घरट्यात माझीया......

Submitted by शांकली on 11 March, 2014 - 23:28

पक्ष्याने घरटं बांधणं हे जरी खूप कॉमन असलं तरी जेव्हा ते प्रत्यक्ष घरटं बांधत असतात; त्या गोष्टीचं निरिक्षण करणं हे फारच आनंददायी असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंजिराने आमच्या अंगणात घरटं बांधण्याचं ठरवलं. दोघांची मिळून जागा शोधायची धावपळ सुरु झाली तसा आम्हाला त्याचा सुगावा लागला. अगदी अभ्यास करून, मग अगदी सर्वात सुरक्षित जागा त्यांनी ठरवली. आमचा जाईचा वेल छाटला आहे आणि शेजार्‍यांच्या ग्रीलमधे त्याचे वाळके अवशेष म्हणजे कडक झालेल्या फांद्या अडकून त्या तशाच राहिल्या आहेत. त्या वाळलेल्या फांदीच्या अगदी टोकाला त्यांनी घरटं बांधायला सुरुवात केली. ह्यांचं घरटं म्हणजे जणू कचर्‍याचा लोंबता बटवाच!

या दोघांची घरट्यासाठी सामान जमवण्याची धडपड सुरू झाली. अगदी हिरीरीने दोघं आलटून पालटून चोचीत काय काय घेऊन येत आणि अगदी मन लावून घरटं उभं करायला धडपडत. कोळिष्टकं, केस,वाळलेल्या काडया, पालापाचोळा यांबरोबरच ह्यावेळी याने,कुठून कुठून छोटे छोटे प्लॅस्टिकच्या कागदाचे तुकडेही गोळाकरून घरट्याला बाहेरून जोडले! मधून मधून इतर पक्ष्यांची पिसं पण चोचीत दिसत. ती अंडी आणि पिल्लांसाठी मऊ मऊ गादीसाठी म्हणून आणत.

चोचीत काड्या आणल्या की कॉपरपॉडवर बसून आधी खूप बडबड करायची. घरट्यापाशी कुणी नाही ना? याची खातरजमा करून घ्यायची आणि मगच घरट्यापाशी जाऊन त्याची बांधणी करायची! मी 'ह्यांना' म्हटलं सुद्धा, "आम्ही घरटं बांधतो आहोत याची इतकी कशाला जाहिरात करायला पाहिजे? आपली मनी, आसपासचे कावळे यांना समजलं तर शिंजिराचं काही खरं नाही." त्यावर मला 'घरचा आहेर' मिळाला! "अगं बडबड करते ना ती मादी शिंजीर आहे; आणि ती केल्याशिवाय तिचं कसं होईल? पण काही म्हण 'तिची' बडबड, चिवचिव गोड तरी आहे!! छान वाटतं ऐकायला!!!" आता ते दोघंही आले की चिवचिवाट करतात हे काय मला माहीत नाही? पण टोमणे मारण्याची एकही संधी सोडेल तर तो नवरा कसला!!

सरते शेवटी ७-८ दिवसांत घरटं पूर्ण झालं. आत बाहेर ये-जा करण्यासाठी अगदी छोटी आणि अगदी कंपासने आखून घ्यावी अशी एक गोलाकार खिडकी ठेवली होती. त्यात आलटून पालटून ते दोघं बसायचे. पोट आणि शेपटी आत आणि चोच बाहेर अशा पोझिशनमधे. बाहेरून कळायचं पण नाही की चोच आहे की वाळकी काडी! इतके बेमालूम लपून जायचे ते! आणि त्या वाळक्या फांदोर्‍यांमधे ते घरटं पण पटकन दिसायचं नाही.

१२-१३ दिवसांनी दोघांची लगबग सुरू झाली त्यावरून आम्ही अंदाज बांधला, की पिल्लं बाहेर आलेली दिसताहेत. आणि मनोमनी त्यांचं अभिनंदनही केलं. पण कितीही प्रयत्न केला तरी पिल्लं काही दिसली नाहीत. एक दिवस मात्र अगदी ३ छोटे गोळे कॉपरपॉडवर ओझरते दिसले. त्यावरून समजलं, किती पिल्लं होती ते.

पिल्लांची शाळा सुरू झाली पण त्यांचं ट्रेनिंग आम्ही बघू शकलो नाही. एकतर पिल्लं पटकन दिसतील इतकी मोठी नव्हती आणि शिवाय पानांमधे ती इतकी बेमालूम लपून जात की त्यांचं अस्तित्व जाणवत नसे. पिल्लं बाहेर येऊन १-२ दिवसांतच त्या पूर्ण कुटुंबाचा मुक्काम आमच्या इथून हलला; कारण नंतर ते दिसले नाहीत.

दिसतो फक्त त्यांनी काडी काडी जमवून हिरीरीने बांधलेला खोपा........
जितक्या सहजपणे त्यांनी बांधला तितक्याच सहजपणे कुठलंही ममत्व न ठेवता सोडलेला................

एक गोष्ट मात्र खरी; की त्यांचा खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे.

IMG_5500-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, सुरेख लिहिलंय Happy शिर्षकही मस्तच. Happy

माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झूले
कुण्या देशीचे पाखरु, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे
माझ्या अंगणात आले...... Happy

वा, काय सुरेख चित्रदर्शी वर्णन Happy नेहमी का नाही लिहीत गं तू अशी?

घरट्यात अंजलीच्या आनंदाचा ठेवा, तूच यदूनाथा सदा असू द्यावा... म्हणजे तो आम्हालाही आपसूकच मिळत राहील Happy
जिप्सी, अप्रतिम साजेशा ओळी, तिच्या लेखासाठीच खास लिहिल्यासारख्या!

किती मस्त लिहिलंय..

बारशाला बोलावलं नाही, आत्याबाईला मान दिला नाही...... आता मी नाही वाचणार पुढचे.... Sad Sad

अगं बडबड करते ना ती मादी शिंजीर आहे; आणि ती केल्याशिवाय तिचं कसं होईल?

तिने बडबड केली नाही तर तो घरटे बांधताना कशावरुन चुकणार नाही?? उद्या घरटे व्हायचे बांधुन आणि मग कळायचे की दरवाजाच केला नाहीय.... उगीच नाही बायका बोलत..

पक्ष्याने घरटं बांधणं हे जरी खूप कॉमन असलं तरी जेव्हा ते प्रत्यक्ष घरटं बांधत असतात; त्या गोष्टीचं निरिक्षण करणं हे फारच आनंददायी असतं >>>>>> निरिक्षण ओघवत्या भाषेत लिहिणं हे देखील घरटं बांधण्याईतकं सुंदर आहे.

मस्त लिहिलय. Happy
मझ्या माहेरिपण मी पाहिलय बर्याच पक्ष्याना घराभोवतालच्या झाडांवर घरटि बांधताना.
सुगरणीची घरटी नारळाच्यअ झावळीच्या टोकाला नाहितर बोराच्या झाडाला. सुर्वातीचं टोक इतकं नाजुक असायचं की तीच्यापेक्षा आम्हालाच काळ्जी पुढचा खोप्याचा भार ते कसं पेलनार?
शिंजीराचे छोटे घरटे बोगन्वेल/ जाईच्या वेलात. अगदि अओबड्धोबड. तीची पिल्लं मात्र धीट.ते पिवळे पिंगपाऑगचे गोळे बाहेर येउन तारेवर ओळित बसायचे उन्हाला.
मुनीयाचं नीट्नेट्कं छोटे वाटिएवढे घरटे सुरुच्या दाट झाडीत असायचे.
आठ्वणी जाग्या झाल्या....:)

सुरेख वर्णन, शिंजीराचे+ घरट्याचे फोटे टाकलेत तर बर होईल....
मी कधी पाहिला नाही शिंजीरा...

शांकली, काय छान वर्णन करतेस ग! पण फोटो पाहिजेतच हां! Happy
तिने बडबड केली नाही तर तो घरटे बांधताना कशावरुन चुकणार नाही?? उद्या घरटे व्हायचे बांधुन आणि मग कळायचे की दरवाजाच केला नाहीय.... उगीच नाही बायका बोलत..>>>>>>>..हो ना. नंतर म्हणणार आधी का नाही सांगितल? म्हणजे बोललं तरी वाईटच आणि नाही बोललं तरी वाईटचं. Uhoh Proud
जिप्सी, कविता छानच! Happy

तिने बडबड केली नाही तर तो घरटे बांधताना कशावरुन चुकणार नाही?? उद्या घरटे व्हायचे बांधुन आणि मग कळायचे की दरवाजाच केला नाहीय.... उगीच नाही बायका बोलत..>>>>>>>>>
इथेच चुकतं तुम्हा बायकांचं .... "तो" शिंजीर तिला पुन्हा पुन्हा ताकीद देत असेल - की प्लीऽज, प्लीऽज मला डिस्टर्ब करु नको... तू हे जे डिस्टर्ब करतेस ना त्यानेच चुका व्हायचे चान्सेस जास्त आहेत .... आणि "ती" ही आपल्या स्वभावाला अनुसरुन त्याला सारख्या सूचना देत असणार ...... Happy Wink
(आई असो वा बायको -आपल्या मुलाला/ नवर्‍याला वळण (किंवा सामान्यज्ञान) कसं ते अज्जिबात नाही हे डोक्यात ठेऊन सतत सूचनाच करत असतात... Happy Wink - उगाच का आपली बोलली जाणारी भाषा "मातृभाषा" असते ........ Happy Wink - ही वस्तुस्थिती असल्याने हलके घ्या वगैरे काही म्हणत नाहीये ......

तो "बाया" म्हणजेच सुगरण पक्ष्यातला नर जरा जास्त स्मार्ट असतो - सगळे घरटे विणून झाल्यावरच "ति"ला बोलावतो - ते पहायला ....... Wink Happy

शांकलीताई आहाहा, कित्ती सुंदर लिहिलेत. फोटो हवाच. सईला मम.

शिंजीर म्हणजेच सुगरण का?

शशांकजी, मिश्कीलपणे झोडलंत समस्त बायांना. तुमचा हा गुण पण कळला ह्या निमित्याने.

हा सुगरण म्हणजेच व्हीवर बर्ड ..... आणि त्याचे अतिशय सुबक घरटे (खोप्यामदी खोपा सुगरणीचा खोपा गं... बहिणाबाई... ) Happy Wink

finns_weaver_001281_at_nest_pml.jpg74150276.jpgbaya_weaver_ploceus_philippinus-_male_w_img_0709.jpg

(सर्व फोटो आंतरजालावरुन साभार......)

शिंजीराबद्दल अधिक माहिती (पुस्तकः पक्षी आपले सख्खे शेजारी, लेखकः किरण पुरंदरे)

इतर मराठी नावं: जांभळा सूर्यपक्षी, चुमका, मधुकर
इंग्रजी नावः Purple Sunbird (पर्पल सननर्ड)
शास्त्रीय नावः Nectarinia asiatica नेक्टरिनिया एशियाटिक
लांबी: १० सें.मी.
आकारः चिमणीपेक्षा लहान

कोणताही पक्षी विशिष्ट झाडावर घरटं बांधतो असं नसून झाडाचं किंवा वेलीचं स्थान महत्वाचं असतं. माणसाच्या सान्निध्यात पक्ष्यांना सुरक्षित वाटतं. लहान आकारांचे किडे आणि मकरंद पुरवणार्‍या झाडाझुडपांचा शेजार पसंत करणारे शिंजीर इतर कितीतरी पर्याय उपलब्ध असुनही पुष्कळदा घरांच्या जवळपास घरटं करतात. खेड्यापाड्यात कावलीसाठी अंगणात उभारलेल्या मांडवाखली घरटं केलं जातं. घरट्यासाठी निवडलेल्या जागा तर फार धाडसी असतात. उदा. विजेच्या वायरी (याबहुदा वेलीपेक्षा किंवा फांदीपेक्षा जास्त मजबूत असल्याने), व्हरांड्यातला वेल.

सर्वात वाईट प्रकार म्हणजे काही वेळा लोकांना - विशेषतः बागकाम करणार्‍या माळ्याला किंवा सफसफाई करणार्‍या नोकरवर्गाला शिंजीराचे घरटं म्हणजे चक्क कचरा वाटतो आणि हे लोक शांतपणे ते काढुन टाकुन देतात. म्हणुन प्रत्येकाने सावध राहून "सरसकट सफाई कार्यक्रम" राबवताना काळजी घेतली पाहिजे.

शिंजीराच्या विणीचा हंगाम मार्च ते जून. घरट्यातील पिल्लं उडुन गेल्यावरसुद्धा शिंजीराच्या घरट्याला हात लावू नये. हा पक्षी दुसर्‍या खेपेलाही तेच घरटं वापरल्याची नोंद झालेली आहे. Happy

हा सनबर्ड म्हणजेच शिंजीर - (फोटो आंतरजालावरुन साभार ...... )>>>>>>शशांक एक शंका आहे. सरसकट सगळ्या सनबर्डला मराठी नाव शिंजीर आहे कि जो जांभळा सुर्यपक्षी आहे त्यालाच शिंजीर म्हणतात?

शशांकजी, एवढी मोठी पोस्ट लिहीलीत, पण एका शब्दाने कौतुक तरी करायच होत? >>>> अंजू जेव्हा ते क्रोशाचे करीत असते (उदा. डॉयली वगैरे..) तेव्हा मी अतिशय "कौतुकाने" म्हणतोच की किती ती बारीक बारीक भोकं पाडत बसलीएस .... खरंच फारंच पेशन्सचे काम आहे हे ... Happy Wink

शशांक एक शंका आहे. सरसकट सगळ्या सनबर्डला मराठी नाव शिंजीर आहे कि जो जांभळा सुर्यपक्षी आहे त्यालाच शिंजीर म्हणतात? >>>> अरे हे कोणा पक्षीतज्ञाला विचारायला पाहिजे - माझे सगळे कामचलाऊ ज्ञान आहे रे बाबा .. Happy

वा शशांकजी आणि जिप्सी, मायबोलीवर येण्याचा हाच फायदा आहे, कित्ती माहिती मिळते वेगवेगळ्याप्रकारे, आणि माझी पाटी खरंच कोरी आहे, माझ्यासाठी हा सर्व आनंदाचा ठेवा आहे.

Pages