घरट्यात माझीया......

Submitted by शांकली on 11 March, 2014 - 23:28

पक्ष्याने घरटं बांधणं हे जरी खूप कॉमन असलं तरी जेव्हा ते प्रत्यक्ष घरटं बांधत असतात; त्या गोष्टीचं निरिक्षण करणं हे फारच आनंददायी असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिंजिराने आमच्या अंगणात घरटं बांधण्याचं ठरवलं. दोघांची मिळून जागा शोधायची धावपळ सुरु झाली तसा आम्हाला त्याचा सुगावा लागला. अगदी अभ्यास करून, मग अगदी सर्वात सुरक्षित जागा त्यांनी ठरवली. आमचा जाईचा वेल छाटला आहे आणि शेजार्‍यांच्या ग्रीलमधे त्याचे वाळके अवशेष म्हणजे कडक झालेल्या फांद्या अडकून त्या तशाच राहिल्या आहेत. त्या वाळलेल्या फांदीच्या अगदी टोकाला त्यांनी घरटं बांधायला सुरुवात केली. ह्यांचं घरटं म्हणजे जणू कचर्‍याचा लोंबता बटवाच!

या दोघांची घरट्यासाठी सामान जमवण्याची धडपड सुरू झाली. अगदी हिरीरीने दोघं आलटून पालटून चोचीत काय काय घेऊन येत आणि अगदी मन लावून घरटं उभं करायला धडपडत. कोळिष्टकं, केस,वाळलेल्या काडया, पालापाचोळा यांबरोबरच ह्यावेळी याने,कुठून कुठून छोटे छोटे प्लॅस्टिकच्या कागदाचे तुकडेही गोळाकरून घरट्याला बाहेरून जोडले! मधून मधून इतर पक्ष्यांची पिसं पण चोचीत दिसत. ती अंडी आणि पिल्लांसाठी मऊ मऊ गादीसाठी म्हणून आणत.

चोचीत काड्या आणल्या की कॉपरपॉडवर बसून आधी खूप बडबड करायची. घरट्यापाशी कुणी नाही ना? याची खातरजमा करून घ्यायची आणि मगच घरट्यापाशी जाऊन त्याची बांधणी करायची! मी 'ह्यांना' म्हटलं सुद्धा, "आम्ही घरटं बांधतो आहोत याची इतकी कशाला जाहिरात करायला पाहिजे? आपली मनी, आसपासचे कावळे यांना समजलं तर शिंजिराचं काही खरं नाही." त्यावर मला 'घरचा आहेर' मिळाला! "अगं बडबड करते ना ती मादी शिंजीर आहे; आणि ती केल्याशिवाय तिचं कसं होईल? पण काही म्हण 'तिची' बडबड, चिवचिव गोड तरी आहे!! छान वाटतं ऐकायला!!!" आता ते दोघंही आले की चिवचिवाट करतात हे काय मला माहीत नाही? पण टोमणे मारण्याची एकही संधी सोडेल तर तो नवरा कसला!!

सरते शेवटी ७-८ दिवसांत घरटं पूर्ण झालं. आत बाहेर ये-जा करण्यासाठी अगदी छोटी आणि अगदी कंपासने आखून घ्यावी अशी एक गोलाकार खिडकी ठेवली होती. त्यात आलटून पालटून ते दोघं बसायचे. पोट आणि शेपटी आत आणि चोच बाहेर अशा पोझिशनमधे. बाहेरून कळायचं पण नाही की चोच आहे की वाळकी काडी! इतके बेमालूम लपून जायचे ते! आणि त्या वाळक्या फांदोर्‍यांमधे ते घरटं पण पटकन दिसायचं नाही.

१२-१३ दिवसांनी दोघांची लगबग सुरू झाली त्यावरून आम्ही अंदाज बांधला, की पिल्लं बाहेर आलेली दिसताहेत. आणि मनोमनी त्यांचं अभिनंदनही केलं. पण कितीही प्रयत्न केला तरी पिल्लं काही दिसली नाहीत. एक दिवस मात्र अगदी ३ छोटे गोळे कॉपरपॉडवर ओझरते दिसले. त्यावरून समजलं, किती पिल्लं होती ते.

पिल्लांची शाळा सुरू झाली पण त्यांचं ट्रेनिंग आम्ही बघू शकलो नाही. एकतर पिल्लं पटकन दिसतील इतकी मोठी नव्हती आणि शिवाय पानांमधे ती इतकी बेमालूम लपून जात की त्यांचं अस्तित्व जाणवत नसे. पिल्लं बाहेर येऊन १-२ दिवसांतच त्या पूर्ण कुटुंबाचा मुक्काम आमच्या इथून हलला; कारण नंतर ते दिसले नाहीत.

दिसतो फक्त त्यांनी काडी काडी जमवून हिरीरीने बांधलेला खोपा........
जितक्या सहजपणे त्यांनी बांधला तितक्याच सहजपणे कुठलंही ममत्व न ठेवता सोडलेला................

एक गोष्ट मात्र खरी; की त्यांचा खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे.

IMG_5500-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

bird.JPG

हा सुगरण पक्षीच आहे ना? की हा सनबर्ड आहे?

bird nest.JPG

हे ह्या पक्षाचे घरटे. गणपती गडदच्या ट्रेकदरम्यान काढलेले हे फोटो आहेत.

कविन - ही सगळी सुगरणीची (व्हीवर बर्ड) घरटी - माझ्या याआधीच्या पोस्टमधे मी त्या सुगरण पक्ष्याचा फोटो दिलाय .......

शशांक, शेवटी सगळे नवरोबा एकजात सारखे ! >>>> हो ना - घरटे काय किंवा काहीही इतर विधायक करायला गेलात तरी बायकोच्या सूचनांपासून सुटका कशी ती नाहीच ...... Happy Wink

सुंदर लेख आणि लिहिलेही गेले आहे अगदी कौटुंबिक प्रेमाच्या ओढणीने. "...खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे...." ~ हे वाक्य तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितल्यासारखेच उतरले आहे. एखादे कार्य आवडीने करत असताना त्याची अखेर काय होईल याची चिंता न करता निखळ मनाने ते पूर्ण करणे इतकेच ध्येय ठेवले म्हणजे शेवट काहीही झाला तरी झोळी आनंदाने भरतेच.

मी हा पर्पल सनबर्ड पक्षी पाहिला आहे....[ज्यांच्या आवारात घरटे लागले होते, ते झूलॉजीचे प्राध्यापक त्याला 'सिंजीर' म्हणत...कदाचित शिंजीरही म्हणत असतील....]. सूर्यप्रकाशात चकाकणार्‍या रंगांचे मेटॅलिक रंगसंगती हा पक्षी होता....सतत हालचाली करत होता....घाबरत होता असे मात्र वाटले नाही. बर्‍याच पक्षांमध्ये नर प्रामुख्याने घरटे बांधण्यात पुढाकार घेतो असे समजले जाते...पण इथे मात्रे मादीकडे हे काम असते [असे ते सर म्हणाले...].

पण इथे मात्रे मादीकडे हे काम असते [असे ते सर म्हणाले...].>>>हे खरं असेल तर काम करणारी बायको आणि बडबड करणारा नवरा होता वरील लेखात उल्लेख केलाय तो असं म्हणायला वाव आहे Wink

शांकली किती सुंदर मांड्लास अनुभव. नगरातल्या कडुलिंबावर सकाळीच खूप शिंजिर येतात.
काळे चमकदार आणि खाकी पोटाचे. नर आणि मादी ना?
आणि काय रे शशांक....<<<<<<<<<..इथेच चुकतं तुम्हा बायकांचं ....>>>>>>>>.इथेही?????????????????(:दिवा:)

तो "बाया" म्हणजेच सुगरण पक्ष्यातला नर जरा जास्त स्मार्ट असतो - सगळे घरटे विणून झाल्यावरच "ति"ला बोलावतो - ते पहायला>>>> नाही नाही. सुगरण पक्षी जवळपास अर्धे घरटे झाले की मादीला बोलावतो. जर मादीला आवडले नाही तर ते घरटे अर्धे तसेच सोडुन पुन्हा नव्याने बांधतो ( त्यापेक्षा पहिल्यापासुन विचारले असते तर ... Wink )

लेख सुंदर. Happy

<<सुंदर लेख आणि लिहिलेही गेले आहे अगदी कौटुंबिक प्रेमाच्या ओढणीने. "...खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे....">>खूप छान लिहिलेय !

मस्तच लिहिलयसं शांकली Happy
खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे....">> +११११११

फार फार सुरेख! आमच्या घरी पण जाईच्या वेलावर सनबर्ड घरटे बांधत असे ते पाहायला मजा यायची! नेमका परीक्षांचा मौसम आणि हे बांधकाम एकाच वेळी! मग मी बराच वेळ पुस्तकं बाजूला ठेवून त्या घरट्याकडे बघत बसायचे! आहा! काय भारी आठवणी जाग्या केल्यात! धन्यवाद!

किती प्रेमानं लिहिलयस हे शांकली.
<<जितक्या सहजपणे त्यांनी बांधला तितक्याच सहजपणे कुठलंही ममत्व न ठेवता सोडलेला..............<<>>
जियो...

शांकली, सुंदरच!

जितक्या सहजपणे त्यांनी बांधला तितक्याच सहजपणे कुठलंही ममत्व न ठेवता सोडलेला >>> यावर एक 'घरचा आहेर' द्यायला सांगा - इथे मायबोलीवर.

खरे आहे सहज ओघवते लिहीलेले आहे.
>>>>>>>>>एक गोष्ट मात्र खरी; की त्यांचा खोपा जरी रिकामा असला, तरी माझी झोळी मात्र त्यांनी आनंदाने भरून दिली आहे.
हे वाक्य फार आवडले.
जिप्सी यांनी उधृत केलेली कविता सुंदर आहे.

Pages