'भाव वा भावसमुह', 'कोणता कारक ग्रह ' विचारात घ्यायचा ते स्पष्ट होते . मी काही प्रश्न 'प्रस्थापित विचारसरणीं व नियमांच्या ' कक्षेबाहेर जाऊन सोडवले आहेत, त्याबद्द्ल माझ्या ब्लॉग वर लिहीणार आहेच.

पटलंच .Suhasg .
गुरुचे कार्यकत्व आणि स्वभाव याला चांगले स्थान मिळाले की फलांत भर पडणारच .

आपण नवीन ठिकाणी जातो एखादे लहान पोर उत्साहाने आपल्याला हव्या त्या ठिकाणी पटकन घेऊन जाते .
माझा ओळखीचा आणि मोठा अधिकारी दिल्लीत राहातो त्याच्याकडे मी जाण्यासाठी दिल्ली गाठतो .तो ऐनवेळी नसतो . हेच ग्रहांचे स्थान/राशीँचे फल .

suhasg , तुम्ही म्हणता तसाच अभ्यास केला पाहिजे मी पण तसाच करत आहे आणि ह्यातूनच शिकत आहे. आधी म्हणूनच गुरु ह्या ग्रहाविषयी लिहिले मग स्थानगत फले दिली आहेत तसेच त्याआधी स्थानाबद्दल पण लिहिले आहे अर्थातच जे अभ्यासक आहेत ते स्वत: ची बुद्धी चालवूनच फलित तयार करत असतात . आजकालच्या काळात ' बाबा वाक्यं प्रमाणम' असे नाहीच आहे मुळी इतकी पुस्तके , इंटरनेट , कुंडली software इ. गोष्टींच्या उपलब्धतेमुळे स्वत: चा अभ्यास करणे शक्य आहे. ह्या सगळ्यातूनच तर्क चालवायला शिकतात . त्यामुळे आजकाल 'फिशिंग ' कसे करावे पण फारसे शिकवावे लागत नाही .

बिघडलेला ग्रह ह्या बद्दल पण आधीच्या लेखांमध्ये उल्लेख आहेच. शुभ योग ,अशुभ योग ह्याविषयी पण आधी लिहिले आहेच.
शेवटी ग्रहाचे कार्यकत्व हे आधीच्या लेखात सांगितले आहेच . हि पहिली पायरी आहे असेही लिहिले आहे .
अशी प्रत्येक पायरीच शिखर गाठण्याकरता उपयोगी पडते .

तुम्ही लेखाची दखल घेतलीत त्याबद्दल धन्यवाद !
बाकी तुमचे लेख वाचायला नक्कीच आवडतील .

Pages