'नेक्स्ट स्टेशन कसारा' चा आवाज डब्यात घुमला नि आम्ही सुस्तीला झटकून आपापल्या सीटवरून उठलो ! जवळपास दिडेकवर्षानंतर सीएसटीवरुन सुटणारी शेवटची कसारा ट्रेन पकडली होती.. हल्ली ट्रेक ह्याच्या ना त्याच्या चारचाकी रथातूनच होत असतात.. असे ट्रेक 'रॉयल' जरी असले तरी ट्रेन-एसटीचा वापर करुन पारंपरिक पदधतीने 'रफ' ट्रेक करण्याची मजा काही औरच.. प्रजासत्ताकदिनाचे निमित्त साधून ऐनवेळी असाच एक ट्रेक आखला गेला. 'पाबरगड' ! कळसूबाई रांगेत उत्तुंग शिखरांना साद देत उभा असलेला हा किल्ला म्हणजे अगदी रांगडागडी हे ऐकून होतो.. आज अनुभवणार होतो !
'हुश्श' करत कसारा या अंतिम स्थानकात ट्रेन स्थिरावली नि आम्ही त्रिकुट बाहेर पडलो ! रो.मा व माझी जोडी दरवेळी असतेच.. पण यावेळी रो.मासोबत त्याचा छोटा भाऊ अतुल देखिल आला होता.. आम्ही लागलीच मोर्चा तिकीट-खिडकीकडे वळवला जेणेकरुन तासभर झोपेचे समाधान मिळेल.. पण रो.माच्या मनात 'झोपेन तर गडाच्या पायथ्याशीच' हा निर्धार पक्का होता. ! तसेही त्या खिडकीजवळील जागेत बरेच जण घोंगडी घेउन झोपले होते तेव्हा आम्ही स्टेशनबाहेरच पडलो ! खरे तर कसार्याहून सकाळी सहापासून सुरु होणार्या वडापने घोटी व घोटीहून पुढे संगमनेर वा राजुरमार्गे पुण्याला जाणार्या गाडीने पुढे सरकण्याचा प्लॅन होता.. पण आता तर पहाटेचे तीन वाजलेले.. अनपेक्षरित्या थंडीचा प्रभाव फारच कमी होता पण गार वारा सुटला होता.. हाताशी असलेल्या वेळेत वाहन मिळवण्याचा प्रयत्न करुया म्हणत बाहेर पडलो.. तर अजुन तीनजण भेटले.. त्यात एकाला तर राजुर गावच गाठायचे होते.. इतक्या पहाटे आम्हाला गाडी मिळणे अवघडच होते पण त्या तिघांपैंकी एकाला पक्के ठाउक होते की पहाटे चारला पेपरची गाडी येते ज्यातून अगदी नाशिकपर्यंत लिफ्ट मिळते.. तेव्हा एका चहाच्या बंद स्टॉलजवळ थांबलो ! एव्हाना आमचा प्लॅन आता बदलला होता.. पेपरवाल्याची गाडी मिळालीच तर घोटीहून सव्वापाचच्या सुमारास 'राजुरमार्गे इगतपुरी - पुणे' एसटी पकडून थेट गुहीरे गाव गाठायचे म्हणजे ट्रेक सुरु !
चार वाजून गेले पण गाडीचा मागमूस नव्हता.. तितक्यात एक सुमो धावून आली.. मस्कापट्टी करुनही चालकाने 'सुस्पष्ट' नकार दिला.. नविन होता तो म्हणे ! ती एसटी आता चुकणार असे वाटत असतानाच अंधारातून एक छोटा टेम्पो आला.. नाशिक वा घोटीच्या मार्केटमधून भाजी आणण्यासाठी इथल्या स्थानिक भाजीविक्रेत्यांनी केलेली गाडी होती ! म्हटले पेपरवाल्याची नाही तर भाजीवाल्यांची गाडी बरी ! त्यांना विनंती करुन घोटीमार्गे लागलो.. मोठा प्रश्ण सुटला.. कुठलीही आगाउ सोय न करता आमची कसार्याहून फारच लवकर सुटका झाली होती व घोटीहून एसटी मिळताच पुढचा प्रवास सुकर ठरणार होता. आमचे नशिब चांगले की टेम्पो थेट घोटीच्या एसटीस्थानकासमोर जाउन थांबला ! ही टेम्पोगाडी अगदी नाशिकपर्यंत लिफ्ट मिळण्यासाठी मस्त !
इगतपुरीहून सुटलेली एसटी सव्वापाचच्या सुमारास घोटी स्थानकात धडकली.. गाडी तशी रिकामीच तेव्हा आम्ही झोपेची स्वप्नं पाहतच गाडीत चढलो.. पण काही अवधीतच भंडारदरानजिकचा वळणा-वळणाचा रस्ता सुरु झाला नि झोपेतच सीटवर सरका-सरकी होउ लागली.. गाडी शेंडीला पोहोचेस्तोवर सहा वाजत आलेले.. चहाच्या टपरीपाशी बसवाहकांनी नि साहाजिकच आम्ही पण 'कटींग' मारली.. इथून मात्र थंडीचे राज्य सुरु झाले.. पसरलेल्या दाट धुक्यातून रस्ता काढत एसटीने अर्ध्यातासात गुहीरे गावच्या स्टॉपवर सोडले.. आमच्याबरोबर तिथलाच एक गावकरी उतरला तेव्हा त्यालाच विचारून वाट समजून घेतली..
पहाटेच्या प्रकाशात नुकतेच गाव उजाडत होते.. शाळेचा गणवेश घालून लहान मुलं झेंडावंदन करण्यास निघाली होती.. या पायथ्याच्या गावातून पाबरगडाचे दर्शन म्हणजे अगदीच तुटक दर्शन.. गावात जाणार्या रस्त्यावरून पाहिले की एका अवाढव्य डोंगराच्या मागे पाबरगडाचा माथा अगदी किंचितसा दिसतो.. आम्ही गावातील मारुती मंदीराच्या बाजूने जाणार्या वाटेने चालू पडलो.. सोबतीला ट्रेकक्षितीज संकेतस्थळावर उपलब्ध असणारी माहिती घेतली होतीच.. अपेक्षेपेक्षा फारच आधी आम्ही गड चढायला घेतला होता.. आतापर्यंत सार्या घडामोडी अनकुल ठरलेल्या.. गावच्या घरांना मागे सोडले नि वाटेतच ट्रेकक्षितीजच्या माहितीनुसार पहिली खुण सिमेंटची टाकी लागली..
प्रचि १ : गुहीरे गाव
आता एक भलामोठा मातीचा चढ आमचा सराव करुन घेण्यासाठी अगदी समोरच स्वागतासाठी उभा होता.. तो चढ पार करुन गेलो नि रो.मा.चे नेहमीप्रमाणे हाशहूश सुरु झाले.. ! इतके ट्रेक करुनसुद्धा ट्रेकच्या सुरवातीला ह्याला दम लागतोच.. नंतर मात्र सुसाट जातो.. पण हे अतुलला कुठे माहित ? त्याने रो.मा ला ढोस देत बंधुप्रेम सुरु केले.. "भाऊ, तरी सांगतो पोट कमी कर.. व्यायाम करत जा"' इति इति.. थोडे कुठे चढलो की रो.मा टाईमप्लिज मागत होता.. आम्ही परिधान केलेल्या कानटोप्या एव्हाना कधीच सॅकमध्ये ढकलल्या होत्या.. आता घामाच्या धारा सुरु होताच जर्कीनही काढून ठेवले.. घामाघुम झालेला रो.मा तर वैतागून 'कमली.. कमली' म्हणत टिशर्टही काढण्यास आतुरलेला.. म्हटले आवरा !!
क्षितीजाची पुर्व बाजू एव्हाना सुर्यदेवांच्या स्वागतासाठी तांबडी झालर घेउन नटली होती.. धुक्याच्या दुलाईत दुरचा परिसर पार न्हाउन गेला होता.. थंडगार हवा सुरु होती नि त्या हवेच्या तालावर आकाशात 'कापशी' घार आपल्या शिकारीच्या शोधात "ध्यानस्थ" अवस्थेत डुलत होती.. इथे आमचे फारसे चढूनही झाले नव्हते तरी रो.माचे आपले 'टाइमप्लिज' काही थांबत नव्हते.. सुर्यदेवांच्या आगमनाची वेळ जवळ येताच सुर्यपक्ष्यांची किलबिल सुरु झालेली.. त्यातच गुहीरे गावातून कविताताईंचे सुर कानावर येउन पडले.. "हर करम अपना करेंगे.." शाळेत झेंडावंदनानिमित्त 'कर्मा' सिनेमातील देशभक्तीचे गाणे सुरु झालेले.. मग आम्ही पण 'ए वतन तेरे लिये...' म्हणत वेग वाढवला...
प्रचि २: लाल टिका
या वाटेवरची माहिती ट्रेकक्षितीज या संकेतस्थळावर व्यवस्थित दिली आहे.. जोडीला ट्रेकचा अनुभव असेल तर मग वाटेला चार फाटे जरी फुटले तरी योग्यच वाट निवडली जाते नि त्याच जोरावर आम्ही पहिला टप्पा पार केला.. अर्थात गावामागच्या पहाडाला वळसा देत वर पोहोचलो.. गुहीरे गाव एव्हाना नजरेआड झाले होते.. आता समोरबर्यापैंकी मोकळा प्रदेश नि एक अजुन एक उंच डोंगर आपली सोंड पसरुन बसला होता.. आम्ही धरलेली वाट मात्र सोंडेकडे न वळता सरळ जात होती.. क्षणभर गोंधळ उडला नि सरळ खायलाच बसलो !
आता नाकासमोरची वाट सोडून उजवीकडे पसरलेल्या सोंडेकडेच आम्ही वळालो... भेटलेल्या एका गुराख्याने आम्हाला योग्य मार्गी लावले होते.. हा सोंडेचा डोंगर भलामोठा उंच वाटत होता.. हाच का पाबरगड असा मनात संभ्रम चाललेला.. पण त्या गुराख्याने 'सोंडेवर जा.. तिथून शेंडयापर्यंत चढत जा.. त्याच्यामागे गड आहे ' असे सांगितले तेव्हा कुठे कळले की आम्ही अजुन दुसर्या टप्प्यावरच आहोत !!
सोंडेवर पोहोचेस्तोवर बराच दम लागला.. पण क्षणिकच... सोंडेवर विराजमान होताच थंडगार वार्याने पुन्हा एकदा मन प्रफुल्लित केले.. आम्ही आता कोवळे उन व सावली यांच्यामधोमध सोंडेवर आलो होतो.. डावीकडची बाजू नुकत्याच उगवत्या सुर्याने उजळवली होती तर उजवीकडे पहाडाच्या कुशीत वसलेली दरी अजुनही सावलीत गारठून निजली होती...
प्रचि ३: गुड मॉर्निंग उडी !
सोंड वाटली तितकी सहजसोप्पी नव्हती.. सरळसोट चढत जावे लागले होते.. दम लागत होता पण वार्याने प्रोत्साहन देणे सुरुच ठेवले होते... इथूनच आतापर्यंत नजरेआड असणारा पाबरगड समोर आला... आतापर्यंत केलेल्या चढाईने वाटत होते की गड आता दूर नाही ! पण उर्वरीत सोंडेचे अंतर मग डोंगराच्या शेंडयाचा भाग.. शेंडयाला वळसा नि मग कुठे गडावरची अंतिम चढाई... !! एवढया सगळयाची टोटल लावली नि एकच मनात आले... " पाबरा.. पाबरा.."
एकदिवसीय ट्रेकच्या नादात भर उनात इतके अंतर चढूनही गड दुरच आहे हे उशीराने जर कळले तर माघारच पत्करलेली बरी ! आम्ही मात्र खरेच सुदैवी ठरलो होतो.. कशाचा पत्ता नसताना आम्ही भल्या पहाटे चढाईला सुरवात केली होती !
प्रचि ४: आतापर्यंत चढून आलेल्या सोंडेचा पसारा नि पलिकडे धुक्यात डुबलेला परिसर !
प्रचि ५ : सोंडेचा डोंगर.. शेंडयाकडचा भाग.. त्याला वळसा घातला की मागे आपली मान उंचावून उभा दिसतोय तो पाबरगड... !! पाबरा... पाबरा !!
प्रचि ६: सोंडेचा डोंगर संपला एकदाचा.. मागे धुक्यात धुंद असणारा पाबरगड
डोंगराचा माथा गाठला तेव्हा अंदाज होताच की वळसा घालून जावे लागणार.. झालेही तसेच.. कातळकडयाला बिलगून जाणारी वाट पकडली.. ही वाट तशी सरळ नि कारवीच्या झाडीने वेढलेली.. या वाटेवरूनच रांगडया पाबरगडाची उंची लक्षात येते.. पुढे ही वाट घळीतल्या एका कातळटप्प्यापाशी आणून सोडते.. हा सोप्पा चढ पार करूनच आम्ही खर्या अर्थाने पाबरगडाला हात घातला होता.. आतापर्यंत इतके अंतर तुडवूनही आम्हाला अजुन अपेक्षित असणारी गुहा काही सापडली नव्हती... म्हणजेच दिडदोन तासाच्या चढाईनंतरही आम्ही पाबरगडाच्या अजुन छाताडावरच होतो..
प्रचि ६: हुश्शा !
खाली दिसणारा आजुबाजूचा परिसर पार धुक्यात अंधुक दिसत होता.. बरीच उंची गाठल्याची साक्ष होती पण वरती पाहिले तर पाबरगडाने अगदी आपल्या मानेपर्यंत 'कारवी'चा मफलर गुंडाळला होता.. या मफलरमधून मार्ग काढताना चढ जरा जास्तच अंगावर येत होते.. आमचे त्रिकुट आता मात्र गळून पडले होते.. अतुल कारवीच्या पल्ल्याड.. मध्ये मी तर मागे रो.मा.. जो तो आपापल्या दमाने चढू लागला... एकमेकांना आवाज दयायचा तर इथे सुसाट वारा नि त्याच्या तालावर फडफडणारी कारवीची झाडी यांनी एकच कल्ला सुरु केलेला ! मग शेवटी एकमेकांसाठी वळणावळणावर थांबत आम्ही तो कारवी पेशल मफलर पार केला ! आमच्यात पुढे असणार्या अतुलने गुहा सापडल्याचा आवाज दिला नि एकदाचे अंतिम टप्प्यात आल्याचे समाधान वाटले ! पण जल्ला पोटोबा केल्याशिवाय काय चैन पडणार नव्हते..
प्रचि ७ : कारवीचा मफलर !
कारवीच्या मधून जाणारी वाट तुडवली की पुन्हा कातळकडयापाशी येतो.. इथून एक वाट कातळकडयात कोरलेल्या पायर्यांनी वरती घेउन जाते तर एक वाट उजवीकडे वळते.. इथेच पुढे नैसर्गिक पण भलीमोठी गुहा लागते.. मुक्कामासाठी अगदी प्रशस्त ! याच गुहेला बिलगून अजुन एक गुहा लागते जिथे पाण्याचे टाके आहे.. या गुहेचे वैशिष्ट्य असे की बारामाही पाणी असते.. पिण्यास योग्य ! एकाच गुहेत एका बाजूस पाण्याचे टाके तर एका बाजूस खडकातच कोरलेली शंकराची पिंड पाहून थक्क झालो.. पहिल्या गुहेपेक्षा इथेच प्रसन्न वाटले ! वातावरण अगदी थंड नि शांत.. उनाला या परिसरात शिरकावच नव्हता.. त्यात मध्येच ढगांनी गलका केला.. ढगांचे पुंजके गुहेच्या तोंडापाशी येउन उभे राहीले नि आमच्यासमोर जणू पडदाच उभा केला.. पण क्षणातच जोरकस वार्याने ढगांचा पडदा उठवला.. इथून फारसे काही नजरेस पडत नव्हते कारण आम्ही वरती नि ढग खालती अशी अवस्था होती.. पहाटेचे धुकेही अदयाप पुर्णतः विस्कटले नव्हते... सकाळचे दहा वाजत आले तरी आम्ही या गुहेपाशी पहाटेची थंडी अनुभवत होतो.. गारठून गेलो होतो.. बोलताना तर तोंडातून मस्तपैंकी वाफा बाहेर पडत होत्या..
अश्या वातावरणात डब्यातून आणलेली उकडलेली अंडी आठवली.. पण या पवित्र जागेत खाणे उचित वाटले नाही म्हणून भावनांना आवर घातला.. या मदहोश वातावरणाचा आस्वाद घेत असतानाच दोन-तीन गावकरी आले.. गडाच्या दुसर्याबाजूच्या गावाकडून आले होते.. त्यांच्याकडूनच मग कळले की रविवारी गावातले बरेचशे भाविक या गडावरच्या 'भैरोबा' देवतेला भेटायला येतात.. भैरोबाचे मंदीर गडाच्या अगदी माथ्यावर आहे.. तिथे जाण्यापुर्वी या शिवलिंगाचे दर्शन घेतात.. बाजुलाच असणार्या टाकीतल्या पाण्याचा अभिषेक करुन हात जोडून भैरोबाच्या दर्शनाला पुढे जातात..
प्रचि ८: गुहा
प्रचि ९: ढग दाटूनि आले
प्रचि १०: धुक्यात बुडालेला सोंडेचा डोंगर
प्रचि ११: दुसर्या गुहेतील शिवलिंग व थंड पाण्याचे नैसर्गिक टाके.. पिंडीपुढे नंदीदेखील आहे.. ! पाण्याचे टाके बर्यापैंकी मोठे नि खोल कपारीपर्यंत पसरलेले आहे.. थोडक्यात पाण्याचा मुबलक साठा
आम्ही खरेतर बराच काळ विश्रांती घेण्याच्या विचारात होतो.. पण गारठल्यामुळे बसणे शक्य नव्हते.. सॅकपासून सगळंकाही थंडगार.. तेव्हा माथ्यावर जाण्यासाठी निघालो.. सोप्पासा कातळटप्पा नि कोरलेल्या पायर्या चढून गेलो की वरती आलो.. इथून मात्र जबरदस्त खोली दिसते.. सोंडेचा डोंगर तर अगदीच खुजा वाटतो.. आमच्यामागून काही गावकरीदेखील चढून आले.. एक तरुण इसम नि त्याचे वयस्कर आई- बाबा ! गुहीरे गावातूनच आले होते.. इतके चढ पार करुन ते वयस्कर जोडपे गडावर आले होते ते केवळ 'भैरोबा' देवतेवर असणारी श्रद्धा ! भैरोबादेवतेचे छप्परवजा मंदीर अगदी समोरच दिसते.. मंदीराच्या मागे पाण्याच्या दोन तीन टा़क्या आहेत.. त्या गावकर्यांनी देवाला नारळ काय दाखवला तर जल्ला आमच्या रो.मा ला लगेच 'खोबर्या'ची स्वप्नं पडू लागली ! कुजबुजूलादेखील.. पण वेळीच त्याला उकडलेल्या अंडीचे आमिष दाखवून सावरले.. या मंदीराला लागूनच एक वाट माथ्याच्या सर्वोच्च उंचवटयावर घेउन जाते.. तिथेच जाउन पेटपूजा करण्याचे ठरवले.. !
प्रचि १२: माथ्यावरती आगमन !
प्रचि १३: एका हातात काठी नि एका हातात चप्पल घेउन गड चढणारी आज्जी !
प्रचि १४: भैरोबाचे छप्परवजा मंदीर
प्रचि १५ : एवढी चढाई करुनदेखील आज्जीबाई मंदीराबाहेरच बसलेल्या.. म्हणजे महिलांना प्रवेश नाही अशी प्रथा असावी हा अंदाज.. विचारायला गेलो नाही.. पण इतके चढून यायचे नि बाहेरच थांबायचे असा नियम असेल तर नक्कीच खटकणारे...
आता आम्ही पाबरगडाच्या अगदी उंच भागावर आलेलो.. साहाजिकच आधीच धुमशान घालणारा वारा इथे अधिक बेभान झालेला.. अगदी आमच्या कानफटात मारतोय असे वाटत होते.. इथे पाहण्यासारखे काही नाही.. पण सभोवताली सुंदर नजारा डोळ्यात भरतो.. एकीकडे भंडारदराचा विस्तिर्ण जलाशय डोळे दिपवून टाकतो.. त्यापलिकडे रतनगडची डोंगररांग खुटयामुळे पटकन ओळखता येते.. आमचे दुर्भाग्य असे की वातावरण फारच धुसर होते त्यामुळे कळसुबाईचे शिखरसुद्धा अंधुकसेच दिसले.. बाकी अलंग-मदन-कुलंग चे त्रिकुट वा पटटागड यांच्या स्थानावरुन रो.मा सोबत बरीच खलबत झाली ! माझे भौगोलिक ज्ञान कमीच असल्यामुळे रो.मा नक्कीच बरोबर असावा पण म्हटले चर्चा महत्वाची.. पुर्वेकडे घनचक्कर नि मुडा पर्वत ही शिखरे अगदी दिमाखात उभी होती.. पाबरगडाचाच भाग असला तरी सुटा भासणारा बाजूचा डोंगर तर अगदी संपुर्ण नजरेत भरतो.. इथे फक्त पाण्याचे एक टाके दिसत होते तेव्हा हा उंचवटा उतरुन त्या डोंगरावर जाण्यास उत्सुक नव्हतो..
उन्हातच बेभान वार्याला पाठ दाखवत खायला बसलो.. ! चुक केली नि पहिला अंडीवरच ताव मारला ! परिणामी पुरणपोळ्यांचा भाव कमी झाला ! गरमागरम मॅगी व अजुन डझनभर अंडी असती तर म्हणून चुकचुकत राहीलो..
आमची खादाडी आटपेस्तोवर चारेक ट्रेकर्सचा एक ग्रुप आला.. ही मंडळी सांगलीहून आली होती ! या परिसरात भटकंतीसाठी शुभारंभ केलेला.. पाबरगड-भैरवगड-कलाडगड-पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड ( !! ) असा कायतरी अचाट प्लॅन होता ! त्यांना आवश्यक ती माहिती पुरवल्यावर त्यांनी निरोप घेतला.. 'जल्ला आम्ही कधी असे ट्रेक करणार.. फुकटचे जळवून गेले' मनातल्या मनात म्हणतच त्यांना टाटा केले !
रात्रीचा प्रवास, कमी झोप नि इतकी चढाई वर खादाडी.. मग त्यात कुणालातरी कळ लागतेच.. पण त्यासाठी चढून आलेला उंचवटा दुसर्या बाजूने उतरायचे जिथे एका बाजूस खराब पाण्याचे टाके दिसत होते नि परत वरती यायचे.. हे सगळे करायला अवघड नि कळ सोसायलाही.. शेवटी नाईलाजास्तव अतुल एकटाच उतरुन गेला.. आता इतके खाली उतरतोयस तर मग बाजूच्या डोंगरावर पण जाउन ये असे अतुलसाहेबांना म्हटले नि स्वारी खरच नंतर त्यादिशेने गेली.. तो तिथवर पोहेस्तोवर त्यांचे मोठे बंधू मात्र उन्हातच निद्रिस्त.. अगदी वार्यासंगे घोरुदेखील लागले !
प्रचि १७: दुसर्या डोंगरावर
प्रचि १८: एकटा
आतापर्यंत आम्ही बराच वेळ काढला होता.. अतुल आला तसे रो.मा ला जागे केले नि माघारी फिरणार तोच तो गावकरी आपल्या वृद्ध जोडप्यांसोबत दुसर्या बाजूने चढून आला ! म्हटले आता ही कुठली वाट तर कळले खाली मारुतीरायांची मुर्ती कोरलेले पाण्याचे टाके आहे ! आता हे कोण चुकवणार म्हणून तिथूनच खाली उतरलो. याक्षणी अतुलचा चेहरा फक्त केविलवाणा होता ! आधीच माहिती असते तर खालीच थांबलो असतो वगैरे वगैरे सुरु झाले !! त्या टाक्याच्या बाजूने असणारी उतरणीची वाट घसरगुंडीला लाजवेल अशी होती.. कसेबसे सरपटत टाक्यापाशी आलो.. खरेतर भैरवाचे मंदीर लागले की त्यामागून जाणारी वाट याच टाक्यापाशी येते.. इथले पाणीदेखिल बर्यापैंकी चांगले वाटले.. इथूनच पुढची वाट छोटछोटया झुडूपांना तुडवत बाजूच्या डोंगरामधल्या घळीपाशी आणून सोडते.. अतुलला म्हणा आता पुढची वाट ओळखीची होती.. इथवर येउनही आम्ही त्या डोंगरावर जाणे टाळले नि त्या उंचवटयाला प्रदक्षिणाच घालायची ठरवली.. वाटेत पाण्याच्या तीनचार सुक्या टाक्या लागल्या.. तर एकाठिकणी काही अवशेष दिसले पण नक्की काय असावे ते अंदाज लागला नाही.. गावकर्याने खोल्या आहेत म्हणून सांगितलेले पण तसे काही वाटले नाही..
प्रचि १९: हनुमान टाके (मारुतीरायांपर्यंत पोचण्यास कोरलेल्या पायर्या आहेत)
प्रचि २०: घळ नि बाजूच्या डोंगरावर जाणारी वाट
प्रचि २१: खोल्या ?
आम्ही अंदाज केल्याप्रमाणे पुन्हा भैरवमंदीराच्या वाटेवर येउन पोहोचलो.. एव्हाना सुर्यदेव डोक्यावर होते.. वार्याचा जोरही कमी झालेला तेव्हा आता करपण्याची वेळ सुरु झाली हे समजून गेलो.. पटापट उतरण्यास सुरवात केली.. अर्थातच पुन्हा त्या थंडगार गुहेची भेट घेतलीच... ही गुहा म्हणजे एसीरुम नि गडाचा माथा म्हणजे पंखा नाही तर चक्क पवनचक्क्याच लावलेली रुम असेच कायतरी वाटून गेले ! पाबरगडाने खरच मनावर भुरळ घातली होती.. कळसुबाई रांगेतील आणखीन एका रांगडयागडीची ओळख झाली..
आतापर्यंत भेटलेल्या गावकर्यांपाशी चौकशी केली तेव्हा गावातून अडीचच्या सुमारास एसटी असल्याचे कळले होते.. पण आम्ही एकच्या सुमारास उतरायला घेतले तेव्हा अशक्यप्राय आव्हान वाटत होते.. भर उन्हात अथक परिश्रम करुन पायथ्याला पोहोचलोदेखिल.. पण गावात पोहोचण्याआधीच दुरच्या रस्त्यावरुन लाल डबा जाताना दिसला ! आमचे दुर्दैव आता कुठे सुरु झालेले ! काल रात्रीपासून सगळे अनकुल घडलेले.. पण आता कडक ऊन.. नि एसटी पण गेली.. डोक्याला शॉट झाला खरा पण आता एसटी गेलीच आहे तर जाउ रमतगमत म्हणत निघालो..
प्रचि २२: वेडा राघू
प्रचि २३: गावातील मारुतीरायांचे देऊळ..(रात्री गावात थांबायचे झाले तर उत्तम जागा). देवळाच्या बाजूलाच काही विरगळी आहेत..
प्रचि २४: सारे जहांसे अच्छा...
देवळात क्षणभर विश्रांती केली.. बाजूच्याच शाळेतील अंगणात खेळणार्या मुलांना रो.मा ने खाऊवाटप केले नि आम्ही चालते झालो... बाहेर रस्त्यावर येताना कळले की गेलेली एसटी कसार्याची नसून स्थानिक होती.. सुटकेचा निश्वास टाकायचा तर कळले या रस्त्याला एसटी येतच नाही.. वरच्या रस्त्याला येते !! जल्ला आता हा वरचा रस्ता कुठला विचारायचे तर कळले अर्ध्यातासाची चाल आहे !! घडयाळाची वेळ सव्वादोन दाखवत होते नि दुपारच्या कडक उन्हात पोचणे अशक्य होते पण रो.मा भाऊंनी' प्रयत्न झालेच पाहिजे' म्हणत लेटस गो केले.. साहेबांची गडावर झोप झाल्याचा परिणाम असावा पण आमची पंचाईत झाली.. तसेही तो डांबरी रस्ता त्रस्तपणे चालताना एसटी मिळेल अशी जराही आशा वाटत नव्हती.. म्हणून वाटेत भेटणार्या गावकर्यांना विचारले तर एसटी नाही तरी कसार्यापर्यंत जीपगाडया नक्कीच भेटतील असे अगदी आत्मविश्वासपुर्ण उत्तर मिळाली.. त्या डांबरी रस्त्याचा कंटाळा आला म्हणून एका गावकर्याकडून शॉर्टकट विचारुन घेतला नि पुन्हा ट्रेक सुरु झाला.. अर्धातास पालटून गेला तरी आमचे चालणे थांबतच नव्हते.. अगदी शेताडात काय घुसलो.. नदीच्या खोर्यातून उतरलो चढलो.. नि जवळपास पाउणतासात वरच्या रस्त्याला पोहोचलो.. !
प्रचि २६: रस्ता.. मागे पहाडामागे डोकावताना दिसतोय तोच पाबरगड !
प्रचि २७: नदीचे खोरे.. सर्वात उंच दिसतो तो पाबरगड !
इतके करुनही त्या रस्त्यावर जीपगाडया काही थांबेनात.. सगळ्या भरलेल्या.. त्यात बहुतांशी त्र्यंबकच्या दिशेने धावणार्या.. जवळपास पन्नास गाडया तरी वारकर्यांच्या भजनमंडळाच्या.. मग कळले दुसर्या दिवशी त्र्यंबकेश्वरला एकादशीनिमित्त संत निवृत्तिनाथ यात्रा होती !! त्यात लिफ्ट मागताना अजुन एक कळले की दुपारच्या अडीचच्या एसटीला उशीर झालेला नि पाच मिनीटापुर्वीच ती गेलेली.. नि पुढची एसटी म्हणे खालच्या रस्त्याने जाणार.. म्हणजे गुहीरे गावात पाच वाजता !! जल्ला हसायचे की रडायचे कळत नव्हते !!! शेवटी दोन्ही त्या दोन रस्त्यांचा समबिंदू गाठून एसटी पकडायचे ठरवले.. अशक्य ट्रेक अशक्य चाल काही संपत नव्हती असे वाटत असताना एका ‘ओमनी’ला हात दाखवला ! हात कसला समोरच उभे राहीलो नि आमचा प्रॉब्लेम सांगितला.. गडावर आलो होतो म्हटल्यावर त्यांनी आदराने विनंतीचा स्विकार केला (खूप आनंदाची गोष्ट)..
त्यांनी आम्हाला थेट चक्क राजुरला (गुहीरेच्या पुढे अंदाजे ६ किमीवरील मुख्य गाव) नेउन सोडतो म्हणाले जिथे एसटी,जीपगाडी काय हवं ते उपलब्ध असतं ! आम्हाला काय आता सगळच चालणार होतं.. 'आम्ही पण मुंबईत येउन गेलोय.. पण तुमची मुंबई नाही परवडत.. कसा तो रेल्वेने प्रवास करता.. काय ती गर्दी.. कुठे मोकळा श्वास नाही.. तुम्हाला इकडे कसं वाटलं.. कसला त्रास नसतो इथे.. मोकळी हवा जास्त रहदारी नाही.. आमची शेती आहे.. ताडीचा पण धंदा आहे.. डिकीत मागे शुद्ध ताडीचे दोन ड्रम आहेत..!! ' इति इति त्यांचे सुरु होते..
शेवटी त्या ताडीचा गंध न घेताच आम्ही राजुरला उतरलो नि समोरच 'कसारा कसारा' ओरडणार्या वडापमध्ये जाउन बसलो.. जवळपास रात्री दहाच्या सुमारास मुंबई गाठली पण ! 'पाबरगडाची' मोहीम अनपेक्षितरित्या यशस्वी झाली यातच समाधान मिळून गेले.. थोडा आडवाटेला असला तरी या रांगडया गडाला भेट देणे म्हणजे एक लांबलचक चाल नि अंगावर येणारे चढ असणारा एकदम 'दमछाक' ट्रेक ! पावसाळ्यानंतरच्या मोसमात सभोवतालचा भंडारदराचा परिसर नि अत्युच्च शिखरे यांचा नजारा नक्कीच वेड लावणारा असावा ! आणि गडावरची त्या पाण्याच्या टाकीची गुहा तर नेहमीच स्मरणात राहणारी.. म्हणून सांगतो 'पा(पहा)- बर- गड' !
काय काय नगाधिराज शोधून काढता
काय काय नगाधिराज शोधून काढता रे ! मस्त !
मस्त लिहिलंय . पाणी आणि
मस्त लिहिलंय .
पाणी आणि निवारा दिसतोय .झाडी रतनगडासारखी नाही दिसत .नदी कोणती ?
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलयं..
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलयं..
एकदम कडक लिहिलंय. मजा आली
एकदम कडक लिहिलंय. मजा आली वाचायला.
भंडारदरा जलाशयाचा वरून काढलेला फोटो पहायला आवडला असता, पण अर्थात तेवढं स्वच्छ वातावरण नव्हतं हे ही झालंच...
कार्वीचा मफलर - हा शब्दप्रयोग जाम आवडला.
हवेच्या तालावर आकाशात 'कापशी' घार आपल्या शिकारीच्या शोधात "ध्यानस्थ" अवस्थेत डुलत होती.. >>> बेस्ट वर्णन!!
एकदम झकास !
एकदम झकास !
वृतांत नेहमीप्रमाणेच चाबूक.
वृतांत नेहमीप्रमाणेच चाबूक. फोटोज पण मस्तच
नेहमीप्रमाणेच
नेहमीप्रमाणेच मस्त!!!
कमली..कमली.. >>
मस्त वृत्तांत. शेंडी वरुन
मस्त वृत्तांत. शेंडी वरुन रतनला जाताना डावीकडे दिसणारा पाबर आठवतोय. भन्नाट उंची आहे.
लै भारी रे दोस्ता ..... एकदम
लै भारी रे दोस्ता ..... एकदम झकास वर्णन .......
भन्नाट!
भन्नाट!
अद्याप हा संपूर्ण विभाग
अद्याप हा संपूर्ण विभाग राहिला आहे…. प्रची पाहिल्यावर रुख रुख आणखी वाढली आहे.
सुंदर!
खतरनाक वर्णन… योचे ब्लॉग
खतरनाक वर्णन… योचे ब्लॉग म्हणजे आपल्यासाठी पार्टीच असते !!
पाबराचा चढ बघून कोणत्याही नवीन ट्रेकर्सचा जीव घाबरा होईल !!! तुझं विशेष कौतुक यासाठी की पाबरगड हा कसलेल्या ट्रेकर्सनाही गुंगारा देण्यात प्रसिद्ध असा किल्ला मानला जातो. एकतर गुहिरे गावातून पाबरगड दिसत नाही. दोन डोंगरांच्या मागे तो लपलाय आणि वाटही चुकवणारी आहे. पण तरीही तुम्ही गावातील माणूस न घेता यशस्वीरीत्या तो सर केलात.
तू केलेलं वर्णन वाचून जायची इच्छा बळावलीये हे नक्की !!!
लय भारि....... घामाघुम झालेला
लय भारि.......
घामाघुम झालेला रो.मा तर वैतागून 'कमली.. कमली' म्हणत टिशर्टही काढण्यास आतुरलेला..>>:D :
त्या गावकर्यांनी देवाला नारळ काय दाखवला तर जल्ला आमच्या रो.मा ला लगेच 'खोबर्या'ची स्वप्नं पडू लागली ! कुजबुजूलादेखील..>>:D :
जबरी
जबरी
धन्यवाद
धन्यवाद
लिहिलंय जहबहरी!! यावेळी फोटोत
लिहिलंय जहबहरी!!
यावेळी फोटोत 'यो टच' मिसिंग वाटला रे... वातावरणाचा परिणाम काय? धुकं होतंच म्हणा....
झकास रे....सॉलीड वर्णन आणि
झकास रे....सॉलीड वर्णन आणि मस्त फोटो
कार्वीचा मफलर शब्दप्रयोग फारच म्हणजे फारच आवडला...
मस्त रे यो ... झकास लिव्हलय
मस्त रे यो ... झकास लिव्हलय ...
पाबरा पाबरा.. पहा बर गड..
ध्यानीमनी नसताना एक प्रजासत्ताकदिन सह्याद्रीच्या कुशीत सार्थकी लागला.
एक शंका. माझ्या
एक शंका.
माझ्या समजूतीप्रमाणे, किल्ले नामक प्रकार घाटवाटांवर, किंवा बेसीकली ट्रेड रूट्स वर लक्ष ठेवणे, यांसाठी मुख्यत्वे बनविलेले. किंवा काही किल्ले राजाला सुखरूप 'रिट्रीट' हवी म्हणून, आसपासच्या उत्तम महसूली प्रदेशावर लक्ष ठेवत, तिथल्या जहागिरदारास सेफ हेवन म्हणुन बनवलेले.
नकाशा पहाता, या इतक्या आडजागी असलेल्या पाभरगडाचं स्ट्रॅटेजिक महत्व काय?
हा खरेच 'किल्ला' होता काय?
याबद्दल वाचायला आवडेल.
सुंदर वर्णन ! <<<थंडगार हवा
सुंदर वर्णन !
<<<थंडगार हवा सुरु होती नि त्या हवेच्या तालावर आकाशात 'कापशी' घार आपल्या शिकारीच्या शोधात "ध्यानस्थ" अवस्थेत डुलत होती..>>> <<<बरीच उंची गाठल्याची साक्ष होती पण वरती पाहिले तर पाबरगडाने अगदी आपल्या मानेपर्यंत 'कारवी'चा मफलर गुंडाळला होता..>>>> मस्त मस्त
प्रचि ९: ढग दाटूनि आले ....खतरनाक
छान
छान
टिपिकल रॉकिंग 'यो'-लिखाण… मजा
टिपिकल रॉकिंग 'यो'-लिखाण…
मजा आ गया!!!
पाबरचा USP म्हणजे फसव्या निसरड्या क्रेझी वाटा आणि माथ्यावरून दिसणारं सह्याद्रीतलं एक अत्यंत अत्यंत अप्रतिम दृष्य..
मस्त लेख. अप्रतीम फोटो. पाणी
मस्त लेख. अप्रतीम फोटो.
पाणी आणि निवारा दिसतोय .झाडी रतनगडासारखी नाही दिसत .नदी कोणती ?>>> प्रवरा नदी